दयेने विश्वाला जिंका

 आपण सर्व बुद्धांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या ह्या पावन भुमीवरचे रहिवाशी आहोत. येथिल चराचरामध्ये  आणि मातीच्या कणा-कणात दयेचा आणि प्रेमाचा निवास आहे. प्राणिमात्रांमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये आपल्याला त्याची अनुभूती येते. सृष्टी कोणाचेही गुण-दोष बघून त्यांच्यात भेदभाव करत नाही. सर्वांवर सारखीच माया करते. वृक्ष वाटसरूंना सावली देतात. गोड फळांनी प्रत्येकाची भूक भागवितात. हिंस्त्र पशू देखील त्यांना भूक लागल्या शिवाय कोणत्याही अन्य प्राण्याची शिकार करीत नाहीत. त्याचप्रमाणे मनुष्याला सुद्धा सृष्टीने दया, प्रेम करुणा ह्या सुंदर गोष्टी बहाल केल्या आहेत. दयाभाव आपल्याला हिंमत आणि शौर्य प्रदान करतो आणि दयेने विश्वाला जिंकता येवू शकते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवरच्या दया आणि प्रेमामुळे रयतेचे राज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे डॉ. भिमराव आंबेडकर, हे दलीतांवरच्या दया आणि प्रेमापोटी त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरूद्ध पेटून उठले. दयाभाव आपले आंतरीक बळ वाढवितो. हे इतिहासातील ह्या दोन उदाहरणांवरून सिद्ध होते.

   आजच्या युगात मात्र मनुष्य एक स्वार्थी व फक्त स्वत:च्याच अवती भवती फिरणारे सीमित आयुष्य  जगतांना दिसतोय. लोक स्वत:च्याच विश्वात रमलेले असतात. पैसा आणि प्रसिद्धीच्या रिंगणात स्वत:ला ठेवून व फक्त त्यावरूनच स्वत:चे मूल्यमापन करत असतात. माणुसच माणसाशी गैरवर्तन करतांना दिसतो कारण भौतिक श्रीमंतीवरून व पेशांवरून माणसा माणसात भेदभाव निर्माण झाले आहेत. माणसातील माणुसकी ह्या महत्वपूर्ण गुणधर्मावरून त्याचप्रमाणे त्याच्या सभ्यतेच्या आचरणावरून त्याला फार कमी महत्व दिले जाते त्याउलट त्याच्यातील त्या विशेशतान्ना त्याच्या व्यक्तीमत्वातील उणीव म्हणून पाहिले जाते. कारण जीवन जगतांना व्यवहार ज्ञान असणे हे त्या अलौकिक गुणधर्मांच्या तुलनेत गरजेचे समजले जाते.  त्यामुळे आपल्या सभोवती सर्वत्र अमाणुसकीचे दर्शन घडत असतांना दिसते. त्याचप्रमाणे दयाभाव, करुणाभाव ह्या महत्वपूर्ण जीवनमुल्यांची उणीव होत असल्याचे निदर्शनात येते. परंतू  हे सर्व थांबविण्याच्या हेतू पुरस्सर निदान एक तरी पाउल टाकण्याची सुरवात आपण स्वत:पासून केली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वप्रथम  स्वत:कडे दयेच्या नजरेने बघण्याची गरज आहे. कारण दयाभाव आपल्या मनात आत्मप्रेम जागृत करतो. जेव्हा आपण स्वत:ला सकारात्मक विचारांनी भरून टाकतो. तसेच स्वत:ला आणि इतरांनाही करुणेच्या नजरेने बघतो तेव्हा दयेच्या भावनेतून आपल्या हातून माणुसकीचे प्रतिनिधीत्व करणारी कृत्ये घडत जातात. आपल्या आसपास असलेल्या माणसांच्या समस्या बघून आपल्या हृदयाला पाझर फुटतो व डोळे पाणावतात. त्याचप्रमाणे त्यादिशेने परीवर्तनशील पावले उचलण्याचे विचार आपल्या मनात येतात. परंतू बर्‍याचदा अशा भावनांना कमकुवत समजल्या जाते. कारण ह्या जगात पैस्याशिवाय अशा भावनांना काही अर्थच उरत नाही. कोणतेही सकारात्मक बदल घडवून आणण्याकरीता भौतिक संपत्तीची गरज भासते. अशाप्रकारे जेव्हा पैसा आणि दयेच्या भावनांची सांगड घातली जाते तेव्हा रख-रखत्या उन्हात विनामुल्य पिण्याच्या पाण्याची सोय करता येवू शकते. वेळ हातून निघून जाण्याअगोदर कोणापर्यंत मदत पोहोचविता येवू शकते. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागविल्या जावू शकतात. कोणावर होणारा अन्याय, अत्याचार  थांबविता येवू शकतात. त्याचप्रमाणे गोरगरीब तसेच अनाथांना मदत करण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहोचता येवू शकते.

1. जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांची निर्मीती व्हावी.

   समाजात अनेक लोक बेघर आहेत. शिक्षणापासून वंचीत आहेत. कोणाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्याकारणाने शिक्षण घेण्याची इच्छा असूनही घेवू शकत नाही. कोणी मुलभूत गरजांनाच मुकले आहेत. अशा लोकांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था जोमाने कार्य करत आहेत. आज आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे कि आपण कर्तव्यदक्ष नागरीक बनून आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी मदत ह्या संस्थांना केली पाहिजे. जी वस्तूंच्या रूपात किंवा पैस्याच्या रूपात असू शकते. आपल्या मदतीने एखादा गरीब परंतू हुशार विद्द्यार्थी उच्च शिक्षण घेवू शकतो. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर छत येवू शकते. कडाक्याच्या थंडीत प्रत्येकाच्या अंगावर उबदार ब्लँकेट असू शकते. रख्रखत्या उन्हात अनवाणी  पाय   भाजण्यापासून थांबू शकतात. त्याचप्रमाणे जगात कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही ह्याची खात्री असते. त्यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्थांची उभारणी होणे आवश्यक आहे. हे मनसुबे तेव्हाच सत्यात साकार होवू शकतात जेव्हा आपण फक्त आपल्या पुरता विचार न करता आपल्या मनात दयाभाव जागृत करू. त्याचप्रमाणे आपल्याला इतरांप्रती करुणा वाटेल.

2. निसर्गाप्रती दयाभाव असावा

  निसर्गाने आपल्याला पाणि , हवा, ऑक्सिजन, सुपीक जमीन अशा अनेक जीवनदायी गोष्टी दिल्या आहेत. आपल्याला ह्या सर्व गोष्टी दयाभावाने जोपासाल्या पाहिजे आणि जस्याच्या तस्या टिकवून ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने झटले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक घरी शक्य असल्यास रेन वॉटर हार्वेस्टींगची सोय असावी. ज्यामुळे पावसाचे पाणि वाहून न जाता जमीनीत मुरल्या जाईल. घराच्या आजू-बाजूला झाडे लावल्याने उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव होईल आणि एसी सारखी वातावरणात उष्णतेची भर घालणारी उपकरणे कमीत कमी वापरली जातील. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात छोटे पक्षी झाडांवर आश्रयासाठी घरटी बांधून सुरक्षीतपणे राहू शकतील. उरलेले अन्न फेकून न देता पक्ष्यांसाठी ठेवले पाहिजे. प्लॅस्टीकच्या वापरावर स्वत:हून बंधन आणले गेले पाहिजे. जमीनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गीक खतांचा वापर केला गेला पाहिजे. ऑक्सिजन मुळे आपण श्वास घेवू शकतो. तेव्हा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण झाले पाहिजे. आणि हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. अशाप्रकारे दयेने सृष्टीला जपले पाहिजे.

3. प्राण्यांप्रती दयाभाव असावा.

   माणसाने आपल्या स्वार्थासाठी जीवनात वेग-वेगळ्या प्राण्यांचा उपयोग केलेला आहे. दुध, अंडी, मांस, लोकर अशा विवीध जीवनावश्यक वस्तू आपल्याला प्राण्यांपासून मिळतात. तसेच कुत्रा, मांजर , पक्षी ह्यासारखे प्राणि आपण पाळतो. त्यांच्याप्रती आपले वर्तन नेहमी करुणामय असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना साम्भाळतांना आपल्या मनात दयाभाव असला पाहिजे. त्यांच्या साठी मनात कोणत्याही प्रकारची शकून-अपशकूना ची भावना नसावी. त्याचप्रमाणे रस्त्यावर बेवारस  आणि रोगग्रस्त प्राणि असतात. आपण त्यांच्याकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करून निघून जातो. परंतू कधी त्यांच्यावर नजर टाकल्यास आपोआपच आपल्या मनात त्यांच्याविषयी दया जागृत होईल. त्याचप्रमाणे आपण त्यांना होणारा त्रासही समजू शकू. त्यांच्यासाठी काही पावले उचलण्याचे मनात आल्यास प्राणि शेल्टर्स ला कळवावे. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर आश्रय मिळेल. तसेच प्राणि शेल्टर्सना ही आपल्या आर्थिक योगदानाची नितांत गरज आहे. कारण जेव्हा ते मुके जीव अन्नाशिवाय उपाशीपोटी झोपतात आणि त्याबद्दल तक्रारही करू शकत नाहीत तेव्हा त्यांचा सांभाळ करणार्‍यांचे मनही खिन्न होते.  तेव्हा आपल्या दयेची आणि सहकार्याची जोड त्यांच्या ह्या श्रेष्ठ कार्यास लाभू द्द्यावी. जेणेकरून त्या मुक्या जीवांना उपाशी रहावे लागणार नाही.

4.  भौतिक श्रीमंतीला दयाभावाने आणखीच श्रेष्ठ करावे.

   दयाभाव आपल्या मनाची श्रीमंती सिद्ध करतो. कोणाचीही वेळेत आर्थिक मदत केल्याने गरजूस अनेक संकटांपासून आपण वाचवू शकतो. तेव्हा जर एखाद्याने परिस्थितीपुढे हात टेकले परंतू उमेद हारली नाही त्यास जीवनात पुन्हा उभे करण्यासाठी आपला खारीचा वाटा असू शकतो. एखाद्याचे प्राण वाचवून त्याच्या प्रियजनांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्यात आपला सहभाग असू शकतो. कोणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून त्यांच्या पर्यंत अन्न पोहोचविण्याचे पुण्याचे काम आपल्या हातून घडू शकते. कोणीही शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणून शिक्षणाचा प्रसार करण्याचे श्रेष्ठ काम आपल्याला करता येवू शकते. प्रत्येकास आपला चरीतार्थ चालविण्यासाठी आत्मनिर्भर बनविण्यास झटता येवू शकते. जर आपण भौतिक दृष्ट्या श्रीमंत आहात. तर दयाभावाने ही कार्ये आपले कर्तव्य म्हणून पार पाडावीत.

   जेव्हा आपण आपल्या आसपास लोकांची दु:ख बघतो तेव्हा आपल्याला आपल्या समस्या कमी वाटू लागतात. अशावेळी केवळ सहानुभूती आणि दया दाखवून काहीही होणार नाही. एक कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून सबळ्पणे पावले उचलावी लागतील आणि त्यासाठी सर्वार्थाने सक्षम व्हावे लागेल. तरच आपण विश्वाला जिंकू शकू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *