आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा आईच्या नावाचा घोषा लावत संपुर्ण घर डोक्यावर घेतात.

  आई म्हणजे मुलांची आदरयुक्त मैत्रीणच असते. आई आणि मुलं एकमेकात अशी रमतात की त्यांना जगाचाही विसर पडतो. ह्या निर्मळ नात्याने घराला घरपण येते. ”घार फिरे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी” ह्या ओळी आईला तंतोतंत लागू होतात. आईचे मन मुलांच्यात असे गुंतलेले असते की मुलं तिच्या डोळ्यांपुढे असली किंवा नसली तरीही तिचे लक्ष त्यांच्यापासून कधिही विचलीत होत नाही. मुलांना जराही दुखलं खुपलं की आईच्या डोळ्यात टचकण पाणि येते. मुलं कितीही मोठी झाली तरी ती आईसाठी लहानच असतात. परंतू मुलांवरच्या अति प्रेमा मुळे कधीकधी आईला त्यांच्या पासून दूर जावून काहिही करणे शक्य होत नाही.

   देवाला प्रत्येका जवळ पोहोचणे शक्य नसल्यामुळे त्याने आईची निर्मीती केली. आई आपली तहान भूक जाणते. स्वत:च्या जीवावर उदार होवून आपले संरक्षण करते. आपल्यावर संस्कार करते. आपली सेवा सुश्रुषा करते. आपली मैत्रीण होते. आई मुलांसाठी देवच असते. आईची ही माया, वात्सल्य आपल्याला कायम आपल्या बरोबर हवेहवेशे वाटत असते. ह्याच कारणाने आपण आईला एक व्यक्ती म्हणून समजून घेण्यात कमी पडतो. मुलांच्या संगोपणास प्राथमिकता देणे हे आईचे कर्तव्य असले. तरिही त्यात तिच्या आयुष्याचा बराच मोठा आणि महत्वाचा कालावधी निघूण जातो. त्यानंतर ती मुलांसोबतच्या त्या जीवनासच आपले आयुष्य समजू लागते. आणि स्वत:मधल्या कर्तबगारीस विसरून इतरांवर विसंबून जीवन व्यतीत करू लागते.

  जसजसा काळ पुढे सरकतो तिचा स्वत:वरचा आत्मविश्वास कमजोर पडू लागतो. आणि इतरांनाही तिच्यातील कलागुणांकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यामुळे तिला कोणिही प्रोत्साहन देत नाही. तिच्यामध्ये सेवाभाव जागृत होतो. आणि ती एका ठरलेल्या व सामान्य दिनचर्येस आपलेसे करते. 

  आपल्याला आईची एक बाजू ठाऊक असते जी आपल्या आसपास वावरत असते. परंतू एक व्यक्ती म्हणून त्याच आईच्या दुसर्‍या बाजूचा आपल्याला थांगही नसतो. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती शिक्षक असेल तर त्याने सर्वतोपरी आदर्श असणेच अपेक्षीत असते. परंतू एक व्यक्ती म्हणून पाहिले तर प्रत्येकातच चांगल्या वाईट गोष्टी असतातच. तसेच प्रत्येकाकडून चुकाही होतात. मग ती व्यक्ती शिक्षक का असेना.

  तसेच डॉक्टर कधि आजारीच पडत नाहीत असे आपल्याला वाटते. परंतू तेही व्यक्तीच असतात. आजारातून त्यांचीही सुटका होत नसते. त्याचप्रमाणे घरात आईचे स्थान असते. जिच्याकडून फक्त कर्तव्यदक्ष असणेच अपेक्षीत असते. परंतू एक व्यक्ती म्हणून तिची स्वप्न, तिच्या आवडी निवडी, तिच्या मध्ये असलेली कला कौशल्ये ह्यांच्याकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करण्यात येते.

   अजूनही बर्‍याच घरांमध्ये कामांवरून भेदभाव करण्यात येतो. हे काम स्त्रियांचे तर हे काम पुरूषाचे अशा निरर्थक गोष्टींमध्ये आपण फसलेले असतो. म्हणूनच कदाचीत आजवर आईकडे एक व्यक्ती म्हणून पाहण्याचे टाळण्यात आले. कारण तिला घरापुरते सिमीत ठेवणे हाच त्यामागचा हेतू असावा. आईने मात्र त्यासाठी कधिही तक्रार केली नाही. तिने घराला आणि नात्यांना आपले कर्तव्य समजून सेवाभावाने व निस्वार्थपणे जपले. म्हणूनच घरात तिचे एकमेव स्थान असते. आणि त्या स्थानावरून तिचे कोणत्याही कारणाने हलणे आपल्याला नामंजूर असते. त्यामुळेच आईच्या घराबाहेरील कारकिर्दीचा फारसा विचार केल्या जात नाही. बर्‍याचदा त्यासाठी तिला तिच्या बाहेरील कारकिर्दीचा त्यागच करावा लागतो.

    परंतू आता काळ बदलला आहे. खुद्द स्त्रियांनीच प्रत्येक क्षेत्रात प्रगती करून कामावरून स्त्रि पुरूषात निर्माण करण्यात आलेला भेदभाव मिटवीला आहे. तेव्हा आता आपणही बदलत्या काळाचा रोख ओळखला पाहिजे. आणि त्याची सुरवात घरात आईला पाठिंबा देवून स्वत:पासून केली पाहिजे.

  आईला तिच्या घरातील कर्तव्यापासून लवकर लवकर उसंत मिळावी ह्यासाठी मदतीचा हात पुढे करावा. जेणेकरून ती स्वत:साठी वेळ काढू शकली पाहिजे. आणी आत्मनिर्भर होण्याचे विचार तिच्या मनातही येवू लागले पाहिजे. आत्मनिर्भर होणे ही तिच्या साठी सक्ती नसावी. परंतू तिची मनोमन इच्छा असल्यास तिला घरातून समर्थन व प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

   आईच्या आयुष्यात जेव्हा निवृत्तीचा काळ येतो. तेव्हा वाढत्या वयाबरोबर त्याचा सामना करणे तिच्यासाठी सोपे नसते. कारण आता ती एकटी असते. तिच्या सभोवताल रेंगाळणारी मुले आता मोठी होवून त्यांच्या स्वतंत्र विश्वात व्यस्त असतात. जर ह्या काळात तिची कारकीर्द सुरू करण्यास घरच्यांनी प्रोत्साहन व पाठींबा दिला. तर तिच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करता येवू शकतो. त्यामुळे निवृत्तीच्या काळास ती धिराने सामोरे जावू शकते. त्याचप्रमाणे कामाच्या  माध्यमातून ती कित्येक नवनवीन लोकांच्या संपर्कात येईल. तसेच त्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ्य योग्य रितीने जपता येईल.

  आईच्या संपुर्ण आयुष्यात तिला आलेले अनुभव आणि त्यामधून तिच्या विचारांना आलेली परिपक्वता ह्या माध्यमातून ती अनेकांना मदत करू शकते. त्याचबरोबर आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याला देखील अर्थपुर्ण बनवू शकते. निसर्गाने स्त्रियांना विशेष घडवीले आहे हे तर आपण जाणतोच. तरीही आपण त्यांना एका सिमीत आयुष्यात बांधण्याचा प्रयत्न करतो. किंवा त्यांना कर्तव्यदक्षतेचा किताब देवून आदर्श बनवीतो. अन्यथा प्रत्येक स्त्रि असामान्य व विलक्षण क्षमतांनी परिपुर्ण असते.

  जर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून स्त्रियांच्या ह्या कर्तबगार बाजूस पुढे आणण्यासाठी त्यांना भक्कम पाठिंबा दिला. तसेच त्यांच्या पाठिशी उभे राहिलो तर त्यांच्यात समाज निर्मीत सिमा ओलांडण्याचे धाडस येईल. त्याचप्रमाणे त्या आत्मनिर्भर बनून एक अर्थपुर्ण जीवन जगू शकतील. म्हणूनच प्रत्येक घरातून प्रत्येक आईस पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.

1. आई तिच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम बनवू शकेल.

  मुलं मोठी झाली कि हळूहळू ती स्वावलंबी होवू लागतात. त्यामुळे त्यांचे आईवर प्रत्येक गोष्टीसाठी विसंबून राहणे कमी होत जाते. अशावेळी आईकडे दैनंदिन कामा व्यतिरीक्त भरपूर रिकामा वेळ उरतो. त्या वेळेचा कसा उपयोग करावा हे तिला कळत नाही. कारण बराच काळ घरात घालविल्यामुळे अचानक बाहेर पडून काही करण्यास सुरवात करण्याचे धाडस तिच्यात नसते.

  आईसाठी हा विचार घरच्यांनी केला पाहिजे. तसेच तिच्या मनात निर्माण झालेल्या त्या विचारास पाठबळ दिले पाहिजे. आईचे मन घरात आणि मुलांमध्ये इतके गुंतले असते. कि ज्यामुळे तिचे पाऊल सहजा सहजी घराबाहेर पडणे शक्य नसते. तेव्हा घरच्यांनी तिच्या माघारी सर्वकाही निट सांभाळण्याची तिला हमी देण्याची आवश्यकता असते. त्यासोबत तिला प्रोत्साहन देवून तिच्यात हिंमत जागविण्याची गरज असते. तरच ती तिच्या स्वतंत्र जगाची निर्मीती करू शकेल आणि स्वत:ला सिद्ध करू शकेल.

2. आईच्या मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होणार नाहीत.

   स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील कर्तव्य व जबाबदार्‍यांना अत्यंत उल्हासितपणे पार पाडत असतात. परंतू त्यात त्यांच्या जीवनाचा बराच मोठा व उमेदीचा काळ निघूण जातो. बघता बघता मुलं मोठी होतात. शिक्षण व नोकरीच्या निमीत्ताने घरापासून तसेच आईपासून लांब जातात. आई मात्र एकटी पडते. तिच्या आयुष्यात निवृत्तीचा काळ येतो. मुल तिच्या आसपास नसल्याने तिच्यातील उत्साह व तिची घरभर चाललेली लगबग मावळते.

  ह्या सर्व गोष्टींचा तिच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण आईच्या जागेवर जावून तिच्या मानसिक वेदना समजून घेतल्या पाहिजे. आणि तिच्याशी संवाद साधून तिचे मत जाणून घेतले पाहिजे. आणि तिच्या संमतीने तिची कारकिर्द नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा आई तिच्या व्यक्तीगत कारकिर्दीत व्यस्त होईल तेव्हा आपोआपच ती मनाने कणखर होत जाईल.

3. आई आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल.

   घराविषयीच्या जबाबदार्‍या पार पाडतांना आई तिच्यातील सेवाभावाने सर्वकाही निभावून घेत असते. त्यासाठी ती तिच्या अंगी असलेल्या कौशल्यांना स्वत:पुरते सिमीत ठेवते. त्याविषयीची कधिही वाच्यता करत नाही. आणी कधिही आपल्या मनात त्यासंबंधीत अहंकार बाळगत नाही. त्यामुळे आईची ती भक्कम बाजू कधिही कुटूंबियांसमोर येत नाही. जेव्हा मुलांच्या संसाराला सुरवात होते तेव्हा मात्र आईसाठी तो विषय कायमचा संपतो. कारण ती स्वत:ला वयाच्या बंधनात अडकवून घेते.

  निवृत्तीनंतर देव धर्म करणे तसेच चिंतन करण्यात वेळ न घालविता आपल्या कला कौशल्यांना महत्व दिल्यास लोक काय म्हणतील ह्या विचारांनी ती त्रस्त होते. अशावेळी ती आपल्या मनाला आवर घालते. परंतू वयाचे बंधन व लोक काय म्हणतील हे आपल्या मनीचे विचार असतात. लोकांना त्यामुळे काहिही फरक पडत नाही. अशावेळी आपण तिच्या विश्वासाला पाठबळ दिले. तर ती तिच्या नविन आयुष्याला सुरवात करू शकेल. त्याचप्रमाणे आर्थिकरित्या सक्षम होवून स्वाभिमानाने जगू शकेल.

4. आई अनेक स्त्रियांसाठी उदाहरण ठरू शकते.

   आई सारख्या अनेक स्त्रियांनी त्यांचे आयुष्य घरापुरते सिमीत केले आहे. त्यासोबत त्यांनी त्यांच्या उज्वल भवितव्याविषयीची उमेद सोडली आहे. परंतू स्त्रियांना त्यांच्या क्षमतांचा विसर पडणे किंवा क्षमता असूनही क्षुल्लक कारणांसाठी त्यांचा त्याग करणे समाजाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत घातक आहे. कारण स्त्रियांच्या माध्यमातून समाजात कितीतरी सुधारणा घडून येवू शकतात. तेव्हा आईमध्ये असलेल्या तसेच काळान्वये मागे राहिलेल्या कला कौशल्यांना जगापुढे आणण्यासाठी तिला सर्वतोपरी पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे.

  ज्यामुळे आईचा आत्मविश्वास वाढेल. ती स्वावलंबी होईल. आणि तिने उचललेल्या धाडसी पावलांमुळे अनेक स्त्रियांच्या मनात आशा पल्लवीत होतील. आपल्या पाठिंब्यामुळे आईने तिच्या आयुष्यात आणलेले बदल असंख्य आयांसाठी उदाहरण ठरतील.

  आई आपला पहिला गुरू असते. तिला आपण देवाच्या जागी मानतो. त्याचप्रमाणे आईला अनेक उपाध्या देवून गौरविण्यात येते. परंतू आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि आई देखील  आपल्या प्रमाणे एक हाडा मासाची व्यक्तीच असते. जेव्हा आपण तिला त्या नजरेने बघू आपल्याला तिच्या समस्या कळतील. तिच्या मध्ये दडलेली कला कौशल्य निदर्शनात येतील. त्याक्षणी आपण तिला गृहित धरणे बंद करू. आणि आपल्या भक्कम पाठिंब्याने तिला स्वावलंबनाकडे व स्वाभिमानाने जगण्याकडे घेवून जावू. हे आपल्या पैकी प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *