आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया

 आपले स्वत:बरोबरचे नाते जोपर्यंत उत्तम होत नाही. आपण स्वत:ला जोपर्यंत सखोल जाणून घेत नाही. तसेच आपणही चुकू शकतो. हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मान्य करत नाही. तोपर्यंत आपले इतरांशी वाद व इतरांचा आपल्याला विरोध हा होतच राहतो. कारण काही निवडक नाती वगळता आपल्याशी संबंधीत इतर लोक हे मुख्यत्वे करून अपेक्षा व औपचारीकतेच्या माध्यमातून आपल्याबरोबर जुळलेले असतात. आत्मप्रेम आपल्याला स्वत:ची ओळख करून देत असते. आपल्याला जर जीवनात आत्मप्रेमाचे महत्व कळले तर आपण आपल्या भावना सहज कोणाही मध्ये न गुंतवितां पुढे त्यामुळे होणाऱ्या दु:खापासून स्वत:ला वाचवू शकतो. आपल्या भावना दु:खास कारणीभूत ह्यासाठी ठरतात. कारण त्या आपल्या मनात अपेक्षा जागृत करत असतात. अशाप्रकारे आपण आपल्या आनंदी व सुखी राहण्याची मक्तेदारी इतरांवर सोपवितो. परंतू जेव्हा इतरांमुळे आपला अपेक्षाभंग होतो. तेव्हा मात्र सर्वाधिक दु:खाला आपणच सामोरे जात असतो. आपली आतल्या आत घुसमट होते. परंतू ते कोणाच्या ध्यानातही येत नाही. कारण ज्यांच्यामुळे आपण दु:खी झालो त्यांच्या मनात आपल्यासाठी जिव्हाळा नसतो. आत्मप्रेम आपल्याला कोणावरही निस्वार्थ प्रेम करणे तसेच सहानुभूती व करुणेने त्यांच्याशी जुळून राहणे शिकवते. परंतू कोणाशीही संलग्न होण्यापासून वाचविते. आत्मप्रेमामुळे आपल्यात असे गुण विकसित होतात कि ज्यामुळे आपले व्यक्तीमत्व इतरांना लोभसवाणे, प्रेमळ व समजूतदार वाटू लागते. इतरांना आपल्याशी बोलून किंवा आपल्या सहवासात राहून दिलासा मिळतो. अशाप्रकारे अगदी नैसर्गिकपणे जेव्हा आपण प्रेम व आपुलकी इतरांना निरपेक्ष भावनेने वाटू लागतो. तेव्हा आपण खऱ्या सुखाचे मानकरी होतो. आपणच जर प्रेमाने व दयेने ओतप्रोत भरलेलो असलो तर त्यासाठी आपल्याला इतरांपुढे हात पसरावे लागत नाहीत. त्याउलट आपणच ते इतरांपर्यंत पसरविण्यास एक माध्यम ठरतो. आत्मप्रेम आपल्याला एकटे पडण्याच्या भीती पासून परावृत्त ठेवते. त्यामुळे कितीही बिकट प्रसंगी आपण मनाने कणखर राहतो. कारण आपला सहवासच आपल्याला सर्वस्वी सर्वदृष्टीकोणाने परिपूर्ण बनवितो. त्यामुळे आपण स्वत:च्या ध्येयावर मन एकाग्र करून आपले खरे व सुंदर विश्व उभारू शकतो. 

   एखाद्या व्यक्तीचा सुंदर चेहरा बघणाऱ्याचे लक्ष वेधून घेतो. कोणाचे सुडौल व आकर्षक शारीरिक सौंदर्य सर्वांच्या नजरेत भरते. परंतू कोणास त्याचे आकर्षण वाटते तर कोणास त्याचा मत्सरही वाटतो. कारण बघणारे त्यास सौंदर्याची खान समजून आपोआपच स्वत:ची तुलना त्याच्याशी करू लागतात. परंतू तोच रूपवान चेहरा काही दुर्दैवी कारणांनी विद्रूप झाला. त्या आकर्षक शरीरास एखाद्या दुर्धर रोगाने विळखा घातला. किंवा शरीरास अपंगत्व आले तर किती लोकांच्या मनात तरीही त्याचे आकर्षण व मत्सराची भावना कायम राहील. कारण शरीर नाशवंत आहे. त्याचे सौंदर्य कायम टिकून राहू शकत नाही. कधी आपले वय, कधी झालेला  एखादा रोग तर कधी एखादा अपघात आपले सौंदर्य हिरावून घेण्यास कारणीभूत ठरतो. जेव्हा त्या शरीराची सुंदरता पूर्णपणे संपलेली असते. तेव्हाही आपल्याला त्याला प्रेमाने जपता येण्यासाठीच स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करावे लागते. कारण जेव्हा आपल्याला अनपेक्षितपणे अशाप्रकारच्या दुर्दैवास सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्या शरीराची अशी अवस्था पाहून आपले मन दु:खी होते. परंतू आपल्याला आपल्या शरीरापासून पळ काढता येत नाही. अशावेळी आपण आपल्या शरीराच्या क्षतिग्रस्त भागाची मनापासून व जास्त काळजी घेतो. त्यामधून पूर्णपणे बरे होण्याच्या दृष्टीकोनाने शक्य ते सर्व प्रयत्न करतो. आपल्या सकारात्मक विचारसरणीने त्या संकटातून बाहेरही येतो. शरीरावर झालेल्या जखमा काळानुरूप भरूनही निघतात. परंतू त्यामुळे आपल्या शरीरावर कायमस्वरूपी पडलेले व्रण किंवा डाग आपल्या देखण्या स्वरूपाला नेहमी साठी विद्रूप करतात. जे आपले मनोधैर्य खचवीन्यास ठोस कारण ठरते. परंतू आत्मप्रेम आपल्या जगण्यात पुन्हा जिवंतपणा आणि हिम्मत आणते. त्यामुळे आपल्या जीवनाला आपल्या कल्पनेपलीकडचे वळण लागते. अशाप्रकारे जीवनात येणाऱ्या चढ उतारांचा स्वीकार करूनच आपल्याला जीवन ही एक सरळ रेषा नाहीतर, खाच खळग्यांचा मार्ग आहे हे कळते. जीवनाची सर्व रूपे स्वीकारून पुन्हा नव्या उमेदीने मार्गक्रमण करण्याची हिम्मत आपल्यात आत्मप्रेमामुळेच येते. कारण आपल्या आयुष्यात जेव्हा सर्वकाही नीट सुरू असते तेव्हा असंख्य माणसे आपल्या आसपास असतात. परंतू आपल्या कठीण काळात मात्र आपल्याबरोबर आपली अत्यंत जिव्हाळ्याची माणसे व आपणच असतो. तेव्हा नात्यांच्या आपल्या जीवनातील मर्यादा आपल्याला कळणे आवश्यक आहे. कारण जीवनभर आपण नात्यांमध्ये इतके गुंतलेलो असतो कि आपले स्वत:कडे दुर्लक्ष होते. परंतू आपण मात्र आजीवन क्षण न क्षण स्वत:बरोबर असतो. तेव्हा आत्मप्रेमाने आपले स्वत:सोबतचे नाते घट्ट केले पाहिजे. अन्यथा आपले जीवन दुर्भर करण्यास आपणच कारणीभूत ठरतो. 

   आपले जीवन कठोर मुल्यांवर आधारीत असले पाहिजे. त्याचबरोबर कितीही नाजूक क्षणी आपल्याला मूल्य जपता आली पाहिजे. जेव्हा आपण मित्रमंडळींच्या सानिद्ध्यात असतो तेव्हा मित्रांकडून आलेल्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडण्यापासून आपण स्वत:ला तेव्हाच वाचवू शकतो.  जेव्हा आपण ठाम निर्धाराने व अगदी तठस्थपने तरीही विनम्रतेने स्वत:च्या बाजूने उभे राहू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुल्यांप्रती अभिमान व विश्वासही वाटला पाहिजे. तसेच आपल्या मनाला विचलीत होण्यापासून वाचावीन्यासाठी अगदी स्पष्टपणे कोणासही हो किंवा नाही म्हणता आले पाहिजे. परंतू आपण एकटे पडण्याच्या भीतीने आपली मूल्य सहजरीत्या तोडून टाकतो. आपल्या अंतर्मनाने केलेल्या मार्गदर्शनाला डावलून इतरांसारखे बनण्याचा प्रयत्न करतो. परंतू कधी जर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव झाली तर मात्र हातातून वेळ निघून गेलेली असते. कारण एका वळणावर आपल्याला इतरांच्या तालावर आपल्या मनाविरुद्ध नाचणे अशक्य होते. अशावेळी जर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचे असल्यास किंवा आपल्या तत्वात न बसणाऱ्या गोष्टी करण्यापासून स्वत:ला वाचवायचे असल्यास आपले इतरांशी असलेले संबंध व त्यांचे आपल्याविषयीचे मत बिघडवून पुन्हा नव्याने एकट्याचा प्रवास सुरू करावा लागतो. परंतू आत्मप्रेम  आपल्याला नात्यांच्या महासागरातही स्वाभिमानाने राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची संधी देत असते. त्यामुळे नाते संबंधांमध्ये सुरवातीलाच सुरक्षित अंतराचे महत्व समजून घेवून, काहीही झाले तरी आपल्या मूल्यांशी तडजोड न करून व आपल्या क्षेत्राला पूर्ण महत्व देवून आपण मैत्रीत किंवा नाते संबंधात पुढे जाण्याचा निर्णय घेवू  शकतो. तरच आपले स्वत:प्रती व इतरांचेही आपल्याप्रती मत तसेच नातेही उत्तम राहते. 

   आपण कायम आपल्या आत्मपरीक्षणावर भर दिला पाहिजे. परंतू त्यासाठी स्वत:मध्ये हिम्मत गोळा करावी लागते. कारण आपण कायम इतरांची मर्जी सांभाळण्यात लागलेले असतो. इतरांच्या नजरेत कायम आपली प्रतिमा उत्तम रहावी हा त्यामागचा हेतू असतो. परंतू आपली ही वृत्ती आपल्या मनाला निर्मळ राहू देत नाही. आपण इतरांना खुश करणारी भाषा बोलू लागल्यामुळे मनमोकळे पणाने वागू शकत नाही. आपल्या अस्सल व्यक्तिमत्वावर औपचारिकतेचे अनेक स्तर तयार होतात. आत्मप्रेम मात्र आपल्याला स्वत:चे परीक्षण करण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा होत जातात. आपण माणुसकीला सखोल समजू शकतो. आपल्यात होत चाललेल्या परिवर्तनाने आपले सुधारीत रूप जगासमोर येते. त्याचप्रमाणे आपले आपल्या सवयींविषयी जागरूक असणेही नाते संबंधांच्या दृष्टीकोनाने फायदेशीर असते. आपल्या काही सवयींची आपल्याला जराही जाणीव नसते परंतू इतरांना मात्र त्यांचा त्रास होत असतो. अशावेळी त्यांना आपल्याला सतर्क करणे जड जात असल्याने ते आपोआपच आपल्या पासून दूर जावू लागतात. किंवा आपल्या माघारी नकारात्मक मतं बनवितात. आत्म परीक्षणाने ह्या सर्व गोष्टींवर आपण स्वत:च ताबा मिळवू शकतो. जेवण करतांना तोंडाचा आवाज न करणे, आपल्या बाथरूम वापरण्याच्या सवयींचे निरीक्षण करणे, आपल्या तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाची कल्पना ठेवून इतरांशी बोलतांना भान ठेवणे, आपल्या बोलण्याचा व वर्तनाचा काय परिणाम होवू शकतो ह्या विषयी जागरूक असणे, पैस्या संबंधीत व्यवहार चोख ठेवणे, स्त्रियांबरोबर वागतांना सभ्यतेचे भान ठेवणे, आपल्याला सेवा देणाऱ्यांचा माणूस म्हणून आदर राखणे व त्यांचा मोबदला वेळेत चुकवीने ह्या सर्व सवयी आपली एक योग्य माणूस म्हणून ओळख निर्माण करतात. त्यामुळे इतरांचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो व त्यांच्या मनात आपल्यासाठी मानाचे स्थान निर्माण होते.  

  जीवनप्रवासात कळत नकळतपणे आपल्या कडून असंख्य चुका होत असतात. परंतू कधी आपण त्यांच्या कडे सहज दुर्लक्ष करतो तर कधी त्या चुकांसाठी आजीवन स्वत:ला माफ करू शकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कमकुवत दर्शवितात. परंतू जेव्हा आपण चुका आपल्या कडूनही होवू शकतात. हे मान्य करून त्या चुकांची जबाबदारी पूर्णपणे स्वत:वर घेतो. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक धाडसी व्यक्तीमत्व ठरतो. त्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच चुका आपल्या हातून घडू नये ह्या विषयी जागरूक असणे ही गोष्ट आपल्याला कर्तबगार सिद्ध करते. आत्मप्रेमामुळे एकाच जन्मात आपण आपल्या परिवर्तनशील व्यक्तीमत्वाबरोबर पुन्हा नव्याने जन्म घेतो. त्याचबरोबर इतरांनाही त्यांनी केलेल्या चुकांसाठी मोठ्या मनाने माफ करून नव्याने जीवन जगण्याची संधी देतो. कारण चुका होण्यामागे कधीकधी अनावश्यक सबबी असू शकतात. तेव्हा चुका सुधारण्याची संधी मीळाल्यास अनेकांचे हृदय परिवर्तन होवू शकते. तसेच त्यांच्या जीवनाला सकारात्मक वळण लागू शकते. अशाप्रकारे आत्मप्रेम हे नात्यांचा भक्कम पाया असते. कारण त्यामुळे आपण स्वत:चे आत्मपरीक्षण करतो, स्वाभिमानाने जगतो, आत्मसम्मान जागृत करतो आणि माणुसकीला महत्व देतो. 

1  प्रामाणीकपणा व अखंडता 

   आपल्या कामात व आपण इतरांबरोबर केलेल्या व्यवहारात प्रामाणीकपणा व अखंडता ह्या गोष्टी पाहिजे असतात. त्यामुळे इतरांनी आपल्यावर केलेल्या विश्वासास आपण पात्र आहोत हे सिद्ध होते. त्यामुळे नात्यात सलोखा निर्माण होतो. कारण आत्मप्रेमामुळे त्या दोन्ही गोष्टींचे महत्व सर्वप्रथम आपल्याला जास्त कळलेले असते. त्यामुळे आपण कधी कोणास फसवीन्याचा विचारही करू शकत नाही. कायम कोणाच्या विश्वासास पुरे पडणे हेच आपल्याला उत्तम रीतीने माहित असते. तसेच हे माणुसकीला साजेशेही   असते. 

2  आत्मचिंतन 

   आपण आपल्या जीवनकाळात आपले कुटूंब, आपली नाती, समाज अशा बऱ्याच ठिकाणी आपले योगदान देत असतो. ह्याचा अर्थ हा होत नाही कि आपण ह्या जगात नसतांना जगाचे रहाटगाडगे आपल्या विना थांबते. आपण जन्मास येण्याअगोदरही सर्वकाही सुरळीत सुरू होते. तसेच आपल्या गेल्यावरही ते तसेच सुरू राहील. तेव्हा आपण आपल्या जन्माप्रती कायम ऋणी राहून आपल्या जन्माचे सोने करण्यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण आपला जन्म हा जीवनाच्या रंगमंचावरील सीमित कालावधीसाठी असलेली एक भूमिका असतो. तेव्हा पडदा पडण्याअगोदर आपण   आपल्या जीवनाचा महान हेतू शोधून काढला पाहिजे. स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत केल्याने हे शक्य होते. 

3  प्रेमाची भाषा 

   प्रेमाची भाषा आपल्याला एकमेकांचा सम्मान करणे शिकविते. तसेच प्रेम शत्रुत्वाच्या भावनेलाही कायमचे नष्ट करू शकते. परंतू प्रेमाची भाषा आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वत:वर प्रेम करतो. स्वत:चा स्वीकार करतो. स्वत:ला माफ करू शकतो. त्याचबरोबर एक माणूस म्हणून स्वत:चा आदर करू शकतो. ह्याचा अर्थ हा होतो की ह्या प्रेमाच्या गोष्टी आपल्याला सर्वकाही स्वत:पासून सुरू करणे शिकवितात. म्हणूनच  जेव्हा आपण स्वत:ला सखोल समजू शकतो तेव्हाच इतरांना समजणे आपल्याला सोपे जाते. म्हणूनच आत्मप्रेमामुळे नाते संबंधांचा पाया रचला जातो. 

4  नात्यातील अंतर व आदर 

   आत्मप्रेमामुळे आपल्याला नात्यातील सुरक्षित अंतराचे महत्व कळते. कारण ज्याप्रमाणे आपले क्षेत्र आपल्यासाठी महत्वाचे असते. तसेच त्याचे स्वातंत्र्य आपल्याला लाभणे हा आपला हक्क असतो. त्याचप्रमाणे आपण जर इतरांच्या क्षेत्रात त्यांच्या मर्जी शिवाय हस्तक्षेप केला. तर तेही आपल्या ह्या दुर्व्यवहारामुळे दु:खी कष्टी होवू शकतात. हे आपण स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत केल्यावरच समजू शकतो. म्हणूनच कोणत्याही  नात्यांमध्ये मान सन्मान व सुरक्षित अंतर निर्माण होणे अनिवार्य असते. तरच ते नाते आजीवन त्यामधील प्राणांसोबत जिवंत राहू शकते. 

   आपले अंतर्मन ज्या गोष्टींनी व्यापलेले आहे त्याच गोष्टी आपल्या आयुष्यातही झळकतात. कारण जे आपल्या आत नाही ते बाहेर सादर करणे आपल्याला कधीही शक्य होत नाही. जर आपले स्वत:बरोबर नाते ठीक नाही तर इतर नात्यांनाही आपण योग्यरीत्या न्याय देवू शकत नाही. जर आपण स्वत:ला समजू शकलो नाही तर इतरांनाही समजने आपल्याकरीता कठीण असते. म्हणूनच आपल्या आसपासच्या जगात आपल्याला अपेक्षित असलेले परिवर्तन आणावयाचे असल्यास परिवर्तनाची सुरवात स्वत:पासून करावी लागते. कारण इतरांकडून बदलण्याची अपेक्षा करणे व्यर्थ असते. जोपर्यंत आपण स्वत:मध्ये बदल आणण्याची तयारी दाखवत नाही. आत्मप्रेमाशिवाय ते शक्यही नसते. आत्मप्रेमामुळेच आपल्याला आपली खरी ओळख होवू शकते. आपली स्वत:शी ओळख झाल्यावरच आपण आपल्या जीवनातील नात्यांना न्याय देवू शकतो. म्हणूनच आत्मप्रेम हे नात्यांचा भक्कम पाया असते.    

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *