
घर म्हणजे स्त्रियांचे हक्काचे क्षेत्र असते. त्यामुळे तिथे सर्वस्वी आपलेच वर्चस्व असावे असे प्रत्येकच स्त्रीला वाटत असते. म्हणूनच घरासम्बंधीत व आपल्या माणसांसंबंधीत कोणतेही हिताचे निर्णय घेण्यास त्या कायमच अग्रेसर असतात. त्यातल्या त्यात गृहिणींनी तर आपल्या दिनचर्येत घरासाठी एक वेळापत्रक बनविलेले असते. एका प्रामाणिक गृहिणीचे ते वेळापत्रक तपासून पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल कि त्यात त्यांनी केवळ घरातील कामांच्या व आपल्या माणसांच्या महत्वाच्या वेळाच टिपलेल्या असतात. परंतू त्यांनी स्वत:साठी मात्र कोणतीही व्यक्तीगत वेळ ठरविलेली नसते. कारण ते करणे त्यांना महत्वाचे वाटत नाही. परंतू आपल्याला मात्र कधी त्याविषयी दखल घेण्याची गरजही वाटत नाही कि घरातील एक माणूस दिवसरात्र फक्त सर्वांचाच विचार करत असतो. सर्वांच्या सगळ्या आवडी निवडी जपण्यासाठी झटत असतो. त्याने स्वत:चा विचार करणे केव्हाच सोडलेले असते. अशी ही एकमेव व्यक्ती संध्याकाळी आपल्या घरी परतण्याच्या वाटेकडे डोळे लावूनही बसलेली असते. खरे तर आपण हे आपले अहोभाग्य समजले पाहिजे कि ह्या अनोळखी जगात कोणी आपल्यासाठी जीव कि प्राण करण्यास तत्पर आहे. परंतू गृहिणींची ही निरपेक्ष घोडदौड आपण अगदी सहजपणे आपल्या नजरे आड करत असतो. त्याउलट गृहिणी असलेल्या त्या स्त्रीने आपल्या आज्ञेचे पालन करण्यास कायम हजर असावे अशी तिच्याकडून अपेक्षा ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे तिच्याविषयी अनेक चुकीची मत व गैरसमज निर्माण केले जातात. मानसशास्त्रानुसार विचार केल्यास कोणत्याही व्यक्तीस त्याने केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसेल. त्याच्या कामांना नगण्य समजल्या जात असेल. त्याची क्वचित स्तुती करण्याऐवजी तक्रारीच जास्त केल्या जात असतील. त्याची माणूस म्हणून किंमत केली जात नसेल. त्याला हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले जात असेल. प्रत्येकाच्या वेळापत्रकानुसार त्यांच्या वेळेला ग्राह्य धरल्या जात असेल. त्याला आज्ञेत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असेल. तर ह्याचा अर्थ सर्वस्वी हाच होतो कि आपण त्याला आपला सेवक समजत आहोत. अशाप्रकारे गृहिणींशी भावनाशुन्य व्यवहार करून अप्रत्यक्षपणे त्यांची मानसिकताच घडविली जाते. ज्यामुळे कोठे ना कोठे त्यांच्या आत्मसम्मानावर व आत्मविश्वासावर नकारात्मक रेघोट्या ओढल्या जातात. त्याचप्रमाणे गृहिणीच्या मनात न्युनगंड निर्माण होतो.
आपल्या प्रत्येकांच्याच आयुष्यात वेळापत्रकाचे महत्व अनन्यसाधारण असते. कारण त्याशिवाय आपण आपल्याला मिळालेल्या वेळेस योग्य रीतीने उपयोगात आणू शकत नाही. जर आपण स्वत:साठी वेळापत्रक बनविले नाही तर आपला वेळ असाच व्यर्थ व्यतीत होतो. प्रत्येक सर्वसाधारण माणसाची त्याच्या सवयीप्रमाणे एक सामान्य दिनचर्या असते. परंतू साधारणता पाच टक्के लोक मात्र आयुष्यात आपल्या स्वप्नांचा मागोवा घेण्याकरीता एक विशेष वेळापत्रक पाळत असतात. जे नियमबद्ध व शिस्तबद्ध असते. तेव्हाच ते आपल्या जीवनात मोठे यश संपादन करू शकतात. त्याचबरोबर विद्द्यार्थी दशेतील तरुणही वेळापत्रकाचे काटेकोर पालन करूनच ते आयुष्यात प्रगती करू शकतात. एकंदरीत आपण सर्वच आपल्या एका ठराविक वेळापत्रकाचे पालन केल्याशिवाय आपल्या चोवीस तासांना उत्पादनक्षम बनवू शकत नाही. कारण वेळ वाळूसारखा आपल्या हातातून वेगाने निसटत जातो. त्याला मुठीत घेणे अतिशय अवघड असते. जर वेळापत्रक वापरून त्या वेळेचा सदुपयोग केला गेला नाही तर आपल्या आयुष्यातून तो क्षण कायमचा वजा होतो. नंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीही उरत नाही. म्हणूनच प्रत्येकास आपल्या वेळेस अचूक साधता आले पाहिजे. त्यासाठीच वेळापत्रकाचा वापर करणे अनिवार्य असते. परंतू अजूनही एक असा पेशा आहे ज्याचे कोणतेही ठरलेले वेळापत्रक नाही. ज्या पेश्याला दिवसभरातील तासही कमी पडतात. जो इतरांच्या वेळापत्रकानुसार आपले वेळापत्रक बदलवीतो. ज्यास कोणत्याही कारणाने रजा घेण्यास मुभा नसते. ज्यात एका मुख्य पेश्याच्या नावाखाली अनेक उपपेशे असतात. अशा ह्या जगावेगळ्या पेश्याचे नाव आहे ”गृहिणी”. गृहिणींना आपल्या घरासाठी व आपल्या माणसांसाठी त्यांनी कितीही केले तरी कमीच वाटते. म्हणूनच त्या घरातील सर्व कामांचे प्रतिनिधीत्व स्वत:जातीने उपस्थित राहून करत असतात. त्याचप्रमाणे घरातील मंडळींना स्वावलंबी होण्यापासून परावृत्त करतात.
खरेतर गृहिणीच्या ह्या निरपेक्ष समर्पनाकरीता घरच्यांनी कायम त्यांचे ऋणी असले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या वागण्यातून वेळोवेळी त्यांच्या भावनिक गरजेला प्रमाणीकरण दिले पाहिजे. तसेच प्रेम व काळजीयुक्त शब्दांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांचे आभार मानले पाहिजे. जेव्हा गृहिणींना घरातील त्यांच्या भूमिकेला व स्थानाला स्पर्धा निर्माण होण्याचा आभास होतो तेव्हा त्या मनाने दुखावल्या जातात. परंतू जेव्हा घरातील त्या महत्वपूर्ण स्थानावर त्यांचे घट्ट पाय रोवून उभे राहणे किती आवश्यक होते. त्याचप्रमाणे ते कसे सर्वांच्या हिताचे ठरले. हे त्यांना आवर्जून दर्शविले जाते तेव्हा त्यांचे मन कृतकृत्य होते. त्यामुळे त्या आणखी जीव ओतून आपल्या भूमिकेत शत प्रतिशत योगदान आजीवन देत राहतात. गृहिणी कितीही विपरीत परिस्थितीत काम करू शकतात. तसेच आपल्या माणसांसाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते. परंतू त्या कष्टांची कोणास जाणीव आहे व आपले योगदान निष्कारण व्यर्थ जाणार नाही ह्या गोष्टींची त्यांना आपल्या माणसांकडून हमी पाहिजे असते. आपल्या माणसांच्या प्रगतीसाठी त्या मनापासून आजीवन सद्भावना व सदिच्छा व्यक्त करत असतात. परंतू कधीकधी घरच्यांचेच त्यांच्या बाबतीत गैसमज होत असतात. त्यांना असे वाटते कि गृहिणीनी फक्त घरातील कामे करण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. अशाप्रकारे ते आपल्या गैरसमजूतीने व तोकड्या दृष्टीकोनाने त्यांची योग्यता ठरवून मोकळे होतात. परंतू घरातील कामे सराईतपने करण्याचे कौशल्य हे अशाप्रकारे दुर्लक्षित करणे योग्य नाही. कारण तो देखील कित्येक स्त्रियांचा पैसे कमवीन्याचा एक स्त्रोत आहे. तसेच त्यासाठी स्त्रियांना आपला संयम पणास लावावा लागतो. कोणतीही गृहिणी कधीही आपले घर व आपल्या माणसांअगोदर स्वत:चा विचार करत नाही. म्हणूनच त्यांचे वेळापत्रक घरच्यांसाठी सोयीस्कर असते. परंतू घरच्यांसाठी ती विनामुल्य उत्तम सोय असली तरी त्यासाठी गृहिणींना मात्र कायम तारेवरची कसरत करावी लागते. त्यामागे असलेल्या त्यांच्या भावना केवळ कर्तव्याशी जोडल्या गेलेल्या नसतात. तर आपल्या माणसांप्रती इमान असते. जे त्यांना काहीही झाले तरी दमू व हार मानु देत नाही.
गृहिणी घरासाठी स्वत:ला वाहून देतात. त्याचबरोबर आपल्या माणसांच्या आयुष्यात कणखरपणे पडद्यामागची भूमिकाही निभवत असतात. तेव्हा त्यांच्या करीताही एक वेळापत्रक बनविले गेले पाहिजे. ज्यात त्यांच्या आरोग्यासंबंधी, शिक्षणा संबंधी, खाण्यापिण्याच्या वेळासम्बंधी, त्यांच्या मीटाईम संबंधी काळजीपोटी काही नियम व नियोजन केले असले पाहिजे. त्याचबरोबर ते नियम पाळण्याची त्यांच्यावर सक्ती केली गेली पाहिजे. अशाप्रकारे आपण आपल्यासाठी घरातील महत्वपूर्ण क्षेत्र भक्कमपणे पेलणाऱ्या गृहिणींच्या स्वरूपातील आपल्या आई, बायको, बहिण ह्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण स्त्रियांनी सक्षम व्हावे असे वाटत असेल तर त्यांचा वेळ कसा उत्पादनक्षम बनविता येईल ह्या विषयावर आवर्जून दृष्टीक्षेप टाकला गेला पाहिजे. घराचा कणा मजबूत ठेवायचा असेल तर गृहिणींचे आरोग्य जपले गेले पाहिजे. घराला सुशिक्षित बनवायचे असेल तर गृहिणींच्या शिक्षण घेण्यावर जोर दिला पाहिजे. त्याचप्रमाणे गृहिणींचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी त्यांना स्वत:बरोबर जास्तीत जास्त वेळ कसा घालविता येईल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना ते शक्य व्हावे म्हणून घरच्यांनी गृहिणींच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे. गृहिणींचा आत्मविश्वास वाढवीन्याकरीता त्यांना त्यांच्या आवडत्या विषयात किंवा क्षेत्रात ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यात आले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या अंगी कौशल्यांची भर पडेल आणि त्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचा विचार करू शकतील. अशाप्रकारे त्यांच्यातील संभवनीय शक्यता बाहेर येवू शकतील. तसेच गृहिणी हा पेशा ज्याला गृहीत धरले जाते. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या स्त्रियांना स्वाभिमानाने जीवन जगता येईल. त्याचप्रमाणे गृहिणींना आपली भूमिका पार पाडतांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो ह्याची प्रत्येकास जाणीव होईल.
अशाप्रकारे गृहिणींच्या मनात त्यांच्या घर कामांविषयी कमीपणा किंवा न्युनगंड निर्माण होण्यास कोठेतरी आपणच जबाबदार असतो. ह्या विषयी आता मोठ्या प्रमाणात जागरूकता येवू लागली आहे. गृहिणींचे चातुर्य व कौशल्य जगासमोर आणण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना संधी उपलब्ध व्हाव्यात. त्याचप्रमाणे गृहिणींना घराबाहेर पडणे शक्य नसल्यास त्यांना घरातूनच काम करण्याची सोय असावी. अशी व्यासपीठ आता कार्यशील आहेत. त्यामुळे गृहिणी देखील आता घरात आपले शत प्रतिशत योगदान दिल्यानंतर अर्थार्जन करण्याचा फक्त विचारच करत नाहीत तर त्या दृष्टीने पावले देखील उचलू लागल्या आहेत. गृहिणींचा पेशा आजतागायत पूर्णपणे दुर्लक्षित होता. कारण त्या पेशाविषयी अनेक गैरसमज मनात बाळगले गेलेले आहेत. घरातील सुविधाजनक वातावरणात राहून गृहिणींना काम करण्यास कोणताही त्रास होवू शकत नाही असा प्रत्येकाचा समज असतो. परंतू गृहिणींना मनस्ताप घरातील कामांमुळे नाहीतर त्यांच्याप्रती व त्यांच्या कामांप्रती असा निम्न स्तराचा दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांमुळे होत असतो. कारण ते गृहिणींचा कोणत्याही कामाप्रती असलेल्या समर्पनामागचा उदात्त हेतू समजू शकत नाहीत. म्हणूनच जेव्हा पुरूष संध्याकाळी कामावरून घरी परततो तेव्हा त्याचे थकलेले असणे ग्राह्य धरले जाते. परंतू गृहिणी घरातील त्याच वातावरणात राहून दिवसभर घरात काय करतात हे प्रत्येकाला पडलेले एक कोडंच असते. त्यांच्या थकण्याला सर्रास अमान्य केले जाते. त्याचप्रमाणे त्या जर त्यांच्या झोपेच्या वेळेपर्यंत काम करतांना दिसल्या तरीदेखील कोणीही त्यांना थांब असे म्हणत नाही. अशाप्रकारे गृहिणीनी आपले वेळापत्रक सर्वस्वी घराला व घरातील माणसांना समर्पित केलेले असते. तेव्हा त्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या घरातील गृहिणींचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काही रोचक कल्पना प्रत्यक्षपणे राबवीन्याचा स्वत:शी प्रण केला पाहिजे. त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात काही उत्साहवर्धक फेरबदल आणण्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे आपले कदापि दुर्लक्ष होता कामा नये. वेळोवेळी त्यांना आश्चर्यचकीत करणाऱ्या व त्यांच्या मनाला सुखद धक्का देणाऱ्या भेटवस्तू देवून त्यांचे मन प्रफुल्लीत ठेवले पाहिजे. एकंदरीत घरच्यांचे आपल्याकडे लक्ष आहे. त्याचप्रमाणे ते त्यांच्या आयुष्यात प्रगती करत आहेत ह्या दोनच गोष्टी गृहिणींना नेहमी ताजेतवाने ठेवण्यास पुरेशा असतात. कारण गृहिणीचा पेशा निभावण्यास सेवाभाव लागतो आणि सेवाभावाने माणूस आपोआपच समाधानी व विनम्र होत जातो.
1 गृहिणींच्या वेळेला कधीही गृहीत धरू नये
घर हे गृहिणींचे कार्य क्षेत्र असल्यामुळे त्या चोवीस तास घरातच असतात. ह्याचा अर्थ हा होत नाही कि त्या प्रत्येकवेळी घरातील सदस्यांच्या आज्ञेचे पालनच करत राहतील. त्यांना आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आपली दैनंदिन कामेही असतात. परंतू बऱ्याचदा गृहिणींना ”ही घरीच असते तेव्हा हे काम हीच करेल” किंवा ”हिला सांगा ही घरीच असते” अशी वाक्ये ऐकायला मिळत असतात. परंतू प्रत्येकच वेळी ती हक्क दाखविण्याची पद्धत असू शकत नाही. तर गृहिणींना व त्यांच्या वेळेला गृहीत धरण्याचे प्रमाण असते. तेव्हा अशी वाक्ये सहजच तोंडून काढण्याअगोदर त्यांचे गृहिणी असलेल्या स्त्रियांच्या मनावर काय परिणाम होवू शकतात ह्या गोष्टीचा नक्कीच सखोल विचार केला गेला पाहिजे. कारण नेहमी नेहमी जेव्हा कधी सहज तर कधी ठरवून एखाद्याला त्याची जागा दाखवून दिली जाते तेव्हा त्याच्या आत्मसम्मानाला मोठा आघात पोहचत असतो. त्यामुळे एकतर त्या व्यक्तीमधील संभाव्य क्षमता कधीही बाहेर येवू शकत नाहीत. तर कधी त्यामधून ठिणगी घेवून ती व्यक्ती आपल्यातील क्षमतांना उजाळा देते व जगासमोर सिद्धही करून दाखविते. परंतू दोन्ही शक्यतांमध्ये आपल्याला त्यांच्यातील तो निरागस निर्दोशपणा पुन्हा बघावयास मिळत नाही. कारण आपण त्यांना असमंजसपणे वागणूक दिल्यामुळे स्वरक्षणार्थ त्यांच्यातील स्वाभिमान जागृत होत असतो. तेव्हा गृहिणींच्या वेळेचा आपल्या हिशोबाने वापर करणे आता कोठेतरी थांबविले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कल्पनाशक्तीची तसेच त्यांच्यातील क्षमतांची पुन्हा भरभराट होईल. ज्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व उजळून निघेल.
2 गृहिणींच्या ”मी टाईम ” चा सम्मान करावा
गृहिणींच्या वेळापत्रकात शक्यतोवर मी टाईम ला जागा नसते. तरीही जर त्यांना त्यांच्या त्या व्यक्तीगत वेळेचे महत्व पटले. तसेच त्यांनी त्यासाठी राखीव वेळ ठेवलेला असला तर त्यांच्या निर्णयाचा नेहमी सम्मान करावा. कारण गृहिणी आपल्या घराशी तर एकरूप झालेल्या असतात. परंतू स्वत:पासून मात्र लांब होत जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या स्वत:बरोबर पुरेसा वेळ घालवू शकत नाहीत. त्यामुळे कालांतराने त्या निरस होत जातात. त्यांना आपल्या आवडी निवडीही ज्ञात राहत नाहीत. केवळ घरात आपण किंचितही कमी पडता कामा नये फक्त एवढेच त्यांच्या करीता महत्वाचे असते. तेव्हा गृहिणींनी घरासाठी केलेल्या समर्पनास कायम वंदनीय समजले पाहिजे. त्याचबरोबर त्यांना स्वत:ला उत्तम व पुरेसा वेळ देता यावा. तसेच त्यांना आपल्या अंतर्मनाचा सखोल शोध घेता यावा म्हणून त्यांच्या अंगावरच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी घरातील सदस्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. कारण घर हे सर्वांचे असते मग गरजेनुसार घरातील कामे करतांना कोणासही कमीपणा वाटता कामा नये. जर गृहिणी आजारपणातून जात असतील तर औषधांबरोबरच त्यांना पुरेसा आराम करण्याची सक्ती केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी विरंगुळा म्हणून काही योजना आखल्या असतील तर त्यात आनंदाने सहभागी व्हावे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या चालण्याचा किंवा व्यायामाचा वेळांमध्ये नियमीतपणा आहे किंवा नाही ह्याकडे जातीने लक्ष द्यावे. त्यांना वाचनाची आवड असल्यास किंवा त्यांना काही कौशल्य अवगत करायची असल्यास त्यासाठी त्यांच्या व्यक्तीगत वेळेत भर पडावी म्हणून जागृत असावे. त्यांच्या मी टाईम मध्ये कोणीही अडथळा निर्माण करू नये. तसेच त्यांच्या मनात त्याविषयी अपराधीपणाची भावना निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेतली जावी. हा आपण गृहिणींच्या निस्वार्थ सेवाभावाचा केलेला सम्मान ठरू शकतो.
3 गृहिणींना औपचारीकतेच्या बंधनात अडकवून ठेवू नये
काही गृहिणी आपली ठराविक दिनचर्या आटोपल्या नंतर त्यांच्यापाशी असलेल्या रिकाम्या वेळेसही उत्पादनक्षम बनवीन्याचा विचार करत असतात. त्यासाठी त्या आपली कौशल्ये व जुने छंद जोपासण्यासाठी उत्साही असतात. परंतू कधीकधी औपचारीक बंधनांमुळे किंवा परम्परानिष्ठतेमुळे घरातील काही अशी कामे असतात जी फक्त स्त्रियांनीच करावीत. असे कधीही व कशासाठीही न बदलणारे काही नियम घरांमध्ये पाळले जातात. अशावेळी कोणीही स्त्रियांना समजून घेत नाही. त्यामुळे स्त्रियांना एकतर आपल्या मनाला आळा घालावा लागतो. किंवा सर्वांचा विरोध पत्करून आपले कार्य सुरू ठेवण्याचे धाडस करावे लागते. ज्यामुळे त्यांच्याप्रती घरातल्यांचे मत दुषित होते. परंतू आता काळ बदललेला आहे. तेव्हा त्यासोबत आपल्या विचारातही परिवर्तन अपेक्षित आहे. जेणेकरून स्त्री पुरूष भेदभावात अडकून स्त्रियांना मोठे नुकसान सहन करावे लागू नये. तेव्हा जर घरातील गृहिणी आपल्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून काही पावले उचलत असतील तर त्यांचे समर्थन करणे व त्यांना सहयोग करणे आपल्यासाठी महत्वाचे असले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम हे काम स्त्रियांचे आहे व काहीही झाले तरी ते त्यांनीच करावे हा अट्टाहास सोडला पाहिजे. उलट त्यांना वेळेची मुभा देवून व त्यांची बाजू सांभाळून घेवून त्यांचे सहकार्य केले पाहिजे. अशाप्रकारे औपचारीकतेच्या बंधनात अडकवून गृहिणींची कोंडी करण्यापेक्षा तसेच गृहिणींच्या पेशाला काय जॉब आहे हा म्हणून हिणावीन्यापेक्षा त्यांच्या पाठीशी पडद्यामागची भूमिका अभिमानाने निभावने जास्त योग्य ठरेल.
4 गृहिणींचे वेळापत्रक हे सर्वस्वी त्यांच्या हिताचे असले पाहिजे
वेळापत्रक बनवीन्याचा अर्थच हा असतो कि आपल्या वेळेला एक योग्य दिशा व उद्देश मिळावा. त्याचप्रमाणे वेळापत्रकानुसार आयुष्यात मार्गक्रमण करणारा व्यक्ती महत्वाकांक्षी असतो. तेव्हाच त्याने आपल्या वेळेला योग्यरीतीने विभाजित केलेले असते. जेणेकरून त्याने त्याच्या वेळेत केलेली गुंतवणूक ही त्यांच्यासाठी कल्पनेपलीकडील यश देण्यासाठी सक्षम असेल. त्याचप्रमाणे जर गृहिणींना त्यांच्या आयुष्यात वेळापत्रकाचे महत्व कळले असेल तर ते त्यांच्या हिताचे व त्यांच्यासाठी प्रगतीचे द्वार उघडणारे कसे ठरू शकते ह्याविषयी त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले पाहिजे. कारण कधीकधी गृहिणींचा असा समज होतो कि त्या सक्षम होवू शकत नाहीत. तेव्हा त्यांनी स्वावलंबी होण्याचा विचार सोडून आपल्या सामान्य दिनचर्येत समर्पित राहिले पाहिजे. परंतू गृहिणींचा प्रामाणीकपणा व जिद्द ही त्यांची खरी ताकद असते. त्यात जर त्यांनी आपल्या वेळेला शिस्त लावली तर त्यांना स्वत:मध्येच एका प्रबळ उर्जेची जाणीव होवू शकते. त्याचबरोबर त्या त्यांच्या कोणत्याही वयात व कशाही परिस्थतीत आपली कारकीर्द सुरू करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचालही करू शकतात. म्हणूनच गृहिणींनी वेळापत्रक बनवितांना त्यात स्वत:लाही महत्व दिले पाहिजे. कारण त्यांचा वेळ कसा व्यतीत होतो आणि कशाप्रकारच्या संगतीत व्यतीत होतो ह्या दोन गोष्टी त्यांचे सक्षम व उज्वल भविष्य घडण्यासाठी फार महत्वाच्या असतात.
स्त्रियांचा पदर हा त्यांच्या सात्विक स्वरूपाचे व त्यांच्यातील आईपणाचे रक्षण करत असतो. म्हणून स्त्रिया त्याला सभ्यतेने सांभाळतात. त्याचप्रमाणे स्त्रीया आपल्या पदरात आपल्या माणसांची स्वप्न व इच्छा सजवून प्रेमाने जोपासून ठेवत असतात. त्याचप्रमाणे ती स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून आपल्या वेळेची व भावनांची गुंतवणूक आजीवन त्यात करत असतात. हा स्त्रियांच्या समर्पणाचा भाग झाला. परंतू जेव्हा गृहिणी स्वत:चे वेळापत्रक बनविण्याचे धाडस करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात सकारात्मकरीत्या उलथापालथ होते. कारण त्यावेळी त्यांना स्वत:ची किंमत कळलेली असते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)