
सृष्टीने मानवजातीला स्त्रियांच्या स्वरूपात एक अनमोल भेट देवून अलंकृत केलेले आहे. किंबहुना धरातलावरील स्त्रियांचे अस्तित्वच सर्वत्र मांगल्य प्रदान करणारे आहे. त्याचप्रमाणे स्त्री ही निसर्गाने घडविलेली अप्रतिम कलाकृती आहे. तिच्या बाह्यारूपास साजेसे तिचे वात्सल्याने, प्रेमाने, दयेने तसेच निस्वार्थतेने व्यापलेले अंतर्मनातील भावनांचे साम्राज्य ह्यांच्या एकरूपतेनेच कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य पूर्णपणे परिभाषित होत असते. स्त्रियांच्या अलौकिक सौंदर्याबरोबरच त्यांच्या कर्तुत्वानेही आजवरचा इतिहास रचला आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी पुरुषप्रधान संस्कृतीतील कुप्रथा, चालीरीती व कधीही न बदलणाऱ्या समाजाच्या निरर्थक मान्यता ह्यांचा नेटाने सामना करत आणि त्यांच्यावर मात करत यशाची शिखरे पादाक्रांत करून पुरुषी मानसिकतेला मोठा धक्का दिला आहे. स्त्रियांना माणूस म्हणून क्षुल्लकही किंमत नसलेल्या त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी उचलले बळकट पाउल ते आजच्या युगातील स्त्रियांना आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी कळालेले .उच्च शिक्षणाचे महत्व म्हणजे जणूकाही एका भव्यक्रांतीची निरंतर पेटती मशालच आहे. त्याचबरोबर स्त्रिया आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी आपल्याच कुटूम्बियांच्या रुढीप्रिय व परंपरानिष्ठ विचारांचा विरोध करून घराघरातून व्यक्तीगत पातळीवर अजूनही लढा देत आहेत. अशाप्रकारे आजच्या स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने हरएक क्षेत्र एखाद्या योद्ध्याच्या कर्तबगारीने आपल्या पायाखाली आणले आहे. त्यामुळे आजच्या स्त्रियांना ”सुपर वूमन” म्हंटले जाते. परंतू स्त्रियांच्या गौरवासाठी उच्चारल्या गेलेल्या ह्या दोन शब्दांमागे खरोखरच त्यांची प्रशांशा करण्याचा हेतू आहे? कि कोठे ना कोठे त्यामागेही अवाजवी अपेक्षा लपलेल्या आहेत? स्त्रियांसाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण कोणत्याही भव्यदिव्य उपाध्यांपेक्षा सर्वप्रथम स्त्रियांना एक माणूस आपले हक्क माहित असणे आवश्यक आहे.
स्त्रियांचे जीवन कायमच संघर्षपूर्ण राहिलेले आहे. परंतू आजच्या युगात स्त्री पुरूष समानतेच्या संकल्पनेने त्यात अधिकच भर घातलेली आहे. खरे तर त्यामुळे स्त्री जीवनाचा कायापालटच झालेला आहे. परंतू स्त्रिया घरादाराला ज्या सुबकतेने व आपलेपणाने सांभाळतात त्याची सर कशालाही येणे शक्य नाही. त्यामुळे स्त्रीयांशिवाय घराची कल्पनाही करता येवू शकत नाही. त्याचबरोबर स्त्रियांवर आईपणाची सर्वात महत्वाची जबाबदारीही असते. त्या अनुषंगाने मुलांच्या वाढत्या वयात स्त्रियांना आपली आई ही भूमिका मोठ्या कर्तव्यदक्षतेने निभवावी लागते. त्यानंतरच त्या स्वत:च्या स्वप्नांसाठी काही प्रमाणात जगू शकतात. कारण पुढच्या पिढीचे दायित्व एक जागरूक आईच उत्तमरीतीने सांभाळू शकते. तरीही ह्या सर्व महत्वपूर्ण गोष्टींच्या वर उठून आजच्या स्त्रिया व्यक्तीगत पातळीवर स्वत:ला घडविण्यासाठीही निरंतर झटत आहेत. स्त्रियांच्या खांद्यावरचा हा सर्व कार्यभार आणि त्यासाठी त्यांचे रात्रंदिवस एक करणे बघता स्त्रियांच्या कार्यक्षमतेचा व चिकाटीचा अंदाज लावता येवू शकतो. परंतू नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. एक म्हणजे जर स्त्रिया सर्वकाही कणखरपणे निभावून नेत आहेत. तर नक्कीच त्यांच्या मागे कोणीतरी भक्कमपणे उभे राहून पडद्यामागची भूमिका निभावत असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना घरातून सर्वतोपरी प्रोत्साहन व सहकार्यही मिळत असले पाहिजे. तसेच दुसरी बाजू म्हणजे स्त्रियांना सुपर वूमन घोषित करून त्यांची अमर्याद अपेक्षांच्या मध्ये कोंडी तर केली जात नाही ना? कारण एका सर्वसाधारण माणसाची काम करण्याची एक मर्यादित कार्यक्षमता असते. ती कार्यक्षमतेची मर्यादा जर स्त्रियांनी ओलांडली आहे तर त्यामागे त्यांची कोणती अडचण तर नाही ना? त्याचप्रमाणे स्त्री पुरूष समानतेची संकल्पना स्त्रियांना निवांत श्वास तरी घेवू देत आहे का? अशाप्रकारचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करणे. त्याचप्रमाणे घरातील त्यांच्या कर्तव्यदक्ष भूमिका व किरकोळ जबाबदाऱ्यापासून ते अर्थार्जनासारख्या कार्यात तत्परतेने आपले योगदान देण्याइतपत स्त्री पुरूष समानतेला आजच्या युगात डोक्यावर घेतले गेलेले आहे. स्त्रियांनीही त्या गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि त्यांनीही स्वत:च्या प्रगतीचा ध्यास घेतला. परंतू तरीही स्त्रियांना मातृत्व प्रदान करून निसर्गानेच स्त्री आणि पुरूष ह्यांच्यातील मुख्य अंतर आपल्यापुढे सिद्ध केलेले आहे. त्यामुळे स्त्रियांनी पुरूषांसारखे तसेच पुरुषांनी स्त्रियांसारखे वर्तन करून आपआपल्या गुणधर्मांना निसर्ग नियमांच्या अपरोक्ष जावून आव्हान करणे योग्य नाही. किंबहुना त्यां दोघांच्या विपरीत गुणधर्मामुळेच सृष्टीच्या कालचक्राचे संतुलन साधले जात आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. कारण जेव्हा स्त्रियांप्रमाणे पुरुषही गर्भधारणा करून मुलांना जन्म देवू शकतील केवळ तेव्हाच स्त्री पुरूष समानतेला पूर्णत्वाने पुष्टी मिळू शकते. उलट स्त्रियांच्या सर्वतोपरी स्वावलंबी होण्याने व त्या आत्मसम्मानाच्या जगण्याकडे प्रेरित झाल्याने. तसेच आर्थिक दृष्टीने सबळ व कर्तबगार झाल्याने जर त्यांच्यातील विनम्रता संपुष्टात येवून त्यांच्यात अहंकार वाढत चालला असेल. त्याचप्रमाणे स्त्रियांना सुपर वूमन घोषित करून माणूस म्हणूनच त्यांना किंमत दिली जात नसेल तर ह्या दोन्ही परिस्थितीत स्त्री पुरूष असमानतेलाच अधिक खतपाणी मिळते. कारण एक कर्तव्यदक्ष स्त्री निश्चितच विनम्र आणि सेवाभावाने समृद्ध असते. तिचा झालेला व्यक्तीमत्व विकास जर चुकूनही तिच्यातील अहंकाराला बढावा देत असेल तर ती नक्कीच व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे. म्हणूनच जर स्त्रिया आपल्या सहयोगपूर्ण भूमिकेतून तसेच संसाराला आपला हातभार लावून आपल्या कर्तव्यांना निभावीन्यासाठी प्रामाणिकपणे झटत असतील तर त्यांच्या योगदानाचा सम्मान राखला गेला पाहिजे. कारण तिथवर पोहोचण्याच्या मार्गात त्यांनी मुलांप्रती आपले वात्सल्य व ओढ पणास लावलेली असते. जोडीदाराची पराकोटीची पुरुषी मानसिकता झेललेली असते. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तीगत वेळेचा त्याग केलेला असतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना अमुल्य महत्व असते. जेव्हा कोरोना ह्या व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले होते तेव्हा भारताद्वारे त्यावर लस तयार करण्याच्या जोखीमपूर्ण कार्यात महिला शास्त्रज्ञांचा सर्वात मोठा सहभाग होता. कारण लवकरात लवकर लस तयार व्हावी म्हणून त्या रात्रंदिवस एक करून श्रम करत होत्या. त्याचबरोबर त्या जीवघेण्या व्हायरसचे स्वरूप त्यांना माहीत असल्यामुळे इतरांसाठी त्यांच्या मनात सेवाभाव देखील निर्माण झाला होता. अशाप्रकारे स्त्रिया त्यांच्यावरच्या अधिक कार्याभारा व्यतिरीक्त जर आपल्या भूमिकांप्रतीही तेवढ्याच जबाबदारीने समर्पित असतील तर त्यांचे मन कधीही कठोर होत नाही. त्यामुळे अशाप्रसंगी त्यांना कोणत्याही मोठ्या उपाध्यांची आवश्यकता वाटत नाही तर स्तुतीपूर्ण दोन शब्दांनी तसेच त्यांच्याप्रती जरासी कृतज्ञता व्यक्त केल्यानेही त्या समाधानी होत असतात.
पुरूष हा प्रदान करणारा व स्त्रिया प्रेमाने स्वीकार करून जतन करणाऱ्या असतात. अशाप्रकारे स्त्री व पुरूष आपआपल्या गुणधर्मामध्ये अगदी शोभून दिसतात. त्याचप्रमाणे ह्याच संकल्पनेअंतर्गत आपली समाजव्यवस्थाही आजवर उभी होती. पुरुषाचे प्रदाता असणे हे त्याच्या पुरुषार्थास साजेसेही असते. कारण प्रदान करण्याचा व्यापक दृष्टीकोन ठेवल्यानेच त्याला आंतरिक बळ प्राप्त होते. तसेच सर्वार्थाने त्याची प्रगतीही होते. त्याचप्रमाणे त्याच्याशी जुळलेल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्याने त्याचा आत्मविश्वासही वाढतो. स्त्रिया सुद्धा त्यांच्याशी जुळलेल्या पुरुषाच्या प्रगतीने समाधानी असतात. तसेच पुरुषाने प्रेमाने प्रदान केलेल्या गोष्टी प्रसन्नतेने स्वीकारतात. परंतू आजची स्त्री मात्र प्रदान करणारी व महत्वाकांक्षीही झालेली आहे. त्यामुळे आता सामाजिक व्यवस्थेला स्त्रीत्वाने आव्हान केलेले आहे. त्या दृष्टीकोनातून स्त्रियांना दैनंदिन जीवनात एक माणूस म्हणून महत्व मिळणे व कुटुंब प्रमुखाच्या स्थानावर समान हक्क प्राप्त होणे नितांत आवश्यक आहे. परंतू तरीही स्त्रीत्वाच्या नावाखाली स्त्रियांच्या मर्यादा ज्या संस्कारांना जन्म देतात. स्त्रियांच्या विनम्रतेतील कणखरता जी त्यांना स्वाभिमानी बनविते. तसेच स्त्रियांची शालीनता जी त्यांना सात्विक व सुंदर बनविते. ह्या अनमोल गोष्टींची स्त्रियांकडूनच पायमल्ली होणे योग्य नाही. कारण बरेचदा स्त्रित्वाचा उदो उदो होत असतांना संपूर्ण पुरूष जातीवरच नकारात्मक दृष्टीकोन टाकला जातो. म्हणूनच स्त्री पुरूष जेव्हा आपआपल्या भूमिकांमध्ये राहून जबाबदाऱ्या पार पाडत असतात. तेव्हा त्यांना लिंगभेदा अनुसार तुलनात्मक भावाने व कमीपणा आणण्याच्या हेतूने न बघता एकमेकांना पूरक व सहाय्यक म्हणून पाहिले पाहिजे. कारण निसर्गानेच त्यांना एकमेकांचे पूरक बनविले आहे. तेव्हाच आजच्या स्त्रीच्या घरातील व घराबाहेरच्या श्रमांना स्त्री पुरूष समानतेच्या चौकटीबाहेर ठेवून खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो.
कुटूम्बाचा आर्थिक भार पेलणाऱ्या किंवा कमाविणाऱ्या व्यक्तीस घरात विशेष सम्मान मिळतो. कारण कुटूम्बियांचे भरण पोषण करणे ही महत्वाची जबाबदारी तो सक्षमपणे निभावत असतो. त्यामुळे त्याची कुटुंब प्रमुख म्हणूनही गणना होत असते. आजच्या काळात स्त्री पुरूष दोघेही ती जबाबदारी आपल्या अंगावर घेण्यास समर्थ असतात. परंतू कधीकधी त्यांच्यातील मतभिन्नता, त्यांचे एकमेकांवरचे अवाजवी वर्चस्व तसेच दोघांचेही अहंकार आपसात भिडत असल्यामुळे त्यांच्या नात्यात रस्सीखेच होतांना दिसते. कारण इथे पुन्हा स्त्री पुरूष समानतेचा मुद्दा त्या दोघांमध्ये अपेक्षा जागृत करत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा अपेक्षांवर त्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते तेव्हा त्यांच्यातील समंजसपणा पूर्णपणे कोसळलेला असतो. अशापरीस्ठीतीत गृहिणी सारख्या अत्यंत कर्तव्यदक्ष भूमिकेत स्थानापन्न असलेल्या स्त्रियांना मात्र स्वत:विषयी न्युनगंड वाटू लागतो. कारण ज्या पुरुषावर त्या आर्थिकदृष्टीने विसंबून असतात त्याने जर त्यांच्या भावनांची किंमत केली नाही तर त्यांचे संपूर्ण आयुष्य दुर्भर झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पुरुषावर विसंबून राहणे त्यांना एकंदरीतपणे कोठे ना कोठे कमीपणाचे व असुरक्षित वाटत असते. अशाप्रकारे स्वावलम्बनाकडे जाणारे त्यांचे विचारच त्यांनाही महत्वाकांक्षी बनवू लागतात. त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षेच्या आवेगात स्त्रिया स्वत:ची पर्वा न करता आपल्या घराशी निगडीत जबाबदाऱ्यासमवेत अर्थार्जन व स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याकरीता देखील परिश्रम घेवू लागतात. त्याचबरोबर उच्च शिक्षणाने आज त्यांच्या व्यक्तीमत्वात आणखीच तेजस्विता आणलेली आहे. स्त्रियांनी घेतलेली ही उंच भरारी अविश्वसनीय व सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. त्यामुळे स्त्रियांच्या छुप्या क्षमतांचा अंदाजा देखील प्रत्येकास आलेला आहे. परंतू त्यामागे त्यांना पडणारे अतिरिक्त श्रम व त्यांची शारीरिक व मानसिक दृष्टीने होणारी ओढाताण ह्याकडे त्यांचे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. कारण स्त्रियांनी सर्वतोपरी एक परिपक्व व सुजाण आई सिद्ध व्हावे म्हणून त्यांचे भावनिक संतुलन कोणत्याही परिस्थितीत राखले जाणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या भावनांची किंमत करणे, वेळोवेळी त्यांना सांभाळणे व त्यांच्या भावनावेगाला योग्य दिशा देणे महत्वाचे असते. परंतू कधीकधी स्त्रियांकडून ठेवल्या गेलेल्या अवाजवी अपेक्षा व स्त्रियांना माणूस म्हणूनच किंमत दिली जात नसेल तर ह्या महत्वपूर्ण गोष्टींकडे सहजच दुर्लक्ष केले जाते. अशाप्रकारे स्त्रिया भावनिक पातळीवर असमाधानी असल्यामुळे कळत नकळतपणे दुखावल्याही जातात. अशारितीने स्त्री पुरूष समानतेचा गाजावाजा व सर्व पैलूंवर स्वत:ला सिद्ध करण्याची स्त्रियांची जिद्द बरेचदा त्यांनाच सर्वतोपरी थकवीन्यास कारणीभूत ठरते. कारण बहु आघाड्यांवर तैनात राहून प्रतिनिधीत्व करणे कोणासाठीही सोपे काम नसते. तेव्हा स्त्रियांना सुपर वूमन घोषित करून त्यांच्याकडे अपेक्षापूर्ण नजरेने बघण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून समजून घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा त्या उंच भरारी घेण्यासाठी स्वत:ला तयार करत असतात तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याचे मनोबल वाढविणे जास्त महत्वाचे आहे.
1. आजच्या स्त्रियांनी प्रतिष्ठेच्या माध्यमाने आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकावी.
मानवी जीवनात स्त्रियांची भूमिका किती महत्वाची आहे, हे इतरांपेक्षा स्त्रियांनाच सर्वप्रथम ठाऊक असणे महत्वाचे आहे. कारण आई, पत्नी, बहिण, मुलगी ह्या भूमिकेतील स्त्रियांचा पुरुषाच्या जीवनाचा कायापालट करण्यात मोठा सहभाग असतो. जसे आई ही आपली पहिली गुरू देखील असते. त्यामुळे तिच्या संस्काररूपी शिक्षणात एक भावी आदर्श पुरूष घडविण्याचे सामर्थ्य असते. ज्याकरीता कोणतीही आई आयुष्यभर आपल्या बहुमूल्य वेळेची, भावनांची, त्यागाची तसेच इच्छा आकांक्षांची गुंतवणूक आपल्या मुलामध्ये अगदी मनोभावे व निस्वार्थपणे करत असते. त्याचप्रमाणे जीवनाची जोडीदार म्हणजे पत्नी जणूकाही पुरुषाच्या जीवनरूपी रथाचे दुसरे चाकच असते. तिची मोलाची साथ तसेच तिचे प्रामाणिक योगदान पुरुषाच्या जीवनास मूल्य जोडत असते. बहिणीचे शुद्ध प्रेम, दया व सद्भावना तर भावाच्या भूमिकेतील पुरुषाच्या पाठीशी आजन्म कार्यरत असतात. तसेच मुलगी ही तर वडीलरूपी पुरुषाचे संपूर्ण जीवनच नवचैतन्याने भरून टाकत असते. अशाप्रकारे स्त्रियांच्या वेगवेगळ्या भूमिका व त्या भूमिकांच्या माध्यमातून निर्माण होणारी नाती पुरूषांनाही त्यांच्यातील भावनिक समज वाढविण्यासाठी मदत करत असतात. ज्यामुळे त्यांची भौतिक, आध्यात्मिक व एक माणूस म्हणूनही टप्प्या-टप्प्याने प्रगती होत असते. तेव्हा स्त्रियांनी भावनेच्या ओघात वाहत न जाता कायम आपला आत्मसम्मान जपण्यासाठी झटले पाहिजे. त्यांचा पेशा काहीही असो तसेच त्यामधून त्या अर्थार्जन करण्यास सक्षम असोत किंवा नसोत, त्यामुळे त्यांना न्यूनगंड वाटता कामा नये. कारण त्या जर आपल्या भूमिकेप्रती कर्तव्यदक्ष, जबाबदार व प्रामाणिक आहेत तर त्या मार्फतच त्या आपल्या माणसांना जे प्रदान करत आहे ते बहुमूल्य आहे. म्हणून त्यांनी आपल्या कामांची, आपल्या क्षेत्राची, आपल्या भूमिकेची तसेच स्वत:ची एक माणूस ह्या नात्याने प्रतिष्ठा राखली पाहिजे. कारण जेव्हा त्या स्वत:चा सम्मान करू शकतील तेव्हाच आपल्या अस्तित्वाची लढाई देखील जिंकणे त्यांना शक्य होईल.
2. आजच्या स्त्रियांमधील स्वावलाम्बनाचे विचार त्यांच्यात अहंकार वाढविणारे नसावेत
ज्याप्रमाणे पुरुषांच्या आयुष्यात स्त्रियांचे अनन्यसाधारण महत्व असते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही आयुष्यात पुरुषांचे महत्वाचे स्थान असते. कारण जीवनप्रवासात क्षणोक्षणी लाभलेले त्यांचे सहकार्य व प्रोत्साहन स्त्रियांचे मनोबल वाढविण्यास मदत करत असते. आजची स्त्री स्वावलम्बनाच्या विचारांनी प्रेरित आहे. हे अगदी उत्तम असले तरी तिने पुरुषाशी स्पर्धा लावून त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. कारण स्त्री असो अथवा पुरूष दोघेही एक दुसऱ्यांना पूरक असतात. त्यामुळे त्यांची आपसातील चढाओढ ही कधीही न संपणाऱ्या संघर्षाला जन्म देत असते. तेव्हा त्यांनी आपआपल्या आयुष्यातील एकमेकांच्या योगदानाचा सम्मान राखला पाहिजे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी आपल्या आत्मसम्मानापुरस्सर आपल्या जीवनात स्वावलम्बनाच्या विचारांना नक्कीच प्रोत्साहन दिले पाहिजे. परंतू जर स्वावलम्बनाने त्यांच्यात अहंकार वाढत असेल तर त्या नक्कीच आत्मकेंद्रित झालेल्या आहेत. .किंवा व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेने पेटून उठल्या आहेत. ह्या गोष्टीची खात्री त्यांनी स्वत:ला पटवून दिली पाहिजे. कारण विनम्रता हा स्त्रियांचा सर्वोत्तम गुण आहे. निसर्गाने स्त्रियांना अशा अनेक विशेष गुणाधार्मांनी अलंकृत केलेले आहे . ज्यांचा समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याकरीता स्त्रिया उपयोग करू शकतात. परंतू तरीही त्या पुरुषांशी स्पर्धा लावण्यात व त्यांची बरोबरी करण्यात आपली संपूर्ण उर्जा पणास लावत असतात. त्याचबरोबर स्वत:ला सर्वश्रेष्ठ सिद्ध करत असतांना सर्वतोपरी दमून जातात. तसेच त्यांच्यात उत्पन्न झालेल्या अहंकाराच्या स्तराने त्यांच्यातील दया माया प्रेम सेवा ह्या मौल्यवान गोष्टींना त्या कायमचे झाकून टाकतात. परंतू स्त्रियांच्या आंतरिक विशेशातांनीच त्यांना शक्तीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यांच्यातील मांगाल्यानेच घरादारात लक्ष्मीचा वावर असतो. तेव्हा त्यांना आपल्या स्त्री जन्माचा खरा अर्थ उमगलाच पाहिजे. कारण स्वावलंबन हे स्वातंत्र्य प्रदान करत असले तरी स्वातंत्र्याला संस्कारांच्या व विनम्रतेच्या मर्यादा असल्या पाहिजे.
3. आजच्या स्त्रियांनी स्वत:ला वर्तमान क्षणात जगण्याची शिस्त लावली पाहिजे
स्त्रिया ह्या एकाच वेळी अनेक कामे करण्यात पटाईत असतात. जर त्या एक काम करण्यात व्यस्त आहेत तर अन्य कामाची योजना मनातल्या मनात त्यांनी त्यासोबतच केलेली असते. अशाप्रकारे त्यांच्या कामांना वेग तर येतो परंतू त्या कधीही वर्तमान क्षणात करत असलेल्या कामात मनापासून हजर राहू शकत नाहीत. कारण त्यांना कोणतेही काम लगबगीने एकदाचे आटोपण्याची सवय लागते. अशा पद्धतीने स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख तर निरंतर वाढतच असतो. परंतू जीवन प्रवासात क्षणभर थांबून त्या आपल्या प्रगतीचा सोहळा व त्यामधून त्यांना लाभलेले पराकोटीचे समाधान ह्यांचा आनंद उपभोगू शकत नाहीत. कारण स्वत:ला सतत कामात व्यस्त ठेवण्याची सवय त्यांना वर्तमान क्षणात उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवत असते . त्याचप्रमाणे त्या स्वत: बरोबरही शांत व उत्तम वेळ घालावीन्यास असमर्थ असतात. ज्या स्त्रिया घरातील जबाबदाऱ्यांबरोबर अर्थार्जनासाठी नियमितपणे घराबाहेर पडत असतात, त्यांची तर अक्षरशा तारेवरची कसरत असते. परंतू स्त्रियांचे अशाप्रकारचे व्यस्त जगणे मात्र त्यांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महागात पडते. कारण सततच्या तणावपूर्ण दिनचर्येमुळे एका मर्यादेनंतर हार्मोनल असंतूलानामुळे त्यांच्यावर विविध आजारांना बळी पडण्याची वेळ येते. ज्यामुळे त्या आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांनी कोणत्याही कामात आपला आंतरिक आनंद व मानसिक समाधान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ पैसा कमविण्याचे यंत्र बनून त्यांनी निवडलेल्या कामाकडे पाहू नये. कारण पैस्याचा लोभ माणसाला कधीही शांत बसू देत नाही. परंतू आपल्या आवडीचे काम करायला मिळाल्याचे समाधान मात्र आपल्याला वर्तमान क्षण मनसोक्त जगण्यास प्रवृत्त करत असते. तेव्हा स्त्रियांनी आपल्या आयुष्यात कायम अशा कामांची निवड करावी जे करण्याची त्यांची आवड आहे. तरच त्या वर्तमान क्षणांना आपल्या आयुष्यात सामावून घेवू शकतील.
4. आजच्या स्त्रियांनी जीवनाप्रती आपला दृष्टीकोन व्यापक ठेवावा
स्त्रियांचे खरे सौंदर्य, शौर्य, धाडस, पराक्रम ह्या सर्व गोष्टी भावनांच्या स्वरूपात त्यांच्या अंतर्मनात समाविष्ट असतात. त्यामुळे भावना ह्या स्त्रियांचे खरे अस्त्र असतात. जर स्त्रियांनी आपल्या भावनांना योग्य दिशा देणे, भावनांवर विजय मिळविणे तसेच आपल्या भावनांवर नियंत्रण आणण्याची कला निष्णात केली. तर त्या आपल्या जीवनाला एक अनोखे वळण देवू शकतात. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच प्रगती करू शकतात. किंबहुना त्यापेक्षाही मोठा पल्ला गाठू शकतात. परंतू स्त्रियांना दये मायेने व्यापलेले हृदय लाभलेले आहे. जे स्वत;पेक्षा जास्त इतरांचा विचार करते. जे इतरांची मदत करण्याकरीता कायम तत्पर असते. जे इतरांची मनापासून सेवा करते. जे इतरांना माफ करण्याचा मोठेपणा दाखविते. त्यामुळे स्त्रियांनी जीवनाप्रती आपला दृष्टीकोन व्यापक ठेवला पाहिजे. कारण जर त्या इतरांच्या संवेदना समजू शकत असतील तर तत्सम पेशा निवडून त्या माध्यमातून निस्वार्थ भावनेने असंख्य जणमाणसांची मदत करू शकतात. आपल्या जीवन अनुभवातून आलेल्या शहाणपणाने कित्येकांना मोलाचा सल्ला देवू शकतात. अशी माणसे जी ह्या जगाचा भाग असली तरी काही ना काही कारणांनी सर्वसामान्यांपेक्षा वेगळी आहेत, त्यांना त्यांच्या व्यक्तीमत्वातच सक्षम व आत्मविश्वासाने भरपूर जीवन जगण्यासाठी स्त्रियाच सर्वाधिक प्रमाणात अगदी हृदयाच्या तळापासून मदत करू शकतात. तेव्हा त्यांनी त्या संदर्भातून स्वत:ला सुशिक्षित बनविले पाहिजे. त्याचप्रमाणे सेवा देण्याच्या पवित्र मनसुब्याने त्यांनी त्यांच्या निवडलेल्या पेशाचे मानक वाढविले पाहिजे. अशाप्रकारे स्त्रिया आपल्या जीवनाच्या ध्येयाशी निगडीत पेशातून आपला मदतीचा हेतू साध्य करून आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवू शकतात. तेव्हा स्त्रियांनी केवळ पैस्याला आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय न ठरविता त्या कष्टाने कमाविलेल्या धनाला इतरांची सेवा करण्याचे माध्यम बनवीन्याचा व्यापक दृष्टीकोन निर्धारित करून आपल्या पेशाला आजीवन प्रतिष्ठेने पार पाडण्याचा प्रण घेतला पाहिजे.
एक स्त्री जी कोणत्याही भूमिकेत असली तरीही तिच्यात तिच्याशी जुळलेल्या वडील, भाऊ, मुलगा तसेच पती ह्या सर्व पुरुषांचे दु:ख वाटून घेण्याची क्षमता व त्यांच्या सुखात मनापासून सामील होण्याचा मोठेपणा असतो. त्यामुळे स्त्रीच असते जिच्यात घरादाराला व नातेसंबंधांना एकसंध बांधून ठेवण्याची कला अवगत असते. परंतू जेव्हा स्त्रिया आपल्या व्यक्तीगत महत्वाकांक्षेला जीवनात अतिरिक्त स्थान देतात. तसेच त्यातून आलेल्या स्वावलम्बनाने व स्वातंत्र्याने अहंकारी होत जातात. तेव्हा त्या संपूर्ण पुरूषवर्गालाच महत्वहीन समजू लागतात. त्याचप्रमाणे आयुष्यात आलेल्या एका पुरुषाच्या कटू अनुभवाने सर्व पुरूशांप्रतीच नकारात्मक मत बनवीत असतात. म्हणूनच आजच्या स्त्रियांचे सर्वार्थाने सबळ होणे हे सर्वतोपरी कर्तव्यदक्षतेकडे पडणारे पाउल असले पाहिजे. एकप्रकारचे सेवेचे व्रत असले पाहिजे. जेणेकरून स्त्रियांची साहसी वृत्ती ही समस्त स्त्री वर्गासाठी स्त्रित्वाचा भक्कम पाया बनू शकेल. त्याचप्रमाणे त्यांच्यातील आत्मसम्मानाला व विनम्रतेला प्रोत्साहित करणारी असेल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)