कवितेच्या विश्वातलं माझं पहिलं पाऊल

आपण आयुष्याला ठरवून सुंदर बनवू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आयुष्य जगू सुद्धा शकतो _ हे मला आता कळू लागलेलं आहे. त्याचप्रमाणे ते सर्वस्वी केवळ आपल्याच हाती असतं; ह्याची जाणीव आता मला पुरेपूर झालेली आहे. तेव्हा हे सोन्यासारखं जीवन, आता रडत कुढत असंच जावू देण्याची माझी इच्छा नाही. मला त्यात रंग भरायचेत. मला जीवनात ‘आनंद’ निवडायचा आहे. मी स्वत:साठी जे काही करू शकते , स्वत:च स्वत:ला जे काही देवू शकते _ ते सर्व मी भरभरून करायचं ठरवलंय.

मागील काही वर्षांपासून मी लिखाण करतेय. सुरवात मी लेख लिहिण्यापासून केली. त्यातही खूप काही महत्वाकांक्षी नव्हते. फक्त विरंगुळा म्हणून त्यात पुढे पुढे चालले होते. मात्र माझ्या ह्या प्रवासाने माझ्याही नकळत सुरेख वळण घेतले. लिखाणामुळे मला थोडी फार ओळख मिळाली. वाचकांकडून उत्तम प्रतिसादही मिळाला. ज्यामुळे माझ्या लेखणीस बळ मिळाले. त्यानंतर माझ्यात थोडंसं धाडस आलं _ आणि मी पुस्तक लिहीण्याचा मनोमन विचार केला. माझ्या त्या विचारांना लेखणीनेही उत्तम साथ दिली. आज मी दोन बहुमान मिळविलेली ‘लेखिका’ म्हणून गौरवान्वित झाले.

लिखाणाच्या ह्या प्रवासानं मला प्रसिद्धी सोबत भरभरून समाधानही दिलं. कारण आजवर अंतकरणात गच्च साठलेलं हळूहळू बाहेर पडू लागलं. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. असे एकेक करून पाडाव पार करत मी पुढे चालले होते. मग एक दिवस ‘कविता’ करण्याचंही मनात आणलं. माझ्या पहिल्या पुस्तकात मी स्वरचित कविता सुद्धा सादर केल्यात. सुरवातीला मोडकं तोडकंच लिहित होते. मग face book वरील काही साहित्यिक समूहांशी मी जूळले. समूहांच्या माध्यमातून मला लिखाणाच्या क्षेत्रातील दिग्गजांशी भेटता आलं. त्यांच्या सहवासात माझी लेखणी वळणदार, नक्षिकार व नाजूक झाली. समूहाने दिलेले उपक्रम करता करता मी कवी म्हणून स्वत:ला अगदी सहज घडवू लागले होते. आता मी माझ्या स्वरचित कवितांचा संग्रह तयार करण्याचा बेत आखला आहे. ज्यावर मी जोमानं कार्य करत आहे.

मी अविरत माझं लिखाण सुरू ठेवलं _ आणि काळानुरूप त्याला सखोलताही आली. मात्र माझ्या मनात लोकांची व मंचाची भीती असल्यामुळे, मी आजवर माझ्या कविता कधी प्रत्यक्षात सादर करण्याचं धाडस केलं नव्हतं. मी तब्बल एक वर्षापासून कविता लिहिते. आता पर्यंत जवळ जवळ दोनशेच्या वर कविता मी लिहिल्या आहेत. म्हणतात ना, आपल्या प्रामाणीकपणाची नोंद आपल्याही नकळत होत असते _ आणि आपले कष्ट फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाहीत.

8 मार्च जागतिक महिला दिन‘ हा दिवस माझ्यासाठी एक नवा अनुभव घेवून आला. एका साहित्यिक समूहाने virtual कवी संमेलनाचं आयोजन केलं. ज्यात मी धडाडीने सहभागी झाले. कारण स्वत:ला कसोटी लावल्याशिवाय मनातली भीती जाणार नाही, हे मला ठाऊक होतं. मग रंगीत तालीम करत स्वत:ची चांगली तयारी करून घेतली. अखेरीस मी google meet ला join झाले. तिथे इतर साहित्यिकांना बघून मनात जराशी कालवा कालव झाली. कार्यक्रमास सुरवात झाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं _ कि कित्येक जण माझ्या सारखेच संमेलनाचा पहिला अनुभव घेणार होते. कित्येक जण सादरीकरणात अडखडत होते. तरीही न थांबता मंचावर स्वत:ची रचना उस्फुर्तपणे सादर करत होते. एकमेकांना प्रतिसाद देत होते. ते बघून मला दिलासा मिळाला. त्यामुळे माझा नंबर येईस्तोवर मी बऱ्यापैकी स्थिरस्थावर होवू शकले. अशारितीनं माझं सादरीकरनही उत्तमरीतीनं पार पडलं. कवी संमेलन पार पडल्यावर मला स्वत:मध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवला. चार भिंतीतील एकांतात बसून काव्य लिहीणं _ आणि लिहिलेलं काव्य सर्वांपुढे सादर करणं ह्यातला फरक कळला. हा प्रवास आपण करू शकलो तरच आपल्या मनाला समाधान लाभतं.

कविता वाचनाचा हा सुरेख अनुभव, आपल्याशी वाटतांना मला खूप आनंद होतोय. एक साधी सरळ गृहिणी ते लेखक व कवियत्री अशा माझ्या प्रवासाचे आपण साक्षीदार आहात. मला सर्वांना, खास करून माझ्यासारख्या केवळ घरालाच आपले साम्राज्य समजणाऱ्या स्त्रियांना हे सांगावसं वाटतंय _ कि ह्या सीमित विचारसरनीतून बाहेर पडण्यासाठी पहीलं पाउल टाकण्याची हिंमत आपणच केली पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असो, आपल्या आयुष्यातील माणसं कशीही असोत. तरीही तक्रारींना जागा देत जगण्यात कोठेही शहाणपण दिसत नाही. त्यापेक्षा स्वत:ला साद घाला. त्याला आपल्या आतूनच अलौकिक प्रतिसादही मिळेल. कर्तृत्वाच्या चांदण्यांचं तेज आपल्या आयुष्याला उजळून टाकेल. आनंदी राहणं निवडा _ आणि आनंदाने जगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *