जिद्द

 जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते. कारण मनातील तीव्र भावना व वेदनांची तीव्रता एखादी गोष्ट मिळवीण्यासाठी ठिणगीचे काम करतात. आपल्या हृदयातील सल जीवंत ठेवतात. आपण काही भावनीक ध्येय न ठेवता नुसतेच परीश्रम घेत राहिलो. तर एका मर्यादेनंतर आपल्याला परीश्रम करण्यास प्रेरणा मिळत नाही. कारण आपले शरीर केवळ यंत्रासारखे राबत असल्यामुळे ते थकते आणि प्रेरणेशिवाय मनही थकते. परंतू कठिण परिस्थितीतही मनातील जिद्द कमी होवू दिली नाहीतर तो आपला प्रेरक हेतू ठरतो. अशावेळी आपला तो हेतू साध्य करून देण्यासाठी सृष्टीचे दैवी सहकार्य व मार्गदर्शन आपण करत असलेल्या कसोसीच्या प्रयत्नांना लाभते.

   आपले अंतर्मन विशेषतांनी व्यापलेले असते. तरिही जीवनात आपल्यावर विपरीत परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याच क्षमतांचा अंदाजा येत नाही. कारण आपल्या क्षमतांची कसोटी पाहण्यासाठी आव्हांनांची आवश्यकता असते. आपल्या जीवात जीव असे पर्यंत प्राणिही आशा सोडत नाहीत. आपण तर मनुष्य रूपात जन्म घेतला आहे. तेव्हा आपल्या अंतर्मनातील जिद्द व इच्छाशक्ती हे आपल्याला सृष्टीने बहाल केलेले विशेषाधिकार आहेत. त्यांच्या बळावर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. कितीही वाईट परिस्थितीच्या प्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिल्यास नुसती परिस्थिती बदलत नाही. तर आपल्याला सोनेरी दिवसही दिसतात. कारण देवही त्याचीच मदत करतो जो स्वत:ची मदत करण्यास कायम तत्पर असतो.

  आयुष्यात कधिकधी आपल्या मनाविरूद्ध घडणार्‍या घटना आपल्याला आतून खचवीतात. खास करून नात्यांमध्ये निर्माण होणारे अविश्वास, प्रेमाच्या व आपल्याच माणसांकडून होणारे अत्याचार, अवहेलना तसेच अपमान काही काळासाठी आपल्या बुद्धीस टाळं लावतात. आपण अत्याचारास बळी पडत असूनही त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आपल्याला कोणाचिही साथ लाभत नाही. परंतू आपल्या सहनशीलतेसही मर्यादा असतात. त्या मर्यादा ओलांडल्या कि आपण प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द ह्यांच्या बळावर स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज होतो. त्या नरकयातनांमधून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी छटपटतो.

  कोणत्याही गोष्टीसाठी लागणारा कालावधी तसेच आयुष्यात येणार्‍या कठिण वेळा आपल्यातील संयमास आव्हान देतात. संयम आपल्याला मनाने कणखर बनवीतो. आपल्या समोर असे मार्ग उजागर करतो जे काटेरी व बोचणारे असले तरी आपल्यातील क्षमतांना प्रेरीत करणारे असतात. आपल्या आयुष्याचा सकारात्मक कायापालट करणारे असतात. परंतू त्या मार्गांवरून चालण्याचे साहस करणे म्हणजे स्वत:ला अशा किर्र काळोखात झोकून देणे ज्याची पहाट सोनेरी असण्याची पुर्ण खात्री असते. ज्याला ते साहस करता आले तो अजिंक्य ठरतो. अनेकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरतो. तेव्हा तो काटेरी मार्ग निवडण्याचा निर्णय सर्वस्वी आपलाच असला पाहिजे. जर आपल्याला आपल्या मनासारखे सर्वकाही सहज उपलब्द्ध झाले तर आपल्या अंतर्मनातील छुप्या विशेषतांची आपल्याला कधिही जाणीव होणार नाही. आपल्याला आपल्या सहनशीलतेची परिसीमा ओलांडावी लागणार नाही. त्यामुळे स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा जीवनातील ध्येय गाठण्यासाठी लागणारी जिद्द आपल्यात कधिही निर्माण होणार नाही.

  आपल्यातील जिद्द विपरीत परिस्थितीतही आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवते. तसेच आपली एकाग्रता ढळू देत नाही. परंतू आंतरीक जिद्द नसेल तर कोणत्याही व्यत्ययामुळे आपले लक्ष आपल्या ध्येयावरून सहज विचलीत होते. किंवा आपल्याला गोष्टी लांबणीवर टाकण्याची सवय लागते. आजच्या क्षणाला कित्येक जण सोशल मिडीयावर अशापद्धतीने वेळ वाया घालवीतांना दिसतात. रात्रीच्या जेवणाला संपुर्ण कुटूंब जेवणाच्या टेबलावर एकत्र आले असेल. तर ते आपसात चर्चा न करता आप-आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. पदार्थ चवीने सेवन करणे सोडून सोशल मिडीयावरील रील्स बघत जेवण दुर्लक्षीतपणे पोटात ढकलत असतात. जेवणास सगळे एकत्र बसणे हे केवळ एक औपचारीक कार्य म्हणून पार पाडले जाते. अशाप्रकारे आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये लक्ष विचलीत करण्याची वाईट सवय लागली आहे.  परंतू ती एकाग्रतेचा सराव करून मोडता येवू शकते. किंबहुना ठरवून व जाणीवपूर्वक ती मोडली पाहिजे अन्यथा जीवनात आपण कोठेही पोहचू शकत नाही.

  आपण कोणतेही काम करत असतांना वर्तमानस्थितीत मनाने उपस्थित राहत नसून अन्य गोष्टीचा विचार करत असतो. कारण आपण एक तणावपुर्ण जीवन जगत आहोत. तसेच तणाव आपल्या मनास विचलीत करण्यास कारणीभूत असतो. अशावेळी एकाग्रतेचा सराव करणे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. जसे जेवण करत असतांना टिव्ही किंवा मोबाईल न बघता. तसेच मनात अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार येवू न देता. जेवणाप्रती आभार व्यक्त करून शांततेने जेवण करणे. प्रत्येक घासाचा आस्वाद घेत घेत जेवण करणे. जेवण करत असतांना कोणाहीसाठी अपशब्दाचा वापर न करणे व मनात राग द्वेष न ठेवणे जेवण करण्याची ही पद्धत आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरते. अन्यथा कधिकधी जेवणच आपल्या आरोग्यास अपाय करते. अशाप्रकारे मन एकाग्रतेचा सराव आपल्या अंतर्मनातील विशेषतांना लाभदायक ठरतो.

  मनातील जिद्द ही चुंबकाप्रमाणे असते. जी काहिही करून आपल्या ध्येयास आपल्यापर्यंत खेचून आणते. परंतू त्यासाठी आपली कठोर परीश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. कारण एखादी गोष्ट मिळवीण्याची जिद्द जेव्हा आपल्यात निर्माण होते. तेव्हा मनोमन आपण तीगोष्ट मिळवलेली असते. जिद्द आपल्याला साहस प्रदान करते. आपण कितीही मोठ्या आव्हानांपुढे जराही डगमगत नाही. कारण आपल्या मनाने ध्येय काबीज करण्याचा ध्यास घेतलेला असतो.

  जीवनप्रवासात उत्तम गोष्टीची जिद्द पकडणे आपल्या जीवनास अर्थपुर्ण बनवीते. परंतू आता जिद्दीने व इच्छाशक्तीने पुढे जाणार्‍यांची संख्या दुर्दैवाने कमी होतांना दिसते. बरेच जण मेहनत करण्यापासून परावृत्त होवून पर्यायी सोपे मार्ग व अनौपचारीक मार्ग पत्करतांना दिसतात. कारण त्यांचा असा समज असतो कि जीवनात यश हे एका रात्रीत संपादन करता येवू शकते. तसेच सद्द्य परिस्थिती चुटकीसरशी बदलवीता येवू शकते. परंतू हा केवळ एक पोरकट समज असतो. कारण वर्षोनु वर्षांच्या मानसिकतेतून कोणतिही परिस्थिती तयार होते. त्यामुळे तिला बदलविण्यासाठीही मानसिकतेत बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागते. तसेच जीवनात एका रात्रीत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कित्येक वर्षांचे शिस्तप्रिय जीवन जगावे  व कठोर परीश्रम करावे लागतात.  

   जे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढले त्या महान क्रांतीवीरांच्या मनात ज्वलंत व तडाफदार विचार होते, अंतर्मनात प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द होती म्हणूनच आजच्या पिढीला स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळालीत. कारण त्यांनी त्यांचे विचार पुढच्या युवापिढीच्या मनावर बिंबवून एकजूटीची मानसिकता घडवीली. परंतू आजच्या पिढीला सर्वकाही तयार मिळाल्यामुळे केवळ त्याचा उपभोग घेण्याची व आपल्या पुरते सिमीत जीवन जगण्याची सवय लागली आहे. त्यांच्यातील विशेषतांना विशाल आव्हानांना सामोरे जावे न लागल्याने त्यांच्यात सामर्थ्यही उरले नाही. त्यामुळे व्यक्तीगत आयुष्यातील समस्या सोडवीत असतांना त्यांचे मानसिक स्वास्थ्य त्वरीत कोलमडून जाते. आणि त्याच्या समोर हार मानून ते आत्महत्येसारखे मार्ग निवडतात. कारण जीवनाच्या संघर्षापुढे त्यांना मृत्यूस कवटाळणे जास्त सोपे वाटते. 

  शिक्षण असो, लग्नासंबंधीत निर्णय असो किंवा कारकीर्द असो अशा कितीतरी महत्वपुर्ण गोष्टी आपण प्रवाहाच्या दबावात येवून करत असतो. कारण आयुष्यात सर्वकाही योग्य वयोमानात व्हावे असा समाजव्यवस्थेचा आग्रहच असतो. त्यामुळे प्रवाहाच्या विरूद्ध जावून काही करायचे असल्यास त्या गोष्टीसाठी जबरदस्त विरोध सहन करावा लागतो. कारण आपल्या मनावर दडपण आणले जाते. एक उदाहरण म्हणून पाहिल्यास एखाद्या महत्वाकांक्षी मुलीच्या जीवनाची परवड झाली तर त्याची जबाबदारी कोणिही घेत नाही. अशाप्रसंगी कित्येक मुली कठिण परिस्थितीशी एकट्याने झुंज देतात. तसेच जिद्द व इच्छाशक्तीच्या बळावर त्यावर मात करून आयुष्यात मोठे ध्येय गाठतात. ह्यावरून हे लक्षात येते की अंतर्मनातील विशेषतांना जागृत करून आपण अभिमानाने जगू शकतो व जीवनाचा आनंद घेवू शकतो.  

1. आपले आयुष्य आपल्या अटींवर जगण्याची जिद्द असावी

  आपल्याला जे बहुमूल्य जीवन लाभले आहे ते जगतांना आपल्याला आनंद आला पाहिजे. परंतू असे होत नाही कारण अनेकदा आपल्या बाबतचे निर्णय आपल्याशी जुळलेली माणसे घेतात. ते निर्णय अक्षरश: आपल्यावर आपल्या इच्छे विरुद्ध थोपविले जातात. आपल्या विचारांना व भावनांना प्रादान्य दिले जात नाही. आपल्यावर अत्याचार बळजबरी केली जाते. अशी अनेक कारणे आपल्या आनंदी जगण्यावर पाणी फेरतात. तेव्हा आपले व्यक्तीमत्व आपण असे घडवावे ज्यात आपली मजबूत तत्व असतील. ज्याद्वारे आपण एक असा आदर्श महामार्ग घडवू शकलो पाहिजे ज्यावर आपल्याला आपल्या अटींवर मार्गक्रमण करता येईल.

2. आपले आयुष्य निरोगी जगण्याची जिद्द असावी

  आपली आताची जीवनशैली अतिशय गतिमान आहे. कारण उत्तम आयुष्य घालवीण्यासाठी तसेच जीवनात आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात ह्यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवीण्या करीता लोक आप-आपल्या कारकिर्दीत दिवस रात्र एक करून मेहनत घेत असतात. त्यामुळे त्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परंतू निरोगी स्वास्थ्यच आपल्या जीवनात उर्जा भरत असते. तेव्हा त्यासाठी आपल्या दिनचर्येत पुरेसा वेळ समावीष्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपण दिर्घकाळ एक निरोगी जीवन जगू शकतो. आणि आपल्या स्वप्नांना जीवनात साकार करू शकतो.

3. आपले आयुष्य अर्थपुर्ण करण्याची जिद्द असावी

  स्वार्थ हा आपल्याला अविचारी जीवन जगण्यास भाग पाडतो. कारण त्यामुळे आपले जीवन फक्त आपल्यापुरते सिमीत होते. परंतू आपण आपले जीवन परोपकारासाठी वाहून देतो तेव्हा मात्र आपल्याला आपल्या जगण्याचा अभिमान वाटतो. तसेच जेव्हा आपण मजबूत जीवनमुल्यांना आपल्या जगण्यात आणतो. तेव्हाही आपले आपल्याबद्दलचे मत चांगले असते. त्याचप्रमाणे आपण स्वाभिमानास आपल्या जीवनात मिठासारखे चवीपुरते मिश्रीत करतो तेव्हा आपले आयुष्य अर्थपुर्ण होते.

4. आपले व्यक्तीमत्व सुजाण करण्याची जिद्द असावी.

  गतिमान जीवनामुळे आपण स्वत:बरोबर पुरेसा वेळ घालवू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनातील भावनांविषयी आपण पुरेसे जागृक नसतो. बर्‍याचदा आपल्याला आतून तणाव जाणवतो. कोणाजवळ बोलून मोकळे व्हावे अशी इच्छा होते परंतू आपल्याला समजून घेतील अशा जीवलग मित्रांची किंवा माणसांची आपल्याला सोबत नसते. शिवाय ज्यांच्यापाशी आपले ऐकुण घेण्यासाठी खास वेळ असेल अशी नातीही नसतात. अशावेळी आपणच जर कोणासाठी जीवाभावाचे बनून त्यांच्या आयुष्यातील ती कमतरता भरून काढू शकलो. तर हा आपला समंजसपणा कित्येकांच्या मनातील वेदना बाहेर काढण्यास मदत करेल. आपला हा सुजाणपणा आपल्या जीवनातही प्रेमाच्या माणसांना आकर्षीत करेल.  

   आपण आपल्या आसपास कोणावर अन्याय होतांना बघतो, सर्रास भ्रष्टाचार होतांना बघतो, मुलभूत गरजांना मुकलेल्या वंचीतांचे जीवन बघतो परंतू त्यांच्या कल्याणासाठी आपले एक पाऊलही उचलण्यास धजावत नाही. अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात आपला एक आवाज उठवण्यास हिंमत करत नाही. कारण आपल्याला हे ठाऊक आहे कि आपला आवाज दाबून टाकण्यात येईल. तसेच त्या दबावाच्या विरोधात उभे राहण्याची जिद्द आपल्यात नसते. त्यामुळे आपण आवाज उठवण्यासच घाबरतो. किंबहुना मुकाट्याने सहन करण्यापलिकडे काहिही करू शकत नाही. तेव्हा सर्वांच्या कल्याणासाठी पाहिजे असलेले बदल घडवून आणण्यासाठी स्वत:मध्ये जिद्द निर्माण करणे. हे प्रत्येक सुज्ञ माणसाचे आद्य कर्तव्य असले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *