
‘पर्यावरणाची सुरक्षा’ ही आधुनीक युगातील प्राथमिक गरज झाली आहे. कारण मानवनिर्मित अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परंतू फार पुर्वीच्या काळात जेव्हा विजेचाही शोध लागला नव्हता. तेव्हा मात्र पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी तो सुवर्ण काळ होता. कारण तेव्हा नैसर्गीक संसाधनांची भरभराट होती. प्रदुषणाचा स्तर नाममात्र असल्यामुळे हवा शुद्ध होती. हवेत गारवा होता. तेव्हा शेती नैसर्गीक खतांचा वापर करून केली जात असे. त्यामुळे जमीनीची सुपीकता उत्तम होती. ऋतूंचे योग्यवेळी येणे-जाणे होते. पाऊस मुबलक प्रमाणात पडत असे. त्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळी ही योग्य प्रमाणात होती. हवामानात स्थिरता असल्याने तेव्हा शेतीच हा मुख्य व्यवसाय होता. पृथ्वीवरचा बराच मोठा भाग दाट जंगलांनी व्यापलेला होता. नद्या दुथळी भरून वाहत होत्या. आताच्या तुलनेत तेव्हा वातावरणात उष्णताही कमी होती. त्यामुळे संपुर्ण जीवसृष्टी आनंदाने नांदत होती.
परंतू आता असे काय घडले की ज्यामुळे नैसर्गीक संसाधनांची कमतरता निर्माण झाली आहे. त्याचे स्पष्ट कारण वाढते आधुनिकीकरण हे आहे. पृथ्वीवरील मनुष्य सोडून बाकी संपुर्ण जीवसृष्टी निसर्गाशी जुळवून घेत जगत आहे. परंतू मनुष्याने मात्र आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून प्रगतीची कास धरली आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यातूनच आधुनिकीकरणाने जोर पकडला. जास्तीत जास्त उत्पन्नाच्या लालसेपोटी जमिनीवर व पिकांवर रासायनिक खतांचा वापर सर्रास वाढला. त्याचे दुष्परीणाम म्हणजे जमीनीची सुपीकता कमी झाली. जमीनीचा वरचा स्तर कडक झाला. त्यामुळे जमीनीत पाहिजे तसा पाण्याचा निचरा होणे कमी झाले. पावसाचे पाणि वरच्या वर वाहून जावू लागले. पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनांचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला. कारण खासगी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. त्यासोबत वाढत्या औद्द्योगिकरणाचाही हवेतील प्रदुषण वाढण्यामागे सिंहाचा वाटा आहे. हवेत कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढले आणि हवेतील प्रदुषणाने डोके वर काढले. ज्यामुळे हृदयाशी संबंधीत आणि श्वसनाशी संबंधीत आजारांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली. चौपदरी रस्ते तसेच टोलेजंग इमारती बनविण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगल कटाई करण्यात आली. परंतू पुन्हा त्याप्रमाणात वृक्षारोपण होवू शकले नाही. त्यामुळे जंगली प्राण्यांचे जीवन धोक्यात आले. प्रत्येक ठिकाणी माणसाने आपले पाय पसरवील्यामुळे पर्यावरणाच्या नैसर्गीक चक्रात व्यत्यय निर्माण झाले. निसर्गाने माणसास सर्वकाही मुबलक प्रमाणात बहाल केले. माणसानेही आपल्या बुद्धीमत्तेच्या आधारे मोठा पल्ला गाठला परंतू तरिही निसर्गाच्या रौद्र रुपासमोर त्याला हात टेकावे लागतात. आजची परिस्थिती ही आहे कि माणसाच्याच हावरटपणामुळे असंख्य माणसांवर मुलभूत गरजांच्या अपूर्ततेची वेळ आली आहे.
त्याचप्रमाणे जागतिक तापमान वाढ झाल्याने जमीनीत पाण्याची पातळी खोल गेली. तसेच ऋतूंचे असंतुलन व अतिरेकही वाढला आहे. त्याचबरोबर हवेतील प्रदुषण आणि वाढत्या आधुनिक यंत्रांच्या वापरामुळे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता इतकी वाढली कि पशु-पक्षी व वृक्षवेलींनाही त्याचा तडाखा बसला. मानवनिर्मीत आधुनिक फटाक्यांच्या तीव्र आवाजाने पशु-पक्ष्यांना त्रास तर होतोच त्यासोबत हवेत प्राणघातक रसायनेही मिसळली जातात. आणि त्यांच्या अतोनात वापराने वातावरणात प्रदुषणाचा स्तर वाढतो. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे शेती करण्यायोग्य जमीनीवर मोठ-मोठ्या टाऊंनशीप उभारल्या जातात. त्यामुळे शेती करण्यायोग्य भाग कमी होतांना दिसतो. ए.सी. रेफ्रीजरेटर सारख्या उपकरणांचा वाढता वापर तसेच वाढते इंडस्ट्रीकरण ह्यामुळे वातावरणात पसरणारा क्लोरो-फ्लोरो कार्बन वातावरणात जास्त काळ जीवंत राहतो. आणि हवेमध्ये त्याचे विषारी स्तर बनतात . त्यामुळे नैसर्गिक ओझोन स्तरालाही धोका निर्माण झाला आहे. ओझोनमुळे सुर्याच्या थेट पडणार्या किरणांपासून आपला बचाव होतो. आपण जेव्हा आपल्या घराचा विचार करतो. तेव्हा ते जास्तीत जास्त सुरक्षीत कसे होईल ह्या दृष्टीकोनातून पावले उचलतो. परंतू जेव्हा निसर्गाशी निगडीत बोलले जाते. तेव्हा मात्र प्रत्येकजण इतरांकडे बोट दाखवीतो. आता वेळ आली आहे संपुर्ण सृष्टीलाच आपले भव्य घर समजण्याची. तेव्हाच आपण तिच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम स्वत:ला जबाबदार धरू. पर्यावरणाच्या सुरक्षेबाबत जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. परंतू आता बोलण्यापेक्षा प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवर जागृकता आणून कृती करण्याची गरज आहे.
1.नैसर्गिक संसाधनांचा उपयोग वाढवावा.
आपल्या घरातून निघणारा ओल्या कचर्यापासून घरच्या घरी खत तयार करता येवू शकते. त्यासोबत आपल्या घराच्या गॅलरीत व छतावर किंवा घराच्या मागे छोटी मोठी झाडे लावली जावू शकतात. त्यासाठी घरीच तयार केलेल्या खताचा वापर केल्यास त्यामुळे आपल्या आहारात सेंद्रीय फळे व भाज्या उपलब्ध होवू शकतात. प्रत्येक घरी शक्य असल्यास रेन वॉटर हारवेस्टींग साठी सोय असावी. ज्यामुळे पावसाचे पाणि वाहून न जाता जमीनीत मुरले जाईल व उन्हाळ्यात पाण्याची पातळी जास्त खोल जाणार नाही. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी शक्य असल्यास घराच्या चारही बाजुने झाडे लावावीत. ज्यामुळे हवा खेळती राहील आणि छोट्या पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षीत जागाही मिळेल. सृष्टीतील प्रत्येक जीवजंतू हा सृष्टीचे संतूलन राखण्यास उपयोगाचा असतो. तेव्हा आपले स्वार्थापोटी उचललेले कोणतेही पाऊल कोणत्याही जीवासाठी प्राणघातक नसावे ही काळजी नेहमी आपल्याकडून घेतली गेली पाहिजे. ए.सी. सारखी उपकरणे पर्यावरणासाठी घातक असतात. तेव्हा ती कमीत कमी वापरली जावीत. विजनिर्मीतीसाठी सोलर पॅनलचा वापर करावा. ज्यामुळे सौर उर्जेचा लाभ आपण घेवू शकतो. प्रत्येकाने सजगतेने पावले उचलली तर पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दिशेने सामुहीकरीत्या मोठी झेप घेता येवू शकते.
2. इको-फ्रेंडली उत्पादकांचा वापर वाढवावा
आपण दररोज घराच्या साफ-सफाई साठी, कपडे तसेच भांडे धुण्यासाठी ज्या उत्पादकांचा वापर करतो. त्यात वापरल्या गेलेली रसायने पर्यावरणाला घातक असतात. ती देखील जमीनीला नापिक बनवीण्यास कारणीभूत असतात. ही घातक रसायने जेव्हा नदीच्या पाण्यात मिसळली जातात. तेव्हा नदीचे पाणि दुषित होते. ज्यामुळे पाण्यात राहणार्या जीवांनाही धोका संभवतो. तेव्हा इको-फ्रेंडली उत्पादकांच्या वापरासाठी अट्टाहास धरावा. जे पर्यावरणास कोणताही अपाय करत नाहीत. त्याचबरोबर पाण्याचीही बचत करण्यास मदत करतात. त्याशिवाय ही उत्पादके आपल्या त्वचेसाठीही आल्हाददायक असतात. तेव्हा नेहमी एक लक्षात ठेवावे कि आपले एक जबाबदारीपुर्ण पाऊल पर्यावरणाला नुकसान पोहोचवीण्यापासून वाचवू शकते. ही सृष्टी म्हणजे आपले भव्य घर आहे. आपण आपल्या घराच्या सुरक्षेसाठी जेजे करतो ते सर्व आपल्याला आपल्या सृष्टीसाठी करावयाचे आहे.
3.प्लॅस्टिक चा वापर थांबवावा
प्लॅस्टीकचे कधिही विघटन होत नाही. त्यामुळे ते पर्यावरणासाठी घातक आहे. जमीनीत मातीचे स्तर असतात त्यात जर प्लॅस्टिकचे तुकडे अडकले तर जमीनीत पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पावसाचे पाणि खोलवर जावू न शकल्याने. उन्हाळ्यात ज्या झाडांची मुळे पाण्याच्या शोधात जमीनीच्या अत्यंत खोल गेलेली असतात. त्यांना पाणि न मिळाल्याने ते कोलमडून पडतात. ह्याचा प्रत्येकाने व्यक्तीगतरीत्या विचार करावा. प्लॅस्टीक वापरल्यावर त्याला कोठेही टाकून न देता सुक्या कचर्याच्या बादलीत जमा करावे. सरकारने कचर्याच्या विघटनासाठी पाऊल उचलले आहे. ज्यात फक्त ओला कचरा आणि सुका कचरा वेग-वेगळा जमा करण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. सरकारच्या ह्या प्रयासात एक जागरूक नागरिक म्हणून आपले पुर्णपणे योगदान असले पाहिजे.
4. पर्यावरणाचे मित्र बना
पर्यावरणाने आपल्याला जे भरभरून दिलेले आहे. त्यासाठी आपण नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. त्यासोबत पर्यावरणाच्या सुरक्षेचा विचार करणे. किंबहूना तत्सम कृती करणे. हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. आणि त्याहिपेक्षा मोठे पाऊल तेव्हा असेल जेव्हा आपण पर्यावरणाला आपला मित्र समजू. आपण आपल्या जीवलग मित्रासाठी जे जे काही करतो. ते सर्व पर्यावरणासाठी करायला पाहिजे. नैसर्गिक संसाधने जपून वापरावी. जेणेकरून आपल्या पुढची पिढीही त्याचा लाभ उचलू शकली पाहिजे. पर्यावरणाला घातक अशा उपकरणांचा वापर करतांना जरा विचार करावा. कारण आपल्याला आराम आणि आल्हाददायक वातावरण मिळावे म्हणून कित्येक जीवांना सहन करावे लागते. अति उष्णतेमुळे छोट्या मोठ्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशाप्रकारे पर्यावरणाचे संतूलन बिघडत चाललेले आहे. तेव्हा आता स्वत:शी पक्का विचार करावा. आणि प्रत्येकाने आपल्या परीने शक्य तेवढा प्रयास सुरू ठेवावा.
मित्रांनो, वाटून खाण्याची सवय लावा. कोणत्याही गोष्टी साठवून ठेवण्यापेक्षा गरज असलेल्यांना वाटून द्द्याव्यात. निसर्गाने आपल्याला कोणताही दुजाभाव न करता भरभरून दिले आहे. आणि आपल्याला माणुसकीचे वरदानही दिले आहे. तेव्हा आपल्याकडून माणुसकीचे प्रदर्शन प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे. जेणेकरून आपण पर्यावरणाचे शत्रू नाहीतर मित्र ठरू. प्रत्येकाने स्वत:ला निस्वार्थभाव, सेवाभाव तसेच दयाभाव जपण्याची सवय लावावी. जीवन जगण्याची ही पद्धत सर्वांसाठीच फायदेशीर आहे. आणि पर्यावरणासाठीही.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)