
आपल्याला झोप येणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या प्रमाणेच पशू पक्षीही झोपत असतात. आपण अंगमेहनत करून किंवा मानसिकरीत्या थकलो कि आपल्याला आपोआपच झोप लागते. एक शांत झोप घेतल्यानंतर आपल्याला ताजेतवाने व स्फूर्तीदायक वाटू लागते. तसेच पुन्हा मेहनत करण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. कारण शांत झोप घेतल्यामुळे केवळ आपल्या शरीरासच आराम मिळत नाही. तर आपल्या मनावरचा ताण देखील कमी झालेला असतो. त्याचबरोबर आपल्या विचारांनाही नव्याने चालना मिळते. त्यामुळे झोपेचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या धकाधकीच्या व प्रतिस्पर्धांच्या युगात आपली आत्मिक शांतता भंग पावण्यास अनेक कारणे अस्तित्वात आहेत. परंतू जोपर्यंत आपण शांत झोप घेण्यास समर्थ आहोत. तोपर्यंत आपल्या शिणलेल्या मनावर नैसर्गिकपणे सुश्रुषा होण्यास मदत मिळत राहते. एखादे लहान बाळ कोणत्याही मानसिक दडपणाशिवाय निरागसपणे झोपलेले पाहून आपल्याला समाधान मिळते. कारण मोठे होता होता शांत झोप येणे, पडता क्षणी डोळा लागणे हे सुखद अनुभव आपल्या आयुष्यात दुर्मिळ होत जातात. अनेकदा परिश्रम करून दमल्यावरही आपल्याला गाढ झोप लागत नाही. कारण अनेक गोष्टींचे ताण आपल्या मनास सहजा सहजी शांत होवू देत नाहीत. कळत नकळतपणे चिंता आपल्या मनाला आतून पोखरत असतात. म्हणूनच चिंतेला चीतेसमान समजले जाते. कारण ती हळूहळू आपल्याला जाळत असते. आपल्या अवतीभवती पंचपक्वानांची रास लागली असेल. किंवा आपल्याला जे पाहिजे आहे ते सर्व मुबलक प्रमाणात उपलब्द्ध असले. तरी ते तोपर्यंत आपल्या काहीही कामाचे नसते जोपर्यंत आपल्याला भूक लागलेली नसते. त्याचप्रमाणे आपण भौतीकरीत्या कितीही धनवान असलो. आपल्याला झोपण्यासाठी वातानुकूलीत खोलीत मऊ बिछाना अंथरलेला असेल. आल्हाददायक मंद प्रकाशा सोबत सौम्य संगीत कानावर पडत असेल. तरीही आपल्या डोळ्यात नैसर्गिकपणे झोप दाटून येण्यावर आपले नियंत्रण नसते. कारण ह्या सर्व सुख सुविधा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत असतात. परंतू आपल्याला झोप येण्याशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. जर आपण धनवान असूनही एक माणूस म्हणून योग्य नाही. किंवा आपण नुसताच धनाचा साठा केला परंतू आशीर्वादांची जमापुंजी कमावलेली नसेल. तर आपण स्वत:बरोबर एकटे राहू शकत नाही. कारण आपले मन आपल्यावर दोषारोपण करून आपल्याला छळत असते. अशावेळी सर्व आरामदायक सुविधा असूनही आपल्याला झोप यावी म्हणून झोपेच्या गोळ्यांचा आधार घ्यावा लागतो. अन्यथा झोप आपल्या डोळ्यांमधून गायब होते.
आपल्याला झोप येणे, भूक लागणे, रडू किंवा हसू येणे, आपल्याला घाम येणे ह्या सर्व आपल्या शरीराच्या नैसर्गिकपणे घडणाऱ्या प्रक्रिया असतात. तरीही आता अशी परिस्थिती आहे कि ह्या प्रक्रियांचे घडणे किंवा न घडणे हे अत्यंत नियंत्रित व कृत्रिम झालेले आहे. कारण आपण ह्या जगात आपले स्थान, रुतबा, प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी पूर्णपणे व्यस्त झालेलो आहोत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर आपला वेळ व्यर्थ दवडल्याचे भाव आपल्या मनात व तत्सम शब्द आपल्या ओठांवर आपसूकच येत असतात. त्यामुळे भूक लागली कि त्वरीत व झटपट जे मिळेल ते कसेबसे पोटात ढकलून आणि जेवणाला एक काम समजून उरकण्याचा आपला उद्देश असतो. त्याचप्रमाणे झोप येत असल्यास प्रतीस्पर्धांचे भूत मानगुटीवर बसलेलेच असल्यामुळे चहा व कॉफी सारखी पेय अति प्रमाणात प्राशन करून झोपेस टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. घरातील अति जवळचे माणूस जगाचा निरोप घेवून कायमचे गेले. तरी फार थोड्या कालावधीतच आपण काहीही न घडल्यासारखे कोरडे वागू लागतो. त्यामुळे आपल्या मनात असंख्य भावनांचा संचय होवून अखेरीस आपल्याला रडू आवरेनासे होते. तरीही त्याचे कोणास काय स्पष्टीकरण द्यावे ह्या भीतीने आपण अश्रूंना डोळ्यातच लपवून कृत्रिम हास्य आपल्या चेहऱ्यावर बाळगण्याचे कौशल्य अवगत करतो. अंगमेहनतीची कामे करून घाम गाळणे हे कठोर परिश्रमांचे स्वरूप आहे. परंतू आता अंगाला घाम येण्यापासून वाचविण्यासाठी वातानुकूलीत कार्यालयात मोठ्या पदाच्या व उच्च प्रतिष्ठेच्या नोकऱ्या जास्त प्रमाणात स्वीकारल्या जातात. परंतू अंगास घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपल्या शरीरातील जास्तीच्या क्यालरीज ज्या शरीरास नुकसानदायक असतात त्या बाहेर पडतात. परंतू थंड हवेच्या मोहापायी आपण तास न तास एकाच जागी बसून काम करत असतो. परंतू आपले शरीर जास्त काळ एकाच स्थितीत राहिले तर एक दिवस ते आपल्याला जीवन मरणाच्या घातक वळणावर नेवू शकते. कारण शरीराबरोबरच जबाबदार्यांचा ताणही मानसिक आजारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नैराश्यास बळी पडतांना दिसत आहे. कारण काही ना काही कारणांनी आपण आपल्या शरीराच्या नैसर्गिकपणे होणाऱ्या प्रक्रियांना स्वत:च आळा घालत आहोत. किंबहुना आळा घालण्यास आपण विवश आहोत. हे सर्व आपल्या बदलत चाललेल्या जीवनशैलीचे घातक दुष्परिणाम आहेत.
फार पूर्वी म्हणजे विजेचा शोध लागला नसतांनाच्या काळात लोक संपूर्ण दिवस परिश्रम केल्यावर दमून भागून घरी येत असत. त्यानंतर सूर्यास्त होताच रात्रीचे जेवण वेळेत आटोपून वेळेत बिछान्यात जात असत. कारण अंधारामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत होत्या. परंतू वेळेत झोपल्यामुळे ते त्यांच्या शरीरास आवश्यक असलेली पुरेशी झोप पूर्ण करून पुन्हा सुर्योदया अगोदर उठू शकत होते. त्यामुळे त्यांची शारीरिक उर्जा द्विगुणीत व मन प्रसन्न राहत होते. त्यामुळे ते पुन्हा कितीही कष्टाची कामे करण्यास समर्थ राहत होते. कारण त्यांनी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांचे महत्व ओळखले होते. तसेच त्यांना पुरेसा वेळ देवून ते जास्त काळ उर्जावान राहू शकत होते. आताच्या काळात मात्र माणसाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आणणारी कोणतीही कारणे उरलेली नाहीत. आपण आपल्या क्षमतेनुसार कितीही परिश्रम घेवू शकतो. परंतू हीच गोष्ट आता आपल्या पथ्यावर पडलेली आहे. कारण त्यामुळे वेळेत खाणे व वेळेत झोपणे ह्या शरीराच्या अत्यंत महत्वपूर्ण नैसर्गिक प्रक्रियांवर मात्र आता आपले नियंत्रण राहिलेले नाही. कारण आताच्या युगात कामांचे स्वरूपही बदललेले आहे. मजूर वर्गाशी जुळलेले लोक वगळता उरलेल्या वर्गांना अंगमेहनतीची कामे करावी लागत नाहीत. कारण जागोजागी आधुनिक यंत्रणा कार्यरत असतात. त्यामुळे माणसाचा बौद्धिक कस मोठ्या प्रमाणात लागतो. पूर्वी मैदानी लढाया लढाव्या लागत असत परंतू आता मात्र मानसिक लढायांना पेव फुटले आहे. परिणामस्वरूपी ताण तणावा मुळे चिंता, खिन्नता, नैराश्य आपल्या जीवनाला घट्ट वेढा घालत आहे. त्यामुळेच ह्याक्षणी नैसर्गिकपणे शांत झोप न येण्याच्या गंभीर समस्येने लाखो लोक झुंझत आहेत.
आपल्याला गाढ व शांत झोप येणे हे आपल्या आरोग्यासाठी लाभकारक व औषधाचे काम करत असते. त्यामुळेच विज्ञानाने झोपेसंबंधीत अनेक उपयोगी नियम सांगितलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण कमीत कमी सात ते आठ तास शांत झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी अनिवार्य आहे. कारण आपण झोपलो असतांना आपले शरीर व मन आरामस्थितीच्या अवस्थेत असते. ज्यामुळे शरीरात अनेक किरकोळ व अत्यावश्यक किंवा महत्वपूर्ण दुरुस्तीच्या प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होवू शकतात. अन्न पचन, शरीराच्या वेगवेगळ्या भागात जीवनसत्वे व प्रथिने पोहोचणे, रक्ताभिसरण, पेशींच्या दुरुस्ती, हृदयाचे ठोके सामान्य स्तराला आणणे ह्या सर्व घडामोडी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक सैन्य करत असते. आपले शरीर म्हणजे एक यंत्र आहे. तेव्हा त्यालाही सखोल देखभालीची आवश्यकता असते. आपण झोपलो असतांना शरीरातील रोगप्रतिकारक सैन्य जास्त क्रियाशील होते. तसेच आपल्या नकळतपणे आपल्या शरीराची काळजी घेते. त्यामुळेच एक शांत झोप घेवून आपण जागे होतो. तेव्हा आपल्या मनावरचा ताण काही प्रमाणात कमी झाल्यासारखा वाटतो. झोपण्यापूर्वी जर आपण एखाद्या समस्येमुळे विचलीत असलो. तर झोप झाल्यानंतर जेव्हा आपण उठतो तेव्हा त्या समस्येवर काहीतरी तोडगा काढण्याच्या दृष्टीकोनातून आपल्यात विश्वास निर्माण झालेला असतो. कारण झोपेमुळे सुश्रुषा झालेले मन बिकट परिस्थितीचा स्वीकार करण्यास तयार होते. आपले शरीर आयुष्यभर पुन्हा पुन्हा नव्याने घडत असते. जर आपण पुरेशी झोप घेण्याचे महत्व समजून घेतले व त्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर आपल्या मनातील भावनांचे व विचारांचे संतुलन राखू शकतो. अशाप्रकारे नव्याने घडणारे शरीर हे निरोगी व सुद्रुढ ठेवणे हे सर्वस्वी आपल्या हाती असते. प्राण्यांना देखील झोपेचे महत्व ठाऊक असते. जेव्हा ते आजारी असतात किंवा त्यांचे शरीर जखमी असते. तेव्हा ते काहीही न खाता पिता केवळ आराम करतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती त्यांना लवकरात लवकर बरे करते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची झोपण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्यावर सखोल परिणाम करत असते. ज्याप्रमाणे काळ हा आपल्याला कितीही मोठ्या दु:खावर मात करण्यास आपल्याला हिम्मत देत असतो. त्याचप्रमाणे एक स्वस्थ झोप आपल्याला आयुष्याच्या चढ उतारांना सोसण्याची, त्यांना सामोरे जाण्याची व त्यातून मार्ग काढण्याची ताकद देत असते. म्हणूनच म्हणतात जो झोपू शकतो त्याला आयुष्य झेपू शकते.
आजच्या परिवर्तनीय जीवनशैलीमुळे आपली पुरेशी झोप घेण्याची प्रक्रिया सहजरीत्या पूर्ण होत नाही. कारण आपण जास्तीत जास्त पैसा कमविण्याचे एका पेक्षा जास्त स्त्रोत निर्माण करतो. तसेच ते स्त्रोत क्रियाशील करण्यासाठी रात्रंदिवस एक करून कठोर मेहनत घेत असतो. अन्यथा आपल्याला आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणांपर्यंत पैसा कमाविण्यासाठी काम करत रहावे लागते. तरीसुद्धा पैसा हे आजच्या काळातील बहुपयोगी शस्त्र असले आणि तो आपल्या गरजेपुरता कमविण्यासाठी आपण झटत असलो तरी ते योग्यच आहे. परंतू पैस्याच्या हव्यासापोटी आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांकडे जाणून बुजून कानाडोळा करणे ही आपल्यासाठी खूप मोठी चूक ठरू शकते. मोठ मोठी शहरे ज्यांची गणना महानगरांमध्ये केली जाते. तिथे दिवसाप्रमाणेच रात्रीही रहदारी, गजबजलेले रस्ते, दुकाने सुरू असतात. एकंदरीत ती शहरे कधीही झोपत नाहीत. कारण देश विदेशातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक सेवा व हॉटेलची सेवा देणे हा पैसे कमवीन्याचा ठोस स्त्रोत ते आपल्या बहुमूल्य झोपेचा त्याग करून चालवत असतात. काहींना रात्र पाळीच्या नोकरीमुळे झोपेला स्वत:पासून लांब ठेवावे लागते. तरूण पिढी नाईट क्लब, बार, पब अशाठीकानी मौज करण्या साठीही आपल्या झोपेला महत्व देत नाहीत. चोवीस तास सेवा देणारे दवाखाने व औषधांची दुकाने ही देखील लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र तैनात असतात. अशाप्रकारे ह्या ना त्या कारणाने लोक डोळ्यात दाटून आलेल्या झोपेस दूर सारण्यासाठी विवश होतात. आपली अपूर्ण राहिलेली झोप ते दिवसा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतू रात्रीच्या झोपेत व दिवसाच्या झोपेत अंतर असते. कारण रात्रीची निरव शांतता आपल्याला झोपेसोबत मानसिक शांतताही बहाल करते. त्यामुळे रात्रीची झोप आपल्या आरोग्यासाठी एक सुश्रुषा असते. परंतू दिवसा मात्र अवघे जग जागृत असते, क्रियाशील व व्यस्त असते. त्यामुळे सर्वत्र निरनिराळ्या आवाजांचा गोंगाट असतो. म्हणूनच दिवसा शांत झोप घेणे शक्य होत नाही. अशाप्रकारे जीवन जगण्याच्या विवशतेपुढे केलेला झोपेचा त्याग हा कधीकधी आपले जीवनच संकटात टाकण्यास कारणीभूत ठरतो.
आपण आपले जीवन हे नियोजनबद्ध पद्धतीने जगले पाहिजे. कारण जीवनाचा चेहरा मोहरा व त्याचा मार्ग केव्हा निमुळता होईल हे सांगता येत नाही. परंतू आपण जर जागरूकतेने जीवन जगत असलो तर काळ कितीही वक्री झाला तरी आपण त्याच्याशी शांततेने निपटू शकतो. युवावस्थेतील उमेदीच्या काळातच आपण आपल्या आयुष्यासाठी ठोस योजना आखली व त्या योजनेवर अंमलबजावणी केली. तर आयुष्याच्या कोणत्याही वळणावर गोष्टी आपल्या हाताबाहेर जाणार नाहीत. ह्या विश्वासानेच आपल्याला रात्री शांत झोप लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येक सकाळ ही आपल्यासाठी स्फूर्तीदायक असेल. लहान मुलांसारखी सुखद झोप घेण्यास मोठेपणीही आपण समर्थ असलो तरच आपल्या आयुष्यात सुरक्षेची व अनंत सम्भावनांची दारे उघडी होतील. आयुष्यात सर्वकाही मिळविल्यानंतर व आयुष्याची सर्व रुप पाहिल्यानंतर जेव्हा आपण स्वत:बरोबर एकटे असतो. तेव्हा आपल्याला मानसिक शांतते शिवाय अन्य कशाचीही आवश्यकता वाटत नाही. तसेच मानसिक शांतता मिळविण्याचे झोप हेच एक माध्यम आहे. आयुष्य जगत असतांना आपण दोन प्रकारच्या भयाचा सामना करत असतो. पहिल्या प्रकारात आपल्यावर कोणतेही संकट आल्यास आपण स्वत:च्या सुरक्षेसाठी इतके कासावीस होतो कि सर्व गोष्टी सोडून आपण स्वत:चा बचाव करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तर दुसऱ्या प्रकारात संकटांची चाहूल लागताच आपण संकटाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचे आकलन करतो. कारण आपल्या मनात भीती असते कि आपण केलेली तयारी अपुरी पडता कामा नये. जर आपल्या मनात दुसऱ्या प्रकारची भीती असेल तर उत्तम गोष्ट आहे. कारण त्याच गोष्टी मुळे आपले वय व वेळ आपल्या हातात असे पर्यंत आपण पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित केल्यास संपूर्ण आयुष्य पुरेशी झोप घेण्याचे सुख आपण अनुभवू शकतो. तसेच आपल्या आरोग्याची सर्व सूत्र आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो.
1 अतिविचार करण्याची सवय आपल्या झोपेत व्यत्यय आणते
विचार करणे ही उत्तम गोष्ट आहे. विचार करून निर्णय घेणे, विचार करून बोलणे तसेच आपल्या वर्तनाचा काय परिणाम होईल हा विचार करून कोणतेही वर्तन करणे हे एका सुज्ञ माणसाचे लक्षण असते. कारण त्यामुळे पुढच्या अघटीत घटना टाळता येवू शकतात. त्याचप्रमाणे गोष्टींना आपल्याला हवे तसे वळण देता येते. परंतू अतिविचार करण्याची सवय वस्तुस्थितीला चीघळवीन्यास, मानसिक ताण तणाव उत्पन्न करण्यास, आरोग्यास हानिकारक व आपली झोप पळवीन्यास कारणीभूत ठरते. कारण अतिविचार हे आपल्या मनात चिंता उत्पन्न करत असतात. अतिविचारांच्या स्थितीत असतांना आपण एखादी घटना घडून गेल्यानंतर जे घडले नाही. ते घडले असते तर काय झाले असते ह्या मुद्द्यावरून आपल्या मनात भीती जागवितो. त्याचप्रमाणे एखादी घटना भविष्यात घडणार असेल. तर सर्वकाही सुरळीत पार पडेल किंवा नाही ह्या अनाहूत भीतीने वर्तमान क्षणातच घाबरतो. त्यामुळे अतिविचार करून कोणताही फायदा होण्यापेक्षा आपलेच व्यक्तीगतरित्या नुकसान होत असते. कारण त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होवून आरोग्यासंबंधीत तक्रारींना आमंत्रण मिळते. आपल्याला जरा रिकामा वेळ मिळाला तरी आपल्या डोक्यात विचारांचे काहूर माजते. तसेच त्याला थांबविणे हे आपल्या नियंत्रणात नसते. रात्री जर असे घडले तर आपल्या डोळ्यांना डोळा लागत नाही. किंवा झोपेत जाग आली तरी अतिविचारांनी तास न तास पुन्हा आपल्याला झोपही लागत नाही. त्याचबरोबर हे घाबरवीणारे विचार आपल्यात केवळ नैराश्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. कारण त्यांच्यामुळे परिस्थितीत कोणताही फेरबदल येत नसतो. तेव्हा अशा सवयी ज्या आपल्यासाठी कोणत्याही दृष्टीकोनातून हितकारक नाहीत त्यांना जाणीवपूर्वक सोडून त्यांच्या जागी सुदृढ सवयी लावल्या पाहिजे. किंवा अतिविचार करण्यासाठी एक सोयीस्कर वेळ ठरवून फक्त तेव्हाच स्वत:ला अतिविचार करण्यास परवानगी दिली पाहिजे. झोपेच्या वेळी मात्र ह्या घातक सवयीस सक्त ताकीद देवून झोपण्याच्या खोलीच्या दारातच थांबविले पाहिजे.
2 समाजाची सेवा करून समाजात आवश्यक बदल घडविणारे महान लोक अति झोपेचा त्याग करतात
जीवन जगण्यासाठी थोडा आराम व जरासा विश्राम हा प्रत्येकासाच गरजेचा असतो. परंतू कायम आपल्या शरीरास आरामस्थितीत ठेवण्याची कल्पना करणे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. कारण असे लोक आपल्या जीवनात कोणत्याही महान कार्यास न्याय देवू शकत नाहीत. किंवा कोणतीही मोठी स्वप्न साकार करू शकत नाहीत. ते फक्त एक सामान्य जीवन जगतात जे फक्त त्यांच्या आस पास गुंतलेले असते. मात्र जे इतरांच्या सेवेचा विडा उचलतात व समाजात असे बदल घडवून आणतात जे शतका नु शतके समाजासाठी हितकारक असतात. अशा थोर महात्म्यांना केवळ झोपच नाही तर आपले व्यक्तीगत आयुष्य देखील पणास लावावे लागते. कारण अति आराम करणे त्यांच्या तत्वात बसत नाही. ते आपल्या देहाचे जणकल्याणासाठी समर्पण करत असतात. परंतू शरीराच्या गरजे पुरता आराम व झोप घेणे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण त्यामुळे आपली उत्पादनक्षमता वाढते. आपल्या कार्याक्षमतेतही त्यामुळे भर पडत असतो. ज्याचा आपण हाती घेतलेल्या कार्यास वेगाने पुढे नेण्यासाठी फायदाही होतो. कारण आपल्या आरोग्याशी बेजबाबदार राहून आपण फार मोठी चूक करत असतो. आपले जीवनच सुरक्षित नसेल तर आपण केलेली कार्य इतिहासात जमा तर होतील परंतू ती बघण्यास आपण मात्र शरीररूपात उरत नाही. तेव्हा आपल्या शरीराप्रती असलेले आपले पहिले कर्तव्य आपण निक्षून पाळले पाहिजे. शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी आपण स्वत:ला पुरेसा वेळ जरूर दिला पाहिजे.
3 आपला हेतू अविचारी व विध्वंसक असला तर झोप आपल्यापासून दूर पळते
आपल्याला शांत झोप येण्यासाठी आपले जीवन समाधानकारक, आपल्या स्वत:प्रती चांगल्या भावना, आपल्या पाठीशी आशीर्वादांची जमापुंजी व आपण झोपलेलो असतांनाही पैसा येत राहील असा सुरक्षित पैस्याचा स्त्रोत आपल्यापाशी पाहिजे असतो. परतू आपण जर पैसा कमाविण्यासाठी अनौपचारिक मार्गाचा अवलंब केलेला असेल. इतरांच्या पैस्यावर आपली वाईट नजर असेल. आपण आपल्या स्वार्थासाठी इतरांची मन दुखावली असतील. तर आयुष्यात कधी ना कधी आपल्या मनात आपण दोषी असल्याची भावना जागृत होते. तसेच ही भावना आपल्या मनात वादळ निर्माण करत असते. कारण आपण पैसा कमाविण्याच्या नादात आशिर्वादांचे कवच किंवा पाठबळ मिळवलेले नसते. आपण जर कोणासाठी वाईट विचार करत असलो किंवा इतरांसाठी व्यक्तीगत शत्रुत्व ठेवून खड्डा खणात असलो तर त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनाची अवस्था खराब होते. तसेच कधीकधी इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडतो. तेव्हा एक माणूस म्हणून आपण नेहमी माणुसकीच्या धर्माला धरून चालले पाहिजे. ज्या गोष्टी आपला एक माणूस म्हणून उद्धार व उन्नती करतील त्यांची कास धरली पाहिजे. आपल्या मनात लालसेचे अंकुर फुटू न देता इतरांच्या सेवेने आपला जन्म सार्थक करून समाधानाने जगले पाहिजे. जर आपण अशाप्रकारचे जीवन स्वीकारले तर आपल्याला आपल्या नजरेत स्वत:साठी अभिमान दिसतो. ज्यामुळे आपण मानसिक शांततेचे धनी होतो. त्याचप्रमाणे आजीवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे कोणत्याही दडपणाशिवाय झोपण्यास समर्थ राहू शकतो.
4 शरीरातील एखाद्या जुन्या आजारामुळे आपल्या झोपेत बाधा निर्माण होते
बरेच जण एखाद्या जुन्या आजारपणामुळे गेली कित्येक वर्ष अंथरुणाला खिळलेले असतात. एकाच परिस्थितीत व एकाच ठिकाणी राहून ते निराश झालेले असतात. त्यापेक्षा लवकरात लवकर आपल्याला मृत्यू यावा व आपण ह्या शरीरातून मुक्त व्हावे अशी आशा ते करत असतात. कारण आपल्यामुळे इतरांना त्रास झालेला त्यांना सहन होत नाही. ते एका ठिकाणी असले तरी त्यांचे डोके मात्र पूर्णवेळ नकारात्मक विचारांनी व्यापलेले असते. त्याचा असर त्यांच्या झोपेवरही होत असतो. त्याचप्रमाणे आपले मन प्रफुल्लीत ठेवण्यासाठी आपल्याला काही अपेक्षित बदलांची आवश्यकता असते. परंतू आजारी व्यक्ती कडे तो विशेषाधिकार नसतो. चोवीस तास एकाच वातावरणात राहिल्यामुळे त्यांनी आपला आत्मविश्वास गमावलेला असतो. तसेच चिंतेने त्याच्या मनात ठाण मांडलेले असते. त्यामुळे ते आपल्या विचारांबरोबर मैत्री करून आयुष्य जगत असतात. परिणामस्वरूपी झोपेसोबत त्याचे वैर झालेले असते. जेव्हा आपले आरोग्य सुदृढ असते तेव्हा अंथरुणात जावून तास न तास झोपण्यास आपण आतुर असतो. परंतू जेव्हा आजारपणामुळे आपण अंथरुणास खिळतो तेव्हा मात्र आपल्याला झोपण्याचा तिटकारा येतो. कारण तेव्हा अंथरुणावर पडून राहणे ही आपली विवशता असते. परंतू झोप येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून तिला आपण आपल्या नियंत्रणात आणू शकत नाही.
इंसोमनिया ह्या झोपेसंबंधीत आजाराशी आता लाखो लोक झुंझत आहेत. त्यांना होणाऱ्या त्रासाची कल्पना करणेही कठीण आहे. ते दररोज सकाळी आपल्या दिवसाची सुरवात निरुत्साहाने करतात. ज्यामुळे संपूर्ण दिवस त्यांच्या अंगात आळस भरलेला असतो. काम करतांना त्यांना सुस्ती येते. झोपण्याची इच्छा होते. परंतू नाईलाजास्तव त्यांना तेव्हा तसे करणे शक्य नसते. तेव्हा सुस्ती घालविण्यासाठी ते चहा कॉफी जास्त प्रमाणात प्राशन करतात. कारण त्याशिवाय ते उत्पादनक्षम राहू शकत नाहीत. परंतू रात्र होताच पुन्हा त्यांच्या मनात झोप न येण्याची भीती भरते. त्यांचे डोळे कोरडे वाटू लागतात व झोप त्यांच्यातून गायब होते. अशावेळी त्यांना अतिविचार करण्याची सवय लागते. ते विचार जास्तीत जास्त नकारात्मकतेने व भीतीने युक्त असतात. संपूर्ण रात्र अशाप्रकारे न झोपता काढणे म्हणजे त्यांच्यासाठी एखाद्या शिक्षेप्रमाणे असते. त्यामुळे ते कोणत्याही दिवसाची सुरवात आनंदाने व स्फूर्तीने करू शकत नाहीत. अशाप्रकारच्या ह्या आजारासाठी आपल्याला असलेल्या वाईट सवयी, औषधांचे दुष्परिणाम, मनावरचा ताण तणाव, स्क्रीनटाईम चे वाढते प्रमाण, जेवणाच्या व झोपेच्या वेळा न पाळणे तसेच पुरेशी झोप न घेणे ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. ह्यापैकी काही गोष्टींवर आपण नियंत्रण आणू शकत नाही . परंतू मोबाईल व laptop वर अनावश्यक वेळ न घालविणे, आपली संध्याकाळची दिनचर्या बदलविणे, रात्रीचे जेवण लवकर व पचनास हलके घेणे, झोपण्या अगोदर कोमट पाण्याने आंघोळ करणे, वाचन करणे, काही योगासने जी शांत झोप लागण्यास मदत करतात ती नियमितपणे करण्याची सवय लावणे ह्या काही उत्तम गोष्टी आपल्याला इंसोमनिया ह्या आजारापासून मुक्त करण्यास हितकारक ठरू शकतात. कारण झोप न येणे ही प्रक्रिया जीवघेणी नसली तरी हळूहळू ती आपल्या चिंतेचा विषय बनत जाते. तसेच चिंता ही चीतेसामान असते. म्हणूनच पुरेशी झोप घेणे हा आपल्या सुदृढ मानसिक आरोग्यासाठी असलेला महत्वाचा मूलमंत्र आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.