जीवनात सवयींचे महत्व

 दिवस उजाडला कि सूर्य उगवणार हे आपल्याला इतके सवयीचे झालेले असते कि त्याविषयी आपल्या मनात कधीही शंका उद्भवत नाही. कारण ते एक शाश्वत सत्य आहे. अशाप्रकारे सवयींनी आपली मानसिकता घडत जाते. तर मानसिकतेने आपले जीवन आकार घेत असते. त्यामुळे चांगल्या सवयी ह्या आयुष्यात ध्येय गाठण्याचा महामार्ग असतात. तसेच वाईट सवयी आपल्याला रसातळाला घेवून जावू शकतात. सवयींचा जर आपल्या आयुष्यावर इतका प्रचंड प्रभाव पडत असेल तर आपण आपल्या सवयींबद्दल जागरूक असणे अनिवार्य आहे. परंतू आपल्याला लागलेल्या चांगल्या वाईट सवयींसाठी कायम आपले कमकुवत झालेले मनच कारणीभूत असते. कारण ते वेगवेगळ्या परिस्थितीत स्वत:ला दिलासा देण्यासाठी व शांत ठेवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असते. आपल्या मनास वेदना होत असतील किंवा मन तणावाचा सामना करत असेल. तर त्यामधून दिलासा मिळविण्यासाठी आपण क्षणिक सुखाचा मार्ग अवलंबतो. जसे  कधी आपल्याला डोके दुखीचा त्रास होत असल्यास आपण त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी थोडा चहा घेण्याचा निर्णय घेतो. जर चहा घेताच चुटकीसरशी डोके दुखायचे थांबले तर पुन्हा कधी ती परिस्थिती उद्भवल्यास आपण चहा घेण्याला पहिले प्रादान्य देतो. कारण चहा घेतल्याने डोके दुखायचे थांबते ह्यावर आपला विश्वास बसू लागतो. हा विश्वासच एक सवय बनून कायमचा आपल्या मनावर कोरला जातो. त्यानंतर चहा घेतला नाहीतर डोके दुखते म्हणून चहा घेण्याच्या खास वेळा ठरविल्या जातात. अशाप्रकारे आपल्याला कोणत्याही सवयी जडण्यामागे काही खास कारणे असतात. त्याचप्रमाणे आपण हळूहळू त्या सवयींचे गुलाम होत जातो. परंतू जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यास अर्थपूर्ण वळण लावायचे असते. तेव्हा मात्र आपण आपल्या सवयींबद्दल जागरूक झाले पाहिजे. तसेच अनावश्यक सवयींना जाणीवपूर्वक खोडून काढून त्या जागी नवीन व महत्वपूर्ण सवयी लावल्या पाहिजे.

      आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्य अवगत करत असतो. आपल्याला यशस्वी होण्यापासून थांबवतील अशा सर्व कमतरता कठोर परिश्रमांनी भरून काढतो. परंतू तरीही उत्तम सवयीची शिस्त नसेल तर यश आपल्यापासून कायम लांब राहते. कारण यशस्वी होण्याकरीता कौशल्यां इतक्याच सवयी देखील महत्वाच्या असतात. आपल्या दिनचर्येत वेळेला महत्व असणे. आपण आनंदी राहण्याला प्राथमिकता देणे. कमीत कमी बोलून जास्तीत जास्त समजून घेणे. इतरांच्या जागी राहून विचार करणे. औपाचारीकतेस नाहीतर आपुलकीस आपल्या वागण्यात समाविष्ट करणे. ह्या आणि अशा अनेक सवयी आपल्या जीवनात आणल्यास आपला व्यक्तीमत्व विकास होतो. त्याचबरोबर इतरांनाही आपल्याशी जुळवून घेण्यात कष्ट पडत नाहीत. तसेच आपण स्वत:बरोबर इतरांच्याही मानसिक स्वास्थ्याचा विचार करणेही महत्वाचे समजतो. जर आपल्याला चुकीच्या संगतीमुळे किंवा इतर कारणांनी मादक पदार्थांचे सेवन करण्याची वाईट सवय जडली. तर त्याचे अत्यंत विध्वंसक दुष्परिणाम आपल्या जीवनावर व आपल्या कुटूंबावर पडत असतात. कारण त्यामागे आपल्या मिळकतीचा बराच मोठा भाग वाया जातो. ज्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. परंतू त्यामुळे घरातील अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी मात्र पैस्याची बचत होवू शकत नाही. म्हणूनच कुटूंब प्रमुख  व्यसनांच्या आहारी गेलेला असल्यास तो सर्वांसाठी फारच चिंतेचा  विषय बनतो. त्याचबरोबर नशेच्या आहारी जावून घरात हिंसाचार करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर पाहण्यात येतात. घरात आपल्याच मुलाबाळांसमोर मर्यादा सोडून लोक वागतांना दिसतात. त्यामुळे घरातील वातावरण एकंदरीतच नकारात्मक झालेले असते. तेव्हा अशा सवयी ज्या आपल्यासाठी, आपल्या माणसांसाठी, समाजासाठी घातक आहेत त्यांना आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याचा ठाम निश्चय केला पाहिजे. कारण मनुष्य जन्म हा एका हेतू पुरस्सर झालेला असतो. त्या हेतूचा उलगडा आपल्याला होण्यासाठी तत्सम पोषक वातावरणाची आवश्यकता असते. तसेच ते वातावरण आपण स्वत:ला उत्तम सवयी लावून मिळवू शकतो. 

       आपण कधीही पूर्णपणे वर्तमान क्षणांमध्ये मनाने उपस्थित राहत नाही. कारण आपल्याला त्याचा सराव नसतो. आपले मन काही ना काही प्रमाणात होवून गेलेल्या क्षणांमध्ये गुंतलेले असते. तर कधी आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनाक्रमाचा विचार करत असते. अशाप्रकारे आपला आपल्या मनाशी निरंतर संवाद सुरू असतो. त्या संवादात भावना असतात, दृश्यांचे सादरीकरण असते, प्रतिफळ असते त्यामुळे आपल्या मनावर त्याचा ताण येतो. हा मनावरचा ताण आपल्या शरीरात असंख्य व्याधी निर्माण करत असतो. क्षण आपल्या जीवनातून मुठीतून वाळू निसटावी त्याप्रमाणे निघून जात असतात. हे आपल्याला माहित असूनही आपल्या मनावर आपल्याला ताबा मिळविता येत नाही. त्यामुळे आपली उर्जा भंग पावते कारण तिला योग्य दिशा मिळत नाही. आपल्याला वर्तमान क्षणांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या वर्तमान क्षणातील आनंद किंवा दु:ख एकाग्रतेने अनुभवन्यापेक्षा ते फोनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीन्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे त्यावर लोकांच्या प्रतिक्रीया येण्याची वाटही बघत असतो. कारण असे करून आपल्याला लोकांचे समर्थन व सहानुभूती मिळवायची असते. अशाप्रकारे आता गोष्टींमध्ये भावना गुंतवण्याचे चलन मोडकळीस येवू लागले आहे. शिवाय अति विचार व विनाकारण चिंता करून आपले मनस्वास्थ्य बिघडविण्यास आपण स्वत:च आतुर असतो. परंतू एखाद्या होणाऱ्या घटनेचा विचार व कल्पना करून आपल्याला जेवढा त्रास होतो. प्रत्यक्षात मात्र ती घटना घडत असतांना आपल्याला विशेष काहीही वाटत नाही. म्हणून अति विचार करण्याची आपल्या आरोग्यासाठी अहितकारक असलेली सवय मोडण्यासाठी आपण कसोसीने प्रयत्न केले पाहिजे. 

        आपण बऱ्याचदा मनात तुलनात्मक भाव आणून एखाद्याचे अनुकरण करण्यासाठी विशिष्ट सवय स्वत:ला लावण्याचा दृढ निश्चय करतो. त्यासोबत प्रचंड तीव्रतेने काही दिवस त्या सवयीचे पालनही करतो. परंतू ती सवय लावण्यामागे आपले कोणतेही भावनिक कारण नसते. आपण केवळ इतरांपुढे त्या सवयीचा दिखावा करत असल्यामुळे काही काळातच त्या सवयीचे काटेकोर पालन करण्यास आपल्याला त्रास होवू लागतो. त्यामुळे आपण त्या सवयी पासून परावृत्त होतो. ज्याप्रमाणे आपण कोणत्याही महत्वाच्या कारणाशिवाय काहीही करण्यास तयार होत नाही त्याचप्रमाणे सवयींचेही असते. आपण सवयी किती तीव्रतेने पाळतो त्यापेक्षा त्यात किती सुसंगतता व निरंतरता आहे हे जास्त महत्वाचे असते. आपण वर्षाच्या सुरवातीला अनेक उत्तम सवयी स्वत;ला लावून घेण्याचा निग्रह करत असतो. त्याविषयी आपल्या मित्रपरिवारात वाच्यताही करतो. परंतू आपल्या त्या निग्रहाकडे आपण तेवढ्या गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे ह्या ना त्या कारणाने आपल्या त्या निश्चयास तडा जातो. त्यासाठी आपण कधी परिस्थिती संबंधीत तर कधी आपल्या माणसांसंबंधीत तक्रारी करत असतो. परंतू आपण केलेल्या निग्रहाची जबाबदारी आपण पूर्णपणे स्वत:वर घेत नाही.

       आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चांगल्या किंवा वाईट सवयी लागण्यामागे काहीतरी उत्तेजित करणारी किंवा चालना देणारी  कारणे असतात. ज्यात संगत, मनातील वेदना, विशिष्ट जागा किंवा गंधाशी जुळलेल्या आठवणी असतात. जेव्हा आपल्याला आपल्या समस्या मुळापासून सोडविण्याची हिम्मत नसते. तेव्हा आपण आपल्या मनास क्षणिक दिलासा देणाऱ्या गोष्टींच्या आहारी घेवून जातो. अशाप्रकारे आपल्याला लागलेल्या नशेच्या आहारी जाण्याच्या व अनौपचारिक संबंधांच्या सवयी ह्या आपल्यासाठी विनाशकारी असतात. तेव्हा आपण सात्विक मार्गाचा अवलंब करून, आपल्या खानापानात शुद्धता आणून त्याचप्रमाणे सभ्यतेच्या आचरणाचा अवलंब करून आध्यात्मिक मार्गाने समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचले पाहिजे. जेणेकरून वाईट सवयींमुळे आपले आयुष्य उध्वस्त होता कामा नये. 

        आपली एखादी सवय अगदी सहज व आपोआप आपल्याकडून पाळली जाते. जसे सकाळी उठल्यावर ब्रश करण्यासाठी आपल्याला कोणाच्याही प्रेरित करण्याची आवश्यकता पडत नाही. त्याचप्रमाणे आपला श्वास जो निरंतर सुरू असतो. तो आपण शरीर रूपाने जिवंत असण्याची खूण असतो. ती आपल्या शरीराची एक सहज व नैसर्गिकपणे होणारी प्रक्रिया असते. ती होत असतांना आपल्याला कोणत्याही प्रकारचा आनंद किंवा कुतूहल होत नाही. परंतू जर आपल्याला काही क्षणांसाठी आपला श्वास रोखून धरण्याची आज्ञा मिळाली. तर एक वेळ अशी येईल जेव्हा आपल्याला आपले श्वास घेणे इतके महत्वाचे वाटेल कि त्यापुढे आपली माणसे, संपत्ती पैसा सर्वकाही नगण्य वाटू लागेल. फक्त श्वास घेण्याची परवानगी शक्य तितक्या लवकर पाहिजे असेल. कारण त्याशिवाय आपण जीवित राहू शकणार नाही. अशाचप्रकारे आपण जीवनापयोगी सवयींना शक्य तितक्या लवकर आपल्या जगण्याचा भाग बनवून त्यांना सहजपणे आपल्या दिनचर्येत आणले पाहिजे. तसेच जीवनात वेळ फार महत्वाची असते आणि वेळेची शिस्त पाळणे ही एक सर्वोत्तम सवय आहे. कारण वेळेस आपण थांबवू शकत नाही. परंतू स्वत:ला शिस्त लावून आपण वेळेचा सदुपयोग नक्कीच करून घेवू शकतो. वेळेप्रती जागृत राहून जगणे व कोणास दिलेली वेळ पाळणे ह्या गोष्टी सभ्यतेत मोडतात. आयुष्य म्हणजे सीमित कालावधीचा जीवनपट असतो. तेव्हा ज्याने वेळेचे महत्व जाणले तोच जीवनाचा आनंद घेवू शकतो. 

       आपल्या कुटूंबास सर्वदृष्टीकोनातून सुखी ठेवणे व जीवनात कुटूंबासमवेत आनंददायी क्षण घालविणे ही एक उत्तम सवय स्वत:ला लावून घेतली पाहिजे. कारण ती सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक व भावनिक आधार मिळतो. जीवनात प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळते. आपण शारीरिक वेदनांना टाळू शकत नाही व कोणाशी वाटूही शकत नाही. परंतू आपण जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलल्यास एका दु:ख विरहीत जीवनाचे शिल्पकार नक्की होवू शकतो. तेव्हा ज्या वाईट सवयी आपल्या गृहसौख्यावर घाला घालतात. त्यांना आपल्यापाशी जोपासून ठेवू नये. त्याएवजी कुटूम्बीयांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी प्रगतीची कास धरणे. आपल्या कुटूंबातील सदस्यांना प्रगती करण्यास प्रेरित करणे. तसेच समाजात एक आदर्श कुटूंब बनून माणुसकीचे धोरण अवलंबणे. ह्या सवयी जीवनात बहुमूल्य ठरतात. जसे सात्विक खानपानाची सवय आपल्या मनाला व विचारांनाही शुद्ध बनविते. तसेच शुद्ध विचारांनी आपले सुंदर जीवन घडत असते. तेव्हा काही सवयी तोडून त्याजागी अन्य चांगल्या सवयी लावण्याची आवश्यकता का आहे ह्याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे.  

1 .    अनावश्यक सवयींना नवीन व उत्तम सवयींनी बदलवून टाकावे 

         आपल्या अनेक अशा सवयी असतात.  ज्या अनावधानाने किंवा मनाला क्षणिक दिलासा देण्यासाठी लागलेल्या असतात. परंतू वर्तमान क्षणांमध्ये मात्र त्या सवयींचा आपल्याला त्रास होत असतो. जर आपण एखाद्या आजारपणातून जात असू तर जास्तीत जास्त आराम करण्याची सवय आपल्याला लागते. काही गृहिणीना दुपारी रिकाम्या वेळेत झोपण्याची किंवा निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालविण्याची सवय लागते. काही शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून लांब राहणाऱ्या मुलांना मिळालेले स्वातंत्र्य गैर मार्गाने उपभोगण्याची सवय लागते. युवकांना आपला मौल्यवान वेळ सतत सोशल मिडीयावर व्यस्त राहून घालविण्याची सवय लागते. अशाप्रकारे प्रत्येक वयातील व प्रत्येक पेशातील अजागारूक लोक आपले मन अशा ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. जिथे त्यांना काही क्षणांसाठी आपल्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. परंतू अशा सवयी आपल्या आयुष्यात दीर्घकाळासाठी राहिल्यास विनाशकारी ठरतात. कारण ह्या सवयी आपल्याला आपल्या परिस्थितीपासून दूर ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे आपली हिम्मत तोडण्यास कारणीभूत ठरतात. तेव्हा आपण आपल्या सवयींबद्दल कायम जागरूक राहिले पाहिजे. ज्या सवयी आपला आज निष्क्रीय बनवितात. आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब घेवून जातात. तसेच आपल्याला आपल्या मनाचा आंतरिक प्रवास करण्यापासून परावृत्त करतात. अशा सवयींना आपल्या जीवनातून काढून टाकावे. त्याचप्रमाणे ज्या सवयी दीर्घकालीन फायदेशीर असतात त्यांना आपल्या दिनचर्येत त्वरीत स्थान द्यावे. 

2 .    सवयी बदलवून टाकण्यामागची भावनिक कारणे शोधावीत 

      आपल्याला आपली जी सवय बदलायची इच्छा आहे. त्या सवयीमुळे आपल्याला कोणता त्रास होत आहे. ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे ठाउक असली पाहिजे. कारण त्यामागे जेवढे मोठे भावनिक कारण असेल तेवढ्या लवकर आपण त्या सवयीपासून परावृत्त होवू शकतो. समजा आपला जोडीदार अंतर्मुखी आहे. कधीकधी आपण त्या गोष्टीला त्याच्यातील उणीव समजून वेळोवेळी त्याला त्यावरून सल्ला देतो. किंवा इतरांसमोर त्याला अपमानित करतो. परंतू त्यामुळे आपला जोडीदार आपल्यापासून मनाने दुरावला जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर  त्याच्या व आपल्या नात्यात कडवटपणा येतो. अशावेळी आपली ही वाईट सवय तोडून आपल्या जोडीदाराला वेळोवेळी पाठबळ देण्यात बदलून टाकली पाहिजे. तसेच आपला जोडीदार जसा आहे तसा त्याचा मनापासून स्वीकार केला पाहिजे. त्याला विनाअट प्रेमाने जपले पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यातील उनीवान्ना आपल्यातील क्षमतांनी भरून काढले पाहिजे. कोणत्याही नाजूक नात्यास आंतरिक प्रेमाने जपण्याची ही स्वस्थ सवय त्या नात्यास बेजोड व अतुलनीय बनवित असते. तेव्हा आपल्या गैर जबाबदार सवयी ज्या इतरांना दुखवीतात त्यांना ठरवून बदलून टाकले पाहिजे.  

3 .    वाईट सवयी लागण्यामागच्या कारणांना समूळ नष्ट करावे. 

        आपल्याला कोणतीही सवय लागण्यासाठी एखादी उत्तेजित करणारी गोष्ट कारणीभूत असते. त्याशिवाय आपण सवयींच्या जाळ्यात फसत नाही. त्याचप्रमाने आपल्या एखाद्या आवडत्या माणसाच्या प्रशंशेस पात्र ठरण्यासाठीही आपण इच्छा नसतांना स्वत:ला विशिष्ट सवय लावून घेतो. परंतू त्यामुळे कधीकधी आपली कोंडीही होत असते. कारण त्या सवयींचे दुष्परिणाम ठाऊक असूनही कोणाच्या तरी दबावास बळी पडून नाईलाजास्तव आपण त्या सवयीचे पालन करत असतो. अशावेळी आपण आपल्या मनाचा कल ओळखला पाहिजे. जी गोष्ट आपल्या मनास पटत नसेल ती करण्यास स्पष्ट नकार देण्याची हिम्मत आपल्यात आणली पाहिजे. कधीकधी जी गोष्ट स्पष्ट नकार किंवा होकार दिल्याने टाळता येवू शकते. त्यासाठी आपल्या मनाविरुद्ध सवयीची बंधने स्वत:ला लावणे योग्य नाही. तेव्हा वाईट सवयींमध्ये स्वत:ला ढकलण्यापेक्षा त्यामागे असलेल्या कारणांचा उघड उघड विरोध करणे जास्त चांगले आहे. 

4 .    अनावश्यक सवयींना खोडून टाकण्याची जबाबदारी सर्वस्वी स्वत:वर घ्यावी. 

        आपल्याला लागलेल्या एखाद्या वाईट सवयीसाठी बऱ्याचदा आपण आपल्या संगतीस जबाबदार ठरवितो. परंतू कधीकधी जेव्हा आपले काही कारणाने कमकुवत झालेले मन क्षणिक दिलास्याकरीता किंवा काही काळासाठी आपल्या समस्यांपासून लांब राहण्यासाठी आपोआप एखादा मार्ग अवलंबते. तेव्हा त्यातून काही विपरीत घडले तर त्यासाठी आपण दुसऱ्यास जबाबदार धरतो. त्याचप्रमाणे चांगले घडल्यास त्याचे श्रेय मात्र फक्त स्वत:ला देतो. परंतू कोणत्याही मार्गाने का असेनात शेवटी अनावश्यक वाईट सवयींचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतात. तेव्हा जर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होवू लागली. तर जास्त वेळ न दवडता थेट निर्णयास पोहोचावे. तसेच आपले जीवन विस्कळीत करणाऱ्या अनावश्यक सवयींना आपल्या जीवनातून हद्दपार करण्याची जबाबदारी स्वत:वर घ्यावी. कारण हे बहुमूल्य जीवन आपले आहे. त्याचप्रमाणे त्यास अर्थपूर्ण बनविण्याची जबाबदारीही सर्वस्वी आपलीच आहे.

        जीवनात पुढे पुढे जात असतांना जास्तीत जास्त प्रगती करण्याच्या हेतूने आपण आपल्याला शक्य असतील तितकी कौशल्ये अवगत करण्यावर पूर्ण भर देतो. तरीही आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त झाले नाहीतर आपण आपल्यातील कमतरतांवर टीका करण्यास सुरवात करतो. परंतू जीवनात यशस्वी होण्यास आपल्यातील कौशल्यांइतकेच आपल्याला उत्तम सवयी असणे जास्त महत्वाचे असते. हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तेव्हा उत्तम सवयींनी आपले जीवन आपल्याला पाहिजे तसे घडविता येवू शकते. त्याचप्रमाणे  स्वत;ला उत्तम सवयी लावणे ही देखील सर्वस्वी आपलीच जबाबदारी असते.            

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *