
आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेशी जोडले गेले आहोत. ही विशाल उर्जा जी अदृश्य रूपात आपल्या आयुष्यात कायम कार्यरत असते. तिचे असणे एक शाश्वत सत्य आहे. ती ह्या भूतलावरील प्रत्येक सुक्ष्म जीवजंतूंपासून ते वनस्पतीपर्यंत, प्राणीमात्रांपासून ते मनुष्यापर्यंत सर्वांवर एकसारखी छत्र धरून असते. जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्यावेळी आपल्या वर्तनातील प्रामाणिकपणा आणि अखंडत्व म्हणजे आपले चांगले कर्म असतात. त्याचप्रमाणे आपल्या करवी घडणारे चांगले वाईट कर्म आपल्या नकळतपणे सृष्टीच्या कॅमेऱ्यात सतत नमूद होत असतात. आपल्या उर्जेला ह्या दैवी उर्जेचे संरक्षण लाभणे अत्यावश्यक असते. मात्र त्यासाठी आपल्याला तिला पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे.
आपण आपल्या वर्तमान क्षणात केलेल्या निर्मीतीक्षम विचारांनी आणी आपल्या चांगल्या कर्मांनी आपले भविष्य स्वत:च घडवत असतो. कारण आपल्या नकळतपणे सृष्टीने आपला प्रत्येक क्षण अचूक टिपलेला असतो. आपल्यापाशी फक्त वर्तमान क्षण असतो आणि तो एक एक क्षण जगत आपले आयुष्य पुढे सरकत असते. आपण मात्र स्वत:ला भूतकाळात होवून गेलेल्या घटनाक्रमात व भविष्यकाळात होणार्या गोष्टींमध्ये असे गुंतवून घेतो कि वर्तमान क्षणांची पर्वा करणे विसरून जातो. त्यामुळे वर्तमान क्षण आपल्या हातून न जगता असाच निसटत जातो. त्यापेक्षा आपण पुर्ण जाणीवपूर्वक व जागृत राहून आपले कर्म करत गेले पाहिजे. तसेच परिणामांची अपेक्षा न बाळगता सृष्टीच्या ह्या विशाल उर्जेवर पुर्ण विश्वासाने विसंबून राहिले पाहिजे. खर्या मेहनतीचे उत्तम परिणाम आपल्याला हमखास मिळतात.
आपण नेहमी सृष्टीने आपल्यासाठी बहाल केलेल्या जीवनदायी संसाधनांसमोर विनम्र असले पाहिजे. त्याचप्रमाणे मनापासून आभारीही असले पाहिजे. तसेच आपल्या दिवसाची सुरवात आपण आभार मानून केली पाहिजे. वर्तमान क्षणात आपण ज्या विशेषाधिकारांनी समृद्ध आहोत त्यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. कारण आपल्याला जे काही लाभलेले आहे ते जीवन इतर कोणासाठी स्वप्नवत असण्याची शक्यता आहे. कोणतीही गोष्ट वाटून घेण्याची प्रवृत्ती आपल्यात असावी. जरका एक माणूस म्हणून आपल्याला माणुसकीची जाणीव आहे. तर आपल्या डोळ्यांसमोर घडणारे अन्याय अत्याचार बघून आपण शांत बसू नये. त्याविरोधात आपले एक पाउल उचलण्यात कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता नक्की पुढाकार घ्यावा. हावरटपणा आणि ओरबाडून घेणे ह्या वाईट गोष्टींना आपल्या आसपास थारा देवू नये. कारण ह्या गोष्टी आपल्यातील विवेक नष्ट करतात. तसेच आपल्याला माणुसकीपासून दूर घेवून जातात.
आपण आपल्या आई-वडीलांसाठी आभारी असले पाहिजे. ज्यांनी आपल्याला हे जग़ दाखवीले आणि ह्या जगात आपले हसतमुखाने स्वागत केले. आपल्याला लहानाचे मोठे केले. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील कठिण काळात त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेल्या अनुभवांचा प्रकाश दाखवून आपले जगणे सोपे केले. वेळप्रसंगी मायेचा पदर पसरवून आपल्याला ह्या कठोर जगाचा सामना करतांना होणारा त्रास सहन करण्याचे बळ दिले. आई-वडीलांचे ऋण आपण कधिही फेडू शकत नाही.
आपण आपल्या गुरूजनांचे आजीवन आभारी असले पाहिजे. कारण ते आपले मार्गदर्शक असतात. ते आपल्याला शिक्षणाबरोबर योग्य माणूस बनण्याचे धडेही गिरवतात. त्यासाठी ते आपल्याला कडक शिस्त लावतात. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रज्वलीत केलेला ज्ञानाचा दिवा कायम आपल्याला दिशानिर्देश करत असतो. त्यासोबत आपण आपल्या जिवंत असण्यासाठी आभारी असले पाहिजे. कारण कित्येक जण ह्या क्षणी आपल्या प्राणास मुकले असतील. परंतू आपण अजूनही जिवंत आहोत. ह्याचा अर्थ हा होतो कि आपल्या जगण्याचा हेतु पुर्ण झालेला नाही. ह्या गोष्टीला आपण एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि माणुसकीच्या मार्गाने जीवन व्यापन करत राहिले पाहिजे. जगत असतांना आपले पुढचे आयुष्य आपल्या समोर उजागर होत जाते आणि वेळोवेळी सृष्टीचे मार्गदर्शन आपल्याला मिळत जाते.
जेव्हा आपण स्वत:ला आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांसाठी आभार व्यक्त करण्याची सवय लावतो. तेव्हा आपण आणखी विनम्र होत जातो. आपण ह्या जगात आलो तेव्हा आपले हात रिकामे होते आणि जेव्हा आपण ह्या जगाचा निरोप घेवू तेव्हाही आपले हात रिकामेच असणार आहेत. परंतू जीवन जगत असतांना आपण स्वार्थी होत जातो व हा स्वार्थ आपल्याला अविचारी बनवीतो. तसेच अविचाराने आपण परोपकाराच्या मार्गावर चालू शकत नाही. तेव्हा आपण आपल्या आयुष्यात जे मिळवीले आहे त्याच्या उपयोगाने जनजीवन सुखकर व्हावे हीच आपली इच्छा असली पाहिजे. त्यामुळे मिळविलेल्या धनसंपत्तीचा आपल्याला अहंकार वाटणार नाही. कारण आपण कितीही आपल्या सौंदर्यावर, आपल्या गोऱ्या रंगावर गर्व केला तरी ते आपल्याला सोबत नेता येत नाही. केवळ आपले कर्मच काही काळासाठी इतरांच्या स्मरणात राहतात. तेव्हा आपल्याकडे असलेले ज्ञान, संपत्ती आणि विशेषाधिकार इतरांसाठी हितकारक कसे ठरतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याबरोबर इतरांनीही प्रगती करावी हिच आपली भावना असली पाहिजे.
1. आभार व्यक्त केल्याने आपण आनंदी होतो
जेव्हा आपण ह्या जगात पहिले पाऊल ठेवतो त्याअगोदर पासून आपल्या येण्याची जय्यत तयारी झालेली असते. आपण मोठे होत असतांना आपले आई-वडील तसेच प्रियजनांनी अनेकदा आपल्याला आधार दिलेला असतो. आपले कोड-कौतुक केलेले असतात. आपण आपल्या आयुष्यात केलेल्या उपलब्ध्यांमध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो. त्यांची क्षणोक्षणी लाभलेली साथ आणि आपल्या प्रगतीने त्यांना झालेला निस्वार्थ आणि भरभरून आनंद आपल्यात जोश भरतो. त्यांचे विनाअट प्रेम व अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. जेव्हा आपण त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो तेव्हा आपल्या अंतर्मनात सकारात्मक तरंग उठतात आणि ते आपल्याला आतून आनंदी करतात.
2. आभार व्यक्त केल्याने आपले शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहते.
वेळोवेळी क्षमा मागणे आणि आभार व्यक्त करणे ह्या इतरांशी वागतांन्याचे शिष्टाचार असतात. ज्यामधून आपण स्वत:च्या आणि समोरील व्यक्तीच्या आत्मसन्मानाची पर्वा करत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कोणतेही ताजे फळ किंवा भाज्यांचे सेवन करत असतांना विनम्रतेने आभार व्यक्त करतो. तेव्हा आपल्या मनातील हावरट व खाण्यासाठी उतावीळ झालेले आपले मन शांत होते आणि खाल्लेल्या फळ व भाज्यांमधील जीवनसत्वांचा आपल्याला लाभ मिळतो. तसेच जेव्हा आपण एखाद्या प्राण्याचे मांस सेवन करत असतांना मनोमन प्रार्थना करतो आणि आपले अन्न बनण्यासाठी ज्या प्राण्याने आपले जीवनदान दिले त्याच्याप्रती आभार व्यक्त करतो. तेव्हा आपण निसर्गाप्रती आपले विनम्र भाव प्रदर्शीत करत असतो. त्याचप्रमाणे जेवणावर पुर्ण लक्ष केंद्रीत करून जेवण केल्याने त्यामधील जीवनसत्व आपले पोषण करतात. ज्यामुळे त्याचे आपल्या शारिरीक स्वास्थ्यावर उत्तम परिणाम दिसतात.
3. आभार व्यक्त केल्याने नाते घट्ट होते.
बर्याचदा आपण आपल्या नात्यांना गृहीत धरत असतो. त्यांचे आपल्या आसपास असणे आपल्या सवयीचे झालेले असते. त्यामुळे त्यांना विशेष महत्व देणे आपल्याला गरजेचे वाटत नाही. आपल्या कित्येक चुका आपली माणसे पदरात घालतात. कित्येकदा आपला बचाव करतात. कित्येकदा आपल्यासाठी कमीपणा घेतात. त्यांनी आपल्याला वेळोवेळी सांभाळून घेतल्याने आपण जीवनात यश संपादन करू शकतो. जेव्हा आपण त्यांच्या आपल्यावर रागावण्याच्या मागच्या भावना समजू शकतो तसेच त्यांची आपल्याप्रती असलेली ओढ आपल्याला उमगते. तेव्हा त्यांच्या आपल्या जीवनात असलेल्या स्थानाची जाणीव आपल्याला होते. तसेच जेव्हा आपण आपल्या वर्तनातून किंवा त्यांना समजून घेवून त्यांचे मनापासून आभार मानतो. तेव्हा ते भारावून जातात व नात्याची विण आणखी घट्ट होत जाते.
4. आभार व्यक्त केल्याने आपली संवेदनशीलता वाढते.
जेव्हा आपल्याला खुप तहान लागलेली असते तेव्हा आपल्याला पाण्याचे आणि ते योग्यवेळी उपलब्ध करून देणार्याचे महत्व कळते. तसेच जेव्हा आपण आपल्या घरापासून लांब असतो आणि उपाशी असतो तेव्हा आईच्या हातच्या गरम गरम जेवणाचे महत्व आपल्याला कळते. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या काळात नितांत गरज असतांना अचानक कोणाकडून लाभलेल्या मदतीचे महत्व आपल्याला कळते. अशाप्रकारे आवश्यकतेच्या वेळी मदतीसाठी पुढे आलेल्या हातांचेही आपल्याला महत्व कळते. आणि त्यामुळे आपली संवेदनशीलता वाढत जाते. अशावेळी आपल्या अंतर्मनातून आभार व्यक्त झाले पाहिजे. कारण अशाप्रसंगी कोणा व्यक्तीच्या माध्यमातून देवच धावून आलेला असतो. तसेच जेव्हा इतरांवर अशावेळा येतात त्या क्षणी आपणही त्यांच्या मदतीसाठी तेवढ्याच तातडीने धावून गेले पाहिजे. अशाप्रकारे माणुसकीला जपले पाहिजे.
आभार व्यक्त करणे ही प्रक्रिया औपचारीक व वरवर नसावी. ती मनाच्या खोलीतून असावी. तरच ती समोरच्या व्यक्तीच्या हृदयाशी भिडते. आभार व्यक्त केल्याने आपल्यातील अहंकार कमी होत जातो आणि आपल्याला इतरांच्या भावना कळू लागतात. आभार व्यक्त केल्याने आपल्या अवती भोवती सकारात्मक विचारांचे वलय निर्माण होते. जे आपल्याला सृष्टीच्या उर्जेश जोडणारा दुवा बनते त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे दुसर्या व्यक्तीशी मैत्रीचे नाते निर्माण होते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)