कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक

 रोज सकाळी कचरा उचलणार्‍यांच्या गाड्या शहरात सर्वत्र फिरत असतात. गाडीवर वाजणारे गाणे प्रत्येकास परिचयाचे झाले आहे. गाडीत बसलेली दोन तरुण मुले. सराईतपणे आणि मन लावून घरोघरचा कचरा गोळा करून गाडीत टाकतात. त्यावेळी मात्र बरेच जण अर्धवट झोपेत आपल्या बिछान्यातच असतात. गाडीवर उंच आवाजात वाजणार्‍या गाण्याने लोकांची झोपमोड होते. तेव्हा ते बाहेर येवून गाणे बंद करण्यास किंवा त्याचा आवाज कमी करण्यास रागवून सांगतात. अशा आत्ममुग्ध लोकांना त्यावेळी त्यांना त्यांच्या दारात मिळत असलेली सेवा दिसत नाही. किंवा आपल्या सारखाच त्या मुलांनाही गाण्याचा त्रास होत असणार हा विचारही येत नाही. कारण अत्यंत स्वार्थीपणे त्यावेळी ते विचार करत असतात. म्हणूनच त्यांच्या मनात कृतज्ञते ऐवजी शब्दात तक्रार असते. त्या मुलांनी सांगितलेले नियम कोणिही पाळतांना दिसत नाही. कचरा वेगवेगळ्या डब्यात साठविणे, कचरा गेट बाहेर काढून ठेवणे, हे सगळ्या गोष्टी  बर्‍याच लोकांना तुच्छ वाटतात. खुप ठिकाणी असेही बघण्यात येते कि ती मुलेच अशा बेजबाबदार लोकांच्या घराचा कचरा आपल्या हाताने वेगवेगळा करतात. अशाप्रकारे लोक त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. सणांच्या निमीत्ताने ही मुले घरोघरी पैसे मागतात. लोक तेही देण्याची टाळाटाळ करतात. किंवा त्यावरून त्या मुलांचा अपमान करून मग देतात. ह्या गोष्टीला आपण उदाहरण म्हणून पाहिले तरी अशी अनेक कामे आहेत. ज्यांना आपल्या लेखी क्षुल्लक महत्व असते आणि ती कामे करणार्‍यांनाही. 

  आपण कामावरून त्या माणसांना कशी वागणूक द्यायची हे ठरवितो. परंतू प्रत्येक काम तितकेच महत्वाचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि ते काम करणार्‍या माणसाचा मान ठेवणे देखील महत्वाचे आहे. आपण कामाच्या दिरंगाई वरून तसेच कामाच्या गुणवत्तेवरून कोणाला बोल लावू शकतो. परंतू कामाच्या स्वरूपावरूनच माणसाचा अपमान करणे माणुसकीला शोभणारी गोष्ट नाही.  जी कामे करून ते आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करतात. त्या कामांना आपण कमी दर्ज्याची म्हणणे योग्य नाही. आज जर आपण मोठ्या घरांमध्ये राहत असलो. तरीही त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ते काम करणार्‍याची आपल्याला गरज भासतेच. मोलकरीण, ईस्त्री करणारे, स्वच्छता करणारे, चौकीदारी करणारे अशी अनेक कामे आहेत जे करणार्‍यांची आपल्याला पदोपदी गरज भासत असते. ह्याचा अर्थ हा होतो कि कोणतेही काम छोटे मोठे नसते. तेव्हा ही कामे करणार्‍या माणसांना कमी लेखू नये. तसेच त्यांना कधिही तुच्छतेने वागवू नये. जेणेकरून त्यांना त्यांच्या कामाविषयी कमीपणा वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या मनात स्वत:बद्दल कमी आत्मसन्मान आणि कमी आत्मविश्वास निर्माण होणार नाही. ह्याची समज असणे ही समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

1.  दयेच्या नजरेने कोणत्याही माणसास बघावे.

    ज्या कामांना आपण कमी दर्ज्याची समजतो. तसेच आपला असा समज असतो कि कमी दर्ज्याची कामे करणार्‍यांना आपण कशीही वागणूक दिली. तरी काही फरक पडत नाही. तर हा चुकीचा समज आहे. स्वत:मध्ये करुणेचे आणि दयेचे भाव जागृत करून त्यांच्या जागेवर जावून विचार केल्यास. आपण त्यांच्या मनास होणार्‍या यातना समजू शकू. त्यांचे देखील कुटूंब असते आणि त्या कुटूंबाचे ते प्रमुख असतात. जेव्हा आपण त्यांचा अपमान करतो. किंवा त्यांच्या कामांना कमी लेखतो. तेव्हा त्यांच्या मनात स्वत:विषयी कमीपणाची भावना निर्माण होते. अशावेळी घरी जावून त्यांना आपल्या कुटूंबास सामोरे जातांना आत्मविश्वास वाटत नाही. तसेच ते आपल्या नातेसंबंधांना न्याय देवू शकत नाही. कारण आपल्या कडून दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमूळे त्यांच्यातील आत्मसन्मानाला जबर धक्का बसतो. तेव्हा समाजाचे हे कर्तव्य आहे कि माणसाच्या कामावरून त्याची योग्यता ठरवू नये. आपल्या नजरेत आणि वर्तनात माणुसकी आणावी. वेळोवेळी आपल्याला सेवा देणार्‍यास मनापासून धन्यवाद म्हणण्यास विसरू नये.

2. कामाचा मोबदला वेळेत द्यावा.

  कोणी आपल्याला सेवा प्रदान केल्यास त्याचा ताबडतोब मोबदला चुकविणे. त्यात टाळाटाळ न करणे. हे कर्तव्यदक्ष व जागरूक नागरिकाचे लक्षण असते. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या कुटूंबाचे पालण पोषण करण्यासाठी पैसा कमविण्याच्या दृष्टीकोणातून ते काम करीत असतो. त्याला कधी तातडीची गरज भासू शकते. आपण नेहमी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे कि आपल्या वेळेत मोबदला चुकविल्याने एखाद्याची अडलेली कामे मार्गी लागू शकतात. ते आपल्या कुटूंबाच्या गरजा वेळेत पुर्ण करू शकतात. आणि आपल्या कुटूंबियांच्या नजरेत स्वत:विषयी गर्व अनुभवू शकतात.

3. आत्मीयतेने विचारपूस करावी.

   आपल्याला सेवा प्रदान करणार्‍यांना आपण कधीही नोकर समजू नये. ते आपल्या दररोज संपर्कात येणारी माणसे असतात. आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारी करुणा आणि माणुसकी ची भावना त्यांच्यात आणि आपल्यात स्वारस्य निर्माण करते. त्यांना दैनंदीन जीवनात येणार्‍या अडचणी, तसेच कुटूंबातील सदस्यांविषयी आपण आत्मीयतेने विचारपूस केल्यास. त्यांच्या मनात आपल्यासाठी आदर निर्माण होतो. तसेच ते आपल्या कामातही सुधारणा करतात. त्यांच्याकडून आपल्याला इज्जत मिळावी असे वाटत असल्यास. सर्वप्रथम आपण त्यांना इज्जत देण्यास सुरवात करावी.

4. शारिरीक अपंगत्वावरून कोणासही संबोधू नये.

    आपल्याला सेवा प्रदान करणार्‍या मध्ये कोणतेही शारिरीक अपंगत्व असल्यास. किंवा त्यांना त्यावरून अपमान करण्याच्या हेतूने त्यांना उपहासात्मक नावे ठेवू नये. त्यावरून तो कधिही आपल्याला उलटून बोलणार नाही. परंतू त्याच्या मनाला ती गोष्ट बोचत राहील. त्याच्या आत्मसन्मानास धक्का लागेल. तेव्हा नेहमी त्याला त्याच्या नावाने बोलवावे. कामाच्या तृटीवरून किंवा शिस्त आणि नियमांवरून रागविण्याचा पुर्ण अधिकार आपल्याला असतो. परंतू व्यक्तीगत रितीने अपमान करणे किंवा शिवीगाळ करणे तसेच शारिरीक अपंगत्वाचा गैरफायदा उचलणे. म्हणजे माणुसकीला काळीमा फासण्यासारखे आहे.

   आपल्याला सेवा प्रदान करणार्‍यांना त्यांची कामे आपल्यासाठी किती महत्वाची  आहेत. आणि ती न केल्याने सर्वांना किती समस्या उद्भवू शकतात. हे पटवून द्द्यावे. त्यांना समजून घ्यावे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यांचे म्हणणे आत्मीयतेने ऐकुण घ्यावे. असे केल्याने त्यांचे मनोबल वाढेल. आत्मसन्मान वाढेल. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ ही म्हण आपण ऐकली असेलच. कितीही गर्भ श्रीमंत माणसाचेही ह्या छोट्या छोट्या वाटणार्‍या  कामांशिवाय सर्वकाही अडू शकते. तेव्हा ह्या कामांचा  आणि त्यांना करणार्‍या माणसांचा नेहमी सन्मान राखावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *