दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष

 नवीन पिढीचा उदय होणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्याचबरोबर त्या पिढीस घडविण्याचे कार्यही मागे पडत चाललेली जुनी पिढीच करत असते. तरीदेखील ह्या दोन पिढ्यांमध्ये आपोआपचकधी ना कधी अंतर निर्माण होते. तसेच हे अंतर बरेचदा त्यांच्यातील संघर्षाचे कारणही बनते. कारण नव्या युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे,  शिक्षणपद्धतीमुळे नवीन पिढीस लाभलेले विशेषाधिकार त्यांच्या बुद्धीमत्तेस तल्लख बनवित आहेत. त्यामुळे त्यांचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जुन्या पिढीच्या तुलनेत जास्त व्यापक झालेला असतो. त्यांच्या नजरेत गोष्टींकडे बघण्याचे कुतूहल व जागरूकता असते. त्यांच्यापाशी जीवनाचा वर्षो नु वर्षांचा अनुभव नसला. तरी ते आपल्या बुद्धीचातुर्याने गोष्टींचे संदर्भ बदलतात. म्हणूनच काळानुरूप दोन पिढ्यांमधील अंतर हे आणखी वाढतच जाते. कधीकधी हे अंतर वस्तुस्थितीत अमुलाग्र बदल आणण्यास ठोस कारण ठरते. तर कधी त्या अंतरामुळे त्यांच्यात   संघर्षाची वात पेटली जाते. त्यामुळे दोन्ही पिढ्यांना विविध मार्गांनी त्रासही सहन करावा लागतो. त्यासाठी त्यांच्यातील वैचारिक मतभेद हे कारण विशेष कारणीभूत ठरते. कारण आपल्या विचाराना व कठोर नियमांना काही प्रमाणात सवलत देवून त्यावर पुनर्विचार करण्यापेक्षा त्यांना ताणून धरण्यात व नवीन पिढीच्या मनावर त्यांचे दडपण आणण्यात जुन्या पिढीला जास्त धन्यता वाटत असते. परतू केवळ आम्ही तुमच्यापेक्षा वडीलधारी आहोत किंवा आम्ही तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले म्हणून जुन्या विचारांना  पाउलखुणा समजून त्यावरूनच नव्या पिढीने मार्गक्रमण  करावे. अशी सक्ती करणे योग्य नाही. कारण त्या गोष्टी शैक्षणिक व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या असणेही गरजेचे आहे. त्याशिवाय तसा अट्टाहास बाळगणे म्हणजे आजच्या बदलत चाललेल्या जगाबद्दल अविश्वास दाखावीन्यासारखेही आहे. जर आपण इतरांच्या विचारांना, ज्ञानाला प्रमाण मानून जीवनात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पाहिले तरीही ते ज्ञान आपल्या व्यक्तीमत्वात उतरविणे सर्वस्वी आपल्याच हाती असते. तेव्हा आपले व्यक्तीमत्व केवळ आपणच घडवू शकतो. म्हणूनच आपल्या विचारांना परिस्थितीच्या गाम्भिर्यानुसार परिवर्तनशील ठेवणे ही एक गोष्ट दोन पिढ्यांमध्ये संघर्षाऐवजी सलोख्याचे  संबंध निर्माण करण्यास मदत करू शकते.  

   घरातील कौटूम्बिक वादविवाद, आई वडीलांचे आपसातील बिघडलेले संबंध ह्यामुळे मुलांना घरात त्यांचे मनोबल वाढविणारे व सुरक्षित वातावरण मिळू शकत नाही. आपल्या नकळत्या वयात कुटुंबात उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देता देता ते त्यांच्या वयानुसार त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना विचार करून न्याय देवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात विश्वास निर्माण होवू शकत नाही. कारण त्यांच्या नाजूक भावनांना उत्तमरीतीने सांभाळले गेलेले नसते. आईवडीलही त्यांनी बऱ्या न केलेल्या त्यांच्या व्यक्तीमत्वातील कमकुवत गोष्टी आपल्याच मुलांच्या मनावर बिम्बवीन्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर आईवडील असल्याचा हक्क ते चुकीच्या पद्धतीने मुलांवर गाजवितात. मुलांवर अवाजवी अपेक्षांचा भडीमार करून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. ह्या प्रक्रियेत एक माणूस म्हणून मुलांचा आत्मसम्मान चिरडला जातो. कारण मुलांना प्रेरित करण्याच्या हेतूने त्यांच्यातील उणीवांवर बोट ठेवून त्यांना उत्तेजित केले जाते. त्याचबरोबर भौतिक श्रीमंतीचा पाठलाग करत असतांना आई वडीलांचे मुलांकडे दुर्लक्ष होत जाते. अशावेळी मुलांच्या मनावर आई वडीलांच्या वर्तणुकीचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्या आवेगात ते त्यांच्या विरोधात बंड पुकारू शकतात. किंवा तारुण्याच्या जोशात डोक्यात राग घालून आई वडीलांनी त्यांच्याकरीता ठरविलेल्या हेतू पासून परावृत्तही होवू शकतात. त्याचप्रमाणे मुलं जर जास्त संवेदनशील असली तर स्वत:चा आत्मविश्वासही गमावून बसतात. परंतू जर आई वडीलांनी मनात आणले तर ते आपल्या तरुण मुलांच्या गोष्टी उत्तमरीतीने समजून घेवून त्यांचे मार्गदर्शनही करू शकतात. कारण त्यांनीही त्यांच्या आयुष्यात वयाचा तो नाजूक टप्पा पार केलेला असतो. त्यांनीही त्या वयात होणाऱ्या चुकांचा सामना करत यशस्वीरीत्या त्यामधून बाहेर पडलेले असतात. तेव्हा त्यांच्या इतके अनुभवी व हक्काचे आई वडील असतांना मुलांना त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बाहेर भटकण्याची आवश्यकताच पडणार नाही. परंतू असे होत नाही. कारण ते आपल्या अनुभवी डोळ्यांनी मुलांना योग्य दिशेने घेवून जात नाहीत. तर आपल्या हक्काचा गैरवापर करून मुलांचे स्वत:साठी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. 

   आई वडीलच मुलांवर संस्कार करत असतात. तेव्हा त्यांनी आपल्या संस्कारांवर विश्वास ठेवून तरी मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलांच्या आयुष्यात नैसर्गिकपणे घडत असलेल्या घटनांना त्यांना स्वत:ला सामोरे जावू दिले पाहिजे. त्यांनाही चुकू दिले पाहिजे तरच ते त्या अनुभवांमधून काही धडे घेत घेत आयुष्यात पुढे जातील. सतत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असलेले आई वडील बनण्यापेक्षा आपल्या विश्वासाची त्यांना जाणीव व्हावी केवळ एवढा दृष्टीकोन ठेवला. तरी पुढे त्यांच्या हातून झालेल्या  चुका त्यांच्या लक्षातही येतील. त्यानंतर त्यांना त्यामधून बाहेर येण्यासाठी मदतही करावी. कारण चुकणे हा काही गुन्हा नाही. परंतू त्या चुकांमधून काही महत्वाचे अर्जित न करता बाहेर पडणे व पुन्हा पुन्हा त्याच चुका करून आयुष्य वाया घालविणे हा मात्र मूर्खपणा ठरतो. आयुष्यात ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कधीही सरळ व सोपा नसतो. त्यासाठी भटकण्याची तयारीही ठेवावी लागते. तेव्हा आई वडीलांनी मुलांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच वागावे म्हणून त्यांना धारेवर धरण्यापेक्षा त्यांचा हात आपल्या हातात घेवून त्यांच्यात विश्वास जागवावा. त्यांच्या चुकांना मोठ्या मनाने आपल्या पदरात घेवून त्यांना पुन्हा नव्याने सुरवात करण्याची संधी द्यावी. तरच ते मुलांच्या नजरेत स्वत:साठी आदरयुक्त भाव पाहू शकतील. अशाप्रकारे जेव्हा दोन पिढ्यांमधील अंतर हे सर्वदृष्टिकोनाने सुरक्षेचे प्रमाण ठरते. त्याचप्रमाणे त्यांच्यात आदर आणि सम्मान दिसतो. तेव्हा दोन्ही पिढ्या एकमेकांसोबत सुखा समाधानाने नांदतात. अन्यथा त्यांच्यात संघर्षाची ठिणगी पेट घेते. 

   नवीन पिढी आपल्या तारुण्यातील प्रेमासम्बंधीत कोवळ्या व निर्दोष भावनांनाही जुन्या पिढीच्या अलवचीक व कठोर विचारांमुळे त्यांच्या पासून लपविण्याचा प्रयत्न करत असते. कारण आई वडील त्या भावनांना समजून घेणार नाहीत. किंवा त्यांच्याकडून त्या भावनांना काळजीपूर्वक सांभाळले जाणार नाही. असे मुलांना ठामपणे वाटते. कारण अनेक तर्क वितर्कांच्या व जातीभेदांच्या काटेरी साखाळदंडाने त्या भावनांना जखडले जाते. तसेच त्यांच्यावर अविश्वासही दाखविला जातो. त्याचप्रमाणे प्रेमाच्या त्या अंकुरास निर्दयीपणे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात येतो. अशाप्रकारे मुलांच्या वयाचा तो टप्पा आई वडीलांना समंजसपणे हाताळता येत नाही. त्या नैसर्गिकपणे येणाऱ्या अतिशय सुंदर गोष्टीला इतके चीघळवले जाते कि तो विषय दोन पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे कारण ठरतो. त्यामुळे नाईलाजास्तव मुलं आपल्या व्यक्तीगत गोष्टी घरच्यांपासून लपवू लागतात. कारण ते त्यांच्या अनावर झालेल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. अशावेळी आई वडीलांनी जर मुलांचे स्वातंत्र्य हिरावून न घेता आपल्या मनात करुणा जागवून त्या विषयी सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तर मुलांच्या मनावरचे दडपण कमी होण्यास मदत मिळेल आणि त्यांचे मन मोकळे झाल्यामुळे ते शांतही होतील. त्यानंतर सौम्य भाषेत त्यांना गोष्टींच्या दुष्परीनामांची कल्पना देता येवू शकते. सद्यपरिस्थितीत त्यांनी कशाला प्राथमिकता देणे महत्वाचे आहे हेही समजावून सांगता येवू शकते. कारण ज्या गोष्टी द्वेषाने व बंधने लादून सोडविता येत नाहीत. त्या मोकळेपणाने केलेल्या संवादातून सहज सुटतात आणि दोन पिढ्यांमधील संबंधही उत्तम राहतात. 

   आपण आपल्या आपसातील नात्यांना व त्यांच्याशी जुळलेल्या कर्तव्यांना जीवनात अतिशय महत्व देतो. परंतू कधीकधी आपल्याच माणसांना एक माणूस म्हणून समजून घेण्यास आपण कमी पडतो. त्यांच्या वेदना व व्यथा खोलवर जावून आपल्याला जाणून घ्यायच्या नसतात. घरातील स्त्रिया व मुलं हे कायमच ह्या गोष्टींना बळी पडतात. बऱ्याच घरात मुलांना अपेक्षेप्रमाणे गुण पडले नाहीतर त्यांना अशाप्रकारे अपमानित करण्यात येते कि तो अपमान आजीवन त्यांच्या लक्षात राहतो. आई वडील आपल्या भल्यासाठीच बोलतात. त्यांना प्रतिउत्तर देणे योग्य नाही. तसेच आपण त्यांच्या अपेक्षेस पूर्ण पडू शकत नाही. अशाप्रकारे स्वत:वरच दोषारोपण करून मुलं आपल्याच आत्मसम्मानास गेलेला तडा आजीवन आपल्या मनात ठेवून जगत असतात. परंतू घरातील मोठी माणसे मात्र मोठ मोठ्या चुका करूनही आपले वडीलधारीपण मोठ्या इतमामात मिरवत असतात. कारण त्यांना जाब विचारणारे कोणीही नसते. जेव्हा मोठ्यांना त्यांनी केलेल्या चुकांची कबुली देणे जमत नाही. किंवा त्याविषयी दिलगिरी व्यक्त करता येत नाही. तेव्हा कोठे ना कोठे ते मुलांच्या मनातील स्वत:साठीचा आदर गमावून बसतात. अशावेळी वरवर दिसत नसला तरी दोन पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण झालेला असतो. कारण आई वडील असले तरी एक माणूस म्हणून नियम सर्वांसाठी सारखेच असतात. 

   आज अशाप्रकारच्या अनामिक संघर्षामुळे अनेक घरांमध्ये क्लेशपूर्ण कौटुंबिक वातावरण बघायला मिळते. कारण घरातील एखाद्या कारागृहांप्रमाणे असलेल्या बंधनांमुळे मुलांच्या मनातील गोष्टी मनातच राहून जातात. त्यांना जगाने दिलेले दु:ख घर नावाच्या चार भितीत येवूनही मोकळेपणाने बोलता येत नाही. तसेच विसरताही येत नाही. माणसाच्या हातून चुका होणे ही एक नैसर्गिक गोष्ट असते. परंतू तरीही आपल्या हातून कदापि चुका होता कामा नये ही केवीलवाणी धडपड मुलं करत असतात. कारण चूक समजून घेतली जात नाही. तसेच चुकीसाठी माफीही दिली जात नाही. तर चुकीसाठी अत्यंत वाईट पद्धतीने अपमानित करण्यात येते. किंबहुना जवळ जवळ आत्मसम्मानच पायदळी तुडवला जातो. अशावेळी मुलांचे कमकुवत व एकटे पडलेले मन जीवनाला नाकारून मरणाला मिठी मारण्यास आतुर होते. मुलांचे जगणे इतके कठीण होण्यासाठी आज कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. ह्यावर विचार विमर्श होणे गरजेचे आहे. कारण सद्यस्थितीत नवीन पिढीच जास्त प्रमाणात अशाप्रकारच्या दुर्दैवी मार्गाचा अवलंब करतांना दिसत आहे. कारण  गरज असतांना त्यांना भावनिक व मानसिक आधार घरातून मिळत नाही. त्यांच्या भावना अनावर झालेल्या असतांना कोणीही त्यांना समजून घेत नाही. जग त्यांना नाकारत असतांना घरातूनही त्यांचा कोणी स्वीकार करत नाही. अपेक्षा व प्रतिस्पर्धा गळ्यातील फास बनून त्यांच्या जीवावर उठलेले असतात. परंतू हा संघर्ष कशासाठी व कोणाबरोबर चालला आहे. ह्याचेही कोणास भान उरलेले नसते. मात्र एकेदिवशी सर्वकाही शांत होते कारण ह्या संघर्षाने पुन्हा कोणाचा तरी बळी घेतलेला असतो. तरीही प्रत्येकवेळी त्यामधून कोणी काहीही धडा घेत नाही. त्यामुळे संघर्षाची वात कायम तेवत राहते पुन्हा कोणाचा तरी बळी घेण्यासाठी.  

1  घरात मैत्रीपूर्ण वातावरण असले पाहिजे 

   ज्या घरास आपण सर्वात सुरक्षित व हक्काची जागा मानतो कधीकधी ते ठिकाणच आपल्याला अनोळखी असल्याप्रमाणे भासते. आपलीच जिवाभावाची माणसे आपल्याला परकी वाटू लागतात. जेव्हा ती आपल्याला समजून घेण्यास अपात्र ठरतात. आपण जिथे जन्म घेतला. ज्या माणसांमध्ये लहानाचे मोठे झालो. काही कारणाने त्यांचाच सहवास आपल्याला इतका नकोसा होतो कि संघर्षाचे कारण ठरतो. परंतू अशी परिस्थिती एका दिवसात निर्माण होत नाही. तर बराच मोठा काळ आपण मनातल्या मनात एकमेकांसाठी नाराजी घेवून तरीही सोबत राहत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. कारण बऱ्याचदा घरात कडक रूढीप्रिय विचारांचे वर्चस्व असते. ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल येण्यास वाव नसतो.  त्यामुळे कोणाच्या भावनांचा बळी जात असल्यास त्याचीही कोणास पर्वा नसते. अशाठीकानी नवीन पिढीच्या नवविचारांची कोंडी होत असते. तसेच त्यामुळे दोन पिढ्यात दरी निर्माण होते. परंतू आज खऱ्या अर्थाने घरातील आपली आपसातील नाती आणि ऋणानुबंध ह्यावर सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण आजची युवापिढी मोठ्या प्रमाणावर मानसिक अस्वास्थ्याचा सामना करत आहे. मुख्य म्हणजे त्यामागे असलेली महत्वाची कारणे घराशी संबंधीतच आहेत. ती म्हणजे घरातील अतिशय कडक शिस्त, तुलना, मुलांच्या भावना व जीवनापेक्षा जास्त महत्वाचे त्यांचे यशस्वी होणे ह्या सर्व गोष्टी माणसांना व नात्यांना यंत्रासम बनवित आहेत. सुख समाधानापासून वंचित ठेवत आहेत. तेव्हा नेहमीच आपल्या विचारांवर तठस्थ राहण्यापेक्षा आपल्या माणसाप्रती प्रेम, आपुलकी, आत्मीयता ह्या सोप्या गोष्टींचा अवलंब करणे जास्त महत्वाचे असते. तरच घरात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होवू शकते. तसेच दोन्ही पिढ्या एकमेकांच्या क्षेत्राचा सम्मान राखू शकतात.    

2  एकमेकांचा भावनिक आधार बनले पाहिजे 

   घरातील मोठ्यांचा असा समाज असतो कि वडीलकीच्या नात्याने नेहमी त्यांनीच लहानांचा आधार बनले पाहिजे. तसेच त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करणे ही देखील ते आपली प्राथमिक जबाबदारी समजतात. ते अगदी योग्यही आहे. परंतू कधीकधी मोठेही त्यांच्या जीवनाच्या अशा वळणावर असतात. जिथे त्यांना हतबल झाल्यासारखे वाटते. आपल्या मनातील भावविवश करणाऱ्या गोष्टी त्यांना कोणा विश्वासू माणसास सांगून मोकळे व्हावेशे वाटते. अशावेळी  त्यांनी आपल्या मनातील शल्य वाटण्यासाठी बिनधास्तपणे आपल्या मुलांची निवड करावी. कारण मुलं आपल्या लहानपणा पासून आई वडीलांना उत्तमरीतीने ओळखत असतात. त्यांच्या व्यक्तीमत्वाची  त्यांना पारख असते. त्यामुळे त्यांचे नवविचारही आई वडिलांसाठी मार्गदर्षनास्पद ठरू शकतात. आई वडीलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मुलांना पटत नसल्या तरी त्या मान्य करण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात येते. परंतू कधी आई वडीलांनीही दोन पावले मागे घेवून आपल्या मुलांचे विचार अमलात आणण्याची तयारी दाखविली. तर मुलं भावनेच्या माध्यमातून आई वडीलांच्या आणखी जवळ येवू शकतात. त्याचबरोबर एकमेकांना भावनिक आधार दिल्याने दोन पिढ्यांचे अंतर जे मजबूत भिंतीसारखे त्यांच्या दरम्यान होते ते आपोआपच संपुष्टात येते. 

3  मोठ्यांनी स्वत:ला जीवनात सिद्ध केले पाहिजे 

   जेव्हा मोठ्यांनी जीवनात संघर्ष करून स्वत:ला सिद्ध केलेले नसते. तेव्हाच ते लहानांकडून त्याविषयी उमेद किंवा अपेक्षा लावून बसलेले असतात. त्यासाठी मुलांना कडक शिस्त लावण्याच्या नावाखाली नजरकैदेत ठेवतात. त्यांच्यातील क्षमतांना नकारात्मक पद्धतीने आव्हान करतात. कारण मुलांचे यश हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनलेला असतो. त्यासाठी ते आपल्याच मुलांच्या आत्मसम्मानास पणास लावून त्यांना कितीही मोठी किंमत चुकविण्यास लावू शकतात. परंतू असे करून त्यांनी आपल्याच मुलांच्या मनातील आपले स्थान गमावलेले असते. ह्याची त्यांना जाणीवही नसते. म्हणून मोठ्यांनी सर्वप्रथम आपल्या मुलांसमोर स्वत: एक उदाहरण बनले पाहिजे. जेणेकरून मुलांना त्यांच्याकडून आजीवन प्रेरणा मिळत राहील. त्यांनी मुलांच्या क्षमतांना समजून घेवून त्यांच्यात विश्वास जागविला पाहिजे. त्यांच्या आवडी निवडी व त्यांच्यातील कलाकौशल्यांना प्रादान्य देवून त्यात त्यांना पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी त्यासंबंधीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: सक्षम बनले पाहिजे. त्याशिवाय मुलांची इतरांशी तुलना करण्यापासून स्वत:ला थांबविले पाहिजे. तेव्हाच ते मुलांची मनं जिंकण्यात यशस्वी होवू शकतील. त्यासोबत मुलंही आई वडीलांच्या अडचणींना समजून घेवू शकतील. तसेच त्यांच्या इच्छेखातर आपल्या आयुष्यात आई वडीलांची स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतील. अशापद्धतीने दोन पिढ्या एकत्र येवून  जीवनात इतिहास रचू शकतात. 

4  एकमेकांना करुणेच्या भावनेने समजून घेतले पाहिजे

   मनातील करुणेचे भाव हे कोणाच्याही हसण्याच्या मागे दडलेल्या वेदना व बोलण्यातील व्यथा खोलवर समजू शकतात. जर आपले आई वडील आपल्यावर संतापलेले असतील. किंवा कधी जर ते आपल्याला क्षुल्लक कारणावरून घालून पाडून बोलत असतील. तर लगेचच त्यांचे म्हणणे शब्दश: घेणे योग्य नाही. कारण कधीकधी ते एखाद्या समस्येत अडकले असू शकतात. त्यावरून होणाऱ्या चिडचीडीमुळे त्यांनी आपल्यावर राग व्यक्त केलेला असू शकतो. अशावेळी मुलांनी आई वडीलांना त्यांच्या स्थानावर राहून समजून घेतले पाहिजे. त्यांची आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी रागाच्या भरात केलेल्या वक्तव्याचा आपल्या मनाप्रमाणे कोणताही अनुचित संदर्भ लावू नये. त्याचप्रमाणे आई वडीलांनीही आपल्या मुलांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध स्थापित केले पाहिजे. जेणेकरून मुलांच्या जीवनात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आई वडीलांची निवड करावी. मुलं त्यांच्या जीवनात कितीही मोठ्या समस्येशी झुंझत असले. तरी आई वडीलांच्या भक्कम पाठिम्ब्याने त्यांचे मनोबल कायम राहावे. आई वडीलांनी मुलांच्या वयाचा, क्षमतांचा व क्षेत्राचा नेहमी आदर राखावा. आपल्या कोणत्याही वक्तव्याचा त्यांच्या मनावर कितपत परिणाम होवू शकतो. ह्याविषयी दूरदृष्टी व जाणीव ठेवावी. अशाप्रकारे करुणेच्या नजरेतून पाहिल्यास आपण समोरच्या व्यक्तीस जास्त जवळून समजू शकतो. त्याचा कोणतीही कृती करण्यामागचा हेतू ओळखू शकतो. कधीकधी दोन पिढ्यांचे एकमेकांना गोष्टी पटवून देण्याचे मार्ग मन दुखावणारे व चुकीचे असू शकतात. परंतू त्यामागचा हेतू त्यांना स्पष्टपणे कळला. तर मात्र त्यांच्यात संघर्ष निर्माण होणार नाही. 

   पूर्वी एकत्र कुटूंब पद्धतीमुळे कितीतरी पिढ्या सोबत सुखाने नांदत असत. परंतू आता मात्र विभक्त कुटूंब पद्धती अस्तित्वात आहे. मुलांना आजी आजोबांचा सहवास लाभनेही आता दुर्मिळ झाले आहे. तरीही ज्यांना हे सुख लाभले आहे त्यांनी त्यांच्या सोबतच्या त्या सहवासाला आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण समजले पाहिजे. त्याचप्रमाणे जुन्या पिढीनेही नव्या पिढीबरोबर आनंदाने जुळवून घेतले पाहिजे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्यात विचारांची देवाण घेवाण झालीच पाहिजे. कारण तेव्हाच त्यांच्यातील अंतर कमी होईल जे त्यांच्यामधील संघर्षास कारणीभूत आहे.      

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *