माझ्याबद्दल

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रेखा आहे. मी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध शहर नागपूर येथे राहते. मी स्वेच्छेने गृहिणी हा पेशा निवडलेला आहे. त्यामुळे मी एक समर्पित गृहिणी आहे. माझ्या ह्या पेशाची विशेषता ही आहे कि मी मनोभावे व निस्वार्थपणे आपल्या माणसांना सेवा प्रदान करू शकते. मी माझ्या घराचा भक्कम आधार बनू शकते. त्याचप्रमाणे मी ह्या तंत्रज्ञानाच्या युगाशी जुळवून घेण्यासाठी स्वत:ला जागरूकतेने सुशिक्षित बनवू शकते. किंबहुना ह्या पेशाशी निगडीत छोट्या मोठ्या कामांना आपल्या मीपणाशी नाहीतर मनाच्या मोठेपणाशी एकरूप करून प्रतिष्ठेस पात्र ठरवू शकते. परंतू कधीकधी जीवनप्रवासात आपल्याला आलेल्या सहज पचविता न येणाऱ्या अनुभवांमुळे आपला उत्साह आपोआपच मावळत जातो. कारण त्या अगोदर आपण आयुष्यात कितीतरी वेळा मनाविरुद्ध आपल्या भावनांना मुरड घातलेली असते. आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी घेतलेला असतो. एकंदरीत अशाप्रकारे आपण आपल्या खांद्यांवर सुखदु:खाचे एक अदृश्य जड गाठोडे घेवून थकलेल्या अवस्थेत कसेबसे जीवनात पुढे जात असतो. तसेच आपली संपूर्ण उर्जा त्यावरच खर्ची घालत असतो. त्यामुळे जीवन जगण्याचा पुरेपूर आनंद आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच आता मला माझ्या आयुष्यात आलेले अनुभव इतरांशी वाटून जरा हलके व्हावेशे वाटते. त्यामुळेच मी ब्लॉग लिहिण्याच्या माझ्या विचारांवर अखेरीस कृती करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून अनुभवांचा हा ठेवा मला आपल्या पर्यंत पोहोचविता यावा. ज्याद्वारे आपणही काही जीवनापयोगी धडे घेवू शकाल असे मला मनापासून वाटते. धन्यवाद