आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व

 भारतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 5 सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. कारण शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावेत यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशिल होते. त्याचबरोबर राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाविषयी त्यांना वाटणारे प्रेम व जिव्हाळा तसेच त्यासाठी त्यांनी केलेले 40 वर्षाचे कार्य याचा सम्मान करण्यासाठी म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषीत करण्यात आला. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. त्यांना भारतसरकारने ‘भारतरत्न’ हा किताब देवून गौरवीले होते.

   समाजाचा विकास आदर्श शिक्षकांमुळे होतो. म्हणून शिक्षकांचे महत्व असाधारण आहे. ज्या देशात शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते असे देश सर्वांगिण विकास करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार व दिलासा असतो. त्यामुळे नागरिकांनी ह्या पेशाचा सम्मान केला पाहिजे. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देतांना परीपुर्ण असावा असे डॉ राधाकृष्णन यांचे मत होते.

   एका आदर्श शिक्षकाकडे दुरदृष्टी असते. विद्द्यार्थ्याला घडवितांना त्या दुरदृष्टीने ते त्याचा पाया भक्कम करतात. जेणेकरून भविष्यात त्यावर एक भव्य भवन उभारता यावे. एक आदर्श विद्द्यार्थी म्हणजे शिक्षकांनी त्याला घडविण्यात घेतलेल्या मेहनतीचे मुर्तीमंत उदाहरण असतो. म्हणूनच शिक्षकी पेशा हा सर्व पेशांमध्ये महत्वाचा आहे. कारण त्याच्या माध्यमातूनच अनेक महत्वपुर्ण पेशांचा जन्म होतो.

  शिक्षक ज्ञानाचा प्रसार तर करतातच त्याचबरोबर एका सुसंस्कृत समाजाची पायाभरणीही करतात. कारण ते विद्द्यार्थ्यांच्या बालमनावर ज्या मुलभूत गोष्टी कोरतात त्या आजन्म मिटविता येत नाही. तसेच त्या मुलभूत गोष्टीच धृव तार्‍या प्रमाणे कायम विद्द्यार्थ्याला दिशानिर्देश करत असतात. विद्द्यार्थ्याला कधिही मार्ग भटकू देत नाही. म्हणून आपण शिक्षकांचे आजीवन ऋणी असले पाहिजे.

   शिक्षक हे आपल्याप्रमाणेच एक सामान्य व्यक्ती असतात. परंतू ते आपल्या आयुष्यात असे काही सकारात्मक परिवर्तन आणतात कि त्यांची कायमच आदरयुक्त भिती वाटत असते. त्याचप्रमाणे त्यांचा इतका आधार वाटत असतो कि ते जेव्हा प्रत्यक्षात आपल्या पुढे येतात तेव्हा आपल्या डोळ्यांना आपोआप अश्रूंच्या धारा लागतात. तसेच नकळतपणे आपण त्यांच्या चरणांवर नतमस्तक होतो. शिक्षक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आयुष्यभर  आपल्या बरोबर असतात. कारण ते ह्या जगात असो अथवा नसो त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचविलेले श्रेष्ठ विचार जीवनाच्या आंधळ्या वळणावरही आपल्याला योग्य व अचूक मार्ग दाखवित असतात. शिक्षकांनी आपल्या विद्द्यार्थ्यावर विश्वास दाखविणे म्हणजे त्या विद्द्यार्थ्याचे अहोभाग्यच समजावे.

  ‘छडी लागे छम छम विद्द्या येई घम घम’ ही म्हण वर्गखोलीच्या भिंतींवर लिहीलेली असते. त्याचबरोबर शिक्षकांच्या हातात छडी पाहिली कि विद्यार्थ्यांचे धाबे दणाणते. भीतीपोटी सुट्टीची घंटा लवकरात लवकर वाजावी ह्यासाठी ते मनातल्या मनात प्रार्थना करू लागतात. परंतू मोठेपणी आपल्याला शिक्षकांच्या त्या छडीचा अर्थ उत्तमरीतीने उमगतो. कारण त्याशिवाय आज आपले इथवर पोहोचणे अशक्य होते.

  शिक्षकांनी आपल्यावर केलेल्या संस्कारातून एक माणूस म्हणून अनेक चांगल्या गोष्टींची जाणीव आपल्याला करून दिली. आई-वडीलांचा आदर करणे शिकवीले. प्राणिमात्रांवर व निसर्गावर प्रेम करणे शिकवीले. इतिहासातील थोर व्यक्तीमत्वांच्या जीवनप्रवासातून देशप्रेमाचे धडे गिरवीले. मातृभूमीचे कायम ऋणी राहणे शिकवीले. सण समारंभातून आपल्या संस्कृतीला जपणे शिकवीले. व्यायामाचे महत्व सांगितले. देशाचा योग्य व जागृक नागरीक बनणे शिकवीले. अन्याया विरूद्ध आवाज उठवीणे शिकवीले. मोठ्यांचा आदर करणे तसेच लहानांना जपणे शिकवीले. दिव्याप्रमाणे कायम तेवत राहणे शिकवीले. आयुष्याला अर्थपुर्ण बनवीणे शिकवीले. दीनदुबळ्यांचा आधार बनणे शिकवीले. ही यादी कधिही न संपणारी आहे. अशाप्रकारे शिक्षकांनी आजीवन निस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळे आपल्याला आपले जगणे सहज व सोपे करता आले.

   आज मात्र ह्या शिक्षण क्षेत्राला सुद्धा वेगळेच वळण आले आहे. कारण पूर्वी ज्या शिक्षकी पेशाला परोपकाराची झालर असायची त्याला आता व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी हे कार्य भावना ओतून करण्यात येत असे परंतू आतामात्र शिक्षणाचे हे जग भावनाशुन्य झाले आहे. जेवढा जास्त पैसा ओतण्याची आपली तयारी असेल तेवढे उत्तमातले उत्तम शिक्षण आपण आज मिळवू शकतो. म्हणूनच जास्तीत जास्त पैसा कमविणे आजच्या जगाची निकड आहे. त्याचप्रमाणे ह्या निकडीने शिक्षकी पेशासही सोडलेले नाही.

  आज शाळेच्या व्यतिरीक्त व्यक्तीगत शिकवण्या घेण्याचे प्रमाण त्यामुळेच वाढलेले आहे. विद्द्यार्थीही शिक्षकांशी फक्त शिक्षण घेण्यापुरते जुडलेले असतात. त्यामुळे आज भरघोष शिक्षण घेवून मोठ मोठ्या पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्तींमध्ये मुलभूत संस्कारांची कमतरता भासते. आजची पिढी संपत्ती, ख्याती आणि त्याबरोबर ओघाओघाने आलेला अहंकार ह्यांच्या आहारी गेलेली आहे.

   तेव्हा आता पुन्हा एकदा समाजाला आदर्श शिक्षकांची गरज भासू लागली आहे. जे त्यांच्या पवित्र शिक्षकी पेशाला केवळ उत्पन्नाचे साधन न समजता समाजाच्या प्रती आपले कर्तव्य समजतील. ज्यांनी ज्ञानाच्या प्रसाराला समाजाची सेवा समजून त्या कार्यास अखंडपणे आजीवन करत राहीले पाहिजे. शिक्षकांच्या हाती देशाचे उज्वल भविष्य आहे. आजचे विद्द्यार्थी उद्द्याचे उत्तम नागरीक बनणार आहेत. शिक्षकांच्या  विद्द्यार्थ्यावर असलेल्या  विनाअट प्रेमामुळे विद्द्यार्थ्यांचा  स्वत:वरचा विश्वास दृढ होतो.  जो शिक्षकांच्या आज्ञेचा कायम आदर करतो त्याला योग्य माणूस बनण्यापासून कोणिही थांबवू शकत नाही. अशा ह्या पवित्र शिक्षकी पेशाला सलाम आहे.

1. शिक्षकांनी विद्द्यार्थ्यांची आपसात तुलना करू नये.

   मोठमोठ्या नावाजलेल्या शाळांमधील विद्द्यार्थ्यांमध्ये आपसात उच्च श्रेणीत राहण्याची चढाओढ लागलेली असते. त्याचबरोबर  विद्द्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्यासाठी शिक्षकही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. त्याचप्रमाणे ज्या विद्द्यार्थ्यांमध्ये ती क्षमता असते त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येते. आणि सामान्य क्षमता असलेल्या विद्द्यार्थ्यांची त्यांच्याशी तुलना करण्यात येते.

  मात्र ह्या गोष्टीचा विद्द्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खोलवर वाईट परीणाम होत असतो. कारण त्यांच्या क्षमतेवरून त्यांना स्वत:विषयी कमीपणा वाटतो. त्यामुळे त्यांची श्रेणी आणखी आणखी घसरत जाते. शिक्षकांनी त्यांचा आत्मसम्मान ठेचाल्याचे ते दुष्परिणाम असतात. परंतू शिक्षकांनी अशा विद्द्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन केल्यास विद्द्यार्थी त्यांच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करू शकतील. तसेच त्यात आणखी भर घालण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे कोणाशिही स्वत:ची तुलना न करता अधिकाधिक उत्तम बनत जातील.

2. शिक्षकांनी विद्द्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा.

   शिक्षकांनी विद्द्यार्थ्यांची आपसात तुलना करणे थांबवीले व अवाजवी प्रतिस्पर्धांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्यात तर विद्द्यार्थ्यांची मनोदशा चांगली राहिल. प्रतिस्पर्धांचे त्यांच्या मनावर असलेले दडपण आणि त्यामुळे स्वत:बद्दल वाटणारा कमीपणा ह्यातून त्यांची सुटका झाल्यास ते अभ्यासासोबत त्यांना जन्मजात लाभलेल्या कलागुणांवर लक्ष केंद्रीत करू शकतील. शिक्षकांनी प्रत्येक विद्द्यार्थ्या मधील खास वैशिष्ट्यांना पारखून त्यावरून त्यांची प्रशंषा केली पाहिजे.

  त्यांना त्या दृष्टीकोनातून शिक्षकांकडून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्यामुळे विद्द्यार्थ्यांचा स्वत:वरचा विश्वास दृढ होत जाईल. त्याचप्रमाणे ते अभ्यास व वारंवार येणार्‍या परिक्षांना त्यांच्या क्षमतेनुसार सामोरे जातील. त्यासोबत त्यांचा सर्वांगीण विकासही होईल. कारण प्रत्येक विद्द्यार्थी हा अद्वीतीय असतो. तेव्हा त्याच्या मध्ये असलेल्या विशेष गुणांचा त्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. ज्या गोष्टी त्याच्यात नाहीत किंवा कमी आहेत त्याविषयी न्युनगंड निर्माण होता कामा नये. तरच प्रत्येकामधल्या विशेषता जगापुढे येतील आणि हे कार्य शिक्षकच करू शकतात.

3. शिक्षकांनी स्वत:ला आदर्श व्यक्तीमत्व बनवावे.

  शिक्षकी पेशाला समाजात वेगळा मान आहे. अत्यंत आदराने आपण त्याच्याकडे बघतो. आणि तो पेशा स्विकारणार्‍या व्यक्तीसही आदर्श समजल्या जाते. त्यांच्या कडून हेच अपेक्षीत असते कि ज्या बहुमूल्य गोष्टी ते विद्द्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्या त्यांनी स्वत:च्या जीवनातही  उतरविल्या पाहिजे. एक व्यक्ती म्हणून ते योग्य असले पाहिजे. तरच पालक आपल्या अपत्यास शिक्षकांच्या हाती सोपवून निश्चींत होतील. आणि शिक्षकही विद्द्यार्थ्याचे जीवन घडवू शकतील.

  तेव्हा शिक्षकी पेशा अंगिकारणार्‍या व्यक्तीने त्या पेशाचा मान ठेवावा. त्याचप्रमाणे त्याच्याशी निगडीत कर्तव्यांचे कायम भान ठेवावे. शिक्षकांनी नेहमी एक माणूस म्हणून योग्य होण्यासाठी स्वत:मध्ये परिवर्तन आणत गेले पाहिजे. त्यांचा नेहमी नविन गोष्टी शिकण्याकडे कल असला पाहिजे. त्यांनी बदलत्या काळानुरूप स्वत:मधे बदल आणावेत. परंतू तरिही ते मुलभूत तत्वांचे पालन करणारे असले पाहिजे. तरच ते विद्द्यार्थ्यांच्या कोर्‍या पाटीसारख्या असणार्‍या मनावर पैलू पाडू शकतील.

4. आपल्या जीवनात कायम शिक्षकांना महत्व असले पाहिजे.

  गुरु-शिष्याच्या ह्या अवर्णनीय नात्याचे एक श्रेष्ठ उदाहरण आपण पाहू. मिस सुलिवन ह्या अमेरीकन शिक्षिका होत्या. त्या वयाच्या 5 व्या  वर्षापासून अंध होत्या. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर त्या हेलन केलरच्या शिक्षीका बनल्या होत्या. हेलन एक अशी मुलगी होती जी लहान असतांना एका दुर्धर आजाराने ग्रस्त झाली आणि त्यात तिला दिसणे व ऐकू येणे बंद झाले होते. मिस सुलिवन हेलनच्या आयुष्यात आल्या तेव्हा ती 7 वर्षांची होती.

  हेलनला कोणतीही भाषा येत नव्हती आणि ती एक अत्यंत जिद्दी व हट्टी मुलगी होती. कारण ती कोणत्याही मार्गाने जगाशी संपर्क करू  शकत नसल्याने  तिचा आत्मा तिच्या शरिरात कैद झाला होता. मिस सुलिवन हेलनच्या अवस्थेला सखोल समजू शकल्या होत्या. त्यामुळे त्यांनी तिला जगाशी जुडण्याच्या साईन लँग्वेज शिकवील्या. मिस सुलीवन ह्यांच्यात प्रेम व संयम हे दोन विशेष गुण होते. त्यामुळेच त्यांनी कधिही हेलनची साथ सोडली नाही. त्यांनी तिच्या गुणांना प्रोत्साहन देवून तिला स्वावलंबी बनविले. त्यांनी तिला जीवनाचे धडेही गिरवीले.

  मिस सुलिवन ह्या शिक्षकी पेश्यात असूनही एक महान मानसशास्त्रज्ञ होत्या. कारण त्यांनी हेलनला सर्वदृष्टीकोनातून समजून घेतले होते. मिस सुलिवन व हेलन मधील नाते गुरू-शिष्या पलिकडचे होते. त्या हेलनसाठी सर्वात मोठा आदर्श व मार्गदर्शक होत्या. कारण त्यांच्यामुळेच हेलन तिच्या जीवनातील सर्वात मोठ्या त्रुटीवर मात करू शकली होती. त्याचबरोबर हेलनने आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करून ती लेखिकाही बनली होती. म्हणूनच मिस सुलिवन व हेलन केलर हे गुरू-शिष्याचे एक आदर्श उदाहरण आहे.

  आपलं बालपण स्फटिकाप्रमाणे असते. जेव्हा आपल्या शालेय जीवनाला सुरवात होते तेव्हा शिक्षकांनी लावलेली शिस्त आपल्याला नकोशी वाटते. परंतू शिक्षकांची मात्र त्या मागे दुरदृष्टी असते. अशाप्रकारे आपण जसजसे मोठे होत जातो आपली स्वत:शीच नव्याने ओळख होत जाते. जेव्हा आपण आयुष्यात चुकतो तेव्हा चूक दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करतो. शिक्षकांची ही किमया आपल्या जीवनाला व्यापून टाकते. आई-वडील आपल्याला जन्म देत असतात. परंतू आपले भवितव्य घडविण्यासाठी अत्यंत विश्वासाने आपल्याला  शिक्षकांकडे सोपवितात. तेव्हा शिक्षकांनी त्यांच्या ह्या श्रेष्ठ कार्याचे मानक वाढविले पाहिजे. त्याचबरोबर आपण कायम शिक्षकांचे ऋणी असले पाहिजे.

1 thought on “आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *