
जीवनप्रवासात कोणत्याही नात्यांमधील सखोलता हेच जीवनाचे मर्म असते. कारण आपल्या अंतरातील काळोखात प्रत्येक जण हा एकाकी असतो. त्याचप्रमाणे तो आपल्या मनातील शल्य व आपले शून्यत्व इतरांशी वाटून घेण्यास व स्वत:च्या मनास दिलासा मिळवून देण्यास आतुरही असतो. परंतू असा उत्तम व भावनिक श्रोता जो आपले मन रिते करण्यास आपली मदत करू शकेल, त्याच्या मिळण्याची मात्र शाश्वती देता येत नाही. कारण आजच्या परिस्थितीत नात्यांना श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी जी आपुलकीची झालर असते. ती जवळपास संपुष्टात येवून नात्यांमध्ये जीवघेण्या औपचारीकतांचा कळस मात्र मोठ्या प्रमाणावर तोंड वर काढत आहे. ज्यामुळे नात्यांचे जग अक्षरशा कोरडे होत चालले आहे. रक्ताची नाती केवळ नावापुरती रक्ताची राहिलीत. कारण त्यांच्यातील जिव्हाळा व हक्क जावून आपसातील चढाओढीनी त्यांच्या दरम्यानची जागा पूर्णता व्यापलेली आहे. तरीही ती नाती जीवनात कधी न कधी कळत नकळत पणे आंतरिक ओढीने व एकमेकांच्या आठवणीने व्याकूळ होत असतात. परंतू अशावेळी ते आपल्या हृदयातून उमटणारी संवेदना समजून न घेता बऱ्याचदा आपसातील संबंधांना टिकवून ठेवण्यासाठी औपचारिक कौशल्यांचा फारच नाटकीयपणे वापर करत असतात. कारण कालांतराने नात्यातील जवळीक काहीसी कमी कमी झालेली असते. परंतू त्यातही काही अशा व्यक्ती असतात ज्या अत्यंत भावनिक असल्यामुळे आपल्या माणसांच्या वरवरच्या औपचारीक वागण्या व बोलण्याने मानसिकरीत्या दुखावल्या जातात. कारण जीवनात आपल्याला कोणीतरी सखोल समजून घ्यावे. ह्या गोष्टीची त्यांना नितांत आवश्यकता भासत असते. परिणामस्वरूपी अशी माणसे आपल्या पुढील आयुष्यात त्यांच्या मनात उठणाऱ्या वेदना कोनाहीपुढे व्यक्त करतांना घाबरतात. त्याचप्रमाणे कोणीही आपल्याला समजून घेणार नाही. ह्या भीतीने कायमचे सर्वांपासून दूर होत जातात. तसेच एकांतात राहून जगणे पसंत करतात. अशाप्रकारे आजच्या जगात आपण एकमेकांशी केलेल्या अत्यंत औपचारिक वर्तणुकीमुळे नात्यांची फारच दयनीय अवस्था झालेली आहे.
नात्यांमधील प्रेम, ओढ व आपुलकी ह्या गोष्टी जीवनातील कितीही विपरीत काळात आपल्याला जगण्याचे बळ देत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण निस्वार्थ प्रेमाने भारावलेल्या माणसांनी वेढलेलो असतो. तेव्हा आपल्याला मानसिक शांतता व स्थैर्य लाभते. त्यामुळे आपले जगणे किमान काही प्रमाणात तरी सुखकर व सोपे होत जाते. त्याकरीताच नाती विश्वासाने, प्रामानिकपणाने व आपलेपणाने जोपासली गेली पाहिजेत. जिथे नात्यामध्ये पारदर्षकतेला विशेष महत्व दिले जाते. जिथे एकमेकांच्या विचारांचा सम्मान ठेवला जातो. जिथे नात्यापेक्षा जास्त परस्परांकडे एक माणूस म्हणून पाहिले जाते. जिथे एकमेकांवर अन्याय अत्याचार केले जात नाहीत. जिथे आयुष्यात विश्वासघाताला तिळमात्रही स्थान नसते. जिथे नाती ओझे नाहीतर भक्कम आधार वाटतात. जिथे नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवत नाही. जिथे निरपेक्षता हा नात्यांचा पाया असतो. जिथे कोणत्याही नात्याकडे थट्टा मस्करीच्या नजरेतून नाहीतर गांभीर्याने पाहिले जाते. जिथे आपल्या मनातील घालमेल हक्काने मांडता येवू शकते. त्याचप्रमाणे जिथे नात्यांना शुद्ध मैत्रीची झालर लावली जाते. अशारितीने नात्यांची उब आपल्या व्यक्तीमत्वास खुलवीन्याकरीता, आपल्यात स्वत:ला स्वीकारण्याचे धाडस निर्माण करण्याकरीता, आपल्यातील नकारात्मक बाबींवर विजय मिळवीन्याकरीता, आपले दु:ख पचवून पुन्हा निर्धाराने जीवनाचा सामना करण्याकरीता तसेच आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याकरीता अत्यावश्यक असते.
औपचारिकता हे नात्यांच्या जगातील अत्यंत सुबक व सुमधुर वाटणारे एक कौशल्य असते. तरी त्यात भावनिक गुंतवणुकीला मात्र कोठेही थारा नसतो. त्याचप्रमाणे त्यात पारंगत असणारे लोक आपल्या अवती भवती कितीही मोठे माणसांचे नेटवर्क निर्माण करू शकत असतील. तरी त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या माणसांची मनं मात्र ते त्या कौशल्याच्या सहाय्याने जिंकू शकत नाहीत. कारण आपल्या माणसांची मनं जिंकण्यासाठी त्यांच्यात आजीवन भावनांची, वेळेची व पैस्यांची सुद्धा गुंतवणूक करत रहावे लागते. औपचारीकतेने दोन व्यक्ती मध्ये आपसात संवादाची उत्तमरीतीने सुरवात तर होवू शकते. किंवा अगदी वरवर एक महत्वाचे चर्चासत्रही पार पडू शकते परंतू कोणाच्याही मनात खोलवर शिरून त्याच्या मनातील वेदनांवर हक्काने फुंकर घालण्याची अनुमती मिळू शकत नाही. त्यामुळे औपचारिक नातेसंबंधांमुळे आपल्याला कधीही भावनिक व मानसिक स्तरावरचे सुख व समाधान लाभात नाही. तरीही संबंधांमध्ये काही प्रमाणात औपचारिकता असणे प्रभावी ठरते. कारण त्यामुळे नात्यात कालांतराने आपसात निर्माण झालेला अवघडलेपणा घालावीन्यास मदत मिळते. आदरातीथ्याला सुवर्ण झळा लागतात. त्याचप्रमाणे समोरच्याच्या मनात आपण स्वत:ची एक अमीट छवी सोडू शकतो. तेव्हा औपचारीकतेलाही जर हृदयापासून तसेच माणुसकीने निभावले गेले तर त्यामुळेही मनं भारावली जावू शकतात. कारण औपचारिकता अगोदरच एक कौशल्य असल्यामुळे तिला जर खोटेपणाने किंवा थट्टा मस्करीने सादर करण्यात आले. तर त्यामुळे आपल्या त्या वर्तणुकीला अत्यंत निकृष्ठ दर्जा प्राप्त होतो. ज्याचे नात्यांवर होणारे दुष्परीनामही आपल्या कल्पनेपलीकडचे असतात. तेव्हा नात्यांमध्ये औपचारिक कौशल्ये देखील आंतरिक सौहार्दतेने पाळली गेली पाहिजेत. परंतू बाहेरच्या जगाशी जुळवून घेतांना मात्र औपचारिकता हा एक कारागार दुवा ठरतो. कारण तिथे आपल्या समस्या व भावनांना समोर ठेवून जीवनातील लढाया जिंकता येत नाहीत. त्याचप्रमाणे तिथे करार महत्वाचे असतात. तसेच प्रत्येक गोष्टीची किंमतही चुकवावी लागते. त्यामुळे जगाशी व्यवहार करण्याकरीता औपचारीकतांचे अनन्यसाधारण महत्व असते.
जेव्हा मोठ मोठे अपघात किंवा दुर्घटना घडतात तेव्हा बऱ्याचदा त्यात एकाच वेळी एका मोठ्या जनसमुदायाचे जीवन संकटात सापडते. काहींना तर आपल्या जीवाला देखील मुकावे लागते. अशावेळी त्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या परीजनांना त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीस कायमचे गमावले असल्यामुळे किंवा त्यांच्या शरीरास अपंगत्व आले असल्यास नुकसान भरपाई म्हणून सरकार तर्फे प्रचंड रकमा घोषित केल्या जातात. परंतू तरीही परीजनांच्या मनातील आक्रोश व वेदना काही शांत होत नाही. कारण नुकसान भरपाई मिळाल्यामुळे संकटात बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटूम्बास एकप्रकारे आर्थिक बळ तर प्राप्त होते. परंतू त्यामुळे त्यांच्या मनास झालेल्या अतीव दु:खास कोणी भावनिक दृष्टीकोनातून प्रमाणित केल्याचे समाधान मात्र त्यांना लाभत नाही. त्यामुळे नुकसान भरपाईच्या स्वरूपात मिळालेली आर्थिक मदत ही एक औपचारिकता ठरते. त्याचप्रमाणे ती औपचारिकता स्वीकारल्यामुळे कधीकधी आपण दोषी व स्वार्थी असल्याचे शल्यही त्यांच्या मनास आजीवन बोचत राहते. कारण त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या अनमोल जीवनाची नुकसान भरपाई केवळ आर्थिकरीतीने चुकवून एकप्रकारे त्यांना समजवीन्याचा प्रयत्न केला गेलेला असतो. किंबहुना त्याक्षणी त्यांना समजवीन्यासोबतच त्यांच्या स्थानावर राहून त्यांची मानसिक अवस्था समजून घेण्याचीही सर्वात जास्त गरज असते. कारण दुर्घटनेत बळी पडलेली व्यक्ती त्यांच्या जीवाभावाची असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने त्यांच्या जीवनात त्या व्यक्तीची रिक्त झालेली जागा कितीही मोठी आर्थिक मदत मिळाली.तरी भरून निघणे अशक्य असते. तेव्हा अशावेळी केवळ कोरडेपणाने नुकसान भरपाईची रक्कम परीजनांच्या स्वाधीन करून औपचारिकता पार पाडणे हे माणुसकीला धरून केलेले वर्तन असू शकत नाही. तर त्यासोबत त्यांना होणाऱ्या दु:खाची झळ स्वत: अनुभवून त्याचप्रमाणे आपल्या सांत्वनायुक्त शब्दांनी व त्या कठीण काळात त्यांच्या बरोबर आत्मीयतेने राहून माणुसकीच्या पवित्र ध्वजाला उंच ठेवले गेले पाहिजे. कारण आपल्या मनातील करुणाभाव जागवून इतरांचे दु:ख समजून घेण्याची आपल्यातील क्षमता ही कोणत्याही तोकड्या औपचारीकतेच्या तुलनेत जास्त श्रेष्ठ असते. ज्यात आपण त्यांच्या मनातून उठणाऱ्या दु:खद वेदना ह्या उद्विग्न प्रतिक्रियांच्या स्वरूपात बाहेर पडत असल्या तरी त्यांना विनम्रतेने ऐकण्याचे धाडस केले पाहिजे. आपल्या विवेकी शब्दांनी त्यांच्यात पुन्हा उमेद जागवीन्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच त्यांच्या दु:खद मनाला काही प्रमाणात तरी दिलासा मिळू शकतो. त्याचबरोबर ते अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यात आलेल्या आकस्मिक दु:खाला झेलण्याकरीता आपल्या काळजावर दगड ठेवून तयार होण्याचे धैर्यही करू शकतात. त्यानंतरच त्यांना पुरविली गेलेली आर्थिक मदत ही माणुसकीचे प्रमाण मानले जावू शकते. म्हणूनच अशाप्रकारच्या आपातकालीन परिस्थितीत आपलेपणाने केलेल्या तातडीच्या मदतीने संकटग्रस्तांना जास्त दिलासा मिळतो.
जनजीवन शिस्तबद्ध व्हावे ह्या अनुषंगाने जगात अनेक नियम अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे त्या नियमांचे आपल्या कडून काटेकोर पालन व्हावे ह्या दृष्टीने जगातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य देखील असते. परंतू हे नियम आपल्याला तेव्हा जास्त कठीण वाटू लागतात जेव्हा कोणाचा जीव संकटात असतांना आपण तातडीच्या मदतीच्या हेतूने वेळेत त्याच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचप्रमाणे नियमांच्या कठोरतेमुळे प्रामाणिक भावनांचे मोल कमी झाल्यामुळे लोक वाम मार्गांचा अवलंब करण्यासही प्रवृत्त होतात. तेव्हा कधीकधी परिस्थितीच्या गरजेनुसार कठोर नियमांमध्ये काही प्रमाणात का होईना सूट देता आली पाहिजे. कोणाच्या भावनांचा आदर राखून माणुसकीला राखता आले पाहिजे. कारण नियमांची औपचारिकता ही इतकी कठोर असते कि त्यापेक्षा आपलेपणाने कोणाच्या दिशेने टाकलेले उमेदीचे व विश्वासाने युक्त पाउलही त्यांच्यात पाहिजे तो बदल आणण्यात व त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यास जास्त प्रभावशाली ठरू शकते. कारण त्यात आंतरिक करुणाभावाची ताकद सामावलेली असते. त्याचप्रमाणे त्यात सूक्ष्म स्वरूपात का होईना आशेचा किरणही असतो. तेव्हा कधीकधी कोणाची आंतरिक कळकळ देखील ग्राह्य धरली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे केवळ नियमांच्या औपचारीकतांचे फास जगण्याभोवती आवळून जीवन आणखीच कष्टप्रद होण्यापासून थांबविले पाहिजे.
कधीकधी आपल्या अतिशय औपचारिक वर्तनाने एखाद्या भावनिक व्यक्तीस आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करण्यास व्यत्यय निर्माण होते. त्यामुळे त्याच्या मनात लोकांमध्ये मिसळण्याची भीती निर्माण होते. तरीही क्षणाच्या गरजेनुसार त्याला आपल्या त्या विचलीत झालेल्या भावनांवर कसेबसे नियंत्रण मिळवून त्या औपचारिक वातावरणात स्वत:ला झोकून द्यावे लागते. कारण लोक आपल्या विषयी काय विचार करतील हा विचार त्याच्या मनास एकसारखा छळत असतो. शिवाय इतरांचाही त्याच्यावर दबाव असतो. अशाप्रकारे त्याच्या मनावर दडपण येवून त्याचे मानसिक स्वास्थ्य अखेरीस विस्कळीत होते. तेव्हा जर कोणास गर्दीची भीती वाटत असल्यास. तसेच ती गोष्ट सांगणे त्याला जमत नसल्यास. तिथे आपल्या औपचारिकपणे वागण्याची नाहीतर आपलेपणाची व त्या व्यक्तीस समजून घेण्याची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे त्यावेळी त्याच्या डोळ्यात व्यक्त झालेली मनातील वेदनेची कळ शब्दाविना ऐकून घेणेही महत्वाचे असते. तेव्हाच नात्यांचे बंध आणखी सुमधुर व घट्ट होत जातात. त्याचप्रमाणे कोणास त्याच्या कठीण समयी समजून घेणे हे आपल्याद्वारे केले गेलेले अत्यंत आपुलकीचे व मैत्रीपूर्ण वर्तन असते. तेव्हा आपल्या वर्तनात त्या महत्वपूर्ण गोष्टी पाहिजे ह्याविषयी आपल्यात जागरूकता असावी.
कधीकधी आपल्या मनातील गोष्टी एखाद्या विश्वासू व्यक्तीपाशी व्यक्त करून देखील त्या व्यक्तीने आपले म्हणणे योग्य प्रकारे ऐकून व समजून घेतल्याचे आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे आपण आणखीच विचलीत होतो. कारण त्यावेळी कसेही करून आपले मन मोकळे होण्याची आपल्याला अतिशय आवश्यकता असते. परंतू आजच्या काळात कोणाकडेही आपले रडगाणे ऐकून घेण्याकरीता वेळ नसतो. अशावेळी ते स्वत:च्या औपचारिक बोलण्याने आपल्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या आपल्या गोष्टींवर मात्र अलगदपणे पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण आणखीच दुखावले जातो. म्हणूनच आपण आपल्या भावनांना जोपासण्याची मक्तेदारी स्वत:वर घेतली पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सक्षम म्हणून गणले जावू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात घेतलेल्या अशाप्रकारच्या अनुभवावरून धडा घेवून आपल्यासारख्या अन्य लोकांपर्यंत पोहोचन्याकरीता औपचारीकतेचा नाहीतर आपुलकीचा मार्ग आवर्जून अवलम्बन्याचा निर्धार केला पाहिजे. कारण कालांतराने नात्यांमधील निरपेक्षता संपुष्टात आल्याने आता औपचारीकतेच्या स्वरूपात केवळ मधुर शब्दांचे खेळ करून नात्यांना फक्त आणि फक्त अपमानित करणे सुरू आहे. असे असतांनाही काही बोटावर मोजण्या इतकी माणसे अजूनही आपल्या आसपास आहेत जे आपल्या समस्या ऐकून घेण्यास तयार आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्यामधून बाहेर काढण्याकरीता आपली मदत करण्यासही तयार आहेत. तेव्हा अशा गोष्टींचा सामना करण्याकरीता आपण पेशेवर माणसाची मदत घेण्यास स्वत:ला प्रवृत्त केले पाहिजे. त्यालाच पुढारलेल्या विचारांचे जतन करणे असे म्हणतात. जिथे आपल्याला आपले म्हणणे कोणीतरी मनापासून ऐकून घेतल्याचे समाधान लाभते. त्याचबरोबर आपल्याशी संबंधीत सखोल चर्चा निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचा आनंदही मिळतो.
1 औपचारीकतेतही सौहार्दता जोपासावी.
आजच्या जगात एकमेकांची अगदी वरवर विचारपूस करण्याच्या औपचारिकतेला जरा जास्तच गमतीशीरपणे निभावले जाते. त्याचबरोबर परस्परांच्या भेटीगाठी घेण्याला पाच दहा मिनिटाचा शिष्टाचार म्हणून पाहिले जाते. तर कधी औपचारिकपणे आमंत्रण मिळावे ह्यासाठी मनात रुसवे फुगवे बाळगले जातात. कारण आजचे जग धावपळीचे असले तरी नाते निभावण्याच्या दृष्टीकोनातून मात्र ते फारच कटीबद्ध आहे. त्याचबरोबर ह्या जगात राहून आपल्या आसपास जेवढा जास्त माणसांचा गोतावळा असेल तेवढे आपण लोकप्रिय असल्याचे समजले जाते. त्यामुळे हसून बोलून सर्वांशी संबंध उत्तम ठेवण्याकरीता प्रत्येकजण झटत असतो. परंतू नाते निभावण्याची ही औपचारिक पद्धत मात्र कधीकधी फारच असंवेदनशील वाटत असते. कारण जोपर्यंत आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करत नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीला आपण त्याचे मन मोकळे करण्या इतपत महत्वाचे वाटत नाही. मग तो त्याच्या आयुष्यात कितीही दु:खाचा सामना करत असला तरी त्याची भनक सहजा सहजी आपल्याला लागू देत नाही. तेव्हा कोणाच्या व्यक्तीगत आयुष्यात त्याच्या अनुमतीशिवाय हस्तक्षेप करण्यापेक्षा आपण आपल्या औपचारिक वर्तनात सौहार्दता व माणुसकीचे पालन करून सुद्धा समोरच्या व्यक्तीला काही प्रमाणात तरी आपल्या सहवासातून दिलासा,विश्वास व प्रसन्नता प्रदान करू शकतो.
2 आपल्या आसपास आपुलकीचे विश्व उभारावे.
घर किंवा आपल्या जिवाभावाच्या माणसांचे कुटुंब हे नेहमी निस्वार्थ प्रेम, दया ,करुणा व समंजसपणा आपुलकीच्या ह्या चार स्तंभांनी उभारले गेले पाहिजे. जर तिथे दुर्दैवाने अत्याचार, असंमजसपणा, अवहेलना तसेच विश्वासघाताला समर्थन मिळत असेल तर त्यामुळे घरातील माणसांची मनं अतिशय पोळली जातात. अशावेळी ते भीतीपोटी एकमेकांशी औपचारिक वर्तन करतात. परंतू कधीकधी त्यांची आपसातील धुसपूस ही कोणाच्या जीवन मरणास कारणीभूत ठरू शकते. त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही त्या गेलेल्या जीवाला क्षोभ विक्शोभाचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा आपल्या आसपास औपाचारीकतेने मोठे साम्राज्य उभे करण्यापेक्षा आपुलकीचे एक छोटेशे विश्व उभारावे. जे हृदयाला हृदयाशी जोडण्याकरिता कारणीभूत ठरेल. त्याचप्रमाणे नात्यांना मैत्रीपूर्ण बनवेल. कारण औपचारिकतेचे साम्राज्य कितीही भव्य असले तरी त्यामुळे पोळलेल्या मनांना शीतलता लाभू शकत नाही. परंतू आपलेपणाचे छोटेशे विश्व मात्र आपल्याला जगण्याचे समाधान देवून जाते. त्याचप्रमाणे काहीप्रमाणात का होईना जीवनाचा मतितार्थ समजून घेण्या इतपत आपल्या जगण्याला अर्थपूर्ण देखील बनविते.
3 औपचारीकतेपेक्षा शिष्टाचारास प्रादान्य द्यावे.
औपचारिक वर्तनामुळे बरेचदा नात्यांमध्ये आपसात गैरसमज, तुलना तसेच प्रतिस्पर्धा निर्माण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. कारण पैसा, प्रसिद्धी व उच्च राहणीमानाचा त्यात मोठ्या प्रमाणावर उल्लेख व प्रभाव असतो. म्हणूनच औपचारिक कौशल्यांमुळे भावनिक स्तरावरील आनंद तोकडा पडतो. तसेच भौतिक श्रीमंतीकडे त्याचा कल अधिक असतो. त्यामुळे औपचारिकता सखोलतेकडे दिशानिर्देश करू शकत नाही. परंतू शिष्टाचाराचे पालन करणे म्हणजे संस्कारांनी समृद्ध पिढ्या घडवीन्यासारखे आहे. ज्यात आपल्या पेक्षा मोठ्यांचा आपल्या वर्तनातून सम्मान राखणे, आपल्या जोडीदाराचा एक माणूस म्हणून आदर राखणे, स्त्रियांचा सम्मान करणे, गुरूजानांचा सम्मान राखणे ह्यासारखे शिष्टतापूर्ण आचरण समाविष्ट असते. ज्याच्या तुलनेत आपले औपचारिक दिखावटी वर्तन हे फारच कोरडे व अभद्र वाटते. त्याचप्रमाणे शिष्टाचार हे अगदी नकळतपणे आपली मानसिकता घडवत जातात. तसेच घरातील मोठे शिष्टाचाराचे पालन करत असतील तर त्यांना बघून लहानही आपोआप तसेच वर्तन करू लागतात. तेव्हा आपल्या आयुष्यात कमीत कमी औपचारिकता पाळावी. जिथे तसे वागण्याची गरज नसल्यास किंवा शक्य असल्यास टाळावीच. परंतू शिष्टाचाराचे मनपूर्वक पालन करून आपल्या व इतरांच्याही जीवनाला सोनेरी छटा लावाव्यात.
4 आपलेपणाने विश्वास व मनं जिंकावीत
आजच्या जगात पैसा व प्रसिद्धीच्या मोहात अडकून प्रत्येकजण एका शर्यतीचा भाग बनला आहे. कारण समाजाचे नियम, रितीरिवाज ह्यांचा प्रत्येकाच्या जगण्यावर एकप्रकारे दबाव आहे. त्याचप्रमाणे लोक काय म्हणतील ह्या असाध्य रोगाने प्रत्येकाला ग्रासलेले आहे. त्यामुळेच जगण्यातील आनंद, सुख समाधान हरवून प्रत्येकजण स्वत:बरोबर एकटाच आपल्या पदरात पडलेले दु:ख, व्यथा व भोग भोगत आहे. कारण कोणाकडेही अन्य व्यक्तीची करुणकहाणी ऐकण्यास वेळ व इच्छा दोन्ही नाहीत. लोक इतके आत्मकेंद्री होवून जीवन जगत आहेत कि इतरांचे म्हणणे पूर्णपणे समजून घेण्याअगोदरच ते त्यावर तोडगा किंवा सल्ला देण्याचे श्रेय स्वत:कडे घेतात. समोरच्याला त्यामुळे काही फायदा झाला किंवा नाही ह्याविषयी देखील ते विशेष रस दाखवत नाहीत. एकंदरीत आपण जेव्हा आपल्या जीवनात त्रास व कष्टाचे दिवस कंठत असतो. तेव्हा कोणीतरी आपल्या मनातील वेदना स्वत:हून जाणून घ्याव्यात. त्याचप्रमाणे त्या दृष्टीकोनातून आपलेपणाने भावना व इच्छा व्यक्त करावी. असे प्रत्येकास वाटत असते. निदान शांततेने आपले म्हणणे ऐकून घेवून आपल्याला मनमोकळे करण्याचे समाधान तरी मिळवून द्यावे. परंतू हे स्वप्न पूर्ण होण्याची वाट बघता बघता आपल्या मनावर साचत गेलेल्या भावनांचे असंख्य थर चे थर तयार होत जातात. त्याचप्रमाणे त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य देखील क्षतिग्रस्त होते. अतिरेक तर तेव्हा होतो जेव्हा आपलीच माणसे आपल्याशी औपचारिकपणे वागून तसेच आपल्याला औपचारिक गोष्टी सांगून आपल्या दु:खात आणखीच भर घालतात. त्यामुळेच आज माणसाचा माणसावरचाच विश्वास उडत चालला आहे. तेव्हा आता नात्यांमध्ये सखोल भावनिक चर्चा करून इतरांची मनं मोकळी करण्याकडे जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. तरच आपसात विश्वास व प्रेम निर्माण होण्याची शक्यता आहे.
समस्या, वेदना, विश्वासघात ह्यासारख्या कित्येक नकारात्मक गोष्टी ज्या आज आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा भाग आहेत. त्याचबरोबर आपण त्यांना आपल्या मनात ठेवून वरवर आनंदी असल्याचे तसेच खोटे खोटे हसण्याचे कौशल्य देखील अवगत कलेले आहे. किंबहुना अशाप्रकारे औपचारिकपणे वागण्याकरीता आपल्याला इतरांकडून विवश केले जाते. परंतू आपण जर नात्यांमधील ह्या नकारात्मक गोष्टींवर आपुलकीची भावना ह्या केवळ एका गोष्टीने हळूवारपणे फुंकर घातली. तर कालांतराने त्या नाहीशा होवून नात्यातील प्रेम हे कोणत्याही अपेक्षेशिवाय व संलग्नतेशिवाय कायम अस्तित्वात राहील. परंतू समस्यांना वाळलेली पाने समजून औपचारीकतेच्या मार्गाने जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यात समस्यासोबतच नातीही पोळली जावू शकतात. तेव्हा नात्यांना औपचारीकतेने नाहीतर आपुलकीने जपले पाहिजे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)