नवरात्रीचे नऊ रंग

नवरात्री हा दुर्गा मातेच्या दिव्य रुपांचा व स्त्रिशक्तीचा सोहळा आहे. स्त्रियांच्या मांगल्याचा व मातृत्वाचा सम्मान आहे. स्त्रियांनी प्रत्येक युगात त्यांच्यातील अविश्वसनीय क्षमतांना सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्रि सामर्थ्य हे कायमच पुजनीय व वंदनीय आहे. स्त्रियांनी समाज निर्मीत सिमांना ओलांडून आकाशाला गवसणी घातली आहे. आजच्या युगातील स्त्रियांची प्रगती बघता त्यांनी किती मोठा पल्ला गाठला आहे ह्याची प्रचिती येते.

  कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी असो, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी असो किंवा मोडक्या संसाराची धुरा सांभाळण्यासाठी असो कारणे काहिही असो परंतू स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडला आहे. तसेच अनेक क्षेत्रात त्यांनी त्यांचे पाय घट्ट रोवले आहेत. स्त्रियांनी स्वत:मधील कमतरतांना व त्यामुळे पदोपदी होणार्‍या अपमानाला तसेच अवमानाला संयमाने सहन केले. त्याचप्रमाणे त्यामुळे मनात निर्माण झालेल्या ठिणगीला कारण बनवून तिचा स्वत:ची प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून वापर केला.  

  आजच्या सामान्य स्त्रियाही राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तुत्वाने प्रेरीत आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी पाठीशी पुत्राला बांधून शत्रुला लढा दिला होता. आजच्या स्त्रिया आपल्या संसारासाठी मुलांना पाठीशी व पोटाशी बांधून घरोघरी जावून फूड डिलीवरी करतांना दिसतात. आज अशा अशा क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी पदार्पण केले आहे ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. अशाप्रकारे स्त्रिया ह्या निश्चयी व खंबीर मनाच्या असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणी थांबवू शकत नाहीत. परंतू महिशासुरासारखे विकृत राक्षस आजही वेगवेगळ्या रुपात समाजात अस्तित्वात आहेत. ज्यांच्याशी स्त्रिया अजूनही लढा देत आहेत.

  दुर्गा मातेने महिशासुर ह्या राक्षसाला नेस्तनाभूत करण्यासाठी तब्बल नऊ दिवस त्याच्याशी सामना केला. आणि दहाव्या दिवशी त्याला संपवून विजय मिळविला. त्याचबरोबर संपुर्ण ब्रम्हांडात स्त्रीत्चावाचा ठसा उमटविला. त्या नऊ दिवसात दुर्गामातेचे नऊ रूपे व नऊ  गुण पुढे आले आणि त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली.

   त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनातही स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात. जी ह्या ना त्या मार्गाने सर्वांच्या उपयोगी पडत असतात. आई हे स्त्रिचे अद्भुत रूप आहे. जी आपल्या मुलांसाठी आपले जीवन निस्वार्थपणे पणाला लावते. बहिण ही भावाची  अत्यंत जीवाभावाची व हितचिंतक असते. तसेच त्यांचे नाते आंतरीक असते. पत्नी हे स्त्रिचे विलोभनीय रूप असते. जी सुख दु:खात कधिही पतीची साथ सोडत नाही. मुलगी हे स्त्रिचे अत्यंत लोभसवाणे रूप असते. आई-वडीलांसाठी मुलगी एक खास भेट असते. अशाप्रकारे नात्यांच्या स्वरूपात स्त्रियांचे विविध पैलू व विविध स्वरूपे जणूकाही साक्षात जगदंबेचेच प्रतिनिधीत्व आपल्या सभोवताल करत असतात.  

  स्त्रि ही कमजोर नाही तर शक्तीचे रूप आहे. तेव्हा तिच्या आपल्यावरच्या कोपाला कधीही गृहीत धरू नये. तसेच तिची सर्वतोपरी सोबत मिळविण्यासाठी आपल्या अंगी विनम्रता बाळगावी. दुर्गामातेने महिशासुराचा वध केला परंतू अशा विकृत राक्षसांचे पृथ्वीवर येणे कधिही थांबले नाही. ह्या विकृतीने समाजाला वाळवी प्रमाणे पोखरले आहे. आपल्या संस्कृतीला कलंकीत केले आहे. आणि लेकीबाळींच्या जगण्याचा आनंद हिरावून घेतला आहे. आज स्त्रियांचे व मुलींचे शिक्षण व नोकरीनिमीत्ताने घराबाहेर पडणे सुरक्षीत राहिलेले नाही. नोकरीच्या जागा स्त्रियांवर पडणाऱ्या घाणेरड्या नजरांनी भ्रष्ट झाल्या आहेत. दररोज ऐकण्यात येणार्‍या मुलींवर होणार्‍या अत्याचारांच्या बातम्यांनी आई-वडीलांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. मुलींनी घराबाहेर पडूच नये असे आई वडीलांना वाटते. परंतू हा काळ मुलींनी घरी बसण्याचा राहिलेला नाही. आता त्या कशालाही न जुमानता प्रगती पथावर चालु लागल्या आहेत. आज स्त्रियांसाठी अनेक कायदे आहेत. त्याचप्रमाणे स्त्रिया स्वत:ही सक्षम आहेत.

   स्त्रियांनी स्वत:च दुर्गामातेप्रमाणे कंबर कसून स्वत:मध्ये स्त्रीत्व जागृत करण्याची आवश्यकता आहे. परंतू काही अत्याचार पिडीत मुली स्वत:ची जीवनयात्रा संपवून मोकळ्या होतात. कारण गुन्हेगारास कठोर शासन मिळत नाही. परंतू आता हा विचार करण्याची वेळ आली आहे कि समाजात अशा विकृती निर्माण कशा होतात. तेव्हा आज प्रत्येक आईने दुर्गेचे रूप धारण केले पाहिजे. आईच मुलांना योग्य संस्कारात वाढवू शकते. तरिही जर आपले अपत्य समाजासाठी घातक ठरत असेल तर त्याच्यामुळे कोणत्याही मुलीस नुकसान पोहोचण्या अगोदर स्वत: आईने आपल्या अपत्यास कठोरपणे दंडीत केले पाहिजे. जेणेकरून समाजात अशा राक्षसांच्या निर्मीतीवरच आळा बसवला जाईल.

  दुर्गेच्या नऊ रुपांची वेगवेगळी नावे त्याचबरोबर वेगवेगळे महत्व सुद्धा आहे. ह्या युगातील स्त्रियांमध्येही त्याची झलक बघायला मिळते. ह्यावरून स्त्रियांनी राखेतून झेप घेतली असेच म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

   शैलपुत्री म्हणजे पर्वताची मुलगी. पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले स्थान निर्माण करणे किती त्रासदायक ठरणार आहे हे दुर्गामातेसही ठाऊक होते. परंतू प्रत्येक युगातील मातेचा दैवी अंश आपल्या हृदयात लेवून आलेल्या स्त्रियांनी हे पर्वत चढण्याईतके कठिण काम करून समाजात आपले भक्कम स्थान निर्माण केले. स्त्रियांची शारिरीक दुर्बलता बघूण त्यांना कमजोर ठरविण्यात येत होते. परंतू स्त्रियांची खरी शक्ती त्यांच्या अंतर्मनात व त्यांच्या स्वाभिमानात आहे. तेव्हाच सृष्टीने सृजनाची महत्वपुर्ण जबाबदारी स्त्रियांवर सोपविली आहे. जेव्हा स्त्रियांचा स्वाभिमान जागृत होतो तेव्हा त्या शक्तीचे रूप धारण करतात आणि अनेक अविश्वसनीय कृत्यांना आपल्या द्वारे न्याय देतात. स्त्रियांचा त्यांच्या कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा, एकाग्रता, जीवतोड मेहनत घेण्याची तयारी आणि मनात असलेला विश्वास ह्या बहुमूल्य गुणांच्या आधारे त्यांनी समाजात आपली जागा  अशी निश्चीत केली कि ज्याला कोणिही नाकारू शकत नाही.

   ब्रम्हचारिणी म्हणजे ज्ञानाची उपासक. एक काळ असा होता जेव्हा स्त्रि शिक्षणावर बंदी होती. स्त्रियांनी शिक्षणाचा विचारही करणे अपवित्र मानन्यात येत असे. स्त्रियांचे विश्व चुल व मुल एवढ्यापुरतेच सिमीत होते. अशा काळातही काही स्त्रिया थांबल्या नाहीत. त्यांनी अत्यंत कठिण परिस्थितीत स्वत: शिक्षण घेवून आपल्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसारही केला. आणि आपल्या सारख्याच अन्य  स्त्रियांना शिक्षीत करण्याचे श्रेष्ठ कार्य केले. त्यातले एक थोर नाव पुढे येते, ते म्हणजे ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”. सावित्रीबाई  फुले ह्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानल्या जाते. त्या समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व कवियीत्री होत्या. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षीका होत्या. त्यामुळे  त्यांचा जन्मदिवस म्हणजे 3 जानेवारी मुलींच्या शाळेत ”बालिका दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. अशा ह्या धाडसी, कणखर व शिक्षण घेवून स्वत:ला सुसंस्कृत बनविणार्‍या स्त्रियांमध्ये आपल्याला निश्चितच दुर्गेच्या ब्रम्हचारिणी ह्या रूपाचे दर्शन घडते.

   दुर्गेचे चंद्रघंटा हे रूप हरहुन्नरी पणाचे प्रतिक आहे. ज्यात स्त्रिया अत्यंत निपुण असतात. स्त्रिया ह्या तीन डोळ्यांच्या धनी असतात. त्यांचा तिसरा डोळा म्हणजे त्यांचे मन असते. जेव्हा त्या कोणतेही काम करत असतात. तेव्हा तिथे उपस्थित असतातच. त्याचबरोबर मनाच्या माध्यमातून अन्य कामावरही लक्ष ठेवून असतात. अशाप्रकारे त्यांच्यात एकाच वेळी अनेक कामे करण्याचे कौशल्य असते. सकाळी मुलांचे आवरून, घरातील सर्व आपल्या योजनेप्रमाणे आटोपून वेळेत ऑफिसात पोहोचतात. त्यांचे शरीर कितीही दमले तरी मनाने त्या नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे आजच्या युगातील स्त्रियांनी देवीच्या चंद्रघंटा ह्या रुपाला खर्‍या अर्थाने सिद्ध केले आहे. त्यांना लाभलेली मातृत्वाची देणगी सांभाळत उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. त्याचबरोबर घरात  व घराबाहेर त्यांच्या नावापुढे लागलेल्या पदव्यांना न्याय देण्यासाठी चोविस तास झटत असतात. आणि तरिही एक स्त्रि म्हणून सुद्धा पुरून उरतात.

   दुर्गामातेचे कुष्मंडा हे रूप निसर्गाचे प्रतिनिधीत्व करते. जीने ह्या विशाल सृष्टीची निर्मीती केली. तिला जोपासले व तिचे संरक्षण केले. सृष्टी ही सर्व प्राणिमात्रांसाठी जीवनदायी आहे. जसे आपले आपल्या आईशी घनिष्ट नाते असते तसेच सृष्टीशीही आहे. देवीच्या कुष्मंडा रूपाचे कर्नाटक राज्यातील ”आलादा मरादा थिमक्का” नावाच्या वृक्षमातेने साक्षात दर्शन घडविले. कारण ह्या विलक्षण स्त्रिने आई ह्या शब्दाला खरा अर्थ प्राप्त करून दिला. तिने चार किलोमीटरच्या क्षेत्रात 385 वडाची झाडे लावली व त्यांची जोपासना करून मोठे केले. त्यासोबतच 8000 अन्य झाडेही लावली. ह्या वृक्षमातेस त्यांच्या महान कार्यासाठी भारत सरकारने ”पद्मश्री” देवून सम्मानीत केले. स्वत:ला एकही मुलबाळ नसतांना थिमक्का असंख्य वृक्षांची माता झाल्या.

  स्कंदमाता म्हणजे कार्तीकेयची माता. कार्तीकेय एक योद्धा, धाडसी, पराक्रमी व देवांचा सेनापती होता. त्याला त्याच्या आईचे समर्थन होते. प्रत्येक आई ही स्कंदमाताच असते. अपत्याला घडविण्यात व त्याच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीत आईचाच फार मोठा सहभाग असतो. आपले अपत्य धाडसी व पराक्रमी व्हावे हीच तिची मनापासून इच्छा असते. कारण ती फक्त तिच्या अपत्याची नाही तर तिच्या स्वाभिमानाची लढाई असते. मुलांना पहाटे अभ्यासासाठी उठवणे त्यासाठी स्वत: त्यांच्या अगोदर उठणे, परिक्षेच्या काळात त्यांचे आरोग्य जपणे, त्यांना वेळोवेळी प्रोत्साहीत करणे ह्या सर्व महत्वपुर्ण गोष्टी एक आईच करत असते. प्रत्येकाला आई त्यांच्या जीवनात कायमच हवी असते. भारतमातेच्या सुरक्षेसाठी देशाच्या सिमेवर तैनात विर सैनीकांच्या माता ह्या स्कंदमाताच असतात. कारण त्यांनी त्यांच्या हृदयातील देशप्रेम त्यांच्या मुलांच्या मनावरही बिंबवीले असते.

  कात्यायनी हे दुर्गामातेच्या रागाचे ज्वलंत रूप आहे. जेव्हा राक्षकांनी देवाधिकांचे जगणे कठिण केले तेव्हा देवांच्या मनात रागाच्या ज्वाला भडकल्या. त्याच ज्वालांमधून कात्यायनीचे रूप प्रकट झाले. दुर्गेचे हे रूप संपुर्ण स्त्रि वर्गाला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवीते. एक म्हणजे स्त्रियांना येणारा राग हा अत्यंत प्रभावशाली व परिणामकारक असतो. स्त्रियांचे रागावलेले रूप कोणासही आवडत नाही. कारण त्या रागाच्या मागच्या वेदना व भावनांची विवशता प्रत्येकास कळेलच असे नाही. त्यामुळे रागावलेल्या स्त्रियांना बघून बर्‍याचदा गैरसमजच होतो. परंतू जो कोणी रागाच्या पलिकडे बघण्याचे धाडस करतो तो त्यांना उत्तम रितीने समजू शकतो. दुसरे म्हणजे स्त्रियांना त्यांना येणार्‍या रागाला योग्य दिशा देता आली पाहिजे. जेव्हा स्त्रियांच्या बाबतीत अघटीत घटना घडत असतात. तेव्हा स्त्रिया अत्यंत विचलीत होतात किंवा भांबावून जातात. परंतू त्यावेळी त्यांच्यात ज्या रागाच्या लहरी उठतात त्यामधून निघणार्‍या ठिणग्यांना त्यांनी विझू देवू नये. त्यामधून उर्जा घेवून आणि स्वत:मध्ये योग्य ते बदल आणून येणार्‍या काळात स्वत:ला सिद्ध करून दाखवावे.

   दुर्गामातेचे कालरात्री हे रूप आपल्याला जीवनातील कठिण समयी हिंमत देण्याचे कार्य करते. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात वाईट काळाचा सामना करत असतो तेव्हा आपल्याला मानसिक आधार देणार्‍याची आवश्यकता पडते. हा मानसिक आधार देवीचे कालरात्री रूप आपल्याला देते. सर्वकाही ठिक होईल असे ती म्हणत नाही तर आलेल्या संकटांचा काळ निघून जाईल हा विश्वास ती आपल्यात जागविते. त्यामुळे तिला शुभ व मंगलकारी मानल्या जाते. कारण ती आपल्या जीवनप्रवासात आलेल्या अंधकारात आशेचा दिवा लावण्याचे बळ आपल्याला देते. त्यामुळे नवरात्रीच्या मंगल पर्वाची प्रत्येक जण वाट बघत असतो. कारण देवीच्या उपासनेने आपले मनोबल वाढण्यास मदत मिळते.

   दुर्गामातेचे महागौरी हे रूप कायापालट किंवा परिवर्तनाचे प्रतिक आहे. आजच्या युगात आपल्याला सर्वकाही त्वरीत पाहिजे असते. त्वरीत यश, त्वरीत प्रसिद्धी मिळवून देणार्‍या मार्गांना आपण शोधत असतो. त्याचप्रमाणे आपण स्वत:ला कधीही पुरेसे समजत नाही. कारण आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा काय नाही ह्यावर आपण पुर्ण लक्ष केंद्रीत करतो. त्यामुळे आपल्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण होते. देवांनाही ह्या गोष्टी चुकल्या नाहीत. कालरात्रीचे भस्माने बनलेले रूप पाहून सगळे घाबरले. तेव्हा तिने गंगेत स्नान करून मागचे रूप सोडले व महागौरीचे रूप धारण केले. एखाद्या जीवाचे वर्तमान रूप बघून भविष्यातील त्याच्या परिवर्तीत रूपाची कल्पना आपण करू शकत नाही. सफरचंदाच्या एका बी मध्ये किती सफरचंदं लपली आहेत हे आपण सांगू शकत नाही. एका कॅटरपिलर मध्ये फुलपाखरू होण्याची क्षमता आहे हे समजू शकत नाही. परंतू कायापालट होणे ही एक नैसर्गीक प्रक्रीया आहे व अटळ आहे. महागौरीचे रूप आपल्याला हेच दर्शविते.

   विपरीत परिस्थितीतही स्वत:ला सिद्ध करण्याचे मुर्तीमंत प्रतिक म्हणजे दुर्गामातेचे सिद्धीदात्री रूप आहे. अरुनिमा सिन्हा जिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आले होते. ज्यात तिने आपले दोन्ही पाय गमावले परंतू उमेद हारली नाही. तिने माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे आपल्या मनात निश्चित करून सर्वप्रथम स्वत:चे ध्येय ठरविले. त्यानंतर विपरीत परिस्थितीवर मात करत स्वत:ला सिद्ध केले. त्याचप्रमाणे लिज्जत पापड ही सात महिलांनी सुरू केलेली कोऑपरेटेव्ह मोव्हमेंट आज तिचे मिलीयन डॉलरचे साम्राज्य आहे. जे 43 हजार महिलांसाठी रोजीरोटीचे ठिकाण आहे. येथे आपल्याला सिद्धीदात्री देवीचे दर्शन घडते.

   फुलन ही एका गरिब घरातील मुलगी होती. ती लहनपणापासून बंडखोर होती. वयाच्या अकराव्या वर्षी तिचे लग्न एका 30 ते 35 वर्ष वयाच्या माणसाशी लावण्यात आले होते. त्यामुळे ती कोवळ्या वयातच त्याच्या अत्याचारास बळी पडली. त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी व स्वत:वर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी डाकू गॅंगशी जुळली. परंतू गॅंगच्या प्रमुखानेही तिच्यावर अत्याचार केले. तेव्हा फुलनने तिचा पति व गॅंगचा प्रमुख ह्या दोघांचीही ठरवून हत्या केली. त्यानंतर डाकू गॅंगमध्ये जातीवरून फुट पडली. ज्यामुळे उच्च जातीय गॅंगच्या दोन सदस्यांनी फुलनवर सूड उगवला. तिला एका खोलीत बंद करून तब्बल तीन आठवडे अनेकांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केले. त्याक्षणी फुलनची अवस्था अत्यंत वाईट होती. तरिही तिने परिस्थितीपुढे हार मानली नाही. तर सर्व अत्याचार्‍यांना स्वत:च्या हातांनी गोळ्या झाडून यमसदनी पाठविले व तिने आपल्या मनाला शांत केले. त्या घटने नंतर ती दोन नावाने ओळखली जावू लागली. एक ‘हिंसक डाकू’ व दुसरे ‘फुलन देवी’. कारण तिने दुर्गेचे रूप धारण करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या राक्षसांना सजा दिली होती. त्यानंतर फुलनने तिचे हत्यार दुर्गा देवीच्या चरणांवर अर्पण करून आपला गुन्हा कबुल केला. त्याचप्रमाणे पोलिसांसमोर  शरणागती सुद्धा पत्करली.

  स्त्रिशक्तीच्या ह्या सोहळ्यात स्त्रियांनी कोणावरही विसंबून न राहता स्वत:च्या आंतरीक शक्तीला जागवीले पाहिजे. तरच त्या अशा राक्षसांवर मात करू शकतील. हेच शिकायला मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *