‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”

   मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान असूनही भिकारी असतो. आईचे प्रेम सर्वात श्रेष्ठ असते. त्याची तुलना होणे केवळ अशक्य आहे. आईशीवाय घराला घरपण नसते. आणि आपल्या आयुष्याला अर्थ नसतो. म्हणूनच फ. मुं. शिंदे ह्यांचे शब्द आहेत –

               आई एक नाव असतं

               घरातल्या घरात

               गजबजलेलं गाव असतं

               आई असते जन्माची शिदोरी

               सरतही नाही …… उरतही नाही

     खरेच आहे हे. आई शरिर रूपात आपल्यासोबत असली किंवा नसली तरिही ती आपल्यातच सामावलेली असते. तिने आपल्यावर केलेल्या संस्कारांची साथ आजीवन आपले मार्गदर्शन करत असते. अशाप्रकारे आपण नेहमीच आपल्या बोलण्यातून व आपल्या कृतीतून आईने केलेल्या संस्कारांचे प्रतिनिधीत्व करीत असतो. आईचा दर्जा सर्वात उंच असतो. मग ती काळी माती असो ही सृष्टी असो हा देश असो किंवा आपल्याला जन्म देणारी आपली आई असो.

    आई आपल्या मुलांचे सुख-दु:ख त्यांनी न सांगताही स्वत:हून समजून घेते. आई आपल्या  मुलांवर विनाअट प्रेम करते, तसेच वेळ्प्रसंगी कठोरही होते. तिच्या कठोर होण्यामागेही प्रेमच दडलेले असते. आई मुलांना घडविण्याचे श्रेष्ठ कामही करते. 

आपल्या गौरवशाली इतिहासात राजमाता जिजाऊंचे नाव अजरामर आहे. ज्यांनी आपला मुलगा छत्रपती शिवाजी राजे ह्यांना स्वपराक्रमातून शिक्षण दिले. आणि स्वराज्याचे बिज त्यांच्या मनात रुजवीले. एका स्वाभिमानी व पराक्रमी मातेने आपली आई ही भुमिका प्रामाणिकपणे निभवून  गोरगरीब रयतेस आपल्या पोटाशी धरले. त्यांच्यावर अन्याय करणार्‍यांचा नायनाट करण्याचे बाळकडू आपल्या मुलाच्या मनात रुजवीले. तसेच अन्याय सहन करणार्‍या रयतेस त्याविरूद्ध पेटून उठण्याचे सामर्थ्यही दिले. आणि पुढे अफाट अशा मराठा साम्राज्याची स्थापना झाली. 

 तशाच एक थोर माता ‘सिंधूताई  सपकाळ’
 ज्यांनी आपल्या पदरात असलेल्या दु:खाला कुरवाळत न बसता
, आपला मायेचा पदर मोठा करून अनेक अनाथ बालकांना आपल्या पोटाशी धरले. त्यांनी त्यांच्या तील वात्सल्य आपल्या अपत्यापूर्ते सिमीत ठेवले नाही.
 तर हजारो अनाथ मुलांचे आईपण स्विकारले. त्यांच्यातील आईपणाने उंची गाठली. आणि  त्यांनी  आई  ह्या  शब्दाची  महती स्थापीत  केली.
 

आईच्या वात्सल्याला  सिमा नाही. प्राणि असो किंवा वृक्ष असो आई सर्वांवर माया करते. असेच एक निराळे उदाहरण आहे ही थोर आई. दिल्ली येथील रहिवाशी प्रतिमा देवी. जी दिवसभर भंगार गोळा करते. दिवसाअखेरीस ते विकून त्यातून मिळालेल्या पैस्यांनी तिच्या चारशेहून अधिक मुलांसाठी खर्च करते. तिची मुले आहेत  रस्त्यावरील कुत्रे. जी उपाशी, लंगडी, रोगग्रस्त अशी आहेत. प्रतिमा देवींनी त्यांचे आईपण स्विकारले व ती कुत्र्यांची आई म्हणून ओळखल्या जावू लागली. कुत्र्यांच्या खाण्या पिण्यापासून ते त्यांच्या लसीकरण व आंघोळी पर्यंतचा सर्व खर्च ही आई उचलते. रस्त्यावरचा प्रत्येक कुत्रा ज्यात मालकांनी सोडलेले कुत्रेही सामील असतात, त्या सर्वांना ती आपल्या पदरात घेते. कारण त्यांचे आईपण स्विकारून तिला मानसिक सुख मिळते. प्रतिमा देवींचे वयाच्या सातव्या वर्षीच लग्न झाले होते. आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ती तीन अपत्यांची आई झाली होती. परंतू पतिच्या अत्याचाराला कंटाळून तिने राहते घर सोडले व दिल्ली येथे आली. आणि आज तिचे भले मोठे कुटूंब तयार झाले. तिच्या अंतकरणात असलेल्या वात्सल्याने प्राण्यांना साद घातली. व त्या मुक्या प्राण्यांनी तिची लेकरे होवून तिचे एकटेपण आणि दु:ख दूर केले.

 अशा ह्या थोर आयांना आणि त्यांच्या महान कार्याला ‘सलाम’ आहे. त्यांच्या पायाशी डोके ठेवून नतमस्तक होण्यासाठी मन आतुर होते. कारण त्यांना ‘आई’ ह्या दिव्य शब्दाचा सखोल अर्थ पुर्णपणे कळला.

    मित्रांनो, लहानपणी आपले आईशिवाय पानही हालत नाही. परंतू जसजसे आपण मोठे होतो. आपण आपल्याच जगात रमत जातो. आणि आईपासून दूर होत जातो. किंबहूना आईला गृहीत धरणे सुरू करतो. ती जरी आपली आई असली तरिही ती एक व्यक्ती आहे. हे विसरून चालणार नाही. तिच्या मन-भावनांची काळजी घेणे हे आपले पहीले कर्तव्य असले पाहिजे. कारण जेव्हा ह्या कठोर जगाचा सामना करतांना ती आपल्यासोबत नसते तेव्हा आपल्या हाता-पायात बळ राहत नाही. आईच्या निस्वार्थ प्रेमाची साथ आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जातांना ताकद देते. एका सुंदर कवितेच्या चार ओळी येथे लिहाव्यास्या वाटतात-

           प्रेमास्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई

             बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी

          ही भूक पोरक्याची होई न शांत आई

             पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही

         वाटे इथून जावे, तुझ्यापुढे निजावे

            नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे

  मित्रांनो, आईने प्रेमाने लहानपणी आपल्याला भरवलेला घास स्मरणात आणा. त्याची चव अमृतासारखी होती. जी आता शोधूनही सापडत नाही. मुलांच्या आवडीचे बणवून खाऊ घालतांना आईला कधिही थकवा येत नाही. एकदा आईच्या प्रेमळ नजरेने स्वत:कडे बघा. तिला आपल्या बाळात कसलीही उणीव भासत नाही. आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी. त्यांनी मोठे नाव कमवावे हीच तिची प्रबळ इच्छा असते. त्यासाठी ती कितिही कष्ट उपसायला तयार असते. आपल्या मुलांना कशाचिही कमी पडू नये ह्यासाठी ती देवाकडे मागणे मागते. देव सर्वांजवळ पोहचू शकत नाही म्हणून त्याने आईला घडविले हेच म्हंटले पाहिजे. म्हणूनच आईच्या इच्छेला आपल्या जीवनात नेहमी प्रथमिकता असली पाहिजे.

1. स्वत:ची तुलना इतरांशी करू नये.

