दुसरी संधी

जीवनात कधी मागे वळून बघण्याची सवड मिळाली  किंवा इच्छा झाली. तर आपल्याला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा जगावेसे वाटते. कारण त्यामुळे वर्तमानातील अनेक दृश्य वेगळी व आपल्याला पाहिजे तशी असू शकली असती. परंतू अर्थातच ही कल्पना कधीही सत्यात उतरविता येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा आपल्या आसपास अनेकांना आपण म्हणतांना ऐकतो कि पुन्हा संधी मिळाली असती तर काही कारणाने राहून गेलेले खास काम पूर्ण करता आले असते. एखादे खोळंबून राहिलेले  चित्र पुर्ण करता आले असते. किंवा खास व्यक्तीपाशी मनातील भावना व्यक्त करता आली असती. जेव्हा आपण पहिल्या संधीत गोष्टींना सामोरे जातो तेव्हा अशी बरीच कारणे असतात. ज्यामुळे आपण यश गाठू शकत नाही. किंवा आपल्या हातून झालेल्या चुका एका संधीत पुर्णपणे सुधारू शकत नाही. तसेच कधि कधी पुर्ण मेहनत करूनही पुन्हा संधी न मिळाल्याने आयुष्याचे सोने होण्यापासून आपण वंचीत राहतो.

    जेव्हा आपल्याला जीवनात काही करण्यासाठी पहिली संधी लाभते. तेव्हा तिलाच अंतिम समजून आपले शंभर टक्के योगदान देणे योग्य असते. कारण पुन्हा आपल्याला संधी लाभेलच ह्याची हमी देता येत नाही. परंतू कधि कधी सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. तर काही गोष्टी आपल्या सकारात्मक तसेच नकारात्मक दृष्टीकोनावरही अवलंबून असतात.  अशावेळी दुसर्‍या संधीचा लाभ मिळाल्यास आपण पुर्ण तयारीनीशी व संपुर्ण सामर्थ्याने त्या संधीचे सोने करू शकतो.

  कधि कधी आपण जीवनाची सुरवात करतो परंतू आयुष्याचा अनुभव घेण्याच्या पहिल्या संधीत आपल्याला मोठमोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. आपल्याच जीवाभावाच्या माणसांचे राक्षशी रूप आपल्याला बघावयास मिळते. जीवन आपल्याला अशे काही धडे गिरवते कि त्यामुळे जीवनाप्रती आपला दृष्टीकोन कडवट होत जातो. अशावेळी आपण नियतीपुढे हात टेकतो. परंतू नियतीच्या मनातही आपल्यासाठी एक विशाल योजना असते. त्यासाठीच ती संकटांच्या माध्यमातून आपल्याला काहितरी शिकवू पाहते. आपल्याला कणखर बनवू पाहते. आणि जेव्हा आपण संकटांना तोंड देवून सर्वदृष्टीकोनातून सबळ होतो. तेव्हाच ती आपल्याला दुसरी संधी सुद्धा देते. ज्या संधीने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. कारण तिथे आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू सापडतो. तसेच त्यामुळे आपल्या आयुष्याचे सोने होते.

   बर्‍याचदा पहिल्या संधीत आपण आपल्या जीवनात अत्यंत चुकीच्या माणसांची निवड करतो. ज्यामुळे आपले जगणे दुर्भर होवून जाते. अशावेळी पश्चाताप करण्यापलिकडे आपल्याकडे कोणताही मार्ग उरत नाही. तेव्हा आपण दुसर्‍या संधीची कल्पना करतो. जर ती मिळाली असती तर आपण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे आपल्या आयुष्यात आकर्षीत केली असती असे मनोमन आपल्याला वाटते. परंतू प्रत्येकास दुसरी संधी मिळेलच असे नाही. किंवा मिळाली तरी तिचा लाभ घेता येईलच असेही नाही. कारण आयुष्य आपल्याला कधिकधी अनेक संधी उपलब्द्ध करून देत असते. परंतू आपल्यातच शहाणपण नसेल तर त्यातून काहिही निष्पन्न होत नाही.

   जीवनात आपल्याला एकापेक्षा अनेक संधी उपलब्द्धही होवू शकतात. परंतू आपल्याकडे आयुष्य मर्यादीत असते. जेव्हा आपल्याकडे आयुष्याचा फार कमी काळ उरलेला असतो. तेव्हा खर्‍या अर्थाने आपल्याला जगण्याचा आनंद येवू लागतो. परंतू आपण मात्र आपले संपुर्ण आयुष्य चुका करण्यात घालवून मोकळे झालेलो असतो. तेव्हा जर आयुष्य नियोजनबद्ध पद्धतीने जगायचे असेल तर आयुष्यात केलेल्या पहिल्या चुकेतूनच धडा गिरवला पाहिजे. तरच पुन्हा मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्याला जीवनाचा आनंद घेता येईल. आयुष्य म्हणजे आपल्याला लाभलेले एक खेळण्याचे मैदान आहे. जर आपण आपल्याला लाभलेल्या संधीचा परेपूर लाभ घेतला तरच वेळेत मैदान मारू शकतो. तसेच जीवन भरभरून जगू शकतो.

   दुसरी संधी मिळणे म्हणजे पहिल्या संधीत केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी पुन्हा त्याच परिस्थितीचा सामना करावा लागणे. परंतू ह्यावेळी पुर्ण मानसिक तयारिनीशी तसेच पुढे काय होणार आहे. ह्याची पुर्ण कल्पना राखून सामोरे जाणे असते. पहिल्या संधीच्या तुलनेत जास्त हिंमत ठेवून तसेच आपली मानसिक शांतता जपून सुरक्षीत अंतर कसे राखता येईल हे बघणे असते. स्वत:ला भावनाविवश होण्यापासून वाचविणे असते. आपण आपल्या आयुष्यातून नकारात्मक विचारांना, नकारात्मक माणसांना कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण जीवनात सकारात्मक बदल येणे ही आपल्यासाठी नितांत गरजेचे झालेले असते. जेव्हा जीवनात आपली आपल्या क्षमतेनुसार प्रगती व्हावी हे विचार सतत आपल्या मनात घोळत असतात. तेव्हा त्यासाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी असते. अशावेळी आपल्याला दुसरी संधी मिळणे अनिवार्य असते.

   आयुष्यात दुसरी संधी मिळाल्यास तिला निरर्थक गमावू नये. तिच्या सहाय्याने आपले जीवन परिवर्तीत करण्याचा ध्यास घ्यावा. सर्वप्रथम स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करावे. ज्यामुळे आपण स्वत:ला निरपेक्ष प्रेम करू. स्वत:ला शिस्त लावू तसेच प्रोत्साहीत करू. आपल्या प्रगतीच्या आड येणार्‍या आपल्याच नकारात्मक विचारांना समूळ नष्ट करू. स्वत:ची सर्वतोपरी काळजी घेवू. कारण  आत्मप्रेम जागृत केल्या मुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल येण्यास मदत मिळते. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात. जीवनात आपल्याला जेकाही मिळविण्याचे स्वप्न होते ते पुर्णत्वास जाते. तसेच आपले जीवनही  सार्थकी लागते.

1. नात्यांमधील दुरावा कमी करता येईल

   नात्यांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा तसेच त्या पुर्ण न झाल्यास होणारा भावनातिरेक ह्या दोन्ही गोष्टी नात्यांचा घास घेतात. त्याचप्रमाणे नाती निभावतांना आपण अनेक चुका करतो. एकमेकांची मनं दुखावतो. परंतू त्याची आपल्याला पर्वाही नसते. आपल्या जीवनातील अगदी जवळच्या नात्यांनाही आपण गृहीत धरत राहतो. त्यांच्या आपल्या बरोबर असण्याला महत्व देत नाही. नात्यांची खरी किंमत आपल्याला तेव्हा कळते जेव्हा ती आपल्यापासून कायमची दुरावली जातात. किंवा ह्या जगाचा निरोप घेवून माणसे निघून जातात. म्हणून आपल्या आसपासच्या आपल्या माणसांना वेळोवेळी समजून घेणे, त्यांना वेळ देणे तसेच आपण कायम त्यांच्यासोबत आहोत ह्याची त्यांना हमी देणे हे आपल्यासाठी सर्वात महत्वपुर्ण असले पाहिजे. जर आपल्यामुळे आपली नाती दुरावल्या गेली असतील तर संधी मिळताच विनम्रतेने त्यांची माफी मागावी. आपण मोठ्या मनाने कळत नकळतपणे आजवर केलेल्या चुकांची कबूली द्यावी. तसेच पुन्हा त्या चुका आपल्या हातून घडणार नाहीत ह्याची कायम जाणीवपूर्वक दक्षता घ्यावी. तसेच नात्यांप्रती असलेल्या आपल्या जबाबदार्‍या हसतमुखाने पुर्ण कराव्यात.

2. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ही दक्षता घेता येईल

   आपल्यात काही असे दुर्गूण असतात. ज्यामुळे आपल्या हातून अनेक चुका घडत असतात. ज्यात स्वार्थ आणि त्यासोबत येणारी लालसा ह्या अक्षरशा राक्षशी प्रवृत्ती आहेत. आणि आपल्या वैचारीक पातळीस खालच्या स्तराला नेण्यास कारणीभूत आहेत. कारण पैस्याच्या लालसेपोटी आपल्या हातून बेकायदेशीर गोष्टी घडण्याची शक्यता असते. जसे कोणाच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवणे, चोरी करणे, वारसाहक्क दाखवून पिढीजात संपत्ती गिळंकृत करणे आणखी बर्‍याच अनौपचारीक गोष्टी करतांना आपण जराही विचार करत नाही. मीपणाच्या अहंकाराने आपल्या आसपास न दिसणार्‍या आगीचे साम्राज्य पसरवीतो. परंतू कधी चुकूनही आपल्याला ह्याची जाणीव झाली तर पश्चातापाने आपले मन दु:खी होते. तेव्हा संधी मिळताच आपल्या मनातील स्वार्थाच्या ह्या राक्षसाला कायमची मुठमाती द्यावी. त्याचबरोबर भौतिक संपतीचा अनाठायी लोभ बाळगण्यापेक्षा आपल्या प्रियजनांनाच आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा समजून त्यांच्या वरच्या प्रेमाखातर स्वत:मध्ये सकारात्मक परिवर्तन आणावे.

3. आपले भविष्य उज्वल बनविता येईल

  आपण आपल्यातील क्षमतांच्या बळावर आपले आयुष्य उभे करतो. ज्यात आपले सिमीत जग सामावलेले असते. आपल्या ह्या सिमीत जगात सर्व सुखसुविधांची पुर्तता व्हावी ह्यासाठी आपण झटत असतो. आणि त्यात यशस्वीही होतो. परंतू जगणे आपल्यापुरते सिमीत असले तर आपल्याला त्या परोपकाराच्या दैवी सुखापासून वंचीत ठेवते. त्यात जे सुख आहे ते ह्या स्वार्थाने बरबटलेल्या व केवळ आपल्याच अवती भवती फिरणार्‍या जगात नाही. तेव्हा आयुष्यात संधी मिळताच परोपकाराचा भव्य दृष्टीकोन ठेवून कायदेशीर मार्गाने श्रीमंत होण्याचा ध्यास घ्यावा. आणि मोठ्याप्रमाणावर संपत्तीचा संग्रह करून समाजातील जो वर्ग मुलभूत गरजांच्या पुर्ततेपासून वंचीत आहे, गरिबीने ग्रासलेला आहे, शिक्षणापासून वंचीत आहे अशांना माणुस म्हणून त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी उपयोगात आणावा. आपल्यासारख्याच अन्य माणसांना मदत केल्याने आपले भविष्य आपोआपच उज्वल होत जाईल.

4. आपल्या जीवनाचा हेतू पुर्ण करता येईल

  जेव्हा आपण मनुष्य रुपात जन्म घेतो तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यासाठी स्वप्न बघण्याची सवय लागते. अशाप्रकारे आपण आपल्या जीवनाची सुरवात मोठमोठ्या स्वप्नांनी करत असतो. परंतू जसजसा आपल्या खांद्यांवर कौटूंबिक जबाबदार्‍यांचा भार वाढतो आणि आपली त्यासाठी पूर्वनियोजीत तयारी नसली तर आता कोठे जन्मास आलेली आपली स्वप्न त्याखाली कळत नकळतपणे गाडली जातात. तेव्हा आयुष्यात पुन्हा संधी मिळाली तर तिचे सोने करण्यासाठी जीवाचे रान करावे. स्वत:वर आत्मविश्वास मिळविण्यासाठी जास्तीत जास्त कौशल्य स्वत:मध्ये विकसीत करावीत. नविन तंत्रज्ञान अंगीकृत करावे. आपला कोणत्या क्षेत्राकडे जास्त रस आहे हे जाणून घेवून आपला जीवनाचा हेतू साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाने पावले उचलावीत.

    आयुष्यात आपण आपल्या अंतर्मनाच्या मार्गदर्शनाने पुढे जात राहिलो तर नक्कीच आपल्या उद्देशाला गाठण्यात यशस्वी होवू शकतो. तरीही कित्येक गोष्टी मिळविण्यासाठी आपल्याला जीवापाड संघर्ष करावा लागतो. परंतू वेळे अभावी किंवा दुसऱ्या संधीच्या अभावामुळे काही गोष्टी हातातून सुटत जातात. तेव्हा आयुष्यात निदान दुसरी संधी मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपल्या हातून एकदा निसटलेली वेळ आपल्याला पुन्हा जगता येत नाही. परंतू तेव्हा राहून गेलेले काही, तेव्हा झालेल्या चुका तसेच अपराधांसाठी आपण आपल्या माणसांना माफी नक्कीच मागू शकतो. त्याचप्रमाणे स्वत:लाही मोठ्या मनाने माफ करण्यासाठी आपल्याला एक तरी संधी आयुष्यात मिळालीच पाहिजे. तसेच जीवनात जे मिळवायचे आहे ते प्रत्येकवेळी एका संधीत साध्य होत नाही. अशावेळी मनाच्या कोपर्‍यात आजीवन काहितरी राहून गेल्याची खंत असते. त्याची मनाला सारखी टोचणी लागलेली असते. त्यामुळे जीवनाचा मनमुराद आनंद घेता येत नाही. तेव्हा जीवनात दुसर्‍या संधीचे अनन्यसाधारण महत्व आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *