आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते

       

आपल्या सर्वांच्या आयुष्यात जन्मदात्यांना सर्वोच्च मानाचे स्थान असते. त्याचप्रमाणे आपल्या हातून जन्मदात्यांची सेवा घडणे हेही सर्वात पुण्याचे कार्य असते. कारण जन्मदात्यांनी त्यांच्या सहजीवनात एकत्र येवून घेतलेल्या निर्णयातूनच आपल्याला ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. आई वडीलांच्या हृदयातही आपल्या मुलांसाठी निस्वार्थ भाव असतो. त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांचे रंगरूप व बाललीला बघून जेवढा आनंद होत असतो तेवढा अन्य कोणासही होत नाही. आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या कमतरतांची, त्रासाची तसेच वेदनांची झळ पोहचू नये. म्हणून आईवडील आपल्या आशिर्वादांचे व संरक्षणाचे कवच मुलांभोवती बनविण्यासाठी आजीवन अक्षरशा झटत असतात. आई वडीलांना आपल्या मुलांचे शारीरिक व्याधी किंवा दुखणे स्वत: वाटून घेणे शक्य नसले. तरीही मुलांच्या आवाजातून उठणारी वेदनेची कळ त्यांचे मन विचलीत करण्यास पुरेशी असते. किंबहुना मुलांना होणाऱ्या त्रासापेक्षाही कितीतरी पटीने अधिक मात्रेत ते मुलांच्या वेदना स्वत: अनुभवू शकतात. कारण मुलं ही आई वडीलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. म्हणूनच सृष्टीची उच्च स्तरीय उर्जा, जी अदृश्य स्वरूपात क्षणोक्षणी आपल्या बरोबर राहून आपले संरक्षण करत असते. तसेच आपण त्या उर्जेसमोर कायम नतमस्तक राहून आभार व्यक्त करत असतो. त्या ईश्वरानंतर आपल्या आयुष्यात केवळ आपल्या तीर्थरूप जन्मदात्यांचे स्थानच सन्माननीय असते. कारण आई वडील एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे आपल्या मायेची सावली त्यांच्या जीवात जीव असे पर्यंत आपल्या मुलाबाळांवर धरून असतात. त्यामुळे आपण आपल्या वयाच्या कोणत्याही टप्प्यात आपल्या जन्मदात्यांना मुकलो तरीही आपल्याला पोरके झाल्याचे दु:ख तितक्याच तीव्र प्रमाणात झाल्यावाचून राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात त्यांची रिक्त झालेली जागा व उणीव कशानेही भरून काढता येत नाही. आई वडील मुलांसाठी आदर्श तर असतातच. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आयुष्यातील अत्यंत बिकट काळात फक्त जन्मदातेच एकमेव आशेचा किरणही असतात. कारण आयुष्यात कधी कोणत्याही कारणाने सर्वकाही गमावल्याचे शल्य आपल्या मनाला छिन्न विच्छिन्न करत असल्यास. आई वडीलांचे अनुभवाचे बोल व आपल्यात विश्वास जागृत करणारा पाठीवरून फिरणारा त्यांचा मायेचा हात ह्या दोनच गोष्टी आपल्यात पुन्हा उमेद जागृत करत असतात. त्यामुळेच आई वडीलांचे आयुष्यभर एकमेकांशी एकनिष्ठ राहून एकत्र असणे व त्यांचे आपसातील नाते हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे स्वतंत्रपणे प्रतिनिधीत्व करणारे असणे. ह्यावरून एका सर्वतोपरी सुखी कुटूम्बाचा पाया निर्धारित होत असतो. कारण त्यांच्या नात्याचे त्यांच्याच मुलांकडून कळत नकळतपणे सूक्ष्म निरीक्षण होत असते. किंबहुना त्या नात्याचे पुढच्या पिढीकडून अनुकरण केले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्याशिवाय त्या नात्यावरूनच मुलांचाही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या इतर नात्यांप्रती दृष्टीकोन, मत व  विश्वास विकसित होत जातो.  

     त्या अनुसार आजच्या पिढीचा नात्यांकडे बघण्याचा, मग ते आई वडील का असेनात त्यांनाही एक माणूस ह्या संज्ञेत बसवून त्यांच्याकडे तठस्थपणे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन असतो. कारण आता शैक्षणिक क्षेत्राच्या व्यापकते मुळे नाते संबंधांपासून ते मनोविकारांपर्यंत भिन्न भिन्न गोष्टींवर सखोलतेने दृष्टीक्षेप टाकण्यात येतो. ज्याद्वारे आपल्या सभोवतालच्या माणसांकडे भावनिक पातळीवरून जरा पुढे येवून तार्कीकदृष्ट्या पाहण्यावर भर देण्यात येतो. त्यामुळेच आपण आपल्या आई वडीलांकडून केवळ अपेक्षा न ठेवता माणूस म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेण्यास. जीवनात त्यांच्याकडून कळत नकळतपणे झालेल्या चुकांसाठी त्यांना माफ करण्यास. तसेच त्यांना सर्वतोपरी समजून घेण्यास पात्र होत जातो. त्याचप्रमाणे आई वडीलांचे कर्तुत्व, जीवनात त्यांनी मिळवलेल्या उपलब्ध्या, दैनंदिन जीवनातील त्यांच्या सवयी, समाजातील त्यांचे स्थान, त्यांचे चरित्र, नात्यांप्रती असलेली त्यांची कर्तव्यदक्षता तसेच त्यांच्यातील योगदानकर्ता अशा कितीतरी मापदंडावरून पडताळणी केल्या नंतर मुलांचे त्यांच्या विषयी एक विशिष्ट मत बनत जाते. ह्याचा अर्थ हा होतो कि मुलांच्या मनात कायम आपल्या जन्मदात्यासाठी परस्पर सम्मान तर असतोच. परंतू जेव्हा आई वडील माणुसकीच्या सर्व मापदंडान्ना पार करून मुलांच्या नजरेत उंच उठतात. तेव्हा मात्र ते मुलांसाठी आदर्श आई वडील ठरतात. तशा आई वडीलांच्या कर्तुत्वाची महती आपोआपच पुढच्या पिढ्यांनाही ऐकविण्यात येते. अन्यथा जन्मदाते म्हणून मुलांच्या आयुष्यात त्यांचे कायम एक स्थान असते. तसेच मुले आपल्या पद्धतीने त्यांच्याप्रती असलेली आपली कर्तव्यही निभावत राहतात. अशाप्रकारे आपल्या पुरते आयुष्य पार पाडल्यानंतर एकेदिवशी ते ह्या जगाचा निरोप घेवून निघून जातात. त्यांच्या जाण्या सोबतच एक पिढी अगदी सहजपणे लोप पावून नवी पिढी उदयास येते. म्हणूनच आई वडीलांनी मुलांसमोर आपल्यातील माणूसपणाचा ठसा उमटविणे आवश्यक आहे.  

   आई वडीलांचे आपसातील एकमेकांचे जोडीदार म्हणून असलेले नाते कशा पद्धतीने संपूर्ण कुटूम्बावर प्रभाव टाकत असते. हे घरातील मुलांच्या मानसिक आरोग्यावरून पडताळून पाहता येवू शकते. कारण खास करून घरातील मुलगी ही वडीलांचे बारीक निरीक्षण करतच लहानाची मोठी होत असते. त्या अनुसार तिच्या मनात तिच्या भावी जोडीदाराची तिच्याही नकळतपणे छवी निर्माण होत जाते. त्याचप्रमाणे ती छवी निर्माण होत असतांना घरात वडील आईला कशी वागणूक देतात ही महत्वपूर्ण बाब मुली सर्वात जास्त ग्राह्य धरत असतात. घरात वडील आईशी वागतांना ज्या ज्या चुका करतात, त्यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्याला आयुष्यात सहन कराव्या लागू नयेत. ह्याचीही कल्पना त्या करत असतात. मग वडील म्हणून ते कितीही उत्तम असले. किंवा त्यांच्यासाठी ते हिरो असले. तरीही त्यांनी घरातील आपली अर्धांगिनी असलेल्या स्त्रीच्या सम्मानाला व तिच्या घरातील क्षेत्राला प्राथमिकता देणे त्या मुलीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असते. ह्यावरून हे लक्षात येते कि मुलींमध्ये त्यांच्या नकळत्या वयापासूनच नैसर्गिकरीत्या जागरूकता असते. त्याद्वारे त्या आपल्या आईला एक स्त्री म्हणून उत्तमरीतीने समजू शकतात. त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्रीला प्रेमासोबातच त्यांचे हक्क, मर्यादा व परस्पर सम्मान प्रदान करूनच त्यांचे मन जिंकता येवू शकते, ह्याची देखील त्यांना पूर्णपणे जाणीव असते. त्यामुळेच जेव्हा मुली वडीलांकडून आपल्या आईला अशा पद्धतीने महत्व दिले जात असल्याचे दृश्य घरात बघतात तेव्हाच त्यांच्या मनाला आई वडीलांच्या सुदृढ नात्याची ग्वाही मिळते. त्याचबरोबर वडीलांचे त्यांच्या नजरेतील स्थान एक माणूस म्हणून आणखीच विश्वासास्पद व उंच होत जाते. परंतू जर दुर्दैवाने वडीलांमुळे आईला मानसिक त्रासातून जावे लागत असेल. किंवा तीला घरगुती हिंसेला बळी पडावे लागत असेल. तर मात्र मुली आईच्या वेदनांशी आपोआपच संलग्न होत जातात. तसेच त्यांच्या मनात वडीलांप्रती तिरस्काराची भावना वाढीस लागते. अशाप्रकारे पुरुषी अहंकाराचा प्रभाव असलेल्या आई वडीलांच्या असंतुलीत नात्याचा मुलीच्या विचारांवर परिणाम होतो. तसेच तिचा समस्त पुरूष जातीवरचाच विश्वास तुटतो. 

   आजची पती पत्नीच्या नात्याची अवस्था ही अतिशय दयनीय व गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडणारी आहे. त्यामागची कारणेही तितकीच जटील व लाजीरवानीही आहेत. पती पत्नीच्या नात्याला तुटे पर्यंत ताणण्याचे प्रकार घडण्याकरीता त्या दोघांचे अहंकारही तितकेच जबाबदार असतात. त्याचबरोबर हल्ली अनैतिक विवाहबाह्य संबंधांचे चलन हे जणूकाही आपल्या संस्कृतीचा भागच बनत चालले आहे. त्यामुळे कुटूम्बांची व मुलाबाळांची वाताहत होणे हेही ठरलेलेच आहे. नव्याने लग्न झालेली जोडपी तसेच आई वडील झालेली जोडपी देखील त्यांच्या दरम्यानच्या ह्या ना त्या कारणांना अतिशय चिघळवून तसेच एकमेकांपासून विभक्त होवून जीवन जगण्याच्या निर्णयापर्यंत अगदी सहज पोहोचतांना दिसतात. त्याचप्रमाणे सर्रासपणे अन्य जोडीदाराची निवड करून पुन्हा नव्याने संसारही थाटणे ह्या त्यांच्यासाठी अत्यंत सोप्या गोष्टी असतात. त्यांच्या अशाप्रकारचे अविचारी कृत्य करण्यामुळे मात्र त्यांनीच जगात आणलेल्या मुलांच्या डोक्यावरची आई वडीलांची छत्रछाया दुरावली जाते. तसेच त्यांचे लहानपणच त्यांच्या आयुष्याच्या संघर्षाची कहाणी बनते. कारण घडलेल्या प्रकारांमुळे मुलांचे आघातग्रस्त झालेले बालमन सहजा सहजी कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. जन्मदात्यांच्या आपसातील मतभेदांमुळे व आत्मकेंद्रीतपणे उचललेल्या पावलांमुळे मुलांना सावत्र आई वडीलांच्या सान्निध्यात राहून लहानाचे मोठे होण्याची वेळ येते. कारण कायद्यान्वये आर्थिकरीत्या सक्षम असलेल्या आई किंवा वडीलांकडे न्यायालयाच्या वतीने मुलांचा ताबा सोपविण्यात येतो. त्यामुळे अशी मुले असामान्य किंवा अस्वाभाविक घडत जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. कारण कोवळ्या वयातच ती जन्मदात्यांच्या निस्वार्थ प्रेमाला मुकलेली असतात. किंबहुना तेवढ्या कमी वयात त्यांनी अशा गोष्टी अनुभवल्या असतात. ज्या त्यांच्या जीवनाला नकारात्मकरीत्या कलाटणी देवू शकतात. अशाप्रकारे एक असंवेदनशील पिढी घडविण्यास असे अविचारी आई वडीलच कारणीभूत ठरत असतात. 

   आई वडीलांमधील मतभेद किंवा त्यांच्यात भिन्न भिन्न कारणांवरून होणारे पराकोटीचे वादविवाद जे दैनंदिन जीवनात जवळपास सर्वच घरांमध्ये होत असतात. तसेच दुर्दैवाने घरातील मुलांनाच त्यांचा सामना करावा लागतो. मुलांसाठी गोष्टी तेव्हा जास्त अवघड होतात. जेव्हा  त्यांनाच त्या दोघांमध्ये मध्यस्ती करून त्यांची भांडणे सोडवावी लागतात. परंतू आई वडीलांचे एकमेकांप्रती असे रौद्र रूप बघून मात्र मुलांचे मनोबल आतल्या आत खचत जाते. कारण त्यांना आई बरोबर कि वडील बरोबर ह्याचा निष्कर्ष लावणे फारच कष्टदायक असते. अशावेळी मुलांच्या मानसिकतेवर जबर दुष्परिणाम होतांना दिसतात. ज्यामुळे एक गोष्ट आवर्जून घडते ती म्हणजे मुलं एकतर अतिशय भावनिक व संवेदनशील होत जातात. नाहीतर त्यांचे एक भावनाशुन्य व्यक्तीमत्व जगासमोर येते. अतिशय भावनिक मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. तर भावनाशुन्य मुले आत्मकेंद्री व स्वार्थी होतात. ज्यामागे आई वडीलांचे आपसातील कमकुवत संबंध हे एक सबळ कारण असते. अशा मुलांमध्ये संयम व साहसाची उणीव जाणवते. त्यामुळे त्यांना जगाशी सामना करतांना अनेक अडथळ्याचा  सामनाही करावा लागतो.

   अशाप्रकारे मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम टाकणारा महत्वाचा अडथळा म्हणजे आई वडीलांचे बिघडलेले संबंध असतात. कारण जेव्हा ते एकमेकांना रागाच्या भरात घालून पाडून बोलतात. तसेच वाईट वागणूक देतात तेव्हा मुलांना त्यांच्यात कोठेही आदर्शवादाची झलक दिसत नाही. मग त्यामागची कारणे काहीही असोत, तरीही त्यांनी असे परस्परांना गृहीत धरणे योग्य नाही. अशा वातावरणात राहणारी मुले आतल्या आत खिन्नता व मनावरचा आघात सातत्याने अनुभवत असतात. त्यांची अशी अवस्था होण्यामागे त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील अन्य कोणत्याही सबळ कारणांची पुष्टता नसते. परंतू तरीही ते असुरक्षेच्या भावनेतून नियमितपणे जात असतात. ज्याचे त्यांच्या शैक्षणिक प्रवासावर, त्यांच्या इतर व्यक्तीगत नात्यांवर व कारकीर्दीवर देखील वाईट परिणाम होत असतात. म्हणूनच आई वडीलांनी आपल्या आपसातील नात्याला मैत्रीपूर्ण बनविले पाहिजे. कारण मैत्रीत निस्वार्थ भाव असल्यामुळे त्याद्वारे ते जोडीदाराच्या मनावर उपचार करू शकतात. त्याचबरोबर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केला पाहिजे. त्यामुळे आयुष्यातील एखाद्या वळणावर कधी ना कधी त्यांच्यातील मतभेद संपुष्टात येवून त्यांच्या मनापासून एकत्र येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. अशाप्रकारे जेव्हा कोणत्याही घरात आई वडीलांचे नाते वयोपरत्वे व कालपरत्वे स्थिर व परिपक्व होत जाते. तेव्हा त्यांच्यात एकमेकांच्या गुण व दोषांना स्वीकारण्याची ताकद निर्माण होते. आई वडीलांचे असे आदर्श नाते विशाल वटवृक्षाच्या सावलीतील गारव्या प्रमाणे असते. जे मुलांमध्ये आत्मविश्वासाचे तेज भरून त्यांच्या अंगी ह्या कठोर जगाला आपल्यातील शीतलतेने व्यापण्याचे सामर्थ्य देत असते.  

 1. आई वडीलांचे नाते मुलांसाठी प्रेरणादायी असावे 

   आयुष्य हे सुख दु:खाचे सार असते. तेव्हा एका जोडप्याला जीवनात अनेक उतार चढावांचा सामना करावा लागतो. जीवनात कधी न कधी त्यांना अतिशय कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. परंतू कोणत्याही गोष्टी आयुष्यात कायमच्या टिकून राहत नाही. त्याचप्रमाणे कठीण दिवसांचे जाणेही तितकेच खात्रीशीर असते. त्या कठीण दिवसांच्या आठवणी मात्र त्या जोडप्याला आजीवन सकारात्मक उर्जा प्रदान करणाऱ्या ठरू शकतात. जर त्यांनी तो काळ सर्वार्थाने एकत्र येवून पार केला असेल. जर त्या क्षणांशी ते एकजुटीने लढले असतील. जर त्या काळात ते एकमेकांची कमजोरी नाहीतर ताकद बनले असतील. आयुष्यात निर्माण झालेल्या उणीवा त्यांनी एकमेकांच्या सोबतीने भरून काढल्या असतील. जर त्यांनी एकमेकांमधील दोषांवर नाहीतर गुणांवर लक्ष केंद्रित केले असेल. त्याचबरोबर एकमेकांचा हात घट्ट पकडून त्या बिकट परिस्थितीवर धैर्याने मात केली असेल तर त्या कठीण काळात झालेला त्रास भविष्यात मुलांच्या आठवणीतही राहत नाही. त्याउलट आई वडीलांनी एकमेकांच्या हिमतीने व एकजुटीने कसे यशस्वीपणे ते दिवस पार केले हा धडा आजीवन त्यांच्या लक्षात राहतो. कारण कुटुंब असो वा एखादे जहाज बाहेर कितीही भीषण वादळे आली तरी डूबत नाही, परंतू त्यांच्या आत मतभिन्नतेच्या, वादविवादांच्या, तिरस्काराच्या तसेच इर्शेच्या पाण्याचा शिरकाव झाल्यास मात्र त्यांना डूबण्यास क्षणभरही लागत नाही. अशाप्रकारे आई वडीलांचे नाते व त्यांचे सहजीवन मुलांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे.

2. आई वडीलांनी आपल्या नात्याचा सम्मान राखावा 

   जेव्हा आई वडीलांच्या दरम्यान अविश्वासाची, गैरसमजांची व शंकांची दरी निर्माण होते. तेव्हा ते त्यांच्या नात्याचा मान राखत नाहीत. त्याचप्रमाणे ते दोघे एका जीवनरूपी रथाची दोन चाके असूनही त्याक्षणी मात्र नदीच्या दोन तीरांप्रमाणे एकमेकांपासून अनभिज्ञ व हटकून असतात. त्याचबरोबर आपल्या अहंकाराला कुरवाळत बसतात. जेव्हा जीवनाचे जोडीदार अशाप्रकारे मानसिकरीत्या एकमेकांपासून विभक्त होतात. तेव्हा त्यांच्या जीवनातील तो काळ अत्यंत कमकुवत असतो. कारण त्या गोष्टींचा गैरफायदा उचलून अनेक विकृत लोक त्यांच्या नात्यात वाईट उद्देशाने शिरकाव करतात. त्याचबरोबर त्या दोघांची कायमची ताटातूट करण्याचा प्रयत्नही करतात. म्हणूनच पती पत्नीने आपल्या त्या नात्याच्या माध्यमातून एकमेकांशी केलेली वचनबद्धता काहीही झाले तरी आजीवन पाळली पाहिजे. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकून आपल्या जोडीदारास जन्मभरासाठी दु:खात लोटू नये. कारण त्यामुळे पती पत्नीच्या पवित्र नात्याचा चारचौघात अपमान होतो. अशाप्रकारे जेव्हा कितीही दुर्बल काळात कोणतेही पतीपत्नी आपल्या नात्याची जबाबदारी आपल्या सक्षम हातात घेतात. त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य निर्णय घेवून आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तेव्हा ते खऱ्या अर्थाने त्या नात्याच्या सम्मानासाठी झटत असतात. अशा आई वडीलांच्या मुलांना आपल्या जन्मदात्यांवर अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आई वडीलांचे माणुसकीच्या सर्व मापदंडान्ना पार करून उरलेले स्वच्छ नाते मुलांना त्यांच्या आयुष्याप्रती सुशिक्षित बनविन्यास एक उत्कृष्ठ उदाहरण ठरते.

3. आई वडीलांचे नाते मैत्रीपूर्ण असावे

   आयुष्यात येणाऱ्या समस्या व मन विचलीत करण्यास भाग पाडणारी परिस्थिती पती पत्नी मध्ये दुरावा आणण्यास सबळ कारण ठरते. त्याचप्रमाणे त्यामुळे त्यांची एकमेकांप्रती मनंही कडवट होत जातात. तरीही त्यांच्यात प्रेमाचा एक अंकुर जीवित असतो जो त्यांना एकमेकांपासून दूर होवू देत नाही. परंतू त्यावेळी त्या नात्याची गरज केवळ प्रेम असणे हे पुरेशे नसते. त्यासोबत विश्वास व परस्परांप्रती आदर ह्या दोन महत्वपूर्ण गोष्टी देखील त्यांच्या नात्याची नितांत गरज असते. बऱ्याचदा ह्याच दोन गोष्टींच्या गैरहजेरीमुळे ते नाते निस्तेज झालेले असते. कारण त्यामुळे त्या नात्यात एकप्रकारचा दबाव जाणवतो. त्याशिवाय अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याखाली नात्यातील गोडवा हळूहळू कमी झालेला असतो. म्हणूनच पती पत्नीचे नाते एका विशिष्ठ कालावधीनंतर मैत्रीत रुपांतरीत होणे आवश्यक असते. कारण जीवन आशेवर आधारीत असते. जर आपल्याशी जुळलेल्या माणसांमध्ये खोट काढण्यात ते व्यतीत केले तर आपल्या भाग्यात केवळ एकटेपणा घर करून बसू शकतो. आपल्या आयुष्यात मैत्री ही सर्वात सुरेख गोष्ट असते. कारण ती आपल्याला एक सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वीकारणे व निरपेक्ष भावनेने देत राहणे शिकविते. तेव्हा जर पती पत्नीचे नाते मैत्रीपूर्ण असेल तर ते नातेच त्यांना कायम एकनिष्ठतेच्या मार्गावर खिळून ठेवते. त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराप्रती एकनिष्ठ असणे हे सर्वस्वी स्वत:शी प्रामाणिक असण्याचे व आपल्या अंतर्मनाच्या सौंदर्याचे प्रतिक असते. अशाप्रकारे जिथे मैत्रीस महत्व असते तिथे व्यक्तीमत्वात सर्वश्रेष्ठता असते. आई वडीलांचे असे सर्वश्रेष्ठ स्वरूप व नाते मुलांमध्येही नवचैतन्य जागविते.

4. आई वडीलांचे नाते सकारात्मक उर्जा पसरविणारे असावे 

   आई वडील आपल्या आयुष्यात स्वप्नांचा पाठपुरावा करणारे किंवा महत्वाकांक्षी असले. तर ते एक शिस्तबद्ध व नियमबद्ध जीवन जगतात. ज्याचा प्रभाव अगदी नकळतपणे मुलांवरही पडत असतो. त्याचबरोबर ते एकाध्येय असतील किंवा एका जोडीदाराच्या ध्येयासाठी दुसरा भक्कमपणे पडद्यामागची भूमिका निष्ठेने निभावत असेल. तर त्या दोघांचीही उर्जा ध्येय काबीज करण्याच्या दिशेने एकरूप झालेली असते. असे आई वडील त्यांच्या नात्याच्या माध्यमातून सकारात्मक उर्जा प्रसारित करत असतात. त्यामुळे त्यांच्या छात्रछायेखाली वाढणारी मुले देखील आपोआपच जीवनाकडे गांभीर्याने बघण्याकडे विश्वास ठेवतात. अशाप्रकारे काही जोडपी त्यांच्या जीवनात एकत्र येवून समाजसेवेचे ध्येय ठरवितात. तर काही लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात. त्यांच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणातूनच त्यांचे गौरवशाली व्यक्तीमत्व घडत जाते. जे सकारात्मक उर्जा पसरविणारे असते. अशे आई वडील ज्या मुलांना लाभतात त्यांना त्यांच्या संस्कारातूनच जीवनाकडे बघतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे बाळकडू मिळालेले असते. अशाप्रकारे आई वडीलांचे नाते हे एकमेकांना अनुरूप व पूरक असले पाहिजे. तरच ते मुलांसाठीही भाग्यशाली ठरते. 

   आई वडील हे आपले जन्मदाते असले तरीही आपल्याला त्यांना एक माणूस पाहणे जमले पाहिजे. त्यातूनच त्यांच्या दिशेने आपण एक मैत्रीपूर्ण दुवा प्रसारित करू शकतो. ज्यामुळे आपल्याला त्यांचे चुकणे समजून घेता येईल. त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांचा मागोवा घेता येईल. त्यांना सखोल जाणून घेणे सोपे होईल. त्यांच्या मनावरची भूतकाळातील दडपण वाटून घेवून कमी करता येतील. त्यांना जगण्याचे समाधान मिळवून देता येईल. परंतू आपण जर त्यांना केवळ आई वडील ह्या फ्रेम मधूनच बघत राहिलो तर मात्र ते आई वडील म्हणून कसे कमी पडले ह्या गोष्टीचे ओझे आपण आपल्या मनावर आजन्म वाहत राहू. तसेच त्याकरीता जन्मदात्यांना दुषणे देत राहू. परंतू जीवनात एका मर्यादेनंतर कोणावरही आरोप किंवा तक्रारी करत राहण्याची सवय आपलेच चरित्र घडवत जाते. त्यामुळे कोणासही लाभ होत नाही. म्हणूनच आपल्या जीवनाची, आपल्या भावनांची व आपण करत असलेल्या बहाण्यांची जबाबदारी आपण स्वत:च उचलली पाहिजे. त्याचबरोबर आई वडीलांचा परस्पर सम्मान करणे ही गोष्ट आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग बनली पाहिजे. तसेच त्यांच्या सेवेचे पुण्य आपल्या पदरात पाडून घेतले पाहिजे. त्याशिवाय त्यांना माणूस म्हणून निरपेक्षपणे आपल्याला पाहता आले पाहिजे. तरच कुटुंब व नाती स्वतंत्रपणे श्वास घेवू शकतील.     

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *