
गृहिणी म्हंटले की सगळ्यांचा त्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते एक सैलसर कपड्यातील व केस विस्कटलेली तसेच स्वत:ला घरकामात गुंतवून घेतलेली स्त्री. जिचा आत्मविश्वास कमी असतो. कारण तिच्या कामातून घरात मिळकत येत नाही. ह्या गोष्टीचा तिच्या मनात न्युनगंड असतो. त्यामुळे तिला सगळेजण तूही काही कर असा सल्ला देतात. आपल्या समाजनिर्मीत व्यवस्थेत स्त्रीयांना बंधनात ठेवण्या कडे कल आहे. त्यातल्या त्यात ती जर गृहिणी असेल तर मग ती घरातील प्रत्येकाच्या अपेक्षांना न्याय देणारी असावी असे प्रत्येकास वाटते. फारच कमी गृहीणीन्ना त्यांच्या गृहिणी असण्याचे समाधान लाभते. मी माझ्या आयुष्यातील सर्वात समंजस आणी समर्पीत गृहिणी अत्यंत जवळून पाहिली ती म्हणजे माझी आई. परंतु तिचे स्वत: कडे मात्र कायम दुर्लक्ष असायचे. कारण तिने स्वत:ला घरासाठी पुर्णपणे वाहून दिलेले होते. परंतू गृहिणी असलेल्या स्त्रीयांनी स्वत:ला अशाप्रकारे गृहीत धरणे व स्वत:कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्या कोणते काम करतात ह्या हूनही जास्त महत्वाचे असते त्यांनी स्वत: कडे एक व्यक्ती म्हणून पाहणे. त्या त्यांच्या कामातुन घरामध्ये पैश्याच्या स्वरूपात मदत करतात किंवा नाही त्या पेक्षा त्या घरातच राहुन आपल्या संस्कारांनी व अजोड प्रेमाने आपल्या कुटूंबाला बांधुन ठेवतात हे कमी महत्वाचे नसते. स्त्रियांचे घरात एक महत्वाचे स्थान असते. सर्वप्रथम ह्याची त्यांना स्वत:ला जाणीव असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे असणे, त्यांचे कुटूंबाप्रती मोलाचे योगदान आणि त्यांचे प्रामाणिक श्रम ह्यांना त्या महत्व प्राप्त करून देवू शकत नाहीत. जसे राजमाता जिजाऊं च्या संस्करातुन व स्वाभिमानी बाण्यातून छत्रपती शिवाजी महाराज घडले तसेच रमाबाईंनी त्यांच्या संसाराप्रती केलेल्या श्रमाच्या व त्यागाच्या योगदानातून जगाला बाबासाहेब आंबेडकर लाभले. देशाचा इतिहास घडविणाऱ्या ह्या दोन योद्ध्यांच्या पाठीमागे ढालीसारख्या उभ्या राहिलेल्या ह्या स्त्रियांनी आपली पडद्यामागची अति महत्वपूर्ण भूमिका एकीने आई म्हणून तर दुसरीने पत्नी म्हणून निभावल्यामुळे त्याही योद्ध्याप्रमाणेच आपल्या स्मरणात राहिल्यात. त्याच प्रमाणे आजच्या स्त्रीयांनी जगण्याकडे दूरदृष्टिने बघण्याची तसेच आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज़ आहे. त्यांच्याशिवाय मानवजातीला काहिही अर्थ उरत नाही. कारण त्यांच्यातील भावना हेच त्यांचे मजबूत शस्त्र असते. तेव्हा त्या त्यांच्या भावनांचे व अस्सल व्यक्तीमत्वाचे मुल्य देवून पुन्हा एखाद्या महापुरूषाला घडवू शकतात. ज्यांची आज जगाला नितांत गरज आहे.
गृहिणी म्हणजे आपल्या कष्टाने आणि आपल्या प्रेमाने घराला घरपण देणारी स्त्रि. गृहिणी म्हणजे अख्खे घर जिचे ऋणी असले पाहिजे अशी घरातील लक्ष्मी. गृहिणी म्हणजे घरातील लहानमोठ्या सर्व कामांना महत्व देवून स्वाभिमानाने व आत्मसम्मानाने मिरवणारी गृहस्वामिनी. परंतु दुर्दैवाने किती तरी अशा गृहिणीही आहेत ज्यांना घरातील कामे करणे कमीपणाचे वाटते . घरातील कामांसाठी मोलकरीण नियोजून त्या किटी पार्टीँ, अवाजवी गप्पा, महिला मंडळ अशा कामात व्यस्त असतात. ह्याचा अर्थ हा होतो कि गृहिणी असूनही आपल्या त्या स्थानाला व भूमिकेला त्या महत्व देत नाहीत. घरातील कामे करून त्यांना स्वत:चे अवमुल्यन झाल्यासारखे वाटते. परंतू कोणतीही कामे कमी दर्ज्याची नसतात केवळ आपण त्यांची तुलना इतरांशी करून त्यांना कमी महत्वाची समजतो. जर गृहिणी असलेल्या स्त्रियांनी त्यांच्या घराशी निगडीत कामांना आणि आपल्या गृहिणी असण्याला सकारात्मक नजरेने व आदराने पाहिले तर इतरांकडूनही त्यांना सम्मानपूर्वक वागणूक मिळेल. कारण संपुर्ण घराची भिस्त गृहिणींच्या खांद्यांवर असते. तेव्हा त्यांच्या जबाबदार्यांना खास महत्व देवून त्यांनी घरात ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यास घरातील बाकी मंडळी बिनधास्त घराबाहेर पडतील आणि प्रगतीही करतील. कारण काम कोणतेही असो परंतू ते करण्यामागे आपला हेतू प्रामाणिक असला तर त्या कामास आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होत असते.
कोणत्याही गृहिणीत परोपकाराची भावना असली पाहिजे. कारण तिचे कर्तव्य केवळ घर सांभाळणे नाही तर घरातील माणसांना समजून घेणे, त्यांचे आरोग्य जपणे,स्वत: हसतमुख राहून संपुर्ण घराला हसत खेळत ठेवून घराचा प्राण जपणे, घरातील सदस्यांना योग्य वेळी मोलाचा सल्ला देवून उत्तम सल्लागार बनने ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी गृहिणींना घ्यावी लागते. गृहिणींना घराचा श्वास असेच म्हंटल्या जात नाही. परंतू त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम स्वत:ची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वत:मध्ये योग्य ते बदल आणले पाहिजे. जसे स्वत:मध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी व घरी येणार्या अतिथींपुढे हसतमुखाने सादर होण्यासाठी नेहमी स्वच्छ राहणे, स्वत:ला शोभेशे व आरामदायक कपडे घालणे, केस निट करून बांधणे, त्वचेची निगा राखणे तसेच अद्दयावत राहणे ह्या सर्वसाधारण वाटणार्या परंतू महत्वाच्या गोष्टी त्यांनी करणे आवश्यक आहेत.
१. सकारात्मक राहावे
घरकामे ही थकविणारी व दिवसभर व्यस्त ठेवणारी असतात. अशा कामांना कुणीहि आनंदाने करित नाही. त्यासाठी त्या कामांप्रती मनात आवड असावी लागते. गृहिणींना मात्र ह्या कामांपासून वाचण्यासाठी कोणताही पर्याय नसतो. तेव्हा त्यांनी घरकामांना श्रेष्ठ रूप देवून त्याविषयीची संकल्पनाच बदलून टाकली पाहिजे. जशा नोकरी करणार्या स्त्रीया कामावर जातांना व्यवस्थित तयार होतात. चांगले कपडे घालून घराबाहेर पडतात. त्याचप्रमाणे गृहिणींनीही स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी व दिवसभर कामे करूनही हुरूप टिकवून ठेवण्यासाठी अशाप्रकारे नीट तयार होवून कामांना सुरुवात केली पाहिजे. त्यांनी हसतमुख रहिले पाहिजे. सर्वसाधारण व ठरलेली दिनचर्या रोज पाळण्यापेक्षा आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काम करण्याच्या पद्धतीत रोचक बदल करत राहिले पाहिजे. ज्यामुळे त्यांना कामांचा कंटाळा येणार नाही. त्याचबरोबर कामाचे नियोजन करून त्यांना आपल्या वेळेची बचतही करता येवू शकते. त्यासोबत त्यानंतर मिळणारा रिकामा वेळही त्यांना निर्मीतीक्षम बनविता येवू शकतो. अशा प्रकारे घरच्या कामांप्रती गृहिणींचा दृष्टीकोण सकारात्मक राहिल.
२. सेवाभाव ठेवावा
घरातील कामात जास्तीत जास्त गोष्टी स्वच्छ्तेत मोडतात. जसे कपडे धुणे, भांडी घासणे, बाथरूम-टॉयलेट साफ करणे, घराची झाडलोट करणे ई. जर ही कामे करतांना आपण सेवाभाव नाही ठेवला तर गृहिणींना ती कामे तुच्छ वाटू लागतील व ती करत असतांना त्यांची मनस्थिती चांगली राहणार नाही. त्यांंच्या मनात स्वत:प्रती कमीपणाची भावना निर्माण होईल. परंतू जर त्या कामांच्या प्रती त्यांचे समर्पण व सेवाभाव असेल तर घरातील माणसांचे आरोग्य उत्तम रहावे व घराला चैतन्य प्राप्त व्हावे यासाठी त्या आणखी झटतील. आपल्या माणसांना उत्तम खावू घालता यावे म्हणून स्वयंपाक करतांना त्यांचे चित्त प्रसन्न असेल. जेणेकरून पोटाच्या मार्गाने जावून त्या आपल्या माणसांची मन जिंकू शकतील. प्रत्येक काम त्या मन लावून करतील आणि त्यांची उत्पादनक्षमताही वाढेल. अशाप्रकारे मनात सेवाभाव असल्यामुळे कामे करतांना त्यांना स्वत:विषयी आदरच वाटेल.
3.घरातील सदस्यांना स्वावलंबी बनवावे
गृहिणी घरातील सदस्यांच्या दिनचर्येप्रमाणे स्वत:च्या कामात बदल करतात. कारण त्यांच्यासाठी स्वत:पेक्षा जास्त घरातील माणसे जास्त महत्वाची असतात. त्याचे दुष्परीणाम म्हणजे त्यांची कामे त्यांना दिवसभर करावी लागतात. त्यामुळे त्या स्व:ताकडे लक्ष देवू शकत नाहीत. अशावेळी त्यांनी कामाची विभागणी करावी. सर्व कामांसाठी घरच्यांना स्वत:वर अवलंबून ठेवण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी बनवावे. जेणेकरून त्यांना काही आवश्यक कामे शिकताही येतील व ते त्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षीतही असेल. मुलांना त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याची शिस्त लावावी. ज्याचा त्याने बेड आवरण्यास सांगावे. इस्त्रीचे कपडे कोणा एकानेच इस्त्री करण्यापेक्षा आपसात वाटून घ्यावेत. अशाप्रकारे गृहिणी आपल्या घरातील सदस्यांना स्वावलंबनाकडे नेवू शकतात. कारण त्यात त्यांच्यासोबत गृहिणींचेही हित आहे.
4. प्रेमळ तसेच शिस्तप्रिय बनावे
एक समर्पीत गृहिणी आपल्या प्रेमाने आणी सेवाभावाने घराला बांधून ठेवते. परंतू त्याचबरोबर त्यांना स्वत:साठी काही गोष्टींची शिस्त लावणे गरजेचे आहे. जसे त्यांनी स्व:तासाठी दररोज कमीत कमी एक तास काढावा जो त्यांचा व्यक्तीगत वेळ असेल. त्याचप्रमाणे त्यांच्या त्या वेळेत अन्य कोणिही व्यत्यय आणणार नाही. तसेच मेडिटेशन तसेच व्यायामासाठी त्यांनी खास वेळ काढावा. गृहिणींचा मी टाईम घरच्यांना माहित असणे गरजेचे आहे. अशाप्रकारे गृहिणी जेव्हा स्वत:च्या आत्मसम्मानासाठी स्वत: सज्ज होतील तेव्हा त्यांच्या भूमिकेस कोणिही धक्का लावू शकणार नाही. कारण एक सुशिक्षीत स्त्रि संपुर्ण कुटूंबाचे कणखरपणे नेतृत्व करते. तसेच गृहिणींनी स्वत:ला कठोर शिस्त लावली तर घरातील लहानांना आपोआप उत्तम वळण लागते. अशाप्रकारे एक प्रामाणिक परीश्रमी व आदर्श गृहिणी घरातील सदस्यांसाठी संस्कृती जोपासणार्या ध्वजाप्रमाणे असते.
5. आधुनिक उपकरणे आणी वाहने शिकावीत
घरातील कामे सोपी करण्यासाठी अनेक नवीन तंत्रज्ञानयुक्त उपकरणे आली आहेत. जसे कपडे व भांडी धुण्याचे मशीन व्ह्याक्युम क्लीनर आधुनिक पोछे. ज्यांचा वापर केल्याने गृहिणींच्या वेळेची बचत होण्यास मदत होवू शकते. त्याचबरोबर त्यांना कामे करणेही सोपे होते. त्यामुळे गृहिणींना कामे करतांना जास्त थकवाही जाणवत नाही आणी कामेही त्यांच्या मनाप्रमाणे होतीत. त्याचप्रमाणे गृहिणींनी त्यांना वाहने चालविता यावी ह्यासाठी आग्रही असले पाहिजे. कारण ती आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहणार नाहीत. त्याचबरोबर सर्वदृष्टीकोनातून आत्मनिर्भर होत जाण्याचे विचारही त्यांच्या मनात जागृत होण्यास मदत होईल .
6. कामे योगसाधने प्रमाणे करावी
गृहीणी म्हणजे ‘बिन पगारी सर्व अधिकारी’ असे सर्वांना वाटत असते. परंतू घरातील कामांना मनापासून करून त्या त्यांना उच्च दर्जा देवू शकतात. कारण पूर्ण दिवस थकविणारी कामे करून सुद्धा त्याचा मोबदला मिळत नसेल तर स्वत:मधली प्रेरणा अबाधित ठेवण्यासाठी व आपल्या आत्मसन्मानात भर घालण्याकरीता कामातील प्रामाणीकपणा उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे कामे करत असतांना त्या स्व:ताशी सकारात्मक संवाद साधू शकतात कारण त्यावेळी मन एकाग्र असते. त्यामुळे काहिही झाले तरी त्यांची मनस्थिती उत्तम राहील. त्याचबरोबर मनातील इच्छा आकांक्षांना प्रत्यक्ष जीवनात आकर्षीत करू शकतील. गृहिणी हे पद स्त्रियांनी स्वइच्छेने स्विकारले असेल तर त्या आपोआपच त्या कामाशी एकरूप होतील आणि घरकामांचे स्वरूप व स्तर उंचावण्यासाठी मनापासून झटतील जर प्रत्येक गृहिणी अशा पद्धतीने तिच्या पेशाला महत्व देत असेल तर त्या घराचा स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही.
अशाप्रकारे जर गृहिणींनीच आपल्या कामाचा आदर ठेवला तर कोणिही त्यांच्या कामाचा अनादर करणार नाही. आणी त्यांना त्यांच्या कामात इतरांचे सहकार्यही लाभेल. त्यामुळे घराला घरपण येईल. त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडेल. अशावेळी त्या घरातील कामासोबतच त्यांच्या आवडी-निवडी व छंद जोपासण्यासाठीही वेळ देवू शकतात. त्यासोबतच जर घराबाहेर पडून काही करण्याची इच्छा असल्यास ते सुद्धा त्यांना अशक्य होणार नाही. तेव्हा माझ्या मताप्रमाणे आजची गृहिणी अशी असली पाहीजे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)