देशकन्या

  शाळेच्या पवित्र पटांगणावर सामूहिकरीत्या प्रतिज्ञा ग्रहण करत असतांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालमनावर आपल्या देशबांधवांप्रती कर्तव्यांचे पालन करण्याचा संदेश वारंवार कोरला जातो. तरीसुद्धा मोठेपणी आपल्याच देशकन्येच्या व देशभगीनीच्या शरीराची विटंबना करतांना विकृतीचा कळस गाठलेल्या माणसांना लाज वाटत नाही. किंवा त्याक्षणी त्यांना आपल्याच घरातील आई बहिण मुलगी ह्या स्त्रियांची आठवण देखील होत नाही. कलकत्ता शहरात घडलेल्या ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा प्रत्येक आई आपल्या मुलीच्या चिंतेने शहारली आहे. परंतू मनुष्य रुपात राहून अशी राक्षसी कृत्य करतांना त्या नराधमांचे अंतर्मन त्यांना धिक्कारत कसे नाही हाच मोठा प्रश्न आहे. असे म्हंटले जाते कि देवाने स्थानापन्न होण्यासाठी माणसाचे हृदय निवडले होते. परंतू माणसाने आपल्या हृदयातील देवत्वावर मात करून. तसेच इतक्या खालच्या थराला जावून आपल्या मनात दानव प्रवृत्तीस बढावा देण्यामागे नेमका त्याचा उद्देश तरी काय आहे? आपलीच देशकन्या जी डॉक्टर ह्या महत्वपूर्ण पेशात असून आपल्या कर्तव्यात रुजू होती. तिला बेसावध अवस्थेत गाठून अत्यंत पाशवीपणे नराधमांनी आपल्या क्षणिक वासनेचे शिकार बनविले. तिच्या शरीराची अपरिमित विटंबना केली. त्याचप्रमाणे तिचा आत्माही भयाने कापला असेल असा निर्दयीपणे तिचा अंत केला. तेव्हा हे केवळ एक बलात्कारा सारखे दुष्कृत्यच नव्हते. तर पुरुषी मानसिकतेने ग्रसित पुरूषांचा एका कर्तुत्ववान देशकन्येला स्त्री म्हणून तिची जागा दाखवीन्याचा घाणेरडा मार्ग होता.

   समाजात पसरलेली ही पुरुषी मानसिकता एकप्रकारची विकृती आहे. कारण ती स्त्रियांवर झडप घालण्यास अत्यंत उतावीळ आहे. स्त्रियांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवून मनमानी करण्यात त्यांना अघोरी सुख मिळते. खासकरून महत्वाकांक्षी व कर्तुत्ववान स्त्रियांवर त्यांचा जास्त आकस असतो. त्यातूनच सहकर्मचारी स्त्रिया, उच्च पदावरील स्त्रिया तसेच प्रगतीशील स्त्रियांना त्यांच्या सोबत काम करणाऱ्या पुरुषांच्या वासनांध नजरांचा नियमितपणे सामना करावा लागतो. किंवा कधीकधी त्या त्यांच्या लैंगिक अत्याचारास सुद्धा बळी पडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असतात. तर कधीकधी त्यांना पुरुषांकडून विविध प्रकारे होत असलेला त्रास कोणाजवळ बोलूनही दाखविता येत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अशा सर्व अडचणींना पार करत स्त्रिया प्रामाणिकपणाने व अपार कष्टांनी समाजात आपले अस्तित्व उभारत असतात. परंतू पुन्हा एखादी अशी हृदय हेलावून टाकणारी विदारक घटना आपल्याच देशकन्येच्या बाबतीत घडवून आणून समाजातील ही कीड आपल्या दानवी क्षमतेचे विकृत प्रदर्शन करते. तसेच ती घटना आणखी एखाद्या निष्पाप देशकन्येचा नाहक बळी घेण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे समाजात वावरत असलेल्या इतर विकृत मानसिकता असलेल्यांचीही हिम्मत आणखी वाढत जाते. अशाप्रकारे ही पुरुषी मानसिकता समाजावर नकारात्मक प्रभाव पाडत जाते. आता तर दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशारीतीने पुरूषप्रधान संस्कृती कडून स्त्रियांच्या बाहेरच्या जगात प्रगती करण्याच्या मनसुब्यांवर अप्रत्यक्षपणे मर्यादा आणली जात आहे.

   ज्या स्त्रिया सर्वतोपरी पुरुषावर अवलंबून जीवन व्यापन करत आहेत. त्यांनाही पुरुषी मानसिकतेचा तडाखा बसतो. त्या आजीवन मानसिक त्रास सहन करत खितपत पडलेल्या असतात. काही स्त्रियांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागते. नवविवाहित मुलींना पैस्याच्या मागणी वरून जीवे मारले जाते. त्याचप्रमाणे त्यांना भूमिकांच्या जबाबदारी मध्ये असे गुंतवून ठेवण्यात येते. जेणेकरून त्यांनी आपले अस्तित्व उभारण्यासाठी व माणूस म्हणून सम्मानास पात्र होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करू नये. अशाप्रकारे स्त्रिया ह्या निष्ठूर समाजाच्या न दिसणाऱ्या साखळदंडाचा भार जीवनभर निमुटपणे सोसत असतात. मग जर आपण गेली पंचाहत्तर वर्ष देशाचे स्वातंत्र्य उपभोगतोय तर त्यात स्त्रिया कोठे आहेत? जर आपण आपल्या देशाला माता असे संबोधतो तर आपल्या देशकन्या व देशभगीनींच्या अब्रूची सुरक्षा मातेच्या पदराखालीच अबाधित का राहिली नाही? आज आपलेच हात जेव्हा त्यांच्या अंगावरची वस्त्रे हरण करण्यासाठी उठतात तेव्हा आपल्या अंतर्मनात माणुसकीला जाग कशी येत नाही? एका असहाय्य स्त्रीच्या किंकाळ्या कानावर पडत असतांना अत्याचार्यांना तिच्या शरीराशी खेळून कोणते स्वर्गीय सुख प्राप्त होत असावे? जेव्हा अशा घटना आपल्या आसपास घडतात. किंवा आपल्यापैकीच कोणाची तरी लेक  बहीण त्या घटनेची शिकार होते तेव्हाच आपल्याला ह्या अनुत्तरिक प्रश्नांच्या उत्तराचे महत्व प्रकर्षाने कळते. कारण त्यामुळे नुकसान फक्त त्या दुर्दैवी घटनेस बळी पडलेल्या एका स्त्रीचेच नाही तर संपूर्ण स्त्रीजातीच्या अस्मितेचे होते.

   तेव्हा आता आई वडीलांच्या पालकत्वावर मोठे प्रश्न चिन्ह उठले गेले पाहिजे. कारण त्यामुळेच समाजात असे अट्टल गुन्हेगार घडत राहतात व सर्रास नव्या शिकारीच्या शोधात मोकाट फिरत असतात. त्यासाठी पालकत्वाचे मापदंड हे व्यक्तीगत पातळीवर सक्तीने पाळलेच गेले पाहिजेत. जर घरात मुलगी आहे तर तिला समाजात पसरलेल्या विकृतीच्या भीतीने बंधनात मोठे करण्यापेक्षा स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित करून मोठे करावे. तिच्यात विश्वास भरावा. तिला शिक्षणाचे बाळकडू पाजावे. त्याचप्रमाणे विनम्रभावाचे व माणुसकीचे महत्व पटवून द्यावे. तसेच जर मुलगा असेल तर त्याला स्त्रीत्वाप्रती संवेदनशील बनवावे. स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्या इतपत धाडसी बनवावे. त्याला स्त्रियांच्या साम्मानास आपल्या आयुष्यात सर्वतोपरी प्राथमिकता देण्याचे शिक्षण द्यावे. त्याला कौशल्य निपुण बनवीन्यासोबतच स्वच्छ मनाचा धनी बनवावे. तरच आपल्या लेकीबाळींना ह्या जगात जन्म घेतल्यावर एका सुरक्षित वातावरणात मनमुराद जगता येवू शकते. अशाप्रकारे जर आपण पुरूष आहात तर एक जबाबदार व कर्तव्यदक्ष देशबंधू बनून आपल्या देशभगीनींच्या अब्रूची लाज राखावी.

1. मुलींनी स्वत:ची साथ कधीही सोडू नये

   मुलींनी कोणत्याही परिस्थितीत स्वत:बरोबर उभे राहावे. कारण त्यांचे अंतर्मन त्यांना योग्य दिशा दाखवत असते. आयुष्यात होणाऱ्या घटनांना प्रत्येकवेळी थांबविणे अशक्य आहे. परंतू आपल्याच मनाचे मार्गदर्शन त्यांना जास्तीत जास्त वेळी स्वहिताचे असल्याचे निदर्शनात येईल. स्वत:ला महत्व देणे. स्वत:च्या आवडी निवडी जपणे. त्यांना स्वत:च्या आणखी आणखी जवळ आणेल. जेव्हा त्या स्वत:च्याच सहवासात रस घेवू लागतील तेव्हा त्यांना स्वत:ला अशा संगती पासून वाचविता येईल जी त्यांच्या करीता योग्य नाही. हे जग जेव्हा त्यांना वाईट नजरांनी बघते. तसेच त्यांचे पाय ओढण्यासाठी त्यांना घालून पाडून बोलत असते. तेव्हा त्यांनी स्वत:च्या डोळ्यात डोळे घालून स्वत:मध्ये विश्वास जागवावा. कारण स्वत:ची साथ सोडून त्या एकही पाउल पुढे टाकू शकत नाहीत.

2. मुलींनी स्वत:चा सम्मान करावा

   आजच्या ह्या आधुनिक युगात जग सर्वच बाबतीत कितीही पुढे गेले असले तरी आपले संस्कार संस्कृती मूल्यच असतात जी आपली एक माणूस म्हणून मजबूत पायाभरणी करत असतात. तेव्हा मुलींनी त्यांचा पेहराव व राहणीमानाला आपल्या अस्मितेशी जोडावे. आजचे चलन व इतरांना बघून वाहवत जावू नये. तर जो पेहराव त्यांनी केलेला आहे त्याने त्यांच्या शरीराचा सम्मान व्हावा. तो पेहराव त्यांच्या शरीराला घट्ट आवळणारा नाहीतर आरामदायक असावा. जेणेकरून त्यांना आपल्या कर्तव्यात रुजू असतांना शरीराची हालचाल करण्यास सहजता व्हावी. त्याचप्रमाणे असा पेहराव करू नये ज्यामुळे त्यांच्याच मनात कोणी काय म्हणत असावे अशी शंका उत्पन्न होईल. तर त्यांचा पेहराव त्यांच्यात सर्वतोपरी विश्वास जागविणारा असावा. अशाप्रकारे मुलींनी स्वत:च स्वत:चा सम्मान राखावा. असे करून त्या समाजात सकारात्मक बदल आणण्याच्या दिशेने खारीचा वाटा उचलू शकतात.

3. मुलींनी शुद्ध प्रगती करावी

   आजचे जग प्रतीस्पर्धांचे आहे. तेव्हा मुलींनीही त्यात मागे न राहता आपल्या क्षमतेनुसार पुढे जावे. परंतू त्यांनी कधीही केवळ पुरूष वर्गाशी बरोबरी करण्याच्या हेतूने प्रेरित असू नये. कारण त्यांचा हा हेतू पुरुषांमध्ये अहंकाररूपी आग जागावीन्यास आणखीच तेल ओतत असतो. त्यानंतर त्यांच्यातील हा अहंकाराचा विकृत राक्षसच मुलींना त्यांची जागा दाखवून देण्याकरीता कोणत्याही थराला जातो. तेव्हा मुलींनी आयुष्यात प्रामाणिकपणाचा व परिश्रमांचा मार्ग अवलंबून तसेच सेवेचा विडा उचलून आपली शुद्ध प्रगती करावी. त्यासाठी त्यांचा मार्ग केवळ आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यापुरता नसावा. तर मार्गात सोबत येणाऱ्यास आपला मैत्रीपूर्ण हात देवून मदत करण्याची त्यांची तयारी असावी. अशाप्रकारे सर्वांच्या प्रगतीची सदिच्छा बाळगून व आपल्या अंतर्मनात दयाभाव जागवून मुलींनी ताठ मानेने प्रगतीपथावर चालत राहावे.

4. मुलींनी आपल्या विनम्रतेतून कणखर व्हावे

   पुरूष प्रधान संस्कृतीत आपला आत्मसम्मान टिकवून ठेवण्याकरीता मुलींनी स्वत:मध्ये विनम्रभाव आणावा. कारण आपल्या विनम्रतेनेच समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराशी उत्तमरीतीने निपटता येवू शकते . परंतू विनम्रता म्हणजे स्वत:कडे कमीपणा घेणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्या सौम्य वागण्या व बोलण्यातून आपले हक्क आपले अधिकार आपल्या मर्यादा निर्धारित करणे. तसेच आपल्या स्पष्टवक्तेपणातून व कणखरपणातून समोरच्याला ते पटवून देणे. तेव्हाच मुली आपल्या वेळेचे तसेच आपल्या भावनांचे योग्य नियोजन करू शकतील. कारण आपला आत्मसम्मान जर आपल्या मीपणाशी जुळलेला असेल तर समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराचा सामना आपण प्रतिक्रियांनी करतो. ज्यामुळे आणखीच भडका उडतो. परंतू विनम्रतेशी जुळला असेल तर मात्र आपल्यातील कणखरता बघून समोरच्याचा अहंकारही काही क्षण स्तब्ध होतो.

   आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ज्यांनी कोणतीही मोहीम जिंकल्यानंतर त्यात अडकलेल्या शत्रूंच्या स्त्रियांनाही पूर्ण मानमरातब देवून सुरक्षितपणे रवाना केले. कारण मनुष्य जातीमध्ये स्त्रियांचे महत्व ते उत्तमरीतीने जाणत होते. परंतू आज आपण त्या पवित्र इतिहासाला आपल्या लाजीरवाण्या व अमानवीय कर्मांनी गालबोट लावलेले आहे. कारण कोणी बाहेरचा राक्षस आपल्या आया बहिणींची अब्रू मातीमोल करण्यासाठी उठला तर त्याचा हात तोडून त्याच्याच हातात देण्यासाठी देशबांधव असले पाहिजेत. इथे तर देशबांधवच आपल्याच देशकन्या व देशभागिनींची अब्रू व अस्मिता भंग करण्यास उतावीळ झालेले आहेत. याहून गलितगात्र अवस्था ह्या मिळालेल्या स्वातंत्र्याची आणखी काय असू शकते.            

1 thought on “देशकन्या”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *