
जेव्हा आपली प्रिय व्यक्ती मृत्युच्या दारात उभी असते. तसेच मृत्युला हुलकावणी देण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडवर संघर्ष करत असते. त्यावेळी विज्ञानानेही हात टेकलेले असतात. पुढे काय होईल ह्याची शाश्वती नसते. अशावेळी सगळे मनोमन त्या व्यक्तीच्या जीवनाच्या सुरक्षेकरीता प्रार्थना करीत असतात. परंतू आपल्या सर्वांच्या त्या प्रार्थनेस व आशिर्वादास मात्र सृष्टीच्या विशाल उर्जेचे पाठबळच प्रभावशाली बनवीत असते. तेव्हाच एखादा चमत्कार झाल्याप्रमाणे ती व्यक्ती मृत्युच्या दाढेतून परत येते. हा अनुभव कित्येकांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवला असेल. आशिर्वादांचे सामर्थ्य इतके प्रचंड असते कि जी गोष्ट पाण्यासारखा पैसा ओतून मिळवता येत नाही ती केवळ त्या सामर्थ्याने मिळवीणे सहज शक्य होते.
आपला असा समज असतो कि आपण आपल्या जीवनात जे कर्म करतो किंवा आपल्या मनात काय चाललेले असते हे कोणासही कळत नाही. परंतू हा आपल्या मनाचा भ्रम असतो. आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेने निर्मीत सीसीटिव्ही कॅमेर्याच्या कायम दृष्टीक्षेपात असतो. त्यामुळे जीवन जगत असतांना आपल्या हातून कळत-नकळत घडणार्या चांगल्या-वाईट कर्मांचा लेखा-जोखा निसर्गाकडे कायम असतो. जेव्हा आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्याक्षणी आपल्या कामातील अखंडता आणि प्रामाणिकपणा ही आपल्या नावाखाली जमा होत जाणारी संपत्ती असते. कारण आपले डोळे कधिही खोटं बोलत नाहीत. मनात चाललेली घालमेल त्यात स्पष्टपणे उमटते. तेव्हा आपण केलेल्या कर्मांच्या परिणामांना आपल्याला आयुष्यात कधि ना कधि सामोरे जावेच लागते. आपण जे काही पेरू पुढे तेच आपल्याला कापावे लागते. ह्यात काहिही द्वीमत नाही. हे शत प्रतिशत सत्य आहे.
आताच्या जगात पैसा व भौतिक संपत्ती ह्यांना अवाजवी महत्व निर्माण झाले आहे. कारण आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. तर आपले जगणे सोपे होते. कारण पैस्याने पाहिजे ते विकत घेता येते. असा सगळ्यांचा समज असतो. किंबहुना ते खरेही आहे. म्हणूनच ज्याच्या कडे जेवढी जास्त जमापुंजी असते त्याची समाजात श्रीमंत म्हणून ख्याती असते. आपल्या गरजेपुरता पैसा आपल्या कडे हा हवाच असतो. परंतू त्यालाच सर्वस्व समजणे हा मात्र केवळ आपला गैरसमज आहे. तेव्हा प्रत्येकासाठी त्याचे कर्म महत्वाचे असले पाहिजे. कारण कर्मांनीच माणसास थोरपण प्राप्त होते आणि तो आशिर्वादास पात्र ठरतो. परंतू आपण जर कोणतीही कृती करतांना त्यामुळे इतरांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करत नसू. आपले बोलणे आपल्या मनातील असभ्यता दर्शवीत असेल. आपल्या स्वार्थापलीकडे आपल्याला कशाचीही व कोणाचीही पर्वा नसेल. तर मात्र आपण पुर्णपणे आपल्या वर्तनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या ह्याच बेपर्वा वागण्यामुळे आपल्याला निसर्गाने जन्मताच बहाल केलेले आशिर्वादांचे कवच आपण आजीवन अबाधित ठेवू शकत नाही. तसेच त्याला उध्वस्त करण्यास आपण स्वत:च जबाबदार असतो.
आपल्याला इतरांकडून पाहिजे असलेला मानसन्मान तसेच आशिर्वाद मागून किंवा ओरबाडून मिळवीता येत नाही. तसेच पैस्याने विकतही घेता येत नाही. तेव्हा आपल्यातील चांगुलपणाने तसेच आपल्या हृदयातील ओलाव्याने ते मिळविण्यास प्रत्येकाने पात्र बनले पाहिजे.अशाप्रकारे ज्याच्यापाशी ही आशिर्वादाची पुंजी जेवढी जास्त तो आणखी आणखी श्रीमंत होत जातो. त्याचप्रमाणे मानसिक समाधानाने व शांततेने समृद्धही होत जातो. आपल्या महान इतिहासात अशी उदाहरणे आहेत. ज्यांनी त्यांच्या भाग्यात अशा श्रीमंतीची भर घातली आणि ते अजरामर झाले.
आपले अस्तित्व ह्या धरतीवर कायम राहत नाही. परंतू जे आपल्या शुद्ध कर्मांनी इतरांच्या आशिर्वादास पात्र ठरत जातात ते अजरामर होतात. तसेच येणार्या पिढ्या त्यांचे गुणगान गात राहतात. जीवन जगण्याची ही पद्धत प्रत्येकाने अंगीकारल्यास कितीतरी जणांचे जगणे सहज आणि सोपे होवू शकते. तेव्हा आपल्या अंतरातील करुणा हीच आपली श्रीमंती आहे. करुणेच्या नजरेने जगाला पाहिले कि आपल्या हातून आपोआपच पुण्यकर्म घडत जातात. तसेच जीवनाच्या अखेरीस आपण आशिर्वादांच्या जमापुंजीचे धनी असतो. त्याचप्रमाणे ह्या जगाचा निरोप घेतांना आपले मन शांत आणि समाधानी असते.
1. आई-वडीलांचे आशिर्वाद
आई-वडीलांचे प्रेम हे अतुलनीय आणि निस्वार्थ असते. त्यांचे प्रेम कोणत्याही अटीवर उभे राहत नाही. आई-वडील आयुष्यभर आपल्या मुलांच्या आनंदासाठी तसेच स्वप्नपुर्तीसाठी रात्रंदिवस झटत असतात. जेव्हा ते आयुष्याच्या तिसर्या टप्प्यात असतात. त्यांना आयुष्यातील रितेपणास सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचे मन खचते आणि त्यांच्या आत्मविश्वासास तडा जातो. अशावेळी त्यांना भक्कम आधाराची गरज भासते. तेव्हा मुलांनी त्यांचा आधार बनले पाहिजे. आणि त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले पाहिजे. तसेच त्यांच्या प्रती असलेली कर्तव्ये अत्यंत प्रेमाने, निष्ठेने आणि आनंदाने पार पाडली पाहिजे. ही कर्तव्ये पार पाडतांना मुलांच्या मनात निरपेक्ष भाव असला पाहिजे. तर कोणताही लोभ किंवा आकस नाही. कारण आई वडील हे देखील मनुष्याच असतात. तेव्हा त्यांनी आयुष्यात केलेल्या चुका ह्या सर्वस्वी त्यांच्या कर्मांचा भाग असतात. म्हणूनच आई-वडीलांच्या इच्छे खातर मुलांनी हाती घेतलेल्या क्षेत्रात उंची गाठावी. मुलांची प्रगती बघून अभिमानाने त्यांची मान उंच होते आणि त्यांच्या मनास समाधान लाभते. आपल्या आयुष्यात आई-वडीलांचे स्थान एकमेव असते. त्यांची सर आणखी कशासही येत नाही. तेव्हा त्यांच्या सेवेचे पुण्य पदरात पाडून घ्यावे. तसेच त्यांच्या आशिर्वादाने आपली झोळी भरून घ्यावी.
2. निसर्गाचे आशिर्वाद
ही सृष्टी, सुर्य, चंद्र तारे हे शाश्वत सत्य आहेत. त्यांना कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या असण्याबद्दल आपल्या मनात कधिही शंका येत नाही. निसर्गाने मुबलक जीवनदायी संसाधनांचा वर्षाव पृथ्वीवरील जीवसृष्टीवर केला आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांसाठी त्यांची आपल्या मागे गैरसोय होवू नये म्हणून सर्व प्रकारच्या सुखसुविधांची तयारी करून ठेवतो. त्याचप्रमाणे सृष्टीनेही पृथ्वीवरील जीवनाप्रती एका कर्तव्यदक्ष पित्याची भुमिका निभावली आहे. तेव्हा आपण पाणी, ऑक्सिजन, हवा ह्या नैसर्गीक संसाधनांचा योग्य वापर करावा. त्यासाठी विनाशकारी रसायनांना आपल्या जीवनातून हद्दपार करावे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. जमीनीत पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी पावसाचे पाणि जमिनीत मुरण्याची सोय करावी. रासायनिक खतांऐवजी नैसर्गीक खतांचा वापर करून शेती करावी. प्लॅस्टिकच्या वापरावर बंधन आणावे. अशाप्रकारे अनेक गोष्टी ठरवून व कर्तव्यदक्षतेने आपण केल्यास निसर्गाप्रती आपले देणे चुकवीता येवू शकते. तसेच आपण निसर्गाच्या आशिर्वादास पात्र ठरू.
3. प्राणिमात्रांचे आशिर्वाद
वन्यप्राण्यांसाठी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सरकारी कायदा असल्यामुळे ते त्यांच्या जगात सुरक्षीतपणे विहार करत असतात. परंतू जे शहरांमध्ये बेवारसपणे वावरणारे प्राणि ज्यात मुख्यत्वे करून कुत्रा, गायी आसतात. त्यांचे रस्त्यावर राहणे, कचर्याच्या ढिगार्यावरून मिळेल ते खाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. कित्येक प्राणि भरधाव वेगाने येणार्या वाहनांच्या धडकेने मृत्युमूखी पडतात. तसेच कित्येक प्राणि रोगग्रस्त असतात. आपण त्यांची अवस्था बघून दुर्लक्ष करून निघून जातो. किंवा केवळ बघ्याची भुमिका घेतो. परंतू आपण हे लक्षात ठेवले पाहिजे कि त्यांनाही शारिरीक वेदना होतात. परंतू ते त्यांच्या वेदना आपल्यासारखे बोलून दाखवू शकत नाहीत. अशा बेवारस प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी प्राणि शेल्टर्स असतात. परंतू तिही आर्थिक दृष्टीकोणातून कमजोर असल्यामुळे तेथेही प्राण्यांची गैरसोय होते. कारण तिथेही त्या मुक्या जीवांना उपाशी रहावे लागते. पैस्या अभावी त्यांच्यावर योग्य उपचार होवू शकत नाहीत. अशावेळी प्रत्येक माणसाने आपले व्यक्तीगत कर्तव्य समजून प्राणि शेल्टर्सना आर्थिक योगदान दिल्यास प्राण्यांना सुदृढ जीवन जगता येवू शकते. ते निष्पाप जीव तृप्त व समाधानी असले तरच त्यांचे आशिर्वाद आपल्या सभोवताल आहेत.
4. गुरूजनांचे आशिर्वाद
आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान फार मोलाचे असते. आईलाही आपल्या जीवनात गुरूचे स्थान देण्यात आले आहे. कारण आई मुलांवर मुळ व महत्वाचे संस्कार करते. ते देखील मुलांच्या नकळत्या व संस्कारक्षम वयापासून. आईने केलेल्या संस्कारातून ते मुल पुढे कसा माणूस बनेल हे ठरते. अशाप्रकारे आईच्या हातात एकप्रकारे समाज घडविण्याचे सुत्र असतात. म्हणून आईला गुरू मानल्या जाते. त्यानंतर शैक्षणीक जीवनात लाभलेले गुरूजन असतात. ज्यांचे आपल्याला घडविण्यात खुप मोठे श्रेय असते. गुरू विद्द्यादानाचे श्रेष्ठ कार्यही करतात. त्याचबरोबर आपल्या विद्द्यार्थ्यास माणुसकीचे धडेही देतात. समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचे कामही गुरूच करतात. म्हणून गुरूजनांचा नेहमी आदर करावा. जीवनात नेहमी त्यांनी दाखविलेला मार्ग अवलंबावा. आईनंतर गुरूजनच असे असतात जे कधि प्रेमाने तर कधि छडीचा धाक दाखवून आपल्याला योग्य मार्गाला लावतात. आपण आजन्म गुरूंच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी विनम्र आणि नतमस्तक असले पाहिजे. तसेच त्यांच्या आशिर्वादांनी आपले जीवन सार्थक केले पाहिजे.
आशिर्वाद ही प्रत्येकाची व्यक्तीगत संपत्ती असते.जीसेवाभावातून, निस्वार्थभावातून, आपल्या अंतरातील करूणेतून, दीन-दु:खीतांच्या हृदयाला स्पर्श करून आपल्या नावाखाली जमा होत जाते. जी कष्टाने कमवावी लागते. आशिर्वादांचे आपल्या सभोवताल सुरक्षा कवच असते. हे सुरक्षा कवच ज्याला लाभले त्याच्या इतका श्रीमंत कोणीही नसतो. कारण आपल्यावर येणार्या कोणत्याही संकटास परत फिरवीण्याची ताकद त्या कवचात असते. त्याचप्रमाणे आशिर्वादांच्या रूपात एक अज्ञात शक्ती आपल्या पाठिशी कायम असते. जी आपला बचाव करते आणि आपले मार्गदर्शनही करते. परंतू जेव्हा अमानवीय वृत्ती स्वार्थ असभ्यता ह्या गोष्टी आपल्या मनावर साम्राज्य करू लागतात. तेव्हा मात्र हे सुरक्षा कवच छिन्न विच्छिन्न होते. तसेच आपले दुष्कर्मच एकेदिवशी आपल्या विनाशाचे कारण बनतात.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)