
आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते भौतिक श्रीमंतीचे सुख भोगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनात कामाच्या दर्ज्यावरून निर्माण झालेला हा भेदभाव त्यांना सेवा प्रदान करणार्या लोकांशी केलेल्या त्यांच्या वर्तनातून दिसून येतो. पैस्याच्या जोरावर सर्वकाही विकत घेता येवू शकते ह्या गुर्मीत ते जगत असतात. परंतू एका माणसाने दुसर्या माणसाशी माणुसकीने वागणे ही एक सभ्यता आहे. त्याचे मुल्य कोणीही ठरवू शकत नाही. इतरांना सेवा प्रदान करणे हे ज्यांचे पैसा कमविण्याचे साधन आहे. त्या भरवश्यावर ते आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करतात. त्यांच्या त्या कामाला दर्ज्यात तोलणार्या आणि स्वत:ला समाजातील महत्वाचा भाग मानणार्या लोकांच्या विचाराची घसरलेली पातळी त्यावरून दिसून येते.
स्वत:ला श्रीमंतांच्या श्रेणीत बसविणार्या लोकांमध्ये बर्याचदा पोकळ अहंकार दिसून येतो. कारण ते पेशा व भौतिक श्रीमंती वरून माणसांची किंमत करतात. त्यांच्या भेदभाव पूर्ण वर्तणुकीमुळे छोटी मोठी सेवा प्रदान करणार्या लोकांमध्ये आपल्या कामाविषयी कमीपणाची भावना निर्माण होते. म्हणूनच कोणत्याही कामाचा व ते काम करणार्या माणसाचा आपल्याद्वारे अनादर होता कामा नये. ह्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. केवळ पैस्याच्या गुर्मीत जगणे हे पूर्णपणे अमानवीय कृत्य आहे. कारण केव्हा ना केव्हा ह्या लहान व कमी दर्ज्याच्या वाटणार्या परंतू महत्वाच्या कामांमुळे फजिती होण्याची वेळ आपल्यावर खात्रीशीरपणे येतेच. कारण घरातून दररोज निघणारा कचरा, विजेसंबंधीत समस्या, नळांविषयी समस्या ह्या सगळ्या गोष्टी श्रीमंती बघून होण्याच्या टळत नाहीत. परंतू ह्या समस्यांचे निरसन करण्याचे ज्ञान मात्र प्रत्येकाकडे नसते. आपल्याच घरचा कचरा आपल्याला नकोसा होतो व तो फेकण्याची आपल्याला लाजही वाटते. परंतू ही सर्व कामे आपणच केली पाहिजे असा काही नियम नाही. तेव्हा त्यासाठी त्याविषयी ज्ञान असलेल्या व्यक्तीस परस्पर शिष्टाचाराने व त्यांची योग्य किंमत चुकवून पाचारण आपण करत असतो. अशाप्रकारे एकमेकांवर विसंबून व एकमेकांच्या सहकार्याने मानवी जीवनाचे कामकाज सुरळीतपणे सुरू असते. म्हणूनच कोणत्याही माणसाचा पेशा जात गरीब श्रीमंत ह्या मापदंडांचा नाहीतर त्याच्यातील माणुसकीचा परस्पर सम्मान आपल्याकडून झाला पाहिजे.
घरात साचलेल्या कचर्याची विल्हेवाट लावल्याशिवाय आपण कोणतेही सणवार साजरे करू शकत नाही. तर कधी घरात कोणत्याही समस्या उद्भवल्यास आपली तारांबळ उडते. अशावेळी ती कामे सराईतपने करणार्या माणसांची आपल्याला किंमत कळते. कारण आपण कितीही श्रीमंत असलो तरी ही छोटी परंतू अत्यंत महत्वाची कामे आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आणिबाणीच्या क्षणी आपण हतबल होवून जातो. त्यावेळी आपल्याला आपल्या खर्या क्षमतांची जाणीव होते. आपण एकमेकांवर विसंबून आहोत व प्रत्येक काम महत्वाचे आहे हे कळते. तेव्हा कामाच्या दर्ज्यावरून माणसांची किंमत ठरवू नये. तसेच कोणत्याही कामाची मनात लाज बाळगू नये. त्याचप्रमाणे प्रत्येक कामाला व ते करणार्या माणसाला आपल्याकडून योग्य तो आदर देण्यात आला पाहिजे.
जी कामे आपल्या मताप्रमाणे कमी दर्ज्याची असतात ती करणार्यांकडे आपण बर्याचदा सम्मानाने बघत नाही. त्यांच्याविषयी आपण एक मत बनविलेले असते. त्यांच्याशी जुळलेल्या समस्यांवर विचार करत नाही. किंबहूना आपल्याला त्याची गरज वाटत नाही. परंतू त्यांच्या कामात काही कमतरता आढळल्यास, कामावर उशिरा आल्यास किंवा वारंवार रजा घेतल्यास आपण खपवून घेत नाही. त्यावरून त्यांचा अपमान करतो. त्यांच्या वेतनातही कपात करतो. आपल्याला झालेल्या गैरसोयीचा त्यांना पुरेपूर चोप देतो. परंतू कधिकधी त्यांच्या तसे वागन्याच्या मागची कारणे वेगळी असू शकतात. त्यांची एखादी अडचण असू शकते. ती जाणून घेण्याअगोदर त्यांच्या विरोधात पावले उचलणे हे योग्य नाही. सर्वप्रथम एक माणूस म्हणून पुढच्याची आपुलकीने विचारपूस करणे हे देखील आपले आद्य कर्तव्य असते.
कदाचीत त्याक्षणी त्यांना आपल्या सहानुभूतीची व मदतीची आवश्यकता असू शकते. अशावेळी आपण रागाच्या भरात त्यांचे वेतन कापले तर त्यांची कोंडी होण्याची शक्यता असते. तेव्हा काहिही झाले तरिही आपल्याला सेवा प्रदान करणार्यांना वेतन पुर्ण, अगदी वेळेत व आदराने त्यांच्या सुपूर्द केले पाहिजे. वेतन देतांना आपुलकीने विचारपुस केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सद्द्यपरिस्थितीचा उलगडा आपल्याला होवू शकतो. किंवा त्यांना गरज असल्यास मदतही करता येवू शकते. असे केल्याने त्यांच्यात व आपल्यात स्वारस्य निर्माण होते. अशाप्रकारे आपल्या पुढ्यात असलेल्या माणसाला कोणतेही प्रमाणीकरण न देता केवळ दयाभावाने पाहणे हे सर्वस्वी माणुसकीचे प्रतिनिधीत्व करणारे कृत्य आहे.
कधि कधी आपण आपल्याला लाभलेल्या विशेषाधिकारांच्या अहंकारात येवून आपल्याला सेवा देणार्या माणसांना सम्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. त्यांची थट्टा मस्करी करतो. त्यांच्या हातून चुका झाल्यास त्यांना कठोरपणे अपमानीत करतो. कमी दर्ज्याची कामे करणे ही एखाद्याची अडचण असू शकते. परंतू एक माणूस म्हणून प्रत्येकाचा आत्मसम्मान जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. एखाद्याच्या अडचणींचा गैरफायदा उचलणे हे माणुसकीला काळीमा फासण्यासारखे कृत्य आहे. त्याचप्रमाणे कोणाच्याही आत्मसम्मानाला मातीमोल करणे हे अत्यंत घृणास्पद आहे. सम्मान द्यावा व सम्मान घ्यावा हे ब्रीदवाक्य सर्वत्र लागू पडते. कामाच्या दर्ज्यावरून किंवा प्रत्येक गोष्टीत त्यांच्यापेक्षा वरचढ असल्यामुळे कोणासही आपल्या दबावात ठेवणे योग्य नाही. तेव्हाच कामाच्या दर्ज्यावरून माणसा माणसात निर्माण झालेला भेदभाव नष्ट होईल. आणि सर्व कामांना दर्जा प्राप्त होईल.
स्वाभिमान हा कोणत्याही दर्ज्याच्या कामाला दर्जा प्राप्त करून देतो. जर एखादी मोलकरीण म्हणून सेवा प्रदान करणारी स्त्रिही तिच्या कामाला पोट भरण्याचे साधन समजून त्याला प्रामाणिकपणे व सेवाभावाने करत असेल तर ती तिच्या कामाला दर्जा प्राप्त करून देवू शकते. तिच्याशी लोक अदबीने वागतील व ती सर्वांच्या विश्वासास पात्र ठरेल. जर आपल्याला सेवा देणार्या माणसात स्वाभिमानाची ठिणगी असेल तर तिला कधिही विझू देवू नये. त्यांच्या अडचणींवर हसू नये किंवा त्यांना गृहित धरू नये. त्यांना पैस्याचा लोभ दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या सुख दु:खाची विचारणा करावी. त्यांच्या कामाची प्रशंषा करावी. त्यांच्यात एखादी विशेषता आढळल्यास तिला प्रोत्साहन द्यावे. ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतील.
1. कामगारांना नेहमी शंकेच्या नजरेने बघू नये.
काही लोकांनी गरिबीला व विपरीत परिस्थितीला त्यांच्या जीवनात अत्यंत जवळून पाहिलेले असते. सुखसोयींची व भौतिक सुखाची कमतरता ह्या गोष्टी त्यांच्या जगण्याचा भागच असतात. त्यामुळे जेव्हा ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी असतात. तेव्हा त्यांचे लक्ष तेथे राहणाऱ्यांच्या भौतिक समृद्धी कडे सहजच जाते. तसेच ते बघून कधि कधी त्यांच्या मनाचा तोल जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. माणसाच्या हातून चुका ह्या घडणारच. म्हणून त्यावरून त्यांच्या विषयी कायमचे मत बनविने योग्य नाही. त्याचप्रमाणे सतत त्यांना शंकेच्या नजरेने बघणेही चुकीचे आहे. कारण छोट्या मोठ्या चोर्या करण्यामागे त्या व्यक्तीचा स्वाभिमान विरहीत स्वभाव असू शकतो. किंवा त्याची काही अडचणही असू शकते. तेव्हा आपण त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून अशाप्रकारच्या गुन्हेगारी वृत्ती पासून परावृत्त करावे.
जर आपल्या ही गोष्ट लक्षात आली तर शक्य असल्यास त्या व्यक्तीस बोलते करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून काही निष्पन्न न झाल्यास पुन्हा त्या व्यक्तीच्या संपर्कात येवू नये. परंतू एका व्यक्तीकडून असा अनुभव आल्यास दुसर्यालाही त्याच नजरेने बघणे बरोबर नाही. पुढच्या वेळी त्या दृष्टीकोनातून सतर्कता बाळगावी व उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आपल्या श्रीमंतीचे व खाण्या पिण्याचे अवाजवी प्रदर्शन करू नये. त्यांच्या मानसिकतेचा नेहमी विचार करावा. परंतू मनात शंका ठेवून त्यांच्यावर पाळत ठेवू नये. त्यांच्याशी वागतांना माणूसकीने वागावे.
2.कामाच्या जागेवर टॉयलेटची सुविधा असावि.
कामाच्या ठिकाणावर टॉयलेटची योग्य सुविधा नसल्यामुळे माणसे रस्त्याच्या कडेने किंवा आडोशाला उभी असल्याचे आढळून येते. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण कामगारांसाठी ह्या सोयीचा निकडीने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे कामाचे ठिकाण एखाद्या घरी असल्यास त्यांना टॉयलेट वापरण्यास मनाई करण्यात येवू नये. कारण असे वागून आपणच त्यांची कोंडी करतो. तसेच बाहेर कोठेही जाण्याची वेळ त्यांच्यावर आणत असतो. आपण माणूस म्हणून त्यांची अडचण समजली पाहिजे. त्यांची गैरसोय झाली तरी पर्वा नाही, त्यांना सवयच असते. अशाप्रकारच्या त्यांच्या विषयी आपल्या मनात ही विचारधारणा असणे चुकीचे आहे.
जर कामगार एक स्त्रि आहे तर तिच्या सुरक्षेचा जास्त विचार करण्यात आला पाहिजे. जेव्हा आपण अन्य माणसाशी कोणत्याही कारणांनी संपर्कात येतो. तेव्हा त्याला त्याच्या पेशावरून वागणूक न देता एक माणूस म्हणून वागावे. आपल्याप्रमाणेच त्यालाही तहान भूक, आराम, मनोरंजन तसेच टॉयलेट्ची सुवीधा अत्यावश्यक आहे. आणि त्यावरून त्याची गैरसोय होता कामा नये ही काळजी घेणे हीच माणूसकी आहे.
3. कामाच्या जागी त्वरीत प्रथमोपचाराची सुवीधा असावी.
कामगारांची कामे ही अत्यंत जोखमीची असतात. त्यामुळे किरकोळ दुखापती ह्या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतात. परंतू दुखापत मोठी असल्यास त्याचा त्यांच्या कामावर दुष्परीणाम होतो. अशावेळी ते दुखणी अंगावर काढतात परंतू काम थांबू देत नाहीत. तेव्हा कामाच्या जागेवर सर्वप्रथम प्रथमोपचाराची सुविधा करण्यात यावी. जेणेकरून कामाच्या दरम्यान त्यांना लहान सहान दुखापत झाल्यास त्वरीत इलाज करता येईल. तसेच त्या व्यक्तीस जंतूसंसर्ग होण्यापासून वाचविता येईल. त्यामुळे जखम जास्त खोल नसल्यास डॉक्टरांनाही दाखविण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारे त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाचतील. त्याचबरोबर दुसर्या दिवशी ते कामावर हजर राहू शकतील.
जर कधी कामाच्या ठिकाणी मोठा अपघात झाल्यास किंवा आणिबाणीची वेळ आल्यास त्वरीत रुग्णवाहिका बोलवून कामगाराचे प्राण वाचविण्यासाठी हालचाल करावी. कारण ते अंगावर जोखीम उचलून आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करत असतात. त्यामुळे त्यांनी कमविलेला पैसा व त्यांचा जीव हे दोन्ही त्यांच्या कुटूंबासाठी महत्वाचे असतात. तेव्हा अशा प्रसंगी तो कामगार आहे हा विचार न करता त्याच्या प्राणांचे मोल जाणावे. जोखीम हा त्यांच्या पेशाचा भाग असला तरीही त्यांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी तत्पर असणे हे आपले कर्तव्य आहे.
4. कामगारांच्या मानसिकतेचा विचार केल्या जावा.
एखाद्याने केलेल्या कामाचा मोबदला पैस्याच्या रूपात चुकविणे फारच सोपे असते. परंतू कोणास समजून घेणे, त्याच्या आत्मसम्मानास जपणे ह्या गोष्टी आपल्या हातून घडण्यासाठी त्यांच्या जागेवर स्वत:ला ठेवून विचार करण्याची गरज असते. जेव्हा आपल्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरू असते तेव्हा इतरांना सल्ला देणे सोपे असते. परंतू एक उत्तम ऐकुण घेणारा बनून एखाद्याचे मन मोकळे करण्यासाठी हृदयात करूणा असावी लागते. सणासुदीच्या काळात आपल्याला सेवा प्रदान करणार्या बांधवांच्या जीवनात मनापासून आनंद भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणिबाणीच्या काळात त्यांना वेतनाच्या व्यतिरीक्त पैस्याची मदत करण्याइतपत मोठं मन श्रीमंतांनी बाळगलं पाहिजे . तसेच ते करतांना मनात सहानुभूतीची भावना व माणुसकी असली पाहिजे.
कामगार स्त्रियांची लहान मुलेही त्यांच्या सोबत कामाच्या ठिकाणी येतात. तेव्हा त्यांच्यासाठी तिथे सुरक्षीत सोय असावी. स्त्रियांना दर महिन्यात अवघड दिवसांना सामोरे जावे लागते. तसेच त्यांची कामेही अवघड असतात. तेव्हा त्या काळात त्यांना थोडा वेळ आराम करण्याची सवलत देण्यात यावी. त्याचबरोबर त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकीन्स चे वाटपही करण्यात यावे. जेणेकरून त्यांची अस्वच्छतेपासून सुरक्षा होईल. कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असावी. बर्याचदा कामगारांना कुबट वातावरणात काम करावे लागते. ते त्यांच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. जसे विहीर खोदण्याचे काम, गटार सफाईचे काम ही कामे त्यांच्या जीवावर बेतणारी ठरू शकतात. परंतू ते त्यांचे मिळकतीचे साधन आहे. त्यात आपण काहिही करू शकत नाही. तरीही माणुसकी धर्माने त्यांच्या वेदना समजू शकलो व त्यांच्याशी माणुसकीने वागलो तर त्यांची मानसिकता जपू शकतो.
कामगारांची कामे ही शारिरीक व मानसिक दृष्ट्या थकविणारी असतात. त्यासोबत कामाच्या दरम्यान त्यांना कशी वागणूक मिळते ह्यावर दिवसा अखेरीस त्यांची मनस्थिती अवलंबून असते. घरी जावूनही त्यांच्याकडे विशेष सुखसुविधा नसतात. अशावेळी बरेच जण व्यसनांच्या आहारी जातात. कारण त्यांच्या मनात अनेक गोष्टी साचलेल्या असतात. जरावेळ त्यांच्यापासून लांब राहण्यासाठी ते मादक पदार्थांचा आधार घेतात. त्याचबरोबर ते गुन्हेगारी प्रवृत्ती कडेही वळले जावू शकतात. त्यांची आयुष्ये अशी वाया जाण्यापासून वाचविण्यासाठी पावले उचलण्यात यावीत. त्यांच्याशी माणुसकीने वागून त्यांचे मनोधैर्य वाढविणे व वेळोवेळी त्यांना सहकार्य करणे ही प्रत्येकाची समाज हिताच्या दृष्टीकोनातून जबाबदारी आहे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)