
घरात मुलगी जन्मास आली कि तिच्या येणाने घरादारात नवचैतन्य पसरते. तसेच तिच्या गोड सहवासाने कुटूंबियांच्याही जीवनाला सकारात्मकरीत्या कलाटणी मिळते. असा विलक्षण अनुभव प्रत्येक जण घेतो. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो. म्हणूनच मुलींचा जन्म सौभाग्याने होतो असे म्हंटले जाते. मुली लहानाच्या मोठ्या होत असतांना आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी झटत असतात. मुलींना भविष्यात कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये म्हणून त्या दृष्टीकोनातून पूर्वतयारी करतात. मुलींना उत्तम संस्कारांबरोबर उच्च शिक्षीत करून स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रेरीत करतात. त्यामागे आई-वडीलांचे प्रेम व प्रेमापोटी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी काळजी असते. शिक्षण आटोपून मुलींचे लग्नाचे वय झाले कि त्यांच्या लग्नाविषयीचे विचार प्रत्येक आई-वडीलांच्या मनात घोळू लागतात. कारण ही समाजाची रितच असते . प्रत्येक आई-वडीलांची ही इच्छा असते कि आपल्या मुलीस सुशिक्षीत, सुसंस्कारी तसेच तिच्यावर अपार प्रेम करणारा जोडीदार मिळावा. त्यायोग्यतेचे स्थळ दिसताच ते मुलीचे लग्न करून तिची पाठवणी मोठ्या आनंदाने करतात.
मुलीच्याही डोळ्यात जोडीदाराविषयी तसेच नवीन संसाराबद्दल अनेक सुख स्वप्न असतात. त्या रंगीत स्वप्नाच्या साथीने ती आपल्या सहजीवनाची सुरवात करते. परंतू ह्या जगात दुर्दैवाने कितीतरी मुलींच्या लवकरच हे ध्यानात येते कि लग्न म्हणजे केवळ सुखस्वप्न नाहीत तर एका अत्यंत खडतर प्रवासाची सुरवात आहे. कारण लग्न करून नववधूच्या रुपात आलेली मुलगी ही दुर्दैवाने अजूनही कितीतरी सासरच्यांसाठी पैस्याचे झाड असते. ज्याला त्यांनी पाहिजे तेव्हा हलवावे आणि त्या झाडाने त्यांच्यावर पैस्याचा सडा पाडावा. हीच तिच्या कडून अपेक्षा केली जाते. जेव्हा मुलगी सुशिक्षीत असूनही बेरोजगार असते. तेव्हा सासरच्यांकडून तिच्या छळाला सुरवात होते. तिला अत्यंत तुच्छतेने ही ताकीद देण्यात येते कि ह्या घरात राहायचे असल्यास तिच्या मार्फत घरात पैसा आलाच पाहिजे. जेव्हा ती नोकरी करण्याची तयारी दाखवीते. तेव्हा त्यावरही त्यांच्या अटी कायम असतात. कारण त्यांना मोठ्या वेतनाची सरकारी नोकरी असलेली सूनच हवी असते. अशाप्रकारे भरमसाठ अटींवर उभ्या राहीलेल्या संसारात ती कसेबसे दिवस कंठत असते. तिच्या छोट्या छोट्याही पैस्यासंबंधीत गरजा कोणिही पुर्ण करण्यास तयार नसतो. कधीकधी वेळ पडल्यास आई-वडीलांच्या आर्थिक मदतीवर ती आपल्या गरजा पुर्ण करत असते. त्याचबरोबर काही ना काही कारणाने तिला दररोज मानसिक व शारिरीक छळाला सुद्धा सामोरे जावे लागते. त्यामागचे कारण एकच ते म्हणजे सासरच्या माणसांची पैस्याची भूक.
सरकारी नोकरी मिळवीण्याच्या आशेने तयारी करण्यासाठी ती घरच्यांच्या सहयोगाची अपेक्षा करते. परंतू त्यावरून तिला तिच्या आत्मसन्मानाला डिवचणार्या गलिच्छ शिव्या ऐकावयास मिळतात. तिच्या आरोग्यविषयक समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. कारण तिचे मानसिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. सासरच्यांकडून होणारा छळ मुकाट्याने सहन करत तसेच त्याविषयी कोठेही वाच्यता न करता ती मुलगी तिच्या जीवनातील नरकयातना देणारा तो काळ कसाबसा व्यतीत करत असते. त्यातच तिला बाळाच्या येण्याची चाहुल लागते. तिचा असा भाबळा समज असतो कि बाळाच्या येण्याने सर्वकाही ठिक होईल. परंतू ती फक्त तिच्या मनाने केलेली सुखद कल्पना असते. प्रत्यक्षात मात्र तिच्या भाग्यात काहितरी दुर्दैवीच वाढून ठेवलेले असते. कारण पैस्याची भूक पैस्याशिवाय आणखी कशानेही शांत होत नाही. असा काहीसा अनुभव तिला घ्यावा लागतो. तिच्या गरोदर पणाच्या काळात जेव्हा तिला जोडीदाराच्या सहवासाची, त्याच्या प्रेमाची तसेच काळजी घेण्याची आवश्यकता असते. तेव्हा जोडीदाराचे अनपेक्षीत रुप तिच्या समोर येते. तो तिच्या पासून आणखीच लांब राहू लागतो. तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या अनौपचारीक वागण्याचा कळस तेव्हा होतो. जेव्हा तो दुसरे लग्न करून तिच्यासाठी घरात सवत घेवून येतो. अशावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती त्याला गयावया करू लागते. त्याच्या असे करण्यामागचे कारण ऐकुण मात्र ती अवाक होते. त्याला नोकरी करून घरात भक्कम पैसा आणणारी जशी हवी होती तशी जोडीदार मिळालेली असते. तेव्हा आता त्याला तिची गरज उरलेली नाही असे सांगून तो तिला तिच्या आई-वडीलांच्या घरी कायमची सोडून येतो.
आयुष्याने अशाप्रकारे घेतलेले नकारात्मक वळण तिच्यासाठी जीवघेणे असते. सर्वकाही तिच्या सहनशीलतेच्या मर्यादे पलिकडचे असते. कारण तिच्या अजोड प्रेमाला व विश्वासाला तडा गेलेला असतो. आई-वडील तिला काहीही करून सावरण्याचा प्रयत्न करत असतात. अशारितीने हळूहळू ती त्या मानसिक धक्क्यातून बाहेर येवू लागते. काही महिन्यातच ती एका गोंडस बाळास जन्म देवून एका मुलीची आई होते. बाळाच्या येण्याने तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण लागते. सृष्टीने तिच्या पदरात मुलीचे दान टाकून तिच्या विझत चाललेल्या आशांना पुन्हा पंख फुटण्यास मदत केलेली असते. त्यानंतर तिच्यातील आत्मविश्वास उंच झेप घेतो. कारण जोपर्यंत तिचे प्रेम तिच्या अपेक्षा जोडीदाराशी जुळलेल्या होत्या. तोपर्यंत ती आतून कमकुवत झालेली होती. परंतू जेव्हा तिने पुन्हा कधिही मागे वळूण न बघण्याचा स्वत:साठी निर्णय घेतलेला असतो. तेव्हा मात्र तिच्या मनाने भरारी घेतलेली असते. त्यानंतर ति आत्मनिर्भर होवून मोठ्या अभिमानाने आपल्या मुलीची जबाबदारी स्वत:च्या बळकट खांद्यांवर घेते.
जगभरात अशा असंख्य मुलींच्या हृदयाला पाझर फोडणार्या जीवनकथा आहेत. ज्यांना सासरच्यांच्या पैस्याच्या मागण्या पुर्ण न करू शकल्यामुळे पराकोटीच्या शारिरीक व मानसिक छळाला सामोरे जावे लागते. कधिकधी त्या छळाला कंटाळून मुली आपली जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त होतात. तर कधी सासरचेच त्या मुलींची हत्या करतात. माणुसकीला काळीमा फासणार्या ह्या पैस्याच्या लालसेने जीचे नाव हुंडा असे आहे मुलींचे आयुष्य नरकासमान बनवीले आहे. ज्या स्त्रियांशिवाय सृष्टीचेही अस्तित्व नाकारले जाते. अशा स्त्रियांना केवळ एका तुच्छ कारणासाठी पाशवी अत्याचाराचे बळी बनविण्यात येते. हे अत्यंत दुर्दैवी व लाजीरवाणे आहे. पैस्याचा हव्यास माणसाला खालच्या थराला नेतो तसेच माणुसकीला सोडून वागायला लावतो हेच खरे.
कित्येक मुली ज्यांच्या डोळ्यात संसाराची स्वप्न आहेत. त्या ह्यातून हाच बोध घेवू शकतील कि आत्मसन्मानाचा हा प्रवास आपल्यात नवी उमेद जागवीतो. त्यामुळेच पुन्हा एकदा आपल्याला आत्मप्रेमाची प्रचिती होते. तसेच आपले मन प्रेमाने ओतप्रोत भरून जाते. ज्या प्रेमात आपल्या बरोबर इतरही ओलेचिंब होतात. तेव्हा अशा राक्षशी प्रवृत्तीच्या माणसांकडून कोणतिही अपेक्षा न करता स्वबळावर आयुष्य व्यतीत करणे हेच योग्य आहे. तसेच त्यात आकाशाला गवसणी घालणेही खात्रीशीर आहे.
1. पैस्यासाठी सासरी होणार्या छळाची माहिती आई-वडीलांना द्यावी
जेव्हा मुली लग्न होवून सासरी जातात. तेव्हा त्यांच्यासाठी सासर आणि माहेर असे दोन घरं तसेच दोन कुटूंब असतात. ज्यांच्यामधील दुवा त्या बनतात. त्या दोन्ही घरांची आब राखण्याची जबाबदारी त्यांची असते. अशावेळी मुली कोणत्याही गोष्टी इतरांना कळू न देता स्वबळावर निस्तरण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून दोन्ही कुटूंबात कायम सलोखा टिकून राहील. त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आई-वडीलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांचीही जाणीव असते. त्यामुळे आता आपल्यामुळे त्यांना कोणताही त्रास होवू नये अशी त्यांची इच्छा असते. अशी बरीच कारणे असतात. ज्यामुळे मुली सासरच्यांकडून होणार्या छळाला सुरवातीच्या काळात लपवून ठेवतात. परंतू कधिकधी कोणास काही कळायच्या आत हातातून वेळ निघून गेलेली असते. कारण गोष्टी इतक्या बिघडलेल्या असतात कि त्यात मुलीला नाहक आपला जीव गमवावा लागतो. तेव्हा ज्या मुली अशाप्रकारच्या छळास बळी पडत आहेत. त्यांनी सर्वप्रथम त्याविषयीची संपुर्ण माहिती जवळच्या विश्वासू माणसास द्यावी. तरच अशा क्रुरकर्म्यांच्या चेहर्या वरचे मुखवटे दूर होवून त्यांचे खरे स्वरूप जगासमोर येईल. तसेच निष्पाप मुलींची त्यांच्या जाचातून सुटका होईल.
2. मुलींनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर असावे.
मुलींचे सर्वार्थाने स्वावलंबी असणे ही आजच्या काळाची गरज आहे. आर्थिक आत्मनिर्भरतेचा विचार करतांना मुलगा मुलगी असा भेद आता केल्या जात नाही. घरातील प्रत्येक सदस्याने स्वबळावर काही ना काही करून कुटूंबास आर्थिक पाठबळ द्यावे. ह्यावर आता जास्त जोर देण्यात येतो. किंबहुना मध्यमवर्गीय कुटूंबांची हीच परिस्थिती आहे. उलट कुटूंबातील मुलीच जास्त कर्तबगार असतात. वेळ पडल्यास संपुर्ण घराची जबाबदारी स्वत:वर घेतात. असे असूनही सासरच्या मंडळींच्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा किंचीतही कमी होत नाही. जेव्हा पैस्याच्या मागणीवरून मुलींना सासरी छळास सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्या आत्मसन्मानासाठी घर सोडण्याची पाळी मुलींवर येवू शकते. अशावेळी त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्या तर काहिही झाले तरी त्यांचा स्वत:वरचा विश्वास ढळणार नाही. आणि त्या आपल्या माणसांच्या सहयोगाने पुन्हा नव्या जोमाने उभ्या राहू शकतात.
3. नवविवाहीतेने सासरी होणार्या जाचासाठी कायद्याचा आधार घ्यावा
आजच्या मुली उच्च शिक्षण घेवून सुसंस्कृत झाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या आत्मविश्वासाने भरपूर आहेत. असे असतांनाही जेव्हा कधी त्यांना सासरच्या जाचास सामोरे जावे लागते. तेव्हा त्या भांबावून जातात. कारण त्यावेळी त्यांच्या विश्वासास तडा गेलेला असतो. ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नव्हती. अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात. परंतू त्यावेळी त्यांनी न डगमगता शांत डोक्याने विचार करावा. अशाप्रकारे कोणाहीकडून आपल्यावर होणारे अत्याचार निमुटपणे सहन करणे म्हणजे गुन्हा करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारास पाठिशी घालणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. तेव्हा भावनांच्या आहारी न जाता सरळ कायद्याचा आधार घ्यावा. जेणेकरुन जाच करणार्यास चांगली तंबी मिळेल. तसेच इतरांनाही जे अशा गोष्टींना सामोरे जात आहेत त्यांनाही त्यातून हिंमत मिळेल.
4. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपला आत्मसम्मान जपावा
मुली भावनाशील असतात. जिथे त्यांना प्रेमाचा ओलावा मिळतो तिथे त्या स्वत:ला पुर्णपणे अर्पण करतात. त्यांच्या मनात काडीमात्रही शंकेची पाल चुकचुकत नाही. परंतू कधीकधी त्यांच्या त्या निष्पाप विश्वासाला त्यांचा कमकुवतपणा समजून त्यांना वेड्यात काढण्यात येते. त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात. त्यांचे मनोबल खचवून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येतो. त्यांना एक व्यक्ती नाही तर उपभोगाची वस्तू समजल्या जाते. ज्याक्षणी मुलींना आपल्या स्वत्वाची जाणीव होते त्याक्षणी त्यांनी आपल्या आत्मसम्मानाच्या रक्षणार्थ पहिले धाडसी पाऊल उचलावे. त्यामुळे त्यांच्यासाठी पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात. आत्मसम्मानाचा मार्ग कितीही कठिण असला तरी आपल्याला आपल्या योग्य ठिकाणावर नक्की पोहोचवतो. भूतकाळात जेकाही झाले त्याकडे पुन्हा वळून न बघता आपल्या अस्तित्वाच्या संघर्षासाठी जय्यत तयारीस लागावे. हाच सृष्टीने आपल्यासाठी दाखवीलेला सुरक्षीत मार्ग समजावा.
मुलींना सृष्टीने खास आंतरीक शक्ती बहाल केली आहे. जेव्हा त्यांना त्याची प्रचिती नसते. तेव्हा त्या घराच्या चार भिंतींच्या आत किंवा त्याबाहेर कोणाच्याही अत्याचारास सहज बळी पडत असतात. त्याचबरोबर तेव्हा त्या अत्याचार करणार्यांपुढे सहज गुडघेही टेकतात. परंतू जेव्हा त्यांच्यातील आत्मसम्मान जागृत होतो तेव्हा मात्र त्या रणरागिनीचे रूप धारण करून स्वबळावर आपल्या जीवनाच्या शिल्पकार होवू शकतात.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)