    आईला आपल्या मुलांमध्ये कोणतीच उणीव भासत नाही. तेव्हा आपण आईच्या सकारात्मक नजरेने स्वत:कडे पाहिले पाहिजे. तेव्हाच आपण आपल्यातील  कमतरतांवर नाही तर आपल्यातील विशेष गुणांवर लक्ष केंद्रित करू शकू.  कारण कमतरता आपल्याला अद्वितीय बणवितात तर विशेष गुण शक्ती प्रदान करतात. ह्या दोन्हींच्या असण्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते. तेव्हा आपला स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होतो. आणि आपण प्रगतीच्या दिशेने झेप घेतो. जर आपण स्वत:ची तुलना इतरांशी करू लागलो तर आपली प्रगती थांबते. त्यासोबतच आईने आपल्यासाठी  पाहिलेल्या  विशेष  स्वप्नांवर  पडदा  पडतो. आई मात्र कधिही हिरमुसत नाही. हेच  आईचे  मोठेपण  असते. आई कायम आपल्या मुलांकडे आशेने बघते आणि  ती  आपल्या मुलांच्या  पाठिशी कायम उभी  असते. 

2. स्वत:ला सिद्ध करावे

   आई मुलांमध्ये तिच्या आयुष्यातील स्वप्न बघते. ती पुर्ण व्हावित अशी तिची मनोमन तीव्र इच्छा असते. आणि जेव्हा ती आपल्या मुलांना त्या दिशेने पावले टाकतांना बघते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणून आयुष्यात नेहमी प्रगतीची कास धरावी. कारण कोणितरी तरी आपल्या प्रगतीकडे डोळे लावून बसलेले आहे. आळसाला झीडकारून मेहनतीचा स्विकार  करावा. आणि स्वत:ला सिद्ध करावे.

3. समाजासाठी योगदान द्द्यावे

  आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या गाडीतून जातांना रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला आपल्या आईच्या वयाच्या स्त्रीया  त्याही कोणाच्या तरी आई असतात. काही कारणांनी रस्त्यावर भीक मागतांना दिसतात. लोकांच्या पुढे हात पसरून एक, दोन रूपयांसाठी गयावया करतांना दिसतात. ते दृश्य बघून आपल्या मनास वेदना होत नसतील तर नक्कीच एक माणूस म्हणून आपण कोठेतरी कमी पडत आहोत. अशावेळी आपले हे कर्तव्य असले पाहिजे कि आपण आपली गाडी बाजुला थांबवून त्यांच्या जवळ जावून त्यांची आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. आपल्याला शक्य असल्यास त्यांना त्यांच्या घरी पोहचविन्याचे कर्तव्य निभावले पाहिजे. तसे करता नाही आले तर एखाद्या वृद्धाश्रमात त्यांच्या राहण्याची सोय करून द्यावी. त्यांच्या प्रती आपले हे योगदान आपल्या आईची सेवा केल्याप्रमाणेच असते.

4. योग्य माणूस बनावे

  आईचे प्रेम अतुलनीय असते. आपल्याला आईची सोबत लाभली आहे तर ते आपले अहोभाग्यच आहे असे समजावे. आपण आयुष्यात मोठ-मोठ्या पदव्या मिळवतो, मोठे यश प्राप्त करतो. परंतू जर आपण माणूस म्हणून योग्य नसलो तर  मिळवलेल्या यशाने आपण  हुरळून  जातो आणि त्यामुळे आपला अहंकारच बढावतो. अहंकारामुळे आपली वैचारीक पातळी घसरते आणि ही माणूस म्हणून आपल्या अधपतनाची सुरवात असते. म्हणूनच आईच्या संस्कारांना कधिही विसरू नये. ते आपल्याला नेहमी जमिनीवर टिकून राहणे शिकवतात. आणि माणूसकीशी बांधून ठेवतात.

   ‘आई’ ह्या विषयावर बोलण्यासाठी शब्द अपूरे पडतात. कारण आईचे वात्सल्य विशाल, कवेत न मावनारे असते. आईच्या सहनशक्तीला मर्यादा नसतात. आई विचारवंत असते आई मार्गदर्शक असते आई शिक्षक असते आई मैत्रिण असते. अशी अनेक रूपे आईची आपल्याला बघायला मिळतात. हाच आई ह्या शब्दाचा सखोल अर्थ आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *