
आई हे कोणालाही न उलगडलेलं कोडं असते. त्याचप्रमाणे तिच्या सामर्थ्याचा अंदाज लावणे केवळ अशक्य असते. तिच्याकडे बघण्याचा आपण आपला दृष्टीकोन बदलल्यास आईच्या अनेक सामर्थ्यशाली रूपांचे दर्शन आपल्याला होत असते. देवाला त्याच्या प्रत्येक लेकराजवळ पोहोचने शक्य नसल्याने त्याने स्वत:ची प्रतिकृती म्हणजे आई घडविली. आई म्हणजे देव नाही किंवा कोणी सुपर ह्युमन नाही. ती आपल्याप्रमाणेच एक मनुष्य आहे. परंतू एका स्त्रिला आईपण लाभल्यानंतर तिच्यात येणारे अवर्णनीय अद्भूत बदल तिला असामान्य बनवित असतात.
आई तिच्या व्यक्तीगत जीवनातील संघर्ष व तिच्या वेदना आपल्या मुलांना कळू देत नाही. त्यांच्यापुढे ती कणखरपणे वावरत असते. मुलांच्या चेहर्यावरचे हसू व त्यांचा आनंद अबाधीत ठेवण्यासाठी स्वत:चे दु:ख पोटात गिळून हसर्या चेहर्याने राहते. आपल्या दु:खाची पडछाया देखील त्यांच्यावर पडू देत नाही. म्हणूनच आई तिच्या एकांकीकेची एकमेव पात्र असते. एक गुणी व हरहुन्नरी कलाकार असते. कारण ती तिची भुमिका अत्यंत शिताफीने निभवत असते. परंतू आई मुलांचे नाते हे आंतरीक असते. त्यामुळे आई मुलांसाठी जे काही करत असते ते त्यांना कळत नसले तरी त्यांच्या मनात आईसाठी आपोआपच अत्यंत आदरयुक्त भावना निर्माण होतात. त्यामुळेच मुलं त्यांच्या मनातील आईचे एकमेव स्थान आयुष्यात कधीही अन्य कोणास देत नाहीत.
मातृप्रेमापोटी स्त्रियांनी केलेल्या पराक्रमाची अनेक उदाहरणे आहेत. त्यातले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी नावाच्या गवळणीचे आहे. हिरकणी एका तान्ह्या बाळाची आई होती. तसेच आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी ती नियमितपणे रायगडावर दूध विकण्यास येत असे. ‘घार फिरे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी’ ह्या वाक्याप्रमाणे तिचे पुर्ण लक्ष तिच्या पाळण्यात झोपलेल्या लहानग्या बाळापाशी असायचे. एकेदिवशी तिच्या जवळचे दूध लवकर न विकल्या गेल्याने तिला गडावरून निघण्यास चांगलाच उशीर झाला. दिवस मावळला व संध्याकाळ झाली. त्याचप्रमाणे गडावरच्या नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे देखील बंद झाले.
अशाप्रकारे हिरकणी गडावरच अडकली. परंतू तिचा जीव बाळाच्या आठवणीने कासावीस झाला. तशी ती पहारेकर्यांना दरवाजा उघडण्यास विनवण्या करू लागली. परंतू ते काही केल्या महाराजांनी बनविलेले नियम मोडण्यास तयार नव्हते. परंतू हिरकणीने मात्र कसेही करून गड उतरण्याचा स्वत:शी निर्धार केला. तसेच तिने असा दुर्गम कडा उतरण्याचे धाडस केले जेथून कोणी दिवसाही उतरू शकत नव्हते. दुर्गम कडेकपारी, दाट जंगल व जंगली श्वापदांसारख्या कठीण अडथळ्यांचा बाळाच्या ओढीपुढे त्या वेड्या मातृत्वाने विचारही केला नाही. अत्यंत शूरपणे त्यांना पार करत सहीसलामत ती आपल्या बाळापर्यंत पोहोचली. अशारितीने आईच्या सामर्थ्यापुढे निसर्गानेही हात टेकले.
आपल्या बाळाच्या आयुष्यापुढे आईला तिचे प्राणही मोलाचे वाटत नाहीत. त्याचप्रमाणे आयुष्यात कधी तशीच वेळ आल्यास ती त्यांना पणास लावू शकते. एका तरुण मुलास एके दिवशी हृदयविकाराचा झटका आला. दुर्दैवाने त्यादिवशी त्याचा वाढदिवसही होता. तात्काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले व त्याच्यावर उपचारही सुरू झाले. परंतू मुलगा कोमात गेला. पुढचे काही वर्ष तो त्याच अवस्थेत होता. त्याची आई त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला एक पत्र लिहून त्याच्या खोलीत ठेवत असे. परंतू आईच्या कोमल हृदयाला मुलाची अवस्था बघवत नव्हती. शेवटी एके दिवशी तिने स्वत:शी निर्णय घेतला. तसेच त्या संदर्भात तिने डॉक्टरांशीही चर्चा केली.
रुग्णालयात दाखल होण्याअगोदर तिने मुलासाठी आणखी एक पत्र लिहून त्याच्या खोलीत ठेवले. त्यानंतर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यात आईचे हृदय मुलाला देण्यात आले. अशाप्रकारे मुलाचे प्राण वाचले व तो पुर्णपणे बरा होवून घरी आला. तो मोठ्या उत्साहात थेट आईच्या खोलीत गेला. तिथे आई दिसली नाही म्हणून तो स्वत:च्या खोलीत तिला शोधण्यासाठी गेला. तिथे त्याला आईने लिहीलेली पत्रे सापडली. ज्यात ते पत्र देखील होते जे तिने तिच्या मृत्यूपूर्वी लिहीले होते. ह्यात तिने तिच्या मुलाला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आईने मुलाला वाचविण्यासाठी आपले प्राणार्पण केले होते. म्हणूनच आईच्या सामर्थ्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे.
आईचे अस्तित्व कायम आपल्या अवतीभवती असते. जेव्हा आपण चालतांना ठेचाळतो तेव्हा सर्वप्रथम आई हेच शब्द आपल्या ओठी असतात. अशाप्रकारे आई ह्या शब्दाने विश्व व्यापले आहे. साने गुरूजी लिखीत श्यामची आई ह्या सत्यकथेवर आधारीत पुस्तकातून त्यांनी एक स्वाभिमानी आई साकारली आहे. जिला स्वातंत्र्याचे जगणे सर्वात जास्त महत्वपुर्ण वाटत होते. जेव्हा तिच्यावर कुटूंबासमवेत माहेरी येवून राहण्याची वेळ येते. तेव्हा तिला ते मिंधेपणाचे जगणे वाटू लागते. कारण तिला व तिच्या कुटूंबाला कोणीही नावे ठेवू नये अशी तिची इच्छा असते. त्यासाठी तिला एखाद्या झोपडीत राहणेही योग्य वाटते. त्याचप्रमाणे झोपडी उभारण्याकरीता ती स्वत:च्या अंगावरचे दागिनेही काढून देते. कारण दागिन्यांनी सजलेल्या शरिरापेक्षा स्वातंत्र्याच्या व आत्मसम्मानाच्या साज श्रुंगाराने आपण जास्त शोभून दिसतो. असे त्यामागे तिचे स्वाभिमानाने प्रेरित विचार होते. हक्काच्या झोपडी वजा घरात चटणी भाकरीचे दोन घास तिला अमृताप्रमाणे भासतात. कारण त्यात स्वातंत्र्याची गोडी होती. श्यामच्या आईला स्वातंत्र्याच्या जगण्याची ओढ होती. तसेच स्वाभिमान हेच तिचे सामर्थ्य होते.
आई मुलांच्या प्रगतीचा व त्यांच्यात येणार्या सकारात्मक बदलांचा ध्यास घेते. त्यामागे तिचा कोणताही स्वार्थ नसतो. त्याचबरोबर मुलांना पाठिशी घालण्यात तिचा हातखंडा असतो. परंतू तशीच वेळ आल्यास मुलांना कठोरातले कठोर शासन केवळ आईच करू शकते. कारण आईच्या प्रत्येक कृत्यात दूरदृष्टी असते. आईने वेळोवेळी उचललेल्या सुयोग्य पावलांमुळे मुलाच्या पुढच्या आयुष्यात येणारी त्याची जीवनसंगिनीरूपी स्त्री एक सुखी व सुरक्षीत आयुष्य जगू शकते. अशाप्रकारे एक स्त्रि अन्य स्त्रि च्या उपयोगी पडते. अशारितीने आईच्या सामर्थ्याचा वारसा पुढे पुढे जात राहतो.
1. आईची सहनशक्ती म्हणजे तिचे सामर्थ्य आहे
प्रत्येक स्त्री लहानपणापासूनच सहनशील असते. कारण सृष्टीने तिला तसे घडविले आहे. परंतू तिचे आई होणे तिला त्याहून जास्त सहनशील बनविते. बाळाला नऊ महिने पोटात वाढवितांना शरिराला पडणार्या कष्टांची तिला पर्वा नसते. कारण त्या दिवसात तिचे बाळाशी ऋणानुबंध जुळत असतात. त्या दोघांचे आंतरीक नाते निर्माण होते. आई कष्टात आहे किंवा आनंदी आहे ह्याचा बाळावर तेव्हापासूनच परिणाम होत असतो. त्यानंतर बाळाला जन्म देण्याची ती प्रक्रिया वेदनांची परिसीमा गाठणारी असते. परंतू कल्पनेतील बाळाला डोळ्यापुढे बघून आईला तिच्या वेदनांचा क्षणार्धात विसर पडतो. अशाप्रकारे कोणतीही आई ही मुळातच पराक्रमी असते.
2. आईचा कणखरपणा म्हणजे तिचे सामर्थ्य आहे
आई परिस्थितीवर मात करणारी असते. जेव्हा ह्या जगात तिचा व तिच्या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच तिला कोणाचेही पाठबळ उरत नाही. त्याक्षणी तिच्या माध्यमातून एक अज्ञात शक्तीच निर्णय घेत असल्याचा भास होत असतो. ज्या आईचे जग आजवर चार भिंतींच्या आड सिमीत होते. तिचेच एक कणखर रूप जगासामोर येते. ती स्वत:ला कधिही नाकरतेपणाच्या खायीत ढकलत नाही. क्षमता नसतांना जमेल ते करून आपल्या बाळासाठी व तो जगात एकटा पडू नये म्हणून स्वत:साठीही अत्यंत धाडसी पाऊल उचलते. पुन्हा नव्याने आयुष्याला सुरवात करते. आयुष्याने दिलेल्या वेदनादायी आठवणी मनाच्या कोपर्यात ठेवून. तसेच त्याचे पुढच्या आयुष्यावर पडसाद उमटू न देता. आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीते. हेच आईचे अवर्णनीय सामर्थ्य आहे.
3. आईचे नेतृत्व म्हणजे तिचे सामर्थ्य आहे
जेव्हा एक आई आयुष्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी आपले कर्तुत्व पणास लावते. तेव्हा ती उत्कृष्ट नेतृत्व करणारी सिद्ध होते. कारण त्यासाठी ती स्वत:प्रती कठोर होते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रात्रंदिन झटत असते. त्यावेळी तिचे कष्ट बघून संपुर्ण घराला शिस्त लागते. कारण ज्या गोष्टी इतरांकडून करणे अपेक्षीत असतात त्या आई स्वकृतीतून त्यांच्या निदर्शनात आणून देते. त्यावेळी पडणारे तिचे प्रत्येक पाऊल तिच्या मुलांसाठी एक धडा असतो. ज्याठिकाणी आई नेतृत्व करते तिथे प्रत्येकाचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक जण प्रगती करतो. कुटूंबाला शिस्त लागते. आणि प्रत्येकासाठी ते कुटूंब आदर्श ठरते.
4. प्रत्येक आईचे आयुष्य पुस्तकाप्रमाणे असते
एका स्त्रि पासून ते तिच्या आईपणाचा प्रवास हा एक धडा असतो. कारण त्या काळात प्रत्येकीच्या समस्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक जणी निरनिराळ्या लढायांवर मोर्चेबांधणी करत असतात. कोणतिही आई तिच्या जीवनातील सुख दु:खांचा मनापासून स्विकार करते. त्यांच्या मागची कारणे समजून घेते व त्यावर तोडगा काढण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. हाच तिचा जीवन संघर्ष असतो. त्यामुळे प्रत्येक आईच्या संघर्षाची गोष्ट ही इतरांना प्रेरणा देणारी असते. आपल्या आईप्रमाणे असणार्या अनेक स्त्रिया परिस्थितीमुळे रस्त्यावर भिक मागतांना दिसतात. कधि आपण त्यांच्या मुखातून त्यांच्या जीवनसंघर्षाची गोष्ट ऐकली. तर कदाचीत त्यातूनही आईच्या सामर्थ्याची आणखी एखादी प्रेरणादायी गोष्ट पुढे येवू शकते.
आईच्या सामर्थ्यापुढे अवघे विश्व खुजे आहे. त्याला कधिही नडू नये. आपल्याकडून त्याचा नेहमी आदर राखला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यामधून धडा घेवून त्यापुढे कायम नतमस्तक राहिले पाहिजे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)