तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी

नाती आपल्या आयुष्याची जीवनरेखा असतात. म्हणूनच त्यांच्याकरीता आपण रात्रंदिवस झटत असतो. त्यांना जगातील सर्व सुखसोयी प्रदान करता याव्यात ह्यासाठीच आपली सर्व भागदौड सुरू असते. परंतू नाती जोपासण्यास काय एवढे पुरेसे आहे? तर नाही. कोणतेही नाते उमलते व हळूवार विकसित होते ते फक्त वेळेची व भावनांची गुंतवणूक केल्याने. कारण नात्याला मनाची भाषा कळते. तेव्हा मनं जुळल्याशिवाय बाहेरून केले गेलेले कोणतेही प्रयास केवळ व्यर्थ असतात. मनांचे तार एकत्रित येण्यासाठी मात्र नात्याला पुरेसा व गुणवत्तापूर्ण वेळ देणे महत्वाचे असते. ज्यामुळे आपण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी होवू शकतो. गोष्टी आपसात वाटल्याने नात्याची वीण आणखीच घट्ट होण्याची शक्यता असते. नात्यात अतूट विश्वास निर्माण होतो. त्याचप्रमाणे अशी उत्कृष्ठ नाती आपल्या मानसिक आरोग्यासाठीही अत्यावश्यक असतात. परंतू आज मात्र ह्या हृदयानजीकच्या नात्यांच्या आपल्यावरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपण आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. आपले आरोग्य जपत नाही. केवळ दिवसरात्र कष्ट करत असतो. आपल्या ज्या व्यक्तीगत वेळेवर आपला व आपल्या नात्यांचा हक्क असतो. तो मूल्यवान वेळ आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या अनोळखी लोकांबरोबर व्यतीत करत असतो. कारण कालांतराने हे मनाविरुद्ध वागणे आपली एकप्रकारे विवशता झालेले असते. त्यातूनच नात्यात दुरावा गैरसमज अपेक्षा व ताणतणाव उदयास येत असतात. ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाळता येवू शकतात. जर आपण नात्यात वेळेची गुंतवणूक करू शकलो. परंतू ह्या धकाधकीच्या जीवनात ते कसे शक्य आहे? थोडा आपल्या बुद्धीचातुर्याला जोर दिला तर उत्तर येईल ”तंत्रज्ञान”.

आपल्या ह्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे एकमेव समाधान आहे आजचे हे तंत्रज्ञान. कारण तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोगामुळे आपण आपल्या वेळेची बचत करू शकतो. तसेच तो मौलिक वेळ आपण आपल्या नात्यांच्या संवर्धनासाठी गुंतवू शकतो. मी स्वत:ला एक उदाहरण म्हणून आपल्या समोर ठेवते. मी एक गृहिणी आहे. आजपासून वीस वर्षाअगोदर घरातील सर्व कामे स्वहस्ते करण्याच्या अट्टाहासामुळे मी स्वत:ला संपूर्ण दिवस व्यस्त ठेवत असे. इतकेच नाहीतर माझे मन व डोक्यात सुरू असलेले विचार देखील केवळ कामांवरच खिळून राहत असत. त्यामुळे माझा वेळ जो माझ्या लहान लहान मुलांच्या सुदृढ शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक होता. तो मी त्यांना तेव्हा देवू शकले नाही. कारण मी माझ्या वेळेला मुलांना प्राथमिकता देण्याच्या दृष्टीकोनातून व्यवस्थापित करू शकत नव्हते. नेहमी काहीतरी काम अपूर्ण असल्याच्या भीतीने मी ग्रस्त राहत असे. परंतू आज मी त्या गोष्टीसाठी कितीही पश्चाताप केला तरी त्याला काहीही अर्थ नाही. माझी मुले आता तरुण झाली आहेत आणि त्यांचे लहानपण पुन्हा कधीही परत येवू शकत नाही. परंतू कधी स्वत:बरोबर एकटे असल्यावर हे शल्य माझ्या मनाला आजही बोचत राहते. कारण वेळा कशाबशा का होईना पार पडत जातात. परंतू त्या त्या वेळी आपण आपल्या जीवालागांबरोबर सर्वार्थाने उपस्थित राहिलो नाही. तर मात्र त्यांच्यात नि आपल्यात एक अदृश्य दरी आजीवन राहते. त्याचप्रमाणे कालांतराने ती आणखी रुंदावूही शकते. तेव्हा वेळ आणि आपली माणसं ह्यांच्याप्रती अजागृक राहणे योग्य नाही. कारण ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत मौल्यवान असतात.

ही जघन्य चूक मात्र माझ्या हातून झाली. तसेच त्यातूनच मला तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून आपला वेळ वाचविण्याची जाणीव झाली. एकंदरीत मला चुकेतून शहाणपण आले हे म्हणणेच योग्य ठरेल. तेव्हा मी सर्वप्रथम स्वत:च्या विचारात परिवर्तन आणण्यास सुरवात केली. तसेच आपल्या माणसांसाठी वेळेची गुंतवणूक करण्याच्या विचाराने प्रेरित झाले. त्यातूनच तंत्रज्ञानाने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. ज्यामुळे मी गृहिणी असून देखील माझ्या घरातील कामांचे स्वरूप आज बदललेले आहे. कारण वेळेची बचत कामांची गुणवत्ता मानसिक आरोग्य नात्यांना पुरेसा वेळ त्याशिवाय आपल्या रिकाम्या व्यक्तीगत वेळेस उत्पादनक्षम बनविण्याच्या परिपक्व विचारांनी मी आता समृद्ध आहे. त्याचप्रमाणे आपले विचारच आपल्या आयुष्यालाही आकार देत असतात. ज्यामुळे आज मी माझ्या तरुण मुलांशी मैत्री करू शकले. त्याचप्रमाणे स्वत:ला देखील पुरेसा वेळ देवून वयाच्या पन्नाशीत माझ्या लिखाणाच्या छंदाला कारकिर्दीत परिवर्तीत करू शकले. त्यातूनच आज माझ्या नावासमोर ”लेखिका” ही उपाधी लागलेली आहे. कारण नुकतेच मी ”स्त्रीत्व” संघर्षातून सन्मानाकडे ह्या नावाचे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. हे सर्व माझ्या आयुष्यात घडू शकले. कारण मी वेळेत जागृत झाले. स्वत:ला अद्दयावत बनविले. महत्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाशी ओळख करून त्याच्याशी जुळवून घेतले. माझ्या आयुष्यात हा विलक्षण बदल केवळ मी माझ्या मनात जागृत झालेल्या पुढारलेल्या विचारांना आचरणात आणल्याने झाला. त्यामुळे माझे सर्वांना हेच सांगणे आहे कि तंत्रज्ञानाला भिऊ नका. त्याविषयी जागृत व्हा. शिकण्याची तयारी दाखवा. नवीन युगाशी जुळवून घेण्यास उत्साही असा. जुनं ते सोनं नक्कीच आहे. परंतू आपल्या आत्मविश्वासात भर घालण्यासाठी नव्याचा स्वीकार करणेही अत्यंत आवश्यक आहे. हीच जगण्याची रीत आहे.

आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. परंतू काही बोटावर मोजण्याइतकी माणसे असतात जी अत्यंत निरपेक्ष हेतूने आजीवन आपल्याशी जुळून राहतात. अशा माणसांसाठी निदान आपला पुरेसा वेळ समर्पित करणे ही त्या नात्यांना आजीवन जपण्यासाठी एक सर्वात सुरेख भेट ठरू शकते. ज्यामुळे त्या नात्याचा गोडवा टिकून राहतो. त्याचप्रमाणे सुरक्षित अंतर राखल्याने व क्षेत्राच्या मर्यादा पाळल्याने त्यांचा सम्मानही राखला जातो. तेव्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शक्य त्या ठिकाणी आधुनिक साधने वापरून आपल्या वेळेची बचत नक्की करावी. कारण वेळ हा मिठाच्या गुणधर्माप्रमाणे काम करत असतो. कोणाबरोबर मनापासून घालविलेला आपला एक क्षणही एखाद्याला जीवनदान देवू शकतो. परंतू आपणच आपल्या वेळेची किंमत केली नाही. तर मात्र इतरांच्या आयुष्यातही आपली केवळ लुडबूडच होते. म्हणूनच आपल्यापाशी मित्रांच्या सुखदु:खात सामील होण्यास वेळ असला पाहिजे. तसेच आपल्या माणसांची मनं मोकळी करण्यासाठी वेळ असला पाहिजे. त्यांच्याबरोबर दोन आनंदाचे क्षण आपल्याला व्यतीत करता आले पाहिजे. त्यांच्या मनात आपल्याला स्थान निर्माण करता आले पाहिजे. कारण वेळेच्या अभावाची सबब देवून आपण आपल्या माणसांनाच आयुष्यभर दूर सारत असतो. परंतू जेव्हा आपल्यापाशी मुबलक वेळ असतो. तेव्हा मात्र आपल्या आयुष्यात जिव्हाळ्याची माणसेच उरत नाहीत. ह्यामधून आपल्याला हाच बोध मिळतो कि आयुष्यात आपल्या हृदया नजीकची माणसे त्यांच्यात आपल्या गुणवत्तापूर्ण वेळेची गुंतवणूक करूनच आपल्याला जपता येवू शकतात. त्यासाठी तंत्रज्ञानाशी हात मिळवणी करणे महत्वाचे आहे.

1. आईचा गुणवत्तापूर्ण वेळ मुलांसाठी

[पूर्वीच्या काळातील आईची कल्पना केली तर शक्यतोवर तिचे कार्यक्षेत्र घर हेच असायचे. त्यामुळे मुलं घरी आले कि त्यांना आई घरीच दिसायची. परंतू आता काळानुसार सर्व चित्रच बदलले आहे. आजची आई घरापेक्षा अधिक उंबरठ्या बाहेरच्या जगात व्यस्त असते. कारण तिचे कार्यक्षेत्र आता विस्तारलेले आहे. तरीही आई ही आईच असते. मुलांसाठी तिचे महत्व आजही तितकेच आहे. तेव्हा आईचा पुरेसा वेळ मुलांना मिळणे हा त्यांचा तिच्यावरचा हक्कच आहे. त्याचप्रमाणे आईच्या कोणत्याही कृतीतून चुकूनही केवळ आपल्यापुरते जगणे व त्यासाठी पैसा कमविण्याचे मशीन बनण्याचा संदेश मुलांच्या मनावर बिम्बवीला जाता कामा नये. अन्यथा नात्यांचे जग कोरडे पडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कोणत्याही आईने दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. आपली दोन्ही कार्यक्षेत्रे सांभाळूनही ती मुलांना पुरेसा वेळ देण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहिली पाहिजे. चैतन्यपूर्ण राहिली पाहिजे. त्यासाठी तिचे तणाव रहित असणे आवश्यक आहे. म्हणूनच तिने आजच्या तंत्रज्ञानाप्रती जागरूक असले पाहिजे. कारण आजच्या जगात कठोर परिश्रमांनी नाहीतर बुद्धीला चालना दिल्याने जगणे सोपे करता येवू शकते. तेव्हा तिने तिच्या कष्टाने कमाविलेल्या पैस्याची योग्य जागी गुंतवणूक करून आपल्या दैनंदिन जीवनात आधुनिक साधनांचे चयन केले पाहिजे. त्यांना हाताळणे शिकले पाहिजे. जेणेकरून जेव्हा ती आपल्या मुलांबरोबर आपला गुणवत्तापूर्ण वेळ घालवत असेल तेव्हा त्याचक्षणी तिची इतर कामेही आधुनिक साधनांद्वारे होत असतील. ज्यामुळे ती मनानेही विचलीत न होता फक्त मुलांसोबत हजर राहू शकेल.

2. पतीपत्नीचा गुणवत्तापूर्ण वेळ एकमेकांसाठी

स्त्री पुरूष समानतेमुळे आज पतीपत्नी दोघेही उच्च शिक्षित व मोठ मोठ्या पदांवर कार्यरत असतात. त्याचप्रमाणे एक उच्च जीवनस्तर जगत असतात. परंतू तरीही ते आपआपल्या कारकिर्दीत व्यस्त असल्यामुळे एकमेकांना पुरेसा गुणवत्तापूर्ण वेळ देवू शकत नाहीत. त्याशिवाय व्यक्तीगत महत्त्वाकांक्षाही कालांतराने त्यांच्यात दुरावा निर्माण करत असतात. अशाच काही कारणांमुळे पती पत्नीत गैरसमजांचे साम्राज्य पसरत जाते. म्हणून पती पत्नी दोघांनीही आपसात सामंजस्याने काही निर्णय घेतले पाहिजे. अर्थार्जनाशी निगडीत दिवसभऱ्याच्या कामानंतर त्यांनी घरातील व्यवस्थापन सुद्धा आपसात वाटून घेण्याची तयारी दाखविली पाहिजे. त्याचप्रमाणे ते आणखी सोपे करण्यासाठी आधुनिक साधने वापरली पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल. घराशी निगडीत कामेही अगदी सुरळीत व कमी परिश्रमांनी पार पडतील. अशारितीने त्या दोघांना एकमेकांजवळ व्यक्त होण्यास अन्य कोणत्याही गोष्टीत विभाजित न झालेला गुणवत्तापूर्ण वेळ मिळेल. त्यात ते आपल्या नात्यात नकळतपणे निर्माण झालेल्या अदृश्य दऱ्या संवादातून भरून काढू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या नात्यात पुन्हा प्राण शिंपडू शकतात.

3. मुलांचा गुणवत्तापूर्ण वेळ वृद्ध आईवडीलांसाठी

आजच्या ह्या प्रतीस्पर्धापूर्ण आयुष्यात प्रत्येकच वयातील माणसे काही ना काही समस्यांचा सामना करत असतात. त्यातल्या त्यात ज्यांच्या खांद्यांवर कुटूम्बाची जबाबदारी असते. त्यांना तर कधीकधी कुटूम्बाच्या भरण पोषणासाठी घरापासून लांब राहावे लागते. तर कधी ते आपल्या कारकिर्दीत इतके व्यस्त असतात. कि आपल्याच वयोवृद्ध जन्मदात्यांची विचारपूस करण्यासही त्यांच्यापाशी वेळ नसतो. ते फक्त दुरूनच त्यांचे सर्वकाही नीट सुरू असल्याची खात्री करून घेत असतात. परंतू आईवडील ज्या वयातून जात असतात. त्या वयात त्यांना वेळोवेळी मुलांच्या भावनिक आधाराचीही गरज असते. आपल्या काळजीयुक्त स्पर्शाचीही आवश्यकता असते. आपल्या मुलांना आमोरासमोर डोळे भरून बघण्याची त्यांचीही इच्छा असते. परंतू त्यासाठी मुले व आईवडील दोघेही परिस्थितीपुढे विवश असतात. अशाप्रसंगी आईवडीलांनाही तंत्रज्ञानाविषयी थोड्याफार प्रमाणात माहिती असली पाहिजे. जेणेकरून ते त्याद्वारे आपल्या मुलांना शक्य त्या ठिकाणी मदतीचा हात देवू शकतात. अशारितीने मुलांच्या काही जबाबदाऱ्या ते स्वत;वर घेवून मुलांना स्वतंत्र करू शकतात. तसेच अधून मधून आपल्या मुलांबरोबर पुरेसा गुणवत्तापूर्ण वेळ घालवू शकतात. जो त्यांना मानसिक समाधान व आनंद प्रदान करेल.

4. तंत्रज्ञानासोबत सुखी कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी आपल्या जीवालागांमध्ये भावनांची व वेळेची गुंतवणूक करणे महत्वाचे असते. कारण जगातील उच्चतम भौतिक सुख पायावर लोळण घालत असले तरी आपल्या माणसाची नजर जोवर आपल्यावर पडत नाही. त्याच्या नजरेत आपल्यासाठी आपण प्रेम पाहत नाही. त्याची स्तुती जोवर आपल्या कानावर पडत नाही. आपण अक्षरशा आतल्या आत तळमळत असतो. कारण जर आपल्या आयुष्यात कोणी सुखदु:खाचा वाटेकरी नसला तर सुखाचा परमानंद आपण भोगू शकत नाही. आपले दु:ख कोणापाशी वाटल्याशिवाय कमी होणार नाही. आजची पिढी जी जीवन जगतांना प्रतिस्पर्धा, बेरोजगारी, सोशल मिडियावर त्यांना मिळालेली नापसंती, तारुण्यातील नातेसंबंध तसेच त्यांच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या ह्या सर्व गोष्टींचा सामना करत निराशेस बळी पडत आहे. जर त्यांना घराच्या चार भिंतीत साधं कोणी मनापासून त्यांचं म्हणणं ऐकून घेणारे नसले तर खचून जावून ते आपले जीवन संपवून टाकण्याच्या विचाराने प्रेरित होत असतात. म्हणून गोष्टींचे गांभीर्य समजून घेण्याची आज प्रत्येकास गरज आहे. आपल्या माणसांसाठी एक क्षणही समर्पित करणे त्यांना जीवनदान देवू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्यापाशी वेळेची मुबलकता असली पाहिजे. तेव्हा तंत्रज्ञांना इतका उत्तम आपला आणखी कोणीही मित्र असू शकत नाही. त्याच्या सोबतीने आपण आपल्या नात्यांना आपुलकीच्या धाग्याने कायम एकसंध ठेवू शकतो.

तंत्रज्ञानाने आपले जीवन जगणे सहज व सोपे होत चालले आहे. तेव्हा आपणही आपल्या माणसांच्या प्रेमाखातर त्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण जीवनाचा कालावधी सीमित आहे. सर्वकाही इथे तात्पुरते आहे. तेव्हा आपल्या माणसांबरोबरच्या गुणवत्तापूर्ण क्षणांत आपण सर्वार्थाने हजार असले पाहिजे. ज्यामुळे जगण्याचा आनंद द्विगुणीत होत असतो. परंतू आपण मात्र त्यांच्याशी चढाओढी मत्सर भांडणे करण्यात आपला वेळ वाया घालवितो. तसेच जीवन स्वनिर्मित दु:खाने भरून टाकतो. जगण्याच्या ह्या चुकीच्या पद्धतीनेच आज जग कोरडे होत चालले आहे. तेव्हा तंत्रज्ञानाने दैनंदिन जीवन सोपे करण्यातच खरा आनंद आहे. तंत्रज्ञानाची गुंतवणूक आपला बहुमूल्य वेळ वाचविण्यात. तसेच वेळेची गुंतवणूक नाती जोपासण्यात. हे एक सुज्ञपणाने केले गेलेले चयन आहे. जे जगण्याला गुणवत्तापूर्ण बनविते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *