
आपल्या आसपासच्या जगातून हल्ली जे काही आपल्या कानावर पडतं किंवा बघायला मिळतं त्यामुळे मन अक्षरशा चर्र होतं. नात्यांनी केलेले मर्यादांचे उल्लंघन ह्यावर विश्वास बसणं कितीही कठीण असलं. तरी वाईट ह्या गोष्टीच वाटतं की हे अगदी सत्य कथन आहे. लहान सहान कारणांवरून आपल्याच जीवलगांची निर्घुण हत्या करणे माणसांना अगदी सोपे वाटू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना एका गावात घडली. ज्यात शाळेचा मुख्याध्यापक असलेल्या समाजातील अगदी कर्तव्यदक्ष पेशातील एका विकृत इसमाने आपल्याच तरुण मुलीस बेदम मारहाण केली. ज्यात तिने आपला जीव गमावला. त्या इसमाच्या अशाप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती मागे त्याचा एक वडील म्हणून पुरुषी अहंकार दिसून आला. मुलगी neet परीक्षेची तयारी करत होती. परंतू त्यात तिला काही कारणाने गुण कमी पडले. वडीलांना मात्र ती गोष्ट काही सहन झाली नाही. कारण तिने ह्यापूर्वी दहावीत असतांना गुणवत्ता यादीत आपले नाव पटकावले होते. त्यामुळे वडीलांच्या मुलीकडून खूप अपेक्षा होत्या. ज्यात ती अर्थातच ह्यावेळी कमी पडली. वडील मुलीस त्या एका गोष्टीवरून नियमितपणे टोचून बोलत असत. मुलगीही मुकाट्याने वडीलांचे बोलणे सहन करत असे. मात्र एकेदिवशी तिच्या सहनशिलतेची मर्यादा संपली. तेव्हा रागाच्या भरात तिनेही वडीलांना उलट उत्तर दिले. जे वडीलांच्या भूतकाळातील शैक्षणिक यशावर ताशेरे ओढणारे होते. त्यामुळे ते थेट त्यांच्या अहंकाराला जावून भिडले. अहंकाराने पेटलेले वडील कोणताही मागचा पुढचा विचार न करता हातात जात्याला लागलेला लाकडाचा खुंटा घेवून आले. तसेच त्या खुंट्याने त्यांनी मुलीस निर्दयीपणे आपली अहंकाराची आग शांत होईस्तोवर बेदम मारले. त्यानंतर जखमी अवस्थेतील मुलीस दवाखान्यात घेवून जाण्याचेही सौजन्य वडीलांनी दाखविले नाही. उलट दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्रास मुलीकडे दुर्लक्ष करून शाळेत निघून गेले. मुलगी मात्र मारहाणीच्या वेदना सहन न होवून अखेरीस बेशुद्धावस्थेत गेली. शाळेतून घरी परतल्यावर वडीलांनी मुलीची अत्यंत खालावलेली अवस्था पाहिली. तेव्हा गोष्टीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तिला ताबडतोब दवाखान्यात हलविले. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली होती. कारण डॉक्टरांनी मुलीचे प्राण वाचविण्यास केलेले अथक प्रयत्न शेवटी असफल ठरले. दुर्दैवाने मुलगी बेशुद्धवस्थेतून बाहेर न येता थेट देवाघरी गेली.
ह्या संपूर्ण कहाणीत पालकांच्या अपेक्षा, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा, भडकलेला क्रोधाग्नी आणि अहंकार ह्या चारही गोष्टींचा विकृत चेहरा पहावयास मिळतो. ज्यामुळे वडीलांचा मुलीला जीवानिशी मारण्याचा उद्देश नसतांनाही त्या मारहाणीत तिने आपला जीव गमावला. हे माणुसकीला काळीमा फासणारे एक असे उदाहरण आहे. ज्यात समाजाच्या वैचारिक पातळीची शोकांतिका दिसून येते. आजची पिढी विलक्षण बुद्धीमत्तेची धनी आहे. परंतू प्रतिस्पर्धांचा पेव फुटलेल्या ह्या युगात ही पिढी आपसी तुलनांमध्ये आपली संपूर्ण उर्जा खर्ची घालतांना दिसते. आत्मपरीक्षणावर भर देवून स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी चढाओढ करण्यात स्वत:ला झोकून देत असते. जिथे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अक्षरशा कोलमडून जाते. ज्यात त्यांच्यातील इतर अशा प्रतिभा आपोआपच त्यांच्याच नजरेआड होत जातात. ज्या त्यांच्या व्यक्तीमत्वाला उभे करण्यास विशेष पाठबळ देवू शकतात. त्यामुळे अर्थातच ह्या सर्व प्रक्रियेत ते स्वत:वरचा विश्वासही गमावून बसतात. मात्र हे प्रतीस्पर्धांचे रोप समाजात इतके फोफावत कसे चालले? हा खरा प्रश्न उद्भवतो. तर त्यामागचे कारण हे आहे कि जे आज पालक बनून आपल्या पाल्यांना स्वत:च्या अपेक्षांवर खरे उतरविण्यास निघाले आहेत. ते सुद्धा कधी आपल्या विद्यार्थी दशेत असतांना आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून ते आज आपल्या मुलांवर दबाव टाकत असतात. जेणेकरून सामाजिक प्रतिष्ठेला ते तोडीस तोड शह देवू शकले पाहिजे. आयुष्यात प्रगती करण्याचा हा अघोरी मार्ग खरेतर प्रकृतीच्या नियमांच्या अपरोक्ष आहे. कारण प्रकृतीने प्रत्येक जीवास विशेष कौशल्य प्रदान केलेले आहे. त्या कौशल्यांच्या आधारे स्वत:ला आत्मशोधाच्या वाटेवर पुढे नेण्यास विशिष्ट परिस्थिती व कमीजास्त प्रमाणात दु:ख सुद्धा दिलेले आहे. मात्र दु:ख व विपरीत परिस्थितीला मार्गातील अडथळे समजण्याचे चूक आपण करत असतो. त्यातूनच आत्मशोधाच्या मार्गावरून आपोआपच बाजूला होवून जीवनात प्रतीस्पर्धांच्या मार्गाचे चयन करतो. जिथे निराशा चिंता तणाव असे दुष्ट राक्षस आपले खरेखुरे व्यक्तीमत्व गिळंकृत करण्यास वाटच बघत असतात. तरीही ह्या मार्गावर कित्येकांना अक्षरशा बळजबरीने ढकलले जाते. त्याशिवाय त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षाही बाळगल्या जातात. ज्याकरीता पालक गुरुजन तसेच ही समाजव्यवस्था अशी विस्तृत शृंखला कारणीभूत आहे.
पुरुषी अहंकाराला कवटाळून बसलेला कोणताही पुरूष मग तो मुलगा असो नवरा असो अथवा स्वत: एक बाप असो. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचा क्रोधाग्नी भडकून त्याचे अहंकारी विकृत स्वरूप त्याच्या माणसांनाच बघावे व सहनही करावे लागते. खास करून घरातील स्त्रिया त्याचे सहजच सावज बनत असतात. ज्यात घरगुती हिंसाचार, वैवाहिक बलात्कार, व्यसने, विवाहबाह्य संबंध तसेच स्त्री पुरूष भेदभाव असे प्रकार घडणे सहाजिक असते. त्यामुळे घरात व नाते संबंधांमध्ये स्त्रियांची भावनिक कोंडी होत असते. पत्नीस मुलीस तसेच घरातील अन्य स्त्रियांना सुद्धा लहान सहान चुकांवरून किंवा त्या अपेक्षांना पुरे न पडल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून देवून दंडीत करण्यात येते. ह्या अहंकारी पुरूषांना तो आपला जन्मसिद्ध अधिकार वाटत असतो. मात्र स्त्रियांनी चुकूनही काढलेला अवाक्षर त्यांच्या क्रोधाग्नीस चिथावत असतो. आजही असे प्रकार स्त्रियांच्या अस्तित्वाला धक्का देत आहेत. त्याचप्रमाणे घरात मुख्य स्थानावर असलेला असा अहंकारी पुरूष तर इतरांकडून बळजबरीने मान सम्मानाच्या अपेक्षाही ठेवत असतो. आपल्यावर विसंबून असलेल्यांना धाकात ठेवणे म्हणजे त्याच्यासाठी महान कार्य असते. अशाप्रकारे अहंकाराच्या आगेत घराचे सौख्य बेचिराख झाले तरी तो मात्र स्वत:च्या व्यक्तिमत्वाला आजीवन अगदी उंच माथ्याने कुरवाळत बसतो. आजची पिढी घरातील अशा तणावपूर्ण वातावरणामुळेही मनाच्या विकारांना बळी पडत चालली आहे. कारण त्यांना प्रतिस्पर्धांच्या ह्या युगात पावलोपावली येणाऱ्या समस्या ते मोकळेपणे बोलू शकत नाहीत. वरून उत्तम कारकीर्द घडविण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यांवर असते. त्याकरीता पालकांनी त्यांचे निरपेक्ष माया देवून मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. परंतू हे मात्र अहंकाराने ग्रसित माणसाच्या बुद्धीला कधी मान्य होत नसते.
1. पालकांनी अपत्यावर विश्वास दाखवावा
नात्यात विश्वासाची उब नात्यातील प्रेमाइतकीच आल्हाददायक असते. किंबहुना विश्वासावर तर जग सुद्धा जिंकता येवू शकते. मग आपल्याच मुलांना अपेक्षांच्या धारेवर धरतांना पालक मुलांवर अविश्वास का दाखवितात. त्यामागचे कारण हे आहे कि ते त्या अपेक्षांच्या माध्यमातून मनोमन आपली सामाजिक प्रतिष्ठा पणास लावत असतात. त्यामुळे सहाजिकच ते असुरक्षेच्या भावनेने ग्रस्त असतात. आपण ठरविल्याप्रमाणे अपत्याने करून दाखविले नाहीतर आपल्या प्रतिष्ठेला डाग लागणार ह्या भीतीनेच ते मुलांमधील क्षमता व त्यांचे परिश्रम बघण्यास कमी पडतात. तसेच कळत नकळतपणे त्यांच्या वरच्या अविश्वासाला पाणी घालत असतात. मात्र आजच्या पिढीस स्वातंत्र्याचा यथायोग्य अर्थ उमगला आहे. ते प्रत्येक क्षेत्रात नव्या कल्पना नवे मार्ग नव्या संधी अशाप्रकारे काहीतरी वेगळे शोधत असतात. त्यांच्या ह्या शोधकार्यात त्यांच्या हातून चुकाही घडतात. मात्र चुकांमधून शिकून तसेच योग्य धडा घेवून पुन्हा शोधकार्य सुरू ठेवणे हाच तर जगण्याचा मंत्र आहे. परंतू चुका घडूच कशा शकतात. हा जर पालकांचा अट्टाहास असला तर मात्र मुलांनी काय करावे. म्हणून मुलांच्या यशात अपयशात पालकांनी त्यांच्या बरोबर असले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्यात विश्वास जागवत राहिले पाहिजे.
2. पालकांनी अहंकाराला नाहीतर आपुलकीला जोपासावे
आजची पिढी संवेदनशील आहे. तसेच आपल्या उज्वल भविष्यासाठीही सजग आहे. त्यामुळे त्याकरीता परिश्रम घेण्यासही ती उत्सुक असते. परंतू त्यांच्या अंतर्मनाच्या सखोलतेतही काही अनामिक दु:ख व वयानुसार उदयास येणाऱ्या विविध भावना सामावलेल्या असतात. कधीकधी त्या कारणानेही ते आपल्या क्षेत्रात मनासारखे यशही पदरात पाडू शकत नाहीत. त्याच्या वेदनाही त्यांचे जगणे नकोसे करत असतात. अशावेळी अनेक उचित अनुचित विचार त्यांच्या मनात घोळू लागतात. कधी तर ते भावनेच्या भरात त्या विचारांना कृत्यात उतरवीण्यासही मागे पुढे बघत नाहीत. तेव्हा पालकांनी अपत्याला अहंकाराच्या तडाख्यातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न करू नये. तर आपुलकीने व मायेने त्याला विश्वासात घ्यावे. त्याला पुन्हा प्रोत्साहित करावे. कारण प्रेमानेच सर्वकाही ठीक होण्याच्या जास्तीत जास्त शक्यता असतात. अन्यथा त्याचे आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही.
3. अपत्याच्या अपयशाला आपल्या अपेक्षांशी जोडू नये
अपेक्षा केवळ पालकांच्याच नसतात. तर मुलांच्याही स्वत:कडून अनेक अपेक्षा असतात. परंतू कोणाच्याही अपेक्षा थेट जीवनाशी खेळणाऱ्या नसाव्यात. कारण ह्या अपेक्षांच्या इरेला पेटूनच समाजातील सन्माननीय पेशातील त्या इसमाने स्वत:च्याच मुलीच्या जीवनाचा अंत केला. जो आपल्या मुलीस ठार करू शकतो. तो एक शिक्षक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांसाठीही धोकादायक ठरला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ह्या जगात फक्त जन्मदातेच आपल्या अपत्यांवर निरपेक्ष प्रेम करतात. हे आपल्याला ठाऊक आहे. मग हा पिता अपवाद कसा काय ठरला. कारण त्याच्या अपेक्षा साध्या नसून सामाजिक प्रतिष्ठेशी निगडीत होत्या. असे पालक अक्षरशा माणुसकीला काळीमा फासत आहेत. कारण ते स्वार्थाने बरबटलेले आहेत. खरेतर अपत्याचे यश अपेक्षांशी नाहीतर आपल्या निर्मळ आनंदाशी जोडावे. तसेच यदाकदाचित ते मनो वांछित यश पदरात नाही पाडू शकले तर त्यांच्यात पुन्हा उत्साह जागृत करण्यासाठी केवळ त्यांच्या पाठीशी उभे राहावे.
4. पालकांनी आपले अपत्य समाजाचे धरोवर असल्याचे ध्यानात ठेवावे
अपत्याची जबाबदारी हे पालकांचे उत्तरदायित्व असते. तरीही आज त्यांचे घडणे म्हणजे समाजासाठी उज्वल भविष्याची निव ठेवण्यासारखे आहे. तेव्हा आई वडील दोघांपैकी एकानेही अपत्या बरोबर अशाप्रकारचे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न जरी केला. तरी दुसऱ्याने आपल्या अपत्यास वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी परिस्थितीच्या गरजेनुसार यथायोग्य मार्ग निवडावा. निदान आरडाओरड करून शेजाऱ्यांना तरी मदतीस बोलवावे. परंतू सर्वप्रथम आपल्या अपत्याचे जीवन सुरक्षित करावे. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवावे. कारण केवळ जन्मदात्यांच्या अमानवीयतेमुळे भविष्यात समाजाची किमती धरोवर ठरणार असलेल्या अपत्याचे जीवन धोक्यात येणे म्हणजे समाजाची मोठी हानी आहे. एक होतकरू मुलगी पदरात असणे खरोखर देशाची शान असते. तिलाच क्षुल्लक कारणावरून जीवानिशी संपविणारा बाप एक निर्दयी कसाईच म्हंटला पाहिजे. तेव्हाच त्याने तरुण मुलीवर नुसता हातच उगारला नाहीतर तिला इतकी बेदम मारहाण केली कि त्यात तिची जीवनयात्राच संपली.
मी सुद्धा एक आई आहे. तेव्हा एक पालक या नात्याने ह्या दुर्दैवी घटनेस बळी पडलेल्या माझ्या लेकी समान असलेल्या त्या मुलीस मी मनापासून माफी मागते. ती आज ह्या जगात नाही. तिच्या मृत्यूबरोबर तिची स्वप्न देखील मातीमोल झाली. परंतू तिचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. ते एका मोठ्या बदलाची नक्कीच नांदी घेवून येईल. तिच्या आईने उशीरा का होईना पण योग्य पाउल उचलले. हत्याऱ्यास कठोरातील कठोर सजा सुनावली जाईस्तोवर तिने कदापि हार मानू नये. कारण त्या दोघी मायलेकी असल्या तरी एक स्त्री म्हणून तिने अन्य स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी नेटाने लढा द्यावा. जर तिने योग्यवेळी स्वत:मध्ये दुर्गेचा संचार केला असता तर आज तिची गुणी मुलगी जीवित असती. परंतू कदाचित नियतीच्या मनात हेच असावे. जे एक उदाहरण बनून ह्यापुढे इतर पालकांना दिशा दाखवत राहील. दिवंगत मुलीच्या आत्म्यास शांतता लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (39)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)