
जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई-वडीलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या प्रेमाने केलेल्या संगोपनाची नितांत गरज असते. जसे एखाद्या कोवळ्या रोपास विशेष देखभालीची, जनावराने तोंड लावू नये म्हणून कुंपनाची, तसेच रखरखत्या उन्हापासून वाचवण्याचीही गरज असते. तसेच आपले बालपणही असते ज्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला आपल्या सभोवताल असलेल्या माणसांच्या सहवासात मायेचा व वात्सल्याचा अनुभव हवा हवासा वाटत असतो. त्यामुळे जन्मदात्यांच्या मउ व उबदार कुशीत तसेच त्यांच्या निस्वार्थ प्रेमाच्या गाराव्यातच विश्वासाची, सुरक्षिततेची व समंजसपणाची बीजं मुलांच्या अंतर्मनावर सखोल रुजली जातात. म्हणून आई वडीलच खऱ्या अर्थाने मुलांचे जिवलग मित्र असतात. परंतू त्यांच्यातील नाते हे त्या निरागस मैत्रीवर कायम वरचढ असते. त्याचप्रमाणे मोठी होता होता मुलं एकेदिवशी त्यांच्या वयाचा तो टप्पा गाठतात. जिथे त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांची गरज भासू लागते. त्यांच्या वयाची ती गरज शालेय जीवनात पुर्ण होते. त्याचबरोबर समवयीन मुलांमध्ये ते इतके रमतात कि आई वडील व त्यांच्यात हळूहळू फक्त एकप्रकारचे औपचारिक नाते शिल्लक राहते. त्यानंतर ते कॉलेज जीवनात पदार्पण करतात. त्या काळात जवळपास त्यांच्या व्यक्तीगत जीवनाला सुरवात होते. त्यामुळे आई-वडिलांपासून बर्याच गोष्टी लपवायला लागतात. मोकळेपणाने बोलू शकत नाही. कारण हा त्यांच्या जीवनातील तारुण्यात पदार्पण करण्याचा काळ असतो. तेव्हा त्याच्याशी निगडीत समस्यांना तसेच अभ्यासाबाबतच्या समस्यांना ते तोंड देत असतात. परंतू आई-वडीलांकडे त्यासंबंधात बोलण्याचे टाळतात.
कारण त्यांना वाटते की आई-वडील त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. किंवा त्यांना समजून घेणार नाहीत. मुलांच्या मनात आई-वडीलांविषयी अशी शंका येण्याच्या मागचे कारण हे आहे की त्यांनी मुलांना त्यांच्या लहानपणापासून स्वत:वर विसंबून ठेवलेले असते. त्यांना स्वतंत्रपणे विचार करू देण्यापासून व निर्णय घेवू देण्यापासून वंचीत ठेवले असते. किंबहुना मुले मोठी झाल्यावर सुद्धा आई-वडील त्यांना त्याच दृष्टीकोनातून बघतात. आई-वडील ह्या एका जबाबदार नात्यानेच त्यांना मुलांवर सतत लक्ष ठेवण्यात समाधान वाटत असते. तसेच मुलांना प्रत्येक गोष्टींसाठी सल्ले देण्यातही ते अग्रेसर असतात. कारण असे करणे त्यांना मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्यतेचे वाटते. तारुण्यात पदार्पण करणार्या मुलांना आई-वडीलांची साथ कायम हवीच असते. मात्र त्यासोबत त्यांनी मुलांना वेळोवेळी एखाद्या समवयीन मित्राच्या जागी राहून समजून घेतल्यास त्यांचे व मुलांचे नाते आणखी उत्तम होत जाण्यास मदत मिळू शकते. तसेच पालकआणि मुले यांच्यात विविध रोचक विषयांवर संवाद देखील साधला गेला पाहिजे. त्यामुळे मुलांकडून आई-वडीलांनाही बरेच काही शिकता येवू शकते. आई-वडीलांनी मुलांसमोर घेतलेला हा कमीपणा मुलांसोबत असलेल्या त्यांच्या नात्याला आणखी घट्ट करतो. त्याचबरोबर त्यांच्यातील औपचारीकता हळूहळू कमी होत जाते. अशा घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहते आणि प्रत्येकास मनातील गोष्टी बोलण्याची मोकळीकही मिळते. तेव्हा आई-वडीलांनी सतत आपले विचार मुलांवर थोपवू नयेत. मुलांच्या मतालाही त्यांनी प्रादान्य द्द्यावे आणि त्यांच्या मताचा सन्मानही करावा. त्यामुळे घरामध्ये दोन पिढ्यांमधील अंतर कमी होत जाण्यास मदत मिळते आणि घराला स्वर्गाचे रूप येते.
आई-वडीलांनी आपल्या तरुण मुलांना त्यांचे क्षेत्र निर्माण करण्याची मोकळीक दिली पाहिजे. कारण कधीकधी सर्वच गोष्टींवर स्वत:चे नियंत्रण स्थापित करण्यापेक्षा काही गोष्टी सृष्टीच्या स्वाधीन केल्याने त्यांची उत्तरे आपल्याला आपोआपच मिळतात. तसेच सृष्टीने आपल्यासाठी निवडलेला मार्ग मोकळा होतो. म्हणूनच मुलांच्या क्षेत्राच्या मर्यादा आई वडीलांकडून राखल्या गेल्या पाहिजे. आई-वडीलांनी आपल्या मुलांवर केलेले आपले संस्कार व जीवनमुल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. आई-वडीलांचा मुलांवरचा विश्वास व त्यांनी मुलांना दिलेली मुल्य तसेच मुलांना मिळालेले स्वातंत्र्य यांचा मेळ होवून मुलांचे भविष्य अगदी उत्तम घडत जाते.
1. संस्कार मुलांना जाच वाटू नयेत
आई-वडील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून किंवा त्यांना शिस्त लागावी तसेच त्यांना आपल्या आज्ञेत ठेवता यावे म्हणून जरा जास्तच कडक होतात. त्यामुळे त्यांनी शिकवीलेल्या सर्व गोष्टी मुलांच्या कितीही उपयोगाच्या असल्या तरीही मुलांना त्यांंचा जाच वाटू लागतो. कारण त्यामुळे त्यांच्याकडून कळत नकळतपणे मुलांचा आत्मसन्मान दुखावला जातो. म्हणूनच ते आई वडीलांनी सांगितलेल्या गोष्टींचा विरोध करण्याचा प्रयत्न करतात. अशारितीने आई-वडील व मुलांच्या नात्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. जर आई- वडीलांनी मुलांच्या आत्मसम्मानास तडा जावू न देता स्वकृतीतून गोष्टी मुलांच्या निदर्शनात आणून दिल्या आणि ते स्वत: मुलांपुढे उदाहरण बनले तर त्यांना मुलांवर जोर-जबरदस्ती करण्याची वेळच येणार नाही. त्याचबरोबर मुलांची मतं किंवा विचार हे नेहमी आई वडीलांकडून स्वागतार्य असले पाहिजे. आई-वडीलांनी नेहमी मोठमोठे उपदेश करण्यापेक्षा कधी मुलांशी सहज गप्पा करुन तसेच अत्यंत निस्वार्थ भावनेने व कोणतिही माहिती काढण्याचा उद्देश न ठेवता मुलांची मायेने विचारपूस करावी. त्यामुळे मुलांच्या मनात साठलेल्या अनेक गोष्टी व भावना मोकळ्या होण्यास मदत होवू शकते. त्याचबरोबर ह्या मैत्रीपूर्ण व माणुसकीच्या मार्गाने गोष्टी हाताळल्या तर आई-वडीलांविषयी त्यांचे मतही चांगले राहील.
2. संस्कार आणि स्वातंत्र्य ह्यामुळे मुले घरातही रमतात.
आई-वडील मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टींनी विपरीत परीणाम होवू नयेत म्हणून झटत असतात. त्याच कारणाने ते सतत त्यांच्या प्रत्येक कृतीकडे शंकाकूल नजरेने बघत असतात. मुलांनी टि.व्ही. वर काय बघावे व काय बघू नये ह्यावर ते नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांच्या इतरही गोष्टींवर बंधने लावतात. मोबाईल फोन च्या वापरावरून तर त्यांच्यात नेहमीच वाद होत असतात. परंतू रबर जेवढा जास्त ताणला तेवढा त्याच्या तुटण्याचा धोका असतो. असेच काहीसे मुलांच्या बाबतीत होते. तरूण मुलांना एखाद्या गोष्टीला करण्यापासून जेवढे थांबवीले ते तेवढ्याच जिकरीने ती गोष्ट करण्याचा ध्यास घेतात. त्यामुळे त्यांच्यावर बंधने लादण्यापेक्षा ते त्या गोष्टीचे फायदे आणि नुकसान उत्तमरितीने जाणतात ह्यावर विश्वास ठेवावा. त्याचबरोबर आपण त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवर विश्वास ठेवावा. त्याही पेक्षा जास्त आपला आपल्या मुलांवर किती विश्वास आहे हे त्यांना पटवून द्यावे. अशाप्रकारे मुलांना घरातच प्रेमाचे आणि विश्वासाचे छत्र लाभले तर ते घरातही रमतील आणि घराबाहेर पडल्यावरही त्यांना घरी परतण्याची ओढ राहील.
3. पालकांनी मुलांना वेळ द्द्यावा
आजच्या काळात आई-वडील दोघांनाही कामानिमीत्ताने घराबाहेर पडावे लागते. त्या कारणाने ते आपल्या मुलांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. अशावेळी मुले त्यांच्या बर्याच समस्या व्यक्तीगत रित्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे तेही त्यांच्या व्यक्तीगत जगात व्यस्त राहतात. आई-वडीलांना कितीही कामाचा व्याप असला तरी तो त्यांनी त्यांच्या आणि मुलांच्या नात्यामधील अडथळा बनू देवू नये. मुलांसाठी खास वेळ राखून ते त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे त्यांच्या निदर्शनात आणून द्यावे. मुलांचे म्हणणे किंवा त्यांचा रोष अगदी मनापासून तसेच ते बोलत असतांना काही व्यत्यय येवू न देता ऐकुण घ्यावे. त्यांच्या मित्रमंडळी बद्दल आपुलकीने जाणून घ्यावे. त्यांना शाळा किंवा कॉलेज मध्ये काही समस्या तर नाहीत ना ह्या विषयी प्रेमाने विचारपूस करावी. मुलांसोबत मनोरंजनाच्या दृष्टीने खास योजना बनवाव्यात. कामाच्या व्यापामुळे आई-वडील मुलांना वेळ देवू शकत नसले तरी मुलांच्याच सुखी भविष्यासाठी त्यांचे घराबाहेर पडणे किती आवश्यक आहे हे मुलांना पटवून द्यावे. अशावेळी मुले पालकांना समजूनही घेतात व त्यांच्यात मैत्रीपुर्ण संबंधही निर्माण होतात.
4. मुले भविष्यात उंची गाठतील
आई- वडीलांचा दबाव नसलेली मुले स्वभावाने मोकळी होतात. त्यांची स्वप्न व ध्येय स्पष्ट असतात. त्यांचे पुढे पडणारे प्रत्येक पाउल जबाबदारीपूर्ण असते आणि ते चुकीच्या दिशेने तर पडत नाही ना ह्याची ते नेहमी काळजी घेतात. त्यासोबत यशही संपादन करतात. कारण ते आत्मविश्वासाने भरपूर असतात. त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक हालचालीतून झळकत असतो. त्यांचा सर्वांगीण विकास झालेला असतो त्यामुळे ते त्यांच्या जीवनाचा हेतूही शोधू शकतात. अशाप्रकारे तारुण्यात पदार्पण करणारी मुले व आई वडील ह्यांच्यातील मैत्री दोघांच्याही हिताची ठरते.
तर कोणत्याही नात्याचे रुपांतरण मैत्रीत झाल्याने अपेक्षांचे स्वरूप ध्येयात बदलते. प्रत्येकजण आपल्या ध्येयाप्रती जागृक असल्याने प्रत्येकाला आपले आयुष्य मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य मिळते. आपण बघतो कि कोणालाही इतरांचे म्हणणे शांततेने ऐकुण घेण्याची सवय राहिलेली नाही. प्रत्येकाला केवळ काहितरी सांगायचे असते. त्यामुळे कोणाच्याही भावना मोकळ्या होवू शकत नाहीत. परंतू घरात आपल्या माणसांसोबत ही चूक करू नये. वेळात वेळ काढून आपल्या मुलांचे म्हणणे वेळोवेळी ऐकुण घ्यावे. त्यांना समजून घ्यावे. त्यांना विश्वासात घ्यावे. आणि आपणच आपल्या मुलांचे जीवलग मित्र बनावे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)