अंतर्मनाचे सौंदर्य

जी व्यक्ती आंतरीक सौंदर्याने समृद्ध असते ती देवाचीही लाडकी असते. त्या व्यक्तीचे पडणारे प्रत्येक पाऊल देव अलगद टिपतो. संकटसमयी वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्या पाठीशी उभा राहतो. अंतर्मनाच्या माध्यमातून त्याचे मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे एक बालहृदय निरागस, निष्पाप व निर्दोष असते. आपल्याला  त्यास आजीवन तसेच जोपासता आले तर सृष्टीने दाखवीलेल्या मार्गावर आपण निर्भीडपणे मार्गक्रमण करू शकतो. परंतू जेव्हा त्या अंतर्मनाच्या सौंदर्यावर दुनियादारीचे कवच चढते तेव्हा सृष्टीच्या दैवी मार्गदर्शनास समजून घेण्यास आपण पात्र राहत नाही. आपण आपल्या व्यक्तीगत जीवनातील आपल्यामुळेच निर्माण झालेल्या अनेक समस्यांमध्ये गुरफटून जातो. त्याचबरोबर आपणच  आपल्या दु:खाचे कारणही बनतो. परंतू अंतर्मनाच्या सौंदर्याची जर आपल्याला अनुभूती होवू शकली तर आपण सर्व चिंतांमधून मुक्त होतो. कारण आपल्याला पदोपदी अंतर्मनाच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत असतो. अशाप्रकारे आपल्यातील निरागसता आजीवन जपली जाते.

   आपल्या आईचा जेव्हाही विषय निघाला कि आपण तिच्याबद्दल भरभरून बोलत असतो. कारण आईच्या वात्सल्याने, तिच्या निस्वार्थ मायेने आपण भारावलेलो असतो. आईच्या अंतर्मनाचे सौंदर्य थेट आपल्या अंतकरणास भिडलेले असते. आपल्या आईची आपण कधिही कोणाशीही तुलना करत नाही. तसेच आई बद्दल बोलतांना आपण तिच्या बाह्य स्वरूपाचे कधिही वर्णन करत नाही. किंवा ती कशीही दिसत असली तरी त्याने आपण विचलीत होत नाही. कारण आपल्यासाठी ते महत्वाचेच नसते. आई शरिर रुपाने आपल्याबरोबर असो किंवा नसो ती आपल्यातच सामावलेली असते. त्यामुळे ती कधिही आपल्या हृदयातून तसेच स्मरणातून विलुप्त होत नाही. आपण तिच्या बाह्य नाही तर अंतकरणाच्या सौंदर्याशी संलग्न झालेलो असतो. आईचे प्रेम निसर्गातील जीवनदायी घटकांप्रमाणे अमर्याद असते. साने गुरूजींनी ‘ ‘श्यामची आई’ ह्या प्रसिद्ध कादंबरीतून आईच्या अंतर्मनातील सौंदर्याचे विलक्षण वर्णन केले आहे. आपणही आईप्रमाणे अंतर्मनाच्या सौंदर्याचे धनी असले पाहिजे.

   एखाद्या स्त्रीचा मनमोहक चेहरा व शारिरीक सौंदर्य आपल्या मनास भुरळ पाडतो आणि आकर्षीत करतो. परंतू तिच्या मनाचे सौंदर्य मात्र आपल्याला मर्यादांची परीभाषा शिकवीत असते. तरिही आपल्या समाजनिर्मीत विवाहव्यवस्थेत मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात  तिच्या रंगावरून, तिच्या दिसण्यावरून तसेच तिच्या बाह्य स्वरूपात कोणतिही खोट तर नाही ह्याची पुर्णपणे पडताळणी करून तिला पसंत किंवा नापसंत केले जाते. जेव्हा तिला तिच्यातील कोणत्याही बाह्य कमतरतेवरून अस्विकृती कळवीली जाते. तेव्हा तिच्या मनावर काय परीणाम होत असतील. ह्याचा विचार करणे कोणासही गरजेचे वाटत नाही. आजच्या मुली शिक्षण व कर्तुत्व ह्या दोन्हीतही कमी नसतात. तरिही त्यांच्या आत्मसम्मानास अपमानीत करणार्‍या पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या ह्या रुढी परंपरा मोडकळीस आलेल्या नाहीत. खरे तर एखाद्याच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या विषयी मत बनवीणे म्हणजे खालच्या स्तरावरील विचारसरणी आहे कारण खरे सौंदर्य अंतर्मनात असते. ज्याच्यापाशी ते ओळखण्याची दृष्टी असते. तो कधिही अशा अवाजवी अपेक्षांना आपल्या जीवनात थारा देत नाही. असेच लोक शारिरीक अपंगत्व, रंग ह्याच्या पल्ह्याड जावून विचार करू शकतात. तसेच आपल्या जीवनात अशा व्यक्तीस जोडीदाराचे स्थान देण्याची हिम्मत दाखवितात. कारण हे करण्यास धाडस लागते. शारिरीक सौंदर्य कायम टिकून राहत नाही. अनेक कारणांनी ते लोप पावते. परंतू मनाचे सौंदर्य मात्र आणखीच द्वीगुणीत होत जाते. कारण त्यामुळे आपण स्वत:ला सिद्ध करू शकतो. इतरांच्या आयुष्यात मुल्य जोडू शकतो. आपल्यातील पराक्रमास बाहेर काढू शकतो.

   एखाद्या व्यक्तीचे निरागस निर्मळ मन त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या मनात दडलेले अतीव दु:ख बाहेर काढण्यास मदत करत असते. त्याला त्या दु:खातून मुक्त करून पुन्हा जगणे शिकवीते. त्याचप्रमाणे त्याच्या मनातील दुष्ट विचारांचा समुळ नायनाट करून मनाच्या खोलीत दडलेल्या निष्पाप बाळास बाहेर येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करते. कारण कोणिही जन्मजात गुन्हेगार किंवा चोर नसतो. त्यामाग़े त्याने आतापर्यंत अनुभवलेली परिस्थिती तसेच त्याच्या निरागसपणाचा गळा आवळणारी निर्दयी माणसे असतात. त्या निरागसतेवर त्याने वरवर दिसणाऱ्या कठोरपणाची चादर टाकलेली असते. अशाप्रकारे तो एका अशा स्वरूपासोबत जगत असतो जे खरे नसून बनावटी असते. आणि हे जग त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे होते. त्यासाठी त्याला शिक्षाही ठोठावते. अशारितीने एका निरागस स्वरूपाचे एका अट्ट्ल गुन्हेगारात रुपांतरण करण्यात हे जग यशस्वी होते. ह्यास जबाबदार कोण आहे हे मात्र कधिही समोर येत नाही.

   अंतर्मनाने सुंदर असलेल्या माणसांच्या सहवासाने वाल्याचा वाल्मिकी होतो हे  आपल्याला ठाउकच आहे. कारण प्रत्येकाचेच अंतर्मन विशेषतांनी व्यापलेले असते. त्यामुळे जेव्हा त्यांना त्यांच्या वाईट कर्मांची जाणीव होते तेव्हा ते त्यांच्या सावटातून बाहेर निघून सभ्यतेचा मार्ग स्विकारतात. परंतू हे जग त्यांच्या बदललेल्या स्वरूपाचा स्विकार करत नाही. त्यामुळे त्यांच्या माथी लागलेला गुन्हेगारीचा ठप्पा कधिही पुसल्या जात नाही.  ज्याप्रमाणे हिरा आपले आंतरीक सौंदर्य खुलवीण्यासाठी घणांचे कठोर घाव सहन करतो. कारण शुद्धता हीच त्याची खरी ओळख असते. परंतू हिर्‍याचा शुद्धतेचा गुणधर्म ओळखण्यासाठी त्याला पारखणारी निर्मळ नजर सुद्धा पाहिजे असते. अन्यथा सामान्य दगडांच्या खोट्या चमकेत हिर्‍याची सात्विक शुद्धता हरवून जाते. कारण कपटाने बरबटलेल्या ह्या जगात शुद्ध हिरा सामान्य दगडांबरोबर अतिसामान्य अवस्थेत विकण्यास ठेवलेला असतो. सामान्य दगडांनीच त्याची तुला करण्यात येते. हीच वास्तवीकता आहे. कारण कोणाच्याही अंतर्मनाचे सौंदर्य ओळखण्यासाठी केवळ एक निष्पाप नजर पुरेशी असते. अशीच व्यक्ती कोणाच्याही अंतरात दडलेला चांगुलपणा बाहेर काढण्यात यशस्वी होते.

   श्रीमंतांच्या घरात सर्वत्र भौतिक श्रीमंतीची चकाकी पसरलेली असते. परंतू बर्‍याचदा अशा ठिकाणी कपटाने भरलेल्या लोकांचे साम्राज्य असते. बाहेरून बघणार्‍याला त्यांच्या समृद्धीचा मोह होतो. त्यापुढे त्यांना स्वत:चे  सामान्य असणे तसेच गरीब असणे बोचत असते. परंतू जो त्या साम्राज्याचा भाग असतो त्यालाच तिथल्या खर्‍या परिस्थितीची जाणीव असते. कारण कधिकधी तिथे राहणार्‍यांनी आपले स्वातंत्र्य गमावलेले असते. त्यांच्या आलीशान इमारतीतील चार भिंतींमध्ये माणुसकीला कलंकीत करणारे कारनामे सुरू असतात. अत्यंत बेमालूमपणे स्त्रियांवर अत्याचार सुरू असतात. ज्याला बाहेरच्या जगात कधिही वाचा फुटत नाही. म्हणूनच पैस्याने जर सुख विकत घेता आले असते. तर प्रत्येक श्रीमंत माणुस हा समाजासाठी एक आदर्श ठरला असता. परंतू सुख समाधानाने जगण्यातच आहे हे सिद्ध झाले आहे. शारिरीक सौंदर्य इतके महत्वाचे असते तर सिनेसृष्टीतील सौंदर्यवती नटींच्या आयुष्यात नात्यातील बेबनाव व घटस्फोट झाले नसते. तेव्हा आंतरीक सौंदर्यामुळेच नाती आजीवन टिकतात हेही सिद्ध झाले आहे. शारिरीक सौंदर्यास समाजनिर्मीत मोजपट्टीनुसार दर्जा देण्यात येतो. त्यापेक्षा कमी असल्यास खपवून घेतले जात नाही. त्याचप्रमाणे जास्त असल्यास त्यास सौंदर्याची खाण समजले जाते. परंतू अंतर्मनाचे सौंदर्य प्रत्येकात असते. ते काळ्या गोर्‍याचा भेदभाव करत नाही. आपल्या व्यक्तीमत्वातून ते झळकते. प्रवाहासोबत वाहत जाणे हे आजचे चलन आहे त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांचे अनुकरण करण्यास लागलेला असतो. फार कमी लोक आपल्या अंतरातील विशेषतांना चमकवीण्यास निघतात. परंतू बाकींना ते वेळ वाया घालवीण्यासारखे वाटते.

  परंतू आज जगाला अंतर्मनाच्या  सौंदर्याचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण माणुसच आज माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे. त्याच्या राक्षशी प्रवृत्ती पुढे अदृश्य शक्तींचीही भिती वाटणे कमी झालेले आहे. वैचारिक गरिबी, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलांवरील अत्याचार, शारिरीक सौंदर्याचे आकर्षण ह्या गोष्टी माणसाच्या मनास किड लागलेली असल्याची पुष्टता देतात. स्त्रियांच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून त्यांना वेश्या व्यवसायात ओढण्याचे दुष्कृत्यही माणुसच करतो तरिही स्त्रियांना कलंकीत ठरवून समाज मोकळा होतो. परंतू जर स्त्रियांच्या अंतर्मनाचे सौंदर्य पाहिले गेले तर स्त्रियांच्या शौर्याचा जयजयकार होईल. त्यांच्यातील संयम व चिकाटीस प्रोत्साहन मिळेल. तसेच त्यांच्यातील मातृत्वास सन्मानीत केले जाईल. एखाद्याला आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून एक चांगला माणूस बनून जगायचे असल्यास त्याच्यावर विश्वास ठेवून मदतीचा हात दिला जाईल. त्याचप्रमाणे एखाद्याचा निरागसपणा अबोल कळीप्रमाणे जपला जाईल.

1. अंतर्मनाचे सौंदर्य धाडसात आहे.

  बालपण मागे टाकून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींना आपल्या सुंदर दिसण्याबद्दल जागृकता असते. त्यामुळे आपले सौंदर्य जपण्यासाठी त्या विशेष उपायही करत असतात. अशीच एक सुंदर मुलगी लक्ष्मी अग्रवाल जिच्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी अ‍ॅसीड अटॅक झाला. तिच्या मनाचे खच्चीकरण करण्यासाठी हे भ्याड दुष्कृत्य करणार्‍याने केले. ज्यात लक्ष्मीचा सुंदर चेहरा मात्र पूर्णपणे उध्वस्त झाला. कित्येक सर्जरी करूनही तिच्या चेहर्‍याचे मुळ सौंदर्य वापस आणता आले नाही. परंतू आज लक्ष्मीला अंतर्मनाच्या सौंदर्याचे महत्व कळले आहे. त्यामुळे तिने तिच्या विद्रूप झालेल्या चेहऱ्यावर मनात आत्मप्रेम जागृत करून विजय मिळवीला आहे. तिला आता विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून जराही कमीपणा वाटत नाही. कारण तिच्यातील आंतरीक धाडसाने तिच्या मनातील कमकुवत विचारांना समूळ नष्ट केले.

2. अंतर्मनाचे सौंदर्य पराक्रमात आहे.

  ”निरजा भनोट” हे वयाच्या तेवीसाव्या वर्षी मरणोपरांत अशोक चक्राने सम्मानीत भारतीय विरांगनेचे शुभनाव प्रत्येकास परीचीत आहे. जी विमानप्रवास सेवीका होती. तिने अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांना वाचवीतांना आपल्या बहुमूल्य जीवनाचे बलिदान दिले. निरजा चेहर्‍याने जितकी सुंदर होती त्याहीपेक्षा अधिक ती अंतर्मनाने सुंदर होती. म्हणूनच ती आपल्या प्राणांवर उदार होवून इतरांना जीवन देवू शकली. तिचे मन करुणेने ओतप्रोत भरलेले होते. त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर प्रवाशांचे होणारे हाल ती बघू शकली नाही. त्यामुळे तिच्याच अंतर्मनाने तिला पराक्रम गाजवीण्यास तयार केले.

3. अंतर्मनाचे सौंदर्य जिद्द बाळगण्यात आहे.

  ”अरुनिमा सिन्हा” हे एका जिद्दी मुलीचे नाव आहे. जिला काही गुंडांनी धावत्या ट्रेनमधून फेकून दिले होते. ज्यात तिचे शारिरीक खुप नुकसान झाले आणि ती अपंग झाली. परंतू अरूनिमाने आपल्या अंतर्मनातील जिद्द गमावली नाही. तिने त्या दुर्दैवी घटनेनंतर काही वर्षातच जगातील सर्वोच्च शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केले. तसेच ते सर करणारी ती जगातील पहिली अपंग महिला ठरली. अरुनिमाच्या जिद्दीपुढे निसर्गानेही हात टेकले आणि तिच्या आंतरीक सौंदर्याने तिला महान यशाचे मानकरी केले.

4. अंतर्मनाचे सौंदर्य साहस दाखवीण्यात आहे.

   ”कल्पना चावला” ह्या भारतीय वंशातील अंतराळात जाणार्‍या  पहिल्या महिला होत्या. त्या अमेरीकन अंतराळ विरांगणा होत्या. जेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाबरोबर फ्लाईंग क्लब मध्ये जाण्याची इच्छा दाखवीली. तेव्हा त्या एक स्त्रि असल्यामुळे त्यांनी वैमानीक होणे योग्य नाही. म्हणून त्यांनी त्या वेडापासून स्वत:ला परावृत्त करावे असे सर्वांना वाटत होते. परंतू त्यांच्या अंतर्मनातील साहसाने कधिही हार मानली नाही. त्यामुळेच अंतराळवीर कल्पना चावला ह्यांचा शेवटचा अंतराळ प्रवास प्रत्येक भारतीयांच्या मनात कायमचा कोरला गेला.

  आपण आपल्या शारीरीक सौंदर्याच्या मोहात पडतो. त्याच्याशी संलग्न होतो. कोणत्याही कारणाने आपल्या सुंदर दिसण्यात व्यत्यय येवू नये. असेच आपल्याला वाटत असते. परंतू शरीर हे नाशवंत असते. जे कधी एखाद्या आजारपणाने तसेच अपंगत्वाने ग्रासले जावू शकते. परंतू आपण अंतर्मनाचा प्रवास करून आपले आंतरीक सौंदर्य खुलवीले तर आपण आपल्या जीवंतपणी अशा महान हेतूस न्याय देवू शकतो. जे आपल्याला मरणोपरांतही जिवीत ठेवत असते. कारण खरे सौंदर्य आपल्या अंतरात असते ज्यास कोणिही संपुष्टात आणू शकत नाही.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *