
सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची ही अंतहीन प्रक्रिया प्रत्येक जन्मी आपल्याला स्वत:ची अद्वीतीय ओळख निर्माण करण्यास संधी प्राप्त करून देत असते.
ह्या जगात जन्म घेणारा प्रत्येक जीव हा स्वत:सोबत एक वेगळेपण घेवून येतो. जे त्याला इतरांपेक्षा भिन्न बनवीत असते. तसेच तीच त्याची अद्वितीय ओळख सुद्धा असते. परंतू ह्या जगात तिला सिद्ध करण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागतो. त्यालाच जीवन संघर्ष म्हणतात. कारण ह्या जगाचे जगण्याचे नियम सर्वांसाठी सारखे असतात. त्यामुळे प्रत्येकालाच त्या कठोर नियमांमध्ये तंतोतंत बसविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. किंबहुना आपल्या आसपास प्रवाहाचा भाग बनण्यासाठी चाललेली चढाओढ पाहून आपल्या मनावरही आपोआपच दबाव निर्माण होत जातो. किंबहुना आपण स्वत:च त्या दिशेने चालू लागतो.
आपली अद्वितीय ओळख ह्या जगात निर्माण करणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्यासाठी गरज पडल्यास कोणाच्याही पाठबळाशिवाय उभे राहण्याचे धाडस करावे लागते. त्याचप्रमाणे सर्वप्रथम आपल्यातील भिन्न व अद्वितीय गुणांचे आपल्याला आकलन होणेही आवश्यक असते. जसजशी आपल्याला त्याची जाणीव होत जाते. तसतसे आपण आपोआपच इतरांपेक्षा भिन्न भासू लागतो. परंतू एकटे पडण्याच्या भितीने बर्याचदा आपण आपली ती असामान्य ओळख लपविण्यासाठी स्वत:च्या खर्या अस्तित्वापासूनच आजीवन पळ काढत राहतो. कारण आपल्यात बळ नसते एकटे पडण्याला सामोरे जाण्याचे. अशावेळी आपण आपल्या खर्या ओळखीला मुठमाती देवून दुनियेच्या पाउलखुणांवर आपली पावले तंतोतंत ठेवण्यासाठी धडपडत असतो. तसेच अशाप्रकारे आपली असामान्य ओळख निर्माण होण्याच्या मार्गावरून आपोआपच हटून सामान्य जगात स्वत:ला हरवून बसतो.
जेव्हा आपण आपल्यातील भिन्नतेचा मनापासून स्विकार करून आपली अद्वितीय ओळख निर्माण करण्याचा पक्का निर्धार करतो. तेव्हा त्या खडतर मार्गावर फार कमी वेळा किंवा भाग्यानेच आपल्याला कोणाची तरी साथ लाभते. बर्याचदा हा संघर्ष आपल्या एकट्याचाच असतो. तसेच त्यात स्वत:ला सिद्ध करणे आपल्यासाठी अनिवार्य देखील असते. कारण ही आपल्या अस्तित्वाची लढाई असते. आपली ओळख निर्माण करण्याचा हा संघर्ष आपल्याला क्षणाक्षणाला कणखर बनवत जातो. कारण जेव्हा जगाकडून आपल्याला तुच्छतेची वागणूक दिली जाते. आपल्याला एकटे पाडण्यात येते. आपल्याला हिनवीले जाते. तसेच आपल्याला हसण्याचे माध्यम देखील बनवीले जाते. त्याक्षणी स्वत:ला आहोत तसे टिकवून ठेवण्यासाठी व आपल्या निवडलेल्या मार्गावर न डगमगता तठस्थ राहण्यासाठी आपल्याला हिंमत उभारावी लागते. जी आपल्याच अंतरात सामावलेली असून आपण मात्र त्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असतो. परंतू ज्याक्षणी आपली ही आंतरीक शक्ती जागृत होते. तेव्हा आपल्यात दहा हत्तींचे बळ येते. त्यावेळी आपणच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. हा चमत्कार तेव्हाच घडतो. जेव्हा आपण आपली अद्वितीय ओळख निर्माण करण्याचा स्वत:शी पक्का निर्धार केलेला असतो.
आत्मप्रेम हे आपली आपल्याशी सखोल ओळख करून देण्यास आपल्याला मदत करते. ज्यावेळी आपल्याला इतरांनी स्विकारावे म्हणून आपण केवीलवाणी धडपड करत असतो. त्यावेळी आपले स्वत:विषयी असलेले मत आपल्याला महत्वाचे वाटत नाही. परंतू ह्या जगात आपली अद्वितीय ओळख निर्माण करण्यासाठी आपले आपल्याबद्दलचे मत चांगले असणे, स्वत:बद्दल खात्री वाटणे आणि स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन योग्य असणे महत्वाचे असते. जेव्हा स्वत:च्या कसोटीवर आपण सर्वथा खरे उतरतो. तेव्हाच स्वत:ची अद्वीतीय ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर पडणारे आपले प्रत्येक पाऊल हे बलशाली होत जाते.
आपली अद्वितीय ओळख निर्माण करण्यासाठी निवडलेल्या मार्गावर आपल्याला पराकोटीचा त्रास होणार हे निश्चीत असते. तसेच आपण एक सर्वसामान्य माणुस असल्याने त्याविरोधात आपल्या मनात प्रतिक्रीयांचे वादळ उठणे हेही खात्रीशीर असते. अशावेळी स्वत:ला काही गोष्टींची शिस्त लावली पाहिजे. आपल्याला इतरांपासून होणार्या त्रासाचा नकारात्मक परीणाम आपल्या आत्मछवी वर पडू देवू नये. तसेच त्यासाठी वेळोवेळी त्रास देणार्यांविरुद्ध आवाजही उठविला पाहिजे. कारण काहिही करून स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरच आपण बाहेरच्या नकारात्मकतेशी झुंज देवू शकतो. त्याचबरोबर आपल्यातील विनम्रताच समोरच्या व्यक्तीच्या मनातील गैर मनसूब्यांना हाणून पाडू शकते. तेव्हा आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास कधिही डगमगू नये.
लहानपणापासून आपण ज्या वातावरणात लहानाचे मोठे होतो. तसेच वेळोवेळी आपल्या वडीलधार्यांनी आपल्याला दिलेली वागणुक. त्यावरून कधिकधी जीवनाप्रती आपला दृष्टीकोन कडवट होत जातो. त्यातून आपल्या मनात प्रतिस्पर्धांची व कमीपणाची भावना निर्माण होत जाते. आपल्यात निर्माण झालेली ही नकारात्मक भावना पुढे आपल्याच आयुष्यावर दुष्परीणाम करू लागते. त्याचबरोबर आपल्या संघर्षात आणखीच भर घालते. अशावेळी आपण अति चिंता करणे तसेच खिन्नतेस बळी पडतो. कारण आपल्याच माणसांच्या जगात आपल्याला स्विकारले जाईल कि नाही ह्याची आपल्याला काळजी वाटू लागते. जगाने ठरविलेल्या यशस्वीतेच्या कसोट्यांवर आपण खरे उतरू किंवा नाही ह्या गोष्टीची भिती आपल्या मनातून काही केल्या जात नाही. ह्या सर्व निरर्थक विचारांचा आपल्या मनावर इतका पगडा बसतो कि आपले अस्तित्व, आपले महत्वाचे असणे तसेच आपले अद्वितीय असणे ह्याचा आपल्याला विसर पडत जातो. परंतू आपल्यातील असामान्य गुण जे आपल्याला वेगळी ओळख प्राप्त करून देत असतात. तसेच जे जगाच्या पाठीवर इतर कोणातही नसतात. तेव्हा त्यांना अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आपण भक्कम पावले उचलणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे.
1. खरे मित्र शोधावे.
बर्याचदा आपल्यातील वेगळेपणामुळे एकटे पडण्याची भिती कायम आपल्यासोबत असते. अशावेळी आपण आपल्या मनावीरुद्ध सर्वांबरोबर राहण्याचा व त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू कधिकधी आपण त्यांच्या सोबत असूनही मनातून मात्र एकाकीच असतो. त्याचबरोबर कळत असूनही कमीपणा, प्रतिस्पर्धा, मत्सर ह्यासारख्या नकारात्मक गोष्टींना आपोआपच स्वत:कडे ओढून घेतो. स्वत:लाच दोषी ठरवीतो. आपल्याला त्रास देण्याचा प्रकार एखाद्या व्यक्तीकडून चुकून घडत असल्यास तो स्वत:मध्ये बदल आणण्यास तयारही होईल. परंतू तो जर ठरवून जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत असेल तर मात्र आपण त्याच्यापासून कायम लांब राहिले पाहिजे. तसेच जे आपल्याला प्रगती करण्यासाठी प्रेरीत करतात. आपल्यातील चांगल्या गुणांना वाव मिळावा म्हणून झटतात. तसेच त्यांच्या सोबतीने आपल्याला दिलासा मिळतो. असे खरे मित्र आपण आपल्या जीवनात आकर्षीत केले पाहिजे. जर असा एकही मित्र आपल्यापाशी नसेल तर आपल्यासाठी स्वत:इतका चांगला आपला मित्र आणखी कोणिही असू शकत नाही.
2. इतरांशी प्रतिस्पर्धा करणे टाळावे.
प्रतिस्पर्धा वाईटच असतात असे नाही. परंतू जेव्हा आपण आपल्या मनात कोणाविषयी मत्सर ठेवून त्याला अद्दल घडविण्याच्या नकारात्मक भावनेतून प्रतिस्पर्धेत उतरतो तेव्हा नुकसान मात्र आपलेच होते. कारण तत्सम प्रतिस्पर्धेत आपण पुढे जरी निघून गेलो तरी त्याचे समाधान आपल्याला लाभत नाही. आपली मनस्थिती आणखी विकृत होते. म्हणून आपल्यापेक्षा सर्वतोपरी वरचढ व्यक्ती आपल्या समोर असल्यास आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला काही धडे गिरवायचे असल्यास अगदी मनापासून त्याला आपला गुरू मानले पाहिजे. तरच एक शिष्य म्हणून आपण त्याच्या पुढे नतमस्तक होवू शकतो. अन्यथा आपले आंतरीक मन आपोआपच त्या व्यक्तीबरोबर प्रतिस्पर्धा करू लागते. ज्यामुळे आपल्या मनात कमीपणाची भावना वाढीस लागते. तेव्हा स्पर्धा इतरांशी न करता स्वत:शी करणे योग्य ठरते. कारण त्यामुळे आपण कालच्या तुलनेत आज सर्वोत्कृष्ट होत जातो. आपल्याला पदोपदी स्वत:चे परीक्षण करण्याची सवय लागते. त्याचबरोबर आपल्यातील छुप्या कला-कौशल्यांना प्रोत्साहन मिळते.
3. आपले अस्तित्व सर्वात महत्वाचे आहे.
ह्या जगात आपली अद्वितीय ओळख निर्माण करणे म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. तेव्हा आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वा विषयी संपुर्ण माहिती असणे फार महत्वाचे आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात काय केल्याने आरामदायक वाटते. तसेच कशामुळे आपण विचलीत होतो. ह्याचे पक्के निदान असले पाहिजे. त्याचबरोबर आपला स्वत:शी कधिही न थांबता चाललेला संवाद कसा आहे ह्यावरून आपल्या आयुष्याचा पुढचा काळ ठरत असतो. जर आपण स्वत:शी नकारात्मक संवाद साधत असू तर ठरवून तो बदलण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असले पाहिजे. अन्यथा विचारातील गोष्टी आपल्या आयुष्यात घडण्यास सुरवात होते आणि त्याला कारणीभूत आपणच असतो. त्यासाठी आपले अंतर्मन जागृत असले पाहिजे. त्यासोबत आपण शक्यतोवर स्वत:ला वर्तमान स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास मदत करेल. तसेच स्वत:ला नेहमी अद्दयावत ठेवले पाहिजे. जे आपल्या आत्मविश्वासात भर घालेल. तसेच आपल्या आवडी निवडीत थोडेफार बदलही आणले पाहिजे. त्याचबरोबर आपल्यातील काही दोष जाणीवपूर्वक काढून टाकून इतरांमधील चांगल्या गोष्टींचा मोठ्यामनाने स्विकार केला पाहिजे. त्यामुळे आपल्याविषयीचे आपले मत चांगले होत जाईल. तसेच आत्मविश्वासाने स्वत:चे अस्तित्व भक्कमपणे उभारणे आपल्याला शक्य होईल.
4. विनाअट प्रेम करणारी माणसे आयुष्यात असणे महत्वाचे आहे.
आयुष्यात काही बनण्यासाठी आपल्याला आपले आरामस्थितीचे क्षेत्र सोडावे लागते. अशावेळी आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांपासून आपल्याला लांब जावे लागते. आणि आपल्याला बाहेरच्या जगाचा सामना करावा लागतो. बर्याचदा ही नवी सुरवात आपल्यासाठी अत्यंत कठिण असते. कारण घराबाहेरचे जग हे कठोर असते. तसेच तिथे आपल्याला निस्वार्थ प्रेम मिळेलच ह्याची खात्री देता येत नाही.. शिवाय प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. त्यावेळी आपण प्रत्येक पावलागणिक ठेचाळतो आणि आपल्याला सावरणारे कोणिही नसते. आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. परंतू आपल्या आयुष्यातील आपली माणसे ही आपल्यापासून दूर असली तरी कायम आपले मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आपण निराशेच्या चिखलात फसत जातो तेव्हा ते त्यांच्या प्रेमाने व पाठबळाने पुन्हा स्थिर उभे राहण्याचे सामर्थ्य आपल्याला देतात. जेव्हा आपण परिस्थितीपुढे हार मानू लागतो. तेव्हा ते आपल्यातील क्षमतांची आठवण करून देतात. तसेच आपली अद्वितीय ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला शक्ती प्रदान करतात.
5. सर्वदृष्टीकोणाने धाडसी बनावे.
सृष्टीने आपल्या रुपात एक अद्भूत व अद्वितीय कलाकृती घडविलेली असते. तसेच आपल्याला स्वत:स सुरक्षीत ठेवण्याची बुद्धीमत्ता देखील बहाल केलेली असते. त्यासोबत आपल्या मनात भावनांचे साम्राज्य व्यापलेले असते. त्याचप्रमाणे केवळ सामर्थ्यशाली विचारांनीही परिस्थितीचे स्वरूप बदलण्याची ताकद आपल्यात असते. किंबहुना संकटांच्या काळ्या पाशानालाही आपल्या आत्मबळाने चुरचूर करून सुखाचे गोड झरे आपल्या आयुष्यात आणण्याची हिंमतही आपल्यातच असते. परंतू आपल्या मुळ ओळखीपासून पळ काढून आपणच स्वत:ला कमकुवत ठरवत असतो. तेव्हा आता आपल्याला पुन्हा एकदा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकण्याची गरज आहे. ह्या विशाल जगात आपले अस्तित्व हरवले आहे. पुन्हा त्याला शोधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण अंतर्मनाने धाडसी बनले पाहिजे. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या मनाच्या तळाशी आहेत. मात्र त्यासाठी मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न आपल्या इच्छाशक्तीने केला गेला पाहिजे. कारण हा प्रयत्न लहान सहान गोष्टींसाठी नाही तर आपली अद्वितीय ओळख ह्या जगात निर्माण करण्यासाठी आहे.
सृष्टीने आपल्याला अद्वितीय घडवीले आहे. आपल्यासारखे अन्य कोणिही नाही. आपल्या अद्वितीय रुपाच्या सर्व खाणाखुणा आपल्या अंतरात विखुरल्या आहेत. स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करून आपण त्या खुणांना आपल्या स्पष्ट पाऊलखुणा बनवीले पाहिजे. तसेच आपल्याला प्रवाहाचा भाग बनण्याचा नाहितर आपली अद्वितीय ओळख निर्माण करण्याचा पक्का निर्धार केला पाहिजे. तरच ह्या जगात आपले अस्तित्व टिकून राहिल. अन्यथा आपल्या जन्म घेण्याला अर्थ उरणार नाही.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)