
जीवन म्हणजे जगण्यातील कुतूहल. जीवन म्हणजे क्षणा – क्षणांचे ऋणानुबंध. जीवन म्हणजे सुख – दु:खांचा ऊन सावल्यांचा खेळ. जीवन म्हणजे सोहळा. जीवन म्हणजे आपल्या जगण्यातून जीवनाचे प्रतिनिधीत्व करणे. हे जरी खरे असले तरी आज आपण स्वत:ला पडताळून पाहण्याची गरज आहे कि आपल्याला जीवनाचा परिपूर्ण असा अर्थ कळला आहे किंवा नाही. कारण आपण सगळे आज जीवावर आल्यासारखे जीवन जगत आहोत. आपला वर्तमान क्षण तणावपूर्ण आहे. चिंता व काळजी ह्यांना आपण आपल्या सख्य्ख्या बहिणी मानले आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांना आपण स्वत:हून आमंत्रण देत आहोत. आपल्या जगण्यातील समाधान हरविले आहे. त्यामुळे आपल्या मनाला अशांततेने जखडलेले आहे. एखाद्या कपड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्यातून आपल्या आवडीचा पोशाख शोधून काढावा त्याप्रमाणे दु:खांच्या, समस्यांच्या व तणावाच्या खोल दरीतून कसाबसा एखादा सुखाचा क्षण आपण शोधून काढतो. त्यालाही आपण घाबरत घाबरत जगतो. नाते संबंधांच्या महासागरात असूनही आपण एकाकी जीवन जगत आहोत. कारण अहंकार, अपेक्षा व औपचारीकतेने नात्यांमध्ये दुरावा निर्माण केला आहे. आपल्या व्यक्तीगत जीवनातील समस्या आपल्याच मानसिक स्वास्थ्यास पोखरत आहेत. आपला जन्म एका महान हेतूस साध्य करण्यासाठी झालेला असूनही तो हेतू अवगत करण्यासाठी आपण झटत नाही. परिणामस्वरूपी आपल्यातील क्षमतांना पुरेसा वाव मिळत नाही. त्यामुळे आपले जगणे निरस होत जाते. आजच्या प्रगतीशील तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या प्रतीस्पर्धांमुळे आपल्यातील कौशल्ये भूतकाळात जमा होत आहेत. कारण काळाच्या गरजेनुसार त्यांच्यात सुधारणा अपेक्षित असतात. त्याचे दुष्परिणाम म्हणजे आपल्यात असुरक्षेची भावना व न्युनगंड निर्माण होतो. त्याच कारणाने आजची नवी पिढी मोठ्या प्रमाणात मानसिक अस्वास्थ्याचा सामना करत आहे. बाहेरच्या जगातील जीवघेण्या स्पर्धा व घरच्यांच्या त्यांच्याकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा अशा दोन जात्यात ते भरडले जात आहेत. त्यामुळे त्यांचे जगणे बेरंग व उत्साहरहित झालेले आहे. अशाप्रकारे विविध क्लिष्ट कारणांनी आज सर्वांचेच जगणे इतके कठीण झाले आहे कि कित्येकजण जगण्यापुढे अगदी सहज हार मानतात. त्याचबरोबर आपले बहुमूल्य जीवन अविचाराने क्षणार्धात मृत्यूच्या स्वाधीन करतात.
प्रत्येकाच्याच मनात इतर कोणत्याही भीतीपेक्षा मृत्यू विषयी अधिक भय असते. तरीही जे जीवनातील कठीण परिस्थितीपुढे हात टेकतात ते जगण्याचे महत्व समजू शकत नाहीत. तसेच मृत्यूस मिठी मारून जीवनातून मुक्त होतात. त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे जीवनातील सर्व उठाठेवींपासून त्वरीत सुटकारा मिळवीन्याचा उत्तम उपाय असतो. परंतू अशाप्रकारे निर्वाणीचा मार्ग पत्करणे म्हणजे सोप्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासारखे असते. किंबहुना जगण्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी आपल्याला त्यावरून चालणे जमलेच पाहिजे. कारण निसर्गाने आपल्याला मनुष्य जन्म बहाल करून एका महान हेतूस न्याय देण्यासाठी पाठविलेले असते. जेव्हा आपण जीकरीने आपल्या जगण्याचा हेतू अवगत करतो व त्याला साध्य करण्यासाठी आपले जीवन पणास लावतो. तेव्हा आपले जीवन सार्थक होते. परंतू आपण जर जीवनमार्गावर अर्ध्या वाटेवरच हार मानली तर आपल्या हेतू पर्यंत पोहोचण्यापूर्वीच आपण जीवनातून बाहेर पडतो. त्यामुळे आपल्याला जीवन जगण्याचे मानसिक समाधान लाभू शकत नाही. म्हणूनच जगणे कितीही कठीण असले तरी त्याचा मनापासून स्वीकार केला पाहिजे. कारण आपल्या समोर असलेल्या परिस्थितीस तोंड देत जगण्यातच खरे धाडस असते.
आपण जीवनाकडून केवळ सुखाचीच आशा करत असतो. त्याचप्रमाणे भविष्यात येणाऱ्या दु:खांची कल्पना करून घाबरत असतो. परंतू काळाच्या उरात कोणत्या क्षणात आपल्यासाठी काय दडलेले आहे ह्या गोष्टीची आपल्याला कल्पनाही नसते. ही सर्वश्रेष्ठ सुविधा करून निसर्गाने आपल्याला वर्तमान क्षणांचे महत्व उत्तमरीतीने शिकविले आहे. वर्तमान क्षण आपल्या ओंजळीत कधी सुख तर कधी दु:ख टाकून जातो. कधी आपल्या जीवनात कोणाचे आगमन होते तर कधी कोणाचा विरह सहन करण्यास लावतो. आपल्या भाग्याने आपल्या हाती जे काही दान पडले ते मात्र आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. जर सुख लाभले असले तरी स्वत:ला स्थिर ठेवता आले पाहिजे. किंवा जर दु:खाशी गाठभेट झाली तर ते पचविण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. कारण सुखाशी आपण त्वरीत संलग्न होतो. सुख आपल्याला कितीही हवेहवेशे वाटत असले तरी सुखाचे दिवस आपल्या जीवनात कायमस्वरूपी टिकून राहत नाहीत. परंतू आपल्या मनास मात्र नक्कीच आनंद देवून जातात. त्याचप्रमाणे दु:खाचे दिवसही पुढे सरसावणाऱ्या काळाबरोबर निघून जातात. परंतू आपल्या भविष्यावर मात्र त्यांचे नकारात्मक पडसाद उमटतात. तरीही दु:ख भोगल्याशिवाय आपल्याला सुखाचे महत्व कळत नाही. तेव्हा आपल्याला दु:खाच्या दिवसांमधूनही काहीतरी जीवनोपयोगी धडा घेता आला पाहिजे. अशाप्रकारे आपल्याला दु:ख पचवून जगणे जमले पाहिजे.
जीवनात यशस्वी होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे यश संपादन करण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने झटत असतो. आपल्यासाठी जीवनात यश गाठणे अनिवार्य असते कारण त्यामुळे समाजात आपण एक सन्मानीय जीवन जगू शकतो. नावलौकिकास पात्र ठरतो. त्याचबरोबर आपल्याला मानसिक रीत्या समाधानकारक व आनंदी जीवन लाभते. परंतू कधीकधी यशाच्या धुंदीत आपण स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजू लागतो. तसेच आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे समर्थन करतो. आपल्याला स्वत:पुढे इतरांचे अस्तित्व नगण्य वाटू लागते. अशाप्रकारे आपल्यात अहंकार जागृत होवून प्राप्त केलेले यश जेव्हा आपल्या डोक्यात जाते तेव्हा आपले पाय जमिनीवर टिकत नाहीत. कारण यशाची धुंदी आपल्या सदसदविवेकबुद्धीस संपूर्ण व्यापून टाकते. यश प्राप्त केल्यावर आपला असा नकारात्मक रीत्या कायापालट होणे मात्र पुढे आपल्याच दु:खाचे कारण बनू शकतो . कारण आपल्या अविचारी वागण्या बोलण्याने आपल्या आसपासचे लोक दुखावले जातात. त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारातून कोणासही भावनिक आधार मिळू शकत नाही. आपण स्वत:चेच गुणगान गाण्यात भान विसरलेलो असतो. परंतू कधी जर आपण आपल्या इतरांपेक्षा दोन पावले समोर असलेल्या आयुष्याला कंटाळलो आणि आपली मागे फिरून पाहिले तर त्यावेळी मात्र आपण पूर्णपणे एकटे पडलेलो असतो. कारण यशाच्या अहंकाराने व यशस्वी जीवनाच्या मोहात अडकून आपण आपली जीवाभावाची माणसे गमावलेली असतात. तेव्हा जीवनात यशस्वी होणे ही सुंदर गोष्ट आहे. परंतू त्यासोबत आपले विनम्र होत जाणे व एक माणूस म्हणून उंच उठणे महत्वाचे असते. तरच आपले यशस्वी जीवन सत्कारणी लागते. अन्यथा यशाच्या त्या डोलाऱ्यात एकेदिवशी आपलीच घुसमट होवू लागते. म्हणूनच आपल्या यशात अवघ्यांच्या भल्याचा विचार असला पाहिजे. त्यात सर्वांचे आशीर्वाद समाविष्ट असले पाहिजे. त्याचप्रमाणे यश संपादन केल्यानंतर इतरांना आपल्यापेक्षा कमी न लेखता त्यांच्याप्रती मनात करुणा जागविली पाहिजे. इतरांनाही योग्य दिशा निर्देश करून प्रोत्साहित करता आले पाहिजे. अशाप्रकारे आपल्याला यशाबरोबरही एक साधे सरळ जीवन जगणे जमले पाहिजे.
जीवनाचे उतार चढाव सर्वांनाच अनुभवावे लागतात. कारण जीवनाचा उद्देश आपल्याला जीवनाचे धडे देवून विकसित करत जाण्याचा असतो. परंतू जे लोक महान हेतू साठी आपले जीवन वाहून देतात त्यांचा जीवनप्रवास मात्र अतिशय काटेरी व खाचखळग्यांनी युक्त असतो. जीवन त्यांच्या पुढे सर्वाधिक आव्हाने घेवून त्यांना खुणावत असते. त्याचबरोबर त्यांची कठोर परीक्षाही घेते. जीवनातील त्या आव्हानांना अत्यंत धीराने व तत्परतेने उत्तर देवूनच ते आपला हेतू साध्य करू शकतात. जसे रस्त्यावरून चालत असतांना जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपल्या लक्षात येते कि आपले कोठेतरी भान हरपले होते. आपल्याला सजग करण्यासाठी ती एक छोटीशी शिक्षा असते. तेव्हा जीवनात आपल्याला गंतव्य स्थान गाठण्यासाठी ठेच लागण्याच्या वेदना सहन करत जगता आले पाहिजे.
जगणे म्हणजे एक लढा असतो कारण प्रत्येक वेळी ते साधनसंपन्न असेलच असे नाही. कोठे ते ठीगळानी जोडलेले असते तर कधी त्याला जागोजागी गाठी मारलेल्या असतात. त्याविषयी तक्रार करणे फार सोपे असते. परंतू तो त्यावरचा उपाय नाही. कधी माणसे आपल्या मनाविरुद्ध वागतात तर कधी परिस्थिती आपल्या विपरीत जाते. जगतांना ह्या सर्व शक्यता खात्रीशीरपणे आपल्या वाटेत येतील ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्याचप्रमाणे जीवन कधीही परिपूर्ण होत नाही तर त्यात अनेक उणीवा आपल्याला भासत असतात. परंतू त्या उणीवा आपल्या विचारात येण्यापासून आपल्याला थांबविता आले पाहिजे. कारण आपले विचार परिपक्व असतील तरच उनीवान्ना भरून काढता येवू शकते. प्रत्येकवेळी एखाद्याच्या मनमोकळेपणाने हसण्याचा अर्थ आनंदच असतो असे नाही. तेव्हा त्या हसण्यामागच्या वेदना आपण समजू शकलो पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी डोळ्यातील अश्रू दु:खाचेच प्रतिनिधीत्व करत असतात असे नाही तर कधीकधी ते आपल्यातील खंबीर व कणखरपणा दर्शवितात. कारण हसण्याने मनावरचा ताण हलका होतो तर रडण्याने मनातील भावना मोकळ्या होत असतात. तेव्हा जीवनात अश्रू व हसणे ह्यांना एकत्र आणून जगणे जमले पाहिजे.
1 परिस्थितीवर मात करता आली पाहिजे
कधी कधी आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे आपली चारही बाजूने कोंडी होते. अशावेळी आपल्या विचारांना चालना मिळत नाही. परंतू कोणत्याही समस्येबरोबर समस्येचा उलगडा होण्याचे उपायही असतात. जर समस्या आहे हे आपण मान्य केले. तर शांतपणे समस्या सोडविण्यावर आपले लक्ष केंद्रित होते. असे करून आपण परिस्थितीवर मातही करू शकतो. परंतू आपण समस्येला नाकारून तिच्याकडे दुर्लक्ष केले तर परिस्थिती जास्त बिकट होवून हाताबाहेर जाते व तीच आपल्यावर मात करते. त्यामुळे आपले जगणे आणखीच दुर्भर होते. तेव्हा परिस्थितीवर मात करून आपल्याला जगणे जमले पाहिजे.
2 जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे
जगणे म्हणजे पंचपक्वानांची चमचमीत थाळी नसून कडू, गोड, आंबट, खारट अशा अनेक चवींचा मेळावा असतो. त्यामधील सर्वच चवी आपल्याला पसंत नसतात. तरीही त्यांना चाखण्यास जीवन आपल्याला विवश करत असते. त्या विवशतेपुढे हात टेकून आपण आणखी एक अनुभव आपल्या गाठीशी बांधत असतो. त्याचबरोबर विविध अनुभवांनी आपले व्यक्तीमत्व आणखी कणखर होत जाते. तेव्हा अनुभवांचा आनंद घेत घेत जीवन जगणे आपल्याला जमले पाहिजे.
3 जगण्याचा अर्थ उमगला पाहिजे
आपण जगण्याला फारच सीमित करून जगत असतो. त्यामुळे जगण्यातील भव्यता आपण समजू शकत नाही. परंतू कधी निसर्ग सानिध्यात जावून निसर्गाच्या विशालतेवर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या जगण्यातील तोकडेपणा व अर्थशून्यता आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागते. कारण आपले विचार स्वार्थाने बरबटलेले असतात. तेव्हा निसर्गाकडून मनाच्या मोठेपणाचे महत्व जाणून घेवून अर्थपूर्ण जीवन जगणे जमले पाहिजे.
4 कर्तव्यांचे पालन करता आले पाहिजे
एक माणूस म्हणून अनेक कर्तव्यांचे पालन करणे ही आपली जबाबदारी असते. आपल्या शालेय जीवनातच आपण आपल्या देशाप्रती व आपल्या देशबांधवांप्रती असलेली कर्तव्ये पार पाडण्याची प्रतिज्ञा घेत असतो. परंतू जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा आपल्याला त्या प्रतिज्ञेचा विसर पडत जातो. आपल्याला कर्तव्य पार पाडण्यासाठी मोठे पाउल उचलणे शक्य नसल्यास देशाचा एक सभ्य व जागरूक नागरिक बनूनही आपण कर्तव्यांचे पालन करू शकतो. कारण देशाच्या मिठाला जागणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. कर्तव्याच्या दिशेने शुद्ध हेतूने टाकलेले पाउल लहानसे का होईना परंतू सामाजिक जागृती आणण्यास पुरेसे असते. तेव्हा कर्तव्यांचे पालन करत जगणे जमले पाहिजे.
जीवन जगणे आपल्याला कठीण वाटू लागते. कारण आपण आपल्यातील विशेशातांकडे दुर्लक्ष करून प्रवाहाचा भाग बनण्याची जय्यत तयारी करत असतो. त्यासाठी आपल्याला प्रतीस्पर्धांचा सामना करावा लागतो. प्रतीस्पर्धा आपल्या मनात तुलना निर्माण करत असतात. त्यामुळे आपण चिंता, खिन्नता व न्युनगंड ह्यांचे शिकार होतो. जे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवितात आणि आपले जगणे दुर्भर करतात. त्याचबरोबर आपण आपल्या आसपासच्या गर्दीत मनाने इतके गुंतत जातो कि स्वत:बरोबर एक घनिष्ट नाते निर्माण करू शकत नाही. आपण स्वत:पासूनच दुरावत जातो. अशाप्रकारे आपल्या अंतर्मनाचा प्रवास न केल्यामुळे आपल्याला जगणे कठीण वाटू लागते. आपल्याला आपल्या भावनांचा उलगडा होवू शकत नसल्याने जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांशी शांततेने व्यवहार करणे आपल्यासाठी कठीण होते. तरीही जीवन जगणे जमले पाहिजे कारण जीवन बहुमूल्य असते.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)