नात्यांची गुंफण

आपल्या जीवनात नाती फार महत्वाची असतात. कारण नाती म्हणजे ह्या विशाल अनोळखी जगात काही निवडक माणसे असतात. ज्यांच्या हृदयात आपल्यासाठी महत्वाचे स्थान असते. ती निवडक माणसे आपल्याशी निगडीत सुख-दु:खाशी संलग्न असतात. जे आयुष्याच्या कठीण वळणावर आपली सोबत करतात. जे आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवितात. जे आपल्या पासून दूर असले तरी आठवणींच्या स्वरूपात कायम आपल्या हृदयाच्या निकट असतात. जे आपल्या आनंदाने सुखावतात तर डोळ्यातील अश्रूंनी व्यथित होतात. जसे पाण्यावर काठी मारल्याने पाण्याचे दोन भाग होत नाहीत. तसेच कोणत्याही नात्यात कितीही कालावधी गेला व मतभेदांची दरी निर्माण झाली तरी नाती दुभंगत नाहीत. फक्त त्यांच्यात गैरसमजाचा एक अदृश्य पडदा आलेला असतो. त्यांच्यात निर्माण झालेल्या अपेक्षांची आपसात पूर्तता न झाल्याने नाती दुरावली जातात. त्यामुळे नात्यांची गुंफण सैल होते. परंतू पूर्णपणे सुटत नाही. कारण त्यांच्या अंतर्मनात एकमेकांसाठी असलेले प्रेम तसेच कायम असते. परंतू त्या प्रेमावर अपेक्षांचा, गैरसमजाचा, मतभेदाचा, हेव्यादाव्याचा, प्रतिस्पर्धान्चा स्तर तयार झालेला असतो. तसेच त्या नकारात्मक स्तरांच्या ओझ्याखाली नात्याची परवड होत असते. परंतू आपण मात्र त्या स्तरांना बाजूला न सारता नात्यांना दुषणे देवून त्यांचा गळा आवळत असतो. 

          पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम विश्वास आदर समजूतदारपणा व मैत्री ह्या महत्वपूर्ण गोष्टी त्या नात्यास मोकळेपणाने श्वास घेवू देणारे व भक्कमपणे पेलणारे मजबूत खांब असतात. त्यांच्या बळावर ते नाते आजीवन स्थिर उभे राहू शकते. तसेच त्यांच्या मुळेच त्या नात्यास श्रेष्ठ स्वरूपही प्राप्त होते. परंतू काही कारणाने जर हे मजबूत खांब निखळू लागले. किंवा त्यांना तिरस्काराची, अविश्वासाची. अनादराची, भावानाशून्यतेची व शत्रुत्वाची वाळवी पोखरू लागली. तर नात्यातील शांतता संपुष्टात येवून नाते तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजित होते. त्याचप्रमाणे ते तुकडे पुन्हा कधीही जोडता येत नाहीत. म्हणूनच जोडीदाराबरोबरचा आपला जीवनप्रवास हा आपल्याला मानसिक शांततेकडे नेणारा असला पाहिजे. त्याचप्रमाणे पती-पत्नीच्या नात्यात अपेक्षांपेक्षा जास्त पारदर्शकता असली पाहिजे. कारण ते नाते जेवढे उघड उघड असेल तेवढा त्यांच्यातील अपेक्षांचा डोंगर आकाराने कमी कमी होत जातो. त्याचबरोबर नात्याप्रती व्यक्तीगतरीत्या जबाबदारी घेण्याची मानसिकता देखील पतीपत्नी मध्ये वाढीस लागते. किंबहुना दोघांच्या एकत्र येण्याने सुंदरता प्राप्त झालेले ते नाते, जसे च्या तसे जोपासले जावे म्हणून दोघांकडूनही एकत्रितपणे प्रयत्न केले जातात. अशावेळी एकाने दुसर~यावर दाखविलेला विश्वास हा त्या नात्यासाठी जीवनदायी ठरतो. नात्याच्या दिशेने टाकलेली छोटी छोटी पावलेही त्या नात्याला सुख समाधानाने समृद्ध करण्यास कारणीभूत ठरतात. अशाप्रकारे त्या नात्याची गुंफण इतकी घट्ट होते कि नाते पूर्णपणे एकरूप होवून जाते. ज्यामुळे नकारात्मकतेचा एक सूक्ष्म कणही त्या नात्यादरम्यान शिरकाव करू शकत नाही.  

         नात्यांना केवळ मनुष्याच्या जगातच महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे नात्यांमधली विविधता व त्यांना समजून घेवून जोपासण्याची कला मनुष्य जातीस विलक्षण स्वरूप प्राप्त करून देत असते. कारण आपण नात्यांमध्ये भावनांच्या नाजूक तारेने गुंतलेलो असतो. आपण नात्यांच्या स्वरूपात एक असे भावनिक जग निर्माण करतो. जे कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहणार नाही हे आपल्यालाही ठाऊक असते. त्यामुळेच आपल्या मनाला वेदनाही होतात. परंतू नात्यांमध्ये अंतर येण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात. कधी एक नाते मागे पडून नवीन नाते उदयास येते. कधी शिक्षण किंवा मिळकतीच्या कारणांनी घरापासून लांब रहावे लागते. तर कधी आपसातील हेव्यादाव्यांनी नात्यात दरी निर्माण होत जाते. मात्र बहुतेक वेळा मनातील दुराव्यामुळेच नात्यात गैरसमज वाढीस लागतात. परंतू नाती मनापासून निभावण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्यापाशी फक्त प्रेमळ व सर्जनशील मन असले पाहिजे. कारण इतर गोष्टी त्याच्या पुढे नगण्य असतात. आपण मात्र नात्यांवर अवाजवी अपेक्षा थोपवून त्यांना दु:खात लोटतो. नात्यांना भौतिक श्रीमंतीशी तोलून त्यांच्याशी जुळलेल्या भावनांचा अपमान करतो. तसेच त्यांना दूर सारतो. नात्यांना  द्वेष मत्सरांनी विषारी बनवितो. त्यामुळे नात्यांची गुंफण सुरवातीला सैल होते. परंतू तरीही आपल्यातील मीपणामुळे आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या उघडत नाहीत. परिणामस्वरूपी एकेदिवशी नात्यांचे नाजूक धागे कायमचे एकमेकांपासून विलग होतात. 

        आपण नात्यांमध्ये नकारात्मक पद्धतीने पराक्रम गाजावीन्यास निघतो. आयुष्यभर एकमेकांचा तिरस्कार करून छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांचे तोंड न बघण्याचे टोकाचे निर्णय घेतो. परंतू राग तिरस्कार हे नात्यांच्या जगात विषारी नागांप्रमाणे असतात. त्यांच्यामुळे निर्माण होणारी उर्जा ही होरपळून टाकणारी असल्यामुळे दु:खाचे कारण बनते. आपले हे आयुष्य सीमित असले तरी जिवलग नात्यांमुळे आपण ह्या जीवनप्रवासात रेंगाळतो,विसावतो व आपल्या भावना गुंतवितो. त्यामुळे आपल्याला जीवनाचा आनंदही घेता येतो. परंतू जर आपण आताच्या आधुनिक तंत्रज्ञांनाप्रमाणे त्वरीत व क्षणिक सुख मिळविण्याचे धोरण नात्याप्रती अवलंबले. तर मात्र आपण त्यांच्या विषयी आयुष्यभर फक्त तक्रारीच करत राहतो. त्याचबरोबर आरोपांची पोती रिकामी करत असतो. त्यापेक्षा कोणत्याही नात्याला समजून घेण्यासाठी त्या नात्याबरोबर आपण उत्तम वेळ घालविला. तसेच बोलण्यापेक्षा जास्त आत्मीयतेने ऐकून घेण्यावर भर दिला. तर वाळवंटातील रखरखीत उन्हाप्रमाणे कोरडे झालेले मन पुन्हा ओलेचिंब होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच आपल्या जीवनातील दु:ख व कमतरता इतरांपासून लपविण्यासाठी आपण हसत व आनंदी राहण्याचे कौशल्य अवगत करतो. व आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वावर मुखवटा चढवितो. त्यामुळे आपली मदत करण्यास आपल्या पर्यंत कोणासही पोहचू देत नाही. अशाप्रकारे जीवनात कधी ना कधी आपण एकटे पडतो. परिणामस्वरूपी आपल्या हसत राहण्यामागे दडलेले अतीव दु:ख समजून घेणारे आपल्यापाशी कोणीही नसते. 

        आपण आपल्या भौतिक श्रीमंतीस व आपण मिळविलेल्या यशास आयुष्यभर कवटाळून बसतो. त्याचप्रमाणे नात्यांना मात्र औपचारीकतेने जोपासतो. त्यामुळे नात्यांमध्ये सौहार्दपूर्ण बंध निर्माण होवू शकत नाहीत. कारण त्यासाठी आपण आपले आरामास्थितीचे क्षेत्र सोडायला तयार नसतो. परंतू आपण जर आपल्या सीमित विश्वातून बाहेर येवून आपल्या माणसांशी परस्पर संवाद साधला. त्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकलो. त्यांच्या सुख दु:खात सहभागी होवू शकलो. त्यांच्या मनातील सल बाहेर काढू शकलो. त्यांची काळजी घेवू शकलो व त्यांना प्रेम देवू शकलो तर जीवनप्रवासात आपल्या गाठीला उत्तम अनुभव निर्माण होतात. उत्तम आठवणींची शिदोरी आपल्या पदरात असते. त्यामुळे आपले आयुष्य उजळून निघते. त्याचबरोबर आपल्या जगण्यातून आनंद ओसंडून वाहत असल्याचा अनुभव आपल्याला होतो. अशाप्रकारे आपण गुणवत्तापूर्ण आयुष्याचे पाईक होवू शकतो. 

         आपल्याला आपल्या नात्यांना निस्वार्थ भावाने भरभरून देता आले पाहिजे. त्याचप्रमाणे देण्यामागे कोणताही व्यक्तीगत हेतू नसावा. नाती जोपासतांना आपल्या हृदयात प्रेम व करुणा असली पाहिजे. तरच त्या नात्यामधून आनंद प्रेरणा प्रगती व मैत्रीची द्वारे उघडी होवू शकतात. परंतू नात्यात मीपणास स्थान असेल तर ते नाते साधनसंपन्न राहत नाही. कारण अहंकारामुळे क्षणोक्षणी त्या नात्याचा प्राण घेतला जातो. कोणतेही नाते केवळ एका कारणाने तुटत नाही. तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्याचे तुटणे विभागले जाते. सुरवातीला घडणार~या घटनांवर आपला विश्वास बसत नाही. परंतू नंतर मात्र आपल्या विश्वासास तडा जातो. मन दुखावली जातात आणि शेवटी नात्यातून कायमचे प्राण निघून जातात. त्यानंतर एका छताखाली राहूनही आपण एकाकी जीवन जगत असतो. तेव्हा अहंकारास व शंकेस नात्यात कधीही थारा देवू नये. त्यापेक्षा नात्याचा आदर ठेवून व त्यांच्यात सुरक्षित अंतर राखून त्या नात्यांना सोनेरी छटा लावाव्यात. कारण नाती आपल्या जीवनात खूप महत्वाची असतात. जेव्हा आपण संकटात असतो. जेव्हा आपल्याला आपला आनंद कोणाबरोबर वाटायचा असतो. जेव्हा आपल्या भावना अश्रूंच्या स्वरूपात मोकळ्या करण्यासाठी एक हक्काचा खांदा पाहिजे असतो. अशा सर्व प्रसंगी आपल्यापाशी हक्काची नाती असली कि आपण एकटे पडत नाही. कारण गुणवत्तापूर्ण नात्यांमुळेच जीवनातील तो विशेष काळ आपण सहज रीतीने पार करू शकतो. तेव्हा नात्यांची गुंफण सैल करणाऱ्या गोष्टींचा छडा लावून त्यांना आपल्या जीवनातून जाणीवपूर्वक हद्दपार केले पाहिजे. तसेच नात्यांच्या नाजूक धाग्यांना पुन्हा एकत्रित आणून त्यांची गुंफण घट्ट केली पाहिजे. 

         नात्यांना आजीवन निस्वार्थ प्रेमाने जोपासले पाहिजे. त्यांच्यात औपाचारीकतेस नाहीतर हक्कास स्थान असले पाहिजे. त्याचप्रमाणे नात्यांना आनंददायी व उत्साहवर्धकही बनविले पाहिजे. उत्तम संवादाने त्यांच्यातील गैरसमज दूर केले पाहिजे. त्यांना मनापासून ऐकून घेवून त्यांच्या भावना मोकळ्या होवू दिल्या पाहिजे. तसेच शब्दांच्या पलीकडे त्यांचे मन समजून घेवून त्यांच्या व आपल्या दरम्यान असलेला अवघडलेपणा दूर केला पाहिजे. नात्यांना जपतांना ह्या गोष्टींचे भान राखले गेले तर तो त्या नात्याचा सम्मान असतो. नात्यात गैरसमजांमुळे निर्माण झालेल्या वादांना व अपमानांना कायमचे आपल्या मनात गाठीच्या रूपात स्थान न देता क्षमाशील बनून त्यांचे परिमार्जन केले पाहिजे. कोणाच्या प्रगतीने मनात मत्सराची भावना न आणता आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून त्यांच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे. आंतरिक प्रेमाने व काळजीने नात्याचे पोषण केले पाहिजे. कोणत्याही नात्यात माणुसकीचे व मैत्रीचे सिंचन करून आयुष्यभर नात्याची गुंफण केली गेली नाही. तर नाती विविध कारणांनी आपल्या हातून निसटत जातात. त्यापूर्वी त्यांच्या गोड आठवणी स्मरणीय बनविल्या पाहिजे. 

1 . आपल्या जीवलग नात्यांसाठी दोन पावले मागे येण्याने नात्यांची गुंफण घट्ट होते. 

         वेगाने पुढे सरसावनार~या काळा बरोबर आपण लहानाचे मोठे होतो. उच्च शिक्षणाचा मार्ग पत्करून समाजात नाव रुतबा कमावीतो. त्याचबरोबर मिळविलेल्या यशाने मीपणासही बळी पडतो. आणि आपल्या आता पर्यंतच्या प्रवासात क्षणोक्षणी आपल्या सोबत असणाऱ्या, आपल्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या. वेळ प्रसंगी आपल्याला भरवून स्वत: उपाशी पोटी राहणाऱ्या. रात्र रात्र आपल्या उशाशी बसून आपली आजारपण काढणाऱ्या. आपल्याला सर्वकाही सर्वोत्तम देता यावे म्हणून स्वत:च्या इच्छा आकांक्षा मारणाऱ्या. तसेच आपल्या आत्मसम्मानात भर पडावी म्हणून क्षमता असतांनाही कायम दोन पावले मागे घेवून मोठ्या मनाने हार स्वीकार करणाऱ्या. आपल्या जिवलगांना गृहीत धरू लागतो. आपली आई आपल्या आवडी निवडी जपण्यासाठी स्वत: तिला न आवडणाऱ्या गोष्टी हसतमुखाने व आनंदाने करू लागते. आपले वडील आपल्या प्रती त्यांची जबाबदारी निभावण्यासाठी कष्ट करतांना कशाचीही पर्वा करत नाहीत. परंतू जेव्हा आपले आई-वडील त्यांच्या वयाच्या चौथ्या टप्प्यात असतात. तेव्हा त्यांच्या जुन्या रहानीमाणाची आपल्याला लाज वाटू लागते. त्यांनी काळानुसार स्वत:मध्ये बदल आणावेत अशी आपली इच्छा असते. कारण आपल्या उंचावलेल्या जीवनशैलीस त्यांचे वागणे शोभून दिसत नाही. परंतू कधी जीवनात आपल्याला आपल्या अशा बेपर्वा वागण्याची जाणीव झाली व पश्चाताप करावासा वाटला तर कदाचित त्यांची मनापासून माफी मागण्यासाठी ते जीवितही नसतील. तेव्हा आपल्या माणसांची सोबत हीच आपली शक्ती आहे. त्यांनी आपल्यासाठी कायम स्वत:कडे घेतलेल्या कमीपणाचे ऋण आपण कधीही चुकवू शकत नाही. म्हणूनच त्यांच्यात उणीवा शोधण्याचे पाप कधीही करू नये. ते जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारून त्याना भरभरून प्रेम द्यावे. आणि त्यांची काळजी घेण्याचे व सेवेचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे. 

2. आपले मन हलके व निर्मळ ठेवून आपण नात्यांची गुंफण घट्ट करू शकतो. 

         आपल्याला ह्या अनोळखी जगात स्वत:च्या अस्सल व्यक्तिमत्वावर मुखवटा चढवून वावरणे सहज जमते. परंतू नात्यांमध्ये भावना गुंतवणे व आपल्या यशाचा बडेजाव न मिरवता सौहार्दपूर्ण मनाने राहणे कठीण होते. कारण आपल्या अंतर्मनात स्वार्थ, तुलना, मत्सर, हावरटपणा अशा नकारात्मक गोष्टी दडलेल्या असतात. जेव्हा त्या गोष्टी आपल्या मनाच्या पृष्ठ भागावर येतात तेव्हा आपले मन हलके राहत नाही. आपल्याच माणसांची प्रगती पाहून आपल्या मनात मत्सर जागृत होतो. आपल्याच माणसांच्या कमकुवत परिस्थितीचा गैर वापर करून आपण जगासमोर आपल्या प्रसिद्धीचे इमले उभे करतो. आपणच कायम सर्वात उंच राहावे म्हणून आपल्याच माणसांचे पाय खेचतो. आपल्यातील उणीवा, दुष्ट विचार आपल्या माणसांच्या मनावर बिम्बवीतो. तसेच फक्त स्वत:लाच महत्व देत राहतो. परंतू आपण कायम हे लक्षात ठेवले पाहिजे कि आपल्याच माणसांबरोबर लावलेल्या ह्या प्रतिस्पर्धा आपल्या मनातील आपल्या विषयीचे स्थान उंच होवू देत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतेही सुख समाधान लाभू देत नाहीत. कारण आपण मिळविलेल्या यशाचा सर्वात जास्त आनंद आपल्याच माणसांना होत असतो. जर आपण त्यांना कोणत्याही प्रकारे आपल्या आनंदाचे वाटेकरी होण्यापासून थांबवीत आहोत. तर आपणही पूर्णपणे आनंदित होवू शकत नाही. तेव्हा आपल्या माणसांच्या मनात स्थान मिळविणे ह्यापेक्षा मोठे कोणतेही यश नसते. तेव्हा आपल्या व त्यांच्या दरम्यान केवळ प्रेम हाच एकमेव  दुवा असला पाहिजे. अशाप्रकारे जीवनाचा हा प्रवास सहज व सोपा होतो. प्रेम देणे व प्रेम घेणे ह्यापेक्षा जास्त आपण ह्या जगात काहीही कमवत नाही. ज्या गोष्टी केवळ आपल्यासाठी जीवन जगण्याचे साधन आहेत. त्यांना तेवढेच महत्व देवून आपल्या माणासांप्रती आपले मन हलके व निर्मळ ठेवावे. तसेच नात्यांची गुंफण घट्ट करावी. 

3 . जीवनात आपल्या माणसांसाठी केलेला त्याग नात्यांची गुंफण घट्ट करतो. 

          जीवनप्रवासात पैसा व प्रसिद्धी मिळविणे हाच बहुतेक जणांच्या जीवनाचा हेतू असतो. त्यासाठी दिवस रात्र एक करत असतांना आपण कित्येकदा आपल्याच माणसांची मन दुखावतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतू आपल्या प्रयत्नांना यश यावे व आपला हेतू साध्य होण्याच्या मार्गात कोणताही अडसर येवू नये म्हणून मनात अंधश्रद्धा जागवून देव देव करत असतो. त्यामुळे आपल्या जीवलगान्च्या हृदयातून आपल्यासाठी निघणाऱ्या आशिर्वादांचे महत्व आपल्याला कळत नाही. जास्तीत जास्त पैसा कमवून आपण श्रीमंत नक्की होतो. परंतू आशीर्वादांच्या पाठबळा शिवाय भाग्यशाली होवू शकत नाही. त्याचप्रमाणे आशीर्वाद मागून मिळत नाहीत तर ते कमवावे लागतात.  आशिर्वादांचे आपल्या सभोवतालचे वलय इतके मजबूत असते कि ते मरणाच्या दारातूनही आपल्याला परत फिरवू शकते. संकटांच्या काळ्या ढगांपासून आपल्याला सहीसलामत ठेवते. आपल्या पदरातील ही आशीर्वादांची संपत्ती आपण कोणासही देवू शकत नाही. परंतू जेव्हा आपल्या जीवाभावाची माणसे जीवन मरणाच्या दारात असतात. तेव्हा आपण इतके विचलीत होतो कि आपल्या पदारातील ह्या पुण्याचाही त्याग करण्यास निघतो. कारण ती माणसे आपले सर्वस्व असतात. तसेच त्यांच्या शिवाय आपल्यासाठी काहीही महत्वाचे नसते. त्याग ही नात्यांची अशी परिभाषा आहे जी नात्याला स्वातंत्र्य बहाल करते आणि पडद्या मागे राहून महत्वाची भूमिका निभावते. 

4 .    आपल्या अंतर्गत निष्ठेने व समंजसपणाने नात्यांची गुंफण घट्ट होते. 

         जेव्हा आपल्याला  जिवलग माणसांचे आपल्या आयुष्यातील महत्व कळते तेव्हा त्यांनी केलेल्या प्रगतिचा आपल्याला हेवा नाहीतर अभिमान वाटतो. आपल्या आयुष्यात त्यांच्या साठी प्राथमिकता असते. त्यांची माफी मागतांना आपल्याला कमीपणा वाटत नाही. त्यांच्या मागण्या व हट्ट पुरवीतांना आपल्याला आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होण्याचे सुख मिळते. त्यांच्याप्रती आपले कर्तव्य मनापासून पूर्ण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होवू लागतात. जर आपण आपल्या माणसांची मन दुखावून कितीही पूजा अर्चना केल्या तरी आपण सुखी समाधानी होवू शकत नाही. कारण देव माणसांच्या हृदयात असतो. परंतू आपण जर त्यांच्या हृदयालाच वेदना पोहोचविल्या तर घरातील शांतता भंग होवू लागते. घरातील स्त्रिया हसत मुखाने जेव्हा घरात वावरतात तेव्हा घराच्या भिंतीनाही वाचा फुटते. संपूर्ण घर आनंदाने डोलू लागते. लहान मुलांच्या निरागसपणाने घराचे गोकूळ होते. तेव्हा आपण आपल्या माणसांप्रती आपल्या मनात निष्ठा ठेवली पाहिजे. समंजसपणे त्यांचा सांभाळ केला पाहिजे. एक योग्य माणूस म्हणून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. कारण सुख पैस्याने विकत घेता येत नाही. ते आपल्या जीवलगान्च्या समाधानी नजरेत सापडते. जिथे माणूस शरीर रूपाने एकमेकांपासून कितीही लांब असला तरीही अंतर्मनाची निकटता हा कायम त्यांच्यातील दुवा असतो. तिथेच नात्यांची गुंफण घट्ट होते. 

         नाती प्रत्येकाच्याच आयुष्यात जीवाभावाची असतात. परंतू ती निभावतांना मनात निस्वार्थ प्रेमाबरोबर त्यांच्या प्रती आदर असला पाहिजे. कारण आदर असेल तरच त्यांच्यात करुणा मैत्री आणि विश्वास निर्माण होतो. परंतू त्या नात्याचा उपभोग घेण्याचा तुच्छ हेतू असल्यास. किंवा नात्यात गैरवर्तनास स्थान असेल. तर मात्र  निरागस नाते कोमेजून जाते. तेव्हा नात्यांची गुंफण सैल होवू नये म्हणून नाते नेहमी सन्माननीय राहील ह्याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे.        

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *