अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा

आपण अखेरचा श्वास घेतल्यानंतर कोणी आपले नावही उच्चारत नाही. तर बॉडी असे संबोधतात आणी फोनद्वारे एकमेकांना आपल्या अंतिमसंस्काराची वेळ विचारतात. आप्तस्वकीय, प्रियजन, जीवलग मित्र तसेच शेजारी शेजारधर्म म्हणून आपल्या अंतिमसंस्कारात सहभागी होतात. कोणाला आपल्या जाण्याचे दु:ख अनावर होते, कोणी हळहळतो तर कोणी आपल्याबद्दल चांगल्या-वाईट गोष्टी आप-आपसात कुजबुजत असतात. जी माणसे आपण जिवंत असतांना आपल्याला समजून घेणे तर दूर आपली दखलही घेत नाहीत. ती आपल्या गेल्यावर औपचारिकता म्हणून काहीतरी चांगले बोलत असतात.  ईथे भा.रा.तांबेंच्या चार ओळी सादर कराव्यास्या वाटतात-

       जन पळ भर म्हणतील हाय हाय

       मी जाता राहील कार्य काय

          सखे-सोयरे डोळे पुसतील

          पुन्हा आपल्या कामी लागतील

          उठतील बसतील हसून खिदळतील

          मी जाता त्यांचे काय जाय

  मित्रांनो, ह्या ओळी वास्तवीकतेला अगदी तंतोतंत लागू पडतात. लोक चार-दोन तास थांबतात, आपल्या परिजनांचे सांत्वन करतात आणि आप-आपल्या आयुष्यात परत फिरतात. मृत्यु बद्दल प्रत्येकाला एवढेच माहित असते कि गेलेली व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाही. कारण ह्या जगातून ती कायमची गेलेली आहे. आपण सगळेजण ह्या जन्ममृत्युच्या फेर्‍यात अडकलेलो आहोत . मृत्यू हे आपल्या जीवनाचे अंतिम कटुसत्य आहे. परंतू जन्म आणी मृत्यू ह्या दरम्यान जो काळ आपल्याला लाभला आहे तो म्हणजे जीवन. आपल्यापैकी प्रत्येकाचा अंतिम पडाव स्मशानभूमी हा असतो. तिथे पोहोचण्याअगोदर जीवन भरभरून जगायचे असते. कारण जीवनकाळ सीमित असला तरी तो उत्तम रीतीने जगून आणि सार्थकी लावून मोठा बनविता येवू शकतो. तेव्हा  आपले जीवन कसेही न घालवीता आपण त्याद्वारे समाजात आदर्श कायम केला पाहिजे. कारण आपण आपल्या जगण्याला अर्थपुर्ण बनविणे आवश्यक असते. जेव्हा आपण आपले आयुष्य समाजासाठी, देशासाठी, वंचीतांच्या वेदना दूर करण्यासाठी अर्पण करतो. तसेच व्यक्तीगत  आयुष्यातील समस्यांमध्ये, सुख-दु:खामध्ये गुरफटून न जाता निर्वीकारपणे  जीवन जगतो. तेव्हाच आपण ह्या जगाचा निरोप घेतल्यावरही पुरून उरतो. आणी जेव्हा आपली अखेरची वेळ येते. तेव्हा अत्यंत समाधानाने शेवटचा श्वास घेतो. कारण फक्त स्वत:पुरते जगण्याने आपल्याला स्वत:च्या जीवनावर अभिमान वाटत नाही. परंतू आपले जीवन इतरांच्या कामी आले तर मात्र आपले मन शेवटच्या क्षणी निर्दोष व निष्पाप असते. 

    ‘मृत्यु’ येणे म्हणजे ह्या जगात आपल्या शरीररूपात असण्याचा शेवट होणे. गेलेली माणसे पुन्हा कधिही परतत नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच मृत्युचे भय असते. जर आपल्याला हे कळले की आपण उद्द्या मरणार आहोत तर ह्याक्षणी आपल्यासाठी सर्वात महत्वाचे काय करणे असेल ? मरतांना आपल्या चेहर्‍यावर समाधानाची चमक असेल असे कोणते काम आपण करू? कारण आपण शरीररूपाने नेहमीसाठी राहू शकत नाही. तेव्हा  आपण आपल्या जीवंतपणी ह्या जगाला काय देवून जातो हे फार महत्वाचे असते. म्हणूनच ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’ ही म्हण  जीवन जगत असतांना कायम आपल्या ध्यानीमनी असली पाहिजे. सतत मनामध्ये मृत्युचे भय न ठेवता जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण कायम सकारात्मक ठेवला पाहिजे. आपल्या सभ्य आचरणातून व आपल्या वाणीतून कायम प्रेम व आपुलकी जतन झाली पाहिजे. जीवन जगत असतांना माणुसकी हाच आपल्यासाठी सर्वात श्रेष्ठ धर्म असला पाहिजे. तरच जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळू शकतो.  

1. कुतूहलाने  ह्या जगन्याकडे बघावे-

    लहान मुलांच्या नजरेत नेहमी कुतूहल बघावयास मिळते. कारण त्यांना कशाचीही भिती नसते. ते त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांमधून व इतर गोष्टी मधून काहीतरी शिकण्याचाच प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमधे जीवन भरले पाहिजे. आपले कुटूंब हे आपली शक्ती असते. तेव्हा  आपल्या प्रियजनांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा तसेच आपली स्वप्न ह्यांना कसे पुर्ण करता येईल. हे आपल्या विचारात कायम असले पाहिजे. आपण आपल्याला असलेल्या वाईट सवयींना जाणीवपूर्वक मुठमाती दिली पाहिजे. त्याचबरोबर आपण आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कि  ‘मृत्यु’ म्हणजे आपल्या जीवनाचा अंत नाही कारण मृत्यू केवळ शरीरास येतो. ही तर नविन जीवनाची सुरवात आहे पुन्हा नविन  रूपात. जन्म मृत्यू हे आपल्याला सांगून येत नाहीत. जीवनाचा प्रत्येक क्षण जर आपण मृत्यू येण्याच्या भितीने जगत राहीलो तर आपल्याला जगण्याचा आनंदही घेता येणार नाही. म्हणून तेव्हाच मरावे जेव्हा आपल्याला मृत्यु येईल मात्र तोपर्यंत जगत रहावे.

2. जगण्यासाठी ध्येय ठरवावे-

  जीवन श्रेष्ठ घडविण्यासाठी आपण जीवनात आपल्यासाठी ध्येय ठरवले पाहिजे. जेणेकरून आपले आयुष्य दिशाहीन होणार नाही. त्यासाठी आपल्यामध्ये कोणते बदल आपण करावे ह्या विषयी स्वत:मध्ये जागरूकता आणली पाहिजे. जीवनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे आपल्याला ठरविता आले पाहिजे. आपली स्वप्न लिहून ठेवली पाहिजे. तसेच आपल्या कल्पनाशक्तीने सुखी-जीवनाची कल्पना करत राहिले पाहिजे. आपल्यातील कमकुवत गोष्टी आपल्याला अद्वितीय बनवितात. त्यांच्यावर जाणीवपूर्वक काम केल्यास आपले व्यक्तीमत्व लाखात एक घडू शकते. म्हणून आपल्या तोंडून कधिही निराशाजनक वक्तव्य करू नये. त्याऐवजी आपल्या जीवनात उत्साह भरावा. आणी आपल्या वक्तव्यातून तसेच कृतीतून ‘जीवनाचे’ प्रतिनीधीत्व करावे.

3. उद्द्या मृत्युचा सामना करावयाचा आहे असे  जगावे-

जिवीत असतांना आपण हे विसरून जातो की कधी-तरी आपल्याला हे जग सोडुन जावयाचे आहे आणी आयुष्यभर निरर्थक गोष्टींच्या मागे आपला वेळ वाया घालवतो. परंतू आपल्याला जर आपल्या मृत्युची वेळ कळली तर एक-एका क्षणाचे सोने करण्याचा आपला प्रयत्न असेल. मृत्यु समयी आपल्याला समाधानकारक वाटावे यासाठी आपण सर्वकाही करू. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहू. आपल्याशी जुळलेल्या माणसांवर निस्वार्थ प्रेम करू. परंतू मृत्यू ही एक घटना आहे आणि ती केव्हा घटीत होईल हे आपल्याला माहित नसणे हेच त्यामागचे गूढ रहस्य आहे. म्हणूनच आपण वर्तमान क्षणातील प्रत्येक घडामोडींवर कायम सकारात्मक उर्जा टाकली पाहिजे. कारण पुढचा क्षण आपल्यासाठी काय घेवून यईल ह्याची आपल्याला कल्पना नसते.

4.  जगासाठी मोलाचा ठेवा ठेवून जावे –

   ह्या सुंदर जगात कित्येक महापुरूष होवून गेले. जे आज आपल्याबरोबर शरीर रूपाने नाहीत तरिही त्यांनी त्यांच्या जीवनात जी महान कार्ये केलीत त्याची गोड फळं आपण आजही चाखत आहोत. नुसतेच आपल्यापुरते जगण्यापेक्षा आपल्याला जमेल तसे ईतरांसाठी जगावे. जेणेकरून सर्वांचे जगने सुखकर होईल. आपले शरीर नश्वर असते. निष्प्राण झाल्यावर ते मातीत मिसळून जाते. परंतू निर्जीव शरीराचेही काही अवयव दान केल्याने एखाद्या जिवीत व्यक्तीस ते उपयोगी पडू शकतात. आपल्या गेल्या नंतरही  आपल्या डोळ्यांनी कोणी दुसरं ह्या सुंदर जगाला बघू शकेल परंतू आपले डोळे दान करण्याचा निश्चय आपल्याला आपल्या जीवितपणीच घेतला पाहिजे. मरणोपरांत आपले शरीर दान करण्याच्या निर्णयाने  कोणाच्या तरी अमुल्य जीवनास वाचविण्यास आपण हातभार लावू शकतो. तेव्हा आपल्या जगण्याने आणि मृत्यूनेही ईतरांची मदत व्हावी हाच विचार आपल्या ध्यानी मनी असु द्द्यावा.

      मित्रांनो, उंच माथ्याने , आत्मसन्मानाने आणी आत्मविश्वासाने हे जीवन जगले पाहिजे आणी आपला मृत्यू हा कोणाच्या दु:खाचे कारण नाहीतर जीवनाचा आधार बनावा ह्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आपल्या जगण्याने इतरांच्या जीवनाची ज्योत कायम तेवत रहावी हा महामंत्र  ज्याला समजला त्याला जीवनाचा खरा अर्थ कळला. तो भौतिक श्रीमंती गोळा करण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत नाही. तर आपला प्रत्येक क्षण  सत्कारणी कसा आणि कोणत्या मार्गाने लावता यईल ह्याच्या शोधात असतो. मृत्युने आपल्या शरीराचे जीवन सीमित होते. परंतू तरीही आपण आपल्या जीवनात केलेल्या कर्तुत्वान्नी आपले जीवन इतके मोठे करू शकतो कि प्रत्यक्षात ह्या जगात नसतांनाही आपण इतरांच्या जगण्यात जीवनामुल्य जोडत राहू शकतो व इतरांच्या मनात जिवंतही राहू शकतो. तेव्हा अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *