उत्कृष्ट नेतृत्व

नेतृत्व करणे  म्हणजे खूप मोठ-मोठ्या उलाढाली करणे  असा  अर्थ  होत  नाही. किंवा खूप मोठ्या समूहाचेच नेतृत्व करणे असाही शब्दश: अर्थ होत नाही. नेतृत्व करणारा एक कुटूंब प्रमुख असू शकतो. किंवा एक आईसुद्धा असू  शकते. अट  फक्त एकच  असते  कि  नेतृत्व करणार्‍याला त्याचा व्यक्तिगत स्वार्थापलिकडे बघता आले पाहिजे. त्याचे  प्रत्येक पाउल स्वत:मध्ये सर्वतोपरी सुधारणा आणत राहण्याच्या  दिशेने पडले पाहिजे  तसेच त्याचा प्रगती करण्यामागचा हेतु एकच  असावा तो म्हणजे स्वत:बरोबर इतरांनाही  व आपल्यावर अवलंबून असलेल्यांनाही प्रगतीच्या  दिशेने घेवून जाणे.

              एक कुटूंब प्रमुख  नेतृत्व  करतो  तेव्हा  त्याच्यावर त्याच्या कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी असते. ह्यात कुटूंबाच्या सुरक्षेची, त्यांच्या गरजा पुर्तीची तसेच भावनीक अशा अनेक गोष्टी येतात. त्यामुळे कुटूंबप्रमुखात विनम्रता हा मुख्य गुण असला पाहिजे. जेव्हा तो कुटूंबाच्या प्रति आपल्या जबाबदार्‍या  निभावतो  तेव्हा त्याने कुटूंबातील  सदस्यांना आपल्या डोक्यावरची ओझी असल्यासारखे भासवू नये. कर्तव्यपूर्ती करतांना दयाभावा सोबतच विनाअट प्रेम आपल्या माणसांप्रती त्याच्या मनात असावे. त्याच्या उपस्थितीत घरात दडपण किंवा दबाव नसावा.  त्याऐवजी स्वतंत्र विचारांचे वातावरण असले पाहिजे ह्याची त्याने काळजी घ्यावी. आपण कुटूंबाप्रती आपली कर्तव्ये निभावली आणि आपले कुटूंबीय आपल्यामुळे आनंदी आहे ह्याची खात्री केल्याशिवाय कुटूंबप्रमुखाने आपल्या व्यक्तिगत स्वार्थाबद्दल विचारही करू नये. कोणताही मोठा निर्णय घेतांना त्याने घरातील  सर्वांच्या मनाचा व विचारांचाही आदर करावा. आपले मत इतरांवर लादू नये. घरातील लोकांच्या समस्या आणि विचार नम्रपणे तसेच मनापासून ऐकूण घ्यावे. आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ताबडतोब पावले उचलावी. कुटूंबाच्या गरजांची पुर्तता करावी. त्यात कोणत्याही प्रकारची टाळाटाळ करू नये. त्याचप्रमाणे तसे न करण्यामागे तसेच काही कारण असल्यास कुटूंबाला विश्वासात घेवून सर्व गोष्टींची पारदर्शकता ठेवावी आणि सर्व गोष्टी उलगडून सांगाव्यात. त्यामुळे त्याला कुटूंबाची साथ मिळेल . अशा पद्धतिने कुटूंबप्रमुखाने आपल्या कुटूंबाचे नेतृत्व केले तर कुटूंबीयांमध्ये एकोपा दिसेल तसेच आपसात स्वारस्य निर्माण होईल. सोबतच त्या कुटूंबातील प्रत्येकाची प्रगती देखील होईल.

        अशाप्रकारे बरेच लोक जीवनात काही ध्येय  ठरवून  छोट्या – मोठ्या समुहाचे नेतृत्व करतात.   परंतू त्या समुहाची प्रगती तेव्हाच होते. जेव्हा नेतृत्व करणारा मनापासून त्या समुहाची काळजी घेतो. आणि स्वत:च्या स्वार्थापेक्षा जास्त त्याला समुहातील प्रत्येक सदस्याची प्रगती महत्वाची वाटते. समुह म्हणजे स्वत:चे कुटूंब असे नेतृत्व करणार्‍याने मानले पाहिजे. जर समुहातील एकाही व्यक्तीची प्रगती थांबली असेल तर  त्याच्या कारणांच्या मुळापर्यंत जाणे हे प्रमुखाचे कर्तव्य असले पाहिजे. समुहातील प्रत्येकाचे व्यक्तीमत्व  व स्वभाव हा वेगवेगळा असतो ह्याची जाणीव ठेवून प्रमुखाने प्रत्येकाचा सांभाळ केल्यास समुहातील प्रत्येकाची प्रगती होईल. आणि त्यामुळे संपुर्ण समुहाची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. नेतृत्व करणार्‍या व्यक्तीमधे काही विशेष गुण असणे अनिवार्य आहे.

1. निस्वार्थीपणा

        नेतृत्व करणारा आपल्या स्वार्थासाठी समुहातील सदस्यांचा वापर करणारा नसावा. किंवा मी एकटा प्रमुख आहे. असे समजून सर्वांना आपल्या दबावात ठेवणारा  नसावा. त्याने समुहातील सदस्यांना विचारांचे स्वातंत्र्य द्यावे. त्यांचे निर्मीतीक्षम विचार ऐकुण घ्यावेत. आणि ते अंमलातही आणावेत. असे केल्याने समुहातील प्रत्येकास महत्व प्राप्त होईल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि समुहाची प्रगती होईल.

2. दुरदृष्टी

      नेतृत्व करणार्‍या कडे दुरदृष्टी असली पाहिजे. पुढे समुहाला कोणत्याही परिस्थितीला तोंड देता यावे व तेव्हा त्यांनी डगमगू नये. तसेच त्यांच्या मनात अविश्वास निर्माण होवू नये ह्या करीता सर्वप्रथम त्याने सावध राहावे. आणि आपल्या समुहाला समोर येणार्‍या बदलांची पूर्वकल्पना द्यावी. त्यामुळे अनपेक्षीत घटनांचा सामना करावा लागणार नाही आणि समुहाची प्रगतीही  थांबणार नाही. समुहाला कराव्या लागणार्‍या कामांचे नियोजन असावे. त्याची अंमलबजावणी  आणि त्या कामांचे भविष्यात येणारे परीणाम ह्या विषयी प्रमुखाकडे पूर्वयोजना असावी. त्यामुळे वेळेची बचत होईल.

3. जबाबदार्‍या घेणे

     नेतृत्व करणार्‍याने अपयशाची जबाबदारी पूर्णपणे स्वत:वर घ्यावी. त्यासाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये. त्याचबरोबर समुहाच्या प्रगती न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत.  त्याची माहिती काढावी. आणि त्याच्या मुळाशी जावून प्रश्न सोडवावे . त्यामुळे प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील . समुहातील प्रत्येक व्यक्तीचे  मानसिक स्वास्थ्य जपण्याचीही जबाबदारी प्रमुखाने घ्यावी. त्यामुळे आपसात स्वारस्य निर्माण होईल. आणि त्याचे परिणाम समुहाच्या प्रगतीवर होतील.

4. ऐकण्याची ईच्छा

     नेतृत्व करणारा ऐकुण घेण्यासाठी तत्पर असला पाहिजे. आपल्या समुहाच्या समस्या व त्यांच्या व्यक्तीगत अडचणी ऐकुण त्यावर विचार विमर्श करण्याकडे त्याचा कल असावा. तसेच समस्या  सोडविण्यासाठी त्याने कायम तयार असावे. त्याच्या ऐकण्यात आत्मीयता हवी.  ते प्रश्न आपल्या समुहाचे नसून आपलेच आहेत असे त्यास वाटाले  पाहिजे. ज्या गोष्टी केवळ सल्ले देवून सोडविता येत नाहीत त्या फक्त मनापासून ऐकूण घेतल्याने सोडवता येतात ह्याची त्याला जाणीव असावी.

5. प्रेरकवृत्ती     

 नेतृत्व करणार्‍या च्या बोलण्यातून  व  वागण्यातून  तसेच  कृतीतून समुहाला प्रेरणा मिळावी. त्याच्या पाठबळाने  समुहाचे मनोबल वाढले पाहिजे. त्याने आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने समुहाला एकत्र आणून त्यांना प्रगतीसाठी प्रेरीत करावे. संकटाच्यावेळी  सर्वप्रथम आपला हात त्यांच्या पर्यंत पोहचावावा. ज्यामुळे समुह आनंदी राहिल आणि त्यांची उपयोगीता वाढेल.  आम्ही करू शकतो  तर तुम्हीही करू शकता केवळ असे म्हणून चालणार नाही. वेळप्रसंगानुसार समुहातील सदस्यांना आपल्या मुलासारखे सांभाळण्याची प्रवृत्ती त्याच्यात असावी.  तर कधी हक्काने रागवून प्रत्येकास प्रेरीत करून त्यांना त्यांच्या समस्यांमध्ये जास्त काळ गुरफटून जावू न देता प्रेमाने बाहेर काढता येण्याची कला त्याच्यात असावी.

       प्रत्येक माणसास आपल्या स्वार्थासाठी प्रगती कराविशी वाटते. परंतू त्यातही जो स्वार्थाच्या पलिकडे जावून इतरांचा विचार करतो. स्वत:बरोबर आणखी काही जणांना प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करावयास लावतो.  स्वाभिमानाने जगणे शिकवीतो. ज्याच्यात स्वार्थाचा लवलेशही नसतो. फक्त असते परोपकाराची भावना आणि उदारता. त्यालाच म्हणतात ‘उत्कृष्ठ नेतृत्व’ ज्यामुळे अनेकांची आयुष्ये बदलून जातात .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *