देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा

माणुसकीचे जतन करणे म्हणजे मानवी देहात राहून नैतिकतेने जीवन जगणे होय. आपण सर्व विविध जाती धर्म व संप्रदायात विखुरलेले असतो. त्याचप्रमाणे आपआपल्या धर्माची थोरवी आजीवन गात राहतो. परंतू माणुसकीची कास धरून जगणे आपल्यापैकी प्रत्येकास जमत नाही. कारण माणुसकीचा मार्ग साधा सरळ असला तरी स्वार्थाने बरबटलेल्या आपल्या वैचारिक पातळीस त्याचे मोल सहजा सहजी कळत नाही. खरेतर माणुसकीची हीच मोठी विटंबना आहे. परंतू माणुसकी मनुष्याला  जीवनाचा खरा अर्थ शिकवत असते. त्यामुळे माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकच धर्माचा पाया हा माणुसकीवरच रचला गेलेला आहे. आपल्यातील मदतीची भावना, सेवाभाव, दयाभाव, समझदारी, सहानुभूती, प्रेम तसेच सदभावना हे सर्व गुण आपल्या निर्विकार अंतर्मनाच्या विशेषता असतात. तसेच ह्या सर्व विशेषता माणुसकीचेच प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळे माणुसकी ही एक प्रकारची दैवी अनुभूती आहे. कारण ती आपल्या मनास निरंतर शुद्ध करत असते. त्याचप्रमाणे माणुसकीच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यानेच आपल्या देहातील प्राण शून्यत्वाच्या दिशेने प्रवास करू शकतात. कारण आपल्यातील मीपणा हा माणुसकी धर्म निष्ठेने पाळल्यानेच हळूहळू गलितगात्र होत जातो. त्यामुळे आपण आपल्या पुढच्या जन्मात सर्वार्थाने विकसित आवृत्तीच्या स्वरूपात जन्म घेवून आपल्या नवजीवनाचा भरभरून आनंद घेवू शकतो. तेव्हा कोणाचेही माणुसकीपूर्ण वर्तन हे स्तुती व प्रोत्साहनास सर्वतोपरी पात्र असते. तसेच ते एक आदर्श उदाहरण म्हणून समाजापुढे उजागर होणे देखील महत्वाचे असते. त्याचप्रमाणे समाजात सकारात्मक परिवर्तन आणण्याच्या हेतूने माणुसकीचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होण्याकडे लक्षकेंद्रीत करणेही गरजेचे आहे. अशाप्रकारे प्रत्येक मानवी देहाच्या तिजोरीत माणुसकीच्या अनमोल ठेव्याचे जतन होणे अनिवार्य आहे.

   संतांच्या सुमधुर व समाजास सुबोध करणाऱ्या वाणीतूनही माणुसकीचेच गुणगान गाईले गेले आहे. त्याचप्रमाणे थोर महात्म्यांनीही माणुसकीला प्रोत्साहन देवूनच आपल्या कार्याला सत्कार्याचे स्वरूप दिले आहे. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने माणुसकीचे दान एकमेकांच्या पदरात टाकत आपल्या जीवनाला प्रकाशित केले पाहिजे. परंतू आज मात्र माणुसकीची अत्यंत दयनीय अवस्था आहे. कारण माणुसकीची ज्योत सर्वसामान्यांच्या अपुऱ्या गरजा, त्यांची बिकट परिस्थिती, पैस्याचे वाढते मूल्य, त्यामुळे त्यांना जीवन जगतांना येणाऱ्या अडचणी ह्या सर्व कारणांनी मंद होत चालली आहे. तसेच परिवर्तीत झालेल्या काळाने प्रत्येकास आपल्या पुरते व आत्मकेंद्रित होवून जीवन जगण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे हळूहळू करून माणसा माणसामधील  आपसातील भाईचारा तसेच मनाचा मोठेपणा कमी कमी होतांना दिसतोय. त्याचबरोबर त्यांच्यामधील आपसी संबंधांना व्यवहाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच समाजात गरीब श्रीमंतीची दरी अतिशय रुंदावत गेली. तसेच त्यावरून एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरविला जाऊ लागला आहे. अशाप्रकारे आज समाजात माणुसकी लोप पावण्याच्या मार्गावर आहे. कारण वाढत्या सिमेंटच्या जगलांबरोबर पैस्याच्या गुर्मीने मस्तवाल झालेली मानवी मानसिकता अतिशय प्रखरतेने उदयास येत आहे. ज्यात स्वत:वर इतके लक्ष केंद्रित केले गेले आहे कि आपल्यामुळे इतरांना होणारे नुकसान किंवा गैरसोय ह्याचा अजिबात अंदाज लावण्याची किंवा विचार करण्याची गरजही आपल्याला भासत नाही. ज्यामुळे मनं इतकी दुरावली जातात कि आपसात माणुसकीचे नाते विकसित होण्यास वावच मिळत नाही.        

   जीवन हे अत्यंत अस्थिर आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या देहाच्या माध्यमातून आपल्या जीवनात सत्कर्मांना न्याय दिला पाहिजे. त्यासाठी आपल्या मनाचा मोठेपणा जपला पाहिजे. निसर्गाच्या व प्राणीमात्रांच्या संवर्धनासाठी झटले पाहिजे. निसर्गाने आपल्या पदरात मुबलक प्रमाणात टाकलेली नैसर्गिक संपत्ती वाटून घेण्यावर भर दिला पाहिजे. हे माणुसकीला प्रोत्साहित करणारे कार्य प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून पार पाडले पाहिजे. परंतू माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीचा कळसच आपल्याला सर्वत्र दृष्टीक्षेपास पडतो. कारण मनुष्य आपल्या जीवनात आता उच्च जीवनस्तर जगण्याला इतर महत्वपूर्ण गोष्टींच्या तुलनेत अधिक महत्व देवू लागला आहे. ह्या गोष्टीचे अत्यंत क्रूर उदाहरण म्हणजे केवळ आपल्या जीवनशैलीचा दर्जा उंचावण्याच्या हेतूने जेवणाच्या प्लेटांची गुणवत्ता वाढविण्याकरीता असंख्य गायींच्या कत्तली करून त्यांच्या हाडांच्या चुऱ्या पासून बोन चायना नावाचे अत्यंत नामांकित प्रतीचे डिनर सेट तयार केले जातात. जे श्रीमंतांच्या जेवणाची शान वाढवीत असतात. ज्या गायींना आपण माता संबोधतो व ज्या सर्वतोपरी आपल्या उपयोगी पडतात. त्यांनाच आपला अत्यंत स्वार्थी हेतू साधाण्याकरीता निर्दयतेने संपवून टाकले जाते. ह्या नराधमी कृत्यातून आपल्यातील माणुसकीचे नाहीतर छुप्या राक्षसी प्रवृत्तीचे दर्शन होते. त्याचप्रमाणे ब्रीडेड कुत्रे व मांजरी ही देखील हल्ली माणसाच्या उच्च जीवनशैलीचा भाग बनली आहेत. त्यासाठी भक्कम पैसा खर्च करण्याची तयारीही लोकांकडून दाखविली जाते. परंतू काही ब्रीडेड  प्रजाती थंड प्रांतातच उत्तमरीतीने जीवित राहू शकतात. आपण त्यांना कितीही कृत्रिम किंवा अनैसर्गिकरीत्या थंड वातावरण दिले तरीही ते वारंवार आजारी पडतात व आपले पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. परंतू श्रीमंतीचा नशा चढलेल्यांना आपल्या छंदापुढे  त्या मुक्या जीवांच्या वेदना अजिबात कळत नाही. अशाप्रकारे हा श्रीमंतीचा विपरीत प्रकार आपल्यात अहंकार जन्मास घालत असतो. त्याचप्रमाणे अहंकाराने आपले पाय मुळाला धरून राहत नाहीत तर हवेत तरंगत असतात. त्यामुळे आपण इतर मुळाला धरून असलेल्या आपल्या सहप्रवाश्यांचे दु:ख समजू शकत नाही. ही खऱ्या अर्थाने माणुसकीची मानहानी आहे.

   उन्हाळा हा ऋतू प्रत्येकासाठीच असह्य असतो. परंतू समाजातील श्रीमंत वर्गाने आपल्या श्रीमंतीने त्यावरही मात केली आहे. जेणेकरून ते जीवघेण्या उष्णतेतही आल्हाददायक गारव्याचा अनुभव घेवू शकतात. भौतिक श्रीमंतीचा नशा आपल्याला नेहमी आरामदायक जगण्याकडे प्रवृत्त होण्यास शिकवत असतो. तर माणुसकी आपल्याला आपल्या आरामदायक जगण्याच्या हौशेखातर किती जणांना व कशाप्रकारे भुर्दंड सोसावा लागतो हे जागरूकतेने पाहणे शिकवत असते. ए सी सारखी उपकरणे आपल्याला इतक्या उष्णतेतही त्वरीत थंडीचा अनुभव देत असतात. परंतू हा काही चमत्कार नाहीतर हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. तेव्हा तंत्रज्ञानाचे दुष्परीनामही होतात ह्या गोष्टीची प्रत्येक सुज्ञ माणसास जाणीव असलीच पाहिजे. ए सी आपल्याला आत जेवढी थंडक देतो त्याच्या दुपटीने उष्णता तो बाहेर टाकत असतो. तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे कि उन्हाळा असल्यामुळे वातावरण आधीच तापलेले असतांना ए सी च्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणात उष्णतेच्या प्रमाणात आणखीच भर पडत आहे. ज्यामुळे पक्षी, प्राणी तसेच समाजातील मध्यमवर्गीयांपेक्षा खालचा वर्ग जो आपल्या उदारनिर्वाहासाठी कठीण कामे करतो त्यांची अवस्था कशी होत असावी. कारण त्यांच्या पाशी आपल्या परिस्थितीशी लढण्यासाठी जीवावरच्या कठीण कामाव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नसतो. तसेच जीवघेणी उष्णता मुकाट्याने सहन करण्याशिवाय दुसरा कोणता मार्गही नसतो. परंतू आपल्या डोक्यात गेलेली श्रीमंती मात्र क्षणभरही आपल्या मनात हा विचार येवू देत नाही. अशाप्रकारे समाजात एक वर्ग कायम गरीबीचे चटके सहन करत जगत असतो. परंतू श्रीमंतांना साधी माणुसकीची जाणीवही होत नाही. अशाप्रकारे आता माणुसकी गरीब व श्रीमंत ह्या भेदाभावात इतकी विभागली गेली आहे.

   आज हवामानात आलेला अमुलाग्र बदल हा मनुष्यासाठी सर्वात जास्त चिंतेचा विषय झाला आहे. कारण ऋतूंच्या लहरीपणाचा सर्वात जास्त कृषी संवर्धनावर व सिंचन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे काही प्रांतातील जनतेस पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. तर काही ठिकाणी अवकाळी येणाऱ्या कमी पावसामुळे जमिनी खोलवर कोरड्या पडल्या आहेत. अशाप्रकारे रोजच्या वापरण्याच्या पाण्यासाठीही तडजोड करण्याची वेळ उन्हाळ्यात लोकांवर येत असते. परंतू ज्यांच्यापाशी पाणी मुबलक प्रमाणात आहे ते मात्र इतरांची पाण्याच्या संकटाची समस्या कदापि समजू शकत नाहीत. त्याचप्रमाणे पाण्याचा अपव्यय करत राहतात.अशावेळी पूर्णता विपरीत परिस्थिती बघावयास मिळते. एकीकडे पाण्याच्या वापरावर तडजोड केली जाते व पाण्याच्या एक एका थेंबाची बचत होतांना दिसते. तर दुसरीकडे माणुसकीच्या दृष्टीकोनातून तरी उन्हाळ्यात पाण्याचा जपून वापर केला पाहिजे ह्या गोष्टीचे भानही ठेवले जात नाही. ही तफावत अगदी समजण्यापलीकडची आहे.  ह्याचा अर्थ हा होतो कि आपल्या पुरता विचार करण्याची प्रवृत्ती माणसाला माणुसकी पासून लांब घेवून जात आहे. कारण तिथे इतरांचे दु:ख आंतरिकरीत्या अनुभवले जात नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात आहे ते फक्त मुबलक प्रमाणात वापरण्यावर भर देत असतात. ज्यांच्याकडे नाही ते कसे जगत असतील ह्याचा विचार करत बसण्याची त्यांना गरजच वाटत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी आपण कोणते माणुसकीपूर्ण पाउल उचलून निदान खारीच्या वाट्या इतके योगदान तरी देवू शकतो का हे विचार तर कधीही त्यांच्या मनात डोकावतही नाहीत.अशाप्रकारे माणुसकी शिवाय हे मानवी जीवन कोरडे वाटू लागले आहे.

   आजचे जग विस्कळीत व्यक्तिमत्वाच्या समस्येचा मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे. आपल्या शरीराला एखादे अपंगत्व असले किंवा आपल्याला एखाद्या रोगाने ग्रासले असल्यास ती सर्वांच्याच लक्षात येणारी गोष्ट असते. त्यासाठी आपल्याला इतरांकडून भरपूर सहानुभूती मिळते व आपल्या सुश्रूषेसाठी पावलेही उचलली जातात. परंतू विस्कळीत व्यक्तीमत्व ही अशी समस्या आहे ज्याकरीता अनेक गोष्टी कारणीभूत असूनही त्याविषयी वाच्यता करणे पिडीत व्यक्तीस अशक्य वाटते. कारण खरेतर त्याला स्वत:विषयीच लाजिरवाणे वाटत असते. अशावेळी माणुसकीच्या नात्याने त्याची मदत आपण तेव्हाच करू शकतो. जेव्हा त्याच्या स्थानी स्वत:ला ठेवून विचार करू शकतो. त्याचप्रमाणे आपण ह्या भव्य जगात इतरांपेक्षा वेगळे आहोत. ह्या त्याच्या मनात दृढ होत चाललेल्या एकाकीपणाच्या जाणीवेपासून त्याला वाचवू शकलो. तर तो विश्वासाने आपल्या हातात त्याचा हात देण्यास तयार होवू शकतो. अशाप्रकारे कोणास विपरीत परिस्थितीतून बाहेर काढायचे असल्यास त्याला दुरूनच विविध व कितीही उत्तम सल्ले देवून काहीही उपयोगाचे नाही. तर त्याला आपला भावनिक आधार देवून सर्वप्रथम त्याच्या मनात आपले स्थान व विश्वास निर्माण करणे सर्वात महत्वाचे असते. कारण कोणी आपल्याला समजून घेतले केवळ ह्या दिलास्यामुळेही त्याच्यात आत्मविश्वास संचारित होत असतो. त्यानंतर तो स्वत:च स्वत:ची मदत करण्यास सक्षमही होतो. तेव्हा कोणास त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी तुझ्या बरोबर आहे हा विश्वास देणे हीच खरी माणुसकी आहे. आपण ह्या भव्य सृष्टीचा एक सूक्ष्म कण मात्र आहोत. सृष्टीने आपल्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण टाकून आपल्याला स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. तेव्हा आपण आपल्या ह्या रहस्यमयी जीवनाला गंतव्यापर्यंत पोहोचविण्यासाठी माणुसकीच्या मार्गावर प्रामाणिकपणे मार्गक्रमण केले पाहिजे.  

1. आपल्या पेशाला माणुसकीच्या ठेव्याने समृद्ध करावे 

   आपल्यातील माणुसकीने आपण करत असलेला पेशा मग तो कोणताही असो श्रेष्ठ होतो. त्या पेशाला प्रतिष्ठा प्राप्त होते. जर एखादा व्यक्ती भर उन्हात रस्त्यावर दगड फोडण्याचे काम करत असेल तर त्याला शारीरिक थकवा जाणवणे सहाजिकच आहे. तरीही त्याने जर त्या कामाला फक्त आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले. तर त्याला आपल्यावरच्या जबाबदार्यांची जाणीव होवून तो अधिकाधिक कष्ट घेण्याची तयारी दाखवेल. परंतू त्याने जर आपल्या दगड फोडण्याच्या कामाला आपल्या माणुसकीने समृद्ध नजरेने पाहिले. तर तो आपण फोडत असलेल्या दगडांचा वापर कोठे करण्यात येणार आहे ह्याची माहिती मिळवेल. त्याचप्रमाणे ते मंदीर, इमारत किंवा रस्ता बनण्याच्या कार्यात आपला खारीचा का होईना वाटा आहे ह्या गोष्टीने समाधानी होवून आणखी उत्साहाने काम करेल. अशाप्रकारे त्याच्यातील माणुसकी जागृत झाल्याने त्याचे त्याला पडणाऱ्या कष्टांवर लक्षकेंद्रित होणार नाही. तो स्वत:ला बिचारा समजणार नाही. उलट मनात एखादे आवडते गाणे गुनगुनत तल्लीन होवून आपले काम पूर्ण करेल. असेच माणुसकीने कोणत्याही पेशाचे मानक वाढत जाते. त्याचप्रमाणे सेवाभाव व दयाभावाने आपला गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रगाढ होतो. कारण कोणत्याही कामाची फक्त पैसे कमविण्याच्या सीमित हेतूने प्रगती होत नाही. तर पैसा कमविण्यामागे भावनिक कारणाची जोड व सेवेचे मूल्य जोडणे अत्यावश्यक असते. तेव्हाच त्या कामाच्या मार्गातील अडथळे दूर होतात व कामाची भरभराट होते. समाजात शिक्षक, डॉक्टर व पोलीस हे पेशे अत्यंत कर्तव्यदक्ष व महत्वाचे असतात. तेव्हा त्या पेशाला निभावणाऱ्या व्यक्तीने माणुसकी धर्माचे सर्वतोपरी पालन केले पाहिजे. शिक्षक विद्येच्या दानाने, डॉक्टर जीवनादानाने तर पोलीस देशसेवेने कळत नकळतपणे माणुसकीचे जतन करत असतात. परंतू ह्याविषयी त्यांना जागरूकता असली पाहिजे. तरच ते आपल्या अंतर्गत करुणेने त्यांच्या पेशाला समृद्ध करू शकतील.

2. मर्यादांचा सम्मान करून माणुसकीला जपावे 

   आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असणे व आपल्यामुळे इतरांची मर्यादा भंग पावणार नाही ह्याची नेहमी काळजी घेणे म्हणजे हे माणुसकीला प्रोत्साहन देणे आहे. त्यासाठी नातेसंबंध जपतांना, शेजारधर्म निभावतांना तसेच माणसाने माणसाशी वागतांना माणुसकीला प्रादान्य दिले पाहिजे. त्यामुळे विश्वासाघातापासून, अनैतिकसंबंधांपासून, फसवेगीरीपासून, चोरीचपाटी करण्यापासून स्वत:ला व इतरांनाही वाचविता येवू शकते. तेव्हा आपण नेहमी आपल्या वर्तनाचे तसेच आपल्या वाणीचे परीक्षण केले पाहिजे. आपल्या वर्तनातून कोणामध्ये भेदभावाची भावना निर्माण करणे. किंवा कमीपणा आणण्याचा प्रयत्न करणे. तसेच आपल्या भौतिक श्रीमंतीच्या व ख्यातीच्या प्रदर्शनाने कोणास मानसिकरीत्या विचलीत करणे हे पूर्णपणे अमानवीय कृत्य आहे. ज्यामुळे इतरांना मानसिक त्रास तर होतोच त्याचबरोबर त्यांच्या संयमाची मर्यादा भंग होण्याची शक्यता देखील असते. तेव्हा आपण नेहमी आत्मजागृकतेने जीवन जगले पाहिजे. आपल्या वागण्याने कळत नकळतपणे इतरांसाठी असुवीधापूर्ण वातावरण निर्माण होणार नाही ह्याचे नेहमी भान ठेवले पाहिजे. कारण आपल्या असभ्य व अरेरावी वर्तणुकीने आपण केवळ समाजात अराजकताच पसरवत असतो. ज्यामुळे आपसात ओलाव्याने समृद्ध असे माणुसकीपूर्ण बंध कधीही निर्माण होवू शकत नाहीत. मर्यादा ह्या संबंधांचा गोडवा जपत असतात. जर त्यांचे कशाही पद्धतीने उल्लंघन झाले तर नकारात्मकतेचा उद्रेक होतो. बर्याचदा आपल्या जवळची माणसेच आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा उचलतात आणि आपल्याला कमीपणा आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. हे देखील मर्यादा ओलांडणेच आहे. कारण जेव्हा आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो तेव्हा आपल्या वाईट काळात ज्यांनी आपली साथ सोडली होती ते आपल्या कायम लक्षात राहतात. परंतू ते आपल्या हृदयातून पूर्णपणे बाहेर पडलेले असतात. त्यानंतर त्यांच्या आपल्या आयुष्यात असण्या नसण्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. तेव्हा आत्मपरीक्षणाच्या सहाय्याने आपल्या मर्यादांचे भान ठेवणे हे माणुसकीपूर्ण वर्तन आहे. 

3. दयेच्या मार्गाने माणुसकीला जपावे 

   उच्च जीवनशैली, ख्याती तसेच धनसंपत्तीचा अति मोह माणसातील विवेक नष्ट करत असतो. त्यामुळे आपल्याला आपण ज्या सुवीधाजन्य जीवनाचा उपभोग घेत आहोत त्यामागे एक मोठी शृंखला आहे जी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भरडली जात आहे ह्याची कधी जाणीवच होत नाही. परंतू हे आपलेच दुर्दैव आहे कि आपण एक माणूस असून सुद्धा आपल्यातील ती माणुसकीची क्षमता आपल्याच लालसेपायी गमावली आहे. ज्याप्रमाणे फार पूर्वीच्या काळात समाजात चार वर्णभेदांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांना कठोर शासन दिले जात असे आणि त्यातही माणुसकीचा विचार केला जात नसे. त्याचप्रमाणे आज गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झालेले आहेत. ज्यात श्रीमंतांच्या अविवेकीपणामुळे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे गरीबांना भुर्दंड बसतो. ज्याला कदापि माणुसकीचे प्रमाण नसते. त्यामुळे आज आपल्या माणूस असण्याला भौतिक समृद्धीच्या जोरावर श्रीमंतीचा अहंकार जोडण्याची नाहीतर आपल्या अंतरंगात दयाभाव जागवून सृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची व आपल्या जन्म घेण्याचे ऋण फेडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण आपल्या सभोवती एक असे विश्व निर्माण केले पाहिजे जिथे नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाचा विचार असेल, प्राण्यांप्रती दयाभाव असेल, जंगलांच्या वृद्धीचा विचार असेल, पर्यावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याकरीता अथक प्रयत्न केले जातील. जेणेकरून आपले पृथ्वीतलावरील अस्तित्व सर्वांसाठी लाभकारी असेल नुकसानदायक ठरणार नाही. तेव्हा फक्त समाजात आपला रुतबा निर्माण करण्याच्या स्वार्थी हेतूने इतरांचे पाय ओढणे म्हणजे माणुसकीलाच नाकारण्या सारखे आहे. परंतू आपल्या समर्थनशील व्यवहाराने समानतेचा प्रसार करणे हे खऱ्या अर्थाने माणुसकीचा ठेवा जतन करण्यासारखे आहे.  

4. मानवी व्यक्तीमत्वाचे प्रकार माणुसकीला आव्हान करणारे असावे 

   आजचे जग मानसिक आरोग्याविषयीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास, वाढत्या प्रतिस्पर्धा, पैस्याचे वाढते मूल्य त्याचबरोबर व्यक्तीमत्वाचे प्रकार जे जगाशी सामना करतांना आपल्यासाठी मोठी अडचण बनत असतात ह्या महत्वपूर्ण गोष्टी कारणीभूत आहेत. खरेतर आपण लाजाळू व शांत असणे तसेच मिलनसार व बोलके असणे ह्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या विशेषता असतात. ज्यांचे स्वत:मध्येच काही महत्व असते. जसे व्यक्तीमत्वाने शांत असणाऱ्या व्यक्ती समजूतदार, संयमी, उत्तम ऐकूण घेणाऱ्या असतात. तर बोलक्या व्यक्ती दयाळू व सर्वांना सामावून घेणाऱ्या असतात. परंतू बर्याचदा ह्या गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येते आणि व्यक्तीमत्वातील दोषांवर पूर्णपणे लक्षकेंद्रीत करून त्या व्यक्तीचा द्वेष केला जातो, त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याच्यावर हसण्यात येते. ह्या अमानवीय प्रकारांमुळे प्रत्येकच वयोगटातील व्यक्तींना असहनीय मानसिक त्रास सहन करावा लागतो. कधीकधी हा मनातील न दिसणारा संघर्ष त्यांना पूर्णपणे कोलमडून टाकत असतो. कारण जो इतरांपेक्षा निराळा आहे त्याला जग सहजा सहजी स्वीकारत नाही. जगाचा अत्यंत कठोर चेहरा फक्त त्यांनाच पहावयास मिळतो. अशाप्रकारे त्यांचा हळूहळू करून माणुसकीवरचा विश्वास उडत जातो. परंतू माणुसकीला आता हे आव्हान असले पाहिजे कि आपल्या सारखाच एक मनुष्य असूनही त्याच्यातील वेगळेपणामुळे आपण केवळ त्याचा स्वीकार करणेच अमान्य करत नाही. तर माणुसकीच्या पातळीवरून खाली उतरून त्याची अवहेलना देखील करत आहोत. तेव्हा ज्यांना सृष्टीने जन्म दिला व विशेष घडवून ह्या जगात ज्यांचे आव्हानात्मक जीवन घडविले त्यांना आपला इतिहास घडविण्याची आंतरिक ताकदही बहाल केली आहे. म्हणून त्यांनी आत्मपरीक्षणावर भर देवून  स्वत: आपल्या जीवनात नेहमी माणुसकीला प्रादान्य देवून माणुसकीलाच आव्हान केले पाहिजे.

   माणसातील माणुसकी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. व्यक्तिगत पातळीवर तिचे जतन केले गेले नाहीतर संपूर्ण जग आंतरिकदृष्ट्या कोरडे होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आपल्यापैकी प्रत्येकाला महात्मा बुद्धांनी दाखविलेल्या शांतीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या देहाचे एक सीमित आयुष्य  असते. परंतू त्यात जतन केलेली माणुसकी ही दैवी अनुभूती आहे. तेव्हा आपला देह जिवंत असे पर्यंत त्याच्या माध्यमातून माणुसकीचा प्रसार करून, माणुसकीला प्रोत्साहन देवून व तिला प्रादान्य देवून माणुसकीचा अनमोल ठेवा आपल्या देहाच्या तिजोरीत जपला पाहिजे. 

1 thought on “देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *