
घर हे प्रत्येकासाठीच एक भावूक करणारे ठिकाण असते. आपण जगात कोठेही फिरलो, कोठेही वावरलो तरी आपले मन घरी येण्यासाठी आतूर असते. कारण घरात आपल्या माणसांसोबतच्या गोड आठवणींची साठवण असते. निस्वार्थ प्रेम व मायेची जमापुंजी असते. आपण कितीही चुकलो किंवा काहिही झाले तरी घर आपल्याला समजून घेतं. घर म्हणजे आपली पहिली शाळा असते. म्हणूनच प्रत्येकाला घराची अपरिमित ओढ असते.
घरातील पुरूष आपल्या कर्तुत्वाने घराला शिखरावर नेवून ठेवतात. तर घरातील स्त्रिया आपल्या पावित्र्याने व मायेने घराला जपतात. घराच्या कानाकोपर्याकडे त्यांचे पुर्ण लक्ष असते. सिमेंट विटांनी बनलेल्या कठोर भिंतींमध्येही त्या जीवन भरतात. स्त्रियांच्या हसतमुखाने घरभर वावरण्यानेच घराला घरपण येतं.
घराचा प्राण तेव्हाच जपला जातो. जेव्हा आयुष्यात कठिण वेळा येतात आणि घरातील सदस्य एकजुटीने त्यावर मात करतात. घराचा एकोपा हा त्या घराचा भक्कम पाया असतो. घरावर कितीही मोठ्या दु:खाचा पहाड कोसळला तरी घर त्याला थारा देत नाही. कारण दु:ख व्यक्त करून त्यातून मोकळे होण्यासाठी आपल्या माणसांचे खांदे पुढे येतात. आणि आपला हात हातात घेवून आपल्याला सहिसलामत त्या दु:खातून पार करतात. त्यासोबत पुन्हा जगण्याचे बळही देतात.
घर ही संकल्पना तेथे राहणार्या माणसांनी तयार झाली आहे. त्यामुळे घराची वास्तू कशी आहे, किती भव्य आहे, किंवा झोपडी आहे त्याने काहिही फरक पडत नाही. कारण वास्तू लहान असो अथवा मोठी तेथे राहणारी माणसेच तिला आपल्या मनाच्या मोठेपणाने व माणुसकीने घर बनवितात. परंतू जेव्हा माणसे ह्या जगाचा निरोप घेवून निघून जातात तेव्हा मात्र घराचा प्राण कायमचा हरवून जातो. जर घरातील माणसांची मुल्य मजबूत असली तर कितीही संकटं आली, कितीही झंझावातांचा सामना करावा लागला तरी घर कणखरपणे कायम उभे राहते.
म्हणूनच कोणत्याही क्षुल्लक कारणांना घराचा प्राण घेवू देवू नये. आपसात उत्तम संवाद साधल्याने, सामंजस्याने, एकमेकांना माफ केल्याने तसेच निरपेक्ष प्रेमाने त्याला जपता येणे शक्य आहे. आपण कायम इथे नसणार आहोत. तेव्हा एकमेकांविषयी आपले मन शुद्ध असले पाहिजे. आणि एकमेकांच्या सोबतीने जीवनाचा हा प्रवास मजेशीर, व सहजसोपा झाला पाहिजे. तरच घर नावाच्या ह्या सुंदर संकल्पनेत प्राण ओतले जातील.
1. कुटूंबियांमध्ये आपसात निर्मळ प्रेम असावे.
निर्मळ प्रेम ही एका अबाधीत कुटूंबाची मुख्य व महत्वाची पायरी असते. आपसात हेवेदावे, मत्सर असल्यास भरल्या कुटूंबातला खरा आनंद हिरावल्या जातो. त्याउलट आपल्या माणसांसाठी स्वत:कडे कमीपणा घेणे, त्यांच्या प्रगतीच्या मार्गात आपल्याकडून मदतीचा हात पुढे करणे, आपल्या माणसांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या प्रगतीने मनापासून आनंदीत होणे, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडचणी दूर करणे ह्या सर्व गोष्टी आपसातील निर्मळ प्रेम दर्शवितात.
मनात एकमेकांसाठी कोणतेही गैरसमज किंवा नकारात्मक विचार बाळगू नये. आपसात चर्चा करून मन स्वच्छ ठेवावे. अन्यथा नात्यातील हक्क संपुष्टात येवून औपचारीकतेमुळे नाते निष्प्राण होते. घर हे मन मोकळे करण्याचे एकमेव ठिकाण असते. जर तिथे आपसी ताणतणावामुळे व्यक्त होण्यास वाव मिळत नसेल तर नात्यांची पकड कमकुवत होते. कधिकधी सगळेजण घरात असूनही घरात स्मशान शांतता पसरलेली असते. आपसात हसण्या बोलण्याचे आवाज येत नाहीत. प्रत्येकजण आपाआपल्या खोलीत असतो, किंवा डिजीटल जीवनात व्यस्त असतो.
अशावेळी त्यांची मनं दुरावली गेली आहेत असा त्याचा अर्थ होतो. अशी लक्षणे घरात दिसू लागताच प्रयत्नांची शर्त करून त्यामागची कारणे शोधून काढावीत. आणि त्या कारणांचा कायमचा नायनाट करावा. अन्यथा घराचा प्राण कायमचा हिरावला जातो. त्याचबरोबर कोरड्या पडलेल्या नात्यांचे शव सर्वत्र विखुरलेले असतात.
2. घरातील स्त्रिया प्रसन्न व आधारस्तंभ असाव्यात.
स्त्रिया ह्या घरादारासाठी जीवनदायी असतात. कारण त्यांच्यात आपल्या माणसांच्या मनातील गुपीत ओळखण्याची कला असते. त्यांच्या ह्या कौशल्यामुळे त्या घरातील माणसांचा भक्कम आधार बनतात. स्त्रियांच्या केवळ घरात असण्याने घरातील माणसे निर्धास्त असतात. कारण त्या त्यांची महत्वाची जागा जबाबदारीने सांभाळत असतात. परंतू त्या कोणत्याही कारणाने त्यांच्या जागेवरून हलतात तेव्हा घर निराधार होवून जाते.
म्हणूनच ह्या गृहलक्ष्म्यांना कायम प्रसन्न ठेवणे कुटूंबाचे प्राथमिक कर्तव्य आहे. घरातील माणसांनी घरासाठी स्त्रियांनी केलेल्या त्यागाची जाणीव ठेवावी. त्यांना नेहमी सुखी समाधानी ठेवावे. त्यांचा आत्मसम्मान जपावा. त्यांना अपमानीत करू नये. त्यांची कामे वाटून घेण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा. त्यांच्या अनावर झालेल्या भावनांच्या मागचा हेतू समजून घ्यावा. त्यांच्या अंगावर नेहमी चांगली वस्त्र व दागिने असावेत.
स्त्रियांच्या ह्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्यांना प्रसन्न ठेवणे शक्य होते. आणि त्यांच्या प्रसन्न असल्याने घरात चैतन्य पसरते. त्यामुळे घरातील माणसांची मनंही समाधानी असतात. अशा वातावरणात स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचा विचारही करतात. आणि घरातील पुरूषांना त्यांचा भक्कम आधार वाटतो. अशा पद्धतीने घराचा प्राण जपता येवू शकतो.
3. घरातील पाळीव प्राणि निरोगी व समाधानी असावे
घरात बर्याचदा आवड म्हणून किंवा लहान मुलांच्या आग्रहाखातर प्राणि व पक्षी पाळण्यात येतात. त्यातही शेजार्या बरोबर केलेली स्पर्धा व श्रीमंतीचा थाट लक्षात ठेवला जातो. सुरवातीला त्या प्राण्यांविषयी प्रेम व करुणेचे भाव आपल्या मनात नसतात. अशावेळी तो प्राणि घरात येवून धुमाकूळ घालतो किंवा सर्वत्र घाण करू लागतो. तेव्हा आपण हैराण होवून जातो आणि तो आपल्याला नकोसा वाटू लागतो.
अशावेळी त्या प्राण्याचा जास्त विचार न करता त्याला एकाच जागेवर बांधून ठेवणे, त्याला एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे वागविणे, त्याच्या खाण्या पिण्याकडे मनापासून लक्ष न देणे असे प्रकार घडतांना दिसतात. किंवा कित्येकदा त्या प्राण्याला घरातून कायमचे काढून रस्त्यावर सोडून देण्यात येते. तो मुका जीव तक्रार करू शकत नाही परंतू आपल्यावर प्रेम करू लागतो. जेव्हा त्या प्राण्याला आपण मनापासून स्विकारतो. तेव्हा हळूहळू आपले त्याच्यावर प्रेम जडू लागते.
त्यानंतर त्याच्या पासून होणार्या त्रासाकडे आपण जास्त लक्ष देत नाही. तसेच आपल्या मनात त्याच्याप्रती करुणा जागृत होते. त्यासोबत तो आपल्या घरातील एक महत्वाचा सदस्यच होवून जातो. अशावेळी तो आपल्याबरोबर सुख समाधानाने राहू लागतो आणि त्याचे जीवन निर्धास्त होवून जाते. तसेच तो त्यांच्यातील निरागसपणाने घरात प्राण भरतो.
4. घरी लावलेली फळा-फुलांची झाडे बहरलेली असावी.
जेव्हा कोणत्याही झाडांची नैसर्गिकपणे व जोमाने वाढ होतांना दिसते तेव्हा त्यांना बघुण आपल्याला मनोमन उत्साह जाणवतो. परंतू जेव्हा घराची शोभा वाढविण्यासाठी झाडांना खुरटी बनविणे, त्यांच्या फांद्यांना वेगवेगळे आकार देण्यासाठी जखडून ठेवणे, त्यांना कोवळ्या उन्हापासून दूर ठेवणे, कमी पाणि देणे हा प्रकार पाहिला कि मनात नकारात्मक भावना उठतात. वनस्पती झाडे झुडपे ही विशाल सृष्टीचा भाग आहेत. त्यांच्यातही आपल्या प्रमाणे जीवनाची उर्जा आहे.
जेव्हा त्यांची नैसर्गीकपणे वाढ होते तेव्हा हंगामाप्रमाणे त्यांचे कार्य सुरू असते. परंतू जेव्हा आपण त्यांच्यावर औषधांचा मारा करतो, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करतो तेव्हा त्यांची नैसर्गीक सायकल विचलीत होते. त्यांना आतून त्रास होत असतो. त्याचे परिणाम म्हणजे त्यांचे निस्तेज दिसणे, निकृष्ठ दर्ज्याची फळे फुले लागणे हे प्रकार निदर्शनात येतात. अशी लक्षणे जर घरात दिसू लागली तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. तसेच आपल्या हातून होणार्या चुका लक्षपूर्वक सुधारण्याची आवश्यकता असते. तरच घराचा प्राण जपला जातो.
5.घरातील माणसांची प्रगती होतांना दिसावी.
जेव्हा कुटूंबप्रमुख आपल्या कुटूंबाचे पालन पोषण मनापासून करतो. आपल्या माणसांना मायेने व प्रेमाने जपतो तेव्हा घरात देवाचा निवास असतो. आपल्यावर विसंबून असणारी माणसे आनंदी रहावी. तसेच त्यांना सर्व सुखं देता यावी ह्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो. त्यांच्या इच्छा आकांक्षांना प्राथमिकता देतो. तेव्हा घरच्यांचे त्याला पदोपदी समर्थन लाभते. घरच्यांच्या डोळ्यात त्याच्या प्रगतीची स्वप्न असतात.
घर कायम घरातील माणसांच्या चुका पदरात घेते. त्यांना सुधारण्याची संधी देते. घरात अठराविश्वे दारिद्र्य असले तरिही घर कधिही विस्कटत नाही. कारण घरात आपल्या माणसांच्या कला गुणांना वाव देण्यात येतो. तसेच त्या कलागुणांना प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी निस्वार्थपणे काबाडकष्ट करण्याची तयारी दाखविणारी आपली माणसे जगात कोठेही शोधून सापडत नाही. ती घरातच असतात. म्हणूनच घरात प्राण असतात.
घराचा प्राण जपणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते. त्यासाठी घरातील माणसांचा आपसात भावनिक स्पर्श असावा. औपचारीकतेपेक्षा आपसात घट्ट मैत्री असावी. लहानांना विचारांचे स्वातंत्र्य असावे. त्याचबरोबर त्यांच्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यावी. त्यासाठी घरातील मोठ्यांचे त्यांना पाठबळ असावे.
मोठ्यांचे हात नेहमी लहांनाना बोट धरून मार्ग दाखविण्यासाठी व त्यांना आशिर्वाद देण्यासाठी उठावे त्यांच्यावर उगारण्यासाठी नाही. लहानांनी मोठ्यांना योग्य तो मान द्यावा ज्याचे ते मानकरी असतात. घरात स्त्रियांच्या क्षेत्राचा मान राखला जावा. स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी घरातील पुरूषांनी पुढाकार घ्यावा. जेव्हा घरात सगळे एकमेकांचा विचार करतील, एकमेकांच्या प्रगतीसाठी झटतील, व एकमेकांवर विनाअट प्रेम करतील तरच घर उत्साही राहील आणि त्याचा प्राण जपला जाईल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)