एकटेपणाने आयुष्य वेढले

 आपण ह्या जगात एकटे जन्मास येतो आणि ह्या जगातून निरोप घेत असतांनाही एकटेच असतो. जे जीवनात आपल्या बरोबर असतात. तसेच आपण गेल्यानंतर आपल्या मृत शरीरावर अंतिम संस्कार होईस्तोवर थांबलेले असतात ते आपले सहप्रवासी असतात. आपण जिवंतपणी आपल्या सहप्रवास्यांच्या आयुष्यातही आपले योगदान देत असतो. तरीही आपला प्रवास मात्र हा फक्त आपल्याबरोबर एकट्यानेच सुरू असतो. असे असतांना सुद्धा जीवनात एकटेपणा हा एक मोठे आव्हान बनून आपल्या समोर उभा असतो. कारण आपल्या आयुष्यात येणारा एकटेपणा हा आपले मनोबल खचवीणारा ठरतो. कधी कधी तर हा एकटेपणा आपल्यासाठी श्राप ठरतो. आपण आयुष्यात एकटे पडतो कारण आपल्या अंतर्मनाशी एकरूप होवून जगणे आपल्याला माहीतच नसते. आपण ह्या जगात पहिले पाउल ठेवल्यानंतर आपल्या अगोदर आलेली माणसे आपले स्वागत करतात. आपल्या जीवनात  ती माणसे आपले परिजन असतात. ज्यांचे स्थान आपल्या हृदयात असते. एकप्रकारे ते आपला श्वासच असतात. कारण ती माणसे आपल्याला कधीही एकटे पडू देत नाहीत. पदोपदी आपली पाठराखण करत असतात. आपल्याला पाठीम्बा देतात. आपल्याला प्रोत्साहित करतात व आपल्याला जगणे शिकवित असतात. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे विविध माध्यमातून व विविध कारणांनी आणखी माणसे आपल्याशी जुळली जातात. ज्यांना आपण नाती म्हणतो. त्या नात्यांना वेगवेगळी नावेही देत असतो. अशाप्रकारे आपल्या सभोवताल माणसांची गर्दी तयार होते. तसेच आपणही त्या गर्दीचा एक भाग बनून जातो. त्याचबरोबर त्या गर्दीची आपल्याला इतकी सवय होते कि आपल्या भावना, आपल्या अपेक्षा आपण त्यांच्यात गुंतवितो. त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली स्वीकृती, त्यांची मते, त्यांचे सल्ले व त्यांची आपल्या जीवनात असलेली मोलाची साथ आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण होत असते. आपल्याला कधीही त्यांचा विरह सहन करावा लागू नये. किंवा ते आपल्यापासून लांब जावू नयेत म्हणून आपण त्यांच्या सारखे बनण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. परंतू ते करत असतांना आपल्याला सहजच विसर पडतो कि आपण आपल्या जीवनाचा प्रवास एकट्याने सुरू केलेला होता. ज्यांनी आपल्याला ह्या जगात आणले. आपल्यावर अपार माया केली. आपला सांभाळ करून लहानाचे मोठे केले. ते केवळ नव्या पिढीच्या उदयास एक माध्यम बनून हातभार लावत होते. त्यामुळे ते आपल्या कितीही निकट असले तरी आपल्या अंतर्मनात डोकावून बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ते आपल्या इतके आपल्याला कधी समजूनही घेवू शकत नाहीत. कारण त्यांच्या व आपल्या दरम्यान अपेक्षा जागृत होतात. तसेच अपेक्षांमुळे दुरावाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण एका छताखाली एकत्र राहत असलो तरी मानसिकदृष्ट्या मात्र एकटेच असतो. कारण वैचारिक मतभेदांमुळे त्यांच्यात आणि आपल्यात मन जुळन्यास वाव नसतो. परंतू आपल्याला एकटेपणाने जगण्याची सवय नसल्याने हा दुरावा मात्र आपल्यासाठी दु:खाचे कारण बनतो.

   ह्या जगात आपला जीवनप्रवास एकट्याने पुढे नेणे कठीण असते. कारण जीवनप्रवासात येणारी संकटे, अपयशाचे अनुभव आपल्याला क्षणोक्षणी निराश करत असतात. त्यामुळे आपली जगण्याची उमेद आपण गमावून बसतो. परंतू जेव्हा आपल्या आई वडीलांकडून व गुरूजनांकडून आपल्याला निस्वार्थ माया व मोलाचे मार्गदर्शन मिळते. तेव्हा आपण पुन्हा नव्या उमेदीने जगण्याकडे बघू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला वेळोवेळी लागणारे प्रोत्साहन व पाठबळही आपल्याला आपली माणसे देत असतात. आपली माणसे आपल्याला भावनिक आधाराची उब देत असतात. जगण्यासाठी लागणारी सुरक्षितताही ते आपल्याला प्रदान करत असतात. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधानाने जगणे शक्य होत असते. म्हणूनच आपण कधीही एकटे नसतो तर एका कुटूम्बाशी, घराण्याशी, समाजाशी, धर्माशी तसेच देशाशी जोडले गेलेलो असतो. असे असतांना आपसातील मतभेदांमुळे, विचारातील अंतरामुळे, कोणावर वर्चस्व गाजवून त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यामुळे, एकमेकांना समजून न घेतल्यामुळे, आपसात सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे, स्वार्थामुळे, तुलनात्मक भावामुळे आपण एकत्र असूनही मनातून मात्र एकटेच असतो. कारण दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या स्थानावर स्वत:ला ठेवून समजून घेवू शकतात तेव्हाच त्यांच्यात सूर जुळू शकतात. परंतू हे मात्र फार कमी वेळा शक्य होते. म्हणूनच ‘दुरून डोंगर साजरे’ ह्या अर्थपूर्ण म्हणीचे महत्व नात्यांमध्ये विशेष जाणवते. कारण नात्यांमध्ये अपेक्षा व औपचारीकतेचा दृष्टीकोन ठेवून व फायदा बघून नात्यांची चांगली किंवा वाईट अशी गणना करण्यात येते. परंतू एखाद्याचे सर्वसमावेशक विचार, सर्वश्रेष्ठ गुण, माणूस म्हणून योग्यता ह्याकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. जर आपल्याला कोणास एक माणूस म्हणून तठस्थपणे बघता आले तरच आपण त्याची साथ निभावू किंवा मिळवू शकतो. अन्यथा आपला प्रत्येकाचा प्रवास हा स्वत: बरोबर एकट्यानेच असतो. 

   कधी कधी पिढ्यांमधील अंतर हे देखील आपल्या एकटेपणासाठी कारणीभूत असते. जुनी पिढी जर बदलत जाणाऱ्या काळाबरोबर स्वत:हून स्वत:मध्ये परिवर्तन आणण्यास तयार असेल किंवा परिवर्तनाचे महत्व तिला कळत असेल तर दोन पिढ्यांमधील अंतर हे कमी कमी होत जाते. त्याचबरोबर त्यांच्यात एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण होण्याची पूर्णपणे शक्यता असतो. परंतू माणसाचा स्वभाव व विचार हे सहजा सहजी परिवर्तीत होत नाहीत. अशावेळी दोन्ही पिढ्या आपसात विचारांची रस्सीखेच करत असतात. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. त्यांच्यात मोकळेपणाने संवाद होवू शकत नसल्यामुळे किंवा नवी पिढी जुन्या पिढीस गृहीत धरू लागल्यामुळे घरात ताण तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. कारण जुन्या पिढीला त्यांचे महत्व कमी झाल्याची जाणीव होवू लागते. ही गोष्ट त्यांच्या आत्मसम्मानास सातत्याने दुखावत असते. अशाप्रकारे ते मानसिक खच्चीकरनास बळी पडतात. अशाच क्लिष्ट परिस्थितीतून आजच्या काळात वृद्धाश्रमांची संख्या वाढतच चालली आहे. कारण जुन्या पिढीस एकाकीपणे जीवन व्यतीत करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वयाच्या त्या टप्प्यात त्यांना जे समाधानकारक व सुरक्षित जीवन पाहिजे असते ते ह्या धकाधकीच्या जीवनात त्यांची मुले त्यांना देवू शकत नाहीत. तर काही वृद्ध दाम्पत्यांची मुले परदेशात जावून स्थायिक झालेली असतात. प्रगतीच्या दृष्टीकोनातून हे कितीही योग्य असले तरी त्यामुळे आई वडिलांवर मात्र एकाकीपणे एक निरस आयुष्य जगण्याची वेळ  येते. अशावेळी समवयीन व समदु:खी लोकांचा सहवास लाभावा म्हणूनही ते वृद्धाश्रमांकडे स्वखुशीने वळतात. कारण संसारातील सर्व रंग पाहून व अनुभवून झाल्यानंतर त्यांना त्या वयात केवळ मानसिक शांततेची आवश्यकता असते. अशाप्रकारे आयुष्यच आपल्याला एका वळणावर एकटेपणाचे महत्व शिकवून जाते. 

   माणसाच्या स्वभावातील विशेषता ज्यांना आपण गुणदोष म्हणतो त्यांच्या मुळेही आपल्याला जीवनात एकटेपणाचा सामना करावा लागतो. कारण प्रवाहाचा भाग बनून जीवन जगणे सोपे असते. ज्यात आपण आपल्या स्वभावाविरुद्ध जावून इतरांसारखे बनण्यासाठी सर्व कौशल्यांमध्ये निपुण होण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त लोकांचे समर्थन व साथ मिळवीन्यासाठी आपण झटत असतो. त्यासाठी आपल्या मनाला मुरड घालण्याचीही आपली तयारी असते. म्हणजे काहीही करून जगाची स्वीकृती मिळविणे हेच आपले मुख्य ध्येय असते. परंतू ते करत असतांना कधी कधी आपल्याला मानसिक यातना सहन कराव्या लागतात. कारण आपल्या स्वभावाला अनुसरून न वागणे हे यातना देणारेच असते. अशावेळी आपण आतल्या आत एकटेपणाच्या अंधाऱ्या खाईत घुसमटत असतो. कारण दोन प्रकारची व्यक्तित्व जगणे आपल्या आंतरिक जगात वादळ आणणारे ठरते. परंतू ह्या जगात आपल्या अस्तित्वाची ओळख आपल्यातील विशेशातान्ना आपल्या नजरेसमोर ठेवूनच करता येवू शकते. त्यासाठी एकटेपणाचा मार्ग स्वीकारणे हाच एकमेव पर्याय असतो. कारण जोपर्यंत आपण स्वत:वर पूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्या विचारांना चालना देत नाही व त्यानुसार कार्य करत नाही तोपर्यंत आपण आपली ओळख निर्माण करू शकत नाही. तेव्हा कधी कधी एकटेपणा हा आपल्यासाठी हितकारक ठरतो. 

   आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठीही आपल्या आंतरिक जगाचा तळ गाठावा लागतो. त्यामुळे आपले स्वत:विषयीचे ज्ञान वाढते. परंतू हा प्रवास पूर्णपणे एकट्याचा असतो आणि तो करण्यासाठी धाडसही लागते. कारण स्वत:बरोबर एकटे असणे हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. तसे करणे म्हणजे स्वत:चे अति सूक्ष्म परीक्षण करण्यासारखे असते. जर तत्पूर्वीचा काळ आपण गैरजीम्मेदारीने, इतरांना दुखावून, कोणाशी दगा करून, खंडीतपणे व अप्रामाणिकपणे घालविला असल्यास एकांतवासात राहणे आपल्याला एखाद्या शिक्षेप्रमाणे वाटू लागते. कारण त्या काळात आपले मन अनेक गोष्टींसाठी आपला धिक्कार करत असते आणि आपल्याच मनाने दिलेली ही शिक्षा शारीरिक वेदानांपेक्षाही अधिक वेदनादायी असते. परंतू स्वत:ला शुद्ध करत जाण्याचा हा सखोल व असरकारक मार्ग असतो. जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर, आपल्या मनावर नियंत्रण मिळविण्यात सफल होतो तेव्हा प्रचंड आत्मविश्वासाने बाहेरच्या जगालाही सामोरे जावू शकतो. आपल्या नात्यांना त्यांच्याशी संलग्न न होता सुबकतेने सांभाळू शकतो. हरण्या जिंकण्याच्या मोहात न अडकता कर्म करू शकतो. धन संपत्तीची लालसा व साठविण्याच्या मोहमायेपासून परावृत्त होवून प्रगती करू शकतो. त्यावेळी आपली आंतरिक शक्ती द्विगुणीत होते. जी आपल्याला असा आनंद व समाधान मिळवून देते ज्याची काहीही सीमा नसते. हा एकटेपणा जीवनाचे सार समजावून सांगणारा असतो. 

   मनुष्य हा सामाजिक प्राणी असला तरी एकटेपणा हा  त्याच्यासाठी प्रत्येकवेळीच त्याला मिळालेल्या एखाद्या शिक्षेसारखा नसतो. कारण स्वत:सोबत एकटे राहून आपण आपल्या मनावर सुश्रुषा करू शकतो. स्वत:वर लक्ष केंद्रित करून स्वत:साठी प्रगतीचे असंख्य मार्ग मोकळे करू शकतो. स्वत:बरोबर विनम्र होवून स्वत:ला माफ करू शकतो. स्वत:च्या भावनांचा आदर राखून त्यांना न्याय देवू शकतो. शेवटी बाहेरच्या जगापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्याच  शरीरावर व विचारांवर काम करणे महत्वाचे असते आणि ह्या प्रक्रियेतून पार होण्यासाठी आपल्याला एकांतवासाचा आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय आपण आपल्या अंतर्मनाचे साम्राज्य जाणू व समजू शकत नाही. ज्याचे ज्ञान आपल्याला असणे हे आपल्या जीवनातील कर्तव्य आहे. तेव्हा नेहमीच गर्दीचा हिस्सा बनून राहण्यापेक्षा कधीकधी एकटेपणाचा आनंदही घेतला पाहिजे.कारण तो अनुभव आपल्याला उत्तमरीतीने जगणे शिकवून जातो.    

1 पती पत्नीच्या दरम्यान असलेला एकटेपणा 

   पती पत्नीला जीवनाचे जोडीदार असे म्हंटले जाते. ह्यावरून ह्या नात्याची सखोलता लक्षात घेता येवू शकते. कधीकधी कोणाच्या काही दिवसांच्या सहवासानेच आपण कोणासारखे बोलू लागतो किंवा वागू लागतो. कारण निरीक्षणातून शिकत जाणे हा आपला गुणधर्म असतो. त्यातल्या त्यात जीवनाचे जोडीदार म्हणजे रात्रन्दिनीची साथ. त्यामुळे त्यांचे एकट्याचे असे अस्तित्वच उरत नाही. कारण त्यांचे एकरूप, एकनिष्ठ, एकध्येय होणे अपेक्षित असते. परंतू असे होत नाही. त्यामागे मीपणा ही मुख्य सबब असते. मीपणामुळे ते कायम एकमेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांच्या क्षेत्राचा अनादर करतात. एकमेकांना आपल्या आयुष्यात महत्व व प्राथमिकता देत नाहीत. त्यामुळे ते एका घरात, एका छताखाली फक्त औपचारिकता म्हणून राहत असतात. परंतू खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सोबत असूनही एकाकीपणे सुरू असतो. जर पती पत्नीस आयुष्यात एकमेकांची मोलाची साथ पाहिजे असेल तर त्यांच्यातील मीपणावर त्यांनी नम्रतेने मात केली पाहिजे. त्यानंतर एकमेकांच्या आचार विचारांचा सन्मान राखला पाहिजे. त्यासोबत स्वत:ला जोडीदाराच्या स्थानावर ठेवून स्वत:चे सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे. तरच ते एकमेकांच्या अडचणी समजू शकतात व सर्वदृष्टीने एकत्र येवून एक आदर्श सहजीवन आजीवन घालवू शकतात.   

2 किशोरवयीन मुलांच्या आयुष्यातील एकटेपणा 

   किशोरावस्थेतील मुलं मुली त्यांच्या वयाचा असा टप्पा पार करत असतात. जिथे त्यांना त्यांच्या मनावर नियंत्रण मिळविणे अवघड जाते. बालपण सरून नव्या नव्याने त्यांचे तारुण्यात पदार्पण झालेले असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात येणारे बदल व त्यांच्या मनाची विचलीत झालेली अवस्था ह्याविषयी त्यांना कुतूहल वाटत असते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न थैमान घालत असतात. अशावेळी त्यांचे घरच्यांकडून योग्य मार्गदर्शन झाले नाहीतर ते त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना समस्या समजू लागतात. त्याचबरोबर त्यावर आपल्या पद्धतीने मार्ग काढण्यासाठी सोशल मिडीया सारखी माध्यमे अंमलात आणतात. कधी वाईट संगतीत अडकून मादक पदार्थांच्या आहारी जातात. कारण ते त्यांच्या मनात एकटेपणाचा सामना करत असतात. त्यामुळे चिंता, खिन्नता व निराशेला बळी पडतात. ह्या वयातील मुलांना सर्वप्रथम आई वडीलांनी शांतपणे व गांभीर्याने ऐकून घेणे महत्वाचे असते. त्यानंतर त्यांना भावनिक आधार देवून मोठ्या मनाने मदतीचा हात त्यांना दिला पाहिजे. त्यांच्या कडून काही चुका झाल्या असल्यास त्यांना समजून घेवून योग्य दिशा दाखविली पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टी सौम्यतेने पार पडल्या पाहिजे. तेव्हाच त्यांच्यात हळूहळू विश्वास जागृत होतो. घरातूनच जर त्यांना समंजस आधार मिळाला तर ते एकटेपणावर मात करून वयाचा तो टप्पा यशस्वीरीत्या पार करू शकतील. 

3 आई वडीलांच्या आयुष्यातील एकटेपणा 

   मुलांचे संगोपन करण्यात व त्यांना लहानाचे मोठे करण्यात आई वडीलांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण काळ निघून जातो. ते करत असतांना ते अनेकदा आपल्या इच्छा आकांक्षा व स्वप्नांचा बळी देत असतात. त्यानंतर मुले मोठी होतात,  त्यांची कारकीर्द व व्यक्तीगत जीवनास सुरवात होते. त्यासाठी त्यांना घरापासून लांबही जावे लागते. त्यामुळे आई वडील एकटे पडतात, शिवाय त्यांच्या आयुष्यातील निवृत्ती काळही त्यांच्या समोर येवून ठेपलेला असतो. आयुष्यभर केलेल्या धकाधकी नंतर आलेला हा निवृत्तीकाळ त्यांच्या मनाचे खच्चीकरण करणारा ठरू शकतो. कारण आपले महत्व कमी होण्याचे त्यांच्या मनावरचे दडपण त्यांना एकटेपणाच्या अंधारात दिसेनासे करते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यावर निराशाजनक मनस्थितीचा सामना करण्याची वेळ येते. परंतू आई वडीलांचा हा निवृत्तीकाळ ठरवून नियोजनबद्ध व निर्मितीक्षम बनविता येवू शकतो. जेणेकरून त्यांना निवृत्ती नंतर महत्वहीन झाल्याचे भासणार नाही. त्याचप्रमाणे घरातील त्यांच्या कुटूम्बप्रमूख ह्या स्थानाला धक्काही लागणार नाही. मुलांनी त्यांना भावनिक आधार देण्यासोबतच वेळोवेळी त्यांच्या सल्ला व मार्गदर्शनास मान दिला पाहिजे. त्यांना कधीही गृहीत धरू नये. कळत नकळतपणे त्यांना कमीपणा आणण्याच्या हेतूने त्यांच्या मनाला लागेल असे बोलण्याचे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. त्यांचे मन मोकळे करण्यासाठी  वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. अशाप्रकारे आपण आपल्या आई वडीलांना एकटेपणापासून लांब ठेवू शकतो. 

4 नात्यांच्या जगातही एकटेपणाचे आयुष्य 

   आपल्या आयुष्यातील केवळ बोटांवर मोजण्याइतकीच नाती जिव्हाळ्याची व आपुलकीची असतात. बाकी संपूर्ण नात्यांचे जग हे अपेक्षा, औपचारिकता व स्वार्थाने ग्रसित असते. जिथे आपल्या भावना मोकळ्या करण्यास मोकळीक नसते. आपल्याला औपचारिकता पाळणे जमले नाहीतर आपल्या विषयी मत बनविले जाते. आपली बाजू जाणून व समजून घेतली जात नाही. आपल्याला धारेवर धरले जाते. आपल्या समस्या व अडचणी शांतपणे ऐकून घेतल्या जात नाहीत. आपले म्हणणे ऐकून घेण्याअगोदरच आपल्याला सल्ले दिले जातात. आपल्याला कमकुवत समजले जाते. अशाप्रसंगी आपण एकटे पडतो कारण त्यांच्या अशा परक्यासारख्या वागण्याने  आपल्या आत्मसम्मानास धक्का पोहोचतो. जर आपण एकमेकांना नात्यांच्या तराजूत न तोलता एक माणूस म्हणून समजू शकलो तर एकमेकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकतो. माणुसकीच नात्यांना जोपासू व वाचवूही शकते. एकमेकांच्या वेळेचा सम्मान करणे, एकमेकांबरोबर उत्तम वेळ घालविणे ह्या गोष्टी नात्यांमधील अंतर कमी करू शकतात. कोणाला मनातील भावना व वेदना मोकळेपणे व्यक्त करण्यासाठी आपल्या आयुष्यात हक्काची जागा निर्माण करून देण्याने नात्याची सुरक्षितता जपली जाते. नात्यांमध्ये हक्काची मर्यादा व पारदर्शकता पाळली गेली तर एक आदरयुक्त जवळीक निर्माण होवू शकते. अशाप्रकारे एकटेपणाचे सावट आपल्या आयुष्यातून दूर घालविता येवू शकते. 

   एकटेपणाने प्रत्येकाचे आयुष्य वेढलेले आहे. कारण एका छताखाली राहून मन दुरावली गेली आहेत. तर शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घराबाहेर पडलेली मुले कुटूम्बापासून दूर जावे लागल्यामुळे व बाहेरच्या जगातील प्रतीस्पर्धांमुळे  मानसिकरीत्या खचलेली आहेत. त्याचप्रमाणे मुले लांब गेल्यामुळे आई वडील एक निरस व एकटेपणाचे आयुष्य जगत आहेत. अशाप्रकारे काही ना काही कारणाने असंख्य लोक एकाकी जीवन व्यतीत करण्यास विवश झाले आहेत. परंतू अंधार झाल्यावर आपली सावलीही दिसेनासी होते. तेव्हा आयुष्याच्या वाटेवर एकट्याने वाटचाल करण्याचे धाडस प्रत्येकाने केले पाहिजे. कारण ह्या सीमित आयुष्यात आपले सहप्रवासी काही काळासाठी आपल्या आयुष्यात येत असतात. त्यानंतर आप आपल्या मार्गांनी निघून जातात. आपण मात्र त्यांच्या असण्याची स्वत:ला सवय करून घेतो आणि त्यांचे आपल्यापासून दूर जाण्याचे दु:ख सहन करू शकत नाही. परंतू खरे तर सृष्टी ह्या मार्गांनी आपल्याला एकट्याने आपला  प्रवास सुरू ठेवण्याचे सुचवत असते. ज्याचा ह्या जगाच्या मोहात अडकून आपल्याला विसर पडलेला  असतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *