जिजामाता ह्यांच्या जीवनातुन शिकण्यासारख्या सहा गोष्टी

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ ह्यांना कोटी कोटी दंडवत. विशाल मराठा साम्राज्याचे स्वप्न ज्यांच्या कुशीत लहानाचे मोठे झाले त्या स्वराज्य जननी जिजाऊंचा जन्म राजे सिंदखेड येथील पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई ह्यांच्या पोटी झाला. जिजाऊ लहानपणापासूनच आईच्या संस्कारांनी प्रेरीत होत्या. तेव्हा एक मुलगी म्हणून त्यांचे हृदय कोमल असले तरी स्वाभिमानाचे तडपते तेज त्यात सामावले होते. जिजाऊंचे पिता हे पराक्रमी असले तरी ते निजामशाहीत चाकरीला असल्यामुळे त्यांच्यावर कायम मुसलमानी सत्तांचे वर्चस्व होते. परंतू स्वाभिमानी जिजाऊंच्या मनाला ती गोष्ट कायम खटकत असे. कारण आपल्या पराक्रमी पित्याने कोणाहीपुढे झुकलेले त्यांना आवडत नव्हते. जिजाऊ लहानपणापासूनच फंदफितूरी करणार्‍यांच्या कट्टर विरोधक होत्या. जिजाऊ मुलगी म्हणून जन्मास आल्या असल्या तरी शस्त्र चालविण्याचे शिक्षण घेण्यास नेहमी तत्पर राहत असत. म्हणूनच त्यांच्या थोर माता-पित्यांनी त्यांना शुरविरांच्या कथा ऐकवूण त्यांच्यातील शूरपणाला नेहमी प्रोत्साहन दिले.

    तो काळ गुलामगिरीने बरबटला असून अत्यंत बिकट होता. समाज स्वातंत्र्याचे जगणेच विसरला होता. क्षुल्लक धनाच्या लालसेपोटी सर्वसामान्य जनता मुसलमानी साम्राज्याचे चाकर होवून त्यांचा मिंधेपणा स्विकारन्यास विवश होती. त्याचबरोबर त्यांच्या मनास पटत नसले तरी आपल्याच माणसांची लूट करून त्यांची दैना करण्याच्या लज्जास्पद कार्यात सहभागी होत होती. तसेच शासनकर्त्यांकडून जोरजबरदस्तीने घेतला जाणारा अमाप शेतसारा ह्यामुळे शेतकर्‍यांची अवस्था तर त्याहून वाईट होती. त्याचप्रमाणे आया-बहिणींची अब्रूही धोक्यात होती. मराठी माणसाची अशी हलाखीची परिस्थिती पाहून जिजाऊंचे मन दु:खाने गहिवरून येत असे. तेव्हापासूनच जिजाऊ आपल्या कल्पनाशक्तीने स्वतंत्र मराठी साम्राज्याचे स्वप्न मनातल्या मनात साकारत होत्या.

   जिजाऊंचा विवाह  शहाजी राजे भोसले ह्यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे तल्लख बुद्धीमत्तेचे धनी होते. त्याचबरोबर ते अत्यंत पराक्रमी व धाडसी होते. ते लहान असतांनाच त्यांचे पिता युद्धात कामी आल्यानंतर त्यांना आदीलशाही, निजामशाहीत मनसबदारी मिळाली. तेव्हापासून शहाजी राजेंनी आपल्या पराक्रमाने मुसलमानी सत्तांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले. त्यांचा जिजाऊंशी विवाह झाल्याने ते दोन तेजस्वी जीव एकत्र आले होते. हा सृष्टीचा खास दृष्टांत समजला पाहिजे. कारण मुसलमानी सत्तांमध्ये मराठी माणसास, मराठी मुलखास मानसन्मान नव्हता. तसेच रयतेच्या कल्याणाचा कोणिही विचार करत नव्हते. अशापरिस्थितीत जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्याची कोठूनही सुरवात होण्यास वाव मिळत नसल्यामुळे त्यांचे मन व विचार आतल्या आत घुसमटत होते.

  जिजाउंनी अशापरिस्थितीत त्यांच्या आराध्य भवानी आईस साकडं घातले. आणि आपल्या पोटी अशा मुलाची कल्पना केली जो शतकानुशतके रयतेवर अन्याय अत्याचार करणार्‍या दैत्यांचा सर्वनाश करेल. देवाधिकांनाही माणसा माणसात पसरलेली राक्षशी प्रवृत्ती बघून त्रास होत असावा. त्यामुळे अशा शुरवीर पुत्रास जन्म देण्यास अशाच एका समर्थ आईची आवश्यकता त्यांनाही भासत होती. अखेरीस भवानी आईने जिजाऊंची प्रबळ इच्छा पुर्ण केली. जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि ती एका बदलणार्‍या पर्वाची जणू दवंडीच होती.

  जिजाऊंनी शिवरायांना रामायण व महाभारतातील गोष्टी ऐकवत लहानाचे मोठे केले. त्यामधून लहानग्या शिवबास पराक्रमाचा महामंत्र मिळाला. पराक्रमी पुरूष हा देवासमान असतो आणि तो सामान्य रयतेस स्वातंत्र्य मिळवून देतो हे बिज शिवबाच्या मनात रोवण्यात जिजाऊ यशस्वी झाल्या. जो रयतेचा छळ करतो, आया-बहिणींवर अत्याचार करतो तो राक्षस असतो. अशा राक्षसाचा सर्वनाश करून सामान्य जनतेस त्याच्या जाचातून मुक्त करणे हे पराक्रमी पुरूषाचे कर्तव्य असते हे ज्वलंत विचार जिजाऊंनी शिवबाच्या मनात पक्के बिंबवले. जिजाऊंनी शिवबांच्या आयुष्यात आई व वडील अशा दोन्ही भुमिका निभावल्या. राजनितीचे धडे, शस्त्र प्रशिक्षण तसेच अन्याय अत्याचार करणार्‍यां विरोधात कठोरातले कठोर शासन अवलंबन्याचे धोरण शिकवीले. अशाप्रकारे स्वकर्तुत्वाच्या भरवशावर जिजाऊंनी शिवबाच्या बालमनावर पैलू पाडले.

  आपल्या झुंजारू व्यक्तीमत्व असलेल्या आईने केलेल्या संस्कारांच्या बळावर शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठ्या लढायांना शिवरायांनी यशस्वीरित्या न्याय दिला. अशाप्रकारे स्वराज्याच्या सिमा वाढविण्यात आणि बळकट करण्यात त्यांना यश आले. जिजाऊंचे प्रेम व प्रोत्साहन शिवरायांना क्षणोक्षणी लाभत होतेच. जिजाऊंच्या मायेच्या पंखाखाली मराठी साम्राज्याच्या सुक्ष्म बिजाचे बळकट वृक्षात परीवर्तन झाले. मराठी रयतेस एक खरा व निश्चयी राजा लाभला. ज्याला रयतेच्या दु:खाची पुर्णत: जाणीव होती. अशा ह्या जाणत्या राज्याचा रयतेच्या समर्थनाने राज्याभिषेक पार पडला. त्याचबरोबर स्वराज्य जननी जिजाऊंचे स्वप्नही साकार झाले. राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी जिजाऊंनी देह ठेवला आणि त्या इतिहासाच्या पानावर एका थोर आईच्या रूपात अजरामर झाल्या. ह्या थोर मातेस विनम्र अभिवादन.

 प्रत्येक स्त्रिस आईपणाची निसर्गदत्त देणगी लाभलेली असते. त्याचप्रमाणे प्रत्येकीतच एक झुंजारू आई असते जी आपल्या मुलांच्या जीवावरचे संकट पळवून लावण्यासाठी वाघिणीचे रूप धारण करते. त्याचबरोबर मुलांच्या पाठिशी आयुष्यभर कणखरपणे उभी असते. जिजाऊंच्या रुपाने स्वराज्यास एक विलक्षण मातृत्व लाभले. जे कायमस्वरूपी अजरामर झाले. जिजाऊंच्या तेजस्वी विचारांनी व गुणांनी त्यांना स्वराज्य जननी बनवीले. त्याचबरोबर त्या हिंदवी साम्राज्याच्या प्रेरणास्त्रोत झाल्या.

1. जिजाऊंचे स्वाभिमानी व्यक्तीमत्व

   सुल्तानी शासनकर्त्यांनी मराठी प्रांताची धुळधान मांडली. शेतकर्‍यांचा मोठा आधार म्हणजे त्यांनी उन्हातान्हात राबून कष्टाने पिकवलेले धान्य बेचिराख केले. स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढले. अशा मन सुन्न करणार्‍या बिकट काळात जन्मास आलेल्या जिजाऊ मात्र स्वाभिमानाच्या व स्वातंत्र्याच्या जगण्याने प्रेरीत होत्या. क्रुर शासनकर्त्यांसमोर माना झुकवून राहणे त्यांना मान्य नव्हते. आपल्या वडीलधार्‍यांनीही त्यांची गुलामी न स्विकारता सामान्य जनतेस त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले पाहिजे ह्या विचारांनी त्यांचे मन व्याकूळ होत असे.

  प्रत्येक स्त्रिने जिजाऊंचे हे स्वाभिमानाने प्रेरीत विचार अंगीकारले पाहिजे. कारण आजही स्त्रिया त्यांच्या मनाविरूद्ध होत असलेल्या अनेक घडामोडींसमोर माना झुकवीतात. किंबहुना त्यांना तसे करण्यास भाग पाडले जाते. स्त्रियांनी आपले सौंदर्य खुलविण्यासाठी अंगावर दागिने घालण्यापेक्षा स्वाभिमानाचा एकच मौल्यवान दागिना आपल्या अंतरंगात ल्यावा. ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात तेजाची भर पडेल. अशाप्रकारे त्या त्यांचा माणूस असण्याचा हक्क व सम्मान आपल्या पदरात पाडून घेवू शकतील.

2. जिजाऊंच्या हृदयातील दयाभाव

    जिजाउंचे मन दयेने व प्रेमाने व्यापलेले होते. त्यांच्या वाड्यातील गडीमाणसे व काम करणार्‍या स्त्रियांना जिजाऊंनी मायेने आपलेसे केले. म्हणूनच जिजाऊंसोबतच लहानाची मोठी झालेल्या गोदास जेव्हा शत्रूच्या सरदारांनी पळवून नेली तेव्हा लहानग्या जिजानेच तिला त्या धक्क्यातून सावरण्यास मदत केली. रायगडावर आलेल्या प्रत्येकास त्याच्या समस्येचे निराकरण केल्याशिवाय तसेच  हात ओले केल्याशिवाय जाऊ न देण्याचा शिरस्ता जिजाऊंनीच पाडला. मोहिमेवर गेलेल्या शूर मावळ्यांच्या घरी कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये. ह्याकरीता जिजाऊ स्वत: जातीने लक्ष घालीत असत. जिजाऊंच्या निस्वार्थ प्रेमाने भारावून सर्वसामान्यातील प्रत्येकांनी त्यांना आईचा दर्जा दिला.

   मनात दयाभाव ठेवून संपुर्ण विश्वास जिंकता येते. ह्याचे मुर्तीमंत उदाहरण होत्या जिजाऊ. दयाभावाने केलेली कोणतिही गोष्ट थेट हृदयाला स्पर्श करते आणि समोरची व्यक्ती आपले प्राणार्पण करण्यासही तयार होते. महाराजांच्या मावळ्यांनिही अनेकदा महाराजांचे मरण आपणहून आपल्या अंगावर घेतले होते.  

3. जिजाऊंचा कणखर बाणा

   स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेवून अवघ्या दहा वर्षांच्या शिवबा समवेत जिजाऊंनी मावळ प्रांतात पाऊल ठेवले होते. तेव्हा त्या प्रांताची दयनीय अवस्था पाहून त्या व्यथीत झाल्या. सुलतानी अत्याचारांनी रयत भयभीत होती. रयतेवर दहशत निर्माण करण्यासाठी जागोजागी पहारी उभारण्यात आल्या होत्या. गावं ओसाड पडली होती. राऊळे उद्ध्वस्त करण्यात आली होती. समाजात पराकोटीची अंधश्रद्धा पसरवीण्यात आली होती. परंतू जिजाऊंनी परिस्थितीपुढे हात टेकले नाही. लोकांमध्ये जागृती आणण्यास त्यांनी सुरवात केली. वर्षोनुवर्षांच्या शासनकर्त्यांकडून उभारलेल्या व रयतेत दहशत निर्माण करणाऱ्या  पहारी उपटून रयतेत विश्वास जागृत केला. गाढवाचा नांगर शेतात चालवील्याने जमिनी भ्रष्ट होतात ही अंधश्रद्धा सोन्याचा नांगर चालवून खोडून काढली. तसेच शेतकर्‍यांना शेती करण्यास प्रोत्साहीत केले. जागोजागी गणपतीची स्थापना करून पुजाअर्चा सुरू केल्या. अशाप्रकारे विपरीत परिस्थितीवर मात करत व रयतेचा विश्वास संपादन करत ही थोर आई स्वराज्य निर्मीतीची ही खडतर वाट निरंतर चालत राहिली.

4. जिजाऊ एक दुरदृष्टी असलेली आई

 आई भवानीस साकडं घालून आपल्या पोटी जन्मास आलेल्या शिवबाचे जिजाऊन्नी अत्यंत दुरदृष्टीने संगोपण केले. एकीकडे पराक्रमाचे बाळकडू पाजून शिवबास शुरवीर बनवीले. तर दुसरीकडे रयतेची सद्द्यपरिस्थिती, आया-बहिणींवर होणार्‍या अत्याचारांचे साक्षात दर्शन घडवीले. अशा बिकट परिस्थितीत एका शुरवीराने नेमके काय केले पाहिजे हे न सांगताही अशाप्रकारे शिवबास कळले. स्वराज्याच्या ह्या महान कार्यात स्वराज्यनिष्ठेने भारावलेल्यांची मात्र नितांत गरज आहे ही गोष्ट ह्या माऊलीस ठाऊक होती. तेव्हा परडीत जोंधळ्याच्या दाण्यांची आणखी वाढ झाली पाहिजे. हा मोलाचा सल्ला जिजाऊंनी शिवबास दिला. शिवबांनीही त्या दृष्टीकोनातून घोडदौड सुरू केली. अशाप्रकारे स्वराज्याच्या निष्ठावान मावळ्यांचे सैन्यदल निर्माण झाले.

5. जिजाऊंचे विलक्षण नेतृत्व

  जिजाऊंच्या हृदयात स्वराज्यरूपी सुंदर स्वप्नाचा जन्म झाला. तसेच ते स्वप्न हूबेहूब साकार व्हावे म्हणून जी ज्वलंत मोहिम सुरू झाली त्या मोहिमेचे विलक्षण नेतृत्व जिजाऊंनी केले. आपल्या मायेच्या छत्रछायेखाली, मोलाच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेळप्रसंगी स्वत: शस्त्र हाती घेवून ह्या झुंजारू व पराक्रमी स्त्रिने मराठी माणसास तसेच मराठी मुलखास हक्काचे स्वराज्य मिळवून दिले. ज्यात दिलासा होता. मानसन्मान होता. तसेच स्वातंत्र्य होते.

6. जिजाऊंचे कष्ट व त्याग

  जिजाऊंनी पाहिलेले स्वप्न स्वातंत्र्याची गोड फळे चाखायला लावणारे होते. त्यामुळे त्यासाठी पडलेले पहिलेच पाऊल त्यागाचे होते. कारण कोणताही भव्य बदल हा भव्य त्यागातूनच जन्मास येतो. मराठी माणसास एक माणूस म्हणून मानसन्मान मिळवून देण्यासाठी तसेच मराठी प्रांतास अस्तित्व प्राप्त करू देण्यासाठी शहाजी राजे आणि जिजाऊंना विभक्त राहून आयुष्य व्यतीत करावे लागले. दोघेही आपाआपल्या ठिकाणी राहून नेटाने आजीवन लढा देत राहिले. शिवबा मोठे होईस्तोवर जिजाऊंनी एकट्याने सर्व संकटांना हिंमतीने तोंड दिले. नांगराचा सोन्याचा फास तयार करण्यासाठी जिजाऊंनी स्वत:च्या अंगावरच्या सर्व दागिने देवून टाकले. कारण स्वातंत्र्याचे जगने हे अंगावर सोने घालून मिरवीण्यापेक्षा आत्मसम्मानाचे आहे हे त्या जाणत होत्या. रयतेच्या मनात विश्वास व हिंमत जागृत करण्यासाठी जीवावरची जोखीम उचलण्याचे धाडसही जिजाऊन्नी दाखवीले. जिजाऊंनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून रयतेवरील अतूट प्रेमाचे दर्शन घडवीले. म्हणूनच त्या स्वराज्य जननी ह्या सर्वश्रेष्ठ उपाधीने इतिहासात अजरामर झाल्या.

   शतकानुशतकाच्या गुलामगिरीच्या बेड्यांमधून मुक्त होवून स्वातंत्र्याचे जीवन जगावे हे प्रत्येकास वाटते. परंतू ते जगणे प्रत्यक्षात आणण्यासाठी लाखात एखादा जीव जन्म घेतो. आपले संपुर्ण आयुष्य पणास लावतो. कारण स्वातंत्र्याची ही वाट अत्यंत खडतर असते. जी त्यागाची मागणी करते. ज्यात आप्तस्वकियांना गमवावे लागते. ज्यात मनाची युद्धे लढावी लागतात. जिजाऊ तो लाखात एक जीव होत्या. कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न खरोखरीच साकारले.   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *