
आपले जीवन तीन टप्प्यांमधे वाटलेले असते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले बालपण. बालपणीचा काळ हा जीवनातील अत्यंत सुखावह काळ मानला जातो. कारण तेव्हा आपले मन निरागस असते व आकार घेत असते. भविष्यातील एक भव्य भवन उभारण्याच्या दिशेने त्याने आपली निर्दोष व निष्पाप पावले उचलली असतात. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या भीतीने आपल्यात जन्म घेतलेला नसतो. त्यामुळे मन कल्पनेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालत असते. अत्यंत नैसर्गिकपणे आपल्यातील कौशल्यांना नाजूक अंकुर फुटू लागलेले असतात. जीवनाचा सखोल अर्थ, त्याची विविध रूपे ह्यांच्याशी दूर दूर पर्यंत आपला अजून काहीही संबंध आलेला नसतो. म्हणूनच त्या वयाला देवाचा स्पर्श असतो. ह्याच काळात आपल्या शालेय जीवनाला सुरवात होते आणि तेथून पुढे आपल्याला शिस्तबद्ध जीवन जगावे लागते. बघता बघता आपण मोठे होत जातो. तारुण्यात पदार्पण करतो. तसेच आपल्या जीवनाचा दुसरा टप्पा सुरू होतो. तो म्हणजे तरुणपण.
तारुण्य म्हणजे आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा काळ असतो. कारण ह्या काळात आपल्या मनात अनेक स्वप्न जागृत होतात. आशा आणि उमेदी जन्म घेतात. आपल्याला ह्या काळात समवयीन मित्रमंडळींची सोबत हवीहवीशी वाटते. तसेच शौर्य गाजवीण्याचा हा काळ असतो. त्याचप्रमाणे स्वत:ला पाहिजे त्या क्षेत्रात सिद्ध करण्यासाठी झटण्याचाही हा कालावधी असतो. तारुण्याचा काळ प्रत्येकास हवा हवासा वाटतो. आपल्या जीवनातील अनेक महत्वाच्या घडामोडी ह्याच काळात घडत असतात. शिक्षण पुर्ण करून आपल्या नोकरी व्यवसायाची सुरवात होते. स्वत:चे कुटूंब निर्माण होते. आपण आपल्या कुटूंबासमवेत अनेक आनंदाचे क्षण अनुभवतो. त्याचप्रमाणे मुलांच्या भवितव्यासाठी तरतूद करण्यासाठी वेळेची गुंतवणूक करतो. जीवनाचे सर्व रंग अनुभवून झाल्यानंतर येतो निवृत्ती घेण्याचा काळ. तो म्हणजे आयुष्याचा तिसरा टप्पा.
आपण म्हातारपणाच्या उंबरठ्याला दस्तक देतो. आपल्या वयाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागणे शक्य असते परंतू आपल्या मनाला आणि विचारांना वयाचे बंधन नसते. ज्यांना त्यांच्या जगण्याचा हेतू कळला नाही. अशांना वयाची पन्नाशी ओलांडली कि म्हातारपणाची चाहूल लागते. परंतू जे महत्वाकांक्षी आहेत त्यांना मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यात त्यांचे ध्येय सापडते आणि त्यात ते यशस्वीही होतात. जेव्हा आपण आयुष्यात उमेद हारतो, सर्वसामान्य दिनचर्येत स्वत:ला फसवून घेतो, काहीही नवीन शिकण्याची तयारी दाखवत नाही, मनातून समाधानी नसतो, जीवनात ध्येय ठरवीणे बंद करतो तसेच वर्तमान क्षणात जगणे बंद करतो तेव्हा आपल्या मनात निवृत्त होण्याची भिती निर्माण होते.
अशावेळी आपण मनाने खचून जातो आणि फक्त वाढते वय लक्षात ठेवतो. ही प्रक्रिया वयाच्या कोणत्याही टप्प्यात सुरू होवू शकते आणि तेव्हापासून आपल्या जगण्यातील कुतूहल संपून मानसिकरीत्या आपल्या म्हातारे होण्यास सुरवात होते. परंतू काहीजणांचा त्यांच्या वयाच्या तिसर्या टप्प्यातही जोश आणि हुरूप हा तरुणांनाही लाजवेल असा असतो. त्यांचे आरोग्य, त्यांचे सामाजीक जीवन, त्यांचे व्यक्तीगत जीवन, तसेच त्यांचे आध्यात्मीक जीवन इतरांसाठी आदर्श असते. त्यांना काहिही करण्यासाठी वयाचे बंधन नसते कारण वय त्यांच्या प्रगतीत बाधा बनत नाही. स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी ते नवनवीन ध्येय ठरवून त्यांना पुर्ण करण्यासाठी धडपडत असतात आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चिरतरुण राहतात.
1. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असावा
जीवन नेहमी सरळ रेषेत चालत नाही. सुख-दु:खाचे आपल्या आयुष्यात येणे-जाणे, अडचणींना आणि समस्यांना सामोरे जाणे तसेच जीवनाची उलथा-पालथ करणार्या घटना आयुष्यात होत राहतात. किंबहुना ते आपल्या जगण्याचा एक भाग असतात. आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना असली पाहिजे कि आपण केवळ वर्तमान क्षण जगतो. तो क्षण मागे पडला कि भुतकाळात जमा होतो. अशा पद्धतीने काळ जोमाने पुढे सरकत असतो. घडून गेलेला घटनाक्रम बदलवीता येत नाही. परंतू वर्तमान क्षणाला पुर्ण विचाराने उत्पादनक्षम बनवीले तर भवीष्याची रचना आपल्या इच्छेप्रमाणे करता येवू शकते.
म्हणूनच आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण जागृकतेने जगलो आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर जीवनात येणार्या अडथळ्यांना आपण जगण्याचा भाग समजून त्यांना जीवन न देता त्यांच्याकडून धडा घेवून पुढे जावू शकतो. त्यामुळे आपल्याला मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागणार नाही. जीवनाचा आनंद घेत सुरक्षीतपणे पुढे सरकत राहण्याचे सामर्थ्य आपल्यात येईल आणि आपण आजीवन चिरतरुण राहू.
2. रोजच्या जेवणात संतुलीत आहार असावा.
आपल्याला निरोगी आणि सुदृढ जीवन जगायचे असेल तर साधे राहणीमान जे आपल्याला निसर्गाशी जुळवून ठेवते ते सवयीत असले पाहिजे. आपल्या आहाराकडे आपले लक्ष असले पाहिजे. कारण आपण जे सेवन करतो त्याचा आपल्या शरिराबरोबरच मानसिकतेवरही परिणाम होतो. आपली खाण्यावर अति लालसा नसावी. ताट पदार्थांनी पुर्ण भरलेले असण्यापेक्षा ताटातील अन्न जीवनसत्वांनी भरपूर असले पाहिजे. गोठवलेल्या पदार्थांचे आणि सहज उपलब्ध होणार्या पदार्थांचे सेवन नाहीच्या बरोबर असावे. जेवण करतांना मनाने उपस्थित रहावे आणि आपल्याला जेवण करण्याचे भाग्य लाभले त्यासाठी आभारी असावे. जेवतांना मनात हावरटपणाचे भाव नसून संतुष्टी असावी.
आहारात मांसाहाराचे प्रमाण फार कमी असावे. त्याऐवजी ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश असावा. भाज्या आणि फळे जास्त काळ साठवून ठेवू नयेत. कारण त्यामुळे त्यांच्यातील जीवनसत्वे नष्ट होतात. आहारात तेलाचे प्रमाण कमी असावे. त्याचप्रमाणे चहा आणि कॉफी सारखी पेये अति प्राशन करू नये. आहाराशी निगडीत नियम पाळल्यास एक निरोगी शरिर आपल्याला लाभते. तसेच त्यात तेजस्वी आणि तडफदार विचार वास्तव्य करतात आणि ते विचारच आपल्याला आजीवन चिरतरुण ठेवतात.
3. आपल्या दिनचर्येत शारिरीक व्यायाम आणि मानसिक आरोग्यास महत्व असावे.
व्यायाम केल्याने आपल्याला संपुर्ण दिवस ताजेतवाने आणि स्फुर्तीदायक वाटते. तसेच शरिरात रक्ताभिसरण योग्य रितीने होवून सर्व अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तेव्हा दररोज व्यायामाची शिस्त लावणे अत्यंत आवश्यक आहे. शरिराबरोबर आपल्या मनालाही पोषणाची गरज भासते. त्यासाठी आपली संगत योग्य असली पाहिजे. आपण व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. आपण स्वत:ला वाचनाची सवय लावावी. त्यामुळे आपल्या विचारात स्पष्टता व खोली येते. जिथे चांगल्या विचारांची आदान प्रदान होते अशा चर्चांमध्ये सहभागी व्हावे. मन एकाग्र आणि शांत ठेवण्यासाठी मेडीटेशन करावे. ज्यामुळे शांत व पुरेशी झोप येण्यास मदत मिळते आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. सुदृढ शरिर आणि स्वच्छ मन आपल्याला आजीवन चिरतरुण ठेवते.
4. आध्यात्मीक जीवनाकडे कल असावा.
आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वरवर असतो. आपण आपल्या बाहेर दिसणार्या स्वरूपाला खरे मानून वागत असतो. जे आपल्या आसपास च्या लोकांनी घडवीले आहे. तसेच कठोर परीश्रम करून जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतो. परंतू जर आपण ध्यान-साधनेचा आधार घेतला. तर आपल्याला आपल्या अंतरंगाचा तळ गाठणे शक्य होईल. त्याचबरोबर आपल्या समोर स्वत:चीच अनेक सत्य आणि रहस्य उलगडतील. आपल्या अंतर्मनाचे साम्राज्य जे प्रेम, दया, उदारता ह्या दिव्य गोष्टींनी समृद्ध आहे त्याची आपल्याला प्रचीती येईल. आपल्या अंतर्मनाचा आवाज आपल्याला दिशा-निर्देश करेल. त्यानुसार आपण आपले जीवन घडवीले तर आपल्याला सर्वत्र आनंदाची अनुभूती येईल आणि हा आनंद आपल्याला आजीवन चिरतरुण ठेवेल.
5. जीवनात कधीही निवृत्त होवू नये.
आपण आपले जीवनयापन करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करतो. आणि मनाने त्या कामाशी संलग्न होवून जातो. त्यातून निवृत्तीच्या विचारानेही आपल्या मनाची घालमेल होते. कारण निवृत्ती नंतर आपल्या मनाला रितेपणा येतो. जो आपले मानसिक आरोग्य असंतुलीत करतो. मानसिक ताणामुळे आपण हृदयासंबंधीत आजारांचे शिकार होतो. ह्यापासून वाचण्यासाठी आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या जीवनाची योजना आखलेली असावी. ज्यामुळे आपले मन गुंतवणे शक्य होईल. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी काही ध्येये ठरवावीत. जी इच्छा असूनही आजतागायत पुर्ण होवू शकली नाहीत. काही छंद जोपासावेत ज्यामुळे मनाला गुंतवणे सोपे जाईल. निसर्ग सान्निध्याची आवड असल्यास शेती व्यवसायात लक्ष द्द्यावे. नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घ्यावा. काहीही करून स्वत:ला सक्रीय ठेवावे. ज्यामुळे आपण आजीवन चिरतरुण राहू.
6. वर्तमान क्षणात जगावे.
आपण आयुष्यभर भुतकाळातील घटनांचे दोषारोपण स्वत:वर लादून घेतो. त्यांचे ओझे आपल्या मनावर घेवून जगत असतो. त्याचप्रमाणे भवीष्यात होणार्या गैरसोयीची किंवा अडचणींची जाणीव होवून आजच चिंतीत होतो. ह्या दोन्ही गोष्टी आपले वर्तमानातील जगणे दुर्भर बनवीतात. आपण सर्वार्थाने त्या क्षणांत उपस्थित राहू शकत नाही आणि त्या क्षणांचा आनंद उपभोगू शकत नाही. परंतू आपण भुतकाळात झालेला घटनाक्रम काही केल्या बदलू शकत नाही. तसेच भवीष्यात होणार्या घटनांचा अंदाजही लावू शकत नाही. परंतू वर्तमान क्षण आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच कायम प्रफुल्लीत आणि आनंदी राहिले पाहिजे. आपल्या कामाप्रती आपला सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे. हा दृष्टीकोनच आपल्याला चिरतरुण ठेवेल.
7. आपण नेहमी कृतज्ञ असले पाहीजे.
कृतज्ञतेची भावना आपल्याला नेहमी विनम्र ठेवते आणि आपल्या पावलांना नेहमी जमीनीवर स्थिर ठेवते. तसेच निसर्गाशी जुळवून घेणे शिकवते. आपण निसर्गाप्रती कृतज्ञ असले पाहिजे आणि त्यासाठी निसर्गाला हितकारक गोष्टी केल्या पाहिजे. व्यक्तीगत पातळीवर वृक्षारोपण करणे, प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणणे, प्राण्यांची सेवा करणे ह्या गोष्टी करून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपल्या पायाखालची माती जी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झाली आहे. तिच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे. जीवनदायी पाण्यासाठी कृतज्ञ असले पाहिजे. सृष्टीची विशाल उर्जा जी अज्ञात रुपाने आपल्या पाठीशी असते. तिच्यासाठी क्षणोक्षणी कृतज्ञ असले पाहिजे. आपल्या आई-वडीलांसाठी कृतज्ञ असले पाहिजे. आपल्याला लाभलेल्या सर्व विशेषाधिकारांसाठी कृतज्ञ असले पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला मानसिक शांतता लाभते. आणि ही शांतताच आपल्याला चिरतरुण ठेवते.
आपले वय तीन टप्प्यात विभागता येवू शकते. परंतू आपल्या विचारांना कसलेही बंधन नसते. आपल्या विचारांना तरुण ठेवण्यासाठी आपण झटले पाहिजे. कारण विचारांना वय बांधून ठेवू शकत नाही. तसेच विचारांना मृत्युही येवू शकत नाही. एक शक्तीशाली विचार अनेकांच्या जीवनाचा सुत्रधार असतो. तसेच विचारांनीच आपले मनही चिरतरुण राहते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)