आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक हालचालीतून केवळ माणुसकीलाच प्रोत्साहन दिले पाहिजे.

1. स्वत:चे व्यक्तीमत्व मान्य करावे  

   आपल्याला ह्या जगात आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारायचे असल्यास सर्वप्रथम आपले अस्सल व्यक्तीमत्व आपल्याला अवगत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत केले पाहिजे. कारण आत्मप्रेम आपल्याला आपल्या मनात डोकावून बघण्यास प्रवृत्त करते. आपण जसजसा आपल्या मनाचा तळ गाठण्यासाठी पुढे सरसावू लागतो तसतसा आपल्याला स्वत:शी निगडीत नवनवीन रहस्यांचा उलगडा होत जातो. अशाप्रकारे जेव्हा आपल्याला हळूहळू करून आपल्या व्यक्तीत्वाची ओळख पटत जाते. तेव्हा त्यास प्रभावशाली बनविण्याचा निर्णय घेवून त्या निर्णयास अस्तित्वात आणण्यासाठी पुर्ण तयारीनीशी पाउल उचलावे. जेणेकरून आपले व्यक्तीमत्व लाखात एक तेजस्वी होत जाईल. आपला मुळ स्वभाव जो लहानपणापासून घडत गेला आहे. त्यामधील गुणदोषांचे आकलन करून ज्या गोष्टी आपल्याला प्रभावशाली बनण्यास अडथळा निर्माण करत आहेत. त्यांचा ठरवून समूळ नायनाट करण्याची आपली तयारी असली पाहिजे. हिरा जेवढा जास्त सुबक व चमकदार दिसतो तेवढे त्याच्यावर आघात झालेले असतात. तसेच सोन्याला लालबुंद भट्टीत तापविल्याशिवाय त्यास झळाळी येत नाही. त्याचप्रमाणे आपण स्वत:लाही प्रभावी व्यक्तीमत्व बनविण्यासाठी कठोरातल्या कठोर परीक्षणास सामोरे घेवून गेले पाहिजे.

2. इतरांना आपली किंमत पटवून द्यावी

   आपण स्वत: जोपर्यंत स्वत:ची किंमत करत नाही तोपर्यंत कोणिही आपली किंमत करत नाही. तेव्हा सर्वप्रथम आपण स्वत:ची एक माणूस म्हणून किंमत केली पाहिजे. त्यानंतर स्वत:च्या नजरेत उंच उठण्या करीता प्रामाणीकपणा दयाभाव ह्या सद्गुणांना आवर्जून अंगीकारले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या निष्ठापूर्वक केलेल्या कष्टाची कदर केली पाहिजे व त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी झटले पाहिजे. कारण प्रामाणिकपणे उन्नती करत गेल्याने व आपला आज कालपेक्षा व उद्द्या आजपेक्षा उत्तम करत राहिल्याने. तसेच कोणत्याही परिस्थितीत हतबल होवून थांबून न जाता परिस्थिती सुधरविण्यासाठी प्रयत्नशील राहिल्याने आपल्या मनातील आपले स्थान गौरवास्पद होत जाते. त्यामुळे उंचावलेला आपला आत्मविश्वास इतरांनाही आपल्याकडे आकर्षीत करतो. तसेच त्यांच्या मनातही आपल्यासाठी खास जागा निर्माण होते. आपण प्रत्यक्षात त्यांच्या संपर्कात नसलो तरी आपले नाव त्यांच्या ओठी कायम असते.

3. आपले मनसुबे निर्धाराने जाहिर करावे

   एखाद्या खाच खळगे असलेल्या रिकाम्या जागेवर लोक कचरा टाकण्यास सुरवात करतात. जोपर्यंत त्या जागेविषयी कोणतिही मोठी घोषणा होत नाही. परंतू जेव्हा त्या जागेचा मालक त्या जागेवर मोठी इमारत उभी करण्याचा फलक लावतो तेव्हापासून लोकांचे कचरा टाकणे आपोआप बंद होते. आपले मनसुबे जाहिर करण्याचे परीणाम असे सामोर येतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपण सामान्य दिनचर्येत जीवन जगत असतो आपल्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. परंतू जेव्हा आपण सर्वांपासून दूर होवून शांततेने आपल्या ध्येयासाठी काम करतो. तेव्हा आपली शिस्त असलेली दिनचर्या बघून इतरांचे आपल्या हालचालींकडे लक्ष जाते. अशाप्रकारे ध्येय जाहिर केल्याने सर्वप्रथम ते आपल्या कानांवर पडते आणि ते पुर्ण केल्याशिवाय आपण शांत बसत नाही.

4. कर्तुत्वाने आपली ओळख निर्माण करावी

  जेव्हा आपण आपल्या ध्येयासाठी एकनिष्ठ होवून एकाग्रतेने काम करतो. तेव्हा इतरांचे आपल्याकडे लक्ष जाते व विश्वासही बसतो. अशावेळी इतर लोक कुतूहलापोटी आपल्या कामाविषयी माहिती काढण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या तोंडून त्यांना हवं ते वदवून घेण्याचा त्यांचा मनसुबा असतो. परंतू सामोरच्या व्यक्तीचा हेतू लक्षात न आल्याने त्याच्या विचारण्यास काळजीने केलेली विचारपूस समजून भावूक होवून आपण त्यास आपल्या ध्येयाची पुर्ण माहिती देण्याची चूक करू नये. त्याचबरोबर त्या व्यक्तीशी कोणताही वादविवाद करण्याचे टाळावे. कारण त्यामुळे आपलीच एकाग्रता भंग पावते. तेव्हा शांततेने व आपल्या ध्येयावर पुर्ण लक्षकेंद्रीत करून अखंडपणे काम करत रहावे. नंतर आपली प्रगती बघून आपल्या क्षमतांची जाणीव आपोआपच सामोरच्याला होत जाईल.

5. मार्गदर्शकाचे कायम आभारी असावे.

  आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शकाची प्रकर्षाने गरज भासते. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही नवीन मार्गावर चालण्याची आपली हिंमत होत नाही. कारण त्यांनी अगोदरच त्या मार्गाचा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे त्या मार्गावरील खाचखळग्यांची अडचणींची त्यांना पुर्ण माहिती असते. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनातून ते नेहमी अशा गोष्टींवर प्रकाश टाकतात कि ज्यामुळे आपल्याला त्यावरून चालतांना कमीत कमी त्रास होईल. तेव्हा कधिही आपल्या मार्गदर्शकाच्या पुढे निघून जाण्याची चूक करू नये. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा नेहमीच मान राखावा.

6. मदत मागतांना भावनीक कारण नाही तर करार पुढे करावा.

   जेव्हा वारंवार आपण कोणाची मदत घेतांना भावनीक कारणे समोर करतो. तेव्हा लोक आपल्याबद्दल मत बनवितात. किंवा कधिकधी आपल्याला मदत करण्यास नकार मिळण्याचाही सामना करावा लागू शकतो. तसेच अशापद्धतीने नेहमी मदत मागण्याची वेळ येत असल्याने आपले स्वत:विषयीचे मतही चांगले राहत नाही. जर आपले आपल्यासाठी मत चांगले राहिले नाही तर आपण आपले प्रभावी व्यक्तीमत्व घडवू शकणार नाही. म्हणून कोणाकडून मदत घेतांना त्या मोबदल्यात काही करण्याचा किंवा देण्याचा करार करावा. त्यामुळे आपल्याला मदतही मिळेल व आपला स्वाभिमानही जपला जाईल. तसेच मदत करणारी व्यक्ती स्वखुशीने मदत करण्यास तयार होईल.

7. आपण नेहमी आनंदी असावे.

  आपला आनंद हा आपल्या जीवनात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांवर विसंबून असतो. काही चांगले व मनासारखे घडले कि आपण त्वरीत आनंदी होतो. मनाविरुद्ध घडले तर मात्र आपला आनंद क्षणात ढासळतो आणि आपल्या चेहर्‍यावर बारा वाजतात. म्हणजे आपल्या आनंदी असण्यात असंतुलन असते. आपला आनंद दिर्घकाळ टिकणारा नसतो. त्यासाठी काहितरी कारण घडट राहावे लागते. परंतू नेहमी आनंदी राहण्याला व आपल्या चेहर्‍यावर स्मीत पसरलेले असण्याला आपण आपल्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग बनवीले पाहिजे. कारण ते सर्वदृष्टीकोनातून आपल्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे आपला आपल्या जीवनाप्रती दृष्टीकोन सकारात्मक राहतो. तसेच आपले प्रभावी व्यक्तीमत्व घडण्यास मदत मिळते.

8. आपले आपल्या रागावर नियंत्रण असावे.

  राग हा आपला सर्वात मोठा शत्रु आहे. कारण रागाच्या भरात केलेल्या कृती तसेच तोंडून निघालेले शब्द कित्येक दुष्परीणामांना कारणीभूत असतात. राग ही क्षणीक भावना असते जी जागृकतेने पार केली किंवा त्याक्षणी आपण शांत राहिलो तर काही वेळानंतर आपण सामान्य स्थितीत येवून योग्य निर्णय घेवू शकतो. परंतू भावनावेगात येवून आपण कोणाचे मन दुखवीले तसेच कोणास क्षती पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे इतके दुष्परीणाम होतात कि ते आजीवन भरून निघत नाहीत. काही वेळानंतर राग शांत होतो परंतू रागाच्या भरात आपल्या हातून घडलेले कृत्य कधीकधी अक्षम्य ठरू शकते. त्यामुळे आपल्याला पश्चातापास सामोरे जावे लागते. तेव्हा आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवीणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय स्थिर राहून विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता स्वत:मध्ये आपण विकसीत करू शकत नाही.

9. इतरांकडून आपल्याला जे अपेक्षीत आहे ते सर्वप्रथम इतरांना द्यावे.

  बर्‍याचदा आपण इतरांकडून अतोनात अपेक्षा ठेवतो. परंतू स्वत:च्या वर्तनाचे परीक्षण करत नाही. इतरांनी आपला मानमरातब ठेवावा तसेच कायम आपल्याशी प्रेमाने व आदराने वागावे हीच आपली मनापासून इच्छा असते. परंतू निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण जे इतरांना वाटतो तेच दुपटीने आपल्याकडे परत येते. तेव्हा आपण नेहमी देण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.  आपले हृदय प्रेमाने व करुणेने व्यापलेले असले पाहिजे. जेणेकरून ते ओसंडून वाहू लागले कि आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक जण त्याने ओलाचिंब होईल. माणुस म्हणून प्रत्येकाचा आपल्याकडून सम्मान झाला पाहिजे. त्याचप्रमाणे दयाभाव व सेवाभावाने स्वत:ला कृतकृत्य केले पाहिजे. त्यानंतर निरपेक्षतेने आपले जीवन जगत रहावे. कारण आपण आपल्या मार्फत जे पसरवीले आहे तेच कितीतरी पटीने आपल्याकडे नक्की परतणार आहे ह्यावर विश्वास ठेवावा.

10. समोरच्या माणसाच्या व्यक्तीमत्वाची ओळख असावी.

   कोणताही व्यवहार करतांना आपल्याला समोरच्या माणसाच्या व्यक्तीमत्वाची ओळख असली पाहिजे. कारण आपल्या बुद्धीमत्तेच्या आधारे युक्तीने कोणाशी व्यवहार करणे सोपे असते. प्रत्येक माणुस हा वेगळ्या विचारसरणीचा असतो. त्यानुसार त्याच्या प्रतिक्रीया समोर येतात. त्यानुसार आपल्या व्यवहारात बदल केल्यास त्यामधून हितकारक लाभ घेता येवू शकतो. त्या व्यक्तीच्या विचारांच्या मर्यादा जिथे संपतात तेथून आपल्या विचारांची सुरवात करावी. तरच अशाप्रकारच्या व्यवहार चातुर्याने दोघांचाही लाभ होतो.

11. प्रतिस्पर्धांचा मोह टाळावा.

   आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रतिस्पर्धा बघावयास मिळतात. परंतू आपल्या आयुष्यात कमीत कमी प्रतिस्पर्धा असणे हे आपल्या मानसिक शांततेसाठी नितांत गरजेचे आहे. त्यापेक्षा स्वत:चे परीक्षण करत व स्वत:ला कठोर कसोट्या लावत आपल्या व्यक्तीमत्वात हळूहळू सुधारणा आणत जाणे उत्तम असते. त्याचबरोबर आपली अद्वीतीय ओळख निर्माण करून स्वत:साठी स्वत:च राजमार्ग निर्माण करून एखाद्या राजा महाराजाप्रमाणे स्वाभिमानाने व आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत राहिल्याने आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आपोआपच इतरांवर पडतो. तसेच मनात कोणाविषयी राग द्वेष नसल्याने आपले स्वनिर्मीत व तेजोमय व्यक्तीमत्व घडत जाते.

12. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे समाजात आपल्याला प्रसिद्धी व प्रतिष्ठा प्राप्त होते.

  प्रभावी व्यक्तीमत्व घडवीण्यासाठी आपण स्वत:वर जास्तीत जास्त काम केले पाहिजे. त्याचबरोबर समाजकार्यात आपला मोठा सहभाग असला पाहिजे. आपले जीवन जनमाणसात प्रेरणास्त्रोत असले पाहिजे. त्यासाठी आपण परोपकाराचा मार्ग अवलंबला पाहिजे. आपल्या दिनचर्येत नियमीतपणे उत्तम पुस्तकांचे पठण करणे असले पाहिजे. ज्यामुळे आपली वैचारीक पातळी उंचावत जाईल. कारण उत्तम व मोलाचे विचार आपल्या व्यक्तीमत्वात आणखीच भर घालत असतात. बर्‍याच लोकांचा असा समज असतो कि जर आपण भौतिक श्रीमंतीचे धनी असलो तर समाजात आपल्याला मानमरातब मिळतो. परंतू त्यामुळे जास्तीत जास्त आपली समाजात ओळख निर्माण होते. खर्‍या अर्थाने मानसन्मानाचे धनी आपण तेव्हा होतो. जेव्हा आपल्या अस्तित्वाने इतरांच्या आयुष्यात आनंद येतो. आपल्या परोपकाराने काही जणांचे जीवन सुखी करण्यात आपला खारीचा वाटा असतो. अन्यथा आपली भौतिक संपत्ती इतरांच्या काहीच उपयोगाची नसते. दयाभाव व सेवाभावच आपल्या व्यक्तीमत्वास खऱ्या अर्थाने प्रभावी बनवीत असतात.

   आपली शरिरयष्टी, आपले दिसणे, आपला पेहराव आपला पेशा तसेच आपली भौतिक श्रीमंती फक्त ह्या वरवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीच आपल्या व्यक्तीमत्वाला प्रभावी बनवीण्यास कारणीभूत आहे असा आपला समज असतो. तसेच त्यामुळे समाजात आपला रुतबा असतो असेही आपल्याला वाटते. परंतू हा केवळ समज आहे. कारण ह्या सर्वांच्या जोडीला जर आपल्यापाशी दयेने व करुणेने भरलेले मन असेल, सर्वांच्या कल्याणास पात्र असे सुसंस्कृत विचार असतील तसेच विचारांना प्रत्यक्षपणे अस्तित्वात आणण्यासाठी अंगी सामर्थ्य असेल तर आपले प्रभावशाली व्यक्तीमत्व उभारण्यास आपल्याला काहीही अडचण येणार नाही. कारण आपल्या अंतकरणात रुजलेली माणुसकीची मुल्यच आपल्या व्यक्तीमत्वाला प्रभावशाली बनवत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *