
आजच्या परिस्थितीत कित्येक घरांमध्ये तरुण मुलांना आपली कारकीर्द निवडण्याची संधी दिली जात नाही. त्याचबरोबर आई वडीलांचा जास्तीत जास्त रोख मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनविण्याकडे असतो. आपल्या मुलांच्या जीवनातील एवढा महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना ते केवळ आपल्या आर्थिक क्षमतांचा, आपल्या इच्छेचा व आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार प्राथामिकतेवर ठेवत असतात. परंतू ते करत असतांना मुलांच्या क्षमतांना व त्यांच्या इच्छांना ग्राह्य धरणे त्यांना गरजेचे वाटत नाही. कारण सामाजिक नियमानुसार मुलांनी ठराविक वयोमर्यादेत ठराविक गोष्टी पार पाडून स्वत:ला समाजापुढे सिद्ध करावे. जेणेकरून एक सामान्य जीवन व्यतीत करण्यास त्यांना कोणत्याही अडचणी येता कामा नये असे आई वडीलांना वाटत असते. त्याचबरोबर ते आपल्या कुटूम्बातील व मित्रमंडळींच्या प्रगतीशील मुलांना उदाहरण म्हणून बघत असतात. तसेच आपल्या मुलानेही त्याच मार्गाचा अवलंब करून पुढे जावे अशी त्यांची मनोमन इच्छा असते. अशाप्रकारे हल्ली आई वडील आपल्या मुलांना त्यांचे मत जाणून न घेता, इतरांना बघून व पैस्याच्या लोभापायी आय टी क्षेत्राकडे जाण्यास भाग पाडत असतात. त्यामुळे घरा घरामधून निदान एक तरी तरुण तरुणी कार्पोरेट विश्वात आपले भक्कम स्थान जमविण्यासाठी संघर्ष करत आहे. त्या संबंधीत शिक्षण पूर्ण करून दरवर्षी तरूणाईचा लोंढा मोठ मोठ्या महानगरांकडे वळतो. तसेच त्या शहराच्या गर्दीत व गोंगाटात नकळतपणे समाविष्ट होतो. त्याचप्रमाणे एका तणावपूर्ण दिनचर्येत आपल्या स्वप्नांचा मागोवा घेवू लागतो. त्यामुळे कार्पोरेट जगातील मानसिक ताण व प्रतिस्पर्धा ह्या त्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग होवून जातात. त्यामुळे त्यांची सहनशिलतेची क्षमता वाढते आणि त्या बरोबर जगणे ते शिकून घेतात. एकदा मुलं त्यांच्या जगात स्थिर स्थावर झालेली पाहून आई वडील तर चिंतामुक्त होतात. परंतू मुलं मात्र एका अशा कारकिर्दीत आपले पाय जमवीन्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात जी त्यांच्या स्वप्नांचा कधीही भाग नव्हती. कारण कोणाच्यातरी दबावात येवून त्यांनी त्या क्षेत्राची निवड केलेली असते. त्यामुळे त्यांना त्यात फसल्याप्रमाणे वाटत असते.
तरुण मुलं नोकरी निमित्ताने आपल्या माणसांपासून व घरापासून लांब राहून स्वकमाईवर एक स्वतंत्र जीवन जगत असतात. आपल्या वयाचा व जीवनाचा मजा घेत असतात. कारण सुरवातीला त्यांना हे स्वतंत्र जीवनच सर्वात जास्त आकर्षित करत असते. त्यामुळे ते आणखी सुखसुविधाजनक करण्यासाठी अंगावर अतिरिक्त लोन घेवून व इतरांशी स्पर्धा करत आपल्या गरजा आणखी वाढवत जातात. अशाप्रकारे एक तणावपूर्ण व व्यस्त दिनचर्या जगत असूनही ते आनंदी असतात. परंतू तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता तरुणवर्ग बेरोजगारीसारख्या समस्येचा सामना करत असतांना दिसतो. कारण नोकरी मिळविणे हे आजच्या जगात सोपे राहिलेले नाही. त्यामुळे ज्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्या क्षेत्राची निवड करण्यास ते विवश असतात. तरीही बेरोजगारीची टांगती तलवार तरुणांच्या डोक्यावर कायम असते. जेव्हा कोणत्याही तरुणास अचानकपणे बेरोजगारीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. तेव्हा मात्र त्याने उभारलेली उच्च जीवनशैलीची इमारत क्षणार्धात कोसळते. कारण नोकरी शिवाय व वेतनाशिवाय तिला टिकवून ठेवणे त्याच्यासाठी शक्य नसते. बेरोजगारी हे तरुणांच्या समोर असलेले आज सर्वात मोठे संकट आहे. कारण हाती असलेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधिका अधिक कौशल्यनिपुण होत राहावे लागते. केवळ उच्च शिक्षणाच्या पदव्यांचा खच नावापुढे लावून चालत नाही. तर त्या क्षेत्रात काम केल्याचा जास्तीत जास्त अनुभवच त्यांना नोकरीत टिकवून ठेवू शकतो. अन्यथा नोकरीतील त्या जागेवरून त्यांना काही विचार न करता हटवून ताबडतोब अन्य व त्याहून जास्त कौशल्यनिपुण तरुणाची निवड करण्यात येते. त्याचप्रमाणे ह्या औपचारिक जगात आपसात निर्माण झालेले कोणतेही भावनिक बंध किंवा कोणाचीही दुविधा समजून घेतली जात नाही. सरळ नोकरीवरून काढून टाकण्यात येते. नोकरी जाण्याच्या अनाहूत भीतीमुळे तरुण प्रतीस्पर्धांमध्ये आपोआपच खेचले जातात. तसेच स्वत:ला कौशल्यनिपुण बनविण्यासाठी झटत असतात. त्यावेळी त्यांना जीवनाचे खरे स्वरूप बघावयास मिळते. कारण आपली नोकरी सुरक्षित ठेवणे हा त्यांच्यासाठी केवळ पोटापाण्याचा व जीवनशैलीचा प्रश्न राहिलेला नसतो. तर आत्मसम्मान जपण्याची नितांत गरज झालेली असते. त्यामुळे तरुण वर्ग सोशिक होत जातो. कार्यालयातील राजकारणे, सहकाऱ्याबरोबरच्या प्रतिस्पर्धा, अतिरिक्त कामाचा ताण, लक्ष्य पूर्ण करण्याच्या अंतिम तारखा, व्यक्तीगत लोन चे हफ्ते अशा सर्व गोष्टींना सामोरे जाता जाता त्यांना स्वत:मध्ये जिवंतपणा जाणवत नाही. त्यांना अतिविचार करत राहण्याची सवय लागते. त्याचबरोबर त्यांची पावलेही वाईट संगतीकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे आजचे तरूण मोठ्या प्रमाणावर नशा करणे व धुम्रपान करतांना आढळून येतात. त्याचप्रमाणे त्या गोष्टीस आजचे चलन म्हणून पाहण्यात येते. ह्या जगाचा भाग बनण्यासाठी व स्वबळावर जगणे शिकण्यासाठी आपण आपल्या पाठीशी असलेला मायेच्या माणसांचा भावनिक आधार काढून घेतो. कारण त्यामुळे आपण आरामास्ठीतीच्या क्षेत्रातून बाहेर पडू शकत नाही. परंतू जेव्हा तरुण अशाप्रकारे स्वत:च स्वत:चे शत्रू होत जातात. तेव्हा मात्र त्यांना आपोआपच घराकडे परतण्याची ओढ लागते. कार्पोरेट जगात घरी जाण्यासाठी परवानगी मिळविणे हे देखील कठीण असते. कारण रजेस सहजा सहजी मान्यता मिळण्याची शक्यता नसते. परंतू तरीही आपली नोकरी वाचविण्यासाठी तरुणांना हे कठोर नियम मनाविरुद्ध पाळावेच लागतात.
पूर्वी फार कमी म्हणजे बोटावर मोजण्या इतके आर्थिक दृष्टीने सक्षम असलेले लोक आपल्या मुलांना विदेशात उच्च शिक्षनासाठी पाठवत होते. परंतू आता मात्र विदेशात जावून शिक्षण घेणे ही एक सर्वसाधारण गोष्ट झालेली आहे. सामान्य घरातील मुलेही आता विदेशी शिक्षण अंगिकारू लागली आहेत. कारण शिक्षणासाठी लोन घेण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ज्यांना विदेशी शिक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ती प्रक्रिया सोपी झाली आहे. विदेशात प्रवेश करण्यासाठी शिक्षण हे मुख्य कारण असले. तरी पुढे शिक्षण पूर्ण करून अंगावर असलेले लोन फेडण्यासाठी त्यांना काम पाहिजे असल्यामुळे विदेशातच नोकरी करण्यासाठी तरुण विवश असतात. त्यामुळे त्यांचा तिथला मुक्काम इतका वाढत जातो कि तिकडच्या राहणीमानाची त्यांना सवय लागते. इकडे आई वडीलांनाही आपला मुलगा किंवा मुलगी विदेशात असल्याचा भारी अभिमान वाटत असतो. तेव्हा काहीजण तिकडचे नागरिकत्व पत्करून कायमस्वरूपी विदेशातच स्थायिक होत असतात. कारण जीवनात प्रगती करण्याच्या व सुख सुवीधाजान्य जीवन जगण्याच्या आशेने त्यांच्यासाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय असतो. त्यांच्यासाठी जीवनात प्रगती करण्याचा अर्थ केवळ पैस्याशी संबंधीत असला तर त्यासाठी ते आपल्या मायेच्या माणसांपासून आजीवन लांब राहण्यासही तयार होतात. तसेच तंत्रज्ञानाने आता जग कसे हाकेच्या अंतरावर आणले आहे. असे म्हणून आपल्या निर्णयाची पाठराखणही करतात. परंतू कधी मायेच्या माणसांना संकट काळात त्यांच्या सोबतीची नितांत गरज भासते. किंवा आई वडीलांच्या अंतिम समयी शेवटची भेट घेण्यासाठी व त्यांची सेवा सुश्रुषा करण्यासाठी ते त्यांच्या जवळ उपस्थित राहू शकत नाहीत. तेव्हा मात्र त्यांना त्या प्रगतीची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. ज्याचे दडपण त्यांच्या हृदयावर आयुष्यभर राहते. मुल जेव्हा आईच्या गर्भात वाढत असते. तेव्हा ते शरीराने निरोगी व सुदृढ व्हावे म्हणून सर्व संभाव्य प्रयत्न केले जातात. परंतू त्याने भावनिकरीत्याही समजदार व्हावे. ह्यावर मात्र विचारही केला जात नाही. जर त्या गोष्टीची काळजी घेतली गेली तर तरुणांचे जीवनाच्या प्रगती संबंधीत संदर्भ बदलू शकतील. कारण आपल्या मायेच्या माणसांपासून लांब राहून व त्यांच्या प्रेमपूर्ण स्पर्शाला दुरावून आपल्याला कितीही व कोणत्याही प्रगतीने सुख व समाधान लाभू शकत नाही. ह्याची त्यांना प्रकर्षाने जाणीव होईल.
तरुणांना आयुष्यात कधी बेरोजगारीचा सामना करण्याची वेळ आली. तर त्याविषयी आई वडीलांजवळ वाच्यता करण्याचे त्यांना धाडस होत नाही. कारण त्यावर आई वडीलांच्या काय प्रतिक्रिया असतील. ह्याचा विचार करूनच त्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. अशावेळी ते आपल्या आपबितीचा सामना शक्य तितका काळ एकटेच करत असतात. त्यासाठी मनात वादळ निर्माण झालेले असतांना देखील त्यांना घरच्यांसमोर खोटे खोटे आनंदी असल्याचे दाखवावे लागते. आई वडील मात्र मुलांच्या घरी येण्याने आनंदात असतात. त्या आनंदाच्या भरात त्यांना आपल्या मुलाच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागच्या वेदना कळू शकत नाहीत. परंतू कधी कधी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले हास्य मृगजळाप्रमाणे फसवे असण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांनी आपल्यापाशी मन मोकळे करण्यास प्रवृत्त व्हावे इतके आई वडीलांनी कायम आपल्या मुलांप्रती संवेदनशील राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मुलांशी सखोल परंतू मर्यादायुक्त संवाद साधने त्यांना जमले पाहिजे. कारण बऱ्याचदा आपल्या माणसांना समजण्यास आपण कोठेतरी कमी पडतो. ज्यामुळे ते समस्यांनी घेरलेले असतांना देखील आपण कोणत्याही प्रकारे त्यांची मदत करू शकत नाही.
तरुणांना कित्येकदा घरातील वातावरणातही मोकळेपणाने वागता येत नाही. कारण घरच्यांच्या नजरेत त्यांच्यासाठी अभिमान असतो. परंतू एकमेकांपासून ते लांब राहत असल्यामुळे त्यांच्या दरम्यान एकप्रकारची औपचारिक दरी निर्माण झालेली असते. त्यामुळे त्यांना घरातच परकेपणा जाणवू लागतो. कारण घरचे लोक त्यांच्याशिवाय जगणे शिकलेले असतात. घरी येवून त्यांना मान तर मिळतो. परंतू आपुलकीच्या हक्काची मात्र त्यांना फारच कमतरता जाणवत असते. आजच्या परिस्थितीत घरोघरी अशा द्विधा मनस्थितीत तरूण अडकलेले असतात. कारण आता पैसा इतका महत्वाचा असतो कि तो अर्जित करणाऱ्यास घरात सन्मानाचे स्थान देण्यात येते. त्याला सर्वश्रेष्ठ समजल्या जावू लागते. त्याचप्रमाणे घराण्याच्या सामाजिक प्रतिष्ठेत भर घालण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे त्याचे आनंदी असणे हे गृहीत धरले जाते. तसेच त्याच्या मनात चाललेल्या घालमेली कडे आपोआपच घरच्यांचे दुर्लक्ष होत जाते. अशाप्रकारे आता कुटुंब आपल्या नोकरी निमित्ताने घराबाहेर पडलेल्या व मायेच्या माणसांपासून लांब झालेल्या सदस्यास भावनिक आधार देण्यास सक्षम राहिलेली नाहीत. त्यामुळे घरच्यांची नोकरी पाहिजे ही अपेक्षा व बाहेरच्या जगातील कोरड्या प्रतिस्पर्धा ह्या दुहेरी जात्यात तरुणवर्ग भरडला जात आहे. अपेक्षांमुळे आपसातील अखंड प्रेमाच्या स्त्रोतात अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर नात्यांमध्ये औपाचारीकतेस महत्व आले आहे. त्यामुळे मन निष्ठूर व कोरडी होत चालली आहेत. कोणीही आपल्या मनात चाललेल्या गोष्टी, उठलेले प्रश्न बोलून दाखवू शकत नाहीत. कारण तेवढ्या सखोल पातळीवर जावून त्यांना कोणी समजून घेईल व त्यावर तोडगा काढण्यास सहकार्य करेल अशी खात्री तरुणांच्या मनात राहिलेली नाही. त्यामुळे तरुणांच्या समस्या त्यांच्या मनातल्या मनात चिघळत जातात व त्यांच्यासाठी मानसिक अस्वास्थ्याचे कारण बनतात.
1 तरुण मानसिकरीत्या घरगुती समस्यांमध्ये गुंतलेले असतात
आज घरा घरांमध्ये नाते संबंध विकोपास गेलेले आहेत. आई वडीलांमध्ये सुरू असलेली शितयुद्ध्ये मुलांच्या मानसिकतेवर सखोल परिणाम करत आहेत. कारण त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होत जाते. तसेच ते बाहेरच्या जगाचा सामना करत असतांना आतून पूर्णपणे कोलमडून जातात. आई वडीलांच्या वैचारिक मतभेदांमुळे मुलांना तठस्थ राहून कोणताही निर्णय घेण्याची मनातून भीती वाटत असते. आई वडीलांच्या डोळ्यात त्यांच्या मुलांसाठी असंख्य स्वप्न असली तरीसुद्धा तेच अशाप्रकारे आपल्या मुलांना आतून पोखरत असतात. तसेच त्यानंतर त्या स्वप्नांना अपेक्षांमध्ये परिवर्तीत करून मुलं कसे त्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम नाहीत. ह्या गोष्टीचा बाऊ करतात. परंतू मुलं मात्र त्यांच्या त्या बोलण्याला व्यक्तीगत घेतात व आपण आपल्या आई वडीलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यास असमर्थ आहोत. ही गोष्ट आपल्या मनाला आजीवन सांगत राहतात. परंतू आई वडीलांना आता जागृत होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या दरम्यान असलेली व्यक्तीगत भांडणे संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी एकमेकांना वेळ देवून व आपसात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून त्यांच्यात समेट घडवून आणला पाहिजे. कारण त्या भांडणांमुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे राहत नाही. ज्याचा कळत नकळतपणे मुलांच्या दैनंदिन जीवनावर व उत्पादनक्षमतेवरही विपरीत परिणाम होत असतो. ते कितीही हुशार व कर्तबगार असले तरी अति ताण तणावामुळे आपल्या क्षमता गमावून बसतात. कारण घर व घरातील माणसे त्यांच्यासाठी सर्वात जास्त जवळची व परिचयाची असतात. तरी देखील जर त्यांना घरात एक भक्कम पाठबळ, एक विश्वास जाणवत नसेल तर मात्र ते आपल्या जीवनातही सीमित होत जातात. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यास जगालाही मोठा कष्टप्रद प्रवास करावा लागतो.
2 तरुण स्वत:वर लक्षकेंद्रित करून स्वत:चा शोध घेत नाहीत
तरुणांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्याकाही समस्या उद्भवतात. किंवा त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजते. त्यावर समाधान शोधण्यासाठी ते भटकतात व मार्गही चुकतात. परंतू आजच्या जगात गुगल, सोशल मिडीया ही त्यांच्यासाठी अशी माध्यमे आहेत जी त्यांना सर्व प्रकारची माहिती पुरवीत असतात. ज्यामुळे त्यांच्या समस्या जगापुढे न येता त्यांना त्यावरचे समाधान मिळते. तरुणांचा त्यावर सर्वात जास्त विश्वासही आहे. त्यांना त्यांच्या उन्नतीसाठी जे काही निवेश पाहिजे ते इतक्या सहज उपलब्ध होत असल्यामुळे एक क्लिक करताच ते आपल्या समस्या सोडवू शकतात. एका क्लिकच्या खेळामुळे त्यांचे मन, बुद्धी व विचार हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे कायम व्यापलेले असते. त्याचबरोबर त्यामुळे त्यांच्या मतांना एक दिशा मिळत जाते. त्यामुळे ते कधीही आत्मपरीक्षण व आत्मशोध करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. परंतू तरीही प्रत्येकाचे एक स्वतंत्र अद्वितीय व्यक्तीमत्व असते हे नाकारता येत नाही. ज्याची सर्व चिन्हे आपल्या आत विखुरलेली असतात. त्या विखुरलेल्या गोष्टी एकत्र आणून काहीतरी विशेष घडण्याची पूर्ण खात्री असते. परंतू त्यासाठी आपण आत्मशोध घेण्याची आवश्यकता असते. जर तरुणांनी सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीस पूर्ण सत्य न समजता आपल्या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या समोर त्यांच्याविषयी अनेक रहस्य उलगडली जातील. ज्यामुळे ते त्यांच्या जीवनाला स्वत: आकार देवू शकतील. स्वत:साठी महामार्ग घडवू शकतील. त्यांची आवड कशात आहे, कोणती गोष्ट केल्याने त्यांचे व्यक्तीमत्व निखरू शकते, माणुसकी व दयेचा मार्ग स्वीकारणे का गरजेचे आहे ह्या विषयांवर ते गहन चिंतन करू शकतील. जेव्हा ते स्वत:मधले काहीतरी वेगळेपण शोधू शकतील. तेव्हा प्रतीस्पर्धांमुळे त्यांच्यात निर्माण झालेला तुलनात्मक भाव कमजोर पडू लागेल. जो त्यांना कमीपणा आणतो व त्यांना त्यांचे जीवन संपविण्यास विवश करतो.
3 तरुणांना घरात दिली जाणारी अपमानास्पद वागणूक
घरातील सर्वात मोठ्या अपत्यावर आई वडीलांचा जेवढा जीव असतो. त्याहून अधिक ते त्यांच्या अपेक्षांचा वेढा त्याच्या भोवती घट्ट करत असतात. तो मोठा असल्यामुळे त्याने आई वडीलांच्या स्वप्नांना साकार करावं. लहान भावडांसमोर एक उत्तम उदाहरण बनावं. नेहमी आपल्या वागण्यातून मोठेपणा दाखवावा. अशाप्रकारच्या अपेक्षांमुळे त्याच्यातील निरागस व निष्पाप बालास्वरूपाचे कौतुक कमी होते व बोलणी तसेच अपमानास्पद बोलणी जास्त खावी लागतात. त्याच्यापेक्षा लहान बहिण भावासमोर त्याच्या कमतरतान्ना नेहमी उजागर केले जाते. जर बहिण भावांमध्ये आपसात घट्ट बंध नसतील तर तो त्यांच्याबरोबर स्वत:ची तुलना देखील करू लागतो. अशाप्रकारे आई वडीलांच्या अपेक्षा व त्यांनी दिलेल्या कठोर वागणुकीमुळे तो मुलगा घरात मोकळेपणाने वागण्यास घाबरतो. त्याच्या भावनांची कोंडी होते. तो त्याच्या क्षमतांना सिद्ध करण्यास असमर्थ ठरतो. पुढे तरुणापणीही त्या गोष्टीचा त्याच्या आत्मविश्वासावर जबर दुष्परिणाम होतो. त्यामुळे जर त्याला असफलतेचा सामना करावा लागला. तरीदेखील आई वडील त्याला घालून पाडून बोलणे सोडत नाही. वेळोवेळी त्याचा अपमान करतात. तो आई वडीलांच्या अपेक्षांचे त्याच्या मनाविरुद्ध प्रतिनिधीत्व करत असतो. परंतू आपल्या स्वप्नांची वाच्यता त्यांच्या समोर करण्यास घाबरतो. अशा पद्धतीने आई वडीलच आपल्या तरुण मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यास बहुतेकवेळा कारणीभूत ठरतात. कारण त्यांच्या मनातही प्रतीस्पर्धांचे वेड जागृत झाले असल्यामुळे आपल्या तरुण मुलास ते जोरजबरदस्तीने त्याचा भाग बनविण्याच्या प्रयत्नात असतात. काहीही करून आपल्या मुलाने जीवनात प्रगतीच्या दिशेने उंची गाठावी. तसेच समाजातील आपली व आपल्या घराण्याची प्रतिष्ठा राखावी. जेणेकरून ते उंच माथ्याने मिरवू शकले पाहिजे. असे त्यांना सर्वतोपरी वाटत असते. प्रत्येकच आई वडीलांचे मुलांना दबावात ठेवण्यामागे हेच कारण राहत नसेलही कदाचित. परंतू तरीही त्यामुळे तरुणांच्या मानसिक स्वास्थ्याची इतकी क्षती होते कि त्याचे पडसाद त्यांना पुढील आयुष्यात दूरवर सहन करावे लागतात.
4 आई वडील आणि तरुण मुलांमध्ये मोकळा संवाद होत नाही
आज कित्येक घरांमधली सर्वात मोठी व विचार करण्यास भाग पाडणारी समस्या ही आहे कि आई वडील व तरुण मुलांमधले संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत. कारण आताची पिढी अशा जीवनाचे प्रतिनिधीत्व करते जिथे परिवर्तनशील राहणे गरजेचे आहे. कोणत्याही एका विषयावर अनेक विचारधारा ग्राह्य धरल्या जातात. तसेच त्यांचे पालनही केले जाते. त्यामुळे तरुण मुलांचे स्वतंत्र विचार विकसित झालेले असतात. तेव्हा आई वडीलान्नीही आपल्या विचारांबद्दल कडक व ताठ न राहता वाचनाच्या माध्यमातून किंवा अन्य सोयीस्कर मार्गाने स्वत:ला अद्दयावत ठेवले पाहिजे. जेणेकरून त्यांना आपल्या मुलांना समजून घेतांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतू आई वडील मात्र आपल्या तरुण मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकत नाहीत. त्याउलट त्यांच्या विचारांना आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपले विचारही त्यांच्यावर बिम्बावीन्यासाठी तत्पर असतात. परंतू मुलं मात्र आई वडीलांचा अनादर होवू नये म्हणून त्यांना सरळ विरोध करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांच्यातील संवाद आपोआपच कमी होत जातो. अशावेळी मुलांना एकटेपणाची जाणीव होवू लागते. कारण मनातल्या मनात ते त्रासातून जात असतात. आई वडीलांच्या प्रेमाला मुकल्यासारखे त्यांना वाटू लागते. परंतू ते आपल्या मनातील वेदना त्यांच्या पर्यंत पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य मात्र पणास लागते.
बदलत्या काळाच्या गरजेनुसार मुलांमध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव करणे ही मागे पडत चाललेली संकल्पना आहे. तेव्हा आपल्या घरातील तरुण मुला मुलींना केवळ एक सामान्य जीवन जगण्याच्या हेतूने, तसेच केवळ समाजात एक प्रतिष्ठा प्राप्त नागरिक बनण्याच्या हेतूने, न घडविता त्यांच्या जन्म घेण्याच्या मागच्या हेतूचे आकलन करण्याच्या दृष्टीने घडविले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यातील छुपा योद्धा बाहेर पडण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या भावनांची व विचारांची कोंडी करून त्यांना कमकुवत न करता. त्यांच्यात विश्वास जागृत करून व त्यांच्यातील क्षमतांना आव्हान करून त्यांना एक आत्मविश्वासू व्यक्तीमत्व बनविले पाहिजे. तरच ते आयुष्याला स्वबळावर पेलू शकतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)