
निसर्गाशी आपले घनिष्ठ नाते असो वा नसो तरिही निसर्गापासून आपल्याला खुप काही शिकावयास मिळते. निसर्ग हा जीवनदाता आहे. निसर्गात सर्वत्र मुबलकता, समृद्धी व भरभराट आहे. तसेच निसर्गातील प्रत्येक गोष्ट तिच्या अस्सल गुणधर्मात विराजमान आहे. तसेच तिथे तिचे महत्वाचे स्थान देखील आहे. तिच्या असण्याला अर्थ प्राप्त आहे. जसे सर्वदूर पसरलेले भव्य निळेशार आकाश आपल्याला प्रगतीचे पंख लावून उत्तूंग विहार करण्यास खुणावते. आकाश व जमीन यांचा मिलाप होण्याचा आभास आपल्या नजरेस जिथे होतो त्या क्षितीजास बघून आपला दृष्टीकोन व्यापक होतो. अथांग सागराची सखोलता आपल्या मनाच्या खोलीची आपल्याला जाणीव करून देते. उंच उंच पर्वत रांगा आपल्यातील विशेषतांना स्थान व अर्थ प्राप्त करून देण्यास उस्फुर्तता देतात. नद्यांचे संथपणे वाहने आपल्या मनातील चंचलतेस शांतता प्रदान करून दिशा दाखवीते. पृथ्वीतलावर आच्छादलेली हिरवीगार दाट वनराई आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करते. कारण वृक्ष आकाशाकडे झेप घेतात. त्यांच्यात लवचीकता असते. ते निसर्गाच्या रौद्ररूपापुढे नमते घेवून स्वत:चा बचाव करतात. वृक्षांच्या मुळांची जमिनीत खोलवर जावून पाण्याचा शोध घेण्याची क्षमता त्यांना मजबूत बनवीते. त्यांना लागणारी फुले फळे प्राणिमात्रांची भूक शमवीतात. अशाप्रकारे आपाआपल्या विशेषतांनी समृद्ध असूनही निसर्गातील प्रत्येक घटक विनम्रतेने निसर्गाचे प्रतिनीधीत्व करत असतो. त्याचप्रमाणे त्यास व्यापकता प्रदान करतो.
त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेला मनुष्यजन्म आणि आपल्या अद्वीतीय व्यक्तीमत्वात असलेल्या विशेषता ह्याचा अर्थ आपण समजला पाहिजे. कारण आपल्या पैकी प्रत्येकाचा जन्म हा एका महान हेतू साठी झालेला असतो. तसेच जन्म व मृत्यु ही शाश्वत सत्य आहेत. त्या दरम्यानचा काळ म्हणजे जीवन जे महान हेतूस पुर्णत्वास नेल्याने सार्थक होते. जर आपल्याला त्या हेतूचे आकलन झाले आणि त्यास गाठण्यासाठी आपण संघर्षाचा मार्ग निवडला तर त्या संघर्षासही मुल्य प्राप्त होते. अन्यथा आपण इतरांसारखे बनण्यासाठी, इतरांशी स्पर्धा लावण्यासाठी तसेच निरर्थक गोष्टींमागे वेळ वाया घालवीण्यासाठी जर संघर्ष करत राहिलो तर ती केवळ अवाजवी केलेली धावपळ ठरते.
ज्यांनी आपल्या जीवनाचा महान हेतू ओळखला, त्यासाठी संघर्ष केला आणि त्यास आपल्या जगण्याचा भाग बनवीले ते अजरामर झाले. कारण त्यांनी त्यांच्या मनुष्यरूपी जन्मास अर्थपुर्ण बनवीले. तसेच आपल्या सुकर्मांनी मानवजातीचे कल्याण केले. त्यांनी त्यांच्या विशेषतांवर लक्षकेंद्रीत केल्याने च त्यांना ते करणे शक्य झाले. कारण त्यांना परोपकाराची व्यापक परीभाषा कळली. फक्त आपल्यापुरते जगणे म्हणजे आपण मृत असल्याची खुण असते. तर आपले जगणे इतरांच्या जगण्याचा आधार बनणे म्हणजे खरी श्रीमंती असते. ह्याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे अशा थोर व्यक्तीमत्वांच्या एकत्र येण्याने इतिहास रचला गेला. त्याचप्रमाणे त्यांची नावे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहील्या गेलीत. ह्याचा अर्थ एकच होतो कि माणसाची कर्मच त्याची ओळख निर्माण करतात. तसेच त्याच्या कर्मांनीच तो नावलौकिकास पात्र ठरतो. नाहीतर दररोज असंख्य जीव जन्मास येतात व मृत्यु पावतात. त्यांना त्यांच्या जीवनाचा महान हेतू कळू न शकल्याने ते आपल्याच समस्यांमध्ये गुरफटून आपल्यापुरते जगतात आणि एकेदिवशी कायमचे निघून जातात. जगाला त्यांचा लवकरच विसरही पडतो. आपल्याला आपल्याच पूर्वजांची नावेही ठाउक नसतात. कारण ते कोणत्याही महान हेतूसाठी जगले नाहीत. परंतू ज्यांची नावे इतिहासात नोंदली गेली ते आपले कोणिही नसून आपण त्यांना आपले आदर्श मानतो. त्यांच्या बहुमूल्य विचारांची आपल्या जीवनात अंमलबजावणी करतो. त्यांच्या जीवनाचा व महान कार्याचा अभ्यास करण्यासाठी धडपडत असतो. त्याचबरोबर ते आजही आपले मार्गदर्शक असतात.
आपण बर्याचदा इतरांच्या नजरेने स्वत:कडे बघतो. आपल्यातीलच विशेषतांवर टिका करतो. तसेच जाणीवपूर्वक आपल्या कमतरतांवर लक्षकेंद्रीत करतो. परंतू ही सवय आपल्याला स्वत:हून लागत नाही. त्यासाठी आपल्या आयुष्यात घडलेल्या नकारात्मक घटना व आपल्या आसपास वावरणारी माणसे कारणीभूत असतात. तेथून आपल्या निरागस व कोवळ्या मनाला वळण लागते. आपल्याला त्यांनी दाखवीलेल्या मार्गावर चालतांना आपल्या व्यक्तीगत कारणांमुळे अडचणी आल्यास आपल्याला कमजोर ठरवील्या जाते. आपल्यातील कमतरतांना आणखीच उजागर करून दाखवीण्यात येते. आपलाही त्यावर हळूहळू करून विश्वास बसत जातो. अशाप्रकारे आपल्याला निसर्गाने बहाल केलेल्या आंतरीक शक्ती ज्या आपल्या विशेषता असतात त्यावर अविश्वासाचे कवच चढत जाते. त्यानंतर आपण अशा व्यक्तीमत्वात राहून आयुष्य घालवीतो जे इतरांना आवडते. ज्याला इतरांकडून स्विकारण्यात येते. जे आपल्याला एकटे पडण्यापासून वाचवीते. परंतू आपल्या मूळ विशेषतांपासून पळ काढून आपण कोठेही पोहचू शकत नाही. अशावेळी आपले आयुष्य समस्यांनी व्यापलेले असते. तसेच त्यांना सोडवीता सोडवीता आपल्या आयुष्याचा शेवट होतो. आपण अशा जीवनात अडकतो जे कोणासही उपयोगी पडत नाही. त्याचप्रमाणे आपला मनुष्य जन्म विनाकारण वाया जातो.
मनुष्य जन्म घेवून आपण ह्या जगाचे प्रतिनिधीत्व करत आहोत. तेव्हा येथील इतर जीवनांप्रती आपला मोलाचा सहभाग देण्यासाठी आपल्याला आपल्या विशेषतांवर मन एकाग्र करणे आवश्यक आहे. आपल्या अंतर्मनात आपल्या आवडी निवडी दडलेल्या असतात. त्यांच्यावर दृष्टीकटाक्ष टाकणे गरजेचे आहे. कोणाच्या मनास अंतराळाचे वेध असतात. कोणास अथांग समुद्राची खोली गाठायची असते. कोणास हिमालयाच्या उंच पर्वत रांगांना सर करायचे असते. तर कोणास भूगर्भातील घडामोडी जाणून घेण्याची दृढ इच्छा असते. परंतू प्रत्येक जण ह्या सर्व गोष्टी करण्यास पात्र नसतो. कारण प्रत्येकाच्या विशेषतांची श्रेष्ठता ही निरनिराळ्या गोष्टींमध्ये असते. तेव्हा आपण इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या अंतर्मनाचा तळ गाठला पाहिजे. कारण त्या एकमेव ठिकाणीच आपल्याला आपल्या आयुष्यातील महान हेतूशी निगडीत ठाम उत्तर मिळत असते. तसेच तेच आपल्या जगण्याला योग्य दिशाही देते.
आपण मात्र नेहमी इतरांच्या विशेषतांवर लक्ष केंद्रीत करतो. आपल्या तोंडून त्यांचे गुणगान गातांना आपण जराही थकत नाही. परंतू स्वत:च्या क्षमतांवर मात्र नेहमी शंका घेतो. वेळोवेळी आपल्या विशेषतांवर टिका करत असतो. हेच मुख्य कारण असते कि ज्यामुळे आपण कधिही समाधानकारक जीवन जगू शकत नाही. स्वत:विषयी असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण जीवनात काहिही विशेष करू शकत नाही. अत्यंत सामान्यपणे जीवन व्यतीत करतो. ज्यात कोणतिही आव्हाने नसतात. तर मानसिक दडपणे व भिती भरलेली असते. ज्यावर आपण कधिही वर्चस्व मिळवू शकत नाही.
आपण आपल्यातील विशेषतांना भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. ज्यामुळे आपण आपल्या जीवनाच्या महान हेतू पर्यंत पोहचू शकू. त्याचप्रमाणे आपल्या जीवनप्रवासात आपल्या हातून असे काही घडेल कि आपला जन्म सार्थकी लागेल. जीवन जगल्याचे समाधान आपल्या पदरी पडेल. त्याचप्रमाणे आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास नेण्याची जबाबदारीही सर्वस्वी आपलीच असते. तेव्हा आपण मनुष्यरुपात जन्म घेतला आहे हे कायम आपल्या ध्यानात असले पाहिजे. कारण जीवसृष्टीत केवळ मनुष्याचाच महान हेतू असतो. तसेच महान हेतू तेव्हाच पुर्णत्वास जातो जेव्हा आपण आपल्या विशेषतांना श्रेष्ठत्वास नेतो.
1. नकारात्मक घटनेतून मनात निर्माण झालेली ठिणगी
जेव्हा आपण आपल्या मार्गावर प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत असतो. तसेच प्रगती करत असतो तेव्हा काही जणांना आपले शांत असणे बघवत नाही. ते निरनिराळ्या मार्गांनी त्रास देवून आपली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपल्याला काहितरी करून शारिरीक इजा पोहोचवीण्याचा त्यांचा मनसुबा असतो. कधिकधी ते त्यात सफलही होतात. त्या नकारात्मक घटनेचा सामना करत असतांना आपल्या मनात अनेक विचार घोळत असतात. जेणेकरून आपल्याला असे दिवस दाखवीणार्या क्रुरकर्म्यांना चांगलाच धडा शिकवता येईल. अशावेळी आपण असे काही करून दाखवीण्याचा स्वत:शी ठाम निश्चय करतो कि ज्यामुळे आपले आयुष्यच बदलून जाते. त्यावेळी आपण आपल्यातील विशेषतांना अनुकूचीदार बनवीतो आणि सकारात्मक विचारांना जीवन देतो. कारण आपण केलेला निश्चय पुर्ण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला ते यश काहीही करून गाठायचेच असते. आपल्यातील विशेषतांच्या जोरावरच आपण तो निर्णय घेवू शकतो. तसेच आपले ध्येय निश्चीतपणे गाठू शकतो.
2. प्रिय व्यक्तीचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी
आपण आपल्या जीवनातील प्रियजन, प्रियमित्र ह्यांना जीवापाड प्रेम करतो. त्यांचा सहवास आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट असते. त्यांच्या शिवाय जीवनाची कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतू मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. जे आपल्यापासून आपल्या माणसांना कायमचे हिरावून घेते. अचानकपणे आपल्या आयुष्यातून आपल्या प्रियजनांचे जाणे म्हणजे आपल्यासाठी मोठा धक्का असतो. अशावेळी भावूक होवून आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचा निश्चय करतो. तसेच त्या स्वप्नास आपल्या जीवनाचा ध्यास बनवीतो. त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यासही आपण सज्ज होतो. तेव्हा आपण आपल्यातील विशेषतांना व क्षमतांना आव्हान करतो. जेणेकरून प्रिय व्यक्तीचे स्वप्न पुर्ण करण्याच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. अशावेळी आपली इच्छाशक्ती व आपल्या विशेषता आपल्याला ते ध्येय गाठण्यास मदत करतात.
3. आपल्या क्षमतांना सिद्ध करून दाखवीण्याची प्रबळ इच्छा
जेव्हा आपण आपल्यातील क्षमतांना सिद्ध करण्याचे ठरवीतो. तेव्हा आपल्यातील विशेषतांना जीवन देतो. त्यांच्यावर काम करून त्यांची श्रेष्ठता वाढवीतो. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात भर पडते. त्यावेळी ठरवीलेले कार्य सिद्धीस नेण्याचे धैर्य आपल्यात येते. त्याचप्रमाणे आपल्या नजरेत आपल्याविषयी आदर असावा, स्वत:विषयी मत चांगले असावे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाही आपण आपल्या आंतरीक शक्तींवर जास्त विश्वास ठेवतो. कारण आपले अंतर्मनच विशेषतांनी व्यापलेले असते. बाहेरच्या जगात आपण केवळ प्रतिस्पर्धांमध्ये गुंतून विनाकारण संघर्ष करत असतो. आपल्या विशेषता आपले मनोधैर्य कधिही खचू देत नाहीत. म्हणूनच आपल्या क्षमतांना सिद्ध करणे आपल्याला सहज शक्य होते.
4. कठिण परिस्थितीत स्वप्न पुर्ण करण्याचे धाडस
अनेक लोक जीवनात कठिण परिस्थितीचा सामना करत असतांना खचतात. कारण ते त्या परिस्थितीशी इतके संलग्न होतात कि त्यावरच आपली संपुर्ण उर्जा लावतात. त्यामुळे चक्रव्ह्यूवात फसल्यागत त्यांची अवस्था होते. समस्यांसोबत त्यामधून बाहेर पडण्याचे मार्गही असतात. परंतू त्यावरून त्यांचे लक्ष पुर्णपणे हटते. तसेच त्या एकाच नकारात्मक गोष्टीच्या मागे आपले संपुर्ण आयुष्य संपवीण्यास निघतात. कारण ते उमेद हारून बसलेले असतात. जर अशावेळी त्यांच्या मनात एखादे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचे विचार आले तर त्यांच्यातील विशेषतांकडे त्यांचे लक्षकेंद्रीत होवू शकते. कारण विशेषतांना श्रेष्ठ बनवील्याशिवाय ते पुढचे पाऊल टाकू शकत नाहीत. विशेषता त्यांच्या धाडसाला पाठबळ देतात. आणि त्यांचे योजलेले स्वप्न ते आपल्या जीवनात प्रत्यक्षरूपात आणू शकतात. .
जगात जे काही भव्य आहे, कठिण आहे तसेच ज्याला गाठणे म्हणजे आपल्याला आपल्या क्षमते पलिकडचे वाटते. अशा सर्व गोष्टींपर्यंत आपण आपल्या जीवनात पोहोचू किंवा नाही ह्याची शाश्वती आपल्याला नसते. परंतू आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास नेण्याचे महत्वपुर्ण काम प्रत्येक जण ठरवून करू शकतो. किंबहूना ते केलेच पाहिजे. कारण त्याशिवाय आपण आपल्या महान हेतू पर्यंत पोहोचणे कठिण आहे. तसेच महान हेतू शिवाय आपला मनुष्य जन्म व्यर्थ आहे. तेव्हा आपल्या विशेषतांमध्ये आणखी भर घालणे व त्यांना श्रेष्ठत्वास नेणे अनिवार्य आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)