क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून होत असते. आपले बालपण कसे व कोठे गेले तसेच आपण त्यामधून काय शिकत गेलो आणि मोठे होता होता आपल्यात काय राहून गेले त्यावरून आपला स्वभाव बनत जातो. आपल्या आसपास निरनिराळ्या स्वभावाची माणसे आढळून येतात. कोणी प्रेमळ असतात, कोणी तापट असतात, तर कोणी मिलनसार असतात. परंतू काही माणसांना भेटून त्यांच्या स्वभावाचा अंदाज लावणे अशक्य असते. कारण त्यांच्या वागण्यात चढ उतार दिसून येतात. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे समजणे अत्यंत कठीण असते. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. अशांना आपण क्लिष्ट स्वभावाची माणसेही संबोधू शकतो.

   स्वभावांच्या क्लीष्ट प्रकारांमुळे कधि कधी एखाद्या व्यक्ती बरोबर काही क्षण घालवीणेही जड होते. स्वभाव सारखे असणे तर कठीण आहे परंतू स्वभावातील अंतर समजून घेवून सामंजस्याने आपसात जुळवून घेता येवू शकते. कधि कधी वैवाहीक जीवनातही जोडीदारांच्या वेगवेगळ्या  स्वभावामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. पती-पत्नीमध्ये जर पती क्लिष्ट स्वभावाचा असेल तर पत्नीने सर्वप्रथम स्वावलंबी होण्याच्या दिशेने पहिले पाउल उचलले पाहिजे. कारण त्यामुळे ती स्वत:मध्ये आत्मविश्वास आणू शकेल.  आपला आत्मसन्मान जपण्यासाठी तिने धाडसी वृत्ती दाखवली पाहिजे. त्यासोबत तिने आपल्या स्वभावात विनम्रता आणि बोलण्यात स्पष्टता आणली पाहिजे. तसेच स्वत:च्या स्वभावाचे गुणदोष समजून घेवून त्यात ठरवून व हळूहळू करून किंचीत बदल आणण्याची तयारी दाखविली तर नात्यामध्ये वारंवार निर्माण होणारे क्लेष कमी करता येवू शकतात. आणि नात्याला पुन्हा एकदा नवे व सकारात्मक वळण लागू शकते. स्वभावाला औषध नसते असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. कारण जिथे निस्वार्थ प्रेम आहे तिथे ठरवून सर्वकाही बदलता येवू शकते.

   कोणत्याही स्वभावाच्या दोन बाजु असतात. स्वभावात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याला नकारात्मक वळण लागते. कोणाचाही स्वभाव हा परीपुर्ण नसतो. तर प्रत्येकात काही ना काही खोट आढळून येते. परंतू गैरसमज निर्माण झाला कि आपण दुसर्‍याकडे बोट दाखवीतो. जेव्हा आपण दुसर्‍याकडे एक बोट उचलतो तेव्हा चार बोटे आपल्या दिशेने असतात ह्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकवेळी आपणच बरोबर असू असे होत नाही. तेव्हा स्वत:ला पाठिशी घालण्यापेक्षा स्वत:मध्ये काय बदल घडवून आणता येतील ह्यावर नेहमी विचार केला गेला पाहिजे. आपल्या कोणत्या वागण्याने इतरांना त्रास होतो ह्याचा छडा लावून स्वत:चे परिक्षण करणे गरजेचे असते. त्यामुळे आपणच आणखी आणखी उत्तम होत जातो.

   प्रत्येकाच्या स्वभावात भिन्नता असली तरिही प्रत्येक स्वभावाचा एकतरी विशीष्ट व चांगला गुण असतो. परंतू तो ओळखण्यासाठी आपसात संबंधांची सखोलता असावी लागते. बहुतेक वेळा आपण वरवर एखाद्या विषयी मत बनवीतो. आणी त्याला चांगला किंवा वाईट घोषीत करतो. परंतू कधि कधी आपल्याच विचारांचे दुष्परीणाम आपल्या शरीरावर तसेच आपल्या आयुष्यावर दिसून येतात. आपला स्वभाव गुंतागूंतीचा असेल तर जीवनात कहिही सुरळीत चालत नाही. मानसिक उलथा पालथ, आर्थिक चढउतार तसेच नातेसंबंधातील सलोखा संपुष्टात येवून आपसात शीतयुद्ध सुरू होतात. नोकरी व्यवसायाला उतरती कळा लागू शकते. आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करण्यात येते. जीवनात कोणत्याही गोष्टींच्या योजना आखणे कठीण होवून जाते. अशारितीने गुंतागूंतीच्या स्वभावामुळे एकंदरीत एका बरोबर त्या व्यक्तीच्या जवळच्या माणसांचेही फार मोठे नुकसान होते.

   क्लिष्ट स्वभावाच्या व्यक्तीचे वर्तन हे उघड उघड नसते. क्षणाक्षणात त्यांच्या वागण्यात परिवर्तन दिसून येते. त्यामुळे त्यांच्या सभोवताल एकप्रकारचे नकारात्मक वलय असते. त्यांच्या आपल्या आसपास असण्याने आपल्यावर मनावर व हालचालींवर दबाव असल्यासारखे वाटते. त्यामुळे त्यांच्या सोबत असणारी माणसे सतत भांबावलेली असतात. आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही वाईट परिणाम झालेले असतात. ते त्यांच्या आयुष्यात चिंता व नैराश्यास बळी पडण्याचीही शक्यता असते. कारण त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेलेला असतो.

   त्याचबरोबर क्लिष्ट स्वभावाच्या माणसांच्या  आरोग्याच्याही कायम कुरबूरी सुरू असतात. कारण ते शरिरात काहिही अनपेक्षीत बदल झाले कि मनातून घाबरतात. आणि त्यातून लवकरात लवकर सामान्य होण्यासाठी धडपडत असतात. किंबहूना कधी आरोग्यविषयक प्रश्न उद्भवूच नयेत असेच त्यांना वाटत असते. अशा स्वभावाची माणसे दोन वेगवेगळी व्यक्तीमत्व जगतात. घरातील माणसे जी सतत त्यांच्या सहवासात असतात त्यांना काही प्रमाणात त्यांच्या स्वभावातील विकृती लक्षात येते. परंतू घराबाहेरच्या जगासाठी ते अगदी देवमाणूस असतात. आणी आपले खोटे व्यक्तीमत्व टीकवून ठेवण्यासाठी ते आयुष्यभर स्वत:चे नुकसान करवून घेत असतात. कारण त्यांना कोणासही ठामपणे हो किंवा नाही म्हणता येत नाही. त्यांच्या स्वभावाचा विकृतपणा लपविण्यासाठी कधिही खंबीरपणे कोणाचीही बाजू घेत नाहीत. नेहमी स्वत:कडे महानता घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा लोकांमध्ये अहंकार असतो आणि तो कोणासाठीही हलत नाही. भावनाशील माणसाने त्यांच्याशी नडणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे असते. जी व्यक्ती त्यांच्याशी जुळवून घेते व त्यांच्या अहंकाराला कुरवाळत बसते तीच त्यांच्याबरोबर राहू शकते. अन्यथा त्यांच्याशी विरोध पत्करून राहणेही अत्यंत कठीण होवून बसते.

1. सतत आरोग्यविषयक तक्रारी असतात.

   क्लिष्ट स्वभावाच्या माणसांची मनस्थिती कधिही स्थिर राहत नाही. कारण त्यांच्या गुंतागुंतीच्या स्वभावाचे दुष्परीणाम जवळ जवळ त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर झालेले असतात. त्यामुळे त्यांना कायम काहितरी शारिरीक आजारपण ओढवल्यासारखे वाटत असते. त्यांचे आयुष्य योजनाबद्ध नसते. आणि त्यांच्याकडे कशाची तयारीही नसते. अशावेळी ते स्वत:च्या व घरातील माणसांच्या लहान सहान आजारपणांनेही घाबरून जातात. जीवन अगदी सुरळीत चालावे त्यात कोणतेही चढ उतार येवू नयेत असेच त्यांना वाटत असते. त्यांच्या मनात चाललेल्या सततच्या घालमेली मुळे त्यांना ब्लडप्रेशर, मधुमेह ह्यासारखे आजारही असू शकतात. त्याचबरोबर सांधेदुखी व त्वचेसंबंधीत संसर्गाने ते कायम त्रस्त असतात. त्यासाठी स्वत:वर दररोज औषधांचा मारा करत असतात. अशाप्रकारे त्यांच्या ह्या स्वभावाचे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतात.  

2. भावनाशुन्य असतात.

   क्लिष्ट स्वभावाची माणसे कोणाच्याही भावना समजून घेण्यात कमकुवत असतात. त्यामुळे जी माणसे त्यांच्यात आपल्या भावना गुंतविण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना मानसिक वेदनांचा सामना करावा लागतो. कारण त्यांच्याशी सामान्यपणे चर्चा करणे शक्य होत नाही. संवादादरम्यान ते स्वत:ची बाजू सुरक्षीत ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळे इतरांना होणारा त्रास ते समजून घेवू शकत नाहीत. त्यांच्या डोळ्यात कधीही व कशामुळेही अश्रू येत नाहीत. त्याउलट त्यांच्यामुळे इतरांवर आयुष्यभर रडत बसण्याची वेळ येते. जी माणसे भावनीक व साधी असतात त्यांच्यावर ते आपल्या उपकारांचा पगडा जमवून ठेवतात. तसेच आपल्या जवळच्या माणसांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरीत करत नाहीत आणि त्यासाठी पाठबळही देत नाहीत. त्यांना कायम स्वत:वर विसंबून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व त्याविषयी ते तक्रारही करत असतात. त्यांच्यात व त्यांच्या जवळच्या माणंसांमध्ये नेहमी बेबनाव असतो कारण ते अतिशय आत्मकेंद्री असतात.

3. खोटे व्यक्तीमत्व जगतात.

   अशा लोकांचे जग कायम त्यांच्या अवतीभवती फिरत असते. आपल्या अगदी जवळच्या माणसांनाही ते एका मर्यादेपलिकडे जवळ येवू देत नाही. त्यामुळे कधि कधी ते फरच रहस्यमय वाटतात. कारण ते एकटेच आपल्या व्यक्तीगत विश्वात रममाण असतात. त्यांच्याबाबतीत काहिही अंदाज लावणे अत्यंत कठिण असते. कुटूंबाप्रती असलेली कर्तव्य व जबाबदार्‍या पार पाडण्यास कमकुवत असतात. ती गोष्ट ते आपल्या मनालाही लावून घेत नाही. त्यांचे वागणे यंत्रासम भासते. तरिही इतरांनी त्यांना समजून घ्यावे त्यांची ही अपेक्षा असतेच. ते कायम कल्पनाविश्वात वावरत असतात. परंतू प्रत्यक्षात मात्र त्यांची कशासाठीही काहिही तयारी नसते. त्यांची आयुष्याची कारकिर्दही डामाडोल असते. एकंदरीत त्यांच्यावर विसंबून राहणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा त्यांचा मुळ स्वभाव असतो. त्याचे त्यांना काहिही वाटत नाही. केवळ आश्वासनांच्या भरवश्यावर ते वेळा मारून नेतात. त्यामुळे घरातील माणसांची नाराजी ओढवून घेतात. बाहेरची माणसे मात्र त्यांच्यावर खुश असतात. कारण खोट्या व्यक्तीमत्वाचे प्रदर्शन करून त्यांनी त्यांचे मन जिंकलेले असते.

4. क्लिष्ट स्वभाव हा एक विकार आहे.

   अशा व्यक्ती बरोबर राहणार्‍या माणसांना ह्या स्वभावाचे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यांच्यामुळे त्यांना कोणत्याही आनंदाच्या क्षणांचा भरभरून आनंद घेता येत नाही. घरात नेहमी तणावपुर्ण वातावरण असते. घरातील माणसांच्या मानसिक स्वास्थ्यावरही दुष्परीणाम झालेला असतो. घरातील तणावपुर्ण वातावरणाचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनावरही परिणाम होतो. त्यांचे मित्रमंडळीत मिसळणे तसेच जीवनाचा आनंद घेणे त्यांना अशक्य होते. कारण त्यांचा काहिही दोष नसतांना चिंता करणे व नैराश्यास सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यातून बाहेर येण्यासाठी मानसोपचारतज्ञांचा आधार घेण्याची वेळ त्यांच्यावर येवू शकते. परंतू ही क्लिष्ट स्वभावाची माणसे स्वत:मध्ये किंचीतही बदल आणण्यास तयार नसतात. शिवाय बाहेरच्या जगात त्यांची एक सभ्य माणूस म्हणून ओळख असल्याने त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासाला बळी पडलेल्यांना कोणी मदत करणे तर दूर समजूनही घेत नाहीत. एका बरोबर सर्वांचे जीवन होरपळून जाते. कारण ”आम्हाला स्वत:मध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही. ” असे त्यांचे मत असते. तेव्हा कोणत्याही माणसाचा हा क्लिष्ट स्वभाव हा एक विकार म्हणून घोषीत होतो.

   कोणतिही व्यक्ती नावाने ओळखली जाते परंतू स्वभावाने आठवणीत राहते. तेव्हा प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्या स्वभावाचे परीक्षण करावे. जेणेकरून आपल्या वर्तनाने घराच्या सौख्यावर संकट येता कामा नये. माणसा माणसात स्वारस्य निर्माण व्हावे. एकमेकांना समजून स्वत:मध्ये लहान लहान बदल आणता यावे. आणि प्रत्येकाच्या जगण्याचा हाच दृष्टीकोन असावा. परंतू अशा विकारांमुळे सर्वांचेच जगणे असह्य होवून जाते. अशावेळी स्वत:ला जाणून घेण्यासाठी मेडिटेशनचा आधार घ्यावा. स्वत:मध्ये बदल आणण्यासाठी स्वत:हून प्रेरीत व्हावे. तरच कुटूंबाचे सुख द्वीगुणीत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *