इच्छा तिथे मार्ग

जीवनाच्या विवीध रंगी छटा विलोभनीय असतात. तसेच आपल्या मनाला भुरळ पाडणार्‍या व गुंतवून ठेवणार्‍या असतात. कौटूंबिक सुखाची उबदार चादर ओढून भविष्याची सुखस्वप्न बघत आयुष्याची कल्पना करूनही परमानंद प्राप्त होतो. आपल्या कल्पनेतील आयुष्यात केवळ सुखच असते दु:खाची छायाही आपण त्यावर पडू देत नाही. ज्या कुटूंबात तसेच ज्या परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याचा मनापासून स्विकार करतो. त्याचप्रमाणे त्यामधूनच उठून काहितरी उत्तम करण्याची आपली इच्छाही असते. इच्छा तिथे तसे सुसंगत मार्गही आपण निवडत जातो. त्या दृष्टीकोनातून शिक्षण घेतो त्याचबरोबर आपल्या अंतर्गत कलाकौशल्यांना आणखी उजळवतो. प्रगतीपथावर येणार्‍या लहान सहान अडथळ्यांना धैर्याने तोंड देत काळाबरोबर आपले मार्गक्रमण सुरू असते. तसेच त्यात आपण आनंदी व समाधानी असतो.

   आयुष्यात अडचणींना पार करत तरिही न थांबता चालत रहावेच लागते. कारण थांबणे हा अडचणींवरचा उपाय नसतो. क्रियाशील राहण्यानेच मार्ग आपोआप मोकळे होत जातात. तसेच प्रश्नांची उत्तरेही सापडत जातात. कारण अडचणीच असतात ज्या आपल्यातील मिळमीळीतपणा काढून आपल्या खंबीर व कणखर स्वरूपास आपल्यातूनच बाहेर काढण्यास मदत करत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या समस्या मात्र निरनिराळ्या असतात. कोणाच्या शिक्षणावर बंदी आणण्यात आलेली असते. कोणास ती मुलगी असल्यामुळे संघर्षाची परिसीमा गाठावी लागते. कोणास सासरकडील छळाला सामोरे जावे लागते. कोणाच्या अस्तित्वावरच प्रश्न उठवीले जातात. तर कोणि तृतीयपंथी आहे म्हणून त्यास समाजाकडून होणार्‍या छळाचा शिकार व्हावे लागते. परंतू कोणतिही सकारात्मक प्रवृत्तीची व्यक्ती अशा सर्व समस्यांना जीवनातील एक आव्हान समजून प्रतिसाद देत असते. तसेच नेटाने त्यांचा सामना करत आयुष्यात ठरवीलेले ध्येय गाठण्यात यशस्वी होते. कारण जी गोष्ट समाजनिर्मीत साच्यात बसत नाही. तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करणे म्हणजे जळत्या निखार्‍यांवर चालण्यासारखे असते. ज्यात पोळलेल्या तळव्यांची तमा न बाळगता धिराने ठरवीलेले ठिकाण गाठायचे असते.

   परंतू कधिकधी आयुष्यात एखादे असे धोक्याचे वळण येते. ज्याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नसते. ज्यामुळे आपल्या आयुष्याचा नकारात्मकपणे कायापालट होतो. जो एखाद्या जीवघेण्या अपघाताच्या स्वरूपात असू शकतो. ज्यात आपल्याला आपल्या शरिराचा अवयव गमवीण्याची वेळ आली. किंवा एखादे आजारपण असेल ज्यामुळे शरीर लूळेपांगळे झाले. ज्यांच्या जीवनावर अशाप्रकारच्या अतीव दु:खाची सावली पडते. त्यांच्यासाठी नेमका तो काळ आणि त्यानंतरचा बराच मोठा कालावधी असा असतो कि त्याचे शब्दात वर्णन होणे कठीण असते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आपल्याला मोठा धीर एकवटावा लागतो. असे वाटते कि त्या व्यक्तीच्या संयम व हिंमतीची कठोर परीक्षा पाहण्यासाठी नियतीने त्याच्याशी ही क्रुर खेळी केली आहे. त्याक्षणी त्या व्यक्तीस त्याने जे काही गमावले आहे. त्याची पुन्हा भरपाई होणे शक्य नाही असे ठामपणे वाटू लागते. सर्वकाही संपले, सर्व मार्ग बंद पडले मग आपण जिवंत तरी का आहोत. हे मोठे प्रश्नचिन्ह त्याच्या आघाताने दुबळ्या झालेल्या मनाला पडते. त्याच्या विचारात नकारात्मकता आलेली असते. किंबहुना विचार पुढे सरकतच नाहीत त्यांना टाळं लागलेलं असते. त्यावेळी त्या व्यक्तीच्या भावना इतक्या सक्रीय झालेल्या असतात कि त्या दुर्घटने पलिकडच्या जगण्याची त्याला कल्पनाही करवत नाही. काळाचे चक्र पुन्हा मागे फिरावे आणि सर्वकाही जसेच्या तसे सुरळीत व्हावे. हा त्याच्या मनाचा हट्ट असतो. परंतू ते शक्य जरी नसले तरी काळासारखे दुसरे कोणी सांत्वन करणारे तसेच जे आहे त्याचा स्विकार करून पुन्हा जगण्याची उभारी देणारे आणखी कोणिही नसते.

   आयुष्याचा बराच मोठा उमेदीचा काळ त्यात खर्ची पडलेला असतो. जेव्हा भावना शांत होवून विचारांना हळूहळू जाग येवू लागते. तेव्हा विस्कटलेले जीवन त्याच्या समोर असते. परंतू जीवन कधिही कोणालाही हार मानू देत नाही. ती व्यक्ती जगण्याच्या दिशेने झेपावते. तसेच खडतर मार्गावरून चालण्याची हिंमत आपल्या अंतर्मनात एकवटू लागते. खडतर मार्गाशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण जीवन मोठ मोठी आव्हाने घेवून त्याला आपल्याकडे येण्यास खुणावत असते. अशावेळी केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच तो प्रत्येक आव्हानास धाडसाने तोंड देत असतो. दरवेळी आणखी जास्त ताकदीनीशी व तयारीनीशी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने पाऊल उचललेले असते. त्याक्षणी  सर्व संकटांवर मात करून अजिंक्य ठरलेल्या त्या शुरविरास विजयश्री अर्पण करण्यासाठी काळही पुढे सरसावलेला असतो.

   जेव्हा आयुष्यात अशा दुर्दैवी घटनेमुळे काळोखाचे साम्राज्य पसरते. तेव्हा एक पाउलही पुढे टाकणे आपल्यासाठी कठिण झालेले असते. आपण हतबल होवून अंधारात चाचपडत असतो. परंतू अशा परिस्थितीतून स्वत:ला सहीसलामत बाहेर काढण्याची क्षमता फक्त आपल्यातच असते. अशावेळी स्वत:ला एकच प्रश्न विचारला पाहिजे कि जर आपण असेच खितपत पडून राहिलो तर जगाचे काय नुकसान होणार आहे? तसेच आपल्यासाठी जगाचे रहाटगाडगेही थांबणार नाही. काळ वेगाने पुढे सरसावत राहिल आणि काळाबरोबर सगळे समोर निघून जातील. जर आज आपण स्वत:ला क्रियाशील केले नाही. तर दुसरे कोणिही हे काम आपल्यासाठी करणार नाही. काळोखात चालतांना आपण कित्येकदा पडणार, ठेचाळणार हे निश्चीत. परंतू मनात पडण्याची भिती बाळगून काही हालचालच केली नाहीतर तर आपले अस्तित्व संपवून टाकण्यास आपणच जबाबदार असू. त्याचप्रमाणे आपल्यावर अशी वेळ येण्यामागेही नक्कीच सृष्टीची अद्भूत योजना असावी. अशाप्रकारे आयुष्यातील वर्तमान स्थितीला सृष्टीच्या उच्च स्तरीय हेतूने बघत. आपण स्वत:ला सर्वतोपरी परीपुर्ण करण्याचा ध्यास घेणार्‍या शक्तीशाली विचारांच्या सहाय्याने परिस्थितीवर मात करू शकतो.

   त्याचप्रमाणे ज्या मुली व स्त्रिया त्यांच्या चेहर्‍यावर अ‍ॅसीड फेकल्या गेल्याच्या अतिशय निर्दयी व माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेस बळी पडतात. त्या मुलींच्या आयुष्यात अतिशय तीव्रतेने बदल येतात. ज्याला क्षणात होत्याचे नव्हते होणे असे म्हणतात. ज्यात त्यांच्या शरिराचा अत्यंत महत्वाचा भाग जो आपली ओळख पटवून देतो. त्यालाच पुर्णपणे विद्रूप करण्याचा दुष्कर्म्यांचा प्रयत्न असतो. सुंदर चेहर्‍यामुळे त्या मुलीत जो आत्मविश्वास असतो. त्यास हाणून पाडण्याचा त्या सुडाने पेटलेल्या विकृत विचारसरणीच्या माणसांचा राक्षशी मनसुबा असतो. अशा हृदयाला पिळवटून टाकणार्‍या घटनांनी मुलींच्या मनाला झालेल्या खोल जखमा आजीवन भरून निघत नाहीत. औषधोपचारांनी काळान्वये जखमा बर्‍याही होतात परंतू त्यामुळे विद्रूप झालेल्या चेहर्‍यानिशी त्यांना पुढचे आयुष्य जगणे अतिशय संघर्षाचे असते. त्या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला इतके नकारात्मक वळण लागते कि त्या मुलींची जगण्याची इच्छाच संपते. परंतू जीवनाचा इतक्या सहजतेने त्याग करणे त्यांच्यातील कणखरतेस पटण्यासारखे नसते. अशावेळी त्या मुली जीवलग माणसांच्या आधाराने तसेच आत्मप्रेम जागृत करून व हृदयात करुणा आणून स्वत:चा स्विकार करतात. कारण एक घाणेरडे पाऊल उचलून चेहर्‍याचे सौंदर्य कोणिही सहज संपवू शकतो. परंतू मनाची निर्मळता हीच मुलींची खरी ओळख असते. आणि ती त्यांच्यापासून कोणिही हिरावून घेवू शकत नाही. असंख्य मुली विद्रूप झालेल्या चेहर्‍यावर हृदयातील पावित्र्याने विजय मिळवीतात. तसेच आत्मविश्वासाने जीवन जगतात. एक गलिच्छ उद्देश ठेवून ज्याने हे भेकड कृत्य केलेले असते. त्याच्या त्या उद्देशाला ह्या रणरागिनी यशस्वी होवू देत नाहीत. त्यांची इच्छाशक्ती पुन्हा त्यांना यशाच्या मार्गावर  घेवून जाते. म्हणूनच मुलींच्या ह्या अतुलनीय निर्धारास सलाम आहे.

  जीवनात अनपेक्षीतपणे येणारी संकटे जीवनाला थोपवू शकत नाहीत. कारण जगण्याची इच्छा ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रबळ असते. तसेच त्या इच्छेखातर आपल्याद्वारे मार्गही शोधले जातात. इच्छा ही आपल्याला सकारात्मक मार्गावर घेवून जाते. आपल्याकडे काय नाही त्यापेक्षा काय आहे त्यावर लक्षकेंद्रीत करण्यास लावते. आपल्यात आत्मप्रेम जागृत करते. आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याचे बळ देते. कणखरपणे परिस्थितीशी लढा देणे शिकवते. तसेच राखेतून उठून झेप घेण्याचे सामर्थ्य देते.

1. इच्छा आपल्याला सद्द्यपरिस्थितीचा स्विकार करण्याचे सामर्थ्य देते.

  जीवनात प्रगती करण्याची व पुढे जाण्याची प्रबळ इच्छा असेल तर वर्तमानस्थितीत आपण कोठे उभे आहोत. ह्याचा प्रामाणिकपणे स्विकार करणे हे त्या मार्गावरील अत्यंत महत्वाचे पाऊल असते. जेव्हा आपण दुर्दैवी घटनेचे शिकार होतो. तेव्हा सर्वकाही पूर्ववत करण्याच्या तीव्र इच्छेमुळेच आपण पुन्हा उभे राहतो. कारण खितपत पडून राहणे आपल्या स्वभावाचा गुणधर्म नसतो. अशावेळी परिस्थिती जेवढी बिकट असते. तेवढेच किंबहुना त्याहून जास्त बळ आपल्यात संचारते. बर्‍याचदा ह्या कठिण वेळाच आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव करून देतात. कारण जेव्हा आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू असते. तेव्हा आपण त्या सुखाशी संलग्न झालेलो असतो. कारण आपल्याला कायम आपल्या जीवनात ते सुख हवेहवेशे वाटते. परंतू संघर्षाशिवाय जीवन क्रियाशील राहत नाही. कारण  त्यामुळेच आपल्या त्यापुढे निघून जाण्याच्या इच्छा आणखी तीव्र होत जातात. म्हणूनच आता ह्याक्षणी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे संघर्ष करावा लागतोय. ह्याची स्पष्टता असणे अनिवार्य असते. तरच त्या गोष्टीची कमतरता भरून काढण्यासाठी आपण तत्परतेने योजना आखतो. तसेच जोपर्यंत ती गोष्ट आपण मिळवत नाही तोपर्यंत नेटाने व कर्तव्यदक्षतेने काम करत राहतो.

2. इच्छा आत्मप्रेम जागृत करतात व अंतर्मनात डोकावणे शिकवीतात

   आपल्याला जीवनात जर भरभरून सुख प्राप्त झालेले असेल. तसेच जर आपण सौंदर्याचे किंवा बुद्धीमत्तेचे धनी असलो. तेव्हा आपल्यात पराकोटीचा आत्मविश्वास असतो. तर कधिकधी त्याचा आपल्याला नकारात्मकरीत्या अभिमानही होतो. अशावेळी आपण त्या गुर्मीत  व मौजमस्ती करत आयुष्य जगत असतो. परंतू जेव्हा  जीवनात आपल्यावर अनपेक्षीत संकटाचा सामना करण्याची वेळ येते. तेव्हा मात्र आपण आयुष्याप्रती जास्त गंभीर होतो. आत्मप्रेम जे आपोआपच आपल्या जगण्याचा भाग होते. तसेच ते अगदी अलगदपणे व आपल्याही नकळतपणे व्यक्त होत होते. आता मात्र ते अत्यंत जागृकतेने स्वत:वर केले जाते. कारण आयुष्यात पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे ह्या कठिण क्षणाची ती नितांत गरज असते.  आत्मप्रेमामुळे  स्वत:चा स्विकार करणे आपल्याला सोपे जाते. आपल्या अंतर्मनाचा गाभारा जो प्रेम करुणा दया सेवा ह्या दैवी संपत्तीने व्यापलेला असतो. त्याची अनुभूती अशाच कठोर प्रसंगांनंतर आपल्याला जास्त तीव्रतेने होते. आणि आपण इतरांचेही दु:ख त्याच्या जागेवर राहून समजून घेण्यास समर्थ होतो. त्याचप्रमाणे त्यांना मानसिक व भावनिक आधार देवून त्याला जगण्याची उमेद देवू शकतो.

3. इच्छा आपल्याकडून कठिण तयारी करून घेतात.

   अरुनिमा सिन्हा जी एक खेळाडू आहे. जेव्हा तिला चालत्या ट्रेनमधून काही गुंडांनी फेकून दिले होते. ज्यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले. परंतू तरिही ती जिवंत राहिली. तेवढ्या जीवावरच्या प्रसंगातून आपला जीव वाचणे म्हणजे त्यामागचा सृष्टीचा दृष्टांत तिला कळला. शरिरास आलेल्या अपंगत्वाला  मनाचे अपंगत्व न होवू देता तिने एव्हरेस्ट चढण्याची योजना आखली. तसेच एव्हरेस्ट सर देखील करून दाखवीले. हे तिच्यासाठी आपल्याला वाटते तितके सोपे नव्हते.  जेव्हा तिने तिच्या अपंगत्वाला पुर्णपणे स्विकारून तरिही जगासमोर स्वत:ला सिद्ध करण्याच्या धाडसी दृष्टीकोनातून एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हाच खर्‍या अर्थाने तिने तो सर केला होता. कारण जेव्हा कोणत्याही मनुष्याच्या  मानसिकतेस अपंगत्व येते. तेव्हा एखादा धडधाकट मनुष्यही अपंग ठरतो. तेव्हा आयुष्यात काही मिळवीण्याची तीव्र इच्छाच आपल्याकडून कठोरातली कठोर तयारी करून घेवू शकते.

4. इच्छा आपल्या जीवनाचा कायापालट करते

  आपल्या आयुष्यात एखादा होत्याचे नव्हते करणारा प्रसंग घडतो. आणि तेथून आपल्या खडतर प्रवासाची सुरवात होते. जर ह्या प्रवासाला आपण ध्येयाकडे घेवून जाणारी दिशा मानले तर त्यात आपण मानसिकरीत्या थकत नाही. कारण प्रवास खडतर असला तरी तो पुर्ण केल्यानंतर आपले आत्मविश्वासाने भरपूर असे व्यक्तीमत्व आपल्या समोर उभे राहते. आपल्या मनात जागृत झालेल्या तीव्र इच्छांना प्रत्यक्ष्यरूप देण्यासाठी आपण प्राणांची बाजी लावतो. अशावेळी आपण प्रतिकूल परिस्थिती, अपंगत्व किंवा आणखी काहींचे बहाणे करत नाही. त्याउलट सर्व प्रतिकूल गोष्टींना आव्हान करून निडरपणे आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो. कारण कोणत्याही अघटीत घटनांनी आपण आतून तूटून न जाता. त्या परिस्थितीला आपण स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा मिळालेली संधी म्हणून पाहिले तर त्यांच्यामुळे आपल्या जीवनाचा कायापालट होतो.

   आयुष्यात संकटे येतील, अघटीत घटना घडतील, जीवावर बेतणारे प्रसंग येतील परंतू त्यांनी जर आपले जीवन हिरावले नाही. तर मात्र आपल्या जीवनाचा हेतू अजून पुर्ण होणे बाकी आहे असे समजावे. तसेच दानात मिळालेल्या ह्या जीवनासाठी सृष्टीची काहीतरी नक्कीच अनोखी योजना असावी हे निश्चीत करून चालावे. आपले अंतर्मन अशाप्रसंगी आपले मार्गदर्शन करते. त्यालाच आपली इच्छा समजले तर इच्छा तिथे मार्गही उलगडू लागतील. तसेच आपण आपल्या जीवनात अशी उंची गाठू जी जगाला दिपवून टाकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *