अर्धांगिनी जशी तुळस अंगणी

भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या आयुष्यात येणारा हा पराकोटीचा बदल स्वीकारून समंजसपणे आयुष्यात पुढे निघून जातात. त्याचप्रमाणे चालीरीतींचा व परंपरांचा हा वारसा हसतमुखाने एक कर्तव्य समजून आपल्या कर्तव्यदक्ष खांद्यांवर घेवून जीवन पार करतात. आयुष्य त्यांच्याकरीता सोपे नसते. परंतू आपल्या जोडीदाराच्या सोबतीने जीवनाचे विविध रंग व पैलू बघण्याची त्यांची पूर्ण तयारी असते. म्हणूनच मुलींची खरी शक्ती त्यांच्या अंतरंगात सामावलेली असते. कारण त्यांचे मन सकारात्मकतेच्या व उमेदीच्या प्रकाशाने तेजाळलेले असते. अशा ह्या जणूकाही जीवनाचे दुसरे रूप असलेल्या मुली आपले खट्याळ बालपण व त्यांच्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास मागे टाकून तसेच आपल्या प्रेमाच्या माणसांना सोडून एका नविन घरात, नविन माणसात आपल्या जोडीदाराच्या साथीने एका अनोख्या आयुष्याची सुरवात करत असतात. त्यांच्या निरागस डोळ्यांमध्ये सुखी संसाराची स्वप्न सामावलेली असतात.

   बऱ्याचदा घरात येणार्‍या नवीन सूनेस घरातील प्रत्येकांच्या अपेक्षा पुर्तीचे माध्यम बनवीले जाते. फार कमीवेळा तिच्या नवीनपणाच्या घालमेलीला समजून घेवून तिला त्या नवीन वातावरणात रूळण्यास मदत करणारी माणसे मिळत असतात. मात्र त्यासाठी तिचे मोठे भाग्य असावे लागते. तिची सगळी नाती आता बदलली असतात. तिचे हक्काचे घर आता तिच्यासाठी माहेर झालेले असते. ती आता अशा बंधनात अडकलेली असते जेथून तिच्यासाठी काही केल्या माघार घेणे शक्य नसते. खरेतर तिच्या धाडसाची ही सत्वपरीक्षाच असते. आई-वडीलांची अल्लड मुलगी जास्तीत जास्त कोणाचीतरी  आत्या आता सासरी सून, वहिनी, जाऊ, मामी, काकू अशा कर्तव्यदक्ष नात्यांनी समृद्ध झालेली असते. सर्वांच्या अपेक्षांना तिने पूरे पडावे असेच प्रत्येकाला वाटते. तिच्या आयुष्यात नावापासून ते नात्यांपर्यंत झालेला हा बदल तिला भांबावून टाकणारा असतो. अशावेळी तिला मायेने विचारपूस करणारा हक्काचा आधार पाहिजे असतो. तिचे अशांत मन आणी तिची उडालेली तारांबळ फक्त एका व्यक्तीच्या निरपेक्ष साथीने थांबू शकते. ती व्यक्ती म्हणजे तिचा नवरा. त्याचे प्रेमच नवीन वातावरणात तिच्या मनास उभारी देन्यास मदत करत असते. त्याचप्रमाणे त्याचे तिला वेळोवेळी समजून घेणे तिला सावरण्यास मदत करते. तसेच त्याचे तिला आपुलकीने जपणे तिचा एकटेपणा दूर करते. अशापद्धतीने त्या दोघांच्या एकत्र आयुष्याची सुरवात होते. त्यासोबतच हळूहळू करून तिच्या जीवनास कलाटणी मिळते.

  ज्याप्रमाणे अंगणात लावलेल्या तुळशीच्या रोपाने अंगणाची शोभा वाढते. अंगणाचे पावित्र्य वाढते. तिन्ही सांजेला तुळशीपुढे लावलेला मांगल्याचा दिवा व उदबत्त्यांचा दर्वळ म्हणजे सकारात्मकतेची व घराच्या समृद्धीची ग्वाही असते. त्याचप्रमाणे लग्न झालेली सासूरवाशीन मुलगी आपल्या विशाल हृदयात प्रत्येकास स्थान देवून आपल्या घरादारासाठी उदंड आयुष्याची मनात प्रार्थना करते. घरातील वडीलधार्‍यांना आई-वडीलांचे स्थान देते. ननंद, दीराला आपल्या आयुष्यात भावंडांचे स्थान देते. पतीसाठी ती क्षणांची पत्नी व अनंतकाळाची माता होते. अशाप्रकारे आपल्यातील आईपणास जागृत करून घरातील जबाबदार व्यक्ती बनते. तिच्या अस्तित्वाने घराला घरपण लाभते. तिच्या घरासाठी तिने केलेला त्याग त्या घराला बांधून ठेवतो. तिचे समर्पण त्या घराचे देवालयात रुपांतरण करते. म्हणूनच अर्धांगिनी ही तुळशीप्रमाणे पवीत्र असते. तिच्या चरणी सुख समृद्धीची व भरभराटीची सरीता वाहते. तेव्हा घरात तिचा अपमान करणे, अवहेलना करणे तसेच तिच्यावर कोणत्याही प्रकारे अत्याचार करणे म्हणजे महापाप करण्यासारखे आहे. त्याची खुप मोठी किंमत त्या घराला व घरातील माणसांना आयुष्यात कधी ना कधी चुकवावीच लागते.

   अजूनही बहुतांशी घरांमध्ये पत्नीस मानाचे स्थान नसते. तिला माणूस म्हणून तुच्छतेची वागणूक देण्यात येते. पतीला तर ती हक्काची उपभोगीय व्यक्ती वाटते. ज्याप्रमाणे कोणतिही निर्जीव वस्तू जिचा वापर करून झाल्यावर ती कोठे पडली आहे ह्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. त्याचप्रमाणे काही घरात पत्नीची अवस्था असते. जगात कोठेही कोणत्याही स्त्रिवर अत्याचार झाल्यास ती दुर्घटना उघडकीस येते व अत्याचार्‍यांना शिक्षाही होते. परंतू जेव्हा घराच्या चार भिंतींमध्ये एक स्त्रि पतीच्या अत्याचारास वारंवार बळी पडते तेव्हा ती गोष्ट बाहेर कोणासही कळत नाही. त्याचप्रमाणे त्याविषयी ती कोणाजवळही वाच्यता करू शकत नाही. कारण तिने तसे करण्याचा प्रयत्नही केल्यास पती म्हणून त्याचा तो हक्क आहे असे म्हणून तिचे तोंड बंद करण्यात येते. दावणीला बांधलेल्या गरीब गायीप्रमाणे अत्याचार सहन करण्यापलिकडे ती काहिही करू शकत नाही. जर तिने त्याविरूद्ध पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर तिला कोणाचीही साथ लाभत नाही. अशावेळी तिच्या शरीराबरोबर तिचा आत्मसम्मानही चिरडल्या जातो.

   असे पुरूष जे देवाब्राम्हणांच्या साक्षीने एका मुलीशी लग्नगाठ बांधतात. तिला अर्धांगिनीचा दर्जा देवून घरी आणतात. त्यानंतर तिला उपभोगाची वस्तू समजून तिचे शोषन करतात. तिच्यावर अत्याचार करतात. खरे तर ते कळत नकळतपणे स्वत:च्या अधपतनाची तयारी करत असतात. त्यांच्यावर एकेदिवशी ईश्वरीय काठीचा असा वर्षाव होतो कि त्यामधून ते कधिही सावरू शकत नाहीत. कारण स्त्रि ही शक्तीचे स्वरूप असते. तिला नात्यांच्या चौकटीत फसवून, तिची केविलवाणी अवस्था करून तिच्या त्या अवस्थेचा गैरफायदा उचलणे हा अक्षम्य गुन्हा आहे. पत्नीच्या आत्मसम्मानास चिरडून व तिला अत्याचाराचा धाक दाखवून तिची कोंडी करणे ह्या पापाचे परीमार्जन होणे केवळ अशक्य आहे.

   लग्नगाठ हे एक अत्यंत पवित्र बंधन असते. कारण विवाहीत जोडप्यांना देवाधिकांचे आशिर्वाद मिळत असतात. तेव्हा त्या नात्याचा पती-पत्नी दोघांनीही नेहमी आदर राखला पाहिजे. पत्नीला गृहलक्ष्मीचा दर्जा देण्यात येतो. कारण ती सर्वार्थाने त्या सन्मानास पात्र असते. आजच्या युगातील स्त्रिया सर्वगुण संपन्न आहेत. त्या पतीच्या जबाबदार्‍यांमध्ये वाटेकरी झाल्या आहेत. त्याचबरोबर घरासोबत घराबाहेरचे विश्वही त्यांनी सचोटीने पेलले आहे. उच्च शिक्षीत व मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्या आपले सणवार तसेच संस्कृती जपण्यास जीवाचा आटापिटा करत असतात. त्याचबरोबर त्या त्यांचा आत्मसन्मान राखण्यासही जागृत आहेत. अशा कर्तुत्ववान स्त्रिया घराची शोभा असतात. त्यांना फक्त पतीच्या हृदयात खास स्थान हवे असते. तेव्हा प्रत्येक पुरूषाने आपल्या अर्धांगिनीस आपल्या जीवनातील खास मैत्रिण समजले पाहिजे. तिला आदरयुक्त वागणूक दिली पाहिजे. तिच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपला अहंकार सोडून विनम्र झाले पाहिजे. तिने विश्वासाने कायम आपल्या जीवनात रहावे ह्यासाठी तिच्या विश्वासास पात्र ठरले पाहिजे. तसेच तिचे पवित्र प्रेम मिळविण्यासाठी योग्य बनले पाहिजे.

1. अर्धांगिनी सोबत असल्याने पुरूषास खास सम्मान मिळतो.

   कोणत्याही पुरूषाचे लग्न झालेले असल्यास समारंभ, सोहळ्यात तसेच मित्रमंडळींच्या किंवा नातलगांच्या घरी पत्नीसोबत जोडीने गेल्यास त्यास विशेष आदरातिथ्य व सम्मान मिळतो. पत्नी बरोबर असेल तर इतर स्त्रियाही त्या  पुरूषाशी मोकळेपणाने वागतात.त्याचप्रमाणे आग्रहाने पाहुणचार केल्याशिवाय सोडत नाहीत. आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीत लग्न म्हणजे एक पुरूष विवाह करून त्याच्या जीवनात एका स्त्रिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. तसेच तिच्या पुढच्या आयुष्याची संपुर्ण जबाबदारी स्वत:वर घेतो. परंतू लग्नाची परीभाषा खर्‍या अर्थाने स्त्रियांना कळली आहे असे वाटते. कारण लग्न झाल्यावर खऱ्या अर्थाने स्त्रियाच पुरूषांचा सांभाळ करतात. त्यांची सर्वतोपरी सेवा करतात. त्यांचे हवं नको ते बघणे हे त्या आपले कर्तव्य समजतात. त्यासोबत पुरूषाच्या कुटूंबाचा भाग बनून कुटूंबातील माणसांचा मनापासून स्विकार करतात. आपल्या स्त्रिपणाचे व सर्वस्वाचे समर्पण करतात. म्हणून लग्न म्हणजे स्त्रियांचीच खरी अग्नीपरीक्षा असते. कारण त्या पतीचा त्याच्या गुण अवगुणांबरोबर स्विकार करून तरिही जगासमोर त्याचा मान राखण्यासाठी त्याची रहस्ये आपल्यापर्यंत मर्यादीत ठेवतात. त्यासाठी वेळप्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेवून आपल्याच माणसांचा रोष पत्करतात. पतीस जगासमोर उंच माथ्याने मिरवता यावे म्हणून कुटूंबाच्या मर्यादांचे पालन करतात. घरातील सर्व व्याप सांभाळून पतीस आर्थिक पाठबळही देतात. म्हणूनच पुरूष अर्धांगिनी शिवाय अपुर्ण वाटतो आणि ती त्याच्या सोबत असल्याने तो सन्मानास पात्र ठरतो.

2. अर्धांगिनीमुळे घराला घरपण येते.

  स्त्रियांमध्ये दयाभाव असतो. त्यामुळे त्या आपल्या घराप्रती व माणसांप्रती अगदी समर्पीत असतात. आपले संपुर्ण आयुष्य त्या कुटूंबाच्या आनंदासाठी तडजोडीत व आपल्या इच्छा आकांक्षांचा त्याग करून घालवीतात. घराला त्यांच्या अस्तित्वाची इतकी सवय असते कि त्यांच्या विश्वासावर घराची शांतता टिकून असते. कोणतीही पत्नी आपल्या जबाबदर्‍या भक्कमपणे पार पाडतेच त्यासोबत पतीच्या कामांचीही पुर्ण माहिती ठेवते. पतीचे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्यास त्याला त्याची आठवण करून देण्याचे काम पत्नीचेच असते. त्यासोबत घराचे आर्थिक नियोजन सांभाळते. पती काळजीत असल्यास प्रेमाने विचारपूस करून योग्य मार्गदर्शनही करते. पतीचे आरोग्य जपण्यासाठी धडपडत असते. पतीची कोणत्या कारणाने चिडचीड होत असल्यास त्याला शांत करते. घरात सणसमारंभ आनंदात पार पाडून घराचे पावित्र्य जपते. घरातील मोठ्यांची सर्वतोपरी काळजी घेते. लहानांवर योग्य संस्कार करते. एकंदरीत अर्धांगिनी म्हणजे त्या घराचे सर्वस्व असते. तिच्या शिवाय त्या घराची कल्पना करणे कठिण असते. म्हणूनच तिच्यामुळे घराला घरपण येते.

3. पुरूषांच्या विषारी स्वभावाने अर्धांगिनीचा निरागसपणा जावू नये.

   स्त्रिया मुळात भावनाशील असतात. त्या पतीचा आदर तर करतातच सोबत त्यांचे पतीवर जीवापाड प्रेमही असते. पती म्हणजे अगदी हक्काची व्यक्ती म्हणून त्या त्याच्यापाशी मनमोकळेपणाने वागतात व बोलतात. परंतू अहंकारी पुरूष मात्र क्षणा क्षणात आपले वागणे बदलवत असतात. स्त्रियांना ते कधि अगदी जवळचे वाटतात तर कधी त्यांच्या वागन्यातून त्यांना परकेपणाची झळ पोहोचते. कारण त्यांच्याकरीता पुरूषांच्या मनाचा तळ गाठणे असंभव असते. स्त्रियांचे मन मात्र निखळ असते. त्यांच्या मनात काय चालले हे त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे उमटलेले असते. पुरूषांचे असे वागणे त्यांच्या समजण्यापलिकडचे असते. अशावेळी त्या मनातून दुखावल्या जातात. परंतू जेव्हा त्यांच्या मनात उठलेल्या प्रश्नांचे समाधान होत नाही तेव्हा मात्र आतापर्यंत मनातले साधे साधे रागवणे हे प्रतिक्रीयांमध्ये बदललेले असते. आणि ह्या प्रतिक्रीया त्यांच्यातील निरागसपणाचा घास घेतात. त्यांच्यातील राक्षसाला जागृत करण्यास प्रवृत्त करतात. कोणत्याही पतीने आपल्या अर्धांगिनीवर अशी वेळ येवू देवू नये. तिच्या भावनांना अत्यंत समजदारीने शांत करावे. तिच्या रागवण्यामागचे प्रेम समजून घ्यावे. आणि तिचा निरागसपणा जीवनभर जोपासावा. त्यातच एका कुटूंबाचे हित आहे.  

4. अर्धांगिनीच्या मांगल्याचा व आईपणाचा नेहमी सम्मान करावा.

   कोणत्याही पुरूषाने नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि नात्याने ती जरी त्याची अर्धांगिनी असली तरी ती एक स्त्रि आहे. जिचे मांगल्य पुजनीय आहे. तिच्यातील आईपणाने संपुर्ण विश्वाला व्यापले आहे. तेव्हा तिला हक्क दाखविण्यासाठी आणलेली व त्या हक्काचा गैरवापर करण्यासाठी असलेली निर्जीव वस्तू समजू नये. जेव्हा पती राक्षशी रूप धारण करून पत्नीवर अत्याचार करतो तेव्हा पत्नी निमुटपणे सहन करते. तेव्हा पती तिला सोशीक गरीब गाय समजतो. परंतू जेव्हा पतीच्या जीवावर कोणतेही संकट येते तेव्हा तिच पत्नी मागच्या सर्व गोष्टी विसरून आईच्या मायेने त्याची सेवा सुश्रूषा करते. हा मनाचा मोठेपणा केवळ अर्धांगिनीतच असतो. स्त्रि ही क्षणांची पत्नी व अनंत काळाची माता असते. कारण ती जन्मताच आपल्याबरोबर विशाल हृदय घेवून येते आणि ते वात्सल्याने ओतप्रोत भरलेले असते. म्हणूनच पुरूषांनी स्त्रियांच्या शारिरीक सौंदर्यावर नाहीतर त्यांच्या मनाच्या पावित्र्यावर प्रेम केले पाहिजे. त्याचबरोबर त्या प्रेमात  प्रामाणिकपणा व सखोलता असली पाहिजे. तरच ते स्त्रियांच्या हृदयापर्यंत पोहोचते.  अर्धांगिनी ही जन्मोजन्मीची सखी असते. तिचे कायम सोबत असणे हेच पतीचे अहोभाग्य असते.

   पतीने पत्नीच्या कष्टांची वेळोवेळी दखल घेणे व पत्नीने पतीच्या लहान मोठ्या कर्तुत्वाचे मनापासून कौतुक करणे हे एका जोडप्याच्या सुखी संसाराचे गुपीत आहे. त्याचबरोबर त्यामधून त्यांच्या यशस्वी नात्याची प्रचीती येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *