देवाचे अस्तित्व

जेव्हा सर्वसामान्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली तेव्हा ते त्यांच्या जीवनातील समस्या व दु:खांचे निरसण करण्यासाठी देवाकडे धाव घेवू लागले. कारण देव सर्वकाही ठिक करेल ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे ते लहान सहान कारणांसाठी स्वत: काही प्रयत्न न करता देवाजवळ येवू लागले. देवाला ह्या गोष्टीची जाणीव झाली आणि ह्या गोष्टीची चिंता वाटू लागली कि असेच सुरू राहिले तर आपले महत्व कमी होईल. तसेच लोक आपल्याला गृहीत धरू लागतील. जेव्हा ही भिती देवाच्या मनात निर्माण झाली. तेव्हा देवाने अशा ठिकाणी स्वत:ला लपवीण्याची योजना आखली जिथे कोणिही सहजा सहजी त्याला शोधू शकणार नाही. देवाने त्यावर खुप विचार केला. अखेरीस देवाला लपण्यासाठी त्याला हवी तशी जागा सापडली. ती पवीत्र जागा म्हणजे माणसाचे हृदय होते.

  अशाप्रकारे प्रत्येक मनुष्याच्या हृदयात देवाचा निवास असतो. आपल्या अंतर्मनातील प्रेम दया सेवा करुणा ह्या पवीत्र विशेषतांच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाची अनुभूती आपल्याला होत असते. आपण मात्र मुर्ती मध्ये देव शोधतो. परंतू मुर्ती ही फक्त देवाची प्रतिकृती असते. जी मनुष्याच्या कल्पनेतून साकार झाली आहे. देवाच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन मुर्तीतून होत नसून.  माणसाने अन्य माणसांसाठी केलेल्या परोपकारातून, सेवेतून, निस्वार्थ प्रेमातून, करुणेतून देवत्वाचा खरा अनुभव आपण घेवू शकतो. म्हणूनच जेव्हा असहाय्य अवस्थेत अनपेक्षीतपणे आपल्याला अचानक मदत मिळते. तेव्हा आपल्या तोंडून ”माणसाच्या रूपात परमेश्वरच धावून आला” अवचीत हे शब्द बाहेर पडतात. परंतू आज माणसाने भौतिक श्रीमंतीची लालसा, गरीब-श्रीमंतीवरून भेदभाव, जीवघेण्या प्रतिस्पर्धा, बेरोजगारी, स्त्रियांवर अमानुष अत्याचार, प्राण्यांची अनावश्यक हत्या, शारिरीक सौंदर्याचे आकर्षण, ह्या आणि अशा अनेक स्वरूपात स्वत:मधील राक्षसास जागवीले आहे. तसेच आज माणुसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनला आहे.

.

  ज्याप्रमाणे शेतजमिनीवर अनावश्यक रोपटी व तण हे आपोआपच उगवत असतात. जर त्यावर ताबा मिळवला गेला नाहीतर ते संपुर्ण शेतजमिनीवर पसरून मुख्य पिकास उत्तमरीतीने वाढू देत नाही. परंतू आपल्या उदरनिर्वाहासाठी जर योग्य प्रमाणात धान्य शेतजमिनीवर उगवावयाचे असेल. तर मात्र त्यासाठी जमिनीची योग्य ती मशागत करावी लागते. पोषकांची फवारणी करावी लागते. त्यानंतर विशीष्ट अंतरावर बियाण्यांची लागवड करून योग्य प्रमाणात पाणि द्यावे लागते. अशाप्रकारे इवल्याश्या रोपट्यापासून ते पिक हातात येईस्तोवर आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. तरच आपल्या पदरात मोत्यासारखे धान्य पडते. जे आपले अन्न असते आणि अन्न हे पुर्णब्रम्ह असते. त्याचप्रमाणे भ्रुण अवस्थेपासून ते जन्म घेवून मोठा होईस्तोवर एका निरागस जीवास जागृकतेने जोपासले गेले. तरच त्याच्यातील देवाच्या अस्तित्वास कायमस्वरूपी जपता येवू शकते. जगाचा कठोर चेहरा दाखवून व आपल्या मार्गदर्शनातून तसेच स्वकृतीतून त्याला त्याच्या जीवनाचा हेतू दर्शवीता येवू शकतो. त्याचबरोबर आपल्या पदरात पडलेल्या निरागस जीवास असे उत्कृष्ठ व अनुकूल वातावरण आपण देवू शकलो. तर प्रत्येक घरातून पिढ्यांचे शुद्धीकरण करण्याचे श्रेष्ठ कार्य निरंतर घडत राहू शकते.

  आज माणसातील माणुसकी लोप पावत चालल्यामुळे आपल्या हृदयातील देवाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. परस्परातील प्रतिस्पर्धा व तुलना मनातल्या मनात राग, द्वेष मत्सर जागृत करण्यासाठी खतपाणि देत आहेत. त्यामुळे घातक विचार सखोल रुजत चालले आहेत. भौतिक संपत्तीच्या लालसेपोटी सख्ख्या बहिण भावांमध्ये वितुष्टे निर्माण होतांना दिसत आहेत. नात्यातील प्रेम, नात्यांना जपणे ह्या गोष्टींचे परीवर्तन करारांमध्ये होत आहे. ज्या गोष्टी मनापासून माफी मागितल्याने व मनापासून माफ केल्याने सहज संपवीता येवू शकतात. त्या आजीवन एकमेकांचे तोंड न बघण्याच्या शपथी घेवून आणखीच क्लिष्ट बनत  चालल्या आहेत. एकमेकांसाठी हृदयात आजन्म रागाच्या रुपात आगच जोपासली जात आहे. ज्यामुळे आपले व आपल्या माणसांचे हृदय पोळण्याचीच शक्यता जास्त आहे. देवाने स्वत:साठी हृदयासारखी शुद्ध व निर्मळ जागा शोधली खरी परंतू ते ही आता सुरक्षीत राहिले नाही. तिथली शांतताही भंग पावत चालली आहे.

  माणसातील मीपणाने उच्चांक गाठला आहे. माणुस लहानाचा मोठा होतो. त्याच्या सवयी, जीवनशैली, वय सर्वकाही बदलत जाते परंतू त्याच्यातील मी कायम तसाच तठस्थ राहतो. त्यामुळे तो स्वत:च्या अंतर्मनातील साक्षात दैवी स्वरूपास ओळखू शकत नाही. तसेच कायम बाहेरच्या जगाशी चढाओढी करण्यात गुंतलेला असतो. तिथे स्वत:ला सिद्ध करू शकला नाही तर आपल्याच क्षमतांवर टिका करून  स्वत:चाच अपमान करण्यास मागे पुढे बघत नाही. परंतू सृष्टीची शक्तीशाली उर्जा आपल्यातून प्रवाहीत होत असतांना स्वत:ची तुलना इतरांशी करणे. तसेच स्वत:ला कमकुवत ठरवीणे म्हणजे आपल्या हृदयातील देवाचा अपमान करण्यासारखे आहे. तेव्हा आपण नेहमी आपल्यातील अद्वीतीय गुणांवर मन एकाग्र केले पाहिजे. मीपणा हा अहंकारास बढावा देतो तेव्हा त्याचा नायनाट करून अंतर्मनाच्या मार्गदर्शनाने जीवनात पुढे पुढे जात राहीले पाहिजे.

  संतांचे मन संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतत नव्हते. कारण ते निरंतर विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन राहत असत. त्याचबरोबर ते आपल्या देवास निसर्गातील वृक्षवेलींमध्ये, प्राणिमात्रांमध्ये, निर्जीव पाषाणामध्ये असे सर्वत्र बघू शकत होते. त्यासाठी त्यांना देवाच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचीही आवश्यकता नव्हती. कारण ते नैसर्गीक उर्जेशी एकरूप झाले होते. त्यांनी त्यांच्या हृदयातील देवास पुर्णपणे जागृत केले होते. त्यामुळेच त्यांना ठायी ठायी देवाचे अस्तित्व जाणवत होते. परंतू आता मात्र प्रत्येक घरात देवघरं असतात. जिथे बसून दररोज पुर्ण भक्तीभावाने पुजा करण्यात येते. कारण तो देवाचे आभार मानन्याचा एक भावपूर्ण मार्ग आहे. आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता असल्यास ती भरून निघावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरातील माणसे निरोगी व स्वस्थ रहावीत, मालमत्तेत किंवा संपत्तीत भरभराट व्हावी, घरात वंशाचा दिवा जन्मास यावा, परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावे अशाप्रकारच्या अमर्याद इच्छा आकांक्षा आपल्या मनात असतात. तसेच त्या मनात बाळगून आपण देवाच्या मुर्तीसमोर उभे राहतो. कारण देवाच्या आशिर्वादाशिवाय त्या पुर्ण होणे शक्य नाही ह्यावर आपला अतूट विश्वास असतो. परंतू जिथे प्रामाणिक प्रयत्न, कठोर परीश्रम आणि त्याच्या जोडीला शुद्ध भावना व सकारात्मक विचार असतील तिथे देव कायम उपस्थित असतो. ह्याचा अर्थ हा होतो कि जिथे शुद्धता व सात्विकता आहे अशा सर्व ठिकाणी देवाचे अस्तित्व असते.

  एखाद्या भुकेने व्याकूळ व्यक्तीसही जेवणासाठी तोपर्यंत तात्कळत ठेवण्यात येते. जोपर्यंत देवाला नैवेद्द दाखवीला जात नाही. अशापद्धतीचा भक्तीभाव मात्र माणसास अंधश्रद्धेकडे घेवून जातो. कारण देव हा आपल्यातच सामावलेला असतो. आपण भुकेल्याची भूक जाणू शकलो इतपत करुणा आपल्या हृदयात जागृत झाली तरी आपल्या मनातील भाव देवापर्यंत पोहोचतो. तेव्हा आपल्या अंतर्मनात डोकावणे, आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास पोहोचवीणे, इतरांच्या वेदना समजू शकणे, अबोल वृक्षवेलींना मायेने जोपासणे, प्राणिमात्रांची सेवा करणे म्हणजेच देवाचे स्मरण करणे होय. आपण निसर्गाचे देणे लागतो ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. सृष्टीची उर्जा आपल्यात सामावलेली असते. म्हणूनच आपण जे काही आपल्या माध्यमातून पसरवू तेच मोठ्या प्रमाणात आपल्यापाशी परत येते. कारण माणसाने वेगवेगळ्या नावांनी तिचे वर्णन केले असले तरी ही सृष्टीची शक्तीशाली उर्जाच आहे जिला आपण देव म्हणतो. त्यामुळे देवाला मुर्तीमध्ये न शोधता आपल्या प्रांजळ भक्तीत, आपल्या संवेदनेत तसेच आपल्या विश्वासात शोधावे. त्याचप्रमाणे देवपुजे संबंधीत कोणतेही कडक नियम कोणाचीही तहानभूक जाणण्यापेक्षा व कोणाचे दु:ख दूर करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असू नयेत.

1. देवाचे अस्तित्व आपल्या प्रामाणिक प्रयत्नात असते.

  आपण कोणत्याही गोष्टींचे घडणे किंवा न घडणे थांबवू शकत नाही. परंतू तरिही प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. आपल्या शरिराचे वय वाढणे, आरोग्यासंबंधीत समस्या उद्भवणे ह्या नैसर्गीक गोष्टी असतात. परंतू उत्तम सवयींचे काटेकोर पालन करून आपण त्या शक्य तितक्या लांबणीवर टाकू शकतो आणि आरोग्यदायी व स्फुर्तीदायी जीवन दिर्घकाळ जगू शकतो. म्हणूनच ”प्रयत्नार्थी परमेश्वर” असे म्हंटले जाते. कारण प्रामाणिक प्रयत्नांचा निकाल नेहमी श्रेष्ठच लागतो.

2. देवाचे अस्तित्व आपल्या सुंदर विचारात असते.

  सुंदर विचार हे नेहमी अजरामर इतिहासास जन्मास घालतात. कारण हे विचार तेजस्वी असतात. निर्मीतीक्षम असतात. तसेच जगात सकारात्मक बदल आणणारे असतात. ज्यात सेवाभाव रुजलेला असतो. ज्यात परोपकारास मान्यता असते आणि त्यासाठी त्याग हा अपरीहार्य असतो. म्हणूनच सुंदर विचारांना सृष्टीचा प्रतिसाद मिळतो आणि ते प्रत्यक्षात अस्तित्वात येवू लागतात. कारण देव त्यांची पाठराखण करत असतो.

3. देवाचे अस्तित्व जगण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करण्यात असते

   जोपर्यंत आपण मीपणाने जीवन जगत असतो तोपर्यंत आपण आपल्या वर्तनातून इतरांचे मन दुखवत असतो. गैरमार्गाने पैसा कमवत असतो. आपल्यात अहंकार बढावलेला असतो. परंतू जेव्हा आपल्या हातून घडलेल्या कुकर्मांसाठी आपले मनच आपल्याला धिक्कारते तेव्हा मात्र आपल्यात सकारात्मक बदल येण्यास सुरवात होते. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. अशावेळी आपण स्वत:मध्ये प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याचे साहस गोळा करतो. त्यावर चालतांना कितीही त्रास होत असला तरी आपण तिळमात्रही डगमगत नाही.  

4. देवाचे अस्तित्व आपल्यातील माणुसकी नेहमी जागृत ठेवण्यात आहे

   माणुसकी हाच माणसाचा खरा धर्म आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून माणुसकीचेच प्रतिनिधीत्व झाले पाहिजे. परंतू स्वार्थ हा माणुसकीचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण स्वार्थी प्रवृत्ती माणसास आंधळे बनवीते. अविवेकी वर्तन करण्यास व पातळी सोडून वागण्यास प्रवृत्त करते. तरीदेखील सेवाभावाने व दयेने आपण स्वार्थावर ठरवून विजय मिळवू शकतो आणि माणुसकीला अजिंक्य बनवू शकतो. त्यासाठी आपण नेहमी जागृतपणे जीवन जगले पाहिजे.  

   आपल्या हृदयातील देवाचे अस्तित्व राखण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. कारण ही सर्वस्वी आपली जबाबदारी असते. समाजाप्रती, देशाप्रती किंवा आपल्याशी जुळलेल्या आपल्या माणसांप्रती आपल्या काही जबाबदार्‍या असतात. त्या यथासांग पार पाडणे हे आपले कर्तव्य असते. त्यासाठी शूद्ध विचारसरणी असणे व त्यांचे आचरण करणे सोपे जावे म्हणून आपल्या हृदयातील देवाच्या अस्तित्वाला जोपासणे महत्वाचे असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *