इनोव्हेटीव्ह मॉम

आयुष्यभर एका प्रामाणिक गृहिणीचे कर्तव्य निभावणारी ‘आई’ जी रोज सकाळी न चुकता सर्वांच्या अगोदर उठते. घरातील प्रत्येकाचे वेळापत्रक तिला तोंडपाठ असते. प्रत्येकास वेळेत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता यावे ह्यासाठी तिची  दररोज सकाळी केविलवाणी धडपड चाललेली असते. आईच्या भरवशावर सगळेजण मात्र बिनधास्त असतात. तसेच प्रत्येकाची आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी घाई सुरू असते. सर्वांच्या आंघोळी आटोपतात आणि बादली कपड्यांनी जड होत जाते. नास्ता व डबा बनवीतांना भांड्यांच्या राशी लागतात. वेळेवर कोणाचे कपडे किंवा वस्तू सापडत नसतील तर शोधाशोधी च्या नादात संपुर्ण घर डोक्यावर घेतले जाते. त्यामुळे सकाळी घराची अवस्था भुकंप आल्याप्रमाणे अस्ताव्यस्त झालेली असते. कारण वस्तू त्यांच्या जागेवरून हललेल्या असतात.

   अखेरीस आपाआपल्या वेळेनुसार सगळे घराबाहेर पडतात. घरात शांतता पसरते. त्यानंतर घरात उरतात  फक्त आई आणि तिची भरमसाठ कामे. कामांच्या नादात तिने  काही खाल्ले असेल कि नाही ह्याची धावपळीत घरातून निघतांना कोणी दखलही घेतलेली नसते. तिला बरे वाटत नसल्यास किंवा काही दुखत-खुपत असल्यास कोणी काळजी करू नये म्हणून तिने कोणास कळूही दिलेले नसते. कारण दुखणे अंगावर काढण्याची तिला सवयच झालेली असते. सगळेजण गेल्यानंतर ती तिच्या दिनचर्येप्रमाणे घरातील कामे आटोपते. तसेच अत्यंत निस्वार्थभावाने नेहमीप्रमाणे घर पुन्हा एकदा निट लावते. त्यात तिने स्वत:साठी किती वेळ दिला हे तिलाही ठाऊक नसते. आईची ही दिनचर्या बर्‍याच काळापासून अशीच निरंतर सुरू असते. आईची त्या संबंधीत काही तक्रार सुद्धा नसते.. त्याउलट तिच्या चेहर्‍यावर आणि हृदयात समाधानच असते. कारण तिला ह्या गोष्टीचा आनंद असतो कि तिने भक्कमपणे आपल्या खांद्यावर घराच्या जबाबदार्‍या पेलल्या मुळे घरच्यांना असुवीधा होत नाही. ते वेळेत आपल्या कामावर जावू शकतात. तसेच आपआपल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. आपण मात्र आईच्या आपल्यासाठी चोवीस तास सहज उपलब्ध असण्याला गृहीत धरत जातो. परंतू आईने आपल्यासाठी केलेला हा त्याग तिच्यासाठी एक क्षुल्लक गोष्ट असते. तिला तो फार महत्वाचा वाटत नाही. म्हणूनच आईच्या निस्वार्थप्रेमाची  कशासीही तुलना होवू शकत नाही.

  आईच्या प्रामाणिकपणाला गालबोट तेव्हा लागते जेव्हा तिच्या त्या घरकामांना कमी महत्वाचे समजल्या जाते. तसेच तिच्या त्या समर्पकपणाची प्रशंषा होत नाही. तसेच ह्या कामांना एखादी मोलकरीण लावूनही करता येवू शकते असे आपल्याला वाटू लागते. कारण आपण अशाच कामांची किंमत करतो ज्यामधून घरात मिळकत येते. अशाप्रकारे घरकामांचे आणि त्यांना करणार्‍या आई सारख्या अनेक स्त्रियांचे समाजात महत्व कमी होवू लागले. मुले जसजसी मोठी होत जातात. ती सर्वदृष्टीकोनातून स्वावलंबी होत जातात. त्यांचे आईवर विसंबून राहणे हळूहळू कमी होत जाते. अशावेळी गृहिणी असणार्‍या स्त्रियांना कामावर जाणार्‍या स्त्रियांच्या तुलनेत कमीपणा वाटू लागतो. कारण घरातील कामे आटोपल्यावर रिकाम्या वेळेत काय करावे हे त्यांना सुचेनासे होते.

   अशाप्रकारे एकेदिवशी रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम बनवीण्याचे विचार स्वाभिमानी आईच्या मनाला शिवून जातात. तसेच त्या दृष्टीकोनातून तिची  कल्पनाशक्ती झेप घेवू लागते. ह्याचा अर्थ हा होत नाही कि घरकामे तिला नकोशी झाली असतात. परंतू जे आजवर करता आले नाही आणि जे केल्याने  तिच्या आत्मविश्वासात भर पडेल आणि तिच्या पंखांना भरारी घेण्याचे बळ  येईल. असे काही करण्याची इच्छा आईच्या मनात जागृत होते. त्यामधूनच एका नाविन्यपुर्ण आईचा जन्म होतो. ज्याची कधी कोणी कल्पनाही केलेली नव्हती.  

1. आईचे नावीन्यपुर्णरूप मुलांना प्रेरणा देणारे असते.

   जे आई-वडील महत्वाकांक्षी असतात. आणी जीवनात यशस्वी होत जातात. ते त्यांच्या मुलांसाठी प्रेरणास्थान असतात. त्यातल्या त्यात खासकरून आईने स्वत:साठी उचललेले पाऊल मुलांसाठी एक धडा असतो. कारण मुलांच्या मनात आईसाठी विशेष स्थान असते. तसेच सगळ्यात जास्त विश्वास देखील असतो. जेव्हा ती एक गृहिणी असते. ते ही मुलांना आवडणारेच असते. परंतू जेव्हा ती स्वाभिमानाने जगण्याचा निर्णय घेते तेव्हा मुलांना खुप आनंद होतो. त्यामुळे मुलांचे पाठबळ आईच्या निर्णयाला लाभते. कारण त्यांच्या नजरेत आईचे स्थान आणखी उंच होते. तसेच आईचे नावीन्यपुर्णरूप मुलांसाठी प्रेरणादायी ठरते.

2. मुले महत्वाकांक्षी होतात.

   आईने आजवर तिच्यातील ज्या गुणांची कधी वाच्यताही केलेली नसते. परंतू आता तिचा स्वाभिमानाने जगण्याचा निर्णय मुलांना अचंभीत करणारा असतो. बर्‍याचदा आपला असा समज होतो कि आईला आणखी काही करणे जमत नाही म्हणून ती घरातील कामे करते. परंतू त्यामागचे खरे कारण हे असते कि आई तिच्यातील आईपणाला नेहमी सर्वात उंच ठेवते. त्यापुढे इतर कशासही महत्वाचे समजत नाही. कारण मुलांपुढे आईसाठी सर्वकाही अर्थशुन्य असते. त्यांच्यासाठी ती तिच्यातील सर्व कलागुणांवर  पाणि ओतण्यास तयार असते. परंतू जेव्हा ती सर्व विचारांती निर्णय  घेते. तसेच काही उत्पादनक्षम करण्याचे ठरवीते. तेव्हा तिचा आत्मविश्वास द्वीगुणीत होतो. आईचे हे नाविन्यपुर्णरूप मुलांच्या मनात त्यांच्या जीवनाविषयी महत्वाकांक्षा जागवीणारे असते.

3. घराला आईचे महत्व कळते.

  आपण लहान असल्यापासून हे बघत आलेलो असतो कि आई गृहिणीचे पद अगदी प्रामाणीकपणे सांभाळत आलेली असते. घरातील प्रत्येकाचे हवे नको ते बघते. आईचा विनम्रभाव आपल्याला तिचा कमकुवतपणा वाटतो. कारण ती प्रत्येकाच्या कामात मदत करते. प्रत्येकाचे म्हणणे ऐकुण घेते. आणि गरज पडल्यास स्वत:कडे कमीपणा घेते. परंतू आईचे नाविन्यपुर्ण रूप याहून निराळे असते. तिने तिच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी जो निर्णय घेतलेला असतो. त्या दिशेने तिची पावले झेप घेतात. त्याच्याशी निगडीत माहीती गोळा करण्यासाठी ती एकाग्र होते. आणि तिचा रिकामावेळ त्याविषयीचे नियोजन करण्यासाठी खर्ची घालते.  अशावेळी आपण त्या आईला हरवून बसतो. जी सतत आपल्या मागेपुढे करत असे. जिचे जग फक्त आपल्यापुरते सिमीत होते. आणि जिला आपण आजवर गृहित धरत होतो. तिचे महत्व आपल्याला कळू लागते.

4. आत्मविश्वासाने भरपूर आई बघावयास मिळते.

   नाविन्यपुर्णरूप आईमध्ये सकारात्मक बदल घडवून  आणते. आपल्या कामांना प्रामाणिकपणे करूनही जो आत्मविश्वास तिच्यात दिसत नव्हता. आज तिच्या व्यक्तीमत्वात त्याची भर पडलेली असते. घरच्यांनी तिच्याकडे आणि तिच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा तिच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झालेला असतो. परंतू तरीही तिच्यातील सेवाभाव कधिही हार मानत नाही. आणि ती स्वत:च्या व्यक्तीगत जगाला दुय्यम स्थान देवून निस्वार्थपणे रात्रंदिवस आपल्यासाठी झटत असते. परंतू जेव्हा ती स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रवृत्त होते तिचा आत्मसन्मान उंची गाठतो. तसेच तिच्या प्रत्येक कृतीतून आत्मविश्वासाची झलक दिसते.

   आईचे नाविन्यपुर्णरूप तिच्या साधेपणात आत्मविश्वास भरते. तिला शिस्तप्रिय बनवीते. आणि आपण तिच्याशी कसेही वागावे ह्यापासून आपल्याला थांबवीते. आईच्या जीवनातील हा सकारात्मक बदल आपल्याला प्रभावीत करतो. प्रत्येक आईला ह्या नाविन्यपुर्णरूपाच्या अनेक शुभेच्छा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *