आत्मजागृकता

आपल्याला कित्येकदा सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात करत असतांना हुरूप  जाणवत  नाही. एकप्रकारचा नकारात्मक तणाव आपल्या मनावर असल्यासारखे वाटते. तरीही आपण  प्रत्येक गोष्ट मनापासून व भावना ओतून करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले कशातही मन लागत नाही. आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटतो. आपल्याला अचानक असे वाटू लागते कि आपल्यात अशा कोणत्याही क्षमता नाहीत. ज्यांच्यामुळे आपण जीवनात यशास पात्र होवू. त्या विचारांचा आपल्या आत्मसन्मानावर नकारात्मक  परिणाम पडतो. त्यामुळे आरश्यापुढे उभे राहील्यावर स्वत:च्याच नजरेला नजर भिडवीण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. अशाप्रकारे आपण अनुपयोगी आहोत ही भावना आपल्या मनात घर करू  लागते.

   जीवन जगत असतांना कधीकधी आपले स्वत:कडे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले असते. कारण आपल्या माणसांना सहकार्य करण्यात व त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात संपुर्ण जीवन आपण व्यतीत केलेले असते. स्वत:ची विशेष काळजी घेण्याकडे आपला कल नसतो. कारण आपल्याला स्वत:ची किंमत करणे महत्वपूर्ण वाटत नाही. तसेच आपण आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रीत करत नाही. कारण ते करणे आपल्याला गरजेचे वाटत नाही. आपण आपल्या शारिरीक स्वास्थ्याकडेही तोपर्यंत दुर्लक्ष करत जातो. जोपर्यंत त्यासंबंधीत कोणतीही मोठी तक्रार आपल्या समोर उभी राहत नाही. कारण ती गोष्ट आपण दैवावर सोडून मोकळे होतो.

   आपल्या मनात ही घालमेल असते कि स्वत:ची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. किंवा त्यामुळे आपल्या माणसांकडे आपण कानाडोळा करतोय. असाही त्याचा अर्थ निघतो. परंतू आता आपण हे कोठेतरी थांबवले पाहिजे. आपण आत्मकेंद्रीत आहोत असे जर कोणास वाटत असेल. तर त्याची काळजी आपण करावयास नको. आपल्या जीवनात आपण काय करावे आणि काय नको ह्यावर कोणाचेही धरबंध नकोत. ह्याचा अर्थ हा होतो कि आपण स्वत:साठी सखोल विचार करणे. तसेच स्वत:च स्वत:ची किंमत करणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण स्वत:ला जाणून व समजून घेणार नाही. तोपर्यंत इतरही आपल्या समर्पनास व आपण त्यांच्या आयुष्यात केलेल्या सहयोगास ग्राह्य धरत नाही. आपण त्यांच्या प्रती निभावलेले कर्तव्य सामान्य गोष्ट मानून त्याला गृहीत धरले जाते. म्हणूनच आपण स्वत:च्या मनातील भावनांना समजणे सुरू केले पाहिजे. त्यासोबत आपण आपले शारिरीक स्वास्थ्य जपले पाहिजे. आपल्या सवयींना शिस्त लावली पाहिजे. आजपर्यंत आपण कोठेतरी हरवलो होतो परंतू आता जागृकतेने जगण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

1.स्वत:चे चांगले मित्र बनावे.

  जेव्हा  आपण आपल्या आयुष्यात ध्येय ठरवीतो. तसेच ते प्राप्त करण्यासाठी आपल्या  वेळेला शिस्त लावतो. तेव्हा काहीजण आपल्यावर हसतात. तर काही आपल्याला स्वार्थी समजतात आणि काही आपल्याला वेड्यात काढतात. अशावेळी जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात त्यांच्या असण्याची नितांत गरज असते. तेव्हा ते आपल्याला सोडून जातात. आपण त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना जवळचे मानतो. तेव्हा त्यांच्या कडूनही तसेच वागणे अपेक्षीत असते. पण जेव्हा आपल्या अपेक्षे प्रमाणे गोष्टी घडत नाहीत. तेव्हा आपण स्वत:च आपले मित्र बनून स्वत:मधील अद्वितीय गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. स्वत:ला प्रोत्साहीत करून उत्साहवर्धक विचार केला पाहिजे. जेणेकरून त्याचा आपल्या कामावर सकारात्मक परीणाम होईल. तसेच आपण आपले ठरवीलेले ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी होवू.

2. स्वत:वर विश्वास ठेवावा.

  आपण आपल्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी ठरवीतो आणि त्यांच्या घटीत होण्याची आशा लावून बसतो. परंतू जेव्हा आपल्या मनाप्रमाणे काहीही घडत नाही. तेव्हा मात्र आपला स्वत:वरचा विश्वास डळमळीत होतो. त्यावेळी आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधावा. आपले अंतर्मन आपल्याला नेहमीच योग्य मार्गदर्शन करत असते. आपण आपले प्रयास अखंड सुरू ठेवावेत. तसेच पुन्हा स्वत:वर विश्वास मिळवीण्यासाठी लहान-लहान ध्येय ठरवून ती प्राप्त करावीत. त्यामुळे स्वत:वरचा आत्मविश्वास वाढतो व आपल्या विचारात टवटवीत पणा येतो. आपण आपल्या आयुष्याप्रती असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास आपल्या सभोवताल आपल्याला आनंद आणि आनंदच दिसेल. आपल्या भावना बदलण्यास मदत मिळेल. तेव्हा काहीही झाले तरीही आपला स्वत:वरचा विश्वास दृढ असला पाहिजे.

3. स्वत:ची काळजी घ्यावी.

  आपण आपल्यातील सर्व गुणदोषांसोबत स्वत:चा मनापासून स्विकार करून स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत  करावे. तसेच स्वत:ची योग्य ती काळजी घेण्यास सुरवात करावी. आपल्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल आणून आत्मपरीक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा. स्वत:विषयी जास्तीत जास्त जाणून घ्यावे. स्वत:चे प्रत्येक पाऊल निर्मीतीक्षम कामे करण्यासाठी पडत आहे ही खात्री करून घ्यावी. आयुष्यात आपल्याकडे काहीही नसले तरीही अनुभवांची पिवळी पाने आपल्या पदरात असतात. त्यांच्यावर फक्त आपलाच अधिकार असतो. त्यामधून धडे गिरवून आयुष्य आणखी उत्तम करत जावे. आपल्या जीवनातील ध्येयांवर लक्ष केंद्रीत करावे. कारण अन्य कोणीही हे आपल्यासाठी करणार नाही. आत्मविश्वासाने मेहनत करावी आणि आपल्या नावापुढे यशाचा ठसा उमटवावा.

4. अंतर्मनाशी संवाद साधावा.

  आपण जेव्हा योगसाधनेचा अभ्यास करतो. तेव्हा आपले चित्त अंतर्मनाशी  एकरूप होते. आपले अंतर्मन आपल्याला दिशा-निर्देश करीत असते. आपण आपल्या मनाचा आवाज लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. जेव्हा आपण जीवनात वाईट काळाचा सामना करत असतो. तेव्हा आपले अंतर्मनच आपला आत्मविश्वास बळकट करत असते. अंतर्मनाशी केलेला सकारात्मक संवाद आपल्या कल्पनेतील गोष्टी आपल्या जीवनात प्रत्यक्ष रूपात घडवून आणण्यास हितकारक असतो. आपल्या जीवनातील चांगल्या काळात आपले अंतर्मनच आपल्यामध्ये आणखी उत्साह आणि आशा भरतो. तेव्हा आपण नेहमी आपल्या अंतर्मनाशी संवाद साधला पाहिजे. जेणेकरून आपल्या मनास टोचणार्‍या गोष्टींवर काम करून आपल्याला आणखी प्रगती करता येईल.

5. निसर्ग सानिध्यात वेळ घालवावा.

  आपण स्वत:ला सामान्य दिनचर्येत गुंतवून घेतलेले असते. परंतू जीवनात उद्भवणाऱ्या अडचणी व समस्यांमुळे कधी-कधी आपला उत्साह मावळत जातो. आपले मन अशांत होते. अशावेळी निसर्गाच्या सानिद्ध्यात व तिथल्या निरव शांततेत स्वत:ला झोकून द्यावे. कारण ती शांतता आपल्यात उर्जा भरत असते. त्यामुळे आपल्याला जगण्याचा अर्थ नव्याने उमगत जातो. ज्या गोष्टी करण्यापासून काही कारणांनी आपण स्वत:ला थांबवीले आहे त्या करण्यासाठी वेळ काढावा. आपण आपले मन मारत जगणे थांबवावे. आपल्याला आयुष्याकडून खर्‍या अर्थाने काय हवे आहे त्याचा थांग लावावा. एखाद्या शांत संध्याकाळी आपल्यातील कला कौशल्यांना नव्याने उजाळा देण्यासाठी ताज्या हवेच्या ठिकाणी तल्लीन होवून बसावे. कारण आपल्यातील कला आपल्या मनातील भावनांचे प्रतिनिधीत्व करत असतात. निसर्गाचा सहवास आपल्याला आपल्या सुखमय जीवनाची कल्पना करण्यास प्रोत्साहित करत असतो.

    आपले जीवन म्हणजे एक उद्देश असतो. ह्या उद्देशाची जाणीव आपल्याला आत्मजागृकतेने होते. आपल्या दिनचर्येत ठरवून केलेले बदल आपल्याला त्या उद्देशापर्यंत घेवून जातात. परंतू जीवनात तो उद्देश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मात्र  आपल्याला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना देखील करावा लागतो. कारण कधीकधी आपलेच नकारात्मक विचार व बिकट परिस्थिती तसेच आयुष्यात असलेली भावनाशुन्य माणसे ह्यांच्यावर विजय मिळविल्यानंतरच  आपला उद्देश पुर्ण होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *