जीवनप्रवास

तुमच्या माझ्या हृदयामधूनी आकारा यावे
       जीवनगाणे गातच रहावे
      झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
      जीवनगाणे गातच रहावे

केशवसूतांच्या ह्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहायला लावणार्‍या सुंदर ओळी जीवन जगण्याकडे दिशानिर्देश करतात. जीवन हे एखाद्या अर्थपुर्ण गाण्याप्रमाणे असते. तेव्हा ते गुनगुनत असतांना देहभान विसरून जावे. जीवनप्रवासात येणारे कटू अनुभव कटू आठवणी ह्यामध्ये जास्त काळ गुंतून न पडता व त्यांच्याशी संलग्न न होता, त्यामधून योग्य तो धडा घेवून पुढे पुढे चालत रहावे. कारण संलग्न होणे म्हणजे अडकून पडणे. त्यामुळे आपण जीवनाचा आनंद घेवू शकणार नाही.

   पृथ्वी गतिमान आहे. नद्या वाहत आहेत. सृष्टीतील प्रत्येक घटक हेतू पुरस्सर कार्यशील आहे. असे असतांना आपण मात्र आपल्या समस्यांमध्ये अडकून पडतो. तत्सम परिस्थिती स्वत:वर ओढवून घेवून कूढत जीवन जगत असतो. जीवनप्रवासात सगळेच दिवस सारखे नसतात. चांगल्या वाईट घटनांचे मिश्रण म्हणजे जीवन असते. आपण मात्र जीवनाकडून फक्त सुखाची अपेक्षा लावून बसलेले असतो. काही आपल्या मनाविरूद्ध झाले तर आपण त्याचा प्रतिकार करतो. परिस्थिती तेवढी बिकट नसली तरी तिचा विरोध करून तिला आपण आणखीच क्लिष्ट बनवीतो. परंतू जर वस्तूस्थितीचा आपण शांततेने स्विकार केला. तसेच सकारात्मक दृष्टीकोनातून तिला प्रतिसाद दिला. तर आपल्याला कमीत कमी मानसिक वेदना होतील. तसेच आपल्याला लवकरात लवकर त्यातून बाहेरही पडता येईल. कारण घडणार्‍या घटनांना आपण थांबवू शकत नाही. तेव्हा जीवनात चुका करण्याला, आपल्या हातून कोणतेही नुकसान होण्याला तसेच अपयशाला कवटाळून बसू नये. कारण ह्याच गोष्टी जगण्यातील खरी गंमत असतात. त्या आपल्या व्यक्तीमत्वास आव्हान देतात. त्या आव्हानांना स्विकारत व जगण्याचा आनंद घेत जीवनप्रवास निरंतर सुरू ठेवावा.

  जीवनप्रवास आपल्या व्यक्तीमत्वास खुलवीणारा व बहरवीणारा असला पाहिजे. त्यादृष्टीकोनातून प्रवास करणे, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणे गरजेचे असते. हे जग नैसर्गीक सौंदर्याने व्यापलेले आहे. परंतू घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडल्याशिवाय आपण ते आपल्या डोळ्यात साठवू शकत नाही. म्हणूनच कधी ट्रीपची योजना आखली तरी आपल्या आनंदाला उधाण येते. रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्येतून काही काळासाठी मुक्तता मिळण्याच्या विचारानेही मनात उत्साह संचारतो. प्रवासात येणारे वेगवेगळे अनुभव, तिथले हवामान, वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात जादू भरण्याचे काम करतात. प्रवासाच्या अनुभवाने आपल्या जीवनात अमुलाग्र सकारात्मक बदल घडून येतात.

  परंतू आपण मात्र आयुष्याचा बराच मोठा काळ एकाच परिस्थितीत खितपत पडलेले असतो. त्यालाच आपले भाग्य समजतो. तसेच त्यात बदल आणण्यासाठी ठामपणे प्रयत्न करत नाही. अशा परिस्थितीत आपण एक निरस व सिमीत आयुष्य जगत असतो. स्वत:वर आजारपणं ओढवून घेतो. आपल्या आसपासची आपली माणसे आपण काहिही करून जिवंत रहावे म्हणून धडपडत असतात. परंतू आपण जगतोय किंवा नाही ह्याची कोणासही पर्वा नसते.  

  आपल्या बालपणी आपण मोकळेपणाने हसतो, रडतो, हट्ट करतो. त्यामुळे आपले मन निर्मळ असते. कारण त्यात भावनांचा संचय होण्यास वाव नसतो. परंतू मोठेपणी मात्र कोणतिही गोष्ट करण्याअगोदर विचार करू लागतो. नात्यांची नाजूक बंधने आपल्याला मोकळेपणाने व्यक्त होण्यास मज्जाव करतात. अशावेळी आपल्या मनात राग द्वेश मत्सर दु:ख ह्यांचा साठा होत जातो. त्यामुळे एका विशिष्ट वयापर्यंत आल्यावर आपण नैराश्यास बळी पडतो. घरातला केर तर दररोज झाडून आपण आपले घर स्वच्छ करतो. परंतू मनातील केर बाहेर काढणे आपल्याला अशक्य होते. कारण मनापासून समजून घेणारी व ऐकुण घेणारी माणसे आपल्या आसपास नसतात. अशावेळी आपल्याला जीवनप्रवासाचा आनंद घेता येत नाही.

   आपले अंतर्मन विवीध विशेषतांनी व्यापलेले असते. ज्यात इच्छाशक्ती व जिद्द हे ही समावीष्ट असतात. तसेच आपल्याला अनेक कला कौशल्य अवगत असतात. त्यातल्या काहीत तर आपण निपुण असतो. परंतू जेव्हा आपण स्वत:वर टिका करतो किंवा स्वत:मधील क्षमतांवर शंका घेवू लागतो. तेव्हा आपण आपल्यातील कला उत्तम रितीने बाहेर साकारू शकत नाही. कारण आपण त्या कलेत निपुण असलो तरी सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी अंतर्मनातील जिद्द व इच्छाशक्तीची त्याला जोड हवी असते. त्याशिवाय त्या कलेस प्रतिसाद मिळत नाही. अशावेळी आपला जीवनप्रवास आपल्या व्यक्तीमत्वास सिमीत करतो.

   आपले वर्तमानकाळातील सर्वदृष्टीकोनाने सबळ असणे आपल्या जीवनप्रवासावर सकारात्मक परीणाम टाकणारे असते. ज्यात आपले स्वास्थ्य, आपले आर्थिक नियोजन, आपले नातेसंबंध आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा महत्वाच्या असतात. कोणत्याही कारणाने ह्या गोष्टी जर कमकुवत असल्या तरीसुद्धा आपण जीवनाचा पुरेपूर आनंद घेवू शकत नाही. आपण जर भुतकाळात एखाद्या दुर्घटनेस सामोरे गेलेले असलो तर त्याचे सखोल पडसाद आपल्या मनावर उमटलेले असतात. जे आपल्या वर्तमान क्षणातील जगण्यावरही परीणाम करतात. त्याचप्रमाणे वर्तमानातही जर काही मनासारखे होत नसेल तर आपले भविष्य देखील आपल्याला अंधकारमय दिसू लागते. त्यामुळे पुढे येणार्‍या काळाचा विचार करून आपण आजच हिंमत हारून बसतो. त्यामुळे आपल्याला जीवनप्रवासाचा आनंद घेता येत नाही.

  आपण आपले पुर्ण लक्ष वर्तमान क्षणांवर केंद्रीत केले पाहिजे. कारण काळ अत्यंत वेगाने पुढे सरसावत आहे. एक एक क्षण वाळूप्रमाणे आपल्या हातातून निसटत चालला आहे. तो क्षण जर आपल्याला जगता आला नाही. त्या क्षणाने आपल्याला जे काही दिले ते स्विकारता आले नाही. त्याचप्रमाणे त्या क्षणात होणार्‍या कटू गोड घटना आपण थांबवू शकत नाही. परंतू त्यांच्याशी संलग्न न होता आपल्याला मार्गस्थ होता आले नाही. तर आपला जीवनप्रवास सुखाचा होवू शकत नाही. आजच्या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत पैस्याने केली जाते. तसेच जर आपल्याला प्रत्येक क्षणाचे मोल पैसे देवून चुकवावे लागले असते. तर आपला प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावला असता. त्याला उत्पादनक्षम बनवीले असते. परंतू तरिही ज्याला वेळेचे महत्व कळले नाही त्याला त्याची पैस्याहूनही जास्त मोठी किंमत चुकवावी लागते. कारण वेळेला शिस्त न लावल्यामुळे आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करता येवू शकत नाही. जीवनातील जबाबदार्‍या पुर्ण करता येवू शकत नाहीत. आपली कलाकौशल्य कोणाच्याही उपयोगी पडत नाहीत आणि आपण आयुष्यात मोठे ध्येयही गाठू शकत नाही. आपण मात्र उगाचच आपल्या भाग्याला दोष देत बसतो.

   आपला आनंद, आपले कौटूंबिक सुख, आपले समाधान हे वर्तमानात घडणार्‍या गोष्टींमध्येच सामावलेले असते. तेव्हा आपण आपले वर्तमान सर्वतोपरी सक्षम बनवीले पाहिजे. संपुर्ण एक दिवस सामान्य दिनचर्येत न  जगता त्याला सर्जनशील बनवीले पाहिजे. त्याचे नियोजन करून व उत्तम रितीने विभाजन करून आपला किती वेळ निरर्थक वाया चालला आहे हे पाहिले पाहिजे. वाया जाणार्‍या वेळेसाठी परोपकाराच्या दृष्टीने योजना आखल्या पाहिजे.

  मनुष्य हा सामाजिक प्राणि आहे. तेव्हा एकमेकांच्या मदतीस धावून जाणे, सुख दु:खात सहभागी होणे, सामाजिक प्रतिष्ठा जपणे ह्या गोष्टी आपल्या व्यक्तीमत्वास खुलवीतात. त्याचप्रमाणे सणसमारंभाच्या निमीत्तानेआप्तेष्टांच्या भेटीगाठी घेणे, सामाजिक स्नेहसंमेलनात सहभागी होणे ह्या गोष्टींनी आपले मानसिक आरोग्य जपले जाते. आणि आपला जीवनप्रवास सहज व सोपा होण्यास मदत मिळते. परंतू आपण जर आपल्या पुरते सिमीत होवून जगत राहिलो तर एकटे पडतो. परंतू समाजासाठी केलेले आपले योगदान आपल्याला समाजात स्थान मिळवून देते. त्यामुळे आपला आत्मसम्मान उंचावतो. त्याचप्रमाणे आपले व्यक्तीमत्व विकसीत होत जाते.

  जीवनप्रवासाचा दिलखुलास आनंद घ्यावयाचा असेल तर सर्वप्रथम आपले मन स्वच्छ असले पाहिजे. कारण राग द्वेश तुलनात्मक भावना आपल्या मनाला आतून पोखरत असतात आणि आपले जगणे सिमीत करतात. आपल्या मनात विष कालवले गेल्यामुळे आपल्याला आतून कमकुवत असल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे आपल्याला लोकांकडूनही स्विकृती मिळत नाही. अशावेळी आपण स्वत:वर जास्तीत जास्त काम केले पाहिजे. स्वत:मध्ये आत्मप्रेम व करुणा जागृत केली पाहिजे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक होत जातील आणि हळूहळू आपण जीवनप्रवासाचा आनंद घेवू शकू.

1. समाधानाने जगण्यात जीवनप्रवासाचा आनंद आहे.

  जेव्हा आपण आपल्या जीवनाला सुरवात करतो तेव्हा आपल्या डोळ्यात खुप स्वप्न साठलेली असतात. आणि ती स्वप्न पैस्याच्या अवती भवती रेंगाळत असतात. म्हणून मग आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमवीता येईल हा विचार करतो. तसेच त्या दृष्टीने मार्गही शोधतो. परंतू फक्त पैसा व संपत्तीची लालसा, नात्यांकडून अपेक्षा ह्या गोष्टी आपल्याला आणखीच खालच्या पातळीला घेवून जातात. कारण त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभत नाही. जिथे मानसिक शांतता नसते त्या जगण्यात समाधानही नसते. कारण पैसा आपल्याला भौतिक सुख तर मिळवून देवू शकतो. परंतू आंतरीक आनंद त्यात सापडणे कठीण आहे. उच्च जीवनशैली हा प्रतिष्ठेचा भाग असला तरी आपल्याला मनशांती व समाधान .शांत झोप, साधे खाणे व साध्या राहणीमानातून, निसर्गाच्या सान्निद्ध्यातून, निरोगी व उत्तम स्वास्थ्यातून तसेच आपल्या प्रियजनांच्या चेहर्‍यावरील सुख समाधानातून लाभत असते. आणि त्यामुळेच आपला जीवनप्रवास आनंदाचा होतो.

2. स्वत:विषयी अभिमान वाटण्यात जीवनप्रवासाचा आनंद आहे

  आयुष्य स्वत:पुरते सिमीत करून जगत राहिल्याने किंवा आपले विचार केवळ स्वार्थाने बरबटलेले असले. तर आपल्याला स्वत:विषयी मोठेपणा वाटत नाही. त्याउलट आपण त्यामुळे आपल्या आसपासच्या माणसांमध्ये तुलनात्मक भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. ते आपल्यापासून विभक्त राहतात कारण ते स्वत:ला आपल्याबरोबरीचे समजत नाहीत. आपल्यामुळे त्यांच्यात न्युनगंडाची भावना निर्माण होते. परंतू जर आपण भौतिक श्रीमंतीवरून माणसांची गणना केली नाही आणि प्रत्येकास एकसारखी वागणूक दिली तर प्रत्येक जण आपल्याशी सहज रितीने जुळवून घेवू शकेल. आपल्या मनात संवेदना जागृत होतील. तेव्हा आपल्याला कळेल कि आपण भिन्न नसून इतरांसारखेच सर्वसामान्य मनुष्य आहोत. तेव्हा आपल्याला स्वत:विषयी अभिमान वाटेल.

3. स्वाभिमानाने जगण्यात जीवनप्रवासाचा आनंद आहे.

  आपले संस्कार व जीवनमुल्य जे आपल्या व्यक्तीमत्वास आकार देतात. ते आपल्याला आजीवन स्वाभिमानाने जगण्यास प्रेरीत करतात. काहिही झाले तरी तत्वांपासून तिळमात्रही आपण हलत नाही. कारण तिच आपली ओळख असते. स्वाभिमान आपल्याला कोणतेही दुष्कृत्य करण्यापासून थांबवीतो. स्वाभिमान आपल्या आत्मसम्मानास जपतो. स्वाभिमान आपल्याला सौजन्याच्या मार्गावर चालणे शिकवीतो. स्वाभिमान आपल्याला कोणत्याही बिकट परिस्थितीत डगमगू देत नाही. स्वाभिमानी व्यक्ती खर्‍याचा मार्ग कितीही काटेरी असला तरी त्यावरूनच चालणे पसंत करतो. कारण स्वाभिमानाने जगण्यातच त्याला आनंद मिळतो.

4. परोपकाराचे जीवन जगण्यात जीवनप्रवासाचा आनंद आहे.

  आपण एक माणुस म्हणून अन्य माणसाच्या समस्या, त्याच्या जगण्यातील वेदना त्याच्या जागी राहून समजू शकलो. तरच त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करू शकतो. किंबहुना त्या माणसांना माणुस म्हणून जगण्याचे अधिकार मिळावेत ह्यासाठी पेटून उठतो. त्यासाठी आपल्या हृदयात  दया व करुणा असली पाहिजे. ह्यालाच परोपकार म्हणतात. अन्यथा आपल्या भौतिक क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी मनात कोणतेही भाव किंवा संवेदना नसतांना मदत देवू केल्याने आपला आंतरीक अहंकार आणखीच बढावतो. परंतू परोपकार हे निस्वार्थ भावनेने केले जातात. त्यामुळे जीवनप्रवासाचा पुरेपूर आनंद घेता येतो.

  जीवनप्रवास हा खुप लांबचा नाही तर उत्तम असला पाहिजे. जीवनप्रवासात आपल्या संपर्कात येणारी माणसे, आपल्याला आलेले अनुभव, आपल्याला वेळोवेळी मदत करणारे आपले मित्र व प्रियजन हे आपल्या गाठिशी असलेले आपले सर्वस्व असतात. त्यांच्यामुळे आपले जीवन अर्थपुर्ण होते. आपल्या ह्या सिमीत आयुष्यात आपला आनंद कशात आहे, आपल्या जगण्याचा हेतू काय आहे आणि आपले आंतरीक समाधान कोणत्या गोष्टीत आहे ह्यांचे जर आपल्याला आकलन होवू शकले तर आपला जीवनप्रवास नक्कीच मोठा व आनंदाचा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *